॥ श्रीसूक्तम् ॥
विश्वसाहित्यात सर्वात प्राचीन मानल्या गेलेल्या चार वेद ग्रंथांपैकी ऋग्वेद हा हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा पवित्र ग्रंथ .व्यासांनी एकाच मूळ वेदाचे चार भाग केले असले तरी नंतरच्या काळातही ऋग्वेदात काही सूक्ते समाविष्ट केली गेली आहेत . नंतर भर पडलेल्या ह्या सुक्तांना खिलसूक्ते म्हणतात . काही अभ्यासकांच्या मते ही खिलसूक्ते यजुर्वेद आणि सामवेदाच्या काळात रचली गेली आहेत . “श्रीसूक्तम्” हे ऋग्वेदातील बाष्कल शाखेतील खिलसूक्तांपैकी एक आहे . ऋग्वेदात एकूण दहा मंडले असून श्रीसूक्त ऋग्वेदातील ५ व्या मंडलातील खिलसूक्तांपैकी एक वैदिक सूक्त आहे .
कोणत्याही स्तोत्राचे किंवा मंत्राचे ऋषि, छन्द, देवता, बीज, शक्ति आणि कीलक ही सहा अंगे असतात . बहुतेक स्तोत्रांच्या सुरुवातीला त्या स्तोत्राचे ऋषी, देवता, छंद, शक्ति, कीलक ह्यांचा उल्लेख केलेला असतो .
काही अभ्यासक मानतात की श्रीसूक्तातील प्रत्येक ऋचेचा ऋषि, छंद आणि देवता वेगवेगळे आहेत . ऋषि म्हणजे द्रष्टा ज्यांना समाधी किंवा साधना अवस्थेत ह्या ऋचांचे दर्शन किंवा साक्षात्कार झाला आणि देवता म्हणजे ज्याची / जिची त्या स्तोत्रात स्तुति केलेली असेल ती .
आनंद, कर्दम, चिक्लित, श्रीदा हे श्रीसूक्ताचे ऋषि आहेत तर अग्नि, श्रीलक्ष्मी आणि श्रीदेवी ह्या श्रीसूक्ताच्या देवता आहेत . छंद म्हणजे स्तोत्र किंवा मंत्र एका विशिष्ट लयीत म्हणणे ज्यामुळे त्यांच्या पठणाचा योग्य उच्चार होऊन ते प्रभावी ठरेल आणि मंत्र पठण करणाऱ्याला त्याचा अपेक्षित परिणाम अनुभवता येईल .
श्रीसूक्ताच्या सुरुवातीच्या ३ ऋचा अनुष्टुभ छंदात, ४ थी बृहति , ५ वी आणि ६ वी त्रिष्टुभ छंदात, त्यानंतरच्या आठ ऋचा परत अनुष्टुभ आणि शेवटची प्रस्तार छंदात आहे.
मंत्राची शक्ती वाढावी म्हणून ज्या मंत्राचा वारंवार उपयोग केला जातो त्याला बीज म्हणतात . बीज मंत्रांमुळे मंत्रांच्या चैतन्यात वाढ होते. “हिरण्यवर्णाम्” हे श्रीसूक्ताचे बीज आहे .
प्रत्येक स्तोत्र किंवा मंत्राचे संचालन करणारी एक विशिष्ट शक्ति असते. त्या शक्तिची प्रार्थना करून मगच मंत्राचे पठण केल्यास ते परिणाम कारक ठरते . “ताम् म आवह” ही श्रीसूक्ताची शक्ति आहे .
स्तोत्रांचा उपयोग उत्तम कार्यासाठी, विश्व कल्याणासाठी, दुष्टशक्तींपासून रक्षणासाठी व्हावा म्हणून ऋषींनी बहुतेक स्तोत्र शापबद्ध करून ठेवली आहेत . ह्या स्तोत्रांचा योग्य परिणाम हवा असेल तर ती शापमुक्त करून मगच त्यांचे पठण केल्यास सकारात्मक अनुभव येतो असे म्हणतात . ह्यालाच उत्कीलन किंवा कीलक असे म्हणतात . “कीर्तीमृद्धीम्” हे श्रीसूक्ताचे किलक आहे .
ब्रह्मांड हे अगणित स्पंदनांनी भारलेले असून विशिष्ट शब्दांच्या अचूक व स्पष्ट उच्चाराने आपण आपल्याला हवी तशी स्पंदने निर्माण करून त्या स्पंदनांच्या आधारे इच्छित शक्तिना आकृष्ट करू शकतो असे प्राचीन ऋषीमुनी मानत असत . आपले आजचे शास्त्रज्ञ देखील हे सिद्ध करण्यात काही प्रमाणात यशस्वी झाले आहेत .
आपल्या प्राचीन ऋषी मुनींनी ह्याच तत्त्वाचा वापर करून अनेक ऋचा रचून त्यांना मंत्र स्वरूपात बद्ध केले . वैश्विक हित नजरेसमोर ठेवून अत्यंत श्रद्धेने, निर्मळ मनाने आणि कृतज्ञतेने रचलेली ही सूक्ते अतिशय प्रभावी व इच्छित फलप्राप्ती करून देणारी आहेत . प्रत्येक सूक्तात एक अद्वितीय मांत्रिक शक्ती, कार्य आणि उद्देश आढळतो .
श्रीसूक्त हे असेच मंत्र स्वरूपात बद्ध केलेले आणि देवी “श्री”ला समर्पित केलेले एक अतिशय उत्तम प्रभावी सूक्त आहे . आपली धर्म संकल्पना शिव आणि शक्ती तत्वावर आधारित असून शक्तीशिवाय शिवाला महत्त्व नाही. शक्ती म्हणजेच अखिल ब्रह्मांडाची जननी किंवा जन्मदात्री म्हणजेच मातृतत्त्व . श्रीसूक्तात ह्याच शक्तीची, मातृतत्त्वाची स्तुती केलेली आहे .
श्रीसूक्तात श्री आणि सूक्त असे दोन शब्द आहेत. श्रीची मुख्य दोन रूपे म्हणजे परा (अंतरंग) शक्ती आणि अपरा (बहिरंग) शक्ती. ह्याशिवाय आद्य शंकराचार्यांनी सौंदर्यलहरीमध्ये ‘श्री' ची दशरूपे सांगितली आहेत - महाकाली, तारा, षोडशी, भुवनेश्वरी, छिन्नमस्ता, भैरवी, धुमावती, बगलामुखी, मातंगी, कमला ही ती दशरूपे . सप्तशतीमध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चन्द्रघन्टा, कुष्मांडा, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री ह्या श्री च्या नऊ रूपांचा उल्लेख येतो . देवी भागवतात वीरलक्ष्मी, गजान्तलक्ष्मी, संतानलक्ष्मी, विजयलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, आदिलक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी आणि धनलक्ष्मी ह्या श्री च्या आठ रुपांचे वर्णन येते . पुराणात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती ही तीन मुख्य रूपे आहेत.
सर्व साधारणपणे आपण “श्री” म्हणजे लक्ष्मी म्हणजेच धन किंवा संपत्ति असा अर्थ घेतो . पण खालील ऋचा वाचल्यावर कळते की “श्री” चा खरा अर्थ अतिशय व्यापक असून “श्री” म्हणजे फक्त श्रीमंती व समृद्धी नाही तर त्यात इतरही अनेक गोष्टींचा समावेश आहे. श्रीदेवी ही सर्वोच्च चैतन्य आणि दैवी बुद्धिमत्तेचं प्रतीक आहे .
श्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधच्छोभमानं महीयते |
धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायु: ||
अर्थ - संपत्ती, सत्ता, आयुष्य, आरोग्य, दीप्तीमान, ऐश्वर्य, किर्ती, धान्य, धन, पशुधन, पुत्र, नातवंडे आणि शंभर वर्षांचे दीर्घायुष्य ह्या सर्व गोष्टींना एकत्रितपणे “श्री” म्हणतात. यातील एकही गोष्टीची उणीव असली तर आयुष्यात संपूर्ण सुख समाधान लाभत नाही . म्हणून ह्या सर्वच्या सर्व गोष्टी एकत्रित प्राप्त व्हाव्यात म्हणून श्रीसुक्ताचे पठण करायचे असते .
श्रीसूक्तात “श्री” देवीच्या विविध गुणधर्मांचे वर्णन आणि ती तिच्या भक्तांना देत असलेल्या आशीर्वादांची माहिती आहे . श्रीसूक्तात “श्री” देवीला सर्व संपत्ती आणि विपुलतेचे स्रोत म्हटले आहे आणि तिला सौंदर्य, तेज आणि प्रजनन यांचे मूर्त रूप म्हणून चित्रित केले आहे .
श्रीसूक्ताचे पठण विपुलता आणि समृद्धीशी संबंधित आलेल्या देवी लक्ष्मीच्या उपासने वेळी , देवीवर अभिषेक व कुंकुमार्चन करताना, नवरात्रीत नऊ दिवस, दिवाळीच्या वेळी लक्ष्मीपूजन करताना तसेच इतर अनेक शुभ प्रसंगी आणि सणांच्या वेळी केले जाते. ह्या शिवाय दोन्ही संध्या समयी, गाईची धार काढताना, स्नान करताना, बी पेरताना, झाडांना पाणी घालताना, पृथ्वी, विहीर व दीप यांची पूजा करताना आणि देवीचे दर्शन घेताना श्रीसूक्त म्हणायचा प्रघात आहे .
श्रीसूक्तात सोळा मंत्रांचा समावेश आहे. पहिले पंधरा मंत्र जातवेद म्हणजे पवित्र अग्नीचे आवाहन करतात आणि आरोग्य, संपत्ती, शांती आणि समृद्धीची प्रमुख शक्ती जी श्रीदेवी किंवा श्रीलक्ष्मी तिला आपल्यासाठी आणण्याची अग्नीला विनंती करतात. श्रीसूक्तातील पहिल्या पंधरा ऋचा म्हटल्यावर एक पाठ पूर्ण होतो .
सोळावा मंत्र फलश्रुतीचा आहे . पहिल्या पंधरा मंत्रांच्या पठणामुळे जागृत झालेली दैवी शक्ती भौतिक परिस्थिती कशी नियंत्रित ठेवते आणि त्यामुळे पठणकर्त्याला आंतरिक आणि बाह्य समृद्धीचा लाभ कसा होतो ते ह्या ऋचेत सांगितले आहे .
श्रीसूक्तातील पहिल्या पंधरा ऋचा म्हटल्यावर एक पाठ पूर्ण होतो . या प्रमाणे पंधरा पाठ केले की एक अभिषेक पूर्ण होतो . एका अभिषेका नंतर फलश्रुतीची १६ वी ऋचा म्हणातात आणि लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणून पाठ पूर्ण करतात. श्रीसूक्ताचे पाठ शक्यतो पहाटे ब्राह्ममुहूर्तावर किंवा संध्याकाळी दिवेलागणी नंतर लगेचच करतात . श्रीविष्णूचे स्मरण करून मगच श्रीसूक्ताचे पठण करावे . कारण जिथे श्रीविष्णूचे स्मरण केले जाते फक्त तिथेच “श्री” देवी वास करते असे म्हणतात .
श्रीसूक्ताच्या नियमित पठणाने मनावरील ताण कमी होतो, चित्ताची चंचलता नाहीशी होते, एकाग्रता वाढते, विवेकबुद्धी प्राप्त होते, आंतरिक शांती मिळते आणि आपल्या सभोवताली एक सकारात्मक वातावरण तयार होते .
श्रीसूक्त हे ऐश्वर्यप्राप्ती आणि सौख्यवृद्धी करणारे आहे. श्रीसूक्त ही प्राचीन ऋषिमुनींनी मानवतेला दिलेली फार मोठी देणगी असून ह्यातील जागृत मंत्र आपल्याला विपुलता आणि पोषणाची शक्ति स्वतः कडे खेचण्याचे सामर्थ्य प्रदान करतात ज्यामुळे आपण परिपूर्ण जीवनाचा अनुभव घेऊ शकू .
श्रीसुक्तातील ऋचांचा अर्थ इथे शक्य तितक्या सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करणार आहे . अर्थ समजून केलेले पठण नेहेमीच जास्त लाभदायी आणि प्रभावी असते .
॥ श्रीसूक्तम् ॥
विश्वसाहित्यात सर्वात प्राचीन मानल्या गेलेल्या चार वेद ग्रंथांपैकी ऋग्वेद हा हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा पवित्र ग्रंथ .
व्यासांनी एकाच मूळ वेदाचे चार भाग केले असले तरी नंतरच्या काळातही ऋग्वेदात काही सूक्ते समाविष्ट केली गेली आहेत . नंतर भर पडलेल्या ह्या सुक्तांना खिलसूक्ते म्हणतात . काही अभ्यासकांच्या मते ही खिलसूक्ते यजुर्वेद आणि सामवेदाच्या काळात रचली गेली आहेत . “श्रीसूक्तम्” हे ऋग्वेदातील बाष्कल शाखेतील खिलसूक्तांपैकी एक आहे . ऋग्वेदात एकूण दहा मंडले असून श्रीसूक्त ऋग्वेदातील ५ व्या मंडलातील खिलसूक्तांपैकी एक वैदिक सूक्त आहे .
कोणत्याही स्तोत्राचे किंवा मंत्राचे ऋषि, छन्द, देवता, बीज, शक्ति आणि कीलक ही सहा अंगे असतात . बहुतेक स्तोत्रांच्या सुरुवातीला त्या स्तोत्राचे ऋषी, देवता, छंद, शक्ति, कीलक ह्यांचा उल्लेख केलेला असतो .
काही अभ्यासक मानतात की श्रीसूक्तातील प्रत्येक ऋचेचा ऋषि, छंद आणि देवता वेगवेगळे आहेत . ऋषि म्हणजे द्रष्टा ज्यांना समाधी किंवा साधना अवस्थेत ह्या ऋचांचे दर्शन किंवा साक्षात्कार झाला आणि देवता म्हणजे ज्याची / जिची त्या स्तोत्रात स्तुति केलेली असेल ती .
आनंद, कर्दम, चिक्लित, श्रीदा हे श्रीसूक्ताचे ऋषि आहेत तर अग्नि, श्रीलक्ष्मी आणि श्रीदेवी ह्या श्रीसूक्ताच्या देवता आहेत .
छंद म्हणजे स्तोत्र किंवा मंत्र एका विशिष्ट लयीत म्हणणे ज्यामुळे त्यांच्या पठणाचा योग्य उच्चार होऊन ते प्रभावी ठरेल आणि मंत्र पठण करणाऱ्याला त्याचा अपेक्षित परिणाम अनुभवता येईल .
श्रीसूक्ताच्या सुरुवातीच्या ३ ऋचा अनुष्टुभ छंदात, ४ थी बृहति , ५ वी आणि ६ वी त्रिष्टुभ छंदात, त्यानंतरच्या आठ ऋचा परत अनुष्टुभ आणि शेवटची प्रस्तार छंदात आहे.
मंत्राची शक्ती वाढावी म्हणून ज्या मंत्राचा वारंवार उपयोग केला जातो त्याला बीज म्हणतात . बीज मंत्रांमुळे मंत्रांच्या चैतन्यात वाढ होते. “हिरण्यवर्णाम्” हे श्रीसूक्ताचे बीज आहे .
प्रत्येक स्तोत्र किंवा मंत्राचे संचालन करणारी एक विशिष्ट शक्ति असते. त्या शक्तिची प्रार्थना करून मगच मंत्राचे पठण केल्यास ते परिणाम कारक ठरते . “ताम् म आवह” ही श्रीसूक्ताची शक्ति आहे .
स्तोत्रांचा उपयोग उत्तम कार्यासाठी, विश्व कल्याणासाठी, दुष्टशक्तींपासून रक्षणासाठी व्हावा म्हणून ऋषींनी बहुतेक स्तोत्र शापबद्ध करून ठेवली आहेत . ह्या स्तोत्रांचा योग्य परिणाम हवा असेल तर ती शापमुक्त करून मगच त्यांचे पठण केल्यास सकारात्मक अनुभव येतो असे म्हणतात . ह्यालाच उत्कीलन किंवा कीलक असे म्हणतात . “कीर्तीमृद्धीम्” हे श्रीसूक्ताचे किलक आहे .
ब्रह्मांड हे अगणित स्पंदनांनी भारलेले असून विशिष्ट शब्दांच्या अचूक व स्पष्ट उच्चाराने आपण आपल्याला हवी तशी स्पंदने निर्माण करून त्या स्पंदनांच्या आधारे इच्छित शक्तिना आकृष्ट करू शकतो असे प्राचीन ऋषीमुनी मानत असत . आपले आजचे शास्त्रज्ञ देखील हे सिद्ध करण्यात काही प्रमाणात यशस्वी झाले आहेत .
आपल्या प्राचीन ऋषी मुनींनी ह्याच तत्त्वाचा वापर करून अनेक ऋचा रचून त्यांना मंत्र स्वरूपात बद्ध केले . वैश्विक हित नजरेसमोर ठेवून अत्यंत श्रद्धेने, निर्मळ मनाने आणि कृतज्ञतेने रचलेली ही सूक्ते अतिशय प्रभावी व इच्छित फलप्राप्ती करून देणारी आहेत . प्रत्येक सूक्तात एक अद्वितीय मांत्रिक शक्ती, कार्य आणि उद्देश आढळतो .
श्रीसूक्त हे असेच मंत्र स्वरूपात बद्ध केलेले आणि देवी “श्री”ला समर्पित केलेले एक अतिशय उत्तम प्रभावी सूक्त आहे .
आपली धर्म संकल्पना शिव आणि शक्ती तत्वावर आधारित असून शक्तीशिवाय शिवाला महत्त्व नाही. शक्ती म्हणजेच अखिल ब्रह्मांडाची जननी किंवा जन्मदात्री म्हणजेच मातृतत्त्व . श्रीसूक्तात ह्याच शक्तीची, मातृतत्त्वाची स्तुती केलेली आहे .
श्रीसूक्तात श्री आणि सूक्त असे दोन शब्द आहेत.
श्रीची मुख्य दोन रूपे म्हणजे परा (अंतरंग) शक्ती आणि अपरा (बहिरंग) शक्ती.
ह्याशिवाय आद्य शंकराचार्यांनी सौंदर्यलहरीमध्ये ‘श्री' ची दशरूपे सांगितली आहेत - महाकाली, तारा, षोडशी, भुवनेश्वरी, छिन्नमस्ता, भैरवी, धुमावती, बगलामुखी, मातंगी, कमला ही ती दशरूपे .
सप्तशतीमध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चन्द्रघन्टा, कुष्मांडा, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री ह्या श्री च्या नऊ रूपांचा उल्लेख येतो .
देवी भागवतात वीरलक्ष्मी, गजान्तलक्ष्मी, संतानलक्ष्मी, विजयलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, आदिलक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी आणि धनलक्ष्मी ह्या श्री च्या आठ रुपांचे वर्णन येते .
पुराणात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती ही तीन मुख्य रूपे आहेत.
सर्व साधारणपणे आपण “श्री” म्हणजे लक्ष्मी म्हणजेच धन किंवा संपत्ति असा अर्थ घेतो . पण खालील ऋचा वाचल्यावर कळते की “श्री” चा खरा अर्थ अतिशय व्यापक असून “श्री” म्हणजे फक्त श्रीमंती व समृद्धी नाही तर त्यात इतरही अनेक गोष्टींचा समावेश आहे. श्रीदेवी ही सर्वोच्च चैतन्य आणि दैवी बुद्धिमत्तेचं प्रतीक आहे .
श्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधच्छोभमानं महीयते |
धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायु: ||
अर्थ - संपत्ती, सत्ता, आयुष्य, आरोग्य, दीप्तीमान, ऐश्वर्य, किर्ती, धान्य, धन, पशुधन, पुत्र, नातवंडे आणि शंभर वर्षांचे दीर्घायुष्य ह्या सर्व गोष्टींना एकत्रितपणे “श्री” म्हणतात. यातील एकही गोष्टीची उणीव असली तर आयुष्यात संपूर्ण सुख समाधान लाभत नाही . म्हणून ह्या सर्वच्या सर्व गोष्टी एकत्रित प्राप्त व्हाव्यात म्हणून श्रीसुक्ताचे पठण करायचे असते .
श्रीसूक्तात “श्री” देवीच्या विविध गुणधर्मांचे वर्णन आणि ती तिच्या भक्तांना देत असलेल्या आशीर्वादांची माहिती आहे . श्रीसूक्तात “श्री” देवीला सर्व संपत्ती आणि विपुलतेचे स्रोत म्हटले आहे आणि तिला सौंदर्य, तेज आणि प्रजनन यांचे मूर्त रूप म्हणून चित्रित केले आहे .
श्रीसूक्ताचे पठण विपुलता आणि समृद्धीशी संबंधित आलेल्या देवी लक्ष्मीच्या उपासने वेळी , देवीवर अभिषेक व कुंकुमार्चन करताना, नवरात्रीत नऊ दिवस, दिवाळीच्या वेळी लक्ष्मीपूजन करताना तसेच इतर अनेक शुभ प्रसंगी आणि सणांच्या वेळी केले जाते. ह्या शिवाय दोन्ही संध्या समयी, गाईची धार काढताना, स्नान करताना, बी पेरताना, झाडांना पाणी घालताना, पृथ्वी, विहीर व दीप यांची पूजा करताना आणि देवीचे दर्शन घेताना श्रीसूक्त म्हणायचा प्रघात आहे .
श्रीसूक्तात सोळा मंत्रांचा समावेश आहे. पहिले पंधरा मंत्र जातवेद म्हणजे पवित्र अग्नीचे आवाहन करतात आणि आरोग्य, संपत्ती, शांती आणि समृद्धीची प्रमुख शक्ती जी श्रीदेवी किंवा श्रीलक्ष्मी तिला आपल्यासाठी आणण्याची अग्नीला विनंती करतात.
श्रीसूक्तातील पहिल्या पंधरा ऋचा म्हटल्यावर एक पाठ पूर्ण होतो .
सोळावा मंत्र फलश्रुतीचा आहे . पहिल्या पंधरा मंत्रांच्या पठणामुळे जागृत झालेली दैवी शक्ती भौतिक परिस्थिती कशी नियंत्रित ठेवते आणि त्यामुळे पठणकर्त्याला आंतरिक आणि बाह्य समृद्धीचा लाभ कसा होतो ते ह्या ऋचेत सांगितले आहे .
श्रीसूक्तातील पहिल्या पंधरा ऋचा म्हटल्यावर एक पाठ पूर्ण होतो . या प्रमाणे पंधरा पाठ केले की एक अभिषेक पूर्ण होतो . एका अभिषेका नंतर फलश्रुतीची १६ वी ऋचा म्हणातात आणि लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणून पाठ पूर्ण करतात. श्रीसूक्ताचे पाठ शक्यतो पहाटे ब्राह्ममुहूर्तावर किंवा संध्याकाळी दिवेलागणी नंतर लगेचच करतात . श्रीविष्णूचे स्मरण करून मगच श्रीसूक्ताचे पठण करावे . कारण जिथे श्रीविष्णूचे स्मरण केले जाते फक्त तिथेच “श्री” देवी वास करते असे म्हणतात .
श्रीसूक्ताच्या नियमित पठणाने मनावरील ताण कमी होतो, चित्ताची चंचलता नाहीशी होते, एकाग्रता वाढते, विवेकबुद्धी प्राप्त होते, आंतरिक शांती मिळते आणि आपल्या सभोवताली एक सकारात्मक वातावरण तयार होते .
श्रीसूक्त हे ऐश्वर्यप्राप्ती आणि सौख्यवृद्धी करणारे आहे. श्रीसूक्त ही प्राचीन ऋषिमुनींनी मानवतेला दिलेली फार मोठी देणगी असून ह्यातील जागृत मंत्र आपल्याला विपुलता आणि पोषणाची शक्ति स्वतः कडे खेचण्याचे सामर्थ्य प्रदान करतात ज्यामुळे आपण परिपूर्ण जीवनाचा अनुभव घेऊ शकू .
श्रीसुक्तातील ऋचांचा अर्थ इथे शक्य तितक्या सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करणार आहे . अर्थ समजून केलेले पठण नेहेमीच जास्त लाभदायी आणि प्रभावी असते .
॥ ॐ ॥
“श्री सूक्त”
श्रीसूक्तात श्रीरूप देवी महालक्ष्मीची स्तुती केली आहे आणि तिने कायमस्वरूपी आपल्याकडे रहायला यावे म्हणून अग्निदेवाला आवाहन करून तिला घेऊन येण्याची विनंती केली आहे
अन्वय - हे जातवेद ! में हिरण्यवर्णां, हरिणीं, सुवर्णरजतस्रजां, चंद्रां, हिरण्मयीं, लक्ष्मीं आवह |
शब्दार्थ -
हिरण्यवर्णां = सोने किंवा सोन्यासारखी चकाकी असलेले
हरिणीं = हरणासारखी, चपल, चंचल, क्षणभंगुर (लक्ष्मीची विशेषणे)
सुवर्ण / सु-वर्ण = सोने किंवा सुंदर वर्ण
रजत – चांदी
स्रजाम् – अलंकार, माळ
चन्द्रां – चंद्र
हिरण्मयीं – सोन्यासारखी मौल्यवान
जातवेद = अग्नी
आवह - बोलव, घेऊन ये
अर्थ व स्पष्टीकरण
“जातवेद” शब्दाचा अर्थ - जात: वेदा: यस्मात् – ज्याच्याकडून वेद मिळाले, “जातवेद” चा दुसरा अर्थ वेदा: त्वदर्थं जाता: इति जातवेद: असा पण होतो – म्हणजे वेद तुझ्यासाठी झालेले आहेत किंवा वेद तुझे महत्त्व समजण्यासाठी झालेले आहेत .
कोणत्याही पदार्थांचे शुद्धिकरण करण्यासाठी अग्नीची आवश्यकता असते . म्हणून ऋषींनी अग्नी जवळ शुद्ध वैभव मागितले आहे . अग्नी हा संदेशवाहक किंवा देवांना प्रसन्न करणारी एक प्रमुख शक्ति असून त्याच्या द्वारे केलेली प्रार्थना देवतांपर्यंत पोचते असे मानले जाते . अग्नी हे देवतांचे मुख मानले जाते. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात हवन/यज्ञाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अग्नीला आहुती दिली, की त्या हविर्द्रव्यांची प्राप्ती संबंधित देवतेला होते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या प्रसंगी हवन करण्याची पद्धत आहे. अग्नी इथे मध्यस्थाची भूमिका बजावतो.
श्रीसूक्तामध्ये वैभव देण्याची शक्ति आहे.
म्हणून पहिल्याच ऋचेत जातवेद म्हणजे अग्नीला उद्देशून ऋषी विनंती करतात की, “तू लक्ष्मीला पाठव, तू वैभव पाठव".
इथे ऋषींनी साधना करतेवेळी लक्ष्मीला ज्या स्वरुपात पाहिले, म्हणजेच जेव्हा ती आदिशक्ती सौन्दर्ययुक्त, तेज:पुंज मूर्ती बनून, ऋषींच्या ध्यानात साकार होऊन आली त्यावेळच्या तिच्या रूपाचे वर्णन ऋषींनी इथे केले आहे .
म्हणून ह्या लक्ष्मीची आराधना करताना ऋषी अग्नीला सांगतात की "हे जातवेदा, हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं मे आवह" |
हिरण्यवर्णां म्हणजे सुवर्णासारख्या वर्णाची, सोन्यासारखी शुद्ध आणि निष्कलंक. तिचा वर्ण सोन्यासारखा आहे आणि तिची कांति माणसाला आकर्षित करणारी आहे.
हरिणीं म्हणजे हरिण . ऋषींनी पाहिलेली लक्ष्मी हरिणासारखी चपळ, चंचल होती .
हरिणी ह्या शब्दाचा अर्थ काहीजण हरिना म्हणजेच विष्णू शब्दाचे स्त्रीलिंगी स्वरूप ह्या अर्थानेही घेतात .
हरिणींचा अर्थ हिरव्या रंगाची असा सुद्धा होतो . हिरवा रंग चैतन्याचे जिवंतपणाचे द्योतक आहे. हिरवा रंग आल्हाददायक व चैतन्यमय असतो.
सुवर्णरजतस्रजां म्हणजेच सोन्या चांदीच्या अलंकारांनी नटलेली, अतिशय तेजस्वी.
हिरण्मयीं लक्ष्मीं मे आवह . हिरण्मयी म्हणजे सोन्याची. जिचे शरीर सालंकृत तैजस तत्वाने शोभून दिसत आहे अशी श्रीलक्ष्मी .
ती चंद्रासारखी शीतल आल्हाददायक असून तिची कांति सुवर्णासारखी चमकदार आहे .
आपल्या सर्वांनाच चंद्राच्या कला माहिती आहेत . पौर्णिमेपर्यंत चंद्राच्या कलेत वाढ होत जाते आणि मग अमावस्येपर्यंत तीच चंद्राची कला क्षीण होत जाते .
ह्याच गूणांमुळे चंद्राची तुलना लक्ष्मीबरोबर केलेली आहे कारण तिच्यातही वृद्धी व क्षयाचे हे दोन गूण आहेत.
लक्ष्मी ज्याच्यावर प्रसन्न होते त्याला भरभरून वैभव देते आणि तिची अवकृपा झाली तर तेच धन क्षणार्धात हिसकावून सुद्धा घेते.
म्हणूनसुद्धा तिच्यासाठी चंद्रा हे विशेषण इथे वापरलेले आहे .
तर ह्या पहिल्याच ऋचेत ऋषि म्हणतात की , “सोन्यासारखा वर्ण असणाऱ्या, हरिणी सारखी चपल व सर्व पापांचे हरण करणाऱ्य , सोन्या चांदीच्या माळांनी अलंकृत , चंद्रासारखी शीतल , कांतीमयी तेजस्वी लक्ष्मीला आमच्यासाठी घेऊन ये ”.
तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् |
यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् ॥ २ ॥
अन्वय - हे जातवेद ! यस्यां अहं हिरण्यं, गां, अश्वपुरुषान् विंदेयं; तां अनपगामिनीं लक्ष्मीं में आवह |
शब्दार्थ
अनपगामिनीं = अविनाशी, दूर न जाणारी , कायम टिकणारी , सातत्यपूर्ण
विन्देयं = मी साध्य करू इच्छितो
गां = गायी, गुरेढोरे
अश्वं = घोडे, घोडदळ
पुरुषान् = पुत्र, पौत्र, सेवक वगैरे
अर्थ व स्पष्टीकरण
इथे ऋषि प्रार्थना करतात की , “ ज्या श्रीलक्ष्मीला तू माझ्यासाठी घेऊन येणार आहेस ती स्थिर असावी ,चंचल नाही. त्यासाठी इथे “अनपगामिनीम्” हा शब्द वापरला आहे . अनपगामिनीम् म्हणजे परत कधीही न जाणारी. आपल्याजवळ येणारी लक्ष्मी कायम राहावी अशी ऋषींची इच्छा आहे.
या “अनपगामिनी लक्ष्मी” पासून ऋषींना “यस्यां हिरण्यं विन्देयंगामश्वंपुरुषानहम्” म्हणजे हिरण्यं, गाम्, अश्वम्, पुरुषं हे सर्व हवे आहे .
“हिरण्यं” म्हणजे सुवर्ण, धन दौलत, पैसाअडका, सर्व मौल्यवान गोष्टी .
“गाम्” म्हणजे गायी आणि “अश्व” म्हणजे घोडे म्हणजेच ऋषी इथे पशुधनाची कामना करत आहेत . प्राचीन काळी कुटुंबाचे आरोग्य आणि धन हे घरातील गायींचे आरोग्य आणि त्यांची विपुलता ह्यावर अवलंबून असे . तसेच अश्व हे पराक्रमाचे प्रतिक मानले जायचे . अश्व म्हणजे राजवैभव होते .
“पुरुषं” – पुरुष म्हणजे मनुष्य बळ . ह्यात मुलं, नातू, मित्र, नातेवाईक, सेवक, हितचिंतक सगळेच आले. आपल्या अडी अडचणीच्या वेळी धावून येणारे, संकटात खंबीर पणे साथ देणारे, हिताच्या गोष्टी सांगून प्रसंगी मदत करणारे असे सर्वच जण अपेक्षित आहेत . असे पुरुषवैभव ऋषि इथे मागत आहेत .
अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीम् ।
श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मा᳚देवीर्जुषताम् ॥ ३॥
शब्दार्थ
अश्वपूर्वां = सर्वात पुढे, आघाडीवर असलेले घोडदळ
रथमध्यां = मधोमध असलेल्या रथात
हस्तिनादप्रबोधिनीम्= हत्तींच्या आनंदयुक्त चित्काराने जागी झालेली
मां = माझ्यासाठी
जुषताम् = आमच्यावर प्रसन्न व्हावे
अर्थ व स्पष्टीकरण
इथे अशी कल्पना केली आहे की ऋषींनी अग्निला ज्या प्रकारच्या लक्ष्मीला आणायला सांगितले होते तशी लक्ष्मी, अग्नि ऋषींच्या घरी घेऊन येत आहे . आपल्याला हवी तशी लक्ष्मी प्रत्यक्षात आपल्याजवळ वाजत गाजत येत आहे अशी कल्पना इथे केलेली आहे .
म्हणजेच आजच्या काळात आपण ज्याला manifestation म्हणतो तेच इथे ऋषींनी केलेले आहे .
तिच्या आगमन सोहळ्याचे वर्णन अतिशय सुरेख रित्या केलेले आहे .
ही लक्ष्मी अतिशय दिमाखात थाटामाटात येत आहे . तिच्या मिरवणुकीच्या सुरुवातीला सर्वात पुढे घोड्यांचा ताफा आहे , मध्यभागी श्रीलक्ष्मीचा तेजस्वी ऐश्वर्यसंपन्न रथ आहे . ती स्वतः गजारुढ (इथे गजान्तलक्ष्मीचे स्वरूप अपेक्षित आहे ) असून रथात मध्यभागी विराजमान आहे आणि हत्तींच्या आनंदी चीत्कारांमुळे ती सदैव सचेत म्हणजे जागृतावस्थेत असते .
देवीं श्रियम् उपव्हये - अशा सामर्थ्ययुक्त लक्ष्मीचे म्हणजेच श्रीसंपत्तीचे आगमन माझ्या निवासस्थानी होऊ देत व तिची कृपा सदैव माझ्यावर राहू देत, अशी प्रार्थना ह्या ऋचेत केली आहे.
ऋषींना इथे पायदळ सैन्य, घोडदळ, हत्तीदळ आणि रथी असे चतुरंग सैन्य असणारी सैन्यलक्ष्मी हवी आहे .
“देवी: श्री: मां जुषताम्” म्हणजे दैवी संपत्ती, सामर्थयुक्त संपत्ती माझ्याजवळ यावी.
इथे ऋषी संपत्ति बरोबर सत्ता सामर्थ्य सुद्धा मागत आहेत . कारण सत्ता म्हणजे शक्ति, सत्ता म्हणजेच वैभव ह्याची त्यांना जाणीव आहे .
ह्या ऋचेत रथ हा श्रीलक्ष्मीच्या निवासस्थानाचे प्रतीक आहे तर अश्व प्रयत्नांचे, उर्जेचे, चपळतेचे प्रतीक आहे . आपल्याकडे येणारी, आपल्याला प्राप्त होणारी शक्ति ऊर्जादायी व गतिमान असावी असे ऋषी म्हणतात . हत्ती लक्ष्मीचे वाहन असून हत्तींचा नाद चैतन्याचे व जागरूक बुद्धीचे प्रतीक आहे .
म्हणजेच ऋषींना फुकट काहीही न करता संपत्ति नको आहे . संपत्ति प्राप्त करण्यासाठी मेहनत घ्यायची प्रयत्नांची पराकाष्ठा करायची त्यांची पूर्ण तयारी आहे . आणि त्यासाठीच ह्या ऋचेत ऋषी श्रीलक्ष्मीकडे उर्जा, चैतन्य आणि बुद्धिमत्ता मागत आहेत .
कांसोस्मितां हिरण्यप्राकारामार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीम् ।
पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वये श्रियम् ॥ ४॥
अन्वय - अहं तां कां सोस्मितां, हिरण्यप्राकारां, आर्द्रां, ज्वलंतीं तृप्तां, तर्पयंतीं, पद्मे स्थितां, पद्मवर्णां, श्रियं इह उपव्हये |
शब्दार्थ
कां = कोणीतरी, अवर्णनीय; किंवा क: म्हणजे ब्रह्मदेव( प्रजापती) म्हणून कां म्हणजे सरस्वती किंवा लक्ष्मी
सोस्मितां= प्रकाशित करणारे स्मित
हिरण्य = सोनेरी रंगाचे
प्राकारा= निर्दोष सममितीय शरीर रचना असलेली देवी लक्ष्मी
आर्द्राम् = दव, ओलसर, दयाळू, तेलकट, गुळगुळीत, चिकट, स्निग्ध
ज्वलन्तीं = अग्नीच्या जिभेप्रमाणे लवलवणारे, दिवाप्रकाशा सारखे
तृप्तां = आत्मसंतुष्ट
तर्पयन्तीम् = भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करणारी
पद्मेस्थितम = कमळात विराजमान असलेली
पद्म वर्णम = गुलाबी कमळाचा रंग
तम श्रियम् = ती जशी आहे
उपह्वये= तुझे माझ्याकडे स्वागत आहे
अर्थ व स्पष्टीकरण
ह्या ऋचेत ऋषी श्रीलक्ष्मीच्या अनिर्वचनीय अव्यक्त रुपाचे वर्णन करतात . ऋषी म्हणतात “हे जातवेदा ! अशा अनिर्वचनीय सुंदर सुरेख श्रीलक्ष्मीला मी माझ्या कल्याणासाठी आमंत्रित करतो . ह्या श्रीलक्ष्मीचा अशीर्वाद माझ्यावर सदैव असू देत”
इथे ऋषी श्रीलक्ष्मीचे वर्णन “कां” असे करतात . “कां” म्हणजे इंद्रियातीत असलेले अव्यक्त किंवा अप्रकट स्वरूप . जिचे आपण वर्णन करू शकत नाही .
“कां” शब्दाचा दूसरा अर्थ असाही घेता येईल की ”क” हे ब्रह्माचे नाव आहे आणि “क” चे स्त्रीलिंगी रूप “कां” होते. “कां” म्हणजे ब्रह्मरूपिणी . अनिर्वचनीय, अप्रगट, अमूर्त असलेली ब्रह्मशक्ती म्हणजे “कां” .
“सोस्मितां” म्हणजे अतिशय लखलखीत तेजस्वी हास्य असलेली सुहास्यवदना .
“हिरण्यप्राकारां” म्हणजे सुवर्ण आसनावर विराजमान अशी देदीप्यमान सुवर्णस्वरुप श्रीलक्ष्मी .
ऋषींनी श्रीलक्ष्मीला “आर्द्रां” म्हटले आहे . आर्द्रा ह्या शब्दाचे अनेक अर्थ होतात जे वर दिले आहेत .
आर्द्रा म्हणजे ओली - लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनावेळी झालेला . ती जेव्हा क्षीरसागरातुन वर आली, तेव्हा तिच्या शरीरावरून पाणी ओघळत होते असे वर्णन आहे .
आर्द्रा शब्दाचा दूसरा अर्थ कोमल किंवा मायाळू . जी अतिशय कोमल हृदयाची असून जिचा स्वभावाने अत्यंत दयाळू आहे आणि जी स्वतः तृप्त समाधानी आहे आणि तिच्या भक्तानांही पूर्णपणे तृप्त करते म्हणून “आर्द्रां”.
ऋषींनी श्रीलक्ष्मीसाठी “ज्वलंतीं” शब्द वापरला आहे . “ज्वलंत” म्हणजे जळणारी किंवा जाळणारी . श्रीलक्ष्मीची ज्याच्यावर कृपा होते त्या माणसाच्या हृदयातील काम, क्रोध,लोभ, मोह, मद मत्सर सर्व जळून नष्ट होतात .
श्रीलक्ष्मीला तृप्तां आणि तर्पयन्तीम् म्हटले आहे . तृप्तां म्हणजे जी स्वतः सदैव समाधानी आणि तृप्त असते . तर्पयन्तीम् म्हणजे पूर्णपणे तृप्त करणारी.
पैसा ही अशी गोष्ट आहे की ती ज्याच्याकडे असते त्याला आणखी जास्त हवी असते . पैशाची धनाची हाव कधीच संपत नाही . लक्ष्मी म्हणजे धन-समृद्धी . ऋषि इथे धन मागत आहेत पण त्या समृद्धीबरोबरच त्यांना शांती आणि तृप्ती हवी आहे . म्हणून ते श्रीलक्ष्मीला बोलवताना म्हणतात की, “ माझ्या घरी येताना वैभवा बरोबर माझ्यासाठी शांती समाधान आणि तृप्ती पण येऊ दे ”.
“पद्मेस्थितां” म्हणजे कमळावर बसलेली. श्रीलक्ष्मी साठी इथे “पद्मवर्णी” शब्द वापरला आहे . सफेद आणि लाल रंग मिळून पद्मवर्ण होतो. सफेद रंग शुद्धता, पावित्र्य आणि सात्विकता दर्शवतो तर लाल रंग शक्ति, चैतन्य आणि उर्जेचे प्रतीक आहे . ऋषींना शुद्ध सात्विक मार्गाने प्राप्त झालेले सामर्थ्य आणि शक्ति हवी आहे . म्हणून त्यांना “पद्मवर्णी” श्रीलक्ष्मी आपल्या घरी यायला हवी आहे .
चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदाराम् ।
तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्येऽलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे ॥ ५॥
शब्दार्थ
चन्द्रां = आल्हादकारिणी , आनंददायक
प्रभासां = आत्मउत्साही
यशसा = विद्या, ऐश्वर्य, विद्वत्ता, दानशूरता, उदारता
देवजुष्टां = अतिशय प्रिय
पद्मिनीमीं = जगरूपी चाकाची नेमी किंवा कमळाच्या तळ्यात बसलेली आहे
इम = वेदस्वरूप अशी ती
अहं शरणं प्रपद्ये = मी तुझा आश्रय घेतो
अलक्ष्मी = उदासीनता, अपुरेपणा, उणीव
नश्यतां = नामशेष होणे
अर्थ व स्पष्टिकरण
ऋषि म्हणतात , “जिच्या भोवतालचे प्रभामंडळ चंद्राप्रमाणे प्रकाशमान आहे, जी यश देणारी आहे, जी पद्मिनी या नावानेही प्रसिद्ध आहे, अशा श्रीलक्ष्मीला मी अनन्यभावाने शरण जातो. जिच्या कृपेने माझ्या जीवनातील ‘अलक्ष्मी’ चा नाश होवो.
ऋषींनी इथे श्रीलक्ष्मीला “चंद्रां” म्हटले आहे . चंद्राचा प्रकाश अतिशय सुखद आणि मनाची प्रसन्नता वाढवणारा असतो . श्रीलक्ष्मीचे अस्तित्व देखील असेच आनंददायी आणि आल्हादकरी आहे .
ऋषी ज्या श्रीलक्ष्मीचा आश्रय घेऊ इच्छितात ती चंद्रासारखी आल्हाददायी, स्वयंप्रकाशित आणि अत्यंत तेजस्वी आहे. जगातील संपन्नतेचे ती मूर्तिमंत स्वरूप आहे, ती देवांनाही अतिशय प्रिय आहे ती उदार आहे व संपूर्ण विश्वाची रक्षणकर्ती आहे. आपल्या आयुष्यातील ‘अलक्ष्मी’ म्हणजे दुर्दैव नष्ट व्हावे म्हणून ऋषि तीची प्रार्थना करतात .
“प्रभासाम्” म्हणजे अतिशय शोभणारी, कान्तिमयी, प्रसन्न. तू स्वतःच्या वैभवाच्या तेजाने सर्व जगात झगमगतेस.
“यशसाज्वलंतीं” म्हणजे देदीप्यमान यशाने शोभणारी, सर्वांची आवडती, जाज्वल्य तेज असलेली .
ऋषी म्हणतात की तू “देवजुष्टाम्” आहेस. देव सुद्धा तुझा आश्रय घेतात . संपूर्ण त्रिभुवनात तुझी कीर्ति आहे, तू सर्व देवतांची प्रिय असून सर्व देव तुझीच पूजा करतात .
तू “उदारां” म्हणजे मनाने प्रगल्भ आहेस . औदार्य हा तुझा गुण आहे आणि तुझ्या प्रत्येक भक्ताला त्याचा प्रत्यय आल्यावाचून रहात नाही .
ऋषि इथे देवीला पद्मिनीमीं म्हणतात - पद्मिनीमीं म्हणजे विश्वरूपी चक्राची नेमि, जी ह्या विश्वाला घेरून विश्वाचे संरक्षण करते .
पद्मिनीमीं चा दूसरा अर्थ कमळाच्या तळ्यात बसलेली किंवा कमलासनावर बसलेली असाही होतो . श्रीलक्ष्मीच्या आजूबाजूला कमळाचे वलय आहे . कमळ हे कुंडलिनी चक्राचे प्रतीक आहे .
ह्याच ऋचेत पुढे ऋषी, “मे अलक्ष्मी: नश्यतां त्वां वृणे |” अशी प्रार्थना करतात .
हे श्रीदेवी ! तू “अलक्ष्मी:” म्हणजे माझे दारिद्र्य नष्ट कर. इथे दारिद्रय फक्त पैशाचे नाही तर बौद्धिक आणि मानसिक दारिद्र्य देखील नष्ट होणे अपेक्षित आहे .
“अलक्ष्मी:” ही श्रीलक्ष्मीची मोठी बहीण मानली जाते. ती श्रीलक्ष्मीच्या बरोबर विरुद्ध गुणधर्माची असून, दारिद्र्य, अपयश, नैराश्य, कमतरता, वादविवाद, हिंसाचार आणि दुर्दैव हे अलक्ष्मीचे गुण आहेत .
अलक्ष्मी ही आळस, मत्सर, क्रोध, लोभ, भ्रष्टाचार, अज्ञान व इतर सर्व नकारात्मक गुणांची देवता आहे . अलक्ष्मी सुद्धा लक्ष्मी प्रमाणेच विपुल धनसंपत्ती देते पण त्याचबरोबर तिला दु:खं, त्रास, मानहानी, हिंसाचार व अशुभत्वाची देवी मानली गेली आहे.
समुद्रमंथन कथेनुसार हलाहल या वषानंतर आधी अलक्ष्मीचा जन्म झाला होता .
कल्किपुराणात अलक्ष्मीला कलिराक्षसाची दुसरी पत्नी, अधर्म आणि हिंसेची मुलगी आणि मृत्यु व अधर्माची माता म्हटले आहे.
कलियुगात जुगार, दारू, वेश्याव्यवसाय, हिंसा, हत्या, ही अलक्ष्मीची आवडती निवासस्थाने सांगितली आहेत .
जिथे अलक्ष्मीचा वास असतो तिथे श्रीलक्ष्मीचे वास्तव्य कधीच नसते.
थोडक्यात सांगायचं तर अलक्ष्मी म्हणजे सर्व नकारात्मक गोष्टी ज्यामुळे आयुष्याचा सत्यानाश व्हायला वेळ लागत नाही .
म्हणून ऋषि अत्यंत कळकळीने श्रीलक्ष्मीला विनंती करतात की अशा अलक्ष्मीला आमच्या कोणाच्याही घरात फिरकू देऊ नकोस .
आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः ।
तस्य फलानि तपसा नुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः ॥ ६॥
अन्वय - हे आदित्यवर्णे तव तपस: वनस्पति: बिल्ववृक्ष अधिजात | तव तपसा तस्य फलानि मम मायान्तराया: बाह्या: अलक्ष्मी: च नुदन्तु |
शब्दार्थ
आदित्य वर्णे = सूर्याच्या तेजात चकाकणारा
तपसा अधिजातो = तपस्येने जन्माला आलेले
वनस्पती = अपुष्पा: फलवन्तो ये ते वनस्पतय: स्मृता: ( ज्याला फुले न येताच फळे येतात त्याला वनस्पती म्हणतात)
अथा = जे शुभ आहेत
बिल्व वृक्ष = बेलाचे झाड
मा= माझ्यामध्ये असलेल्या
या अंतरा = ते जे आत आहेत
या च बाह्य = ते जे माझ्या बाह्य शरीरावर परिधान केले आहे
नुदंतु = बाजूला टाका, दूर करू द्या
अर्थ व स्पष्टिकरण
बिल्व फळ म्हणजे बेलवृक्षाची फळे . बिल्व फळ हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानले जाते . बेलाची पाने शंकराला अतिशय प्रिय आहेत हे सर्वांनाच माहीत आहे . ह्या विषयी पुराणात एक कथा अशी येते की श्रीलक्ष्मीने शैल्य पर्वतावर बेलवृक्षाच्या रूपात भगवान शंकरांची आराधना करून शंकराच्या मनात विष्णू विषयी असलेला गैरसमज दूर केला होता. म्हणून बिल्ववृक्ष श्रीलक्ष्मीचे स्वरूप मानला जातो.
लक्ष्मीने आपल्या तपाच्या सामर्थ्याने बेलाचे झाड उभे केले म्हणून बेलवृक्षाखाली लक्ष्मी म्हणजेच वैभव आहे असे मानले जाते .
श्रीलक्ष्मीने केलेल्या तपश्चर्येमुळे बेलवृक्षाला श्रीवृक्ष आणि बिल्वफळाला श्रीफळ सुद्धा म्हणतात. श्रीफळ म्हणजे श्रीलक्ष्मीने ज्या झाडाखाली बसून तपश्चर्या केली त्या वृक्षाचे फळ, म्हणजेच बिल्वफळ किंवा बेलफळ.
घराच्या आवारात बेलाचे झाड लावणे शुभ मानले जाते . बेलाच्या झाडाखाली बसून श्रीसूक्ताचे पठण केल्यास दारिद्रय नष्ट होते असे म्हणतात .
इथे “श्री” देवीसाठी ऋषींनी आदित्यवर्णे हे विशेषण वापरले आहे . आदित्यवर्णे म्हणजे आरक्तवर्णा, सूर्यासारखा तेजस्वी वर्ण असलेली . ऋषि म्हणतात, “ हे आदित्यवर्णे तुझ्या तपोबलाने निर्माण झालेल्या ह्या बेलवृक्षाच्या फळांनी म्हणजे बिल्वफळांच्या तपसामर्थ्याने आमच्या आयुष्यांतील सर्व आंतरिक आणि बाह्य अलक्ष्मी दोष समूळ नष्ट होऊ देत”.
इथे ऋषींना बाह्य शुद्धी बरोबर आंतरिक शुद्धी सुद्धा तितकीच महत्त्वाची वाटत आहे .
बाह्य अलक्ष्मी दोष म्हणजे आळस, चिडचिड, दारिद्र्य. हे दूर झाले की माणसाची प्रगती व्हायला वेळ लागत नाही . कार्यात व्यवसायात गती येते, यश मिळते . यश मिळाले की धन, समृद्धी, प्रसिद्धी आलीच . पण ऋषींना फक्त धन, समृद्धी आणि प्रसिद्धी नको आहे . त्यांना हे सर्व प्रामाणिक पणे मिळवायचे आहे . कोणाला फसवून कोणाचे नुकसान करून त्यांना हे नको आहे .
म्हणून ते आपल्यातील आंतरिक अलक्ष्मी दोष म्हणजे अज्ञान, अहंकार, लोभ, मोह, मत्सर, क्रोध इत्यादींचा सुद्धा समूळ नाश व्हावा अशी प्रार्थना करतात .
म्हणूनच आंतरिक म्हणजे मनाचे दारिद्रय आणि बाह्य म्हणजे भौतिक दारिद्रय दोन्ही नष्ट व्हावेत म्हणून ह्या ऋचेत ऋषीं श्रीलक्ष्मीची प्रार्थना करत आहेत .
उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह ।
प्रादुर्भूतो सूराष्ट्रे॒ऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे ॥ ७॥
शब्दार्थ
मणिनासह = मौल्यवान रत्नांसोबत
देवसख: = शिवमित्र, कुबेर संपत्तीची देवता
कीर्ति: = नावलौकिक, प्रतिष्ठा, प्रसिद्धी
मां = माझ्याकडे
उपैतु = माझ्या जवळ येऊ दे
अस्मिन् सुराष्ट्रे = इथे ह्या लोकी, ह्या जगात
प्रादुर्भूत: = जन्म घेतला
ऋद्धिं = ऐश्वर्य
ददातु = दे
अर्थ व स्पष्टीकरण
देवसख: म्हणजे देवांचामित्र, शिवभक्त कुबेर .
हा मंत्र कुबेराला उद्देशून आहे. कुबेर ही एक यक्षदेवता असून ती कीर्ती व संपत्तिची मुख्य देवता मानली जाते . कुबेर लक्ष्मीच्या अधीन असल्याने त्याने त्याची कीर्ती व मणी म्हणजे वैभव घेऊन आमच्याकडे यावे अशी ऋषि श्रीलक्ष्मीकडे प्रार्थना करत आहेत .
कीर्ती म्हणजे भाग्य किंवा प्रसिद्धी.
मणीचा अर्थ चिंतामणी असाही होऊ शकतो. एक असा मणी की जो काळजी चिंता दूर करून मनातील सर्व इच्छा पूर्ण करतो .
मणी शब्दाचा आणखी एक अर्थ होतो तो म्हणजे मणीभद्र यक्ष . हा मणीभद्र कुबेराचा खजिनदार आहे असा उल्लेख पुराणांमध्ये आहे .
ह्या ऋचेत आम्हाला कुबेराप्रमाणे धनसंपत्ती, जडजवाहिर प्राप्त व्हावी, चिंतामणीची प्राप्ती व्हावी आणि आम्ही ज्या सुराष्ट्रात जन्म घेतला आहे त्या ठिकाणी आम्हाला कीर्ती, प्रसिद्धी प्राप्त होऊन आमचा उत्कर्ष व्हावा अशी इच्छा ऋषिंनी व्यक्त केली आहे .
ऋषि म्हणतात , “ हे श्रीलक्ष्मी ! चिंतामणी किंवा आपल्या मणीभद्र खजिनदारासह तो कुबेर आणि यशांची देवता असणारी ती किर्ती आमच्याकडे येऊ दे .
आम्ही या सुराष्ट्रात जन्माला आलो म्हणून ह्या किर्तीवर ह्या संपत्तिवर आमचा हक्क आहे . कुबेराची जगभर पसरलेली किर्ती, भाग्यसमृद्धी आम्हाला मिळावी.
कुबेराचे धनाचे अक्षय भांडार आमच्या जवळ यावे म्हणजेच आम्हाला प्राप्त व्हावे अशी प्रार्थना ऋषि इथे करत आहे . कीर्ती आणि मणि यांच्यासह कुबेराला आमच्या जवळ येऊ दे. ते आम्हाला प्रसिद्धी आणि विपुलता देतील”.
ह्या ऋचेत मी सुराष्ट्रात जन्मलो असे म्हटले आहे . ह्या सुराष्ट्रात आपली प्रगती व भरभराट व्हावी अशी प्रार्थना ह्या ऋचेत ऋषि करतात . ह्या सुराष्ट्राच्या प्रगतीसाठी, सुराष्ट्राचे भाग्य वृद्धिंगत करण्यासाठी ऋषि श्रीदेवीकडे वैभव मागत आहेत . संपत्ती, समृद्धी, शक्ती, सामर्थ्य मागत आहेत .
पण सुराष्ट्र म्हणजे फक्त आपलं राष्ट्र किंवा आपला देश अशी भावना नसून ऋषिंना संपूर्ण जगाचे कल्याण व भरभराट अपेक्षित आहे . कारण “वसुधैव कुटुंबकम” ही आपली संस्कृती व संस्कार आहेत . केवळ स्वतःच्याच कल्याणाची इच्छा न करता ऋषि इथे संपूर्ण विश्वाच्या भल्याचा विचार करताना दिसतात . ज्या मातीत जन्म झाला ज्या पृथ्वीवर आपण आपलं आयुष्य घालवणार आहोत त्या भूमीसाठी त्या पृथ्वीच्या उत्कर्षासाठी ऋषि समृद्धी आणि सामर्थ्य मागत आहेत .
क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम् ।
अभूतिमसमृद्धिं च सर्वां निर्णुद मे गृहात् ॥ ८॥
अन्वय - ज्येष्ठां क्षुत्पिपासामलां अलक्ष्मीं च अहं नाशयामि || मम गृहात् असमृद्धीं अभूतिं च निर्णुद ||
शब्दार्थ -
ज्येष्ठां = मोठी , आधी जन्माला आलेली
क्षुत्पिपासामलां = भूक, तहान, दोषांची मलिनता
अलक्ष्मीं = दैन्य, दारिद्रय, दुर्भाग्य
अभूतिं = अनैश्वर्यम, गैरसंपत्ती
निर्णुद = पूर्णपणे काढून टाक, नष्ट कर
अर्थ व स्पष्टिकरण
ह्या ऋचेत ऋषि म्हणतात की , “ हे श्रीलक्ष्मी तू माझ्या घरी यायलाच हवंस पण त्याआधी अलक्ष्मी माझ्या घरून निघून गेली पाहिजे” .
कारण फक्त लक्ष्मी आली म्हणजे सगळे मिळाले असे होत नाही . जोपर्यंत घरातून अलक्ष्मी जात नाही तोपर्यंत प्राप्त झालेल्या लक्ष्मीला परिपूर्णता येत नाही.
म्हणून ऋषि प्रार्थना करतात की , “ही भूक, तहान, दु:ख, दारिद्र्य वगैरे दोषांनी युक्त अशी जी ज्येष्ठा अलक्ष्मी आहे तिचा नाश करण्याचा, तिला माझ्या घरून, माझ्या आयुष्यातून पूर्णपणे बाहेर काढायचा मी प्रयत्न करीन. हे श्रीलक्ष्मी ह्यात तू माझी मदत कर.
माझ्या घरातील अभूति आणि असमृद्धी पूर्णपणे नष्ट कर . त्यांचा मागमूसही माझ्या घरी नको ”. “निर्णुद” म्हणजे पूर्णपणे समूळ नष्ट करणे .
इथे तहान भुक ह्या शब्दांचा जो उल्लेख येतो तो केवळ शारीरिक गरजांशी निगडीत नसून त्यांचा संबंध इतरांच्या गोष्टींविषयी असलेली तृष्णा आणि लोभ असाही आहे .
ऐश्वर्य प्राप्त झाले , श्रीमंती आली म्हणजे माणूस तृप्त होतोच असे नाही . उलट धन ही अशी गोष्ट आहे की ती आणखी धनाचा लोभ निर्माण करते . कितीही पैसा मिळाला तरी समाधान नसते .
माणूस हापापल्या सारखा आणखी पैसे कमावण्याच्या मागे लागतो . अशा वेळी मग त्याला विवेक, नितीमत्ता, प्रामाणिकपणा ह्या कशाचेच भान रहात नाही . आणि ह्याच हव्यासा पोटी शेवटी अनेकांची अत्यंत दीनवाणी अवस्था होते .
मिळालेल्या धनाचा उपभोग कसा घ्यावा हे अनेकांना कळत नाही . ऐश्वर्यामुळे मिळालेल्या प्रसिद्धी व कीर्ती ह्यामुळे डोक्यात हवा जाऊ दिली नाही तरच ह्या सर्व गोष्टींना अर्थ आहे .
समाधान तृप्ती म्हणजेच श्रीलक्ष्मी तर अतृप्ती, असंतोष , हापापलेपणा, चिंता म्हणजेच अलक्ष्मी .
म्हणूनच ऋषि इथे अलक्ष्मीला पूर्णपणे घरातून बाहेर काढण्यासाठी श्रीलक्ष्मीला विनंती करत आहेत . धन, समृद्धी आणि संपत्ति सोबत त्यांना तृप्ती, शांती आणि समाधानही हवं आहे .
आपले मन निर्मळ शुद्ध व्हावे म्हणून ऋषि स्वतः मनापासून प्रयत्न करणार आहेतच पण ही गोष्ट किती कठीण आहे हे
गीतेतील पुढील श्लोकामुळे आपल्या सर्वांनाच माहीत आहे .
"चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमादी बलवद्दृढम्।
तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् (भगवद्गीता - ६.३४)
आणि म्हणून ह्या प्रमादी मनावर ताबा मिळवणे अतिशय कठीण आहे हे माहीत असल्यानेच ऋषि श्रीलक्ष्मीची मदत मागत आहेत .
गंधद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम् ।
ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियम् ॥ ९॥
शब्दार्थ -
गंधद्वारां = सुगंधित मार्गाने जी प्रवेश करते
दुराधर्षां =अभेद्य, जिला तिच्या मर्जीविरुद्ध कोणीही नेऊ शकत नाही
नित्यपुष्टां= सदैव सुपोषित, संपन्न आणि समृद्ध असलेली
करीषिणीं= भरपूर शेणाने भरलेली किंवा माखलेली
तम् श्रियम = ती श्रीदेवी
उपव्हये= तुझे आम्ही स्वागत करतो
अर्थ व स्पष्टीकरण
ह्या ऋचेत ऋषि म्हणतात की , “ हे अग्ने ! माझ्यासाठी त्या श्रीदेवीला आमंत्रित कर, जी स्वतः सुगंधांचे प्रवेशद्वार आहे म्हणजेच जी सर्व सुगंधांची उगमस्थान आहे, जिचे माझ्या घरून निघून जाणे अशक्य आहे, जी स्वतः सुपोषित असून सदैव पोषण करणारी आहे आणि जी भरपूर शेणाने माखलेली म्हणजेच विपुलतेने भरलेली आहे”.
“ह्या ऋचेत ऋषि भौतिक समृद्धी बरोबर भूमीचीही मागणी करत आहेत. ऋषिंना “गंधद्वारां” म्हणजे गंधाने जी ओळखता येणारी अशी गंधवती पृथ्वी हवी आहे .
इथे पृथ्वीला श्रीलक्ष्मी स्वरूप मानून ऋषि भूमिरूपातील श्रीलक्ष्मीला बोलावत आहेत .
महाभूतानि खं वायुरग्निरापः क्षितिस्तथा| शब्दः स्पर्शश्च रूपं च रसो गन्धश्च तद्गुणाः॥ (चरक संहिता 1.27-28)
अर्थ : खम् (आकाश ), वायु (वायु), अग्नि (अग्नी), आप (पाणी), क्षिती (पृथ्वी) यांना महाभूते म्हणतात. शब्दम् (ध्वनी), स्पर्शम (स्पर्श), रूपम (दृष्टी), रस (स्वाद) आणि गंध (गंध) हे अनुक्रमे या महाभूतांचे अद्वितीय गुण आहेत.
पृथ्वी ही पंचमहाभूतांपैकी एक असून गंध हा तिचा गुण आहे . पृथ्वीला एक प्रकारचा सुगंध आहे. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ओल्या मातीचा मृद्गंध आपण सर्वांनीच अनुभवलेला आहे .
सुगंधित भूमी स्वच्छता, पावित्र्य दर्शवते. म्हणून ऋषिंना केवळ जमीन नको तर त्यांना सुगंधित पृथ्वी हवी आहे . पवित्र सुगंधित भूमीच सूपीक असते . अशी सुजला सुफला भूमी नवनिर्मितीसाठी सक्षम असते . आणि अशा भूमीवरच श्रीलक्ष्मीचे वास्तव्य असते .
“शिवाय त्यांना “दुराधर्षां” भूमी हवी आहे . दुराधर्षां म्हणजे जिला कोणीही कितीही प्रयत्न केले तरी तिचे कर्षण करून कोणी घेऊन जाऊ शकत नाहीत .
तसेच ऋषिंना “नित्यपुष्टा” पृथ्वी अपेक्षित आहे. पृथ्वी अन्न निर्माण करून शरीराचे पोषण करते . ह्या अन्नामुळे शरीरा बरोबरच आमची बुद्धी सुद्धा पुष्ट होऊ देत असे ऋषि म्हणतात .
प्राचीन काळी विपुल पशुधन हे समृद्धीचे चिन्ह होते . म्हणून त्यांना पृथ्वी म्हणजेच श्रीलक्ष्मी “करीषिणीम्” हवी आहे . “करीषि” म्हणजे गाईचे वाळलेले शेण. ज्याच्याकडे पुष्कळ पशुसम्पत्ती असेल त्याची भूमी सदैव भरपूर शेणाने माखलेली असणार हे साहजिकच आहे . म्हणूनच ऋषी आमची गोसंपदा सतत वाढत राहू देत अशी प्रार्थना करतात आणि “करीषिणीम्” पृथ्वीची मागणी करतात .
ह्या ऋचेतही ऋषि भौतिक समृद्धी मागत आहेत . प्राचीन काळच्या श्रीमंतीचे वर्णन इथे दिसते .
स्वच्छ, पवित्र आणि सुगंधाने दरवळणारी भूमी श्रीलक्ष्मीला प्रिय आहे . अशाच ठिकाणी तिचे वास्तव्य असते . ती नेहमी सुगंधित द्वारातूनच आत येते . अशी लक्ष्मी जेव्हा स्वतःहून प्रसन्न मनाने आपल्या घरी प्रवेश करते तेव्हा तिच्या इच्छेविरुद्ध कोणीही तिला आपल्या घरातून बाहेर काढू शकत नाही . ऋषिंना अशी यश देणारी संपन्न, सूपोषित, स्थिर लक्ष्मी हवी आहे .
इथे श्रीलक्ष्मीला पृथ्वीमातेच्या रूपात संबोधले गेले आहे . तिला गंधवती म्हटले आहे . पृथ्वीवरील सर्वच प्राणीमात्र आणि विशेष करून मानव तिचा अनेक प्रकारे वापर करतो . असंख्य प्रकारे तिचा आपल्या प्रगतीसाठी फायद्यासाठी हरतऱ्हेने वापर करतो . हे सर्व अत्याचार पृथ्वी अत्यंत धैर्याने सहन तर करतेच पण आपल्यावर अत्याचार करणाऱ्या मानवाला आपलाच पुत्र मानून क्षमा देखील करत असते . ह्या ऋचेत म्हणूनच ऋषि पृथ्वीला श्रीलक्ष्मी स्वरूप मानून तिची मनोभावे क्षमा मागत आहेत . तिची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून प्रार्थना करत आहेत .
मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि ।
पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीः श्रयतां यशः ॥ १०॥
अन्वय
त्वया मयि अन्नस्य श्री: यश: श्रयतांवयं मनस: कामं आकूतिं वाच: सत्यं पशुनां रूपं अन्नस्य रूपं अशीमहि |
शब्दार्थ -
मनस: कामं = मनातील इच्छा
आकूतिं = संकल्प ,समाधान, तृप्ति
वाचः = खरे बोलणे , स्पष्टवक्तेपणा
पशुनां = पशुधन, गायी घोडे वगैरे
पशुनां अन्नस्य रूपं= दूध व इतर दुग्धजन्य पदार्थ
श्री: = यश: कीर्ती, समृद्धी
मयि श्रयताम् = माझ्याकडे आश्रयाला ये
अशीमहि = मला मिळवायचे आहे
अर्थ व स्पष्टीकरण
ह्या ऋचेत ऋषी म्हणतात , “ माझी वाणी प्रामाणिक कर . वाणीचा खरेपणा मला प्राप्त होऊ देत. हे श्रीलक्ष्मी ! तुझ्या प्रभावाने माझे मनोरथ आणि संकल्प शुद्ध ठेव . माझ्या मनात कोणतेही वाईट विचार येऊ देऊ नकोस .
“पशूनां रूपम्” म्हणजे रूपवान पशू माझ्या घरी असावेत . प्राचीन काळी गायी, म्हशी, घोडे, हत्ती हे पशुधन होते . रूपवान म्हणजे नुसते दिसायला सुंदर नाही तर सुदृढ, सुस्थितीतील पशुधन . श्रीलक्ष्मीच्या कृपेने ऋषिना आपल्या जीवनात रूपवान सक्षम पशुधन हवे आहे .
ऋषि म्हणतात , “माणसांबरोबरच मी माझ्या पशूंवर देखील प्रेम करू शकेन इतके माझे मन संवेदनशील बनव”. आपल्याला सदैव उपयोगी पडणाऱ्या, आपले आयुष्य सुखी समृद्ध करणाऱ्या प्राण्यांना ऋषि इथे आपल्या कुटुंबियांचा दर्जा देत आहेत . आपले विचार आणि मन समृद्ध असावे असे ऋषि श्रीलक्ष्मीकडे मागत आहेत .
ऋषिंना आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करून मनाची तृप्ती साधायची आहे, त्यांना स्पष्टवक्ती सत्य वाणी हवी ज्यामुळे भरपूर पीक आणि पशुधन प्राप्त होईल, त्यांनी प्राप्त केलेली समृद्धी आणि श्रेष्ठता कायमस्वरूपी टिकून राहील .
धनप्राप्ती करताना कुठेही खोटेपणा त्यांना करायचा नाही . जो काही व्यवहार करायचा तो स्पष्टपणे , प्रामाणिकपणे करायचा, वाणीने कोणालाही मी दुखवू नये, फसवू नये असे सामर्थ्य ह्या मनाला दे , माझ्या वाणीला दे असे ऋषि इथे मागत आहेत.
कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम ।
श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् ॥ ११॥
शब्दार्थ -
कर्दमेन= कर्दम प्रजापती , चिखल असाही अर्थ होतो
प्रजाभूता = संतती असलेली
मयि संभव = माझ्यामध्ये रहा
पद्ममालिनीम् = कमळाच्या माळांनी सजलेली
मे कुले वासय= माझ्या कुळात वास्तव्य कर
अर्थ आणि स्पष्टीकरण
हा मंत्र कर्दमाला उद्देशून आहे.
“कर्दमेन प्रजाभूता.” म्हणजे कर्दमामुळे पुत्रवती बनलेली लक्ष्मी.
इथे ऋषी म्हणतात, “हे कर्दमा ! तू माझ्यावर कृपा कर व माझ्या घरी वास्तव्याला ये . सोबत तुझ्या पद्ममालिनीं म्हणजेच कमळाच्या माळांनी अलंकृत मातेला सुद्धा घेऊन ये आणि ती माझ्या कुळात स्थिर राहील असे कर. ”
कर्दम हा एक महान ऋषी आणि प्रजापती (जगाचा शासक) असून तो लक्ष्मीचा मानसपुत्र मानला जातो . ज्याच्यामुळे लक्ष्मी पुत्रवती मानली जाते त्या लक्ष्मीपुत्र कर्दमाला ऋषी आपल्या घरी बोलावत आहेत . कारण अगदी स्पष्ट आहे . पुत्रप्रेमामुळे जिथे मूल तिथे आई ह्या न्यायाने कर्दम आला की त्याची आई श्रीलक्ष्मी स्वतःहून त्याच्या मागोमाग आपल्या घरी कायम राहायला येईल अशी ऋषींची भावना आहे.
कर्दम शब्दाचा दुसरा अर्थ चिखल असाही आहे . चिखलाने ओली झालेली जमीनच निर्मितीक्षम असते . अशा भूमीत सृजनशक्ति असते म्हणून त्यात लक्ष्मीचा वास आहे असे ऋषि म्हणतात.
आपल्या घरी धन संपत्ति नुसती असून उपयोगी नसते तर आपण तिचा कसा वापर करतो, विनियोग करतो तेही तितकेच महत्त्वाचे असते .
धनलक्ष्मीची चार पर्व शास्त्रात सांगितली आहेत . अर्जनपर्व, भोगपर्व, वितरणपर्व आणि त्यागपर्व.
१)अर्जनपर्व - अर्जन म्हणजे मिळवणे प्राप्त करणे . ह्याला ब्रह्मचर्याश्रम म्हणतात. ह्या पर्वात सर्व काही मिळवायचे असते . शिक्षण, बुद्धी, शक्ती, शरीरसंपदा हया सर्व गोष्टींचा संचय करायचा असतो . ह्यापैकी काहीही वापरायचे नाही किंवा कोणाला द्यायचेही नाही.
भोगपर्व :- म्हणजेच गृहस्थाश्रम. ह्या पर्वात मिळवलेल्या गोष्टींचा उपभोग घ्यायचा असतो . हा उपभोग कसा घ्यावा ह्या विषयी सुद्धा काही नियम आहेत . प्रामाणिकपणे, मेहनतीने आणि कष्टाने मिळवलेल्या गोष्टी , वारसाहक्काने प्राप्त झालेल्या गोष्टीच इथे अपेक्षित आहेत . इतरांना फसवून, लुबाडून, अन्यायाने मिळवलेल्या गोष्टींचा उपभोग कधीच घेऊ नये .
वितरणपर्व :- वितरणपर्व म्हणजेच वानप्रस्थाश्रम. वितरण म्हणजे देणे किंवा वाटणे . ह्या पर्वात तुमच्या जवळ आज पर्यन्त जे काही जमा झालेले आहे ते सर्व इतरांना देणे अपेक्षित आहे . तुमचे ज्ञान, संपत्ति, तुमचे अनुभव, सर्व गोष्टींचे स्वेच्छेने वितरण करायचे .
त्यागपर्व :- त्यागपर्व म्हणजे संन्यास , सर्वाचा त्याग करणे , पूर्णपणे अनासक्त होणे .
म्हणून ऋषी इथे कर्दमाला विनंती करत आहेत की , “मला तुझ्या सारखी संतती हवी , म्हणजे मला माझ्या जवळील धनलक्ष्मीचे वितरण करता येईल. लक्ष्मी ही नेहमी खेळती हवी . तिला साठवायचा जितका जास्त प्रयत्न करू तेवढी ती आपल्या हातून निसटते . पण जर आलेल्या धनलक्ष्मीचा योग्य वापर केला तर ती परतून आपल्याकडे येत राहते . कारण
दानं भोगो नाशस्तिस्रः
गतयः भवन्ति वित्तस्य
यो न ददाति न भुङ्क्ते
तस्य तृतीयागतिर्भवति ।
म्हणजे
प्राप्त धनाच्या तीन गति किंवा मार्ग सांगितले आहेत . पहिला व सर्वोत्तम मार्ग म्हणजे दान, दुसरा उपभोग आणि तिसरा नाश . जी व्यक्ति धनाचे दानही करत नाही व उपभोगही घेत नाही, फक्त धनसंचय करत राहतो त्या धनाची तिसरी गति आहे . म्हणजे ते धन साठूनसाठून शेवटी नष्ट होते .
म्हणून प्राप्त धनाचे योग्य वितरण करून ते धन स्थिर करण्यासाठी ऋषींना कर्दमासारखी संतती हवी आहे. कारण नुसती संपत्ति माणसाला अविवेकी बनवू शकते पण जर संतती असेल तर आपल्या कुटुंबाचा विचार माणूस सर्वप्रथम करतो . आपल्या वंशासाठी पुढील पिढीसाठी तो सजग होतो . धन खेळते (म्हणजे एकीकडून दुसरीकडे जात राहीले) राहीले तरच त्याची वृद्धी होते .
आपः सृजन्तु स्निग्धानि चिक्लीत वस मे गृहे ।
नि च देवीं मातरं श्रियं वासय मे कुले ॥ १२॥
अन्वय - हे आप: स्निग्धानि स्रजन्तु हे चिक्लीत त्वं मे गृहे वस | देवी मातरं च मे कुले निवासय |
शब्दार्थ -
आप: =पाणी
स्निग्धानि = चिकट, गुळगुळीत
स्रजन्तु= निर्माण करू दे
चिक्लीत = श्रीलक्ष्मीचा पुत्र, पाण्याचा ओलावा किंवा भिजलेली असाही एक अर्थ
मे गृहे वस = माझ्या घरी रहा
मे कुले निवासय=माझ्या कुळात वास्तव्य कर
अर्थ आणि स्पष्टीकरण
हा मंत्र चिक्लिताला उद्देशून आहे . चिक्लीत हा श्रीलक्ष्मीचा दुसरा मानसपुत्र असून तो सुद्धा एक ऋषी आहे.
असे म्हणतात की जिथे जिथे चिक्लीत जातो तिथे तिथे लक्ष्मी जाते . म्हणून कर्दमा प्रमाणेच ऋषि चिक्लीताचीही स्तुती करून त्याला आपल्या घरी राहायला बोलावत आहेत .
ऋषि म्हणतात , “ हे चिक्लिता ! तुझे अस्तित्व सर्व गोष्टीत प्रेम निर्माण करते . तू तुझ्या अस्तित्वाने तुझ्या आईला श्रीलक्ष्मीला जी प्रेमस्वरूप आहे माझ्यासाठी माझ्या घरी घेऊन ये” .
ह्या ऋचेत चिक्लित हा शब्द पाण्याचा ओलावा, जलदेवता किंवा जलवैभव ह्या अर्थाने सुद्धा घेतला जातो . ह्या संपूर्ण सृष्टीची निर्मितीच जलामुळे झाली आणि युगांतकाळी ह्याच जलात सृष्टिचा लय होतो . जल जीवनाचा सर्वात प्रमुख घटक आहेच . शिवाय जल हे संपत्ती आणि समृद्धीचे प्रतिकही आहे .
म्हणून ऋषि श्रीलक्ष्मी पुत्र चिक्लिताला विनंती करतात की , ” तू माझ्याकडे राहायला ये आणि येताना सोबत तुझ्या आईला, श्रीलक्ष्मीला सुद्धा घेऊन ये”.
ऋषींनी आधीच्या ऋचेत कर्दमाला संपत्तीच्या योग्य वितरणासाठी आणि प्राप्त धनाच्या स्थैर्यासाठी बोलाविले आणि ह्या ऋचेत ते चिक्लिताला त्याने जल-वैभव प्रदान करावे, घराचा, वंशाचा आपल्या कुळाचा उत्कर्ष व्हावा, कायम प्रेमळ मंगलमय वातावरण असावे म्हणून बोलावत आहेत .
पाण्यामुळे परस्पर आपुलकी आणि स्नेहबंध निर्माण होतात .
ऋषिना केवळ आर्थिक वैभव नको आहे तर त्यांना आपल्या बुद्धीचं, भावनांचं, आचरणांचं, चारित्र्याचं आणि नातेसंबंधांचं वैभव सुद्धा हवं आहे .
आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीम् ।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥ १३॥
हे जातवेद: आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं मे आवह |
शब्दार्थ -
आर्द्रां = ओलसर , भिजलेली
पुष्करिणीं = कमळे असलेली
पुष्टिं= पुष्ट , सुपोषित
पिङ्गलां = पिवळसर लाल , तपकिरी रंग
पद्ममालिनीं= कमळांच्या माळा असलेली
अर्थ आणि स्पष्टीकरण
ह्या ऋचेत ऋषी म्हणतात, “माझ्या घरी आर्द्रां, पुष्करिणीं, पुष्टिं, पिंगलां, पद्ममालिनीं अशा विशेषणांनी युक्त असलेली लक्ष्मी यावी.”
आर्द्राचा शब्दश: अर्थ ओलसर असा होतो. इथे आर्द्रा म्हणजे स्निग्ध, स्नेहयुक्त, दयाळू किंवा ओलसरपणामुळे सुखद शीतल अशी थंडावा देणारी आल्हाददायक श्रीलक्ष्मी .
पुष्करिणी म्हणजे कमळांनी भरलेले तळे , जी कमळांनी भरलेल्या तळ्यात बसली आहे अशी किंवा पुष्करिणीचा दूसरा अर्थ मादी हत्ती असा सुद्धा होतो . किंवा जिच्यावर हत्तीच्या सोंडेने सतत अभिषेक होत आहे अशी. लक्ष्मीचे वाहन हत्ती आहे आणि हत्तीला भारतीय संस्कृती ऐश्वर्याचे प्रतिक मानतात . अशी हत्तींनी चारही बाजूने घेरलेली गजान्तलक्ष्मी आमच्या घरी यावी असे ऋषि म्हणतात .
पुष्टिं म्हणजे भक्तांना पुष्टी देणारी, शरीराबरोबरच आत्म्याचेही पोषण करणारी, सर्वच बाबतीत उन्नती करणारी श्रीलक्ष्मी माझ्या घरी येवो.
पिंगलां हा रंग लाल व पिवळा या दोन रंगाचे मिश्रण आहे . हे दोन्ही रंग सामर्थ्य व समृद्धीचे प्रतीक मानले जातात . ऋषिना ध्यानवस्थेत ज्या लक्ष्मीचे दर्शन झाले ती पिंगल वर्णाची आहे .
ह्या श्रीलक्ष्मीने कमळांच्या माळा धारण केल्या आहेत , ही सुवर्णआभा असलेल्या चंद्रासारखी तेजस्वी आहे.
आर्द्रां यः करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीम् ।
सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥ १४॥
अन्वय
हे जातवेद: आर्द्रां य: करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मी मे आवह |
शब्दार्थ -
यष्टिं = काठी , वेताची छडी
सुवर्णां = तेजस्वी,
हेममालिनीं = सोनेरी माळांनी सजलेली
सूर्याम् = कोमल सूर्यासारखी तेजस्वी
अर्थ आणि स्पष्टीकरण
ऋषि म्हणतात , “ हे जातवेदा ! माझ्यासाठी दयाळू, संपूर्ण जगताचा आधार असलेली आणि जगाचे नियंत्रण करणारी, सोनेरी रंगाची, सोन्याच्या माळा धारण करणारी, सूर्यासारखी तेजस्वी अशा श्रीलक्ष्मीला आमंत्रित करा . हे अग्ने ! माझ्या घरात “आर्द्रां” (भिजलेली) म्हणजेच कोमल दयाळू लक्ष्मी यावी” .
“य:करणीं यष्टिम्” अशी लक्ष्मी माझ्या घरात यावी. हातात धर्मदंड असलेली, जगताचे नियंत्रण करणारी , न्यायनिवाडा करणारी, हातात वेताची छड़ी घेतलेली अशी श्रीलक्ष्मी माझ्या घरी यावी . ऐश्वर्य आणि समृद्धी ह्यांना जर धार्मिकतेची जोड नसली तर ते अत्यंत घातक ठरू शकते . श्रीमंती माणसाला उद्दाम, उद्धट आणि आसुरी बनवते . म्हणूनच ऐश्वर्याचे नियंत्रण अतिशय गरजेचे असते . त्यासाठीच ऋषिना आपल्यावर नियंत्रण ठेवणारी, आपल्या चुकीची शिक्षा देणारी, जिचा वचक वाटावा अशी हातात छडी असलेली श्रीलक्ष्मी हवी आहे .
परोपकारी, सर्व इच्छा पूर्ण करणारी, सुवर्णमाळा धारण केलेली , सूर्यासारखी तेजस्वी कान्ती असलेली आणि धर्मनिष्ठ अशी श्रीलक्ष्मी ऋषिना आपल्या घरी हवी आहे .
तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनी म् ।
यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योऽश्वान् विन्देयं पुरुषानहम् ॥ १५॥
हे जातवेद: तां अनपगामिनीं लक्ष्मीं मे आवह | यस्यां (प्राप्तायां) अहं प्रभूतं गाव: दास्य: अश्वान् हिरण्यं पुरुषान् विन्देयम् |
शब्दार्थ
अनपगामिनीं = अविनाशी, दूर न जाणारी , कायम टिकणारी , सातत्यपूर्ण
प्रभूतं = भरपूर प्रमाणात
गाव: = गुरेधोरे , पशुधन
दास्य: = सेवक, नोकरचाकर, मदतनीस वगैरे
पुरुषान् = मनुष्यबळ
विन्देयम् = मी साध्य करू इच्छितो
अर्थ आणि स्पष्टीकरण
हे जातवेदा ! माझ्यासाठी जी कधीही निघून जात नाही अशा श्रीलक्ष्मीचे आवाहन कर . जिच्या हिरण्यमय सुवर्णस्पर्शाच्या कृपेने मला भरपूर सोने, गुरेढोरे , नोकरचाकर , घोडे आणि मनुष्य बळाची प्राप्ती होईल .
कधीही निघून न जाणारी अनपगामिनीं श्रीलक्ष्मी म्हणजे कधीच कमी न होणारी घरातील धन संपत्ति . आपल्या आयुष्यातील कर्मे अशी असावीत की श्रीलक्ष्मीने प्रसन्न होऊन स्वतःच आपल्या घरात कायमस्वरूपी वास करण्याचा निश्चय करावा . त्यामुळे प्राप्त होणारी समृद्धी आणि स्थैर्य निश्चितच अविनाशी अक्षय आणि सतत वृद्धिंगत होणारे असे असणार .
श्रीलक्ष्मीचा सुवर्ण स्पर्श म्हणजे तीची कृपादृष्टी . तीची कृपा होते तेव्हा घरातील अलक्ष्मी निघून जाते आणि कष्ट, प्रामाणिकपणा व प्रयत्नांची जी ऊर्जा निर्माण होते त्यामुळेच सोने, गुरेढोरे , नोकरचाकर , घोडे आणि मनुष्यबळ ह्या सर्व भौतिक गोष्टींची प्राप्ती होते . ह्या सर्व गोष्टी लक्ष्मी स्वरूप असून त्यांना श्रीलक्ष्मीचे बाह्य स्वरूप मानतात .
यः शुचिः प्रयतो भूत्वा जुहुयादाज्य मन्वहम् ।
श्रियः पञ्चदशर्चं च श्रीकामः सततं जपेत् ॥ १६॥
अन्वय
य: शुचि: प्रयत: भूत्वा: आज्यं अन्वहं जुहुयात श्रीकाम पंचदशर्चंच सुक्तम् सततं जपेत् |
शब्दार्थ
शुचि: = शुद्ध पवित्र होऊन
प्रयत: = प्रयत्न करणारा
आज्यं = तूप
अन्वहं = दररोज
जुहुयात = हवनात आहुति देणे
श्रीकाम = श्री ची इच्छा करणारा
पंचदश = पंधरा
अर्थ व स्पष्टीकरण
ही फलश्रुतीची ऋचा आहे . वरील पंधरा ऋचामध्ये ऋषींनी जे जे मागितले ते कसे व कधी प्राप्त होईल ते ह्या ऋचेत सांगितले आहे . ऋषि म्हणतात की ज्या मनुष्याला संपत्तिची, वैभवाची म्हणजेच श्रीलक्ष्मीच्या प्राप्तीची इच्छा आहे त्याने दररोज स्नान करून शुद्ध आणि पवित्र होऊन सतत या पंधरा मंत्रांचा जप करावा व प्रयत्नशील असावे . त्याच्या घरात जन्मजन्मांतरी टिकणाऱ्या स्थिर अनपगामिनी श्रीलक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य असेल .
शुचि शब्दात शारिरिक स्वच्छते बरोबर मानसिक पावित्र्य सुद्धा अभिप्रेत आहे . ज्याचे मन साफ आणि निर्मळ असते त्याच्याकडेच स्थिर श्रीलक्ष्मी येते . पैसा कोणीही कसाही कमावतो . पण तो चुकीच्या मार्गाने आला तर तितक्याच वेगाने तो जातो सुद्धा . आणि जाताना सुख शांती समाधान सर्व काही घेऊन जातो . म्हणूनच श्री ची इच्छा करणाऱ्यासाठी शारीरिक व मानसिक शुद्धता पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे .
शरीर आणि मनाची प्रयत्नपूर्वक शुद्धी केली की मग “अन्वहं आज्यं जुहुयात्” म्हणजे हवनकुंडात तुपाची आहुति द्यावी . प्राचीन काळी घरोघरी होमहवन केले जात असत . आजच्या काळात हे दररोज शक्य नाही . पण ह्या वाक्याचा प्रतिकात्मक अर्थ लक्षात घ्यायला हवा . आपल्या मनातील विकार, विषयवासना ह्या सर्वांची भक्तिरूपी तुपाच्या मदतीने आहुति द्यावी व त्यांना आपल्या मनातून समूळ नष्ट करावे . शुद्ध सात्विक भाव मनात ठेऊन जो माणूस वरील पंधरा ऋचांचा सतत जप करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात . त्याला हव्या असलेल्या प्रसन्न अनपगामिनी श्रीलक्ष्मीची त्याला प्राप्ती होते . आपले बाह्य व आंतरिक दारिद्रय दूर करून आपले जीवन परिपूर्ण आणि सक्षम बनवणे हाच श्रीसूक्ताचा मुख्य उद्देश आहे .
महालक्ष्मै च विद्महे विष्णुपत्नी ची धीमही ।
तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् ॥ (देवी गायत्री)
आम्ही महालक्ष्मीला जाणतो आणि श्रीविष्णुच्या पत्नीचे ध्यान करतो. देवी श्रीलक्ष्मी आम्हाला प्रेरणा देवो आणि मार्गदर्शन करो.
© नयना पिकळे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा