शुक्रवार, ३० मे, २०२५

ओळख वेदांची - अथर्ववेद | Know our Vedas - Atharvaveda

 

अथर्ववेद


अथर्ववेद हा अथर्वान्गिरसवेद: ,  भृग्वान्गिरसवेद: , ब्रह्मवेद: , भेषज्यवेद: आणि क्षत्रवेद: या नावांनीही ओळखला जातो .

 

अथर्वान्गीरो वेद: - अथर्वन् ऋषींचे यातुविद्या संबंधित मनुष्य जातीला उपकारक ठरणारे पवित्र मंत्र आणि अंगिरस ऋषींचे तंत्रविद्ये वरील शत्रुत्वामुळे एखाद्याला त्रास देण्यासाठीचे अभिचार मंत्र यात आहेत . यातील अंगिरस ऋषींचे मंत्र ऋग्वेदापेक्षाही प्राचीन मानले गेले आहेत .

अथर्वन् शब्दाचा अर्थ अग्नी आणि सोम यांना पुजणारा असाही होतो . अवेस्ता या पारसी लोंकाच्या पवित्र धर्मग्रंथातही अथ्रवन शब्दाचा अर्थ अग्निपूजक असा आहे .

भृग्वान्गीरो वेद: - भृगु ऋषींचे काही मंत्र देखील अथर्ववेदात आहेत .

ब्रह्मवेद: - ब्रह्म हि मंत्रातील पवित्र सूप्त शक्ती मानली गेली आहे . अथर्ववेदातील मंत्रांमध्ये हि शक्ती आढळते म्हणून या वेदाला ब्रह्म्वेद म्हणतात . तसेच ब्रह्मतत्त्वाचे ज्ञान करून देऊन मोक्षप्रत नेणारा वेद हे एक स्पष्टीकरण सुद्धा दिला जातं .

 

भेषज्यवेद: - विविध रोगांवर उपचार सांगणारे मंत्र या वेदात आहेत .

 

क्षत्रवेद: - अथर्ववेदात क्षत्रियांची कर्तव्ये , रिती , रूढी त्यांची दिनचर्या , कर्मे , यश , कीर्ती याविषयीची सर्विस्तर माहिती मिळते . क्षत्रियाला आत्मरक्षण आणि राज्यरक्षणासाठी उपयोगी असणारे मंत्र या वेदात आहेत .

 

राजपुरोहित अथर्ववेदज्ञ असावा असे म्हटले आहे .

अथर्ववेदाचे वैशिष्ट्य म्हणजे हा सामन्यांचा वेद मानला जायचा . इतर तीन वेदांमध्ये त्याग आणि देवतांची स्तुती प्रार्थना यांच्याशी संबंधित मंत्र आहेत . तर अथर्ववेदात समाजाच्या समस्या , त्यावर तोडगे , सामन्यांच्या इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने केले जाणारे तंत्रमंत्र , यातुविद्या आहे .

 

मानवाने इथे इच्छापूर्तीसाठी इथे थोडी खालची पातळी गाठलेली आहे . म्हणून इतर तीन वेदांच्या तुलनेत अथर्ववेदाला महत्त्व दिल गेलेलं नव्हतं . जैन आणि बौद्ध धर्मीय देखील या वेदाला कमी लेखतात .

बाळाच्या बारशाला इतर तीनही वेद व पवित्र पुराणग्रंथ , वेदांगे बाजूला ठेवली जातात पण ह्या पवित्र प्रसंगी अथर्ववेद ठेवू नये असा उल्लेख शांखायन गृह्यसूत्रात आहे .

 

अथर्ववेदाच्या एकूण ९ शाखा आहेत . पैप्पलाद , तौद , जलद , देवदर्शिन् , शौनक , मौद , जाजल , ब्रह्मवद , चारणवैद्य .

पण आज केवळ पिप्पलाद आणि शौनक शाखेच्या संहिता उपलब्ध आहेत .

ह्यापैकी पिप्पलाद संहिता योग्य प्रकारे जोपासली गेलेली नाही .

या संहितेतील मंत्र लिहिलेला क्रम आणि म्हणण्याचा क्रम नीट जुळत नाही म्हणून आज केवळ शौनक संहिता वापरली जाते .

 

शौनक संहितेत एकूण ७३१ सूक्ते , ६००० मंत्र आणि २० कांड आहेत . १९ आणि २० कांड अर्वाचीन आहेत . १५ आणि १६ कांड गद्यात असून ती सर्वात प्राचीन ( ऋग्वेदा पेक्षा आधीची ) असावीत असे अभ्यासकांचं मत आहे .

 

काही अभ्यासकांच्या मते संपूर्ण अथर्ववेद आधी गद्यात होता पण नंतर ऋग्वेदाची लोकप्रियता पाहून व उच्चारायला सोपे जावे म्हणून त्यांचे पद्यात रुपांतर केले गेले .

 

अथर्ववेद इतर तीन वेदांपेक्षा कमी प्रतीचा मानला जातो कारण यात अनेक वाक्य आहेत जी एक प्रकारची नकारात्मक भावना निर्माण करतात . ही वाक्ये पावित्र्य नष्ट करतात असे मानले गेले आहे .

उदा य: अस्मान् द्वेष्टि यं चं वयं द्विष्म: |

जे आमचा द्वेष करतात व ज्यांचा आम्ही द्वेष करतो .

 

अग्नी , वरू , मरुत् , इंद्र आदि देवतांनी यातुविद्येत सहाय्य केल्याचा उल्लेख अथर्ववेदात येतो .  अथर्ववेदातील मंत्र इतके प्रभावी मानले जातात की त्यांचा योग्य प्रकारे वापर केला असता त्यांच्यातील ब्रह्मन् शक्ती जागृत होते आणि देवतांच्या मनात असो नसो याचकाची कोणतीही बरी वाईट मनोकामना त्यांना पूर्ण करावी लागते .

 

अथर्ववेदातील सूक्तांची खालील प्रमाणे १० वर्गात विषयवार मांडणी करता येते .... 

१-पौष्टीकानि सूक्ते ( पुष्टी देणारे )

भृगु आणि अथर्व ऋषींनी लिहिलेले मंत्र यात आहेत . कष्टकरींना बळ देणारी , आयुर्वर्धक , शारीरिक पुष्टी देणारी . तसेच श्रमजीविंसाठीची सूक्ते जसे कि योग्य प्रमाणात वृष्टी होवो , हिंस्र श्वापद त्रास न देवो , समस्या संकटे दूर होवो , आपल्या व्यवसायात आदर मान आणि यश मिळो या अर्थाची सूक्ते इथे येतात . तसेच व्यापार आणि कृषी विषयक कर्मे , ध्युतकर्मे आणि अभ्युदय मंत्र ज्यात आयु , प्राण , कीर्ती , द्रव्य आणि पशूंची प्रार्थना केली जाते अशी अनेक सूक्ते या विभागात येतात .

 

२- भेषज्यानि सूक्ते (आयुर्वेदाचा उगम)

ह्या विभागातील सूक्तात आजच्या आयुर्वेदाचा उगम आहे असे मानले जाते . इथे गंधर्व आणि अप्सरांमुळे होणारे रोग (मानसिक) तसेच पिशाच्च आणि राक्षसांमुळे होणाऱ्या रोगांवर उपाय म्हणून अग्नीची उपासना सांगितलेली आहे .

आधि (मानसिक) आणि व्याधि (शारीरिक) हे दोन प्रकारचे रोग त्या काळी मानले जायचे आणि कोणत्याही व्याधिचे मुख्य कारण आधि आहे असे म्हटले आहे .

ह्या विभागात अनुवंशिक त्वचा रोग , कृमिजन्य रोग इत्यादींवर उपाय सांगितले आहेत . अजश्रुंगी , गुग्गुळ (सांधेदुखी) करीरा (कडू किराइत कृमी नष्ट करण्यासाठी) , पथा  आयुवृद्धी साठी ह्याचा ताईत वापरावा असे म्हटले आहे ) भृंगराज (केशवर्धन) शंखपुष्पी (प्रेमवृद्धी) , पिंपळी , दुर्वा , ज्येष्ठमध अशा असंख्य वनस्पतींची त्यांची गुणधर्मासकट माहिती दिली आहे .

विविध वृक्षांच्या साली , फळ , पान , फुलं वापरून रत्न किंवा मणी (ताईत) कसे बनवायचे आणि ते धारण कसे करायचे त्याचे विधी दिले आहेत .

ह्या विभागात ज्वर (ताप) , तक्मन् (शक्तिपात) यक्ष्मा (न्युमोनिया) राजयक्ष्मा (advance TB) उदरशूल (वरुणाच्या कोपामुळे होणारा रोग) मस्तकशूल (रुद्राच्या कोपामुळे होणारी तीव्र वेदना) . विविध विषबाधांपासून वाचण्याचे उपाय देखील या विभगात येतात .

तसेच बाळाचे चौलकर्म (तिसऱ्या महिन्यात जावळ काढणे) आणि त्याचे उपनयन संस्कार यांचीहि सविस्तर माहिती याच विभागात दिलेली आहे .

 

३- आयुष्य कर्मे

या विभागात विविध व्याधींचा प्रतिकार करून आयुर्वर्धन कसे करावे त्या संबंधीची सूक्ते आहेत . मृत्युच्या १०१ प्रकारांपासून संरक्षण मिळवण्यासाठीच्या प्रार्थना इथे दिल्या आहेत . अग्नी हे जिवंतपणाचे प्रतिक असल्याने बहुतेक सूक्तात अग्नीला महत्त्व दिलेले आहे .

 

४- प्रायश्चित्तानि सूक्ते

या विभागात गर्भपात , पाप , हत्या वगैरे झाल्यास तसेच अशुभ स्वप्न , अमंगल सूचना किंवा अपशकुन इत्यादींपासून वाचण्यासाठी उपाय सांगितले आहेत .

त्या काळी कायदा , दंड याविषयी शासनपध्दति जास्त विकसित झाली नव्हती . एखाद्या चुकीमुळे त्या व्यक्तीच्या मनात कायम नकारात्मक भावना निर्माण होऊन त्याचा त्याच्या आयुष्यावर किंवा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून हे प्रायश्चित्त विधी सांगिलेले आहेत .


५- राजकर्माणि सूक्ते

ह्या विभागातील सूक्तात राजाची कर्तव्ये , त्याचे यश , शक्ती , लोकप्रियता कीर्ती वृद्धिंगत व्हावी म्हणून . तसेच त्याच्या एकूणच समृद्धी साठीची सूक्ते आहेत .

या विभागात अनेक दानसूक्ते सुद्धा आहेत . तसेच वेगवेगळ्या कथा आणि भेषज्यानि विभागातील मणी धारण करायचे विधी इथे परत दिलेले आहेत .

  

६- तत्त्वचिंतनात्मक सूक्ते

प्रसिध्द असे पृथुवेनस्य ब्रह्मसाक्षात्कारसूक्तम् याच विभागात आहे . विश्वाचं मूळ हे काळ्या जादूत असल्याचं इथे म्हटलं आहे . काळ हेच सृष्टीचं मूळ आहे .

जगाची उत्पत्ती वृषाभातून झाली असं म्हटलं आहे . वृषभाला इथे सूर्य आणि इंद्राचे प्रतिक मानले आहे . 


७- अभिचारकर्माणि सूक्त

यात अनेक अघोरी उपाय दिलेले आहेत . या विभागातील मंत्रांची भाषा अत्यंत निष्ठुर असून थोडी दुर्बोधहि आहे .

शत्रूला त्रास व्हावा त्याचा नाश व्हावा अशा अर्थाची सूक्ते इथे आहेत .

सुप्रसिध्द सपत्नीनाशनसूक्त ज्याचा उच्चार स्वप्नवासवदत्ता नाटकात आला आहे ते याच विभागात येते .

उशाखाली विशिष्ट वनस्पती ठेऊन पुरुषाला दुसऱ्या स्त्रीपासून दूर करणे , स्त्री किंवा पुरुषाचे मन जिंकण्याचे मार्ग , त्यांना वांझ करण्याचे उपाय इत्यादी अनेक विषय या विभागात येतात .

चेटूक करणार्यांचा प्रतिकार करण्याचे मंत्र सुद्धा यात दिले आहेत .

 

८- स्त्रीकर्माणि सूक्ते

स्त्री जीवनाशी निगडीत अनेक विषयांवरील सूक्ते या विभागात आहेत .

कुमारिकेस वरप्राप्ती , गर्भसंभव , गर्भाचे व मातेचे संरक्षण , तसेच स्त्री पुरुषांचे प्रणय मंत्र सुद्धा याच भागात आहेत .

इच्छित स्त्री किंवा पुरुष लाभावा म्हणून करायचे उपाय दिले आहेत . प्रेमातील आपल्या प्रतीस्पर्ध्याचा नाश करण्याचे उपाय इथे आहेत .

त्या सर्व मंत्रात पराकोटीची असूया आणि चीड स्पष्ट दिसते . पापनक्षत्रावर जन्मलेल्या मुलाच्या बाबतीत करायची शांतिकर्मे सुद्धा याच विभागात दिलेली आहेत .

 

९- सांमनस्यकर्माणि सूक्ते

कुटुंबात प्रेम सलोखा नांदण्यासाठी , कलह नष्ट करण्यासाठी आणि सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठीचे उपाय या विभागातील सूक्तात येतात .


१०- ब्राह्मण महात्म्य सूक्ते

इथे ब्राह्मणांना हितकारक अशा प्रार्थना दिल्या आहेत . ब्राह्मणांना देव हि उपाधी इथे दिलेली आढळते .

ब्राह्मणाचा छळ करणे किंवा ब्राह्मण हत्या ह्यांना महापाप म्हटले आहे .

यशप्राप्ती , मेधावर्धन या विषयक ब्राह्मणांच्या प्रार्थना इथे येतात . पण काही अभ्यासकांच्या मते ह्या विभागातील मंत्राचा काळ अर्वाचिन मानला गेला आहे .

 

गोपथ ब्राह्मणानुसार सर्पवेद , पिशाचवेद , असुरवेद , इतिहासवेद आणि पुराणवेद हे अथर्ववेदाचे पाच उपवेद मानले जातात .

गृह्यसूत्र , धर्मसूत्र इत्यादी विविध सूत्रग्रंथांचा उगम देखील अथर्ववेदात झाला असे अभ्यासकांचे मत आहे .

 

अथर्व वेदातील अभिचार मंत्रांमुळे बराच काळ या वेदाला प्रतिष्ठा प्राप्त झाली नव्हती .

पण अथर्ववेदातील विषयांचे वैविध्य पहिले तर त्याचे महत्त्व सहज लक्षात येते . वैदिक काळातील आर्यांच्या सर्व सामान्य जीवनाचे प्रतिबिंब यात दिसते .

त्या काळी प्रचलित असलेल्या लोकसमजुती आणि लोकाचार कळतो .

गर्भधारणेपासून अंत्येष्टी पर्यंतचे सारे काही अथर्ववेदात सापडते . मानवी जीवनातील एकूण एक पैलू इथे चर्चिला गेलेला आहे .

त्या काळचा समाज , त्यांच्या चाली रिती , रूढी रिवाज , समाजाची दुसरी व्यावहारिक बाजू ह्या वेदात उत्तम रित्या अभ्यासता येते .

अथर्ववेदातील या माहितीचा मानवशास्त्र आणि देवविषयक कल्पनांचा इतिहास यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे असे विद्वानांचे मत आहे .

 

नयना पिकळे

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, तृतीय अंश, त्रयोदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 3 , Adhyay 13

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ तृतीयः अंशः ॥ त्रयोदशोऽध्यायः ॥   आभ्युदयिक श्राद्ध , प्रेतकर्म तथा श्राद्धादि विचार और्व उवाच सचैलस्य पितुः ...