शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२६

विष्णुपुराण, पंचम अंश, सप्तम अध्याय | Vishnu Puran, Ansh 5 , Adhyay 7

 

विष्णुपुराणम्

॥ पञ्चमः अंशः ॥ ॥ सप्तमोऽध्यायः ॥

 

"कालिया-दमन"

 

श्रीपराशर उवाच
 एकदा तु विना रामं कृष्णो वृन्दावनं ययौ ।
 विचचार वृतो गोपैर्वन्यपुष्पस्रगुज्ज्वलः ॥ १ ॥

श्रीपराशर म्हणाले ;- एके दिवशी रामला सोबत घेतल्याशिवाय कृष्ण एकटाच वृन्दावनात गेला आणि तिथे वन्य पुष्पमाळांनी सुशोभित होऊन गोपगणांसोबत हिंडू लागला ॥ १ ॥

 


 स जगामाथ कालिन्दीं लोल कल्लोलशालिनीम् ।
 तीरसंलग्नफेनौघैर्हसन्तीमिव सर्वतः ॥ २ ॥

फिरत फिरत ते सगळे चंचल तरंग असलेल्या यमुनेच्या तटावर पोचले जी किनार्‍यावर फेस जमा झाल्याने जणू जोराजोरात हसत आहे अशी भासत होती ॥२॥

 


 तस्याश्चतिमहाभीमं विषाग्निश्रितवारिणम् ।
 ह्रदं कालीयनागस्य ददर्शातिविभीषणम् ॥ ३ ॥

यमुनेत त्यांनी विषाग्निमुळे संतप्त जल असलेले कालियानागाचे महाभयंकर कुण्ड पाहीले ॥ ३ ॥

 


 विषाग्निना प्रसरता दग्धतीरमहीरुहम् ।
 वाताहताम्बुविक्षेपस्पर्शदग्धविहङ्‍गमम् ॥ ४ ॥

त्याच्या विषाग्नीच्या प्रभावाने किनार्‍यावरील वृक्ष जळून गेले होते आणि वार्‍यामुळे उसळणार्‍या जलकणांचा स्पर्श होताच पक्षीगण दग्ध होत होते ॥४॥

 


 तमतीव महा रौद्रं मृत्युवक्रमिवापरम् ।
 विलोक्य चिन्तयामास भगवान्मधुसूदनः ॥ ५ ॥

मृत्युच्या दुसर्‍या मुखासमान ते महाभयंकर कुण्ड पाहून भगवान मधुसूदनाने विचार केला ॥५॥

 


 अस्मिन्वसति दुष्टात्मा कालीयोऽसौ विषायुधः ।
 यो मया निर्जितस्त्यक्त्वा दुष्टो नष्टः पयोनिधिम् ॥ ६ ॥

'ह्यात दुष्टात्मा कालिया नाग राहतो ज्याचे विषच त्याचे शस्त्र आहे आणि जो दुष्ट माझ्याकडून अर्थात माझी विभूति असलेल्या गरुडाकडून पराभूत होऊन समुद्र सोडून इथे पळून आला आहे ॥ ६ ॥

 

तेनेयं दूषिता सर्वा यमुना सागरङ्‍गमा ।
 न नरैगोधनैश्चापि तृषार्तैरुपभुज्यते ॥ ७ ॥

त्याने ही संपूर्ण समुद्रगामिनी यमुना दूषित केली आहे, आता हीचे जल तहानलेल्या माणसांना आणि गाईंना देखील उपयोगाचे राहिले नाही ॥ ७॥

 


 तदस्य नागराजस्य कर्तव्यो निग्रहो मया ।
 निस्त्रासास्तु सुखं येन चरेयुर्व्रजवासिनः ॥ ८ ॥

म्हणून मला ह्या नागराजाचे दमन करायलाच हवे, ज्यामुळे ब्रिजवासी निर्भय होऊन सुखपूर्वक राहू शकतील ॥ ८ ॥

 


 एतदर्थं तु लोकेऽस्मिन्नवतारः कृतो मया ।
 यदेषामुत्पथस्थानां कार्या शान्तिर्दुरात्मनाम् ॥ ९ ॥

“ह्या कुमार्गी दुरात्म्यांना शान्त करण्यासाठीच तर मी ह्या लोकी अवतार घेतला आहे” ॥९॥

 

 
 तदेतं नातिदूरस्थं कदम्बमुरुशाखिनम् ।
 अदिरुद्य पतिष्यामि ह्रदेऽस्मिन्ननिलाशिनः ॥ १० ॥

म्हणून आता मी ऊंचच ऊंच शाखा असलेल्या जवळच्याच कदम्ब वृक्षावर चढून ह्या वायुभक्षी नागराजाच्या कुंडात उडी मारतो ॥ १० ॥

 


 श्रीपराशर उवाच
 इत्थं विचिन्त्य बद्ध्वा च गाढं परिकरं ततः ।
 निपपात ह्रदे तत्र नागराजस्य वेगतः ॥ ११ ॥

श्रीपराशर म्हणाले ;- हे मैत्रेया ! असा विचार करून भगवंताने वेगाने नागराजाच्या कुंडात उडी मारली ॥ ११ ॥

 


 तेनातिपतता तत्र क्षोभितःस महाह्रदः ।
 अत्यर्थं दूरजातांस्तु समसिञ्चन्महीरुहान् ॥ १२ ॥

त्याच्या उडी मारण्याने महाह्रदाने अत्यन्त क्षोभित होऊन दूर स्थित वृक्षांनाही भिजवून टाकले ॥ १२ ॥


 ते हि दुष्टविषज्वालातप्ताम्बुपवनोक्षिताः ।
 जज्वलुः पादापाःसद्यो ज्वालाव्याप्तदिगन्तराः ॥ १३ ॥

त्या सर्पाच्या विषारी विषाच्या ज्वालांनी तापलेल्या जलाने भिजल्याने त्या वृक्षांनी क्षणार्थात पेट घेतला आणि त्या ज्वाळांनी सम्पूर्ण दिशा व्याप्त झाल्या ॥ १३ ॥

 


 आस्फोटयामास तदा कृष्णो नागह्रदे भुजम् ।
 तच्छब्दश्रवणाच्चाशु नागराजोऽभ्युपागमत् ॥ १४ ॥

तेव्हा कृष्णचन्द्राने त्या नागकुंडात आपल्या भुजा थोपटल्या; त्या आवाजाने तो नागराज लगेच त्यांच्या सम्मुख आला ॥ १४ ॥

 


 आताम्रनयनः कोपाद्विषज्वालाकुलैर्मुखैः ।
 वृतो महाविषैश्चान्यैरुरगैरनिलाशनैः ॥ १५ ॥

त्याचे नेत्र रागाने काहीसे ताम्रवर्ण झाले होते, तोंडातून आगीच्या ज्वाळा निघत होत्या आणि तो महाविषारी अन्य वायुभक्षी सर्पांनी घेरलेला होता ॥ १५ ॥

 


 नागपत्‍न्यश्च शतशो हारिहारोपशोभिताः ।
 प्रकम्पिततनुक्षेपचलत्कुण्डलकान्तयः ॥ १६ ॥

त्याच्या सोबत मनोहर हारांनी सुशोभित आणि शरीर-कम्पनामुळे हलणार्‍या कुण्डल कांतीने सुशोभित शेकडो नागपत्नी होत्या ॥ १६ ॥

 


 ततः प्रवेष्टितःसर्पैः स कृष्णे भोगबन्धनैः ।
 ददंशुस्तेऽपि तं कृष्णं विषज्वालाकुलैर्मुखैः ॥ १७ ॥

सर्व सर्पांनी कुण्डलाकार होऊन कृष्णचन्द्राला आपल्या शरीरांनी लपेटले आणि आपल्या विषाग्नि-सन्तप्त मुखांनी दंश करू लागले ॥ १७ ॥

 


 तं तत्र पतितं दृष्ट्‍वा सर्पभोगैर्निपीडितम् ।
 गोपा व्रजमुपागम्य चुक्रुशुः शोकलालसाः ॥ १८ ॥

त्यानन्तर गोपी कृष्णचन्द्राला नागकुंडात पडलेला आणि सर्पांच्या दंशांनी पीडित होत असलेला पाहून ब्रजात गेले व दुःखाने व्याकुळ होऊन रडू लागले ॥१८॥

 


 गोपा ऊचुः
 एष मोहं गतः कृष्णो मग्नौ वै कालियह्रदे ।
 भक्ष्यते नागराजेन तमागच्छत पश्यत ॥ १९ ॥

गोपगण म्हणाले;- या,या बघा! हा कृष्ण कालीयडोहात बुडून बेशुद्ध झाला आहे, बघा त्याला नागराज दंश करत आहेत! ॥ १९ ॥

 


 तच्छ्रुत्वा तत्र ते गोपा वज्रपातोपमं वचः ।
 गोप्यश्च त्वरीता जग्मुर्यशोदाप्रमुखा ह्रदम् ॥ २० ॥

वज्रपाता समान त्यांचे हे अमंगल बोलणे ऐकून गोपगण आणि यशोदा आदि गोपी लगेच कालीयाडोहा कडे धावत आले ॥ २० ॥


 हाहा क्वासाविति जनो गोपीनामतिविह्वलः ।
 यशोदया समं भ्रान्तो द्रुतप्रस्खलितं ययौ ॥ २१ ॥

अरेरे! कृष्ण कुठे गेला?' अशाप्रकारे अत्यन्त व्याकुळ होऊन रडणार्‍या गोपीका यशोदासोबत घाईघाईने धडपडत धावत होत्या ॥ २१ ॥

 


 नन्दगोपश्च गोपाश्च रामश्चाद्‍भुतविक्रमः ।
 त्वरितं यमुनां जग्मुः कृष्णदर्शनलालासाः ॥ २२ ॥

नन्द तसेच अन्यान्य गोपगण आणि अद्भुत विक्रमशाली बलराम देखील कृष्णाला पाहायला शीघ्रतापूर्वक यमुना-तटावर आले ॥ २२ ॥

 


 ददृशुश्चापि ते तत्र सर्पराजवशंगतम् ।
 निष्प्रयत्‍नीकृतं कृष्णं सर्पभोगविवेष्टितम् ॥ २३ ॥

तिथे येऊन त्यांनी पाहीले की कृष्णचन्द्र सर्पराजाच्या विळख्यात फसलेला होता आणि त्याने कृष्णाला आपल्या शरीराने लपेटून निरुपाय करून टाकलेले ॥ २३ ॥


 नन्दगोपोऽपि निश्चेष्टो न्यस्य पुत्रमुखे दृशम् ।
 यशोदा च महाभागा बभूव मुनिसत्तम ॥ २४ ॥

हे मुनिसत्तमा! महाभागा यशोदा आणि नन्दगोप सुद्धा पुत्राच्या चेहर्‍याकडे एकटक पाहात स्तम्भित झाले ॥ २४ ॥


 गोप्यस्त्वन्या रुदन्त्यश्च ददृशुः शोककातराः ।
 प्रोचुश्च केशवं प्रीत्या भयकातर्यगद्‍गदम् ॥ २५ ॥

अन्य गोपींनी सुद्धा जेव्हा कृष्णाला अशा स्थितीत पाहीले तेव्हा त्या शोकाकुल होऊन रडू लागल्या आणि घाबरून व्याकुळ होऊन गद्ग़द वाणीने त्याला प्रीतिपूर्वक म्हणू लागल्या ॥ २५ ॥

 

 


 गोप्य ऊचुः
 सर्वा यशोदया सार्धं विशामोत्र महाह्रदम् ।
 सर्पराजस्य नो गन्तुमस्माभिर्युज्यते व्रजम् ॥ २६ ॥

गोपी म्हणाल्या;- आता आम्ही सुद्धा यशोदेसोबत ह्या सर्पराजाच्या महाकुंडात उडी मारतो, आम्हाला आता ब्रजमध्ये जावेसेच वाटत नाही ॥ २६ ॥


 दिवसः को विना सूर्यं विना चन्द्रेण का निशा ।
 विना वृषेण का गावो विना कृष्णेन को व्रजः ॥ २७ ॥

सूर्या शिवाय कसला दिवस? चन्द्रा शिवाय रात्र कशी? बैलांशिवाय गाईंना काय अर्थ? कृष्णाशिवाय ब्रजात ठेवलेच काय आहे? ॥ २७ ॥


 विनाकृता न यास्यामः कृष्णेनानेन गोकुलम् ।
 अरम्यं नातिसेव्यं च वारिहीनं यथा सरः ॥ २८ ॥

कृष्णाला घेतल्याशिवाय आम्ही आता गोकुळात नाही जाणार; कारण त्याच्याशिवाय गोकूळ जलहीन सरोवरा सारखे अत्यंत अभव्य आणि असेव्य आहे ॥ २८ ॥


 यत्र नेन्दीवरश्यामकायकान्तिरयं हरिः ।
 तेनापि मतुर्वासेन रतिरस्तीति विस्मयः ॥ २९ ॥

जिथे नीलकमलदला सारखी प्रभा असणारे श्यामसुन्दर हरी नाही त्या मातृ मन्दिरात प्रीति असणं अतिशय आश्चर्यकारक आहे ॥ २९ ॥

 


 उत्फुल्लपङ्‍कजदलस्पष्टकान्तिविलोचनम् ।
 अपश्यन्तो हरिं दीनाः कथं गोष्ठे भविष्यथ ॥ ३० ॥

अगं! उमललेल्या कमलदलासारखे कान्तियुक्त नेत्र असलेल्या श्रीहरिला बघितल्या शिवाय अत्यन्त दीन झालेली तु ब्रजात कशी राहू शकशील ? ॥ ३० ॥

 


 अत्यन्तमधुरालापहृताशेषमनोरथम् ।
 न विना पुण्डरीकाक्षं यास्यामो नन्दगोकुलम् ॥ ३१ ॥

ज्याने आपल्या अत्यन्त मनोहर बोलीने आमचे समस्त मनोरथ आपल्या वशीभूत केले आहेत त्या कमलनयन कृष्ण चन्द्रा शिवाय आम्ही नन्दाच्या गोकुळात नाही जाणार नहीं ॥ ३१ ॥


 भोगेनाविष्टितस्यापि सर्पराजस्य पश्यत ।
 स्मितशोभिमुखं गोप्यः कृष्णस्यास्मद्विलोकने ॥ ३२ ॥

गोपिकांनो! बघा सर्पराजाच्या फणांनी घेरलेले असूनही श्रीकृष्णाचे मुख आपल्याला पाहून मधुर हास्याने सुशोभित झाले आहे ॥ ३२ ॥

 


 

श्रीपराशर उवाच
 इति गोपीवचः श्रुत्वा रौहिणेयो महाबलः ।
 गोपांश्च त्रासविधुरान्वि लोक्य स्तिमितेक्षणान् ॥ ३३ ॥
 नन्दं च दीनमत्यर्थं न्यस्तदृष्टिं सुतानने ।
 मूर्चाकुलां यशोदां च कृष्णमाहात्मसंज्ञया ॥ ३४ ॥

श्रीपराशर म्हणाले ;- गोपिकांचे असे बोलणे ऐकून त्रासलेल्या व चकित झालेल्या गोपांना, पुत्राच्या चेहर्‍याकडे एकटक पाहणारे अत्यन्त दीन नन्दाला आणि शुद्ध हरपायला आलेल्या यशोदेला पाहून महाबली रोहिणीनन्दन बलरामाने श्रीकृष्णाला म्हटले - ॥३३-३४॥

 


 किमिदं देवदेवेश भावोऽयं मानुषस्त्वया ।
 व्यज्यतेऽत्यन्तमात्मानं किमनन्तं न वोत्सि यत् ॥ ३५ ॥

"हे देवदेवेश्वरा! तुम्ही स्वतः अनंत आहात हे माहीत आहे ना? मग असे मानव-भाव का व्यक्त करता आहात? ॥ ३५ ॥

 


 त्वमेव जगतो नाभिरराणामिव संश्रयः ।
 कर्तापहर्ता पाता च त्रौलोक्यं त्वं त्रयीमयः ॥ ३६ ॥

चक्रांची नाभि जशी अरींचे आश्रय असते तसेच आपणही जगताचे आश्रय, कर्ता, हर्ता आणि रक्षक आहात तसेच आपणच त्रैलोक्य स्वरूप आणि वेदत्रयीमय आहात ॥ ३६ ॥

 
 सेन्द्रै रुद्राग्निवसुभिरादित्यैर् मरुदश्विभिः ।
 चिन्त्यसे त्वमचिन्त्यात्मन् समस्तैश्चैव योगिभिः ॥ ३७ ॥

हे अचिन्त्यात्मना! इन्द्र, रुद्र, अग्नि, वसु, आदित्य, मरुद्गण आणि अश्विनी कुमार तसेच समस्त योगिजन आपलेच चिन्तन करतात ॥३७॥

 


 जगत्यर्थं जगन्नाथ भारावतरणेच्छया ।
 अवतीर्णोऽसि मर्त्येषु तवांशश्चाहमग्रजः ॥ ३८ ॥

हे जगन्नाथा! संसाराच्या हितासाठी पृथ्वीचा भार हलका करण्याच्या इच्छेनैच आपण मर्त्यलोकात अवतार घेतला आहे, आपला अग्रज मी सुद्धा आपलाच अंश आहे ॥ ३८ ॥

 
 मनुष्यलीलां भगवन् भजता भवता सुराः ।
 विडम्बयन्तस्त्वल्लीलां सर्व एव सहासते ॥ ३९ ॥

हे भगवंता ! आपण मनुष्य-लीला केल्यामुळे हे गोपवेषधारी समस्त देवगणही आपल्याच लीलांचे अनुकरण करत आपल्या सोबत राहत आहेत ॥ ३९ ॥


 अवतार्य भवान्पूर्वं गोकुले तु सुराङ्‍गनाः ।
 क्रीडार्थमात्मनः पश्चादवर्तीर्णोऽसि शाश्वत ॥ ४० ॥

हे शाश्वता ! आधी विहारार्थ देवाङ्गनांना गोपीरूपात गोकुळात अवतीर्ण करून मग आपण स्वतः अवतार घेतला आहे ॥ ४० ॥


 अत्रावतीर्णयोः कृष्ण गोपा एव हि बान्धवाः ।
 गोप्यश्च सीदतः कस्मादेतान्बन्धूनुपेक्षसे ॥ ४१ ॥

हे कृष्णा ! इथे अवतीर्ण झाल्यावर आपल्या दोघांचे हे गोप और गोपिकाच बान्धव आहेत; तर मग इपल्या ह्या दुखी बान्धवांची आपण अशी उपेक्षा का करत आहात? ॥ ४१ ॥

 


 दर्शितो मानुषो भावो दर्शितं बालचापलम् ।
 तदयं दम्यतां कृष्ण दुष्टात्मा दशनायुधः ॥ ४२ ॥

हे कृष्णा! हा मनुष्य भाव आणि बालचापल्य आपण खूप दाखवले, आता लगेचच दात शस्त्र असलेल्या ह्या दुष्टात्म्याचे दमन करा" ॥ ४२ ॥

 


 श्रीपराशर उवाच
 इति संस्मारितः कृष्णः स्मितभिन्नोष्ठसम्पुटः ।
 आस्फोट्य मोचयामास स्वदेहं भोगिबन्धनात् ॥ ४३ ॥

श्रीपराशर म्हणाले ;- अशाप्रकारे आठवण करून दिल्यावर मधुर हास्य करत कृष्णचन्द्राने झटक्यात स्वतःचे शरीर सापाच्या बंधनातून सोडवले ॥ ४३ ॥

 


 आनम्य चापि हस्ताभ्यामुभाभ्यां मध्यमं शिरः ।
 आरुह्याभुग्नशिरसः प्रणनर्तोरुविक्रमः ॥ ४४ ॥

आणि मग आपल्या दोन्ही हातांनी त्याची मधली फणा वाकवून त्या नतमस्तक सर्पावर चढून अतिशय वेगाने नाचू लागले ॥ ४४ ॥

 

 


 प्राणाः फणेऽभवंश्चास्य कृष्णस्याङ्‌‍घ्रिनिकुट्टनैः ।
 यत्रोन्नतिं च कुरुते ननामास्य ततः शिरः ॥ ४५ ॥

कृष्णचन्द्राच्या पायातील जोरामुळे त्या सर्पाचे प्राण कंठात गोळा झाले, तो आपले जे मस्तक उचलायचा त्यावरच उडी मारून कृष्ण ते वाकवायचा ॥ ४५ ॥

 


 मूर्चामुपाययौ भ्रान्त्या नागः कृष्णस्य रेचकैः ।
 दण्डपातनिपातेन ववाम रुधिरं बहु ॥ ४६ ॥

कृष्णचन्द्राने भ्रान्ति (भ्रम), रेचक तसेच दण्डपात नावाच्या नृत्यसंबंधित गतींनी ताडन केल्याने तो महासर्प मूर्छित झाला आणि तोंडातून रक्त ओकू लागला ॥४६॥


 तं विभिग्रशिरोग्रीवमास्येभ्यः स्रुतशोणितम् ।
 विलोक्य करुणं जग्मुस्तत्पत्‍न्यो मधुसूदनम् ॥ ४७ ॥

अशाप्रकारे त्याची मस्तके आणि गळे झुकलेले तसेच तोंडातून वाहणारे रक्त पाहून त्याच्या पत्न्या काकुळतीने श्रीकृष्णा जवळ आल्या ॥ ४७ ॥

 


 नागपत्‍न्य ऊचुः
 ज्ञातोऽसि देवदेवेश सर्वज्ञस्त्वमनुत्तमः ।
 परं ज्योतिरचिन्त्यं यत्तदंशः परमेश्वरः ॥ ४८ ॥

नागपत्न्या म्हणाल्या;- हे देव देवेश्वरा! आम्ही तुम्हाला ओळखले आहे. तुम्ही सर्वज्ञ आणि सर्वश्रेष्ठ आहा; जो अचिन्त्य आणि परमज्योति आहे आपण त्याचाच अंश परमेश्वर आहात, ॥ ४८ ॥

 
 न समर्थाः सुराःस्तोतुं यमनन्यभवं विभुम् ।
 स्वरूपवर्णनं तस्य कथं योषित्करिष्यति ॥ ४९ ॥

ज्या स्वयम्भू व व्यापक प्रभुची स्तुति करण्यास देवगण सुद्धा असमर्थ आहेत त्या आपल्या स्वरूपाचे आम्ही स्त्रिया कसं वर्णन करू शकू? ॥ ४९ ॥


 यस्याखिलमहीर्व्योमजलाग्निपवनात्मकम् ।
 ब्रह्माण्डमल्पकाल्पांशः स्तोष्यामस्तं कथं वयम् ॥ ५० ॥

पृथ्वी, आकाश, जल, अग्नि आणि वायु स्वरूप हे सम्पूर्ण ब्रह्माण्ड ज्याचा छोट्यातला छोटा अंश आहे, त्याची स्तुति आम्ही कशी करणार? ॥ ५० ॥


 यतन्तो न विदुर्नित्यं यत्स्वरूपं हि योगिनः ।
 परमार्थमणोरल्पं स्थूलात्स्थूलं नताः स्म तम् ॥ ५१ ॥

योगिजन ज्याचे नित्यस्वरूप प्रयत्न करूनही जाणू शकत नाहीत तसेच जो परमार्थरूप अणुहूनही अणु आणि स्थूलाहूनही स्थूल आहे त्याला आम्ही नमस्कार करतो ॥ ५१ ॥


 न यस्य जन्मने धाता यस्य चान्ताय नान्तकः ।
 स्थितिकर्ता न चान्योऽस्ति यस्य तस्मै नमःसदा ॥ ५२ ॥

विधाता आणि काळ ज्याचे जन्म आणि अंताचे कारण नाहीत तसेच ज्याचा स्थितिकर्ता सुद्धा कोणी अन्य नाही त्यांना सर्वदा नमस्कार ॥ ५२ ॥

 


 कोपः स्वल्पोऽपि ते नास्ति स्थितिपालनमेव ते ।
 कारणं कालियस्यास्य दमने श्रुयतां वचः ॥ ५३ ॥

आपण क्रोधीत झाल्याने ह्या कालियनागाचे दमन करत नाही आहात तर केवळ लोक रक्षण हाच आपला हेतू आहे, म्हणून आमचे निवेदन ऐका ॥ ५३ ॥

 

 स्त्रियोनुकम्प्याःसाधूनां मूढा दीनाश्च जन्तवः ।
 यतस्ततोऽस्य दीनस्य क्षम्यतां क्षमतां वर ॥ ५४ ॥

हे क्षमाशीलांमध्ये श्रेष्ठा! साधु पुरुषांनी स्त्रिया तसेच मूढ़ आणि दीन जन्तुंवर सदैव कृपा करायला हवी, म्हणून आपण आम्हा दीनांचा अपराध क्षमा करा ॥ ५४ ॥



 समस्तजगदाधारो भवानल्पबलः फणी ।
 त्वत्पादपीडितो जह्यान्मुहूर्तार्धेन जीवितम् ॥ ५५ ॥

प्रभों! आपण सम्पूर्ण संसाराचे अधिष्ठान आहात आणि आपल्या तुलनेत हा सर्प तर अत्यन्त बलहीन आहे. आपल्या चरणांनी पीडित होऊन तो पुढच्याच मुहूर्तात आपले प्राण त्यागेल ॥ ५५ ॥


 क्व पन्नगोऽल्पवीर्योऽयं क्व भवान् भुवनाश्रयः ।
 प्रीतिद्वेषौ समोत्कृष्टगोचरौ भवतोऽव्यय ॥ ५६ ॥

हे अव्यया! प्रीति समानांशी आणि द्वेष उत्कृष्टांचा केला जातो; मग कुठे हा अल्पवीर्य सर्प आणि कुठे अखिल भुवनाश्रय आपण? ॥ ५६॥

 

 

 

 ततः कुरु जगत्स्वामिन्प्रसादमवसीदतः ।
 प्राणांस्त्यजति नागोऽयं भर्तृभिक्षा प्रदीयताम् ॥ ५७ ॥

म्हणून हे जगत स्वामी! ह्या दीनावर दया करा. हे प्रभो! आता हा नाग आपले प्राण सोडू इच्छितो, कृपा करून आम्हाला आमच्या पतिची भिक्षा द्या ॥ ५७ ॥

 

 
 भुवनेश जगन्नाथ महापुरुष पूर्वज ।
 प्राणांस्त्यजति नागोऽयं भर्तृभिक्षां प्रयच्छ नः ॥ ५८ ॥

हे भुवनेश्वरा! हे जगन्नाथा! हे महापुरुषा! हे पूर्वजा  आता हा नाग आपले प्राण सोडू इच्छितो, कृपा करून आम्हाला आमच्या पतिची भिक्षा द्या ॥ ५८ ॥

 


 वेदान्तवेद्य देवेश दुष्टदैत्यनिबर्हण ।
 प्राणांस्त्यजति नागोऽयं भर्तृभिक्षा प्रदीयताम् ॥ ५९ ॥

हे वेदान्तवेद्य देवत्श्वरा ! हे दुष्ट-दैत्य-दलना ! आता हा नाग आपले प्राण सोडू इच्छितो, कृपा करून आम्हाला आमच्या पतिची भिक्षा द्या ॥ ५९ ॥

 


 श्रीपराशर उवाच
 इत्युक्ते ताभिराश्वस्य क्लान्तदेहोऽपि पन्नगः ।
 प्रसीद देवदेवेति प्राह वाक्यं शनैः शनैः ॥ ६० ॥

श्रीपराशर म्हणाले ;- नागपत्नींनी असे म्हटल्यावर थकलेला नागराज धीर एकवटून म्हणाला 'हे देवदेवा ! प्रसन्न व्हा" ॥ ६० ॥

 


 कालिय उवाच
 तवाष्टगुणमैश्वर्यं नाथ स्वाभाविकं परम् ।
 निरस्तातिशयं यस्य तस्य स्तोष्यामि किन्‍न्वहम् ॥ ६१ ॥

कालियानाग म्हणाला ;- हे नाथा ! आपला स्वभाविक अष्टगुणविशिष्ट परम ऐश्वर्य निरतिशय आहे [म्हणजेच आपणाहून जास्त कोणाचेच ऐश्वर्य नाही], म्हणून मी कशा प्रकारे आपली स्तुति करू शकेन ? ॥ ६१॥


 त्वं परस्त्वं परस्याद्यः परं त्वत्तः परात्मक ।
 परस्मात्परमो यस्त्वं तस्य स्तोष्यामि किन्न्वहम् ॥ ६२ ॥

आपण पर आहात आपण पर (मूलप्रकृति) चेसुद्धा आदिकारण आहात. हे परात्मका ! परची प्रवृत्तिसुद्धा आपल्यापासूनच झाली आहे, म्हणून आपण परहूनही पर आहात; मग मी आपली स्तुति कशी करू शकेन? ॥६२॥

 


 यस्माद्‍बह्माच रुद्रश्च चन्द्रेद्रमरुदश्विनः ।
 वसवश्च सहादित्यैस्तस्य स्तोष्यामि किन्‍न्वहम् ॥ ६३ ॥

ज्यांच्यापासून ब्रह्मा, रुद्र, चन्द्र, इन्द्र, मरुद्गण, अश्विनी कुमार, वसुगण आणि आदित्य आदि सगळे उत्पन्न झाले; त्यांची स्तुति मी कशी करू शकेन ? ॥ ६३ ॥

 


 एकावयवसूक्ष्मांशो यस्यैतदखिलं जगत् ।
 कल्पनावयवस्यांशस्तस्य स्तोष्यामि किन्‍न्वहम् ॥ ६४ ॥

हे सम्पूर्ण जगत ज्यांच्या काल्पनिक अवयवाचा एक सूक्ष्म अवयवांशमात्र आहे, त्या आपली स्तुति मी कशी करू शकेन ? ॥ ६४ ॥

 


 सदसद्‍रूपिणो यस्य ब्रह्माद्यास्त्रिदशेश्वराः ।
 परमार्थं न जानन्ति तस्य स्तोष्यामि किन्‍न्वहम् ॥ ६५ ॥

ज्या सदसत् (कार्य-कारण) स्वरूपाच्या वास्तविक रूपाला ब्रह्मादि देवेश्वरगण सुद्धा जाणत नाहीत त्या आपली स्तुति मी कशी करू शकेन ? ॥ ६५ ॥

 


 ब्रह्माद्यैरर्चितो यस्तु गन्धपुष्पानुलेपनैः ।
 नन्दनादिसमुद्‍भूतैः सोर्च्यते वा कथं मया ॥ ६६ ॥

ज्यांची पूजा ब्रह्मा आदि देवगण नंदनवन पुष्प, गन्ध आणि अनुलेपन आदिंनी करतात त्या आपली पूजा मी कशी करू ? ॥६६॥

 


 यस्यावताररूपाणि देवराजःसदार्चति ।
 न वेत्ति परमं रूपं सोऽर्च्यते वा कथं मया ॥ ६७ ॥

देवराज इंद्र ज्यांच्या अवतार रूपांची सर्वदा पूजा करतात तरीही यथार्थ रूप जाणत नाही त्या आपली पूजा मी कशी करू ? ॥६७॥

 

 


 विषयेभ्यः समावृत्त्य सर्वाक्षाणि च योगिनः ।
 यमर्चयन्ति ध्यानेन सोऽर्च्यते वा कथं मया ॥ ६८ ॥

योगिगण आपल्या समस्त इन्द्रियांना त्यांच्या विषयापासून खेचून ज्यांचे ध्यानद्वारा पूजन करतात त्या आपली पूजा मी कशी करू ?॥ ६८॥


 हृदि संकल्प्य यद्‍रूपं ध्यानेनार्चन्ति योगिनः ।
 भावपुष्पादिना नाथः सोऽर्च्यते वा कथं मया ॥ ६९ ॥

ज्या प्रभुच्या स्वरूपाची चित्तात भावना करून योगिजन भावमय पुष्पादिंनी ध्यानद्वारा उपासना करतात त्या आपली पूजा मी कशी करू ? ॥ ६९ ॥

 


 सोऽहं ते देवदेवेश नार्चनादौ स्तुतौ न च ।
 सामर्थ्यवान् कृपामात्रमनोवृत्तिः प्रसीद मे ॥ ७० ॥

हे देवदेवेश्वरा ! आपली पूजा अथवा स्तुति करण्यास मी सर्वथा असमर्थ आहे, माझ्या चित्तवृत्ति केवळ आपल्या कृपेकडेच लागलेली आहे, म्हणून आपण माझ्यावर प्रसन्न व्हा ॥ ७०।।


 सर्पजातिरियं क्रूरा यस्यां जातोऽस्मि केशव ।
 तत्स्वभावोऽयमत्रास्ति नापराधो ममाच्युत ॥ ७१ ॥

हे केशवा ! माझा ज्यात जन्म झाला आहे ती सर्पजाति अत्यन्त क्रूर असते, हा माझा जातीय स्वभाव आहे. हे अच्युता ! ह्यात माझा कोणताच अपराध नाही ॥ ७१ ॥


 सृज्यते भवता सर्वं तथा संह्रीयते जगत् ।
 जातिरूपस्वभावाश्च सृज्यन्ते सृजता त्वया ॥ ७२ ॥

ह्या सम्पूर्ण जगताची रचना आणि संहार आपणच करता. संसारातील रचनांसोबतच त्यांच्या जाति, रूप आणि स्वभाव सुद्धा आपणच बनवता ॥ ७२ ॥

 


 यथाहं भवता सृष्टो जात्या रूपेण चेश्वर ।
 स्वभावेन च संयुक्तस्तथेदं चेष्टितं मया ॥ ७३ ॥

हे ईश्वरा ! आपण मला जाति, रूप आणि स्वभावाने युक्त करून जसे बनवले तसेच मी वागत आहे ॥ ७३ ॥


 यद्यन्यथा प्रवर्तेयं देवदेव ततो मयि ।
 न्यायो दण्डनिपातो वै तवैववचनं यथा ॥ ७४ ॥

हे देव देवा! जर माझे आचरण विपरीत असेल तर अवश्य आपल्या कथना नुसार मला दण्ड देणं योग्य आहे ॥ ७४ ॥


 तथाप्यज्ञे जगत्स्वामिन्दण्डं पातितवान्मयि ।
 स श्लाघ्योऽयं परो दण्डस्त्वत्तो मे नान्यतो वरः ॥ ७५ ॥

तथापि हे जगत-स्वमी ! आपण मझ्यासारख्या अज्ञानीला जो दण्ड दिला आहे तो आपल्याकडून मिळालेला दंड माझ्यासाठी चांगलाच आहे, त्याबदल्यात मला दुसर्‍या कोणाचे वरदानही नको ॥ ७५ ॥


 हतवीर्यो हतविषो दमितोऽहं त्वयाच्युत ।
 जीवितं दीयतामेकमाज्ञापय करोमि किम् ॥ ७६ ॥

हे अच्युता ! आपण माझा पुरुषार्थ आणि विष नष्ट करून चांगल्याप्रकारे माझे मानमर्दन केले आहे. आता केवळ माझे प्राणदान करा आणि आज्ञा द्या की मी काय करू ? ॥ ७६ ॥

 


 श्रीभगवानुवाच
 नात्र स्थेयं त्वया सर्प कदाचिद्‌यमुनाजले ।
 सपुत्रपरिवारस्त्वं समुद्रसलिलं व्रज ॥ ७७ ॥

श्रीभगवंत म्हणाले ;- हे सर्पा ! आता तु ह्या यमुना जलात राहू नकोस. आताच्याआता आपल्या पुत्र व परिवारा सहित समुद्राच्या जलात जा ॥ ७७ ॥

 

 
 मत्पदानि च ते सर्प दृष्ट्‍वा मूर्धनि सागरे ।
 गरुडः पन्नगरिपुस्त्वयि न प्रहरिष्यति ॥ ७८ ॥

तुझ्या मस्तकावर माझी चरण-चिह्ने पाहून समुद्रात राहात असूनही सर्प शत्रु गरुड तुझ्यावर प्रहार करणार नाही ॥ ७८ ॥

 

श्रीपराशर उवाच
 इत्युक्त्वा सर्पराजं तं मुमोच भगवान्हरिः ।
 प्रणम्य सोऽपि कृष्णाय जगाम पयसां निधिम् ॥ ७९ ॥
 पश्यतां सर्वभूतानां सभृत्यसुतबान्धवः ।
 समस्तभार्यासहितः परित्यज्य स्वकं ह्रदम् ॥ ८० ॥

श्रीपराशर म्हणाले ;-  सर्पराज कालियाहा असे सांगून श्रीहरीने त्याला सोडून दिले आणि तो त्यांना प्रणाम करून समस्त प्राण्यांच्या देखत आपले सेवक, पुत्र, बन्धु आणि समस्त स्त्रियांसह ते कुण्ड सोडून समुद्रात निघून गेला ॥ ७९-८० ॥

 



 गते सर्पे परिष्वज्य मृतं पुनरिवागतम् ।
 गोपा मूर्धनि हार्देन सिषिचुर्नेत्रजैर्जलैः ॥ ८१ ॥

सर्प गेल्यानंतर गोपगण, परत जिवंत झालेल्या मृत पुरुषा समान कृष्णचन्द्राला मीठी मारून प्रेमाने त्याचे मस्तक अश्रुंनी भिजवू लागले ॥ ८१ ॥


 कृष्णामाक्लिष्टकर्माणमन्ये विस्मितचेतसः ।
 तुष्टुवुर्मुदिता गोपा दृष्ट्‍वा शिवजलां नदीम् ॥ ८२ ॥

काही अन्य गोपगण यमुनेचे जल स्वच्छ झालेले पाहून प्रसन्न होऊन लीलाबिहारी कृष्णाची आश्चर्याने स्तुति करू लागले ॥ ८२ ॥

 


 गीयमानः स गोपीभिश्चारितैः साधुचेष्टितैः ।
 संस्तूयमानो गोपैश्च कृष्णो व्रजमुपागमत् ॥ ८३ ॥

त्यानन्तर आपल्या उत्तम चरित्राविषयीची गाणी गोपिंकडून एकत आणि गोपांकडून प्रशंसित होत कृष्णचन्द्र ब्रज ला गेले ॥ ८३ ॥

 


 इति श्रीविष्णुमहापुराणे पञ्चमे अंशे
सप्तमोऽध्यायः (७)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, पंचम अंश, सप्तम अध्याय | Vishnu Puran, Ansh 5 , Adhyay 7

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ पञ्चमः अंशः ॥ ॥ सप्तमो ऽध्यायः ॥   "कालिया-दमन"   श्रीपराशर उवाच   एकदा तु विना रामं कृष्णो वृन...