मंगळवार, ९ जानेवारी, २०२४

श्री गणपती अथर्वशीर्ष | Shree Ganapati Atharvashirsha



गणपती ही बुद्धी व ज्ञानाची देवता . गणपती भौतिक सुखांचा दाता आहे . तो  आयुष्यातील दु:ख , संकटे आणि कष्टांपासून रक्षण करतो म्हणून त्याला सुखकर्ता दु:खहर्ता म्हणतात .


गणपतीला प्रसन्न करण्यासाठी जप-तप , संकष्टीचे उपवास , स्तोत्र-पठण , पूजा, आरती अशा अनेक प्रकारे त्याची उपासना केली जाते . ह्या सर्वात श्री गणपती अथर्वशीर्षाचे महत्त्व खूप मोठे मानले गेले आहे .

बहुतेक घरांतून दर मंगळवारी , तसेच संकष्टी , विनायकी आणि गणेशचतुर्थीला नित्यनेमाने अथर्वशीर्ष म्हटलं जातं .


श्री गणपती अथर्वशीर्ष हे अथर्ववेदाचे उपनिषद आहे आणि ह्या अथर्वशीर्षाचे रचनाकार गणकऋषी आहेत . 


ह्या उपनिषदात सगुण मूर्ती , निर्गुण ब्रह्म आणि मंत्रातून उमटणारं शब्दब्रह्म अशा अतिशय व्यापक अर्थाने गणपतीचं वर्णन केलं आहे . सगुण साकार गणेशाची उपासना करत करत निर्गुण निराकार परब्रह्मा पर्यंत पोहोचायचा मार्ग अथर्वशीर्षात सांगितला आहे . 


अथर्वशीर्षाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे इतर कोणत्याही देवतेच्या स्तोत्रात आधी देवतेच्या मूर्तीचे वर्णन आणि नंतर स्तुती असते . पण अथर्वशीर्षात आधी स्तुती व नंतर ध्यान असा क्रम आढळतो . शांतीमंत्र ध्यानविधी आणि फलश्रुती अशा तीन भागात अथर्वशीर्षाची विभागणी केलेली आहे . शांतीमंत्र अथर्वशीर्षाच्या सुरुवातीला व शेवटी असा दोन्ही वेळा आलेला आहे . 


श्री गणपती अथर्वशीर्ष (अर्थासहित)


शांतीमंत्र

ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः । 

भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः ॥

अर्थ - अथर्वशीर्षाची सुरुवात मंगल अशा ओंकाराने केली आहे . रचनाकार गणक ऋषि म्हणतात - हे देवांनो आमच्या कानांवर सदैव चांगल्या गोष्टीच पडू देत व आमच्या डोळ्यांना कायम चांगलंच दिसू देत . म्हणजेच आम्ही आमच्या कानांनी चांगलंच ऐकावं आणि जे चांगलं तेच पहावं .  


स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः । 

व्यशेम देवहितं यदायुः ॥

अर्थ - आम्हाला बलवान , निरोगी शरीर लाभू दे ज्याच्या सहाय्याने आम्ही मिळालेलं संपूर्ण आयुष्य देवांची स्तुति व सेवा करत व्यतीत करावं . आयुष्याचा कंटाळा न करता , जे आयुष्य लाभलं आहे ते आम्ही सार्थ म्हणजे अर्थपूर्ण रित्या जगावं .


स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः । 

स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः ॥

स्वस्तिनस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः । 

स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॥

ॐ शांतिः । शांतिः ॥ शांतिः॥

अर्थ - इंद्र आम्हाला शारीरिक व मानसिक रित्या स्वस्थ ठेवो . आमची श्रवण शक्ति वाढवो  जेणेकरून आमची बुद्धी व विचार प्रगल्भ होतील . विश्वव्यापि पूष (सूर्य) , विषारी सर्पांना नष्ट करणारा म्हणजेच सर्व संकटे दूर करून रक्षण करणारा अरिष्टनेमि गरुड , आणि देवांचा गुरु बृहस्पती आमचं कायम रक्षण करोत .

ह्या शांतिमंत्रात आपल्या सकारात्मक संस्कृतीचं दर्शन घडतं आणि आपल्या भोवताली सकारात्मक लहरी निर्माण होतात .


ध्यानविधी

ॐ नमस्ते गणपतये | 

त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि | 

त्वमेव केवलं कर्ताऽसि |

अर्थ - अथर्वशीर्षाचे रचनाकार गणकऋषी म्हणतात – हे समस्त देवगणांचा स्वामी गणपती , तुला माझा नमस्कार . 

हे देवा केवळ तूच प्रत्यक्ष तत्त्व आहेस . इथे तत्त्व शब्दाचा अर्थ आपल्या इंद्रियांना प्रत्यक्ष दिसणारे व जाणिवांच्या पलीकडे असणारे सर्व चराचराला व्यापून टाकणारे ब्रह्म असा आहे .

केवळ तूच कर्ता करविता आहेस . अशा प्रकारे आपल्या सर्व गोष्टींच कर्तृत्व गणपतीला देऊन मनातील अहंकाराची भावना समूळ नष्ट केली आहे . 

त्वमेव केवलं धर्ताऽसि | 

त्वमेव केवलं हर्ताSसि |

त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि | 

त्व साक्षादात्मासि नित्यम् |

अर्थ - सर्व काही केवळ तूच धारण करतोस आणि संहारही तूच करतोस . उत्पत्ती , स्थिती आणि लय ह्या साऱ्याचा अधिपती तूच आहेस.

हे गणपती देवा , संपूर्ण विश्वाला व्यापून टाकणारं सर्वव्यापि ब्रह्मतत्त्व देखील तूच आणि माझ्यातला अविनाशी आत्मस्वरूप असा अंतरात्माही तूच आहेस .

 ऋतं वच्मि |  सत्यं वच्मि |

अर्थ - हे मी यथार्थ आणि त्रिकालाबाधित असे सत्य सांगतो आहे . 

अव त्वं माम् | अव वक्तारम् |

अव श्रोतारम् | अव दातारम् |

अव धातारम् |

अवानूचानमव शिष्यम् |

अर्थ - तुझ्या ह्या रुपाचे सार्थ वर्णन करणाऱ्या माझे (मंत्र म्हणणाऱ्या वक्त्याचे) तू  रक्षण कर . तुझ्या गुणांचे श्रवण करणाऱ्या सर्व श्रोत्यांचे (शिष्याचे) रक्षण कर . तुझी उपासना दान करणाऱ्या (दात्याचे) रक्षण कर . ह्या उपासनेचे सांगोपांग अध्ययन धारण करणाऱ्या शिष्याचे (धात्याचे) रक्षण कर .

म्हणजेच जो हे ज्ञान धारण करू शकतो आणि नंतर पुढे देऊ शकतो त्या दोघांचेही तू रक्षण कर.

अव पश्चातात् | अव पुरस्तात् | 

अवोत्तरात्तात् | अव दक्षिणात्तात् |

अव चोर्ध्वात्तात् | अवाधरात्तात् |

सर्वतो मां पाहि-पाहि समंतात् |

अर्थ - तुझ्या उपासनेत कोणतीही विघ्ने येऊ नयेत म्हणून तू माझं पश्चिम दिशेकडून म्हणजेच मागून रक्षण कर . पूर्वे कडून म्हणजे पुढून रक्षण कर . तसेच उत्तर आणि दक्षिणे कडूनही रक्षण कर .

इथे मागून म्हणजे भूतकाळातील चुका आणि पुढून म्हणजे भविष्यकाळातील संकटे असाही अर्थ घेतला जातो .

तसेच उत्तर ही कुबेराची दिशा असल्याने धनलाभा मुळे येणारा उन्मत्तपणा व त्यामुळे होणारी दुर्दशा ह्यापासून तू माझं रक्षण कर आणि दक्षिण ही यमाची दिशा असल्याने यमपाश म्हणजे मृत्यू पासून तू माझं रक्षण कर असाही अर्थ काहीजण लावतात . अशाप्रकारे मागे , पुढे , वर , खाली अशा सर्व बाजूंनी हरप्रकारे माझे रक्षण कर.

त्वं वाङ्‍मयस्त्वं चिन्मयः | 

त्वमानंदमयस्त्वं ब्रह्ममयः |

त्वं सच्चिदानंदाद्वितीयोसि | 

त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि | 

त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि | 

अर्थ - उच्चारला जाणारा प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कार्य यात हे देवा फक्त तूच आहेस . तूच वाणी असल्याने तू वाङ्मयस्वरूप आहेस . चिन्मय आणि चैतन्य तूच आहेस . सत् , चित् आणि आनंद तूच आहेस , तू एकमेव अद्वितीय आहेस . तू ज्ञानमय आणि विज्ञानमय आहेस . चराचरात जे जे काही आहे त्या सर्वांचे मूर्त स्वरूप केवळ तूच आहेस .

सर्वं जगदिदं त्वत्तो जायते | 

सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति | 

सर्वं जगदिदं त्वयिलयमेष्यति | 

सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति | 

अर्थ - हे समस्त जगत तुझ्यापासून उत्पन्न होते आणि तुझ्यातच स्थित राहते . ह्या जगताचे पालन पोषण तुझ्याच कडून होते आणि शेवटी हे जगत तुझ्यातच विलीन होते .

त्वं भूमिरापोनलो निलो नभः |

त्वं चत्वारि वाक्पदानि | 

त्वं गुणत्रयातीत: त्वमवस्थात्रयातीतः |

त्वं देहत्रयातीतः | त्वं कालत्रयातीतः

अर्थ - पृथ्वी , जल , अग्नि , वायु आणि आकाश ही पंचमहाभूते तूच आहेस .

परा , पश्यंती , मध्यमा आणि वैखरी ही वाणीची चार रुपे तूच आहेस .

सत्व , रज , तम ह्या तीन गुणांच्या तू पलीकडे आहेस .

स्थूल , सूक्ष्म आणि आनंदमय ह्या जिवाच्या तीन अवस्थांच्या तू पलीकडे आहेस .

जागृत , स्वप्न आणि सुषुप्ति ह्या देहाच्या तीन अवस्थांच्या तू पलीकडे आहेस . भूत वर्तमान आणि भविष्य ह्या तीन काळांच्या तू पलीकडे आहेस .

त्वं मूलाधार स्थितोसि नित्यं |

त्वं शक्ति त्रयात्मकः |

त्वां योगिनो ध्यायंति नित्यं |

अर्थ - तू देहातील मूलाधार चक्रात नित्य स्थित आहेस .

तू उत्पत्ति , स्थिति आणि लय घडविणाऱ्या तीन शक्तिस्वरूप आहेस .  

जीवनमुक्ती लाभलेले योगी नित्य तुझेच ध्यान करतात . 

त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रूद्रस्त्वं इंद्रस्त्वं

अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुव:स्वरोम् |

अर्थ - ब्रह्मा , विष्णु आणि रुद्र तूच आहेस म्हणजेच सृष्टीचा कर्ता , पालक आणि संहारक तू आहेस . इन्द्र (उपभोग घेणारा) अग्नि (हविर्भाग ग्रहण करणारा) वायु (प्राणदायी) सूर्य (प्रकाशित करणारा ऊर्जास्वरूप) चंद्र (वनस्पतींना जीवन प्रदान करणारा) तूच आहेस . ब्रह्म म्हणजेच सर्व प्राणिमात्रातील जीव तू आहेस .

भू: भुव: आणि स्व: म्हणजे पृथ्वी अंतरिक्ष आणि स्वर्ग देखील तूच आहेस . ओंकार सुद्धा तूच आहेस .

माझ्या आतलं आणि माझ्या भवतीचं सगळं विश्व म्हणजे केवळ तूच आहेस . इथे गणपती म्हणजेच निर्गुण निराकार परब्रह्म अस म्हटलं आहे . 

गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादीं स्तदनंतरम् | 

अनुस्वार: परतरः |

अर्धेन्दुलसितम् | तारेण ऋद्धं | 

एतत्तव मनुस्वरूपम् | 

अर्थ - इथे मंत्र कसा उच्चारावा ह्याचे वर्णन येते . गण ह्या शब्दाचा पहिला वर्ण ग् प्रथम उच्चारावा त्यानंतर ग् पुढे असलेला वर्ण अ ह्याचा उच्चार करावा . त्यानंतर त्यापुढील अर्धचंद्रांकित अशा अनुस्वाराचा अनुनासिक उच्चार करावा . तार म्हणजेच प्रणव किंवा ओंकार ह्याच्या सहाय्याने हा एकाक्षरी मंत्र म्हणावा . हे तुझे मंत्र स्वरूप आहे .

गकार: पूर्वरूपम् | अकारो मध्यमरूपम् | 

अनुस्वारश्चान्त्यरूपम् | बिन्दुरूत्तररूपम् |

नाद: संधानम् | संहितासंधि: । 

अर्थ - ग् कार हा मंत्राचा पहिला वर्ण आहे त्यानंतर अ वर्ण मध्यम आहे आणि शेवटी अर्धचंद्रांकित अनुस्वार आहे . अनुस्वारा नंतरचा अनुनासिक बिंदु हे मंत्राचे उत्तररूप आहे . ओंकाराच्या नादाच्या सहाय्याने ह्या भिन्न वर्णांचे‌ एकत्रिकरण करावे . 

सैषा गणेश विद्या | गणकऋषि: |

निचृद्गायत्रीच्छंदः |

गणपतिर्देवता | 

अर्थ - ही गणेशविद्या आहे व अशा योग्य प्रकारे उच्चारलेला मंत्र श्री गणेशाची प्राप्ती करून देतो .

ह्या मंत्राचे ऋषि गणक ऋषि आहेत . निचृद्गायत्री छंद आहे आणि ह्या मंत्राची देवता गणपती आहे .

ॐ गं गणपतये नमः |

एकदंताय विद्‍महे। वक्रतुण्डाय धीमहि | 

तन्नो दंती प्रचोदयात् |

अर्थ - इथून गणपतीच्या सगुण स्वरूपाचे वर्णन केले आहे .

आम्ही एकदंताला सवार्थदाता (सर्व काही देणारा) असे जाणून घेतो आणि वक्रतुंडाचे ध्यान करतो. तो दन्ती आम्हाला भक्तीची प्रेरणा देवो व आमच्यात भक्तिभावना निर्माण करो . 

एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुश धारिणम् |

रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम् | 

अर्थ - एकच उजवा दांत , चार हात , वरील उजव्या हातात पाश , वरील डाव्या हातात अंकुश , खालील डाव्या हातात हत्तीचा दात , उजव्या हातात वरदमुद्रा आणि वाहन (चिह्न) उंदीर असे तुझे सगुण स्वरूप आहे .

रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम् |

रक्तगंधानु लिप्तांङ्गं रक्तपुष्पै: सुपुजितम् | 

अर्थ - रक्त (लाल) वर्णाचा , मोठे उदर असलेला , सुपासारखे कान असलेला , लाल वस्त्रे परिधान केलेला , रक्तचंदनाची उटी अंगाला लावलेला आणि तांबड्या फुलांनी पूजलेला  असे तुझे सगुण स्वरूप आहे .

भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम् | 

आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृ‍ते: पुरुषात्परम् | 

एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः |

अर्थ - भक्तांवर निरंतर कृपा करणारा , सर्व जग लिलेने उत्पन्न करणारा , अविनाशी , सृष्टीच्या पूर्वी उत्पन्न झालेला , प्रकृती व पुरुष यांच्याही पलीकडे असलेला असे तुझे सगुण स्वरूप आहे .  अशा सगुण गणपतीचं जो ध्यान करतो तो योग्यांचा योगी होतो .

नमो व्रातपतये | नमो गणपतये |

नम: प्रमथपतये | 

नमस्ते अस्तु लंबोदरायैकदंताय |

विघ्ननाशिने शिवसुताय |

श्रीवरदमूर्तये नमो नमः | 

अर्थ - या नमनात व्रातपती , गणपती , प्रमथपती , लंबोदर , एकदंत , विघ्ननाशी , शिवसुत , आणि वरदमूर्ती अशी आठ नावं वापरली आहेत . असा ध्यान विधी सांगितला आहे . 

फलश्रुती

एतदथर्वशीर्षं योधीते | 

स ब्रह्म भूयाय कल्पते |

स सर्वत: सुखमेधते | 

स सर्व विघ्नैर्नबाध्यते |

स पंचमहापापात्प्रमुच्यते | 

अर्थ - इथून फलश्रुतीचा भाग सुरू होतो .  

जो ह्या अथर्वशीर्षाचे अध्ययन करतो तो स्वतः ब्रह्मस्थितीला प्राप्त होतो म्हणजेच ब्रह्मस्वरूप होतो . त्याला सर्व सुखांची प्राप्ती होते . त्याला कोणत्याही संकटांची बाधा होत नाही . पंचमहापापांपासून (ब्रह्महत्या , सुरापान , गुरुस्त्रीगमन , चौर्यकर्म आणि ह्या गोष्टी करणाऱ्यांची संगत) तो मुक्त होतो .

सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति | 

प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति | 

अर्थ - संध्याकाळी केलेल्या अथर्वशीर्षाच्या पठनाने दिवसा केलेल्या पापांचा नाश होतो . दिवसा केलेल्या पठनाने रात्रीच्या पापांचा नाश होतो .

सायं प्रात: प्रयुंजानो पापोSपापो भवति | 

सर्वत्राधीयानोऽपविघ्नो भवति। 

धर्मार्थकाममोक्षं च विंदति | 

अर्थ - अशाप्रकारे रात्रंदिवस पठन करणारी व्यक्ति पूर्णपणे पापमुक्त होते . सर्वत्र पठन करणारा निर्विघ्न होतो आणि त्याला धर्म , अर्थ , काम , मोक्ष ह्या चारही पुरुषार्थांचा लाभ होतो .

इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयम् | 

यो यदि मोहात् दास्यति स पापीयान् भवति | 

सहस्रावर्तनात् यं यं काममधीते तंतमनेन साधयेत् | 

अर्थ - हे अथर्वशीर्ष अशिष्याला म्हणजे मनात श्रद्धा आणि आदर नसलेल्या व्यक्तीला कधीही शिकवू नये . जर कोणी धनप्राप्तीच्या मोहात हे श्रद्धारहित व्यक्तीला शिकवले तर तो पापी होतो . ह्या अथर्वशीर्षाची सहस्र आवर्तने केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात .

अनेन गणपतिमभिषिंचति स वाग्मी भवति | 

चतुर्थ्यामनश्नन् जपति स विद्यावान् भवति | इत्यथर्वण वाक्यम् |

ब्रह्माद्यावरणं विद्यात् न बिभेति कदाचनेति | 

अर्थ - अथर्वशीर्षाच्या पठनाने गणपतीला अभिषेक करणार उत्तम वक्ता होतो . चतुर्थीला उपवास करून अथर्वशीर्षाचे पठन करणारा विद्वान होतो असे अथर्वण ऋषींनी म्हटले आहे . ब्रह्मावर मायेचे आवरण आहे म्हणजेच ब्रह्म सत्य जगत् मिथ्या हे जो जाणतो तो कधीच कशाहीमुळे भयभीत होत नाही .

यो दूर्वांकुरैंर्यजति स वैश्रवणोपमो भवति | 

यो लाजैर्यजति स यशोवान् भवति स मेधावान् भवति | 

यो मोदक सहस्रेण यजति स वांछितफलमवाप्नोति | 

य: साज्यसमिद्भिर्यजति स सर्वं लभते स सर्वं लभते |

अर्थ - जो दुर्वांकुरांनी गणेशाची हवन पूजा करतो तो कुबेरा सारखा धनवान होतो . जो लाह्यांनी हवन करतो तो यशस्वी आणि बुद्धीवान होतो . जो सहस्र मोदकांनी गणेशाचे हवन करतो त्याला सर्व इच्छित फलांची प्राप्ती होते . जो घृतमिश्रित म्हणजे तुपात बुडवलेल्या समिधांनी हवन करतो त्याला सर्वच गोष्टींची प्राप्ती होते .

अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्ग्राहयित्वा सूर्य वर्चस्वी भवति |

सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमा संनिधौ वा जप्त्वा सिद्धमंत्रों भवति | 

अर्थ - आठ ब्राह्मणांना हे अथर्वशीर्ष योग्य रित्या शिकवणारा सूर्यासारखा तेजस्वी होतो . सूर्यग्रहणाच्या वेळी गंगा यमुना व इतर महानद्यांच्या जवळ किंवा गणेश प्रतिमे जवळ बसून अथर्वशीर्षाचा जप केल्याने पठण करणारा सिद्धमंत्र होतो म्हणजे त्याला तत्क्षणी फलप्राप्ती होण्याचे सामर्थ्य प्राप्त होते .

महाविघ्नात् प्रमुच्यते | 

महादोषात् प्रमुच्यते | 

महापापात् प्रमुच्यते | 

स सर्वविद्‍ भवति स सर्वविद्‍ भवति |

य एवं वेद इत्युपनिषद्‍ |

अर्थ - अथर्वशीर्षाचे पठन करणारा महाविघ्नांपासून आणि महादोषापासून मुक्त होतो . महापापापासूनही त्याची मुक्ती होते .

अथर्वशीर्षाचा पठणकर्ता सर्वज्ञानी होतो .


शांतीमंत्र

ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः । 

भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः ॥

स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभिः । 

व्यशेम देवहितं यदायुः ॥

स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः । 

स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः ॥

स्वस्तिनस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः। 

स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॥

ॐ शांतिः । शांतिः ॥ शांतिः ॥।

इति श्रीगणपत्यथर्वशीर्षं समाप्तम् ॥

परत एकदा शांतिमंत्राचे पठण करून श्री गणपती अथर्वशीर्ष समाप्त करावे . ह्या शांतीमंत्राचा अर्थ सुरुवातीला दिलेला आहे .


🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, द्वितीय अंश, षष्ठ अध्याय | Vishnu Puran, Ansh 2 , Adhyay 6

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ द्वितीयः अंशः॥ ॥ षष्ठोऽध्यायः ॥   " भिन्न – भिन्न नरक तसेच भगवन्नामाच्या माहात्म्याचे वर्णन " परा...