बुधवार, १५ जानेवारी, २०२५

ओळख वेदांची - ऋग्वेद : | Know our Vedas - Rigveda

 परिचय आपल्या संस्कृतीचा

आज आपली संस्कृती म्हटलं कि बहुतेकांना हिंदू धर्म , ब्राह्मण , वेद , याज्ञिक कर्मकांड असले शब्द आठवतात .
पण संस्कृती म्हणजे नक्की काय ?
संस्कृती ह्या शब्दाची फोड सम् + कृती अशी आहे .
" सम्यक् कृती: संस्कृति: कथ्यते "
" या मनस: आत्मनो वा संस्कारं करोति सा संस्कृति: "
जी मनावर किंवा आत्म्यावर संस्कार घडवते ती संस्कृती .
शब्दशः कळायला खूप साधी सोपी वाटणारी पण प्रत्यक्ष अर्थ कळून तो आचरणात आणायला अतिशय गहन गंभीर असलेली आपली भारतीय संस्कृती .
आपली भारतीय संस्कृती आज संपूर्ण विश्वात सर्वात प्राचीन आणि श्रेष्ठ मानली जाते .
अशा ह्या आपल्या गौरवास्पद असणाऱ्या संस्कृतीची ओळख आपल्याला वेद , ब्राह्मणग्रंथ , आरण्यक , उपनिषद , धर्मसूत्र , भारतीय दर्शन , स्मृतीग्रंथ , पुराणे व इतर अनेक ग्रंथांतून अगदी विस्ताराने घडते .
पण आहे काय ह्या ग्रंथांमध्ये संस्कृती विषयक ?
ऋग्वेद , सामवेद , यजुर्वेद , अथर्ववेद यांच्यात नक्की काय माहिती दिली आहे ?
ब्राह्मणग्रंथ , आरण्यक आणि उपनिषद म्हणजे काय ?
आपल्या संस्कृतीचे निदर्शक असणाऱ्या ह्या प्राचीन वैदिक ग्रंथात कुठेही धर्म म्हणजे हिंदू असा उल्लेख शोधून सापडणार नाही .
त्यामुळे हे ज्ञान वैश्विक आहे . ज्यांचा देवावर किंवा हिंदू धर्मावर विश्वास नाही अगदी त्यांच्यासाठी सुद्धा वैदिक वाङमय जाणून घेणं खूप उपयुक्त ठरेल .
पण हे सगळेच प्राचीन ग्रंथ संस्कृत मध्ये असल्याने हे ज्ञान अगदी मोजक्या लोकांपर्यंत सीमित राहते .
म्हणून आपल्या समृध्द संस्कृती विषयी जाणून घेण्यासाठी हा सर्व प्रपंच .
अर्थात मी काही या विषयातील तज्ञ नाही .
त्यामुळे मी इथे मांडलेले विचार , माझं निरीक्षण , माझी निदानं अंतिम नाहीत . मला माझ्या कुवतीप्रमाणे जे काही आकलन झालं त्यावरून मांडलेली ही माझी वैयक्तिक मते आहेत .
फक्त आपल्या प्राचीन ग्रंथातील ज्ञान शक्य तितक्या सोप्या पद्धतीने तुम्हा सर्वांसमोर आणावं आणि त्यानिमित्ताने माझाही त्या विषयाचा अभ्यास दृढ व्हावा हाच ह्या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे .
त्यामुळे लिखाणात कुठे काही त्रुटी आढळल्यास जाणकारांनी केलेलं मार्गदर्शन स्वागतार्हच आहे .

ओळख वेदांची - ऋग्वेद :

जशी भारतीय संस्कृती विश्वात सर्वात प्राचीन तसेच विश्वसाहित्यात वेद सर्वात प्राचीन ग्रंथ मानले गेले आहेत .
प्राचीन काळी प्रचलित असलेली सांस्कृतिक मुल्ये , विविध देव देवतांचे स्तवन , अध्यात्मिक तत्त्वज्ञान , शास्त्र , विज्ञान , तंत्र-मंत्र , विद्या ह्यांचे अतिशय सुरेख छंदबद्ध वर्णन वेदांमधील ऋचांमध्ये आढळते .
समाधीअवस्थेत ऋषींना जेव्हा पराकोटीची अनुभूती प्राप्त झाली तेव्हा मनाच्या अतिशुद्ध अवस्थेत त्यांना झालेलं ज्ञान , मिळालेला आत्मानंद म्हणजेच वेद .
ह्या ऋषींना द्रष्टा ( दृश् धातू ) म्हटलं आहे .
द्रष्टा म्हणजे त्यांना हे वेद दिसले .
आपल्या तपाचरणामुळे त्यांना अंत:करणात वेदांचे दर्शन ( दृष्टांत ) झाले .
वेद मानव निर्मित नसल्याने अपौरुषेय मानले जातात .
वेद म्हणजे परमेश्वराचे निश्वसित ( श्वास ) असे म्हटले आहे .
परमेश्वर नित्य असल्याने त्याचा श्वास म्हणजेच वेदही नित्य आहेत .
श्वासाचा अर्थ ज्ञान असाही असल्याने ज्ञानही नित्यच आहे .
ऋषींनी अंत:करणातच हे वेद ऐकले म्हणून वेदांना श्रुती देखील म्हणतात .
प्रत्येक वेदाचे वैदिक संहिता , ब्राह्मणग्रंथ , आरण्यक आणि उपनिषद असे चार विभाग आहेत .
ऋग्वेद , सामवेद , यजुर्वेद आणि अथर्ववेद या चारही वेदांमध्ये ऋग्वेद सर्वात प्राचीन मानला जातो .
ऋग्वेदाला भारतीय संस्कृतीचा मानदंड आणि वेदांचा आत्मा मानले जाते .
ऋग्वेद: म्हणजेच ( ऋचाम् वेद: ) .
वेद शब्द विद् धातु पासून आला आहे .
विद् म्हणजे पवित्र ज्ञान .
ऋच् – स्तुयन्ते ऋच्यन्ते अनया: देवाः ( ज्यात देवाची स्तुति केली जाते त्याला ऋचा म्हणतात ) .
ऋग्वेदाची रचना या प्रमाणे आहे
ऋक् – ऋच: - सूक्तं – सूक्तानि – मंडळ
अनेक ऋचा एकत्र मिळून एक सूक्त बनत .
अनेक सूक्तांच एक मंडल आणि अनेक मंडळांचा एक वेद .
“येनोक्तं यस्य वाक्यं स ऋषिः |
यया तेनोच्यते सा देवता |”
ज्याने जे म्हटलं (मन्त्र / ऋक् ) तो त्या ऋचेचा ऋषी आणि त्या ऋचेत ज्याबद्दल सांगितलं गेलं आहे ती देवता .
वेदांमधल्या सूक्तांची देवता एखादी निर्जीव गोष्ट देखील असू शकते .
जसे की एका सूक्तात पाटा वरवंटा यांची स्तुती असल्याने त्या सूक्ताची पाटा वरवंटा हीच देवता मानली गेली आहे .
ऋग्वेदाचा काळ साधारण पाच हजार वर्षांपुर्वीचा असून तो सर्वात जुना ग्रंथ मानला जातो .
ऋग्वेदाची रचना नक्की कधी झाली याबाबत अनेक मतभेद असले तरी सर्वसामान्य पणे इ स पुर्व १५०० – ३५०० या दरम्यान ऋग्वेदाची रचना झाली असावी असे अनेक अभ्यासकांचे मत आहे .
वेद आधी एकच होता पण व्यासांनी त्याचे चार भाग बनवले व आपल्या चार शिष्यांना दिले .
ऋग्वेद त्यांनी आपल्या पैल नामक शिष्याला दिला .
वेद व्यास – पैल – इंद्रप्रमती व बाष्कल – इंद्रप्रमती कडून - मांडूकेय – सत्यश्रवा – सत्यहित – सत्यश्रिय – असे करत करत ऋग्वेदाचा प्रसार झाला .
पतंजली मुनींच्या मते ऋग्वेदाच्या २१ शाखा होत्या . पण आज केवळ शाकल शाखा सर्वात शुद्ध आणि टिकलेली शाखा मानली जाते .
मौखिक परंपरेने या शाखेचा प्रसार झाला असल्याने सूक्त , शब्द , अक्षर सारे काही मोजून मापून एका मात्रेचाही फरक न होता आज इतक्या हजारो वर्षानंतरही जसेच्या तसे जोपासले गेले आहे .
ऋग्वेदात एकूण १०१७ सूक्ते आणि १०५५२ ऋचा आहेत .
ह्या शिवाय ११ खिल ( मागाहून भर पडलेली ) सूक्ते आहेत जी वालखिल्य ऋषींनी लिहिली असा प्रवाद आहे .
ही खिल सूक्ते ऋग्वेदातील आठव्या मंडळात येतात .
ऋग्वेदात एकूण १० मंडळे आहेत आणि वेगवेगळ्या गोत्रांच्या ऋषींनी ही सूक्ते रचलेली आहेत .
ऋषींची मुले व त्यांच्या शिष्यांनी पुढे त्यात भर घातली .
एका गोत्राचे अनेक ऋषी मिळून एक मंडळ तयार करतात.
उदा – विश्वामित्र मंडळ .
एकूण ३९० ऋषींनी मिळून हि सूक्ते लिहिली आहेत .
त्यापैकी २१ स्त्रिया आहेत .
काही ऋचा ब्राह्मणांनी , काही अन्य जातीतील विद्वानांनी तर काही प्रत्यक्ष इंद्राने लिहिल्याचा उल्लेख आहे .
ऋग्वेदातील १ आणि १० मंडळात वेगवेगळ्या ऋषींची मिश्र सूक्ते आहेत .
१ ल्या मंडळात १०० पेक्षा जास्त ऋचा लिहिलेल्या ऋषींची सूक्तं आहेत .
म्हणून त्या मंडळाला शतर्चिमंडळ असंही म्हणतात .
२ ते ८ ही गोत्र मंडळे आहेत .
९ वे संपूर्ण मंडळ सोम या वल्लीशी संबंधित आहे .
सूक्तानुसार मंडळांची वर्गवारी –
१) मिश्र सूक्ते
२) गृत्स्यमद ऋषी
३) विश्वामित्र
४) वामदेव
५) अत्री
६) भारद्वाज
७) वसिष्ठ
८) कण्व आणि अंगिरा , शिवाय वालखिल्यांची खिल सूक्ते
९) वरील सर्व ऋषींनी रचलेली सोम सूक्ते
१० ) मिश्र सूक्ते .
ऋग्वेद अग्निसूक्ताने सुरु होतो आणि संज्ञानसूक्ताने संपतो .
पहिल्या मंडळातील अग्निसूक्त ( १.९९ ) हे ऋग्वेदातील सर्वात लहान ( १ ऋचा ) सूक्त असून अस्यवामीय सूक्त ( १.६४ ) सर्वात मोठे सूक्त ( ५२ ऋचा ) आहे .
ऋग्वेदात अष्टकरचना ( आठ सम भाग ) म्हणजे ऋचांच्या आधारे केलेली वर्गवारी आढळते .
३० ऋचांचा – १ वर्ग
३०/३२ वर्गांचा – १ अध्याय
८ अध्यायांचा – १ अष्टक
८ अष्टकांचा – १ पूर्ण ऋग्वेद
मौखिक पाठासाठी ऋग्वेदाचे ८५ अनुवाक् ( भाग ) केले गेले आहेत .
तसेच देवतानुसार देखील काहीवेळा सूक्तांची वर्गवारी केलेली आहे .
ऋग्वेदात मुख्यत्त्वे विविध देवतांची स्तुती आढळते .
विविध नैसर्गिक शक्तींना देवता मानून आपल्या रक्षणासाठी , उत्कर्षासाठी , सुख समाधानासाठी त्यांची स्तुती केलेली आहे .
इंद्र , अग्नी , वरुण , आदित्य , अश्विनी कुमार , मित्रावरुण , बृहस्पति , रुद्र , पूषन ह्या देवतांपासून अगदी पर्जन्य , उषा , अन्न , वायू , गो , वास्तोष्पती यांच्यावरही सूक्ते रचलेली आहेत .
ऋग्वेदात एकट्या इंद्रावर जवळ जवळ २५० सूक्ते आहेत .
इतर अनेक सूक्तात देखील इंद्राचा उल्लेख येतो .
ह्यावरून त्याकाळी इंद्र मुख्य देवता होती हे कळते .
इंद्रा नंतर सर्वात जास्त सूक्ते अग्नीची आहेत .
सोम वल्ली वर देखील खूप सूक्ते रचली गेली आहेत .
ऋग्वेद हा जरी धर्मग्रंथ मानला गेला असला तरी धर्म म्हणजे हिंदू असा उल्लेख संपूर्ण ऋग्वेदात कुठेही येत नाही .
ह्यावरून हा ग्रंथ कुणा एका विशिष्ट धर्मासाठी ( आजच्या काळातल्या ) रचलेला नाही हे त्या काळच्या धर्म अधर्माची व्याख्या पाहता लक्षात येते .
वैदिक काळात धर्म अधर्म म्हणजे न्याय – अन्याय , नीती - अनिती , पाप पुण्य .
ऋग्वेदात जरी असंख्य देव देवतांचा उल्लेख असला तरी सौरशक्ती हि एकमेव शक्ती मानली गेली आहे .
सौरशक्तीची उपासना करून सामर्थ्य संपादन करणे , शारीरिक आरोग्य प्राप्त करणे हे विषय वेगवेगळ्या प्रकारे हाताळलेले आहेत .
इंद्र , अग्नी , वरुण , आदित्य व इतर सर्व देवतांना याच सौरशक्तीच्या उपदेवता किंवा स्वरूपे मानून त्यांचे मानवीकरण केले आहे आणि समाज धारणेसाठी त्यांचा उपयोग करून घेतला आहे .
खगोलशास्त्र , भूगोलशास्त्र , जलचक्र , ऋतूचक्र , ग्रह तारे तारकांच्या गति , भ्रमण मार्ग , गुरुत्वाकर्षण , स्थिरता , अणु विभाजन , अणुशक्ती , हवेतील विविध वायू , तसेच मानवी आरोग्य , शल्यचिकित्सा , शल्यक्रिया , अवयवारोपण , औषधयोजना , राज्यशासन , परराष्ट्र व्यवहार , शेती , धरणे , कालवे , पाणबुड्या , जलप्रवास न्यायदान , दंडपद्धती , शत्रुनाश , स्वदेश संरक्षण अशा जीवनाच्या एकूण एक अंगासंबंधीचे विवेचन ऋग्वेदात आढळते .
ह्यावरून ऋग्वेद हा धार्मिक ग्रंथ नसून त्याकाळी समाज प्रबोधनासाठी उपयोगात आणला जाणारा सामाजिक ग्रंथ होता हे नक्की .
वैदिक काळच्या समाजाची स्थिती , श्रद्धा अंधश्रद्धा , नीति नियम , तंत्रज्ञान , विकसित शास्त्रपद्धती , शिस्तबद्ध समृद्ध समाज यांची ओळख करून घेण्यासाठी ऋग्वेदाचा अभ्यास अत्यावश्यक आहे .
इतर वेदांची प्राथमिक माहिती दिल्यावर पुढे ऋग्वेदातील विविध देवता आणि त्यांच्यावर आधारित सूक्ते ह्यावरही लिहीनच .

© नयना पिकळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, द्वितीय अंश, षष्ठ अध्याय | Vishnu Puran, Ansh 2 , Adhyay 6

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ द्वितीयः अंशः॥ ॥ षष्ठोऽध्यायः ॥   " भिन्न – भिन्न नरक तसेच भगवन्नामाच्या माहात्म्याचे वर्णन " परा...