सामवेद :
आज आपण जाणून घेणार आहोत सामवेदा बद्दल .
सामवेद हा चारही वेदांतला तिसरा वेद . वेदव्यासांनी
सामवेदाचे ज्ञान आपला शिष्य जैमिनी ह्याला दिल म्हणून जैमिनीला सामवेदाचा द्रष्टा
मानल जातं .
साम म्हणजे देवतांना प्रसन्न करणार गान .
इतर वेदांच्या तुलनेत सामवेद खूप छोटा असला तरी इतर तीनही
वेदांमधला निवडक अंश सामवेदात असल्याने तो सर्व वेदांचे साररूप मानला गेला आहे .
भगवान श्रीकृष्णाने भगवत गीतेतल्या विभूती योगात अर्जुनाला
प्रत्येक वस्तूतलं आपलं स्वरूप कोणतं हे सांगताना “वेदानाम् सामवेदो S हम्" अस म्हटलं आहे .
या एका वाक्यावरून सामवेदाच वेगळेपण कळतं .
महाभारतातल्या अनुशासन पर्वातही " सामवेदश्च वेदानां
यजुषां शतरुद्रीयम् " असं म्हटलं आहे .
अग्निपुराणा नुसार सामवेदातल्या विशिष्ट मंत्रांचा विधिवत
जप केल्याने अनेक रोगांपासून मुक्ती मिळते आणि मनोकामना पूर्ण होतात .
बृहद्देवते नुसार साम माहित असलेल्या पुरुषालाच केवळ वेदांच
खरं रहस्य , त्यांचं तत्त्व कळत " यो सामानि वेत्ति स वेत्ति
तत्त्वम् " .
भारतीय विद्वान चारही वेदांना एकाच वेदराशीचा अंश मानतात .
पण काही पश्चिमी अभ्यासक सामवेद नंतरच्या काळात लिहिता गेला
अस मानतात .
पण ऋग्वेदात काही ठिकाणी वैरूपम् , बृहतम् , रेवतम् इत्यादी
नावांनी सामवेदातील सामगायनाच्या चर्चेच वर्णन आढळतं .
यजुर्वेदातहि सामगायनाला रथंतरम् , बृहतम् ह्या नावांनी संबोधल आहे .
ऐतरेय ब्राह्मणग्रंथात बृहतम् , रथंतरम् , वैरूपम् , वैराजम् आदींची चर्चा आलेली आहे .
अथर्ववेद , ऐतरेय ब्राह्मण
ताण्ड्यब्राह्मण आणि बृहदारण्यक उपनिषदात ऋचा ( ऋक् ) + साम ( स्वर ) यांना
पति-पत्नी ची उपमा दिलेली आहे .
" अम् अहम् अस्मि सा त्वम् , साम् अहमस्मि ऋक त्वम् , द्यौ : अहं पृथ्वीत्वं , ताविह संभवाह प्रजयामावहै।"
अर्थ - मी अम् ( पति ) आहे तू सा ( पत्नी ) , मी साम् तू ऋक् आहेस , मी द्युलोक तू पृथ्वी आहेस .
आपण एकत्रित पुढे जाऊ व प्रजेचा विस्तार करणारे होऊ .
साम – सा + अम् – यातील प्रत्येक अक्षराला प्रातिनिधिक अर्थ
आहे .
सा + अम्
१) पृथ्वी + अग्नी
२) अंतरीक्ष + वायु
३) ध्युलोक + आदित्य
४) नक्षत्र + चंद्र
५) आदित्याची शुक्लप्रभा + नील कार्ष्ण्य
६) वाणी + प्राण
७) चक्षु + आत्मा
८) श्रोत्र + मन
ऋचांना दिलेल्या चाली म्हणजे साम .
आणि ह्या वेगवेगळ्या चालींच्या संग्रहाची संहिता म्हणजे
सामवेद .
वेदांतील मंत्रांच गान कसं करायचं हे सामवेदात सांगितलं आहे
.
साम शब्दाचं वर्णन “ गीतिषु सामाख्या ” असं केलं जातं .
सामवेदात स्वरांचं ज्ञान आहे .
सामवेद हा गायन कला आणि शास्त्रीय संगीताचा पाया , त्यांचा मूलाधार आहे .
कोणतीही ऋचा सामसहित ( सामाने बांधलेली ) असावी .
स्वरांच्या पट्टीनुसार एक ऋचा वेगवेगळ्या सामामध्ये गायली
जाऊ शकते .
गायनकलेतील स्वर, ताल , लय , छंद , राग , भाव इत्यादी
सर्वांचा उगम सामवेदातूनच झाला आहे हे आजच्या आधुनिक अभ्यासकांनी मान्य केल आहे .
जवळ जवळ ९० टक्के सामवेदातील भाग हा ऋग्वेदातूनच घेतलेला
आहे .
सामवेदात एकूण १८७५ ऋचा आहेत आणि त्यातील १५४६ ऋचा
ऋग्वेदातल्या आहे . फक्त सुमारे १७ मन्त्र अथर्ववेद आणि यजुर्वेदातील आहेत .
यज्ञ विधी करताना म्हणायच्या ऋचा नेहमी सामात म्हटल्या
जातात .
पण ऋक् आणि साम यामध्ये ऋक् ला जास्त महत्त्व दिल जात .
ऋक् जर योनी आहे तर साम जन्मबिंदू मानला आहे .
छांदोग्य उपनिषदात “ वाक् एव सा प्राण: अम् तत् साम “ असं
म्हटलं आहे .
वाक् आणि प्राणांचे एकत्त्व व्हावे हि अपेक्षा असते .
मनापासून म्हटलेली ऋचा फळते .
पतंजली ऋषींच्या मते “ सहस्रवर्त्मा सामवेदा: “ यावरून
प्राचीन काळी सामवेदाच्या १००० तरी शाखा असाव्यात किंवा १००० हा संख्यावाचक नसून
बहुत ह्या अर्थी योजलेला असावा .
पण मग निदान १०० तरी शाखा त्याकाळी प्रचलित होत्या असे
मानले जाते .
आज मात्र सामवेदाच्या केवळ तीन शाखा अस्तित्वात आहेत
म्हणजेच त्यांच्या संहिता उपलब्ध आहेत .
१-राणायनीय ( गोकर्ण , महाराष्ट्र ) . ह्या शाखेचे १- द्राह्यायण श्रौतसूत्र २ -
खादिरगुह्यसूत्र आणि पुष्पसूत्र अशी ३ सूत्रे असून साम अभ्यासकांना पुष्पसूत्र
अत्यंत उपयुक्त आहे .
२-जैमिनीय ( कर्नाटक , केरळ , तामिळनाडू )
३-कौथुम ( गुजरात , उत्तरप्रदेश , बिहार , ओरिसा – हि शाखा आज सर्वात जास्त प्रचलित आहे )
कौथुम शाखेचे पुर्वार्चिक आणि उत्तरार्चिक असे दोन विभाग
आहेत .
पुर्वार्चिक विभागात ५८५ मंत्र आहेत . यात ६ प्रपाठक आहेत .
१० ऋचांच एक दशक आणि १० दशकांचं एक प्रपाठक .
आर्चिक हे शिकणारे विद्यार्थी होते जे रागांवर ऋचा म्हणायचे
.
ही पद्धत फक्त पठनासाठी वापरली जायची , यज्ञकार्यासाठी नाही .
पुर्वार्चिकेत १) आग्नेय २) ऐन्द्र ३) पावमान ४) आरण्य ५)
महानाम्न्यार्चिक हि ५ कांडे आहेत .
उत्तरार्चिक विभागात ४०० मंत्र म्हणजे सुमारे १२०० ऋचा आहेत
.
यात १ मंत्र = ३ ऋचा . या विभागात यज्ञातील विधीनुसार
मंत्रांची मांडणी केलेली आहे .
ह्या विभागात एकूण २१ विभाग आहेत आणि ९ प्रपाठक असून एकूण
१२२५ मंत्र आहेत .
सामवेदांतील ऋचांच्या गानाचे ४ मुख्य प्रकार आहेत .
१-अरण्यगानम् – अरण्यात होणाऱ्या यज्ञात ऋषी हे मंत्र म्हणत
असत
२-ग्राम्यगानम् – गावात लोक जमा झाले असता एखाद्या
कार्यप्रसंगी किंवा यज्ञाच्या वेळी म्हटले जाणारे मंत्र
३- उहगानम् – विशिष्ट धार्मिक प्रसंगी करायचे गान
४- उह्यगानम् – उह्य म्हणजे रहस्य . हे गान सार्वजनिक
ठिकाणी करत नसत
ह्या व्यतिरिक्त वैरूपगानम् , वैराजगानम् , रथंतर: , शक्वर: , भद्र: , वैखानस: , बृहद् हे देखील
गानाचे अन्य काही प्रकार मानले जातात .
प्रस्तोता , उद्गाता , प्रतिहर्ता आणि सुब्रह्मण्य हे ४ पुरोहित यज्ञात
सामगान करतात .
सामगानाची सुरुवात प्रस्तोता करतो आणि शेवट प्रतिहर्ता करतो
.
उद्गात्याला सामगानात मदत करणाऱ्या पुरोहिताला सुब्रह्मण्य
म्हणतात . या चारांच्या खेरीज समूहगान करणारे जे इतर ऋत्विज असतात ज्यांना
उपगातार: म्हणतात .
कोणताही यज्ञ किंवा ऋग्वेदिक मंत्र साम शिवाय अपूर्ण मानला
जातो . साम ऋचेला बांधून ठेवतात .
सामवेदात एकूण ४५ देवतांची प्रार्थना किंवा मंत्र आहेत
ज्यात
ग्रहदेवता – सूर्य सोम भौम बुध गुरु शुक्र शनैश्वर राहू
केतू शंभु समा स्कंद विष्णू ब्रह्मा इंद्र यम काळ आणि चित्रगुप्त अशा एकूण १८
देवता येतात .
अधिदेवता – यात अग्नी वरूण पृथ्वी विष्णू शक्र इंद्राणी
प्रजापती सर्प ह्या ८ देवता आहेत .
लोकपाल – गणपती दुर्गा वायू आकाश अश्विनीकुमार श्री
मृत्युंजय वास्तुदेवता ह्या ८ देवता
दिकपाक – इंद्र अग्नी यम निर्कृती वरूण आयु सोम ईशान
परमेष्ठी विष्णू विश्वेदेव – ११
सामगायना बाबत त्या काळच्या समाजात खालील काही समज प्रचलित
होते असे दिसते .
१- कुत्र्याचे भुंकणे, वाघाची गर्जना , कोल्हेकुई , घुबडाचा आवाज इत्यादी अशुभ आवाज आला तर सामगायन करू
नये .
२- यज्ञात सामगायन गाणारा नसल्याने सामगायन झाले नाही तर तो
यज्ञ निकृष्ट प्रतीचा समजला जाई . शतपथ ब्राह्मणानुसार सामगायाना शिवाय यज्ञ होत
नाही " नासामा यज्ञो भवति "
३- सामविधान – या भागात काही अभिचार मंत्र आहेत जे तंत्र
मंत्र , काळीजादू यांच्या जवळ जाणारे आहेत . ते अशुभ मानले
गेले आहेत .
सामवेदाची मुख्य तीन तत्त्व आहेत -
१- समतेची भावना निर्माण करणं .
२ – सर्वांना एकत्रित करणं .
३- साम म्हणजे प्राण आणि प्राणशक्ती ही जीवनासाठी
अत्यावश्यक आहे .
© नयना पिकळे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा