शुक्रवार, ८ मे, २०२६

विष्णुपुराण, तृतीय अंश, त्रयोदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 3 , Adhyay 13

 

॥ विष्णुपुराणम् ॥

॥ तृतीयः अंशः ॥ त्रयोदशोऽध्यायः ॥


 

आभ्युदयिक श्राद्ध, प्रेतकर्म तथा श्राद्धादि विचार

और्व उवाच
सचैलस्य पितुः स्नानं जाते पुत्रे विधीयते ।
जातकर्म तदा कुर्याच्छ्राद्धमभ्युदये च यत् ॥ १ ॥

और्व म्हणाले : पुत्र जन्मानंतर पित्याने सचैल वस्त्र घातलेल्या अवस्थेत स्नान करून मगच जातकर्म संस्कार व आभ्युदायिक श्राद्ध करावे. ॥ १ ॥

 


 युग्मान्देवांश्च पित्र्यांश्च सम्यक्सव्यक्रमाद्‌द्विजान् ।
 पूजायेद्‍भोजयेच्चैव तन्मना नान्यमानसः ॥ २ ॥

मग एकाग्रतेने आणि अनन्यचित्ताने देवता आणि पितृगणांसाठी डाव्या व उजव्या बाजूला दोन दोन ब्राह्मणांना बसवून त्यांची पूजा करून त्यांना भोजन द्यावे. ॥ २ ॥

 


 दध्यक्षतैः सबदरैः प्राङ्‍मुखोदङ्‍मुखोऽपि वा ।
 देवतीर्थेन वै पिण्डान्दद्यात्कायेन वा नृप ॥ ३ ॥

नंतर पूर्वेकडे व पश्चिमेकडे तोंड करून आपल्या दही, अक्षता आणि बदरीफलांनी बनवलेली पिंडे देवतीर्थ किंवा प्रजापतीतीर्थांना दान करावी. ॥ ३ ॥

 

 नान्दीमुखः पितृगणस्तेन श्राद्धेन पार्थिव ।
 प्रीयते तत्तु कर्तव्यं पुरुषैः सर्ववृद्धिषु ॥ ४ ॥

हे पृथ्वीनाथ, ह्या आभ्युदायिक श्राद्धाने नंदीमुख नावाचे पितृगण प्रसन्न होतात म्हणून सर्व आनंद प्रसंगी मनुष्याने ह्याचे अनुष्ठान केले पाहिजे .


 कन्यापुत्रविवाहेषु प्रवेशेषु च वेश्मनः ।
 नामकर्मणि बालानां चूडाकर्मादिके तथा ॥ ५ ॥
 सीमन्तोन्नयने चैव पुत्रादिमुखदर्शने ।
 नान्दीमुखं पितृगणं पूजयेत्प्रयतो गृही ॥ ६ ॥

मुलाच्या किंवा मुलीच्या विवाहप्रसंगी, गृहप्रवेशाच्यावेळी, मुलाचे नाव ठेवताना, मुंज व इतर शुद्धीकरण प्रसंगी, गर्भार मातेचे केस बांधताना, प्रथम मुलाचा चेहरा पाहताना किंवा यासारख्या इतर प्रसंगी गृहस्थाने एकाग्रचित्ताने नान्दीमुख नामक पितृगणांची पूजा करावी . ५-६



 पितृपूजाक्रमः प्रोक्तो वृद्धावेष सनातनः ।
 श्रूयतामवनीपाल प्रेतकर्मक्रियाविधिः ॥ ७ ॥

अशा प्रसंगी करण्याच्या आभ्युदायिक श्राद्धात पितृपुजेचा क्रम तुला सांगितला. आता प्रेतक्रियेचे विधि करण्याचे नियम ऐक.

 


 प्रेतदेहं शभैः स्नानैः स्नापितं स्रग्विभूषितम् ।
 दग्ध्वा ग्रामाद्‍बहिः स्नात्वा सचैलःसलिलाशये ॥ ८ ॥
 यत्र तत्र स्थितायैतदमुकायेति वादिनः ।
 दक्षिणाभिमुखा दद्युर्बान्धवाःसलिलाञ्जलीन् ॥ ९ ॥

“मृतव्यक्तिच्या बंधु बांधवांनी पवित्र जलाने प्रेताला स्नान घालून, पुष्पमालांनी सजवून, गावाबाहेर त्या शवाचे दहन करावे. नंतर सचैल (वस्त्रासहित) स्नान करून, दक्षिणेकडे तोंड करून उभे राहावे, आणि मृत व्यक्तीचे नाव घेऊन हात जोडून, ​​'तू जिथे कुठे असशील .' असे उद्देशून जलांजलि द्यावी. ८-९

 


 प्रविष्टाश्च समं गोभिर्ग्रामं नक्षत्रदर्शने ।
 कटकर्म ततः कुर्युर्भूमौ प्रस्तरशायिनः ॥ १० ॥

मग गोधुलीच्या वेळी आकाशात तारामंडळ दिसू लागल्यावर गावात परतावे आणि अशौचकर्म आटपून जमिनीवर तृणाच्या शय्येवर झोपून विश्रांती घ्यावी. १०

 


 दातव्योनदिनं पिडः प्रेताय भुवि पार्थिव ।
 दिवा च भक्तं भोक्तव्यममांसं मनुजर्षभ ॥ ११ ॥

मृत व्यक्तीसाठी दररोज सूतक असेपर्यंत जमिनीवर पिंडदान करावे आणि दररोज फक्त दिवसा मांसरहित भात खावा. ११

 


 दिनानि तानि चेच्छातः कर्तव्यं विप्रभोजनम् ।
 प्रेता यान्ति तथा तृप्तिं बन्धुवर्गेण भुञ्जता ॥ १२ ॥

शोक करणाऱ्याने सुतकाच्या दिवसात ब्राह्मणांच्या इच्छेनुसार त्यांना भोजन द्यावे. असे केल्याने मृताच्या आत्म्याला समाधान मिळते . १२

 


 प्रथमेह्नि तृतीये च सप्तमे नवमे तथा ।
 वस्त्रत्यागबहिःस्नाने कृत्वा दद्यात्तिलोदकम् ॥ १३ ॥

सुतकाच्या पहिल्या, तिसऱ्या, सातव्या किंवा नवव्या दिवशी नातेवाईकांनी वस्त्रांचा  त्याग करून दाराबाहेर स्नान करून तिलोदक (तिळाच्या दाण्यांनी जलार्पण) करावे.१३

 


 चतुर्थेह्नि च कर्तव्यं तस्यास्थिचयनं नृप ।
 तदूर्ध्वमङ्‍गसंस्पर्शःसपिण्डानामपीष्यते ॥ १४ ॥

चौथ्या दिवशी मृतव्यक्तिची राख व अस्थी गोळा कराव्यात. त्यानंतरच सपिंड बांधवाना अंगस्पर्श करता येतो. १४

 


 योग्याःसर्वक्रियाणां तु समनसलिलास्तथा ।
 अनुलेपनपुष्पादिभोगाद् अन्यत्र पार्थिव ॥ १५ ॥

ह्यांनतर समानोदक पुरूष चंदन आणि पुष्पधारण ह्या क्रिया सोडून इतर सर्व कर्म करू शकतो. १५

 


 शय्यासनोपभोगश्च सपिण्डानामपीष्यते ।
 भस्मास्थिचयनादूर्ध्वं संयोगो न तु योषिताम् ॥ १६ ॥

राख व अस्थी गोळा केल्यानंतर सपिंड पुरूष शय्या व आसनाचा वापर करू शकतात पण स्त्रीसंग नाही करू शकत.१६

 


 बाले देशान्तरस्थे च पतिते च मुनौ मृते ।
 सद्यः शौचं तथेच्छातो जलाग्न्युद्‍बन्धनादिषु ॥ १७ ॥

बालक, परदेशात राहणारी, पतित, किंवा तपस्वीच्या मृत्यु झालि असेल किंवा अग्नि, जल किंवा फाशी देण्याने मृत्यु झाला असल्यास लगेच सुतक संपते. १७

 


 मृतबन्धोर्दशाहानि कुलस्यान्नं न भुज्यते ।
 दानं प्रतिग्रहो होमः स्वाध्यायश्च निवर्तते ॥ १८ ॥

मृत व्यक्तिच्या कुटुंबातील अन्न दहा दिवस खाऊ नये तसेच सुतकाच्या काळात दान, परिग्रह, होम, स्वाध्याय आदि करू नयेत.१८

 


 विप्रस्यैतद्‌द्वादशाहं राजन्यस्याप्यशौचकम् ।
 अर्धमासं तु वैश्यस्य मासं शूद्रस्य शुद्धये ॥ १९ ॥

ब्राह्मणासाठी दहा दिवस, क्षत्रियासाठी बारा, वैश्यासाठी पंधरा आणि शूद्रासाठी एक महिना सुतकशुद्धी पाळावी .

 


 अयुजो भोजयेत्कामं द्विजानन्ते ततो दिने ।
 दद्याद्‌दर्भषु पिण्डं च प्रेतायोच्छिष्टसन्निधौ ॥ २० ॥

सुतक संपल्यावर इच्छेनुसार तीन, पाच, सात किंवा नऊ ब्राह्मणांना भोजन द्यावे आणि त्यांच्या भोजनानंतर उरलेल्या उष्ट्या अन्ना जवळ कुश गवतावर मृत व्यक्तीसाठी पिंडदान करावे.२०

 


 वार्यायुधप्रतोदास्तु दण्डश्च द्विजभोजनात् ।
 स्प्रष्टव्योनन्तरं वर्णैः शुद्धेरन्ते ततः क्रमात् ॥ २१ ॥

ब्राह्मणांच्या भोजनानंतर, ब्राह्मण आदि चारही वर्णाच्या लोकांनी आपल्या जातीनुसार, पाण्याला, शस्त्राला, प्रतोद(कोडा) आणि लाठीला स्पर्श करावा. अशा संपर्काने तो शुद्ध झाला असे मानावे. २१

 


 ततःसर्वणधर्मा ये विप्रादिनामुदाहृताः ।
 तान्कुर्वीत पुमाञ्जीवेन्निजधर्मार्जनैस्तथा ॥ २२ ॥

त्यानंतर तो आपल्या जातीधर्माचे अनुसरण करून विहित कर्तव्याचे आचरण पुन्हा सुरू करू शकतो.२२

 


 मृताहनि च कर्तव्यमेकोद्दिष्टमतः परम् ।
 आह्वानादिक्रियादैवनियोगरहितं हि यत् ॥ २३ ॥
 एकोऽर्घ्यस्तत्र दातव्यस्तथैवैकपवित्रकम् ।
 प्रेताय पिण्डो दातव्यो भुक्तवत्सु द्विजातिषु ॥ २४ ॥

त्यानंतर एका वर्षासाठी प्रत्येक महिन्यातील मृत्युतिथीच्या दिवशी एकोद्दिष्ट श्राद्ध करावे ज्यात आवाहनादि क्रिया विश्वदेवसंबंधित ब्राह्मणांना आमंत्रण आदि नसावे. ह्यावेळी एक अर्घ्य आणि एक पवित्रक द्यावे आणि अनेक  ब्राह्मणांना भोजन देऊन मृत व्यक्तीसाठी एकच पिंडदान करावे. २३-२४

 


 प्रश्नश्च तत्राभिरतिर्यजमानद्विजन्मनाम् ।
 अक्षय्यममुकस्येति वक्तव्यं विरतौ तथा ॥ २५ ॥

यजमानाने ब्राह्मण संतुष्ट झाल्याची खात्री झाल्यावर त्यांच्या संमतीने, “ह्यामुळे मृतव्यक्ती सदैव संतुष्ट होवो” अशी प्रार्थना करावी.२५

 


 एकोद्दिष्टमयो धर्म इत्थमावत्सरात्स्मृतः ।
 सपिण्डीकरणं तस्मिन्काले राजेन्द्र चत्छृणु ॥ २६ ॥

हे एकोद्दिष्ट नावाचे श्राद्ध, व्यक्तीच्या मृत्यूपासून बारा महिने होईपर्यंत दर महिन्याला केले जाते; आणि बारा महिने झाले की सपिंडदान नावाचा संस्कारविधी करावा. २६

 


 एकोद्दिष्टविधानेन कार्यं तदपि पार्थिव ।
 संवत्सरेथ षष्ठे वा मासे वा द्वादशेह्नि तत् ॥ २७ ॥

सपिंडदान कार्य एक वर्ष, सहा महिने किंवा बारा दिवसानंतर एकोद्दिष्ट श्राद्धविधि प्रमाणेच करावे. २७

 


 तिलगन्धोदकैर्युक्तं तत्र पात्रचतुष्टयम् ॥ २८ ॥
 पात्रं प्रेतस्य तत्रैकं पैत्रं पात्रत्रयं तथा ।
 सेचयेत्पितृपात्रेषु प्रेतपात्रं ततस्त्रिषु ॥ २९ ॥

ह्यात पाणी, गंध आणि तीळ ह्यांची चार पात्र करावीत. पहिले पात्र मृतव्यक्तीसाठी आणि इतर तीन पितृगणासाठी असतात. नंतर मृताच्या पात्रातील जलादिंनी पितृगणांच्या पात्रांचे सिंचन करावे. २८-२९

 


 ततः पितृत्वमापन्ने तस्मिन्प्रेते महीपते ।
 श्राद्धधर्मैरशेषैस्तु तत्पूर्वानर्चयेत्पितॄन् ॥ ३० ॥

असे केल्याने मृत व्यक्ती पितृवर्गात समाविष्ट होते व त्याला पितृत्व प्राप्त होते. त्यानंतर मृतापासूनच सुरूवात करून पितृगणांचे पूजन करावे. ३०

 


 पुत्रः पौत्रः प्रपौत्रो वा भ्राता वा भ्रातृसन्ततिः ।
 सपिण्ड सन्ततिर्वापि क्रियार्हो नृप जायते ॥ ३१ ॥

पुत्र, नातू, पणतु, भाऊ, पुतण्या किंवा सपिंड संततित उत्पन्न झालेल्या पुरूषालाच श्राद्ध संस्कार करण्याचा अधिकार आहे. ३१

 


 तेषामभावे सर्वेषां समानोदकसन्ततिः ।
 मातृपक्षमपिण्डेन सम्बन्धा ये जलेन वा ॥ ३२ ॥

वरीलपैकी कोणीही नसेल तर अशावेळी समानोदक संतति किंवा मातृपक्षाचे सपिंड किंवा समानोदकाला हे कार्य करण्याचा अधिकार असतो. ३२

 


 कुलद्वयेपि चोच्छिन्ने स्त्रीभिः कार्याः क्रिया नृप ।
 पितृमातृसपिण्डैस्तु समानसलिलैस्तथा ॥ ३३ ॥

 सङ्‍घातान्तर्गतैर्वापि कार्याः प्रेतस्य च क्रियाः ।
 उत्सन्नबन्धुरिक्थाद्वा कारयेदवनीपतिः ॥ ३४ ॥

मातृ व पितृ दोन्ही बाजुच्या कुटुंबातील पुरूष वंश नामशेष झालेला असल्यास हे श्राद्धकार्य त्या कुटुंबातील स्त्री, एखाद्या धार्मिक अथवा सामाजिक संस्थेमार्फत मृत व्यक्तीशी संबंधित सहकाऱ्यांद्वारे किंवा मृतव्यक्तिची मालमत्ता मिळालेली व्यक्ती हे कार्य करू शकते. ३३-३४

 


 पूर्वाः क्रिया मध्यमाश्च तथा चैवोत्तराः क्रियाः ।
 त्रिःप्रकाराः क्रियाःसर्वास्तासां भेदं शृणुष्व मे ॥ ३५ ॥

प्रेतकर्म तीन प्रकारची आहेत, पुर्वकर्म, मध्यमकर्म आणि उत्तरकर्म. त्यांची लक्षणे ऐक. ३५

 


 आदाहवार्यायुधादिस्पर्शाद्यन्तास्तु याः क्रियाः ।
 ताः पूर्वा मध्यमा मासि मास्येकोद्दिष्टसंज्ञिताः ॥ ३६ ॥

पहिला प्रकार म्हणजे प्रेत जाळल्यानंतर जल आणि शस्त्रांचा स्पर्श होईपर्यंत जी कर्म पाळली जातात त्यांना पुर्वकर्म म्हणतात . दर महिन्याला जे एकोद्दिष्ट नावाचे श्राद्ध केले जाते ते मध्यमकर्म. ३६

 


 प्रेते पितृत्वमापन्ने सपिण्डिकरणादनु ।
 क्रियन्ते याः क्रियाः पित्र्याः प्रोच्यन्ते ता नृपोत्तराः ॥ ३७ ॥

आणि सपिंडिकरण ज्यामुळे मृत व्यक्तीला पितृत्व प्राप्त होते त्यानंतर केली जाणारी सर्व पितृकर्म म्हणजे उत्तरकर्म.३७

 


 पितृमातृसपिण्डैस्तु समानसलिलैस्तथा ।
 सङ्‍घातान्तर्गतैर्वापि राज्ञा तद्धनहारिणा ॥ ३८ ॥
 पूर्वाः क्रियाश्च कर्तव्याः पुत्राद्यैरेव चोत्तराः ।
 दौहित्रैर्वा नृपश्रेष्ठ कार्यास्तत्तनयैस्तथा ॥ ३९ ॥

पुर्वकर्म मृताचे वडिल, आई, सपिंड, समानोदक, नातेवाईक, सहकारी, त्याच्या मालमत्तेचा वारसदिर किंवा राजा करू शकतो. पण उत्तरकर्म पुत्र, दौहित्र किंवा त्यांच्या संततिनेच कले पाहिजे. ३८-३९

 


 मृताहनि च कर्तव्याः स्त्रीणामप्युत्तराः क्रिया ।
 प्रतिसंवत्सरं राजन्नेकोद्दिष्टविधानतः ॥ ४० ॥
 तस्मादुत्तरसंज्ञायाः क्रियास्ताः शृणु पार्थिव ।
 यथा यथा च कर्तव्या विधिना येन चानघ ॥ ४१ ॥

स्त्रियांचे उत्तरकर्म सुद्धा एकोद्दिष्ट श्राद्धविधिने दरवर्षी त्यांच्या मृत्यु तिथिला केले पाहिजे. ह्या उत्तरक्रिया कोणीकोणी व कशा प्रकारे कराव्या हे मी आता तुला सांगतो.” ४०-४१

 


 इति श्रीविष्णुमहापुराणे तृतीये अं
शे त्रयोदशोध्यायः (१३)



 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, तृतीय अंश, त्रयोदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 3 , Adhyay 13

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ तृतीयः अंशः ॥ त्रयोदशोऽध्यायः ॥   आभ्युदयिक श्राद्ध , प्रेतकर्म तथा श्राद्धादि विचार और्व उवाच सचैलस्य पितुः ...