मेघदूत पार्श्वभूमी –
आज आषाढ महिना सुरू होत आहे .
आजही आषाढ महिन्याचा प्रथम दिवस म्हटला की फक्त भारतातीलच नाही तर समस्त विश्वातील खऱ्या साहित्य प्रेमींना आवर्जून आठवण होते ती मेघदूताची .
मेघदूत – एक अजरामर दूतकाव्य . महाकवी कालिदासाने रचलेलं हे महाकाव्य म्हणजे अलका नगरीत राहणाऱ्या एका यक्षाचा संदेश .
कुठे होती ही अलकानगरी ? आपल्या पौराणिक कल्पनेनुसार आठ दिशांचे आठ अधिपती मानले आहेत जे अष्टदिक्पाल म्हणून ओळखले जातात . उत्तर दिशेचा अधिपती आहे कुबेर . कुबेर हा यक्ष , गंधर्व आणि किन्नारांचा राजा असून हिमालय पर्वतावरील अलकानगरी त्याची राजधानी मानली जाते .
कुबेराचा सेवक असलेल्या ह्या यक्षाच्या एका चुकीमुळे त्याला आपल्या पत्नीपासून वर्षभर दूर राहायचा शाप मिळालेला आहे . आणि शापित काळ भोगत असताना आषाढ महिन्याच्या पहिल्याच दिवशी त्याला एक मेघ दिसतो आणि त्या मेघाला दूत बनवून तो यक्ष आपल्या प्रियतमेला संदेश पाठवतो .
यक्षाने अशी कोणती अक्षम्य चूक केली होती की त्याला एवढी कठोर शिक्षा मिळाली ?
तर याच अलकानगरीत चैत्ररथ नावाचे एक विशाल उद्यान होते . ऋतू कोणताही असो , वर्षभर हे उद्यान दिव्य अलौकिक सुगंधी फुलांनी बहरलेले असे . चैत्ररथ उद्यानात शीतल जलाने आणि नयनरम्य कमलपुष्पांनी भरलेले एक रम्य सरोवर होते . रोज पाहटे ह्याच सरोवरातील ताजी कमलपुष्पे देवपूजेसाठी कुबेराच्या महालात जात असत .
आणि रोज ही ताजी पुष्पे आणण्यासाठी कुबेराने ह्या यक्षाला नेमले होते .
आपल्या कर्तव्यात कोणतीही कसूर न करता यक्ष अत्यंत प्रामाणिकपणे हे काम दररोज करत असे .
पण काही काळानंतर यक्षाचा विवाह झाला . आपल्या नवविवाहित पत्नीसोबत संपूर्ण रात्र सुखात घालवल्यावर पहाटे तिच्यापासून विलग होऊन कमळे काढायला उद्यानात जाणे यक्षाच्या जीवावर येऊ लागले .
तेव्हा यक्षाला एक कल्पना सुचली . तो पहिल्या दिवशी संध्याकाळीच सरोवरातील कमळे तोडून ठेवू लागला . काही दिवस सारे काही सुरळीत चालले .
एके दिवशी मात्र यक्षाची हीच चलाखी त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या वियोगाचे कारण बनली .
एका संध्याकाळी तोडलेल्या एका कमळात रात्रभर एक भुंगा अडकला .
पहाटे यक्षाने वेळेवर कुबेराला पूजेसाठी कमळे पोहोचवली . कुबेराने जेव्हा भुंगा असलेले कमळ उचलले तेव्हा भुंग्याने कुबेराच्या बोटाला जोरात दंश केला .
काय झाले असावे हे चाणाक्ष कुबेराच्या लक्षात आले आणि त्याने यक्षाकडूनच सारे काही वदवून घेतले .
यक्षाने फुले आदल्या दिवशी का तोडली हे कळल्यावर मात्र कुबेर संतापला आणि त्याने यक्षाला शाप दिला कि “ज्या प्रियेपासून दूर व्हावे लागू नये म्हणून तू आपल्या रोजच्या कर्तव्यात दिरंगाई केलीस त्याच प्रियेपासून तू एक वर्ष दूर राहशील व तुझ्या सिद्धींनाही मुकशील .”
आणि अशाप्रकारे वर्षभराचा विरह काळ कंठण्यासाठी यक्ष आपले अलकानगरीतील घर आणि आपल्या प्रिय पत्नीला सोडून अलकानगरी पासून खूप दूर असलेल्या रामगिरी आश्रमात राहू लागला .
अशाप्रकारे विरहाचे जवळ जवळ आठ महिने गेल्यावर यक्ष एके दिवशी एका पर्वत शिखरावर उदास मनस्थितीत बसला असता त्याला एक मेघ दिसला आणि त्याच्या भावना अनावर झाल्या .
अनेक महिने घडलेल्या प्रियेच्या वियोगामुळे यक्ष इतका व्याकूळ विमनस्क झाला होता की हा निर्जीव मेघ सजीव दूताचे काम कसे करेल हा प्रश्न देखील त्याच्या मनाला शिवला नाही .
यक्षाने त्या मेघालाच जिवलग मित्र मानून आपले मनोगत सांगितले आणि त्याच्याकडे मोठ्या विश्वासाने आपल्या प्रिय पत्नी साठी निरोप पाठवला ….
हीच आहे महाकवी कालिदास विरचित मेघदूत ह्या समस्त विश्वाला भुरळ पडलेल्या काव्याची पार्श्वभूमी .....
मेघदूत काव्य पूर्वमेघ आणि उत्तरमेघ अशा दोन भागात विभागले गेले आहे .
यक्षाची केविलवाणी मनस्थिती , तो शापितकाळात राहत असलेल्या ठिकाणाहून अलकानगरी पर्यंतचा त्याने मेघाला सांगितलेला अचूक भौगोलिक मार्ग, मार्गातील वने , पर्वत , नद्या , शेती , प्राणी , फुले , निसर्ग यांची अत्यंत मनोरम वर्णने पूर्वमेघात येतात .
तर उत्तरमेघात पूर्णपणे काल्पनिक असलेल्या अलकानगरीचे , यक्षाच्या घराचे आणि यक्षपत्नीचे अलौकिक मंत्रमुग्ध करणारे वर्णन येते .
तर आपण संपूर्ण मेघदूत त्यातील संस्कृत श्लोक व त्यांचे मराठीतून अर्थ अशा पद्धतीने समजून घ्यायचा प्रयत्न करुया.
मेघदूत - पूर्वमेघ
कश्चित् कान्ताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्तः
शापेनास्तङ्गमितमहिमा वर्षभोग्येण भर्तुः ।
यक्षश्चक्रे जनकतनयास्नानपुण्योदकेषु
१ – ( रामगिरी ह्या स्थानाविषयी आजही मतभेद आहे . काही अभ्यासकांच्या मते हे ठिकाण म्हणजे मध्यप्रदेशातील चित्रकूट पर्वत तर काही इतिहास संशोधकांच्या मते रामगिरी म्हणजे महाराष्ट्रातील नागपूर मधील रामटेक हे आहे ). तर ह्या महाकाव्यातील यक्ष आपली शिक्षा भोगण्यासाठी रामगिरी येथे राहात होता. इथल्या सौभाग्यशाली जलाशयाला जनक कन्या जानकीच्या स्नानाचे भाग्य लाभल्याने तीर्थाचे पावित्र्य प्राप्त झाले होते . इथले जल शीतल , निळेशार, जीवनदायी होते . इथे स्निग्ध घनदाट छाया देणारे असंख्य विशाल वृक्ष होते . इथे ऋषी आपल्या हातांनी हरिणांना अतिशय प्रेमाने निवार धान्य भरवित असत . हत्तींची पिल्ले एकमेकांसोबत खेळत असत . हरीणांचे कळप निवांतपणे इकडून तिकडून नाचत बागडत असत . ह्याच रामगिरी पर्वतावरील एका आश्रमात एक शापित यक्ष राहत होता . आपल्या कांतेच्या मोहामुळे उन्मत्त होऊन कर्तव्याला चुकलेला , आपल्या सर्व सिद्धी गमावल्यामुळे निष्प्रभ झालेला तो यक्ष , संपूर्ण एक वर्षाच्या वियोगाचा शाप भोगण्यासाठी रम्य अलकानगरीतील आपल्या घरापासून दूर , दुःखात आपले दिवस कंठत होता .
तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्तः स कामी
नीत्वा मासान् कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः ।
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ॥ २॥
२ - प्रिय पत्नीच्या वियोगामुळे त्या कामातूर यक्षाची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती . तिच्या विरहात तो इतका रोडावला की त्याचा चेहरा फिकट पडला होता . गालही आत गेले होते . त्याची मनगटे देखील इतकी बारीक झाली होती की त्याच्या हातातील सोन्याचे कडे वारंवार पार कोपरापर्यंत मागे जात असल्याने मनगट मोकळे वाटत असे . अशा स्थितीत त्या यक्षाने रामगिरी पर्वतावर काही महिने घालवले . असाच एकदा आषाढ महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच पहिल्याच दिवशी तो यक्ष शून्यमनस्क अवस्थेत पर्वतावर बसला होता . सूर्य पश्चिमेकडे झुकला होता , आकाशात सर्वत्र मळभ दाटून आले होते . गार आल्हाददायक वारा सुटला होता . पानांची सळसळ , पक्ष्यांची किलबिल , जवळच वाहणाऱ्या नदीचा खळाळता आवाज .... यक्षाचं मन आज काही केल्या थाऱ्यावर नव्हतं . एक वेगळीच हुरहुर त्याला लागली होती . पत्नीसोबत घालवलेले ते आनंदी दिवस त्या रम्य रात्री त्याला सारख्या आठवत होत्या .
तो दिवस त्याला अगदी लख्खं आठवत होता .... त्या दिवशी ती चूक झालीच नसती तर ? कदाचित आज ह्या धुंद क्षणी त्याची प्रिया त्याच्या आलिंगनात असती ....
अशाच रम्य आठवणीत यक्ष भोवतालचे भान विसरला होता . आपल्या कल्पनाविश्वात रमला होता . की अचानक गिरीतटाला अगदी बिलगलेला एक प्रचंड कृष्ण वर्णाचा मेघ त्याला दिसला . आपल्या वक्र सुळ्यांनी पर्वतशिखराला ढुशा देत , क्रीडेसाठी आतुर असलेल्या , खाली वाकलेल्या एखाद्या देखण्या दिमाखदार गजराजासारखा तो मेघ त्या यक्षाला भासला .
तस्य स्थित्वा कथमपि पुरः कौतुकाधानहेतोः
अन्तर्बाष्पश्चिरमनुचरो राजराजस्य दध्यौ ।
मेघालोके भवति सुखिनोऽप्यन्यथावृत्ति चेतः
कण्ठाश्लेषप्रणयिनि जने किं पुनर्दूरसंस्थे ॥ ३॥
३ – अशा धुंद ओल्या वातावरणात मेघाला पाहिल्यावर आपली प्रिय व्यक्ती जवळ असणाऱ्या सुखी माणसाच्या हृदयाची देखील चलबिचल होते . मग ज्याची सखी त्याच्या पासून दूर आहे अशा व्याकूळ झालेल्या , तिला मिठी मारण्यास अत्यंत उत्सुक असलेल्या यक्षाची अवस्था किती दीनवाणी झाली असेल याची कल्पनाही करवत नाही . एकाकी , विरही , दुखाने भारावून गेलेला असा तो कुबेराचा सेवक, मिलनाची उत्सुकता वाढवणाऱ्या त्या मेघाला काही क्षण न्याहाळत राहिला . अचानक त्या यक्षाच्या मनात काय आले कोणास ठाऊक . आपल्या प्रियेच्या आठवणीने डोळ्यातून अविरत गळणारे अश्रू त्याने अत्यंत कष्टाने आवरले आणि अंगात त्राण नसतानाही कसाबसा तो यक्ष त्या मेघासमोर जाऊन उभा राहिला .
प्रत्यासन्ने नभसि दयिताजीवितालम्बनार्थी
जीमूतेन स्वकुशलमयीं हारयिष्यन् प्रवृत्तिम् ।
स प्रत्यग्रैः कुटजकुसुमैः कल्पितार्घाय तस्मै
प्रीतः प्रीतिप्रमुखवचनं स्वागतं व्याजहार ॥ ४॥
४ – श्रावण जवळ आल्याने आपली कांता देखील आपल्या विरहामुळे आपल्यासारखीच व्याकूळ झालेली असणार ... तिला चार धीराचे शब्द सांगून तिचे सांत्वन केलेच पाहिजे आणि त्यासाठी ह्या मेघा सोबत संदेश पाठवला पाहिजे . ह्या एकमेव विचाराने यक्षाच्या मनाचा कब्जा घेतला . सर्व प्रथम यक्षाने त्या मेघाचे प्रियाराधन केले . त्याला आळवले, आपल्या दोन्ही ओंजळीत बाजूलाच पर्वतावर फुललेली ताजी टवटवीत कुड्याची फुलं घेतली आणि यक्षाने त्या मेघाला अर्घ्य दिले . अत्यंत गोड हसून , मधुर शब्दांनी आणि प्रसन्न मनाने त्याचे स्वागत केले .
धूमज्योतिः सलिलमरुतां संनिपातः क्व मेघः
संदेशार्थाः क्व पटुकरणैः प्राणिभिः प्रापणीयाः ।
इत्यौत्सुक्यादपरिगणयन् गुह्यकस्तं ययाचे
कामार्ता हि प्रकृतिकृपणाश्चेतनाचेतनेषु ॥ ५॥
५ – पाणी , वाफ , वारा , धूर , अग्नी , वीज यापासून निर्माण झालेला तो मेघ . संदेश पोचवण्याचं काम करायला खरंतर कोणत्यातरी सचेतन प्राण्याची गरज असते . पण यक्ष आपल्या पत्नीच्या आठवणीत इतका कामातुर झाला होता की हा अचेतन मेघ आपला संदेश कसा पोचवेल हा विचार एक क्षण देखील त्याच्या मनात आला नाही . प्रेमात पडलेल्या माणसाला चेतन अचेतनाच्या तारतम्याच्या विवेकाचं भान नसतं हेच खरं . अत्यंत काकुळतीला येऊन विनम्रपणे यक्ष मेघा समोर उभा राहून म्हणतो …
जातं वंशे भुवनविदिते पुष्करावर्तकानां
जानामि त्वां प्रकृतिपुरुषं कामरूपं मघोनः ।
तेनार्थित्वं त्वयि विधिवशाद्दूरबन्धुर्गतोऽहं
इथून यक्षाचं स्वगत सुरु होतं …..
६ - हे पुष्कर आवर्तकाच्या थोर प्रसिद्ध कुळात जन्मलेल्या मेघा , तू मनाला येईल ते रूप धारण करू शकतोस . तू साक्षात देवराज इंद्राचा प्रमुख अधिकारी आहेस . तू अत्यंत उदार मनाचा आहेस , तू आपल्या वृष्टीने पृथ्वीला सस्य शामला करतोस . तू अत्यन्त गुणवान आहेस . तुझ्या ह्या थोरवीमुळेच अत्यंत दुर्दैवी असा कांतेच्या विरहाने दुःखीकष्टी झालेला मी आज तुझ्याकडे एक याचना करणार आहे . तू माझी याचना अव्हेरलीस तरी चालेल कारण असं म्हणतात की एखाद्या नीच माणसाकडून उपकृत होण्यापेक्षा सज्जन माणसाकडून पदरी पडलेली उपेक्षा बरी असते . पण मला माहित आहे की तू मला निराश नक्कीच करणार नाहीस .
संतप्तानां त्वमसि शरणं तत् पयोद प्रियायाः
संदेशं मे हर धनपतिक्रोधविश्लेषितस्य ।
गन्तव्या ते वसतिरलका नाम यक्षेश्वराणां
बाह्योद्यानस्थितहरशिरश्चन्द्रिकाधौतहर्म्या ॥७॥
७ - हे मेघा , रखरखीत उन्हात तापलेल्या आणि विरहाच्या आगीत जळणाऱ्या जीवांना शांत करणारा असा तू जलद आहेस . मी देखील एक पिडीतच आहे . माझ्या स्वामीने क्रोधीत होऊन मला शाप दिला आहे ज्यामुळे मी माझ्या पत्नीच्या विरहाग्नीत पोळून निघतो आहे . माझा संदेश माझ्या प्रियेपर्यंत पोचवशील ना ? तू इतरांसारखाच माझाही ताप शांत करशील याची मला पूर्ण खात्री आहे . कैलास पर्वतावर कुबेराची अलका नावाची अत्यंत मनोरम नगरी आहे . नगरीच्या वेशीवरच एक रम्य अलौकिक असे उद्यान आहे . तिथे भगवान शिवांचे वास्तव्य आहे . शंकराच्या मस्तकावरील चंद्रकलेमुळे फुललेल्या चांदण्याने या नगरीतील भवने उजळलेली आहेत . ही झगमगणारी अलका नगरी तुला सहज ओळखता येईल . तुला तिथे जाऊन माझ एक काम करायचं आहे .
त्वामारूढं पवनपदवीमुद्गृहीतालकान्ताः
प्रेक्षिष्यन्ते पथिकवनिताः प्रत्ययादाश्वसन्त्यः ।
कः संनद्धे विरहविधुरां त्वय्युपेक्षेत जायां
न स्यादन्योऽप्यहमिव जनो यः पराधीनवृत्तिः ॥८॥
८ - तुझं दर्शन हे प्रेमीजनांसाठी अतिशय सुखकर अशी खूण आहे . तू आकाशात इथे तिथे संचार करू लागलास की मार्गातील वनिता आपल्या डोळ्यांवर येणाऱ्या भुरभुरणाऱ्या केसांच्या बटा मागे सारून तुझ्याकडे आशेने पाहू लागतील . आपला प्रिय पति दूर असल्याने त्यांनी आपल्या केसांना तेल लावले नसणार , वेणी फणी केलेली नसणार . तुझं आगमन म्हणजे दूर देशी गेलेल्या आपल्या प्रियकराचे आगमन हे ओळखून त्या खुश होतील . कारण वर्षाऋतूत कोणीही सहसा आपल्या पत्नीपासून दूर राहून आपल्या विरहाने दुःखी होणार्या आपल्या पत्नीची हेळसांड करत नाही . केवळ मीच एकटा असा अभागी आहे जो ह्या वर्षाऋतूत माझ्या प्रियेपासून दूर असेन . माझ्याएवढा पराधीन आणि दुःखी या जगात दुसरा कोणी असणं अशक्यच .
मन्दं मन्दं नुदति पवनश्चानुकूलो यथा त्वां
वामश्चायं नदति मधुरं चातकस्ते सगन्धः ।
गर्भाधानक्षणपरिचयान्नूनमाबद्धमालाः
सेविष्यन्ते नयनसुभगं खे भवन्तं बलाकाः ॥९॥
९ - तुला अनुकूल असलेला अत्यंत सुखद शीतल पवन जसजसा तुला हळूहळू पुढे पुढे नेईल तसतसा तुला आल्हाद होईल . तुला पाहताच पाण्याचा एक तरी थेंब चोचीत पडावा म्हणून उत्सुक झालेला उन्मत्त चातक तुझ्या डाव्या बाजूला कूजन करत तुझी मनधरणी करू लागेल . तुझे दर्शन म्हणजेच गर्भाधानाचा काळ जवळ आल्याची सूचना हे जाणून तुला पाहताच आकाशातील बगळे खुश होतील . त्यांच्या डोळ्यातून आनंदोत्सव ओसंडून वाहू लागेल आणि लगबगीने ते तुझ्याभोवती फेर धरून तत्परतेने तुझी सेवा करू लागतील .
तां चावश्यं दिवसगणनातत्परामेकपत्नीं
अव्यापन्नामविहतगतिर्द्रक्ष्यसि भ्रातृजायाम् ।
आशाबन्धः कुसुमसदृशं प्रायशो ह्यङ्गनानां
सद्यःपाति प्रणयि हृदयं विप्रयोगे रुणद्धि ॥१०॥
१० - हे मेघा , वाटेत कोणतेही विघ्न न येता तुझा प्रवास अगदी सहज विनासायास होईल . अलका नगरीत पोचल्यावर तू पाहशील की मी नसल्याने कोमेजून गेलेली माझी पतिव्रता पत्नी अत्यंत दुखी अंतकरणाने विरहाचे शेवटचे दिवस मोजत बसलेली असेल . आमचे लवकरच पुन्हा मिलन होईल ह्या एकमेव आशेवर ती चिवटपणे तग धरून असेल . स्त्रियांचे हृदय कोमल फुलासारखे असते . तीव्र दुख ते सहन करू शकत नाही . अशावेळी केवळ पुनर्भेटीची आशाच त्यांना सावरायला मदत करते . तिने आपल्या हृदयाला कसंबसं समजावलं असणार .
कर्तुं यच्च प्रभवति महीमुच्छिलिन्ध्रामवन्ध्यां
तच्छ्रुत्व ते श्रवणसुभगं गर्जितं मानसोत्काः ।
आ कैलासाद् बिसकिसलयच्छेदपाथेयवन्तः
११ - कानांना अतिशय गोड वाटणाऱ्या तुझी गर्जना ऐकून वसुंधरेच्या गर्भातून कोवळे अंकुर तुला पाहायला उत्सुकतेने हळूच बाहेर डोकावतील . भूमी आळंब्यांनी आच्छादून जाईल आणि तिचे वांझपण संपेल . केवळ तुझ्याच मुळे तिला सुपीक झाल्याचा आनंद भोगता येईल . हे मेघा , ह्या एवढ्या लांबच्या प्रवासात तुला एकटं एकाकी अजिबात वाटणार नाही . कारण तुझा आवाज ऐकून राजहंस सुद्धा मानससरोवराकडे जायला अधीर उत्सुक होतील . कमल तंतुंच्या नाजूक देठांची शिदोरी बरोबर घेऊन ते आकाशात तुझी पार कैलासा पर्यंत सोबत करतील .
आपृच्छस्व प्रियसखममुं तुङ्गमालिङ्ग्य शैलं
वन्द्यैः पुंसां रघुपतिपदैरङ्कितं मेखलासु ।
काले काले भवति भवतो यस्य संयोगमेत्य
स्नेहव्यक्तिश्चिरविरहजं मुञ्चतो वाष्पमुष्णम् ॥ १२॥
१२ - हा रामगिरी पर्वत तुझा अत्यंत प्रिय सखा आहे . ह्या पर्वताच्या तटांवर विश्ववंद्य प्रभू श्रीरामांच्या चरणकमळांच्या पवित्र खुणा उमटल्या आहेत . दर वर्षाऋतुत तू तुझ्या प्रिय सख्या पर्वताला प्रेमभराने आलिंगन देतोस . तुमच्या ह्या मिलनाच्या वेळी पर्वतांवरील वृक्षांच्या पानावरून आनंदाश्रू ओघळतात . हे जलबिंदू जमिनीवर पडले की जमिनीतून उष्ण वाफा निघतात . वर्षभराच्या दीर्घकालीन विरहामुळे ढाळलेले ते दुखाश्रूच असतात . तुमच्या एकमेकांवरच्या स्नेहाचेच हे प्रतिक आहे . म्हणून अत्यंत जिवलग अशा या उत्तुंग रामगिरी पर्वताला एकदा कडकडून भेट , त्याला आलिंगन दे आणि त्याचा प्रेमपूर्वक निरोप घे .
मार्गं तावच्छृणु कथयतस्त्वत्प्रयाणानुरूपं
संदेशं मे तदनु जलद श्रोष्यसि श्रोत्रपेयम् ।
खिन्नः खिन्नः शिखरिषु पदं न्यस्य गन्तासि यत्र
क्षीणः क्षीणः परिलघु पयः स्रोतसं चोपभुज्य ॥ १३॥
१३ - हे मेघा माझ्या पत्नीसाठी अतिशय गोड असा संदेश मी तुला देणार आहे . पण संदेश आधी सांगितला तर कदाचित तू विसरशील म्हणून आधी तुला अलकानगरी पर्यंत जाण्याचा योग्य सोयीस्कर असा मार्ग सांगतो . प्रवासातील ओळखीच्या खुणा आणि माहिती सुद्धा देतो . वाटेत तुला अनेक दुसरे पर्वत लागतील . जर प्रवासात तू दमलास तर त्या पर्वतांवर काही काळ विश्रांती घे . तहान किंवा भुकेने व्याकूळ झालास तर तिथल्या नद्या झऱ्यांचे पाचक पथ्यकर पाणी पिऊन ताजातवाना हो आणि मगच पुढची वाट धर .
अद्रेः शृङ्गं हरति पवनः किं स्विदित्युन्मुखीभिर्
द्र्ष्टोत्साहच्चकितचकितं मुग्धसिद्धाङ्गनाभिः ।
स्थानादस्मात् सरसनिचुलादुत्पतोदङ्मुखः खं
दिङ्नागानां पथि परिहरन् स्थूलहस्तावलेपान् ॥ १४॥
१४ - वाऱ्याच्या जोरा बरोबर तू देखील हळूहळू पुढे ढकलला जाशील . तुझ्या वेगावरून वाऱ्याच्या प्रचंड वेगाचा अंदाज जेव्हा वाटेवरील अल्लड स्त्रियांना होईल तेव्हा त्या अचंबित होतील . तू एखादे अवाढव्य पर्वताचे शिखर उपटशील की काय अशी भीती त्यांना वाटेल आणि संदेश पोचवण्याची तुझी तळमळ व तत्परता पाहून त्या आश्चर्यचकित होतील . अशावेळी रसरशीत अशा वेळूंच्या बेटांवरून उत्तरेला पुष्ट गजांच्या सोंडाचे प्रहार चुकवत वेगाने आकाशात झेप घे . तुझा विशाल महाकाय देह आणि प्रचंड वेग पाहून ते गर्विष्ठ दिग्गज देखील मनातून नक्कीच लाजतील .
रत्नच्छायाव्यतिकर इव प्रेक्ष्यमेतत् पुरस्ताद्
वल्मीकाग्रात् प्रभवति धनुष्खण्डमाखण्डलस्य ।
येन श्यामं वपुरतितरां कान्तिमापत्स्यते ते
बर्हेणेव स्फुरितरुचिना गोपवेशस्य विष्णोः ॥ १५॥
१५ - प्रवासात इंद्रधनुष्य दिसणं हे शुभचिन्ह मानतात . हे मेघा तुलाही प्रवास सुरु केलास की इंद्रधनुष्य नक्कीच दिसणार . पर्वत शिखरांच्या वारुळा आडून बाहेर पडणारा तो इंद्रधनुष्याचा पट्टा पाचू माणिक वैडूर्य आदि रत्नांच्या मिश्रित वर्णांमुळे अत्यंत विलोभनीय भासेल . उज्ज्वल अशा मोरपिसामुळे श्यामल गोपाल वेषधारी विष्णूचे रूप जसे खुलून दिसते तसेच त्या नानारंगी चमचमत्या इंद्रधनुच्या पट्ट्यामुळे तुझे सावळे रूप देखील अतिशय मनमोहक आकर्षक दिसेल .
त्वय्यायत्तं कृषिफलमिति भ्रूविलासानभिज्ञैः
प्रीतिस्निग्धैर्जनपदवधूलोचनैः पीयमानः ।
सद्यःसीरोत्कषणसुरभि क्षेत्रमारुह्य मालं
१६ - तुझ्या अगमानावरच शेतीचं उत्तम फळ अवलंबून असतं . मादक नेत्र कटाक्ष आदि विलासात पूर्णपणे अनभिज्ञ असलेल्या शेतकऱ्याच्या निरागस भोळ्या स्त्रिया आपल्या प्रेमाने ओतप्रोत नजरांनी आकाशाकडे अगदी टक लावून तुझी वाट पाहत असलेल्या तुला दिसतील . तूच सर्वस्वी त्यांचा अन्नदाता आहेस . माळवा पठारावर नुकतीच नांगरणी झाली असेल आणि पहिल्या पावसाच्या जलधारांनी तिथल्या जमिनी मृदगंधाने सुगंधित झाल्या असतील . त्या पठारावर चढून पश्चिमेला वळून थोडासा पुढे जा आणि मग शीघ्रगतीने परत उत्तरेलाच गमन कर. वृष्टी केल्याने तुलाही आता खूप हलके आणि ताजेतवाने वाटेल .
त्वामासारप्रशमितवनोपप्लवं साधु मूर्ध्ना
वक्ष्यत्यध्वश्रमपरिगतं सानुमानाम्रकूटः ।
न क्षुद्रोऽपि प्रथमसुकृतापेक्षया संश्रयाय
प्राप्ते मित्रे भवति विमुखः किं पुनर्यस्तथोच्चैः ॥ १७॥
१७ - प्रवासात तू दमलास तरी आम्रकुटावरील वनातील वणवे विझवल्याने तू आम्रकूट पर्वताच्या सन्मानाला प्राप्त होशील . क्षुद्र माणूस देखील पूर्व उपकाराचे स्मरण ठेवून आपल्या मित्राला गरजेच्या वेळी आश्रय देतो . मग हा सद्गुणी उत्तुंग पर्वतराज तुला नक्कीच विन्मुख पाठवणार नाही . तो अत्यंत हर्षभरित होऊन तुला आपल्या मस्तकी धारण करेल आणि ही तुझ्यासाठी देखील खूप सन्मानाची गोष्ट आहे .
छन्नोपान्तः परिणतफलद्योतिभिः काननाम्रैः
त्वय्यारूढे शिखरमचलः स्निग्धवेणीसवर्णे ।
नूनं यास्यत्यमरमिथुनप्रेक्षणीयमवस्थां
मध्ये श्यामः स्तन इव भुवः शेषविस्तारपाण्डुः ॥ १८॥
१८ - रसरशीत पिकलेल्या , पाडाला आलेल्या आम्रफळांमुळे पर्वताच्या भोवतालचा भाग आमरायांनी पूर्णपणे आच्छादून गेला असेल . तुझा रंग देखील तेल लावलेल्या वेणीसारखा तुकतुकीत काळाभोर दिसेल . पलीकडे उत्तरेला जाताना तुला पर्वतशिखराला चिकटूनच जावे लागेल . जेव्हा तू शिखराच्या मधोमध येशील तेव्हा वसुंधरेच्या उरोजाप्रमाणे मध्ये काळसर आणि भोवती पिवळसर पांढरे असे अत्यंत मोहक दृश्य दिसेल . आकाशस्थ समग्र देव देवतांनी आपल्या स्त्रियांसमवेत पाहावं असं ते अवर्णनीय दृश्य असेल .
स्थित्वा तस्मिन् वनचरवधूभुक्तकुञ्जे मुहूर्तं
तोयोत्सर्गद्रुततरगतिस्तत्परं वर्त्म तीर्णः ।
रेवां द्रक्ष्यस्युपलविषमे विन्ध्यपादे विशीर्णां
भक्तिच्छेदैरिव विरचितां भूतिमङ्गे गजस्य ॥ १९॥
१९ - जंगलातील भिल्लिणी या आम्रकुटावरील तरू कुंजात सुखाने विहरत असतात क्रीडा करत असतात . त्यांच्या सोबत आम्रकुटावर थोडा वेळ विसावा घे . तिथे वृष्टी करून हलका हो म्हणजे पुढील प्रवासासाठी तुझा वेग वाढेल . आम्रकूट ओलांडून पुढे गेलास की पलीकडे विन्ध्य पर्वताच्या तळाशी खडकांमुळे उंच सखल असलेल्या भागात विखुरलेली नर्मदा नदी तुला दिसेल . काळ्याशार खडकातून जागोजागी फुटून वाहत असलेल्या नर्मदेच्या जलाचे शुद्ध पवित्र झोत गजांच्या शरीरावर काढलेल्या चित्र विचित्र सुरेख वेलबुट्टी प्रमाणे शोभून दिसतील .
तस्यास्तिक्तैर्वनगजमदैर्वासितं वान्तवृष्टिः
जम्बूकुञ्जप्रतिहतरयं तोयमादाय गच्छेः ।
अन्तःसारं घन तुलयितुं नानिलः शक्ष्यति त्वां
रिक्तः सर्वो भवति हि लघुः पूर्णता गौरवाय ॥ २०॥
२० - नर्मदेच्या प्रवाहात रानहत्तींचा स्वैर विहार चालू असतो . त्यांच्या मदाच्या उग्र दर्पाने नर्मदेचे जल सुगंधित झालेले असते . ठिकठिकाणी जांभूळवृक्षांनी नर्मदेचे जल अडवल्याने तिचा प्रवाह संथ झालेला दिसतो . हे मेघा तू नुकताच आम्रकुटावर केलेल्या वृष्टी मुळे हलका झालेला असशील . नर्मदेचे शांत शीतल सुगंधी जल पोटभर प्राशन कर आणि मगच पुढच्या प्रवासाला लाग . परत एकदा बळ प्राप्त झाल्यावर वारा तुला सहजासहजी उडवून लावू शकणार नाही . जो जो रिक्त असतो तो क्षुद्र ठरतो . पूर्णता असेल तरच गौरवास्पद वागणूक मिळते .
नीपं दृष्ट्वा हरितकपिशं केषरैरर्धरूढैः
आविर्भूतप्रथममुकुलाः कन्दलीश्चानुकच्छम् ।
जग्ध्वारण्येष्वधिकसुरभिं गन्धमाघ्राय चोर्व्याः
२१ - तू केलेल्या पहिल्या वहिल्या वृष्टी मुळे वनात व नदीकाठी वावरणारे भुंगे व इतर पशु पक्षी प्रसन्न झालेले असतील . पावसांच्या आल्हाददायक सरींमुळे कदंबाच्या पुष्पांतील अर्धवट उगवलेल्या हिरव्या पिवळ्या केशरातील मधु चाखत भुंगे ह्या फुलावरून त्या फुलावर भ्रमण करत असतील . नदीकाठावरील पाणथळ प्रदेशात उगवणाऱ्या रानकेळीची पहिली कोवळी केळफुले खातखात हरीणांचे कळप इथे तिथे बागडत असतील . उन्हाने तापलेल्या जमिनीचा दाह पावसाच्या पहिल्या शिडकाव्याने शांत झालेला असेल व जमिनीचा मोहक सुगंध घेतघेत हत्ती वनात मदमस्त हिंडताना दिसतील . त्यांच्या प्रसन्न हालचाली तत्परतेने तुला तुझा पुढचा मार्ग सांगतील .
अम्भोबिन्दुग्रहणचतुरांश्चातकान् वीक्षमाणाः
श्रेणीभूताः परिगणनया निर्दिशन्तो बलाकाः ।
त्वामासाद्य स्तनितसमये मानयिष्यन्ति सिद्धाः
सोत्कम्पानि प्रियसहचरीसम्भ्रमालिङ्गितानि ॥२२॥
२२ - तुझे आगमन झाले की सगळे यक्ष तुझ्यातून ठिबकणारे जलबिंदू अलवार टिपून आपली तहान शमविणाऱ्या चातक पक्ष्यांकडे कौतुकाने पाहतील . त्याचवेळी आकाशात तुझी वाट पाहत असलेल्या बगळ्यांच्या रांगा देखील त्यांना दिसतील . तुझा दमदार आवाज ऐकून यक्षस्त्रिया घाबरून आपल्या प्रियकराला बिलगतील . त्या गोंधळलेल्या बावरलेल्या प्रियेला प्रेमाने आपल्या मिठीत घेत तृप्त झालेले यक्षगण तुझे आभार मानून तुझा सत्कार करतील . कारण तुझ्या मुळेच त्यांना ह्या आनंदाचा अनुभव घेता आलेला असेल .
उत्पश्यामि द्रुतमपि सखे मत्प्रियार्थं यियासोः
कालक्षेपं ककुभसुरभौ पर्वते पर्वते ते ।
शुक्लापाङ्गैः सजलनयनैः स्वागतीकृत्य केकाः
प्रत्युद्यातः कथमपि भवान् गन्तुमाशु व्यवस्येत् ॥ २३॥
२३ - मेघा मला खात्री आहे की माझा संदेश माझ्या प्रियेला लवकरात लवकर पोचवावा अशी तुझी इच्छा असणार आणि त्यासाठी तू जीवाचं रान करशील . पण मित्रा हे देखील लक्षात ठेव की तुझ्या मार्गातील प्रत्येक पर्वतावरील वाट कुड्यांच्या फुलांनी सुगंधित सुशोभित झालेली असेल . तिथे तुझ्या आगमनामुळे हर्ष भरीत झालेले मोर डोळ्यात प्राण आणून तुझ्या स्वागताला सज्ज असतील . त्यांना निराश करू नकोस . प्रत्येक ठिकाणी काही काळ का होईना पण थांब आणि त्यांचे आतिथ्य प्रेमाने स्वीकार . पण नंतर मात्र कसंहि करून लगेच तिथून पुढच्या प्रवासाला लाग .
पाण्डुच्छायोपवनवृतयः केतकैः सूचिभिन्नैः
नीडारम्भैर्गृहबलिभुजामाकुलग्रामचैत्याः ।
त्वय्यासन्ने परिणतफलश्यामजम्बूवनान्ताः
सम्पत्स्यन्ते कतिपयदिनस्थायिहंसा दशार्णाः ॥ २४॥
२४ - दशार्ण नावाच्या देशात जेव्हा तू पोचशील तेव्हा तुझ्या आगमना मुळे केवड्याच्या कणसांच्या टोकदार पिवळसर पांढऱ्या कळ्या उमलतील . तिथल्या उद्यानातील उपवनातील कुंपणे काटेरी होतील . गावच्या मार्गावरील वृक्षांवर पक्षी आपले घरटे बांधण्यात गुंग झालेले असतील. वृक्षांवरील जांभळे पिकल्यामुळे संपूर्ण जांभूळवन काळे निळे भासेल . तिथे काही राजहंस देखील तुला पाहून मानस सरोवराला प्रस्थान करण्यास उत्सुक होतील . दशार्ण देशाला वर्ष ऋतूच्या आगमनाने शृंगारिक शोभा प्राप्त झालेली दिसेल .
तेषं दिक्षु प्रथितविदिशालक्षणां राजधानीं
गत्वा सद्यः फलमविकलं कामुकत्वस्य लब्धा ।
तीरोपान्तस्तनितसुभगं पास्यसि स्वादु यस्मात्
सभ्रूभङ्गं मुखमिव पयो वेत्रवत्याश्चलोर्मि ॥ २५॥
२५ - पुढे गेल्यावर तुला विदिशा नामक दशार्ण देशाची विख्यात राजधानी लागेल . तिथे वेत्रवती नदीच्या तीरावर जा आणि नदीजलाचा तू आस्वाद घे . वेत्रवती नदीच्या लाटा अतिशय चंचल अवखळ आहेत . जणू भृकुटी चढवून कुणी प्रणयिनी आपल्या कटाक्षांनी तुला आमंत्रण देत आहे असेच तुला वाटेल . तिचे मधुर जल प्राशन केलेस की त्या चंचल अधरांचे चुंबन घेतल्याचे समाधान तुला मिळेल व तू सुखावशील . कारण विलासी पुरुषाला सुरत सुखापेक्षा अधरामृत प्राशन करण्यातच सुख सर्वस्व वाटते . वेत्रवती नदीच्या जल प्राशनाने तुला आपल्या विलासी जीवनाचे परिपूर्ण फल मिळेल .
नीचैराख्यं गिरिमधिवसेस्तत्र विश्रामहेतोः
त्वत्सम्पर्कात् पुलकितमिव प्रौढपुष्पैः कदम्बैः ।
यः पण्यस्त्रीरतिपरिमलोद्गारिभिर्नागराणां
२६ - विदिशा नगरीच्या जवळंच एक निचै नावाचा क्रीडापर्वत आहे . प्रवासातील थकवा घालविण्यासाठी तू त्यावर काही काळ विश्राम कर . विलासिनी स्त्रीला आपल्या प्रियकराचा प्रेमभरला स्पर्श होताच ती मोहरून जाते , तिच्या अंगावर रोमांच उभे राहतात . अगदी तसेच त्या पर्वतावरील कदंब वृक्ष तुझा स्पर्शाने मोहरतील पूर्णपणे उमलतील आणि पूर्ण फुललेल्या वृक्षांमुळे तो पर्वतही रोमांचित झालेला भासेल . त्या क्रीडा पर्वता वरील गुहांमध्ये राहणाऱ्या वारांगनांचा रति परिमल भोवताली दरवळत असतो . त्या घमघमाटाने नगरातील लोकांचे मुसमुसणारे तारुण्यंच सूचित होते . अशा ह्या पर्वतावर तू काही काळ वसती कर आणि विश्रांती घे .
विश्रान्तः सन् व्रज वननदीतीरजातानि सिञ्चन्न
उद्यानानां नवजलकणैर्यूथिकाजालकानि ।
गण्डस्वेदापनयनरुजाक्लान्तकर्णोत्पलानां
छायादानात् क्षणपरिचितः पुष्पलावीमुखानाम् ॥ २७॥
२७ - ताज तवानं होऊन पुढल्या प्रवासाला निघताना वनातील नदी तीरांवर जी उद्याने आहेत तिथल्या जाई जुईंच्या जाळ्यांवर तुझ्या जलबिंदूंचा शिडकावा कर . उद्यानातील श्रमांमुळे तिथल्या माळीणींचे गाल घामेजून गेलेले असतील . त्यांच्या कानांवरील जाई जुईंच्या सुकलेल्या कळ्यांमुळे त्यांची मुखे म्लान झालेली असतील . तू केलेल्या छायेमुळे त्या आनंदून जातील . त्यांच्या सुंदर मुखांच्या क्षणभर झालेल्या परीचयामुळे तू सुद्धा मोहित होशील . पण तिथे जास्त वेळ रेंगाळू नकोस . पुढचा मार्ग आक्रमायला सुरुवात कर .
वक्रः पन्था यदपि भवतः प्रस्थितस्योत्तराशां
सौधोत्सङ्गप्रणयविमुखो मा स्म भूरुज्जयिन्याः ।
विद्युद्दामस्फुरितचकितैस्तत्र पौराङ्गनानां
लोलापाङ्गैर्यदि न रमसे लोचनैर्वञ्चितोऽसि ॥ २८॥
२८ - हे मेघा , अलकानगरी उत्तरेला आहे आणि अवंती देशाची अत्यंत समृध्द वैभवशाली अशी राजधानी उज्जैयिनी थोडी आडबाजूला आहे . पण मुद्दाम वाट वाकडी करून उज्जैनीला जा . तिथले रम्य प्रासाद , भव्य मंदिरे, धवल शुभ्र गच्च्या पाहिल्याशिवाय राहू नकोस . तुझ्या आगमना मुळे जेव्हा विजा चमकतील तेव्हा तिथल्या युवती आपल्या चंचल विशाल काजळ भरल्या डोळ्यांनी तुला चकित होऊन पाहतील . तू जर त्यांच्या मधुर मादक कटाक्ष विलासात तल्लीन झाला नाहीस तर एका अतिशय रमणीय अशा दृश्याला पारखा होशील व तुझा जन्म विफल झाला असे मला खेदाने म्हणावे लागेल .
वीचिक्षोभस्तनितविहगश्रेणिकाञ्चीगुणायाः
संसर्पन्त्याः स्खलितसुभगं दर्शितावर्तनाभेः ।
निर्विन्ध्यायाः पथि भव रसाभ्यन्तरः सन्निपत्य
स्त्रीणामाद्यं प्रणयवचनं विभ्रमो हि प्रियेषु ॥ २९॥
२९ - उज्जैयिनी नगरीच्या वाटेवर निर्विन्ध्या नदी लागते . तिथल्या खळखळाट करणाऱ्या पाण्याच्या लाटांवर किलबिलाट करणाऱ्या हंस पक्ष्यांची माळ मेखले सारखी तिला शोभून दिसते . खडकातून वेडीवाकडी मोहक वळणे घेत जाणारी ही नदी म्हणजे ठुमकत मुरकत जाणारी नवयौवनाच जणू . प्रवाहात निर्माण झालेल्या भोवरारुपी नाभीचे ती तुझ्यासमोर दिमाखाने प्रदर्शन करील . प्रियकराच्या समोर शृंगार चेष्टा करणे हेच स्त्रीचे प्रेम सूचित करणारी पहिली स्पष्ट खूण असते . म्हणून तू निर्विन्ध्या नदीला आलिंगन देऊन तिचा पूर्ण आस्वाद घे आणि तिचे आल्हाददायक शीतल जल प्राशन करून आपला श्रम परिहार कर .
वेणीभूतप्रतनुसलिलासावतीतस्य सिन्धुः
पाण्डुच्छाया तटरुहतरुभ्रंशिभिर्जीर्णपर्णैः ।
सौभाग्यं ते सुभग विरहावस्थया व्यञ्जयन्ती
कार्श्यं येन त्यजति विधिना स त्वयैवोपपाद्यः ॥ ३०॥
३० - निर्विन्ध्या नदी ओलांडून पलीकडे गेल्यावर तुला सिंधू नदी दिसेल . हिचा प्रवाह अतिशय अरुंद असा असल्याने एखाद्या स्त्रीच्या वेणीप्रमाणे दिसतो . वर्षभर तुझ्या वियोगामुळे ती कृश झालेली असेल. तिच्या काठावरील वृक्षांच्या जीर्ण फिकट पानांमुळे ती अशक्त झालेली वाटेल . ती तुझी आतुरतेने वाट पाहत असेल . एखाद्या स्त्रीने आपल्या विरहात झुरावे , निस्तेज, कृश व्हावे हे पुरुषासाठी भाग्याचेच तर लक्षण असते . तेव्हा मित्रा सिंधू नदीचा कृशपणा नाहीसा करण्यासाठी तू तातडीने उपाय कर .
प्राप्यावन्तीनुदयनकथाकोविदग्रामवृद्धान्
पूर्वोद्दिष्टामनुसर पुरीं श्रीविशालां विशालाम् ।
स्वल्पीभूते सुचरितफले स्वर्गिणां गां गतानां
३१ - सिंधू नदी पार केलीस की तुला अवंती देश लागेल . तिथे उदयन राजाची व वासवदत्तेची कथा जाणणारे अनेक वृध्द विद्वान नागरिक तुला भेटतील . असं म्हणतात की स्वर्गात वास्तव्य करणाऱ्या पुण्यवान महात्म्यांच्या पुण्यकर्माचं फळ क्षीण झालं की ते परत पृथ्वीवर येतात . अशांच्या पुण्याचा शेष भाग एकत्र मिळून ही उज्जैयिनी नगरी निर्माण झाली आहे . अत्यंत समृद्ध आणि वैभवशाली अशी ही उज्जैयिनी नागरी अवंती देशाची राजधानी आहे . ही नगरी म्हणजे भूलोकीचा स्वर्गच जणू .
दीर्घीकुर्वन् पटु मदकलं कूजितं सारसानां
प्रत्यूषेषु स्फुटितकमलामोदमैत्रीकषायः ।
यत्र स्त्रीणां हरति सुरतग्लानिमङ्गानुकूलः
शिप्रावातः प्रियतम इव प्रार्थनाचाटुकारः ॥ ३२॥
३२ - या नगरीत प्रात:काळी शिप्रा नदीवरून वाहणारा शरीराला सुखद स्पर्श करणारा आल्हाददायक वारा सारस पक्ष्यांचे उन्मादक मोहक कूजन भोवतालच्या परिसरात घुमवताना दिसेल . हा वारा जेव्हा फुललेल्या कमळांवरून जातो तेव्हा त्यांच्या संसर्गामुळे सुगंधित झालेला असतो . आपल्या कांतेला आलिंगन देऊन तिची मनधरणी करणाऱ्या एखाद्या प्रियकराप्रमाणे असणारा तो वारा रमणींना गोंजारून कुरवाळून पुन्हा एकदा आर्जवाने मोहरवून टाकतो आणि आपल्या सुखकर मुलायम स्पर्शाने त्यांना आलेली रति ग्लानी नाहीशी करून परत एकदा संभोग सुखासाठी त्यांना उद्युक्त करतो .
हारांस्तारांस्तरलगुटिकान् कोटिशः शङ्खशुक्तीः
शष्पश्यामान् मरकतमणीनुन्मयूखप्ररोहान् ।
दृष्ट्वा यस्यां विपणिरचितान् विद्रुमाणां च भङ्गान्
संलक्ष्यन्ते सलिलनिधयस्तोयमात्रावशेषाः ॥३३॥
३३ - ह्या उज्जैयिनी नगरीच्या बाजारात जडजवाहिरांचे ढीग विक्रीसाठी मांडून ठेवलेले तुला दिसतील . त्यात रत्नजडित पदक असलेले पाणीदार मोत्यांचे कोट्यवधी हार आणि मोत्यांचे शिंपले तुला दिसतील . तेजाने चकाकणारे गवताप्रमाणे हिरवेगार पाचू आणि कोट्यवधी पोवळ्यांच्या राशी देखील तुला सापडतील . हे सर्व डोळे दिपवणारे रत्नांचे ढीग पाहून रत्नाकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समुद्रात आता केवळ पाणीच उरले आहे की काय अशी शंका तुझ्या मनात येईल .
प्रद्योतस्य प्रियदुहितरं वत्सराजोऽत्र जह्रे
हैमं तालद्रुमवनमभूदत्र तस्यैव राज्ञः ।
अत्रोद्भ्रान्तः किल नलगिरिः स्तम्भमुत्पाट्य दर्पा-
दित्यागन्तून् रमयति जनो यत्र बन्धूनभिज्ञः॥३४॥
३४ - वत्स देशाचा राजा उदयन याने उज्जैयिनीच्या प्रद्योत राजाची प्रिय कन्या वासवदत्ता हिला तिच्या आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध ह्याच नगरीतून हरण केले होते . इथेच प्रद्योत राजाची तालवृक्षांची सुवर्ण राई होती . इथेच इंद्राने प्रद्योत राजाला दिलेला खांबाला बांधलेला नलगिरी नावाचा हत्ती मदोन्मत्त होऊन खांब उपटून सैरावैरा धावत सुटलेला . ह्या उज्जैयिनी नगरीतल्या अशा अनेक रोमांचक रमणीय गोष्टी इथले नागरिक बाहेरच्या देशातून आलेल्यांना सांगून त्यांचे मन रमवत असतात .
जालोद्गीर्णैरुपचितवपुः केशसंस्कारधूपैः
बन्धुप्रीत्या भवनशिखिभिर्दत्तनृत्त्योपहारः ।
हर्म्येष्वस्याः कुसुमसुरभिष्वध्वखेदं नयेथा
लक्ष्मीं पश्यंल्ललितवनितापादरागाङ्कितेषु ॥ ३५॥
३५ - उज्जैनीत धनिकांचे अगणित प्रासाद आहेत . तेथील स्त्री पुरुषांनी केश प्रसाधनासाठी वापरलेल्या चंदन , उद , धूप आदिंचा जाळीदार खिडक्यांमधून बाहेर पडणाऱ्या सुगंध तुला धुंद करील . त्यांच्या घरातील पाळलेले मोर तुला पाहून नृत्य करून तुझे स्वागत करतील . विविध फुलांच्या सुगंधाने दरवळणाऱ्या त्या धनिकांच्या भव्य वाड्यातील स्त्रियांनी आपल्या चरणांना लावलेल्या मेंदीचे लाल ओल्या पावलांचे ठसे उमटलेले तुला दिसतील . ह्या टोलेजंग वाड्यातील वैभव आणि विलास पाहत तू तुझ्या प्रवासाचा शीण घालव .
भर्तुः कण्ठच्छविरिति गणैः सादरं वीक्ष्यमाणः
पुण्यं यायास्त्रिभुवनगुरोर्धाम चण्डीश्वरस्य ।
धूतोद्यानं कुवलयरजोगन्धिभिर्गन्धवत्याः
३६ - प्रवासाचा शीण गेल्यावर मात्र तू भक्तिपूर्वक त्रिभुवनपती महाकालाचे दर्शन अवश्य घे . तुझाही कंठ भगवान शिवाच्या कंठा प्रमाणेच नीलवर्णी आहे . तुला पाहून शंकराच्या गणांना आपल्या नीलकंठ स्वामींचीच आठवण होईल व ते आदराने तुला पाहतील . नीलकमलातील परागांनी सुवासित , जलविहारात दंग असलेल्या तरुणींच्या अभ्यंगस्नानाच्या चंदनादी अंगरागांनी सुगंधित आशा गंधवती नदीवरील वाऱ्याने त्या मंदिराच्या परिसरातील उद्यान डोलत असेल .
अप्यन्यस्मिञ् जलधर महाकालमासाद्य काले
स्थातव्यं ते नयनविषयं यावदत्येति भानुः ।
कुर्वन् संध्याबलिपटहतां शूलिनः श्लाघनीयां
आमन्द्राणां फलमविकलं लप्स्यसे गर्जितानाम् ॥ ३७॥
३७ - महाकालेश्वराच्या जागृत मंदिरात तू सूर्यास्ताच्या आधी पोचलास तर काही वेळ तिथे थांब आणि संध्याकाळच्या पूजेचा थाट पहा .तुझ्या गडगडाटाचे तिथे सार्थक होईल . तुझी गंभीर गर्जना म्हणजे भगवान शिवाच्या प्रदोषकाळी केलेले चौघडा वादनच जणू . महाकालेश्वराच्या सायंपूजेत अत्यंत स्पृहणीय कार्य केल्याचे थोर पुण्य तुला लाभेल व त्याचे योग्य असे फळही प्राप्त होईल . ऐहिक सुखोपभोगांबरोबर तुला पारलौकिक फलप्राप्ती देखील खात्रीने मिळेल .
पादन्यासैः क्वणितरशनास्तत्र लीलावधूतै
रत्नच्छायाखचितवलिभिश्चामरैः क्लान्तहस्ताः ।
वेश्यास्त्वत्तो नखपदसुखान् प्राप्य वर्षाग्रबिन्दून्
आमोक्ष्यन्ते त्वयि मधुकरश्रेणिदीर्घान् कटाक्षान् ॥ ३८॥
३८ - सायंकाळच्या पूजेनंतर तिथे सेवा करणाऱ्या भाविणींचे नृत्य होईल . त्यांच्या पदन्यासावेळी त्यांच्या पैंजणांची मंजुळ रुमझुम ऐकू येते . रत्नांकित चवऱ्या ढाळून त्यांचे कोमल हात शिणून जातात . त्यांच्या हातातील रत्नजडित कंकणांची प्रभा त्या चवर्यांच्या मुठींवर पडलेली असते . नखक्षतांना थंडावा देणारे सुखकर असे पहिले पावसाचे थेंब तुझ्याकडून मिळाल्यावर त्या आपल्या दीर्घ भ्रमरांच्या पंक्तीप्रमाणे असलेले नेत्र कटाक्ष तुझ्याकडे प्रेमाने चंचलपणे टाकतील .
पश्चादुच्चैर्भुजतरुवनं मण्डलेनाभिलीनः
सांध्यं तेजः प्रतिनवजपापुष्परक्तं दधानः ।
नृत्यारम्भे हर पशुपतेरार्द्रनागाजिनेच्छां
शान्तोद्वेगस्तिमितनयनं दृष्टभक्तिर्भवान्या ॥ ३९॥
३९ - सायंपूजेनंतर गजासुराचे ताजे ओले कातडे पांघरून भगवान शंकराचे तांडव नृत्य सुरु होईल . सायंकालीन सूर्याच्या प्रभेने नुकत्याच तोडलेल्या जास्वंदीचा आरक्त वर्ण तू अशावेळी धारण कर आणि भगवान शिवाच्या बाहुरूपी उंच तरुवनाला विळखा घालून बिलग . ज्यामुळे गजाजिन दिसेनासे होईल . देवी पार्वतीला पहिल्यांदाच गजाजिन पाहून किळस वाटलेली . ती तिची भीती आणि किळस नाहीशी होईल . ती निश्चल नेत्रांनी तुझी भक्ती पाहत राहील आणि तुझ्यामुळे भगवान शिवाची गजचर्म पांघरण्याची हौसही भागेल . तू दोघांच्या कौतुकाला पात्र ठरशील .
गच्छन्तीनां रमणवसतिं योषितां तत्र नक्तं
रुद्धालोके नरपतिपथे सूचिभेद्यैस्तमोभिः ।
सौदामिन्या कनकनिकषस्निग्धया दर्शयोर्वीं
तोयोत्सर्गस्तनितमुखरो मा स्म भूर्विक्लवास्ताः ॥ ४०॥
४० - उज्जैनी नगरीत रात्रीच्या वेळी इतका घनदाट अंधार होतो की राजमार्ग दिसेनासे होतात . अशावेळी अंधारात आपल्या प्रियकराकडे जाणाऱ्या अभिसारीकांचे राजमार्गावर पाऊल अडखळते . तू सुवर्ण रेषेप्रमाणे चमचमणार्या तुझ्या तेजस्वी विद्युल्लतेच्या सहाय्याने त्यांना मार्ग दाखव . पण उगाचंच पाउस पाडून गडगडाट करून त्यांना घाबरवू मात्र नकोस . त्या काम विव्हलतेमुळे अधिकच व्याकूळ भित्र्या झालेल्या असतात हे लक्षात ठेव . अशावेळी मला प्राप्त नसणारे सुख दुसऱ्यांना प्राप्त झालेले पाहून मला फार आनंद होईल .
तां कस्यां चिद् भवनवलभौ सुप्तपारावतायां
नीत्वा रात्रिं चिरविलसनात् खिन्नविद्युत्कलत्रः ।
दृष्टे सूर्ये पुनरपि भवान् वाहयेदध्वशेषं
४१ - खुप वेळ लखलखल्याने तुझी कांता विद्युल्लता देखील थकून गेलेली असेल . तेव्हां एखाद्या वाड्याच्या कौलांवर विसावा घे आणि तिच्यासह उरलेली रात्र निवांतपणे घालव . पहाटे सूर्योदय होताच मात्र पुढल्या प्रवासाला लाग . आठवण आहे न तुला की माझ्या प्रियेला संदेश पोचवण्याचे कार्य तू स्वीकारले आहेस ? मित्राचे कार्य करणारे आपले काम कधीही लांबणीवर टाकत नाही .
तस्मिन् काले नयनसलिलं योषितां खण्डितानां
शान्तिं नेयं प्रणयिभिरतो वर्त्म भानोस्त्यजाशु ।
प्रालेयास्रं कमलवदनात् सोऽपि हर्तुं नलिन्याः
प्रत्यावृत्तस्त्वयि कररुधि स्यादनल्पाभ्यसूयः ॥४२॥
४२ - ज्या प्रेयसींची रात्री प्रणयेच्छा पूर्ण न झाल्याने वंचना झालेली आहे त्या अत्यंत दुखी अंतकरणाने अश्रू ढाळत असतील . त्यांचे प्रियकर प्रभातकाळी त्यांचे अश्रू पुसून त्यांचे सांत्वन करताना तुला दिसतील . सूर्य देखील नलिनी पुष्पाच्या मुखकमलावर जमा झालेले हिमरूपी अश्रू पुसण्यासाठी आकाशात वर आला असेल . त्याच्या प्रकाशाची वाट अडवू नकोस नाहीतर तो तुझ्यावर जळफळेल व तुझा द्वेष करेल . तुलाही माझे काम करायचे आहे हे आठवते आहे ना . मग विलंब न करता पुढच्या प्रवासाला लाग .
गम्भीरायाः पयसि सरितश्चेतसीव प्रसन्ने
छायात्मापि प्रकृतिसुभगो लप्स्यते ते प्रवेशम् ।
तस्मात् तस्याः कुमुदविशदान्यर्हसि त्वं न धैर्यान्
मोघीकर्तुं चटुलशफरोद्वर्तनप्रेक्षितानि ॥ ४३॥
४३ - गंभीरा नदीचे स्फटिकासमान स्वच्छ शीतल जल म्हणजे जणू सत्त्वगुणसंपन्न निर्मल अंतः करण . ती तुझ्यावर अनुरक्त असल्याने तुझ्या स्वभावतःच सुंदर असलेल्या आत्म्याचे प्रतिबिंब तिच्या जलात पडेल . गंभीरा नदीच्या स्वच्छ शुभ्र जलाच्या पृष्ठभागावर टुणटुण उड्या मारणाऱ्या माश्यांमुळे जलावर तरंग उठतील . हे तरंग म्हणजे जणू तिने तुझ्यावर टाकलेले प्रेमपूर्ण चंचल कटाक्षचं आहेत ज्यांच्या मदतीने ती तुझ्यावरील प्रेम व्यक्त करील . तिच्या ह्या निरागस निर्मल प्रेमाचा अनादर करू नकोस . माझ्या कार्यामुळे तुला नक्कीच घाई असणार . पण तरीही तिथे थोडा वेळ तू थांबायलाच हवेस .
तस्याः किंचित् करधृतमिव प्राप्तवानीरशाखं
नीत्वा नीलं सलिलवसनं मुक्तरोधोनितम्बम् ।
प्रस्थानं ते कथमपि सखे लम्बमानस्य भावि
ज्ञातास्वादो विवृतजघनां को विहातुं समर्थः ॥ ४४॥
४४ - गंभीरा नदी म्हणजे सौंदर्यशालीन युवतीच . तिचे जलरूपी नीलवस्त्र काठापर्यंत जाऊन जेव्हा परत मागे फिरते तेव्हा नवयौवनेच्या नितंबावरून घसरलेल्या वस्त्राप्रमाणे दिसते . आणि परत काठाकडे फिरताना लव्हाळ्यांच्या कोवळ्या अग्रात गुरफटल्याने तिने ते घसरणारे वस्त्र किंचित वर धरावे तसे शोभून दिसते . हे उन्मादक दृश्य पाहून तुझी पाऊले नक्कीच तिथून निघणार नाहीत . साहजिच आहे, ज्याने अशा विलासाचा आस्वाद आधी घेतला असेल तो जघनभाग उघडा असलेल्या स्त्रीला सोडून पुढे जाण्यास कसा बरे धजावेल ?
त्वन्निष्यन्दोच्छ्वसितवसुधागन्धसम्पर्करम्यः
स्रोतोरन्ध्रध्वनितसुभगं दन्तिभिः पीयमानः ।
नीचैर्वास्यत्युपजिगमिषोर्देवपूर्वं गिरिं ते
शीतो वायुः परिणमयिता काननोदुम्बराणाम् ॥ ४५॥
४५ - तुझ्या वृष्टी मुळे तृप्त होऊन सुगंधी निश्वास टाकणाऱ्या जमिनीच्या सान्निध्यात आल्यावर वारा देखील सुगंधित होईल . हा मोहक सुगंध हत्ती आपल्या सोडांनी भरभरून प्राशन करतील . त्यावेळी सोंडेत एकदम शिरलेल्या वाऱ्यामुळे त्यांच्या सोंडेतून मधुर ध्वनी बाहेर पडतील . शीतल वाऱ्याच्या आल्हाददायक स्पर्शाने वनातील उंबराची फळे परिपक्व होतील . हा वारा म्हणजे तुझ्या सारख्या मेघराजाच्या स्वागतासाठी त्या प्रदेशातील राजाने पाठवलेला कुमारच जणू . हा शीतल वारा अत्यंत सौम्य असा वाहून तुला कोणताही त्रास पोचणार नाही याची काळजी घेत हळूहळू देवगिरीकडे घेवून जाईल .
तत्र स्कन्दं नियतवसतिं पुष्पमेघीकृतात्मा
पुष्पासारैः स्नपयतु भवान् व्योमगङ्गाजलार्द्रैः ।
रक्षाहेतोर्नवशशिभृता वासवीनां चमूनां
४६ - देवगिरी पर्वतावर कार्तिकेयाचे नित्य वास्तव्य असते . इंद्राच्या सेनेंचे रक्षण करण्यासाठी भाळी चंद्रकोर धरण करणाऱ्या चंद्रमौळी भगवान शिवाने सूर्यतेजापेक्षाही जास्त प्रखर असलेले आपले तेज अग्नीच्या मुखात ठेवले . ह्या प्रखर तेजातूनच शिवपुत्र कार्तिकेय प्रकट झाला . कार्तिकेय भगवान शंकरांइतकाच पूजनीय आदरणीय आहे . त्याच्या आदरार्थ तिथे पोचल्यावर तू पुष्पमेघाचे रूप धारण कर . आकाशगंगेच्या पवित्र निर्मल जलाने आर्द्र झालेल्या पुष्पवृष्टीचा त्याच्यावर सतत अभिषेक कर .
ज्योतिर्लेखावलयि गलितं यस्य बर्हं भवानी
पुत्रप्रेम्णा कुवलयपदप्रापि कर्णे करोति ।
धौतापाङ्गं हरशशिरुचा पावकेस्तं मयूरं
पश्चादद्रिग्रहणगुरुभिर्गर्जितैर्नर्तयेथाः ॥ ४७॥
४७ - कार्तिकेयाचे वाहन असलेल्या मोराचे पीस देवी पार्वती अत्यंत प्रेमाने आपल्या कानांत कमळांच्या पाकळ्याऐवजी खोवते . शिवाच्या जटे वरील चंद्राच्या तेजामुळे मयुराच्या डोळ्यांच्या कडा मोत्यासारख्या चमचमतात . पुष्पवृष्टी करून कार्तिकेयाची पूजा केल्यावर तू संपूर्ण देवगिरी पर्वत दणाणून सोड आणि आपल्या गडगडाटाच्या तालावर ह्या मयूरास नृत्य करायला लाव .
आराध्यैनं शरवणभवं देवमुल्लङ्घिताध्वा
सिद्धद्वन्द्वैर्जलकणभयाद्वीणिभिर्मुक्तमार्गः ।
व्यालम्बेथाः सुरभितनयालम्भजां मानयिष्यन्
स्रोतोमूर्त्या भुवि परिणतां रन्तिदेवस्य कीर्तिम् ॥ ४८॥
४८ - शर गवतात जन्मलेल्या कार्तिकेयाच्या उपासनेनंतर पर्जन्यवृष्टी होईल ह्या भयाने वीणा धारी सिध्द जोडपी आडोशास जातील व तुला पुढचा मार्ग प्रवासासाठी मोकळा मिळेल . काही काळ मार्ग अक्रमल्यावर तुला रन्तिदेवाने केलेल्या गो यज्ञाचे फल म्हणून जन्माला आलेल्या चर्मण्वती नदीचा प्रवाह दिसेल . तिथे नदीकाठी थोडा वेळ खाली उतर , विहार कर .
त्वय्यादातुं जलमवनते शार्ङ्गिणो वर्णचौरे
तस्याः सिन्धोः पृथुमपि तनुं दूरभावात् प्रवाहम् ।
प्रेक्षिष्यन्ते गगनगतयो नूनमावर्ज्य दृष्टीः
एकं मुक्तागुणमिव भुवः स्थूलमध्येन्द्रनीलम् ॥ ४९॥
४९ - तुझा रंग देखील शारंगधरी कृष्णासारखा सावळा विलोभनीय आहे . चर्मण्वती नदीचे पात्र प्रत्यक्षात अफाट लांब रुंद असले तरी उंचावरून लांबून मात्र अगदी लहान दिसते . तू जेव्हा जलप्राशनासाठी खाली उतरशील तेव्हा चर्मण्वती नदीचा प्रवाह म्हणजे तुझ्या मोहक श्यामल देहाभोवती ठसठशीत इंद्रनील मणी असलेल्या एकपदरी मोत्यांची माळच जणू असा भास होईल . आकाशात संचार करणारे सिद्ध गंधर्व आदि देवगण निसंशय ह्या देखण्या दृश्याकडे टक लावून पाहतील .
तामुत्तीर्य व्रज परिचितभ्रूलताविभ्रमाणां
पक्ष्मोत्क्षेपादुपरिविलसत्कृष्णशरप्रभाणाम् ।
कुन्दक्षेपानुगमधुकरश्रीमुषामात्मबिम्बं
पात्रीकुर्वन् दशपुरवधूनेत्रकौतूहलानाम् ॥ ५०॥
५० - नदी ओलांडून जरा पलीकडे गेल्यावर दश्पूर नगरीत तुला भृकुटी विलास आदि क्रीडांमध्ये निपुण असलेल्या ललना दिसतील . पापण्या वर केल्याने त्यांच्या नेत्रात नानावर्णी प्रभा दिसतील . त्यांच्या चंचल नेत्रातील शोभे पुढे त्यांच्या मागे मागे फिरणारे भ्रमर सुद्धा फिके वाटतात . ह्या ललनांच्या चंचल नेत्रातील अभिलाषेचा , त्यांच्या कौतुकाचा तू नक्कीच विषय होशील . आता मात्र तिथे जास्त काळ रेंगाळू नकोस . पुढच्या प्रवासाला लाग .
ब्रह्मावर्तं जनपदमधश्छायया गाहमानः
क्षेत्रं क्षत्रप्रधनपिशुनं कौरवं तद् भजेथाः ।
राजन्यानां शितशरशतैर्यत्र गाण्डीवधन्वा
५१ - मेघा पुढे ब्रह्मावर्त ओलांडल्यावर तू कुरुक्षेत्री पोचशील . तू जसा कमलपुष्पांवर आपल्या जलधारांचा अविरत वर्षाव करतोस तसाच क्षत्रिय योद्ध्यांच्या शिरांवर गांडीवधरी अर्जुनाने आपल्या तीक्ष्ण बाणांचा वर्षाव इथे ह्याच क्षेत्री केला होता . ह्या क्षेत्राचे दर्शन घेऊन पुढे जा .
हित्वा हालामभिमतरसां रेवतीलोचनाङ्कां
बन्धुप्रीत्या समरविमुखो लाङ्गली याः सिषेवे ।
कृत्वा तासामभिगममपां सौम्य सारस्वतीनां
अन्तःशुद्धस्त्वमपि भविता वर्णमात्रेण कृष्णः ॥ ५२॥
५२ - कौरव पांडव दोन्ही आपले नातलग असल्याने बलरामाला कोणा एकाची बाजू घेऊन दुसऱ्याला वंचित ठेवणे अप्रशस्त वाटले . मदिरेचा आस्वाद घेताना त्यात आपल्या प्रिय पत्नी रेवतीच्या नेत्रांचे पडलेले कटाक्ष पाहण्याचा मोह त्याने टाळला. आणि युद्धात सहभागी न होता तीर्थयात्रेला निघून गेला . यात्रा समयी सरस्वती नदीचे जलप्राशन करून तो पवित्र झाला . म्हणून हे दैवी मेघा तू सुद्धा सरस्वतीचे निर्मल जल पिऊन पावन हो म्हणजे तुझा अंतरात्मा निर्मल होईल आणि तू केवळ रंगानेच सावळा राहशील .
तस्माद् गच्छेरनुकनखलं शैलराजावतीर्णां
जह्नोः कन्यां सगरतनयस्वर्गसोपानपङ्क्तिम् ।
गौरीवक्त्रभ्रुकुटिरचनां या विहस्येव फेनैः
शंभोः केशग्रहणमकरोदिन्दुलग्नोर्मिहस्ता ॥ ५३॥
५३ - नंतर तू हिमालयावरून सपाट प्रदेशात उतरलेल्या कनखल तीर्थाजवळ असलेल्या गंगेकडे जा . ह्याच जान्हवीने सगर पुत्रांना स्वर्गात जाण्यासाठी पायऱ्यांप्रमाणे मार्ग उपलब्ध करून दिला होता . जान्हवी भगवान शंकराच्या जटांचा आश्रय घेऊन पृथ्वीवर अवतीर्ण झाली . तेव्हा जणू आपले तरंगरुपी हात तिने शंकराच्या भाळी असलेल्या चंद्रकलेला भिडवून त्याच्या जटांनाच धरले . हे पाहून देवी पार्वतीला साहजिकच राग आला . पार्वतीच्या कपाळाला पडलेल्या आठ्यांचा गंगेने आपल्या शुभ्र फेसाने जणू अवमानच केला आहे .
तस्याः पातुं सुरगज इव व्योम्नि पूर्वार्धलम्बी
त्वं चेदच्छस्फटिकविशदं तर्कयेस्तिर्यगम्भः ।
संसर्पन्त्या सपदि भवतः स्रोतसि छाययासौ
स्यादस्थानोपगतयमुनासङ्गमेवाभिरामा ॥ ५४॥
५४ - देवांचे हत्ती अंतराळाला आपल्या शरीराचा मागील अर्धा भाग भिडवून थोडे तिरकस उभे असतात . तू सुद्धा तसंच वाकून गंगेचे निष्कलंक स्फटिका सारखे शुभ्र स्वच्छ जल प्राशन कर . जेव्हा तू असे करशील तेव्हा तुझे सावळे प्रतिबिंब तिच्या शुभ्र पात्रात पडेल . त्यावेळी प्रयागच्या खूप मागे गौरवर्णी गंगेचा श्यामल कांती असलेल्या यमुनेशी प्रीती संगम होताना जसे अत्यंत मनोहर दृश्य दिसते तसाच तुमचा संगम दिसेल .
आसीनानां सुरभितशिलं नाभिगन्धैर्मृगाणां
तस्या एव प्रभवमचलं प्राप्य गौरं तुषारैः ।
वक्ष्यस्यध्वश्रमविनयने तस्य शृङ्गे निषण्णः
शोभां शुभ्रत्रिनयनवृषोत्खातपङ्कोपमेयाम् ॥ ५५॥
५५ - हिमाच्छादित शुभ्र हिमालयात गंगा उगम पावते . तिच्या प्रवाहातील शिळांवर कस्तुरीमृग सुखाने विसावत असल्याने त्या शिळांना कस्तुरीचा घमघमाट येतो . या सुगंधित हिमाद्रीच्या शिखरावर तू विसावलास की तुझा संपूर्ण श्रम नाहीसा होईल . भगवान शंकराचा नंदी जेव्हा आपल्या खुरांनी चिखल उकरतो तेव्हा शुभ्र हिमाद्रीच्या परिघातील तो काळा चिखलाचा भाग विशेष उठून दिसतो . त्याप्रमाणे त्या शुभ्र हिमाद्रीवर तू एकटाच कृष्णवर्णी असल्याने तुझी शोभा नक्कीच वृद्धींगत होईल .
तं चेद् वायौ सरति सरलस्कन्धसङ्घट्टजन्मा
बाधेतोल्काक्षपितचमरीबालभारो दवाग्निः ।
अर्हस्येनं शमयितुमलं वारिधारासहस्रैः
५६ - हे मेघा तू जेव्हा हिमालयावर पोचशील तेव्हा जोराचा वारा वाहत असले . त्यामुळे हलणाऱ्या वृक्षांच्या फांद्याच्या घर्षणाने वणवा पेटलेला असेल . त्या वणव्यातील आगीच्या ठिणग्या पडून तेथील वनगायींच्या शेपटांवरील केस जळत असतील . अशा ह्या प्राणघातक वणव्यात कोणीतरी मदतीला यावे असे हेमाद्रीला नक्कीच वाटणार . अशावेळी आपल्या संतत पर्जन्यधारांनी तू तो वणवा पूर्णपणे विझव . संकटात सापडलेल्यांना मदत करून त्यांच्या दुःखाचा परिहार करणं हेच तर थोरांचे परम कर्तव्य आहे . नाहीतर त्यांचे ऐश्वर्य निरर्थक ठरेल .
ये संरम्भोत्पतनरभसाः स्वाङ्गभङ्गाय तस्मिन्
मुक्ताध्वान सपदि शरभा लङ्घयेयुर्भवन्तम् ।
तान्कुर्वीथास्तुमुलकरकावृष्टिहासावकीर्णान्
के वा न स्युः परिभवपदं निष्फलारम्भयत्नाः ॥ ५७॥
५७ - मेघगर्जना ऐकून अनेकदा सिंह देखील गर्जना करायला लागतात . म्हणून तुझ्या गर्जनेला सिंहगर्जना समजून सिंहापेक्षा प्रबळ असलेले आठ पायांचे शरभप्राणी बेभान होऊन तुझ्या आवाजाच्या दिशेने झेप घ्यायचा प्रयत्न करतील . तू त्यांच्या अवाक्यात येणार नाहीसच पण उलट त्यांचेच हातपाय मोडण्याची शक्यता आहे हे काही अविचारामुळे त्यांना कळणार नाही . तेव्हा उग्र रूप धारण करून त्यांना गारांचा मारा करून झोडपून काढ आणि त्यांची पार दाणादाण उडव . निरर्थक गोष्टी साध्य करण्यासाठी जे जीवाचा आटापिटा करतात त्यांची फजिती झाल्यावाचून राहत नाही .
तत्र व्यक्तं दृषदि चरणन्यासमर्धेन्दुमौलेः
शश्वत् सिद्धैरुपहृतबलिं भक्तिनम्रः परीयाः ।
यस्मिन् दृष्टे करणविगमादूर्ध्वमुद्धूतपापाः
संकल्पन्ते स्थिरगणपदप्राप्तये श्रद्दधानाः ॥ ५८॥
५८ - हिमालयातील एका शिळेवर तुला भगवान शंकराची पाऊले उमटलेली दिसतील . योगीजन त्यांची नित्य पूजा करतात . तू देखील भक्तिभावाने त्या पाऊलखुणांना प्रदक्षिणा घाल . त्या चरणन्यासांच्या दर्शनाने श्रद्धावान भक्तांच्या पापांचे परिमार्जन होते आणि देहपातानंतर त्यांना शिवगणांमध्ये शाश्वत स्थान प्राप्त होते . तुला हे भाग्य अनायासे साध्य होईल तेव्हा ही संधी कोणत्याही कारणाने घालवू नकोस .
शब्दायन्ते मधुरमनिलैः कीचकाः पूर्यमाणाः
संसक्ताभिस्त्रिपुरविजयो गीयते किंनरीभिः ।
निर्ह्रादी ते मुरज इव चेत् कन्दरेषु ध्वनिः स्यात्
सङ्गीतार्थो ननु पशुपतेस्तत्र भावी समग्रः ॥ ५९॥
५९ - तिथे प्रवेश करताच पोकळ वेळुंच्या आत शिरलेले सुसाट्याचे वारे कानांना सुखद असा मधुर आवाज करताना तुला दिसतील . मयासुराने तारकासुराच्या तीनही पुत्रांसाठी बांधलेली नगरे त्यांच्यासह शंकराने जाळली होती . ही विजय गाथा तिथल्या किन्नर स्त्रिया वेणूवाद्यांच्या साथीवर गाताना तुला दिसतील . ह्यावेळी तू सुद्धा आपल्या गंभीर गर्जनेने मृदंगासारखे बोल घुमव . म्हणजे भगवान शंकराच्या उपासनेसाठी गीत , वाद्य आणि नृत्य असा संगीताचा संपूर्ण मेळ जमून येईल आणि कोणतीही उणीव उरणार नाही .
प्रालेयाद्रेरुपतटमतिक्रम्य तांस्तान् विशेषान्
हंसद्वारं भृगुपतियशोवर्त्म यत् क्रौञ्चरन्ध्रम् ।
तेनोदीचीं दिशमनुसरेस्तिर्यगायामशोभी
श्यामः पादो बलिनियमनाभ्युद्यतस्येव विष्णोः ॥ ६०॥
६० - हिमालयाजवळचे प्रेक्षणीय देखावे पाहून पलीकडे गेल्यावर तुला क्रौंच पर्वताची चिंचोळी खिंड दिसेल . इथूनच राजहंस मानस सरोवराकडे जातात . कार्तिकेयाने ह्या पर्वताला रंध्र पाडल्याचे ऐकून परशुरामानेही आपले शौर्य दाखवण्यासाठी दुसरे तसेच रंध्र पाडले. बळीराजाचे नियमन करण्यास श्रीविष्णूने उचललेल्या आपल्या कृष्णवर्णी पायाप्रमाणे दिसणारा आणि अरुंद अशा त्या रंध्रातून पलीकडे जाण्यासाठी तिरकस लांबच्या लांब पसरलेला तू फार शोभिवंत दिसशील . इथून तू पुढे उत्तरेच्या दिशेला मार्ग क्रमण कर .
गत्वा चोर्ध्वंदशमुखभुजोच्छ्वासितप्रस्थसंधेः
कैलासस्य त्रिदशवनितादर्पणस्यातिथिः स्याः ।
शृङ्गोच्छ्रायैः कुमुदविशदैर्यो वितत्य स्थितःखं
६१ - तिथून जरा वर जा आणि कैलासाचा पाहुणचार अनुभव . शिवभक्त रावणाने आपल्याला रोज शिवपूजेसाठी कैलासावर जावे लागू नये म्हणून कैलासालाच उचलून लंकेत न्यायचे ठरवले . त्यावेळी त्याने आपल्या बलशाली बाहूंनी कैलासाला खिळखिळे केले होते . बर्फामुळे चमकदार शुभ्र दिसणाऱ्या कैलास पर्वताचा तिथल्या देवांगना आपल्या नटण्यासाठी दर्पणासारखा उपयोग करतात . कैलास पर्वताची चंद्र-विकासी कमळाप्रमाणे दिसणारी उत्तुंग हिमाच्छादित शुभ्र शिखरे पहिली कि प्रतिदिन वृद्धिंगत झालेले आणि आकाशाला व्यापून राहिलेले ते शंकराचे मनमोकळे हास्यचं जणू असे वाटते .
उत्पश्यामि त्वयि तटगतेस्निग्धभिन्नाञ्जनाभे
सद्यःकृत्तद्विरददशनच्छेदगौरस्य तस्य ।
शोभामद्रेः स्तिमितनयनप्रेक्षणीयां भवित्रीं
अंसन्यस्ते सति हलभृतो मेचके वाससीव ॥ ६२॥
६२ - तुझी कांती खललेल्या काजळी प्रमाणे काळी तुकतुकीत आहे आणि हिमाच्छादित कैलास पर्वत नुकत्याच कापलेल्या हस्तीदंताच्या पांढऱ्या शुभ्र शकलाप्रमाणे आहे . श्यामलवर्णी तू जेव्हा या कैलासाच्या धवल उतरणीवर येशील तेव्हा पाहणाऱ्याला खांद्यावर काळे वस्त्र परिधान केलेल्या गौरवर्णी बलरामाची आठवण येईल . अनिमिष नेत्रांनी पाहत राहावे असे हे मनोरम आल्हाददायक दृश्य असेल .
हित्वा तस्मिन्भुजगवलयं शंभुना दत्तहस्ता
क्रीडाशैले यदि च विचरेत् पादचारेण गौरी ।
भङ्गीभक्त्या विरचितवपुः स्तम्भितान्तर्जलौघः
सोपानत्वं कुरु मणितटारोहणायाग्रयायी ॥ ६३॥
६३ - कैलासावरील क्रीडा शैलावर आपल्या हाताभोवती असलेले सर्प कंकण बाजूला सारून देवी पार्वतीला आधार देण्यासाठी हात पुढे केलेले भगवान शंकर तुला तिथे दिसतील . देवी पार्वतीला पायी चालताना त्रास होऊ नये म्हणून तू तत्परतेने पुढे होऊन आपल्या अंतर्भागी असलेले पाणी गोठव . लाटांप्रमाणे जुळणाऱ्या जिन्यासारखी आपल्या शरीराची रचना कर आणि देवी पार्वतीला रत्नजडीत शिखरावर चढण्यासाठी आपल्या शरीराचा झुलत्या पायऱ्यांचा जीना कर .
तत्रावश्यं वलयकुलिशोद्धट्टनोग्दीर्णतोयं
नेष्यन्ति त्वां सुरयुवतयो यन्त्रधारागृहत्वम् ।
ताभ्यो मोक्षस्तव यदि सखे घर्मलब्धस्य न स्यात्
क्रीडालोलाः श्रवणपरुषैर्गर्जितैर्भाययेस्ताः ॥ ६४॥
६४ - प्रखर उन्हामुळे होणारा उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी तिथल्या देवांगना आपल्या हातातील रत्नकंकणाच्या हिऱ्यांनी तुला टोचून टोचून तुला ओरखडतील आणि तुझ्यातले पाणी बाहेर सोडण्यास तुला भाग पाडतील. तुझ्या शीतल जलाच्या शिडकावा त्यांच्या तप्त देहावर व्हावा म्हणून तुझे हजारो रंध्राचे कारंजे करतील . त्यांच्या तावडीत जर अशा प्रकारे सापडलास तर तुझी सहजा सहजी सुटका होणे कठीण आहे . अशावेळी त्या खेळात रंगलेल्या देवांगनांना आपल्या प्रचंड गडगडाटाने भयभीत कर आणि आपली सुटका करून घे .
हेमाम्भोजप्रसवि सलिलं मानसस्याददानः
कुर्वन् कामात् क्षणमुखपटप्रीतिमैरावतस्य ।
धुन्वन्कल्पद्रुमकिसलयान्यंशुकानीव वातैः
नानाचेष्टैर्जलद ललितैर्निर्विशेस्तं नगेन्द्रम् ॥ ६५॥
६५ - मानस सरोवरात तुला सुवर्ण कमळे उमललेली आढळतील . तिथले शुद्ध निर्मळ पाणी प्राशन करून ताजातवाना हो . तिथे ऐरावत पाणी प्यायला आला असेल तर त्याच्या मुखावर छाया धर व सरींचा झिरझिरीत पडदा काही काळ त्याच्या मुखाभोवती धरून त्याला आनंदित कर . सुळसुळीत मुलायम रेशमी वस्त्राप्रमाणे वाऱ्यावर सळसळणार्या कल्पवृक्षाच्या कोवळ्या पालवीला थोडेसे गोंजार . अशाप्रकारे विविध क्रीडा करून आपला थकवा घालव आणि दीर्घकाळानंतर भेटलेल्या ह्या पर्वताचा मनसोक्त उपभोग घे .
तष्योत्सङ्गे प्रणयिन इव स्रस्तगङ्गादुकूलां
न त्वं दृष्ट्वा न पुनरलकां ज्ञास्यसे कामचारिन् ।
या वः काले वहति सलिलोद्गारमुच्चैर्विमाना
मुक्ताजालग्रथितमलकं कामिनीवाभ्रवृन्दम् ॥ ६६॥
६६ - हे इच्छेप्रमाणे संचार करणाऱ्या मेघा, ह्याच कैलास पर्वताच्या कुशीत विसावलेली अत्यंत मनोरम अशी अलका नागरी तू खात्रीने ओळखशीलच . कैलासाच्या उतरणीवर बाजूनेच वाहणारी गंगा नदी पहिली की अलकानगरी म्हणजे विरळ सूक्ष्म नेसूचे वस्त्र बाजूला सरकलेली मादक प्रणयीनीच भासते . भव्य उत्तुंग प्रासाद असलेल्या ह्या अलका नगरीवर वर्षाकाळी जलधारांची वृष्टी करणारे मेघ पाहिले की काळ्याभोर कुरळ्या केसात मोत्यांच्या सरी गुंफलेल्या नवयुवतीचा भास होतो .
विद्युत्वन्तं ललितवनिताः सेन्द्रचापं सचित्राः
सङ्गीताय प्रहतमुरजाः स्निग्धगम्भीरघोषम् ।
अन्तस्तोयं मणिमयभुवस्तुङ्गमभ्रंलिहाग्राः
अर्थ - कैलास पर्वतावरील या अलका नगरीत पोचल्यावर आकाशात अतिशय उंचावरून संचार करणाऱ्या तुझ्याशी तुलना करता येतील असे अनेक गगनस्पर्शी महाल तुला दिसतील . त्या प्रासादातील लावण्यवती स्त्रियांचे डोळे दिपवणारे तेज पाहून तुला तुझ्या अंतरंगी वास करणार्या विद्युल्लतेचाच भास होईल . तिथली सुशोभित चित्रे तुझ्या सभोवती निर्माण होणाऱ्या मनोरम इंद्रधनुष्या इतकीच रमणीय आहेत . प्रासादात सदैव घुमणारे मृदंगाचे बोल तुझ्या मधुर गंभीर घनगर्जने सारखेच श्रवणीय आहेत . रत्नखचित भूमी असलेले तिथले महाल आणि अंतर्भागी पाणी असलेला तू दोघेही सारखेच परिपूर्ण आहात . म्हणून तुला तिथे आपलेच प्रतिबिंब पाहत आहोत की काय असे वाटल्यास नवल नाही .
हस्ते लीलाकमलमलके बालकुन्दानुविद्धं
नीता लोध्रप्रसवरजसा पाण्डुतामानने श्रीः ।
चूडापाशे नवकुरबकं चारु कर्णे शिरीषं
सीमन्ते च त्वदुपगमजं यत्र नीपं वधूनाम् ॥ ६८॥
अर्थ - निसर्गात इतरत्र वेगवेगळ्या ऋतूत फुलणारी फुले अलकानगरीत मात्र सदैव फुललेली असतात . इथल्या काहीजणी हातात कमल पुष्पे घेऊन त्यांच्या वास घेताना दिसतील तर काही आपल्या कुरळ्या केसात कुंदाची ताजी फुले माळताना आढळतील . काहीजणींनी लोध्र फुलातील परागचुर्णाने आपले मुखसौंदर्य उजळवलेले असेल तर काहींनी आपल्या विपुल केशकलापात ताजी कोरांटीची फुले खोवलेली असतील . काहींनी कानात नाजूक शिरीषपुष्पांच्या मंजिरी आणि भांगामध्ये कदंबपुष्प माळलेले दिसेल .
यत्रोन्मत्तभ्रमरमुखराः पादपा नित्यपुष्पा
हंसश्रेणीरचितरशना नित्यपद्मा नलिन्यः ।
केकोत्कण्ठा भुवनशिखिनो नित्यभास्वत्कलापा
नित्यज्योत्स्नाः प्रतिहततमोवृत्तिरम्याः प्रदोषाः ॥६९॥
अर्थ - अलका नगरीतले वृक्ष बारा महिने फुललेले असतात . फुलातील मध पिऊन धुंद होऊन भ्रमर तिथल्या वृक्षांवर गुंजन करत असतात . पुष्करिणी सदैव कमल पुष्पांनी फुललेल्या असतात . त्यांच्या सुगंधाने मोहित झालेल्या तिथल्या हंसाच्या रांगा पाहून त्या पुष्करिणी हंस मेखलांनी नटलेल्या आहेत असा भास होतो . तिथे पाळीव मोर माना उंचावून केकारव करताना दिसतात . चंद्रप्रकाशामुळे उजळलेल्या व तिमिर नष्ट झालेल्या अलका नगरीतल्या रात्री अत्यंत रमणीय असतात .
आनन्दोत्थं नयनसलिलं यत्र नान्यैर्निमित्तैः
नान्यस्तापः कुसुमशरजादिष्टसंयोगसाध्यात् ।
नाप्यन्यस्मात्प्रणयकलहाद्विप्रयोगपपत्तिः
वित्तेशानां न च खलु वयो यौवनादन्यदस्ति ॥ ७०॥
अर्थ - अलकानगरीत कुणालाही दुख कसे ते माहीतच नाही . इथे केवळ आनंदानेच यक्षांच्या डोळ्यात अश्रू तरारतात . कोणतीही व्यथा , किंवा कोणत्याही तापाची बाधा इथल्या नगर जनांना कधीच होत नाही . या नगरीत केवळ मिलन सुखात अंतर पडणे हेच व्यथेचे एकमेव कारण आहे . पण ही व्यथा देखील अल्पकाळ टिकते . इथले यक्ष चिरतरुण असल्याने त्यांना म्हातारपण माहीतच नाही .
यस्यां यक्षाः सितमणिमयान्येत्य हर्म्यस्थलानि
ज्योतिश्छायाकुसुमरचितान्युत्तमस्त्रीसहायाः ।
आसेवन्ते मधु रतिफलं कल्पवृक्षप्रसूतं
त्वद्गम्भीरध्वनिषु शनकैः पुष्करेष्वाहतेषु ॥७१॥
अर्थ - इथल्या महालात स्फटिकांच्या रत्नजडीत गच्च्यांवर पडलेले ताऱ्यांचे प्रतिबिंब पुष्पांच्या सजावटी सारखे मनोरम दिसते . हे मेघा तुझ्या गंभीर ध्वनी सारखेच मधुर मृदंग वादन तिथे चालू असते . अशा प्रफुल्ल प्रसन्न वातावरणात यक्षगण आपल्या स्त्रियांसमवेत कल्पवृक्षातून काढलेले रतीफल नावाचे मद्य सेवन करत आपल्या वेळ मजेत घालवतात .
मन्दाकिन्याः सलिलशिशिरैः सेव्यमाना मरुद्भिः
मन्दाराणामनुतटरुहां छायया वारितोष्णाः ।
अन्वेष्टव्यैः कनकसिकतमुष्टिनिक्षेपगूढैः
अर्थ - इथल्या यक्ष कन्या मंदाकिनी नदीवरून वाहणाऱ्या शीतल वाऱ्याने आल्हादित होतात . मंदाकिनीच्या तटावरील मंदार वृक्षांच्या छायेत जाऊन त्या उन्हापासून आपला बचाव करतात . देवांनाही मोहात पाडणाऱ्या ह्या अत्यंत तेजस्वी आणि लावण्यवती यक्षकन्या मुठी भरभरून रत्ने घेतात आणि सुवर्णाच्या वाळूत लपवून पुन्हा शोधून काढण्याच्या रमणीय खेळात रंगलेल्या असतात .
नीवीबन्धोच्छ्वसितशिथिलं यत्र बिम्बाधराणां
क्षौमं रागादनिभृतकरेष्वाक्षिपत्सु प्रियेषु ।
अर्चिष्टुङ्गानभिमुखमपि प्राप्य रत्नप्रदीपान्
ह्रीमूढानां भवति विफलप्रेरणच्चूर्णमुष्टिः ॥७३॥
अर्थ - प्रेम विव्हल प्रियकराने जवळ ओढून आलिंगनात घेताच स्त्रियांच्या रेशमी वस्त्रांची निरगाठ सैल होते . त्यावेळी ह्या रुपगर्विता बावरून लज्जेने चूर होतात आणि आपल्या मुठीतले सुगंधी चूर्ण उधळून प्रासादातील रत्नदीप विझवण्याचा प्रयत्न करतात . पण रत्नदीपांच्या ज्योती तशाच तेवत राहिल्याने त्यांचे प्रयत्न असफल होतात आणि प्रियकराच्या मनातली इच्छा पूर्ण होते .
नेत्रा नीताः सततगतिना यद्विमानाग्रभूमीः
आलेख्यानां नवजलकणैर्दोषमुत्पाद्य सद्यः ।
शङ्कास्पृष्टा इव जलमुचस्त्वादृशा जालमार्गैः
धूमोद्गारानुकृतिनिपुणा जर्जरा निष्पतन्ति ॥ ७४॥
अर्थ - वाऱ्याच्या झोक्याबरोबर तुझासारखे अनेक मेघ तिथल्या महालात अगदी वरच्या मजल्या पर्यंत जातात . काही मेघ आत शिरून भिंतीवरील चित्रे धूसर करतात तर काही आपल्या तुषारांनी चित्रे भिजवून खराब करतात . नंतर आपण कोणता अपराध केला हे कळताच मात्र घाबरून महालातील जाळीदार गवाक्षातून कसेबसे अंग चोरून छिन्नविच्छिन्न होऊन धुम्र रुपात वेगाने बाहेर पडतात .
यत्र स्त्रीणां प्रियतमभुजालिङ्गनोच्छ्वासितानां
अङ्गग्लानिं सुरतजनितां तन्तुजालावलम्बाः ।
त्वत्संरोधापगमविशदैश्चन्द्रपादैर्निशीथे
व्यालुम्पन्ति स्फुटजललवस्यन्दिनश्चन्द्रकान्ताः ॥ ७५॥
अर्थ - प्रासादातील छतांच्या मध्यभागी चंद्रकांत मण्यांच्या माळा लोंबत असतात . उत्तर रात्री ह्या मण्यांवर निर्मल नितळ चंद्र किरण पडले की ते मणी द्रवतात आणि मंचकांवर मण्यांचा रस पाझरतो . ह्या आल्हाददायी सुखद वातावरणामुळे प्रियकरांच्या आलिंगनातून सुटलेल्या कामिनींचा सुरतक्रीडेचा शारीरिक थकवा नाहीसा होतो .
अक्षय्यान्तर्भवननिधयः प्रत्यहं रक्तकण्ठैः
उद्गायद्भिर्धनपतियशः किंनरैर्यत्र सार्धम् ।
वैभ्राजाख्यं विबुधवनितावारमुख्यासहाया
बद्धालापा बहिरुपवनं कामिनो निर्विशन्ति ॥ ७६॥
अर्थ - या अलका नगरीतील भवनात लक्ष्मीचा अखंड वास असतो . सर्वत्र समृद्धीचे वातावरण दिसते . यक्ष आणि किन्नर इथे धनपति कुबेराचे यशोगान करताना दिसतात . ह्या नगरी बाहेर असलेल्या वैभ्राज नावाच्या उद्यानात विलासी यक्ष तारुण्याने मुसमुसलेल्या देवांगनांबरोबर नाना प्रकारच्या विलासात कायम दंग असतात .
गत्युत्कम्पादलकपतितैर्यत्र मन्दारपुष्पैः
पत्रच्छेदैः कनककमलैः कर्णविभ्रंशिभिश्च ।
मुक्ताजालैः स्तनपरिसरश्छिन्नसूत्रैश्च हारैः
अर्थ - हे जलदा पहाटे सूर्योदय झाल्यावर तुला मार्गांवर वेणीतून निसटलेली मंदार पुष्पे गळून पडलेली आढळतील . कामिनींच्या कानांवरून निखळलेले सुवर्ण कमळांच्या पाकळ्यांचे तुकडे सुद्धा मार्गावर विखुरलेले दिसतील . रात्रीच्या अंधारात ठुमकत मुरडत , वाटेत अडखळत जाताना त्यांच्या स्तन प्रदेशावर घासल्याने पदर तुटून सरातील मोती ओघळलेले दिसतील . या सर्व खुणा अभिसारीकांच्या मार्गाचे गुपित फोडतात . विलासिनी स्त्रिया आपल्या प्रियकराच्या घरी रात्री कोणत्या मार्गाने गेल्या ते त्यांच्या ह्या खुणांमुळे सहज ओळखता येते .
वासश्चित्रं मधु नयनयोर्विभ्रमादेशदक्षं
पुष्पोद्भेदं सह किसलयैर्भूषणानां विकल्पम् ।
लाक्षारागं चरणकमलन्यासयोग्यं च यस्याम्
एकः सूते सकलमबलामण्डनं कल्पवृक्षः ॥७८॥
अर्थ - परिधान करण्यासाठी लागणारी विविध प्रकारची मुलायम वस्त्रे , मादक नजरांना खुलवणारे मद्य , केशभूषेसाठी लागणारी कोवळी पालवी आणि सुगंधित विकसित पुष्पे आणि पायांना रंगवण्यासाठी लाल रंगाची लाक्षा हे सारे देण्यास अलका नगरीत असलेला कल्पवृक्ष एकटाच समर्थ आहे .
पत्रश्यामा दिनकरहयस्पर्धिनो यत्र वाहाः
शैलोदग्रास्त्वमिव करिणो वृष्टिमन्तः प्रभेदात् ।
योधाग्रण्यः प्रतिदशमुखं संयुगे तस्थिवांसः
प्रत्यादिष्टाभरणरुचयश्चन्द्रहासव्रणाङ्कैः॥७९ ॥
अर्थ - त्या अलकानगरीतील घोड्यांचा रंग हिरव्यागार पानांसारखा हरित असल्याने ते दिनकराच्या घोड्यांशी बरोबरी करतात . तेथील हत्ती पर्वतासमान उत्तुंग आणि मदस्रावा मुळे तुझ्यासारखेच वर्षाव करणारे आहेत . तिथले श्रेष्ठ योद्धा रावणा बरोबर झालेल्या युद्धात त्याच्याशी युद्ध करताना रावणाच्या चंद्रहास नावाच्या तलवारीने झालेल्या घावांच्या खुणा अंगावर अभिमानाने मिरवत असल्याने त्यांना इतर कोणत्याही आभूषणांची इच्छाच नाही .
मत्वा देवं धनपतिसखं यत्र साक्षाद् वसन्तं
प्रायश्चापं न वहति भयान् मन्मथः षट्पदज्यम् ।
सभ्रूभङ्गप्रहितनयनैः कामिलक्ष्येष्वमोघैः
तस्यारम्भश्चतुरवनिताविभ्रमैरेव सिद्धः ॥८०॥
अर्थ - कुबेराचा मित्र भगवान शंकराचे वास्तव्य अलका नगरीतच आहे . तो आपल्याला परत जाळेल ह्या भयाने मदन भ्रमराची दोरी असलेले आपले कामोद्दीपक धनुष्य इथे चुकूनही उचलत नाही . तरीही इथल्या सौदर्यवती ललना कामुक पुरुषांना अचूक हेरून त्यांना लक्ष्य बनवतात . आणि आपले मादक भ्रुकटाक्ष फेकतात . ह्या ललनांचे विविध शृंगारिक विलास पाहून मदन खुश होतो .
तत्रागारं धनपतिगृहानुत्तरेणास्मदीयं
दूराल्लक्ष्यं सुरपतिधनुश्चारुणा तोरणेन ।
यस्योपान्ते कृतकतनयः कान्तय वर्धितो मे
हस्तप्राप्यस्तबकनमितो बालमन्दारवृक्षः ॥८१॥
अर्थ - ह्या अलका नगरीत कुबेराच्या प्रासादाजवळ उत्तरेला आमचे घर आहे . प्रवेशद्वारावर असलेल्या इंद्रधनुष्यासारख्या मोहक तोरणामुळे ते दुरूनही लक्ष वेधून घेतं . अंगणात माझ्या पत्नीने पुत्रासारखा पाळलेला लहानसा मंदार वृक्ष आहे ज्याची फुले हाताने सहज तोडता येतात . पुष्पगुच्छांच्या भाराने वाकल्याने जणू तो नमन करत आहे असेच वाटते .
वापी चास्मिन् मरकतशिलाबद्धसोपानमार्गा
हैमैश्छन्ना विकचकमलैः स्निग्धवैदूर्यनालैः ।
यस्यास्तोये कृतवसतयो मानसं संनिकृष्टं
अर्थ - आमच्या घरात एक विहीर आहे जिच्यात उतरण्यासाठी पाचुंनी मढवलेल्या पायऱ्या आहेत . वैदुर्यमण्यांचे देठ असलेल्या पूर्ण उमललेल्या सुवर्णकमळांनी ती विहीर कायमच पूर्णपणे भरलेली असते . ह्या विहिरीत अनेक हंस राहतात . विहिरीचं पाणी इतक स्वच्छ नितळ आहे की तुला पाहून , वर्षा ऋतू जवळ आल्याचा संकेत मिळूनही ते हंस जवळच असलेल्या मानससरोवराकडे जायला उत्सुक नसणार .
तस्यास्तीरे रचितशिखरः पेशलैरिन्द्रनीलैः
क्रीडाशैलः कनककदलीवेष्टनप्रेक्षणीयः ।
मद्गेहिन्याः प्रिय इति सखे चेतसा कातरेण
प्रेक्ष्योपान्तस्फुरिततडितं त्वां तमेव स्मरामि ॥ ८३॥
अर्थ - त्या पुष्करिणीच्या काठावर एक लहानसा क्रीडापर्वत आहे. त्याचे शिखर इंद्रनील मण्यांनी मढवलेले आहे . त्या शिखरा भोवती असलेल्या सुवर्ण कर्दळी मुळे तो अतिशय सुंदर दिसतो . हे मित्रा ! विजांमुळे तुझे शरीर जेव्हा उजळून निघते तेव्हा तुला पाहून मला माझ्या प्रियेचे आवडते ठिकाण असलेल्या त्या नीलवर्णी चमचमत्या क्रीडापर्वताची आठवण होते आणि मन बेचैन होते .
रक्ताशोकश्ः चलकिसलयः केसरश्चात्र कान्तः
प्रत्यासन्नौ कुरबकवृतेर्माधवीमण्डपस्य ।
एकः सख्यास्तव सह मया वामपादाभिलाषी
काङ्क्षत्यन्यो वदनमदिरां दोहदच्छद्मनास्याः ॥ ८४॥
अर्थ - या क्रीडापर्वतावर तांबड्या कोरांटीचे कुंपण असलेला मधुमालतीचा एक मनोरम लतामंडप आहे . जवळच कोवळ्या पालवीने बहरलेले अशोक आणि बकुल वृक्ष आहेत . अशोक वृक्ष माझ्याप्रमाणेच तुझ्या मैत्रिणीच्या डाव्या पायाच्या स्पर्शाची अभिलाषा बाळगतो . तुला माहीतच असेल की सुंदर स्त्रीच्या डाव्या पायाची लाथ बसताच रक्तअशोक बहरून जातो . बकुल वृक्ष देखील केसर यावेत म्हणून माझ्या प्रियेच्या वदनमदिरेच्या चुळीची लालसा बाळगतो .
तन्मध्ये च स्फटिकफलका काञ्चनी वासयष्टिः
मूले बद्धा मणिभिरनतिप्रौढवंशप्रकाशैः ।
तालैः शिञ्जावलयसुभगैर्नर्तितः कान्तया मे
यामध्यास्ते दिवसविगमे नीलकण्ठः सुहृद् वः ॥ ८५॥
अर्थ - या वृक्षांच्या मध्ये पक्ष्यांना विसावण्यासाठी एक पाचूचा चौथरा बांधलेला तुला दिसेल . त्यावर एक सोन्याची दांडी बसवलेली आहे जिच्या खाली एक शुभ्र स्फटिकाची फळी आहे . माझी कांता रोज सायंकाळी टाळ्या वाजवीत असताना तिच्या कंकणांच्या मधुर तालावर तुझा मित्र मोर तिथे नृत्य करतो .
एभिः साधो हृदयनिहितैर्लक्षणैर्लक्षयेथा
द्वारोपान्ते लिखितवपुषौ शङ्खपद्मौ च दृष्ट्वा ।
क्षामच्छायं भवनमधुना मद्वियोगेन नूनं
सूर्यापाये न खलु कमलं पुष्यति स्वामभिख्याम् ॥ ८६॥
अर्थ - हे चतुर मेघा ! माझ्या घराच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला शंख पद्म यांच्या आकृती काढलेल्या आहेत . ह्या सर्व खुणांमुळे तु माझे घर नक्की शोधून काढशील . पण सूर्य मावळल्यावर कमळ जसे कोमेजून जाते तसेच माझ्या वियोगात माझे घर देखील अगदी उदास कळाहीन झालेले असेल .
गत्वा सद्यः कलभतनुतां शीघ्रसम्पातहेतोः
क्रीडाशैले प्रथमकथिते रम्यसाणौ निषण्णः ।
अर्हस्यन्तर्भवनपतितां कर्तुमल्पाल्पभासं
अर्थ - माझ्या गृहात तुला विना विलंब प्रवेश करता यावा म्हणून तू आधी हत्तीच्या पिला प्रमाणे आटोपशीर शरीर धारण करून प्रथम मी सांगितलेल्या क्रीडाशैलावर जाऊन बस . तुझ्यामुळे एकदम मोठ्या प्रकाशाचा झोत घरात आला तर माझी कांता भयाने दचकेल . विजांचा कडकडाट न करता काजव्यांच्या लुकलुकणाऱ्या मंद प्रकाशात माझ्या घरात हळूच डोकाव .
तन्वी श्यामा शिखरदशना पक्वबिम्बाधरोष्ठी
मध्ये क्षामा चकितहरिणीप्रेक्षणा निम्ननाभिः ।
श्रोणीभारादलसगमना स्तोकनम्रा स्तनाभ्यां
या तत्र स्याद् युवतिविषये सृष्टिराद्येव धातुः ॥ ८८॥
अर्थ - आत तुला माझी सुकुमार पत्नी दिसेल . माझी नवयौवना प्रिया खोल नाभी असलेली , सडपातळ बांध्याची , कळ्यांप्रमाणे नाजूक दात असलेली , पिकल्या तोंडल्याप्रमाणे लालचुटूक अधर असलेली , बारीक कटी आणि हरिणीसारखे भिरभिरणारे नेत्र असलेली अशी अलौकिक लावण्यवती आहे . पुष्ट नितम्बांमुळे तिची चाल मंद मोहक असून पुष्ट स्तनभाराने ती किंचित वाकलेली असेल . तिचे लावण्य पाहून विधात्याने निर्माण केलेली ती सर्वोत्कृष्ट निर्मिती आहे याची तुलाही खात्री पटेलच .
तां जानीथाः परिमितकथां जीवितं मे द्वितीयं
दूरीभूते मयि सहचरे चक्रवाकीमिवैकाम् ।
गाढोत्कण्ठा गुरुषु दिवसेष्वेषु गच्छत्सु बालां
जातां मन्ये शिशिरमथितां पद्मिनीं वान्यरूपाम् ॥८९॥
अर्थ - माझी कान्ता म्हणजे माझंच दुसरं शरीर आहे असं समाज . मी दूर असल्याने ती एकाकी चक्रवाकी पक्षिणी प्रमाणे माझ्या विरहात झुरत असेल . विरहाचे असह्य दिवस कसेबसे कंठत शिशिरातील थंडीच्या कडाक्याने पार कोमेजलेल्या कमलिनी प्रमाणे ती विरूप दिसेल . पण म्हणून ही दुसरीच कुणी आहे की काय ह्या संभ्रमात मात्र तू अजिबात राहू नकोस .
नूनं तस्याः प्रबलरुदितोच्छूननेत्रं प्रियाया
निःष्वासानामशिशिरतया भिन्नवर्णाधरोष्ठम् ।
हस्तन्यस्तं मुखमसकलव्यक्ति लम्बालकत्वाद्
इन्दोर्दैन्यं त्वदनुसरणक्लिष्टकान्तेर्बिभर्ति ॥९०॥
अर्थ - माझ्या विरहात ती अविरत अश्रू ढाळत बसलेली असेल . रडून रडून तिचे डोळे सुजलेले असतील , उष्ण निश्वासामुळे तिचे अधर काळवंडून गेले असतील . माझ्या काळजीत ती आपले हात गालांवर टेकून सारखे उसासे सोडत बसलेली असणारं . केशभूषा न केल्याने तिचा केशसंभार मुखावर अस्ताव्यस्त विखुरलेला असेल . तुझ्या आड येण्याने चंद्र जसा निस्तेज कळाहीन दिसतो तसेच तिचे कोमल सतेज मुख विरहाने दीनवाणे कळाहीन झालेले तुला दिसेल .
आलोके ते निपतति पुरा सा बलिव्याकुला वा
मत्सादृश्यं विरहतनु वा भावगम्यं लिखन्ती ।
पृच्छन्ती वा मधुरवचनां शारिकां पञ्जरस्थां
कच्चित् भर्तुः स्मरसि रसिके त्वं हि तस्य प्रियेति ॥९१॥
अर्थ - कदाचित आमचा विरह लौकर संपावा म्हणून देवतेची आराधना करण्यात ती मग्न असेल . विरहावस्थेमुळे माझी काय अवस्था झाली असेल याचे ती कल्पनेने चित्र रेखाटत असेल . किंवा पिंजर्यातील मंजुळ बोल बोलणाऱ्या आणि मला अतिशय प्रिय असलेल्या सारीकेला माझी आठवण येते का असे विचारत असेल .
उत्सङ्गे वा मलिनवसने सोम्य निक्षिप्य वीणां
मद्गोत्राङ्कं विरचितपदं गेयमुद्गातुकामा ।
तन्त्रीमार्द्रां नयनसलिलैः सारयित्वा कथं चिद्
अर्थ - पती दूर गेल्याने विरहात असलेल्या स्त्रीने नवे वस्त्र नेसू नये असा संकेत असल्याने माझ्या प्रियेने मलीन वस्त्र परिधान केलेलं असणारं . मांडीवर वीणा ठेऊन माझे नाव गुंफून स्वतःच रचलेले एखादे गीत गायचा ती प्रयत्न करत असेल . पण तिच्या डोळ्यातून अविरत वाहणाऱ्या अश्रूंमुळे तिच्या मांडीवरील वीणेच्या तारा ओल्या होतील . आणि वारंवार अश्रू पुसण्याच्या प्रयत्नात ती गीताचे बोल विसरत असेल .
शेषान् मासान् विरहदिवसप्रस्थापितस्यावधेर्वा
विन्यस्यन्ती भुवि गणनया देहलीदत्तपुष्पैः ।
(संयोगं) मत्सङ्गं वा हृदयनिहितारम्भमास्वादयन्ती
प्रायेणैते रमणविरहेष्वङ्गनानां विनोदाः ॥९३॥
अर्थ - विरहाच्या पहिल्या दिवसापासून माझा शापकाल संपेपर्यंतचे दिवस मोजण्यासाठी ती रोज घराच्या उंबरठ्यावर एक एक फुल ठेवत असेल . ती फुलांची रास मोजून आता विरहाचे किती महिने उरले याचा ती मनाशी परत परत हिशेब करत असेल . आमच्या मिलनाच्या क्षणाची मनातल्या मनात सारखी कल्पना करत असेल . विरह प्रसंगी आपले दुख विसरण्यासाठी विरंगुळा म्हणून स्त्रियांचे अशा कल्पनांमध्ये रमणे अगदी साहजिकच आहे .
सव्यापारामहनि न तथा पीडयेन्मद्वियोगः
शङ्के रात्रौ गुरुतरशुचं निर्विनोदां सखीं ते ।
मत्संदेशैः सुखयितुमलं पश्य साध्वीं निशीथे
तामुन्निद्रामवनिशयनां सौधवातायनस्थः ॥९४॥
अर्थ - दिवस भराच्या कामात तिचा वेळ कसातरी निघून जाईल . पण रात्री मात्र तिचे मन कशातही रमणार नाही . अति दुखाने तिला झोपही येत नसेल . विरही स्त्रीला पर्यंकशैय्या देखील वर्ज्य असते . म्हणून ती तुला दुखी कष्टी अवस्थेत जमिनीवर पहुडलेली दिसेल . अशा अवस्थेत माझा निरोप मिळाला तर ती मनोमन सुखावून जाईल . म्हणूनच तू तिच्या दृष्टीस पडशील असा माझ्या वाड्याच्या खिडकीपाशी जाऊन उभा राहा आणि तिची भेट घे .
आधिक्षामां विरहशयने संनिषण्णैकपार्श्वां
प्राचीमूले तनुमिव कलामात्रशेषां हिमांशोः ।
नीता रात्रिः क्षण इव मया सार्धमिच्छारतैर्या
तामेवोष्णैर्विरहमहतीमश्रुभिर्यापयन्तीम् ॥९५॥
अर्थ - माझ्या विरह व्यथेत झुरणारी माझी प्रिया एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर तळमळत असलेली तुला दिसेल . पूर्वक्षितिजावर ज्याप्रमाणे एक कलामात्र शेष उरलेली चंद्रकोर फिकट पणे दिसते तशीच माझी कांता देखील केवळ छाया रूपाने आपले अस्तित्व टिकवून कशीबशी जीवन कंठत असेल . माझ्या सोबत घालवलेल्या अनिर्बंध प्रणयरात्री पूर्वी तिला एका क्षणासारख्या वाटत असत . पण आता त्याच रात्री मी नसल्याने कंटाळवाण्या कधीच न संपणाऱ्या वाटत असतील . रात्रभर ती पूर्व आठवणीत दुखाश्रू ढाळत बसलेली तुला दिसेल . तू विलंब न करता तिला भेट .
पादानिन्दोरमृतशिशिरान् जालमार्गप्रविष्टान्
पूर्वप्रीत्या गतमभिमुखं संनिवृत्तं तथैव ।
चक्षुः खेदात् सलिलगुरुभिः पक्ष्मभिश्छादयन्तीं
साभ्रेऽह्नीव स्थलकमलिनीं न प्रबुद्धां न सुप्ताम् ॥९६॥
अर्थ - माझ्या सोबत रात्र घालवताना झरोक्यातून आत शिरणारे अमृताप्रमाणे भासणारे शीतल चंद्र किरण तिला आता सुखकर वाटणार नाहीत . उलट त्यांना पाहून तीव्रतेने तिला माझी आठवण येईल . दुखातीशयाने तिचे डोळे आसवांनी डबडबून जातील . मेघांनी आकाश झाकोळून गेले कि भुई कमळ जसे अर्धवट उमललेले असते तशीच माझी प्रिया देखील तुला मलूल दिसेल .
निःश्वासेनाधरकिसलयक्लेशिना विक्षिपन्तीं
शुद्धस्नानात् परुषमलकं नूनमागण्डलम्बम् ।
मत्संभोगः कथमुपनयेत् स्वप्नजोऽपीति निद्रां
अर्थ - पती दूर असलेल्या स्त्रीला अभ्यंग स्नान देखील वर्ज्य असते . अभ्यंगविरहित स्नानामुळे माझ्या प्रियेचे केस राठ रखरखीत होऊन गालांवर पसरलेले असतील . तिच्या कुरळ्या केसांच्या बटा भुरभूर उडत असतील . लांब सुस्कारे टाकून टाकून तिचे लुसलुशीत अधर दुखाने थरथर कापत असतील . स्वप्नात का होईना माझ्याशी समागम होईल ह्या कल्पनेने तिच्या नेत्रात आनंदाश्रू दाटलेले असतील पण तिची झोप मात्र उडालेली असेल . अशा माझ्या प्रियेला हे मेघा तू भेट .
आद्ये बद्धा विरहदिवसे या शिखा दाम हित्वा
शापस्यान्ते विगलितशुचा तां मयोद्वेष्टनीयाम् ।
स्पर्शद्विष्टामयमितनखेनासकृत् सारयन्तीं
गण्डाभोगात् कठिनविषमामेकवेणीं करेण ॥ ९८॥
अर्थ - पती दूर असलेल्या स्त्रीला केशभूषा देखील वर्ज्य असते . ज्या दिवशी आमची ताटातूट झाली त्याचं दिवशी तिने फुलांची वेळी न माळता एकपेडी वेणी घातली . मी शापमुक्त होऊन आल्यावर मीच ती वेणी परत सोडवणार असल्याने माझ्या प्रियेचे अस्ताव्यस्त झालेले खरखरीत केस टोचून तिला ओरखडे आले असतील . मेघा अशा नखे न कापलेल्या हातांनी आपले भुरभुरणारे केश गालांवरून वारंवार सावरणाऱ्या माझ्या प्रियेला तू भेट .
सा संन्यस्ताभरणमबला पेशलं धारयन्ती
शय्योत्सङ्गे निहितमसकृद् दुःखदुःखेन गात्रम् ।
त्वामप्यस्रं नवजलमयं मोचयिष्यत्यवश्यं
प्रायः सर्वो भवति करुणावृत्तिरार्द्रान्तरात्मा ॥ ९९॥
अर्थ - पती दूर असलेल्या स्त्रीला देहभूषा देखील वर्ज्य असते. तिच्या अंगावर एकही दागिना नसेल . विरहाने रोडावलेली अस्वस्थपणे वारंवार कूस बदलण्याचा चाळा करणारी ती कृशांगी पाहून हे मेघा पोटात पाणी असलेल्या तुला पाझर फुटल्या शिवाय राहणार नाही . तू नक्कीच जलवृष्टी करून अश्रू ढाळशील . मृदू अंतकरणाचा प्रत्येक माणूस दयाशीलच असतो .
जाने सख्यास्तव मयि मनः संभ्र्तस्नेहमस्माद्
इत्थंभूतां प्रथमविरहे तामहं तर्कयामि ।
वाचालं मां न खलु सुभगंमन्यभावः करोति
प्रत्यक्षं ते निखिलमचिराद् भ्रातरुक्तं मया यत् ॥१००॥
अर्थ - तुझ्या सखीच्या हृदयात माझ्या विषयी अपार प्रेम असल्यानेच तिची अशी केविलवाणी दयनीय अवस्था झालेली असणार . मी स्वतःला भाग्यवान समजत असलो तरी मी तिच्या अवस्थे विषयी उगाचंच खोटी बडबड करतो असे अजिबात समजू नकोस . मी तिचे केलेले वर्णन अगदी यथार्थ आहे हे तुला तिला पाहताच कळेल .
रुद्धापाङ्गप्रसरमलकैरञ्जनस्नेहशून्यं
प्रत्यादेशादपि च मधुनो विष्मृतभ्रूविलासम् ।
त्वय्यासन्ने नयनमुपरिस्पन्दि शङ्के मृगाक्ष्या
मीनक्षोभाच्चलकुवलयश्रीतुलामेष्यतीति ॥१०१॥
अर्थ - तिच्या कुरळ्या केसांच्या रखरखीत बटा डोळ्यांवर आल्याने कटाक्षांचा दिमाख नाहीसा झालेला असेल . डोळ्यात काजळाचा लवलेशही नसल्याने ते तुकतुकीत व बोलके वाटणार नाहीत . पती दूरदेशी असलेल्यांना मद्य वर्ज्य असल्याने भृकुटी व नेत्रांचे आकर्षक चाळे सुद्धा ती पूर्णपणे विसरली असेल . पण तुला पाहताच माशांच्या चपळ हालचालींमुळे पाण्यातील थरथरणाऱ्या नीलकमळा सारखा त्या हरिणाक्षीचा डावा डोळा लवू लागेल .
वामश्चास्याः कररुहपदैर्मुच्यमानो मदीयैः
मुक्ताजालं चिरपरिचितं त्याजितो दैवगत्या ।
संभोगान्ते मम समुचितो हस्तसंवाहनानां
अर्थ - आमच्या वियोगाला दीर्घ काळ उलटल्याने तिच्या मांडीवर माझ्या नखांच्या खुणा तुला दिसणार नाहीत आणि नखचिन्हांची दाहकता कमी करण्यासाठी तिला आता शीतल मोत्यांची माळ वापरावी लागत नसेल . आमच्या मिलनानंतर शीण जावा म्हणून मी नेहमी चुरुन देत असलेली तिची रसरशीत केळीच्या गाभ्यासारखी गोरीपान डावी मांडी सुद्धा थरथरू लागेल . डावा डोळा लावणे , डावी मांडी स्फुरण पावणे हे शुभशकून तिला माझ्या आगमनाची पूर्व सूचना नक्कीच देतील .
तस्मिन् काले जलद यदि सा लब्धनिद्रासुखा स्याद्
अन्वास्यैनां स्तनितविमुखो याममात्रं सहस्व ।
मा भूदस्याः प्रणयिनि मयि स्वप्नलब्धे कथं चित्
सद्यः कण्ठच्युतभुजलताग्रन्थि गाढोपगूढम् ॥१०३॥
अर्थ - हे जलदा , तू पोहोचशील तेव्हा जर ती झोपलेली असेल तर गर्जना करून तिला जागवू नकोस . काही प्रहर तिथेच दारी शांत बसून राहा . स्वप्नात कदाचित तिचे माझे मिलन झालेले ती अनुभवत असेल . स्वप्नातली माझ्या गळ्या भोवतालची तिची मिठी तुझ्या गर्जनेने सैल पडून ती आलिंगन सौख्याला पारखी होणार नाही याची काळजी घे .
तामुत्थाप्य स्वजलकणिकाशीतलेनानिलेन
प्रत्याश्वस्तां सममभिनवैर्जालकैर्मालतीनाम् ।
विद्युद्गर्भः स्तिमितनयनां त्वत्सनाथे गवाक्षे
वक्तुं धीरस्तनितवचनैर्मानिनीं प्रक्रमेथाः ॥१०४॥
अर्थ - विजांचा कडकडाट किंवा मुसळधार वृष्टी नको करूसं , अशाने ती बावरून जाईल . त्यापेक्षा हे मेघा तुझ्या जलतुशारांनी हवा थंड आल्हाददायक कर . शीतल वार्याची झुळूक गवाक्षातून तिच्या हलकेच अंगावरून गेली कि ती जागी होईल . पहाटेच्या दव भरल्या मालतीच्या पुष्पासारखी टवटवीत तजेलदार होईल . तुला तिथे गवाक्षी पाहून आश्चर्यचकित होईल . परस्त्रीशी कधीही एकट्याने बोलू नये . म्हणून तू आपली कांता विद्युल्लतेला घेवूनच त्या मानिनीला माझ्या प्रियेला भेट आणि विश्वासाने , मोकळेपणाने आपल्या गंभीर मधुर शब्दात तिच्याशी आश्वासक बोल .
भर्तुर्मित्रं प्रियमविधवे विद्धि मामम्बुवाहं
तत्संदेशैहृदयनिहितैरागतं त्वत्समीपम् ।
यो वृन्दानि त्वरयति पथि श्राम्यतां प्रोषितानां
मन्द्रस्निग्धैर्ध्वनिभिरबलावेणिमोक्षोत्सुकानि ॥ १०५॥
अर्थ - हे मेघा माझ्या प्रियेला सांग “ हे सुभगे मी मेघ , तुझ्या पतीचा जिवलग स्नेही आहे . तुझ्या विरहात दुखाने व्याकूळ झालेल्या तुझ्या पतीचा प्रीतीसंदेश माझ्या हृदयात बाळगून तुला देण्यासाठी इथे आलो आहे . तू मला ओळखले नाहीस का ? विरहाने व्याकूळ झालेले प्रियजन माझा गडगडाट ऐकताच आपल्या गृहाकडे जायला त्वरेने निघतात . प्रेमीजनांचे मिलन घडवणे हेच माझ कार्य आहे . प्रियकर आपल्या विरही प्रियेच्या केशसंभाराचा गुंता मोकळा करण्यास उत्सुक असतात . प्रवासात ते दमले असले तरी मी माझ्या मधुर गंभीर गर्जनांनी मी त्यांना आपल्या घरी जाण्यास अधीर बनवतो”.
इत्याख्याते पवनतनयं मैथिलीवोन्मुखी सा
त्वामुत्कण्ठोच्छ्वसितहृदया वीक्ष्य संभव्य चैव ।
श्रोष्यत्यस्मात् परमवहिता सौम्य सीमन्तिनीनां
कान्तोदन्तः सुहृदुपनतः सङ्गमात्किंचिदूनः ॥ १०६॥
अर्थ - हे मेघा तुझ्या अगमनाचे कारण कळताच माझी प्रिया प्रफुल्लीत होऊन उत्सुकतेने तुला निरखून पाहू लागेल . पवनपुत्र हनुमानाला पाहिल्यावर मैथिलीने जसे आनंदून त्याचे सन्मानाने स्वगत केले होते अगदी तसेच माझी कांता तुझेही प्रेमपूर्वक स्वगत करील आणि तुझे बोलणे अगदी कानात प्राण आणून एकाग्रतेने ऐकेल . मेघा तुला तर माहीतच असेल की आपल्या पती विषयी त्याच्या परम मित्राकडून मिळालेली त्याच्या संबंधीची कुशल वार्ता सुद्धा स्त्रियांना पतीच्या प्रत्यक्ष भेटीइतकीच सुखद वाटते .
तामायुष्मन् मम च वचनादात्मनः चोपकर्तुं
ब्रूयादेवं तव सहचरो रामगिर्याश्रमस्थः ।
अव्यापन्नः कुशलमबले पृच्छति त्वां वियुक्तः
अर्थ - हे चिरंजीव मेघा , कायम परोपकराचे व्रत आचरणारा तू , माझी विनंती मान्य करून माझ्या प्रियेकडे जात आहेस . तिला सांग “ हे अबले सध्या तुझ्या सहचर रामगिरी पर्वतावरील एका आश्रमात वास्तव्य करत आहे . तो सुखरूप असला तरी तुझ्या विरहात अत्यंत व्याकूळ झाला आहे . तो सदैव तुझ्याच आठवणीत दंग असतो . तू कशी आहेस हे जाणून घ्यायला तो उत्सुक आहे . वियोग काळी आपल्या प्रिय व्यक्तीचे कुशल जाणून घेण्या व्यतिरिक्त विरहीजन दुसरे काहीही करू शकत नाहीत .
अङ्गेनाङ्गं प्रतनु तनुना गाढतप्तेन तप्तं
सास्रेणाश्रुद्रुतमविरतोत्कण्ठमुत्कण्ठितेन ।
उष्णोच्छ्वासं समधिकतरोच्छ्वासिना दूरवर्ती
सङ्कल्पैस्तैर्विशति विधिना वैरिणा रुद्धमार्गः ॥ १०८॥
अर्थ - हे मेघा तिला सांग की “ दैवगतीच्या दुर्दैवी फेऱ्यामुळे तुझ्या पतीला तुझ्यापासून खूप लांब रहावं लागत आहे , त्याच्या मार्गात अनेक अडथळे आहेत , दुखाने त्याचे डोळे तप्त होऊन अश्रूंनी डबडबले आहेत , विरहाने तो कृश झाला आहे , तुझ्या आठवणीत तो सतत झुरत असतो . तुझी देखील अवस्था त्याच्यापेक्षा वेगळी नसणार हे त्याला माहित आहे . ह्या विरहावस्थेत प्रत्यक्ष मिलन जरी शक्य नसले तरी कल्पनेत मात्र सदैव तो केवळ तुझ्याशीच समरस होत आहे असेच तू समज ” .
शब्दाख्येयं यदपि किल ते यः सखीनां पुरस्तात्
कर्णे लोलः कथयितुमभूदाननस्पर्शलोभात् ।
सोऽतिक्रान्तः श्रवणविषयं लोचनाभ्यामदृष्टः
त्वामुत्कण्ठाविरचितपदं मन्मुखेनेदमाह ॥ १०९॥
अर्थ - “ पूर्वी तुम्ही एकत्र असताना ज्या तुझ्या सखीनच्यासमोर सहज सांगता येतील अशा अगदी साध्या उघड गोष्टीही तो तुझ्या कानात सांगण्यासाठी आसुसलेला असे . त्यामागे तुझ्या मुखाचा होणारा स्पर्श , सहज चुंबनाची मिळणारी संधी हेच मुख्य कारण असे . पण आता मात्र तो इतका दूर आहे की त्याचा दुखाने भारावलेला निरोप त्याला माझ्या मार्फत तुला कळवण्या शिवाय कोणताही दुसरा पर्याय नाही” .
श्यामास्वङ्गं चकितहरिणीप्रेक्षणे दृष्टिपातं
वक्त्रच्छायां शशिनि शिखिनां बर्हभारेषु केशान् ।
उत्पश्यामि प्रतनुषु नदीवीचिषु भ्रूविलासान्
हन्तैकस्मिन्क्वचिदपि न ते चण्डि साद्र्श्यमस्ति ॥ ११०॥
अर्थ - हे सखी तुझ्या पतीचा तुला काय निरोप आहे ते ऐक , तो म्हणतो कि “ निसर्गातील सर्व वस्तूत मला केवळ तूच दिसतेस , कोवळ्या वेलींची वलये म्हणजे तुझा सुकुमार देहच जणू . घाबरलेल्या हरिणीच्या नेत्रात तुझीच भिरभिरणारी नजर आठवते . पूर्णचंद्राला पाहिले की तुझ्या वदनाची कांती आठवते . मोरांचा दाट पिसारा पाहिला की तुझाच केशसंभार डोळ्यासमोर येतो . नदीच्या काठावरील छोट्या छोट्या चंचल लाटा म्हणे तुझे भ्रूविलासाच जणू . पण माझे दुर्दैव पहा की कोणत्याही एका वस्तुत तुझे संपूर्ण साम्य मात्र कुठेच आढळत नाही .”
त्वामालिख्य प्रणयकुपिता धातुरागैः शिलायां
आत्मानं ते चरणपतितं यावदिच्छामि कर्तुम् ।
अस्रैस्तावन् मुहुरुपचितैर्दृष्टिरालुप्यते मे
क्रूरस्तस्मिन्नपि न सहते सङ्गमं नौ कृतान्तः ॥ १११॥
अर्थ - “ माझ्यावरील प्रेमामुळे तू नक्कीच माझ्यावर खूप रागावलेली असशील . रुसलेल्या तुझ्या चरणांजवळ बसून मी तुझी पश्चातापाने माफी मागतो असे चित्र शिळेवर काढण्याची माझी खूप इच्छा आहे . असे चित्र काढायला गेरू घेऊन अनेकदा बसतो देखील . पण डोळ्यात वारंवार येणारे अश्रू माझी दृष्टी अंधुक करतात . निष्ठुर दैवाला चित्रातील आपली भेट सुद्धा कदाचित मंजूर नाही असेच दिसते . यापेक्षा मोठा दैवदुर्विलास दुसरा कोणता असेल ? “
मामाकाशप्रणिहितभुजं निर्दयाश्लेषहेतोः
लब्धायास्ते कथमपि मया स्वप्नसंदर्शनेषु ।
पश्यन्तीनां न खलु बहुशो न स्थलीदेवतानां
अर्थ - “ हे शुभांगी पहाटे स्वप्नात मोठ्या कष्टाने कधीतरी तुझी माझी गाठ पडते तेव्हा तुला आलिंगन देण्यासाठी मी अवकाशात दूर पर्यंत माझे दोन्ही बाहू पसरतो . ही माझी दुःखावस्था पाहून वनदेवी देखील व्याकूळ होते आणि तिचे अश्रू मोत्यांसारखे दवबिंदू बनून वृक्षांच्या कोवळ्या पालवीवर ढळतात .
भित्त्वा सद्यः किसलयपुटान् देवदारुद्रुमाणां
ये तत्क्षीरस्रुतिसुरभयो दक्षिणेन प्रवृत्ताः ।
आलिङ्ग्यन्ते गुणवति मया ते तुषाराद्रिवाताः
पूर्वस्पृष्टं यदि किल भवेदङ्गमेभिस्तवेति ॥ ११३॥
अर्थ - “ हिमालयावरून वाहणारा शीतल वारा देवदार वृक्षांच्या कोवळ्या पालवीच्या सेवनाने सुगंधित होऊन दक्षिणेकडे वाहतो . हे गुणवती प्रिये , ह्या वाऱ्याने तुलाही नक्कीच स्पर्श केला असणार हे जाणून मी त्याला कवटाळतो . त्यामुळे अप्रत्यक्षरित्या का होईना पण तुझा स्पर्श अनुभवल्याचे समाधान मला मिळते .”
संक्षिप्येत क्षण इव कथं दीर्घयामा त्रियामा
सर्वावस्थास्वहरपि कथं मन्दमन्दातपं स्यात् ।
इत्थं चेतश्चटुलनयने दुर्लभप्रार्थनं मे
गाढोष्माभिः कृतमशरणं त्वद्वियोगव्यथाभिः ॥ ११४॥
अर्थ - “ हे प्रिये , ही विरहाची काळ रात्र एका क्षणात संपून जावी असे वाटते . विरहाने कासावीस झालेल्या मला तुझ्या शिवाय घालवत असलेली प्रत्येक रात्र युगा सारखी दीर्घ , कधीही न संपणारी वाटते . दिवसा सूर्याचा ताप जीव जाळवतो . हा विरह वणवा कमी होऊन सूर्याचा ताप मंद सुखद होईल का ? हे चंचल नयने तुझ्या विरहाने मी अत्यंत अगतिक झालो आहे” .
नन्वात्मानं बहु विगणयन्नात्मनैवावलम्बे
तत् कल्याणि त्वमपि नितरां मा गमः कातरत्वम् ।
कस्यात्यन्तं सुखमुपनतं दुःखमेकान्ततो वा
नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण ॥ ११५॥
अर्थ - “ हे कल्याणी , या पृथ्वीवर शाश्वत सुख कुणालाही आजवर मिळालेले नाही . तसेच कायमचे दुखाही कुणाला भोगावे लागलेले नाही . सुखानंर दुःख आणि दुःखानंतर सुख ही परिस्थिती रुपी कालचक्राची गति ठरलेलीच आहे . म्हणूनच आज जरी मी विरहात असलो तरी शापकाळ संपल्यावर भोगायला मिळणाऱ्या सुखाच्या कल्पनेने मला धीर येतो . तू सुद्धा न घाबरता धैर्याने हा वेळ घालव”.
शापान्तो मे भुजगशयनादुत्थिते शार्ङ्गपाणौ
शेषान्मासान् गमय चतुरो लोचने मीलयित्वा ।
पश्चादावां विरहगुणितं तं तमात्माभिलाषं
निर्वेक्ष्यावः परिणतशरच्चन्द्रिकासु क्षपासु ॥ ११६॥
अर्थ - “ हे प्रिये माझ्या शापाचा आता खूप कमी काळ उरलेला आहे . चार महिन्यानंतर जेव्हा भगवान विष्णू शेषशैय्येवरून जागा होईल तेव्हा मला मिळालेला शाप संपेल . हा काळ धैर्याने कसाबसा साजरा कर . आपला विरह संपला की आपण रचलेले प्रत्येक मनोरथ , आपली प्रत्येक अभिलाषा आपण शरद ऋतूतील चांदण भरल्या रात्री पूर्ण करू शकू”
भूयश्चाह त्वमपि शयने कण्ठलग्ना पुरा मे
निद्रां गत्वा किमपि रुदती सस्वनं विप्रबुद्धा ।
सान्तर्हासं कथितमसकृत् पृच्छतश्च त्वया मे
अर्थ - “ हे सुभगे तुला आठवते का ? एके रात्री मला मिठी मारून गाढ झोपेत असताना तू अचानक दचकून हुंदके देत जागी झालीस . मी वारंवार तुला रडण्याचे कारण विचारल्यावर आपण स्वप्न पहिले हे लक्षात येताच तू मला लाजून म्हणालीस “ लबाडा , स्वप्नात मी तुला दुसऱ्या स्त्रीबरोबर हसत खेळत असलेले पाहिले . तू मला सवत आणलीस की काय ह्या भयाने मला रडूच कोसळले” .
एतस्मान् मां कुशलिनमभिज्ञानदानाद् विदित्वा
मा कौलीनाच्चकितनयने मय्यविश्वासिनी भूः ।
स्नेहानाहुः किमपि विरहे ध्वंसिनस्ते त्वभोगाद्
इष्टे वस्तुन्युपचितरसाः प्रेमराशीभवन्ति ॥ ११८॥
अर्थ - हे फक्त आपल्या दोघातले गुपित ह्या मेघाला मी सांगितले यावरून हा मेघ माझा मित्र आहे ह्याची खात्री बाळग आणि मी सुखरूप आहे हे निश्चिंतपणे जाण. एखाद्या सज्जन माणसाला कलंकित करण्यासाठी अनेक अफवा पसरवल्या जातात . पण त्या निराधार असतात . ताटातूटीने खरे प्रेम कधीच कमी होत नाही . म्हणून हे नीलनयने तू लोकप्रवादाकडे अजिबात लक्ष देऊ नकोस आणि माझ्यावर अविश्वास ठेवू नकोस . प्रिय व्यक्तीची तीव्र अभिलाषा प्रेमाची उत्कटता नेहमीच वाढवते हे लक्षात ठेव .
आश्वास्यैवं प्रथमविरहोदग्रशोकां सखीं ते
शैलादाशु त्रिनयन्वृषोत्खातकूटान्निवृत्तः ।
साभिज्ञानप्रहितकुशलैस्तद्वचोभिर्ममापि
प्रातः कुन्दप्रसवशिथिलं जीवितं धारयेथाः ॥ ११९॥
अर्थ - हे मेघा, ह्या अशा आश्वासक शब्दांनी तू तुझ्या वहिनीचे सांत्वन कर . आणि तिचे कुशल माझ्या पर्यंत पोहोचवण्यासाठी तू शंकराच्या नंदीने विदारलेल्या कैलास शिखरांना ओलांडून त्वरेने माघारी माझ्याकडे ये . माझ्या सारखेच ती सुद्धा तुला माझ्यासाठी निरोप देईल . तिचा निरोप मिळाला आणि तिचे कुशल कळले की तिच्या वियोगात अस्वस्थ झालेल्या माझे आयुष्य पहाटेच्या टवटवीत कुंदपुष्पाप्रमाणे होईल आणि मलाही नव संजीवनी मिळेल .
कच्चित् सोम्य व्यवसितमिदं बन्धुकृत्यं त्वया मे
प्रत्यादेशान्न खलु भवतो धीरतां कल्पयामि ।
निःशब्दोऽपि प्रदिशसि जलं याचितश्चातकेभ्यः
प्रत्युक्तं हि प्रणयिषु सतामीप्सितार्थक्रियैव ॥ १२०॥
अर्थ - हे मेघा, मी तुझ्यावर एवढ्या विश्वासाने सोपवलेले हे काम मित्र म्हणून तू करशील ना ? तू काहीच का बोलत नाहीस ? पण तुझे मौन म्हणजे नकार असे मात्र मी मानत नाही . कारण माझे काम तू करशीलच याची मला पूर्ण खात्री आहे . चातकाने विनंती करताच तू बोलत नाहीस पण त्यांची तृष्णा आपल्या जलबिंदूंनी तत्परतेने शमवतोस . थोर व्यक्ती शब्दाने उत्तर देत नाहीत . प्रत्यक्ष कृती हेच त्यांचे उत्तर असते हे मी जाणतो .
एतत् कृत्वा प्रियमनुचितप्रार्थनावर्त्मनो मे
सौहर्दाद् वा विधुर इति वा मय्यनुक्रोशबुद्ध्या ।
इष्टान् देशान् विचर प्रावृषा संभृतश्रीः
मा भूदेवं क्षणमपि च ते विद्युता विप्रयोगः ॥ १२१॥
अर्थ - हे जिवलग मित्रा, मेघा, मी तुला सांगितलेले दूतकार्य अतिशय सामान्य आणि तुझ्यासारख्या कर्तृत्ववानासाठी अनुचित आहे हे मला पूर्णपणे ठाऊक आहे . पण तरीही मित्र म्हणून विरहात दुखी कष्टी असलेल्या माझ्यावर तू दया करून मला धन्य करावेस हीच माझी नम्र विनंती आहे . हे मेघा वर्षाकाळचे वैभव प्राप्त झाले की मोठ्या दिमाखात तू आपली कांता विद्युल्लता हिच्यासह तुझ्या इच्छेनुरूप देशोदेशी भ्रमण करत रत हो … पण माझी आणि माझ्या प्रियेची जशी ताटातूट झाली तशी तुझी व विद्युल्लतेची एक क्षणही ताटातूट होऊ नये हीच माझी मनापासून इच्छा आहे .
( उत्तरार्ध - संपूर्ण )
संदर्भ
• मेघदूत – पद्यानुवाद, गद्यानुवाद व श्लोकसूची , लेखक - कै कृष्णशास्त्री चचपळूणकर , प्रकाशक – विदर्भ मराठवाडा बुक कंपनी .
• महाकवी कालिदासाचे मेघदूत , अनुवादक – चिंतामण द्वारकानाथ देशमुख , प्रकाशक – सरिता प्रकाशन पुणे .
• कालिदासाचे मेघदूत , लेखक कुसुमाग्रज , प्रकाशक – पॉप्युलर बुक डेपो मुंबई
• महाकवी श्रीकालिदासाचे मेघदूत , अनुवाद – शांता ज शेळके , प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाऊस , शनिवार पेठ पुणे .
• मेघदूत , अनुवादक कविवर्य बा भ बोरकर , प्रकाशक – श्रीविद्या प्रकाशन , शनिवार पेठ पुणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा