यजुर्वेद:
आज आपण यजुर्वेदाविषयी जाणून घ्यायचा प्रयत्न करूया .
यजुषाम् वेद: यजुर्वेद: |
ऋग्वेद काळी यज्ञविधींचं स्वरूप साधं सरळ होतं .
यज्ञप्रसंगी देवतांची मंत्राद्वारे स्तुती करून त्यांना प्रसन्न केलं जायचं आणि
त्यांना सोमाची किंवा इतर आवडत्या पदार्थांची आहुती दिली जायची .
पुढे हळुहळु हे तंत्र प्रगत होत गेलं तसतसे वेगवेगळे विधी
सुरु झाले . प्रत्येक यज्ञात वेगळे विशिष्ट मंत्र वापरले जाऊ लागले , विशिष्ट नियम पाळले जाऊ लागले .
अशावेळी ऋषींनी मूळ ऋग्वेदातील मंत्रांचं वेगवेगळ्या यज्ञा नुसार संकलन केलं .
साधारण पणे मंत्र पद्यात्मक असतात पण यजुर्वेदातील मंत्र
गद्यात आहेत .
हे यज्ञासाठी रचलेले गद्यमंत्र म्हणजेच ‘यजुस्’ .
यजुर्वेद म्हणजे गद्य मंत्र संकलित केलेला वेद.
ऋग्वेदातील २ किंवा ३ सूक्ते किंवा ऋचा एकत्र करून
यजुर्वेदातील एक सूक्त बनलेलं आहे .
उदा ऋग्वेदातील हिरण्यगर्भ सूक्ताच्या पहिल्या ४ ऋचा आणि
शिवसंकल्प सूक्ताच्या ९ ऋचा मिळून बनलेलं सूक्त अश्वमेध यज्ञ किंवा
पिंडपितृयागाच्या वेळी म्हटलं जातं .
अध्वरवेद या नावानेही यजुर्वेद ओळखला जातो .
अध्वर – त्याग , अहिंसा .
यज्ञात दिल्या ज़ाणाऱ्या पशुबळीला
"शमन" म्हणत असत .
कोणत्याही यज्ञ प्रसंगी ऋग्वेदाचा होता, सामवेदाचा उद्गाता, यजुर्वेदाचा अध्वर्यु आणि अर्थववेदाचा ब्रह्मा हे चारही
एकाच वेळी हजार असणं गरजेचं असतं .
या चार प्रमुख ऋत्विजांपैकी अध्वर्यु नावाचा ऋत्विज
यज्ञतंत्रासाठी ज्या वेदातील मंत्रांचा उपयोग करतो त्या वेदाला यजुर्वेद म्हणतात .
अध्वर्यु - यज्ञातील महत्त्वपूर्ण घटक मानला जातो . तो
यज्ञातील विधी आणि त्याप्रसंगी म्हणायचे मंत्र ठरवतो .
होता - यज्ञासाठी देवतांचे आवाहन करतो .
उद्गाता – सामगायन करतो .
ब्रह्मा – यज्ञ कार्य कोणत्याही विघ्नाशिवाय पार पडावं म्हणून सर्वांवर दृष्टी ठेवून यज्ञाची रक्षा करतो . प्रत्येक जण आपलं कर्तव्य चोख
पार पाडतो का हे पाहणे देखील ब्रह्माचेच काम असते .
कोणी चुकीचं मंत्रपठण केल्यास ब्रह्मा त्याला प्रायश्चित
सांगतो .
अशावेळी ते चुकलेले मंत्र ब्रह्मा म्हणतो आणि अग्नीत आहुती
देतो .
यासाठी ब्रह्माला सर्वांची कामे नीट माहिती असणं व त्याने
अत्यंत दक्ष अनुशासक असणं आवश्यक आहे .
यमाची दिशा दक्षिण असते आणि त्याच बाजूने सगळी संकटे किंवा
असुर येतात म्हणून ब्रह्मा यज्ञ समयी दक्षिणेला तोंड करून बसतो .
होता, उद्गाता आणि
अध्वर्युला सोमरसाचा एक घोट मिळतो तर ब्रह्माला १ कप सोमरस मिळतो . यावरूनही ब्रह्माचे महत्त्व कळते .
चरणव्यूह या परिशिष्टग्रंथात यजुर्वेदाच्या ८६ शाखा
असल्याचा तर पातंजल महाभाष्यात यजुर्वेदाच्या १०१ शाखा असल्याचा निर्देश आहे .
आज मात्र यजुर्वेदाचे केवळ शुक्ल आणि कृष्ण यजुर्वेद असे
दोनच भेद ग्रंथ स्वरुपात उपलब्ध असून त्यांच्या सहा शाखा उपलब्ध आहेत .
कृष्ण यजुर्वेदाच्या ४ शाखा आहेत
काठक संहिता – काश्मिरी पंडित
मैत्रायणी ( कालापक ) संहिता – महाराष्ट्र , बीड , नाशिक , गुजरात
कपिष्ठल ( कठ ) – ह्या संहितेची केवळ हस्तलिखिते उपलब्ध आहेत
. ह्यांचा अभ्यास कुठे होत होता हे अजून कळलेलं नाही .
तैत्तिरिय संहिता – दक्षिण भारत
तैत्तिरिय ह्या नावा संदर्भात विष्णू पुराणात एक गोष्ट येते
ती अशी –
वैशंपायन ऋषीं आपले शिष्य याज्ञवल्क्य याच्यावर एकदा चिडले
असता त्यांनी याज्ञवल्क्य यांना शिकवलेले वेद परत मागितले .
तेव्हा याज्ञवल्क्यांनी वेदांचे निखार्यांच्या स्वरूपात वमन
केले . तेव्हा इतर शिष्यांनी तित्तिरी नामक पक्ष्यांचे रूप घेऊन ते वेद आपल्या
चोचीत ठेवले .
तैत्तिरिय संहितेत अनेक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली आहे
पण सर्व माहिती विखुरलेल्या अवस्थेत आहे .
कृष्ण यजुर्वेदात मंत्र आणि ब्राह्मण यांची सरमिसळ आढळते .
त्यात यज्ञांचा क्रमही नीट पाळलेला दिसत नाही .
मंत्रांचा अर्थ सुद्धा दिलेला आहे .
मंत्रांचा अर्थ सांगावा लागतो म्हणजेच वेद भरकटला असे मानले गेले आणि याअर्थी
कृष्ण यजुर्वेद भ्रष्ट मानला जातो .
ब्राह्मणभाग आणि काम्येष्टि म्हणजेच कामनापूर्तींसाठी
केलेले यज्ञ हे कृष्ण यजुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे .
शुक्ल यजुर्वेदाच्या तुलनेत कृष्ण यजुर्वेदाची रचना
शिस्तबद्ध नसली तरी कृष्ण यजुर्वेदातील माहिती संपूर्ण मानली जाते .
वरील वमन प्रसंगानंतर याज्ञवल्क्यांनी सूर्याची उपासना केली
आणि "अयातयाम" म्हणजे कुणाच्याही तोंडी राहून शिळे न झालेले नवीन
यजुर्मन्त्र सूर्यापासून मागून घेतले .
सूर्याने वाजी म्हणजे घोड्याचे रूप घेऊन याज्ञवल्क्यास हे
मंत्र दिले .
हा नवीन वेद म्हणजे शुक्ल यजुर्वेद .
( वाज = घोडा + सनि = देणारा )
अश्वरुपी सूर्यापासून निर्माण झाली म्हणून ही वाजसनेयी संहिता या नावानेहि प्रसिद्ध असून ह्यात फक्त मंत्र आहेत .
शुक्ल यजुर्वेद केवळ परंपरेने कळतो म्हणून तो शुद्ध मानला
गेला आहे .
शुक्ल यजुर्वेदाच्या दोन शाखा आहेत .
काण्व संहिता – याचा अभ्यास ओरिसा इथे काही खास ठिकाणीच केला जातो .
माध्यंदिन संहिता – उत्तरप्रदेश
शुद्ध मंत्रसंहिता , प्रवर्ग्य विधी , अवभृतस्नान विधी
आणि ईशाव्यास उपनिषदांचा अंतर्भाव ही शुक्ल यजुर्वेदाची वैशिष्ट्य आहेत .
शुक्ल याजुर्वेदाची वाजसनेयी संहिता ४० भागात विभागली गेली
आहे .
पहिल्या १ - २५ अध्यायात दर्शपूर्णमास , अश्वमेध , अग्निहोत्र , गोपितृयज्ञ अशा अनेक मोठ्या व महत्त्वाच्या यज्ञासंबंधी
वर्णन येते .
२६ – ३० अध्याय ही खिल कांड आहेत . यात वेगवेगळ्या
प्रार्थना दिल्या आहेत .
३० अध्यायात पुरुषमेधातील बळींची सूची दिली आहेत . यात १८४
प्रकारच्या माणसांची यादी आहे .
३१ अध्याय – ऋग्वेदातील परुषसूक्त इथे येतं
३२ – ३३ सर्वमेधयागाची माहिती – आपल्याकडे असलेलं सर्वस्व
दान करणं
३४ अध्याय – शिवसंकल्पोपनिषद
३५ – अध्याय अंत्यविधी क्रियेच्या वेळी म्हणायचे मंत्र
३६ – ३९ प्रवर्ग्य विधी – यात ३ मातीची भांडी करून त्याचे
एकावर एक ३ थर करतात . तूप खूप कढवतात आणि पाणि घालतात . आगीची ज्योत खूप वरपर्यंत
जाते . यामुळे दिलेली आहुती देवांपर्यंत पोचते असा समज होता .
४० अध्याय – अवभृतस्नान विधी – यज्ञ समाप्ती नंतर सर्व
संबंधितांनी नदीवर जायचं. एक भांड ( महावीरपात्र ) घायचं . हे सूर्याचं प्रतिक
मानलं आहे . त्या भांड्यावर केस म्हणून दर्भ , कान म्हणून दही दुधाचं दोहनपात्र , डोळे म्हणून सुवर्णपत्र , आणि पाय म्हणून चपटी छोटी पात्रे लावायची आणि मनुष्याकृती
तयार करायची . ह्या आकृती वर पीठ पसरवायचं आणि त्या पात्रात मध आणि दुधाचे मिश्रण
वर पर्यंत भरून ते नदीला अर्पण करायचे .
यजुर्वेद त्या काळी महत्त्वाचा मानला गेला आहे कारण विविध
यज्ञकार्यांमुळे इच्छापुर्ती होते असा त्या काळच्या समाजाचा ठाम विश्वास होता.
प्रदीर्घ चालणारे यज्ञ आणि त्यातले असंख्य विधी यामुळे अनेकांना कामही मिळत असे .
आज मात्र यजुर्वेदातील विविध यज्ञविधींचा शास्त्रीय
दृष्टीकोनातून अभ्यास होणं गरजेचं आहे .
अभ्यासकांचं मत आहे की वेदांच्या अभ्यासामुळे त्याकाळचं
सामाजिक जीवन, प्रचलित असलेल्या प्रथा रूढी , त्याकाळी प्रगत असलेली अनेक शास्त्र आणि प्रचलित
असलेलं विज्ञान कळायला मदत होत आहे .
© नयना पिकळे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा