आपण ह्या आधी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद ह्या चारही वेदांची थोडक्यात माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
वेदांनंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदांचा समावेश होतो. ( ब्राह्मण ग्रंथ आणि ब्राह्मण जात ह्या दोन्ही पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत)
वेदांबद्दल भाष्य करणाऱ्या इतर कोणत्याही ग्रंथांपेक्षा ब्राह्मणग्रंथ उल्लेखनीय मानले गेले आहेत कारण ते वेदांविषयी भाष्य करणारे पहिले ग्रंथ आहेत. ब्राह्मणग्रंथ वैदिक मंत्रांच्या संहितेनंतर तयार झाले अशी मान्यता असून प्राचीन परंपरेनुसार ब्राह्मणग्रंथ सुद्धा अपौरुषेय वाङ्मयातच येतात.
ब्राह्मण शब्दाची उत्पत्ती अशा प्रकारे करण्यात येते.
ब्रह्म म्हणजे मंत्र किंवा यज्ञ. शतपथ ब्राह्मणात ‘ब्रह्म वै मन्त्रः’ असा उल्लेख आहे. याचा अर्थ वैदिक मंत्रांचे (ब्रह्म) विवेचन करतात ते ब्राह्मण असा होतो.
वैदिक साहित्याला “वेदमन्त्रब्राह्मणा:” म्हणतात.
“मन्त्रब्राह्मणयोर्वेदोनामधेयं” म्हणजेच मंत्र आणि ब्राह्मण यांना वेद म्हटले जाते.
वेदांमध्ये शुभसूचक (स्तुती, प्रार्थना, संकट निवारण) आणि अभिचार (जारण मारण, जादू टोणा, शाप) अशा दोन्ही प्रकारच्या ऋचा आहेत. पण चारही वेदांमध्ये फक्त ऋचा दिलेल्या आहेत. वैदिक मंत्रांचा यज्ञात कसा विनियोग करावा ते ब्राह्मण ग्रंथ सांगतात आणि म्हणूनच ब्राह्मणग्रंथ महत्त्वाचे ठरतात.
असे मानले जाई की वैदिक मंत्रात एक अदभुत सुप्त शक्ती आहे. तिला ब्रह्मन् म्हणत असत. पुरोहित जेव्हा योग्य प्रकारे मंत्र म्हणतो (इथे मंत्रांचे योग्य उच्चार व त्यामुळे निर्माण होणारी अचूक कंपने अभिप्रेत आहेत) तेव्हाच ही शक्ती जागृत होते व आपले सहाय्य करते.
वैदिक काळात देवता महत्वाच्या होत्या पण ब्राह्मणग्रंथात यज्ञ विधींना जास्त महत्त्व दिले गेले आहे. जर यज्ञविधी अचूकपणे केले तर देवतांना तुमच्या कार्यात सहाय्य करावेच लागते हा समज त्या काळात वाढीला लागला. यज्ञांचे महत्त्व एवढे वाढले की एक वर्षापासून बारा वर्षांपर्यंत चालणारी यज्ञसत्र अस्तित्वात आली.
ब्राह्मण ग्रंथांमध्ये प्रामुख्याने यज्ञ आणि यज्ञ प्रयोगाची माहिती येते. ही माहिती दोन भागात येते . एक विधी आणि दुसरा अर्थवाद.
विधी म्हणजेच यज्ञाच्या सविस्तर प्रयोगाची माहिती.
यज्ञांचे विधान करणाऱ्या वाक्यांना विधिवाक्ये म्हणतात.
कर्म करत असताना काही गोष्टींचा निषेध केला जातो. जसे की - खोटे बोलू नये, चोरी करू नये. अशा वाक्यांना निषेधवाक्ये म्हणतात.
अर्थवाद म्हणजे प्रयोगाचा उद्देश किंवा त्यातील तंत्र, मंत्र आणि कृतीची माहिती. अर्थवाद विभागात विधेय कर्माची स्तुती आणि निषिद्ध कर्माची निंदा आहे.
वाचस्पती मिश्राच्या मते, ज्या ग्रंथांमध्ये निर्वचन (निरुक्ती) मंत्रांचा उपयोग - विविध यज्ञ, उद्देश, स्थापना (अर्थ) आणि पद्धतीमध्ये केला जातो त्या ग्रंथांना 'ब्राह्मण' म्हणतात. वाचस्पती मिश्रांनी ब्राह्मणाचे चार उद्देश सांगितले आहेत.
1. व्याख्या 2. विनियोग 3. स्थापना 4. कायदा.
“नैरुक्त्यं यत्र मन्त्रस्य विनियोगः प्रयोजनम् ।
प्रतिष्ठानं विधिश्चैव ब्राह्मणं तदिहोच्यते" ।। (वाचस्पति मिश्र)
1)व्याख्या - शब्दांचा अर्थ स्पष्ट करणे. एखाद्या वस्तूच्या नावाचा आधार काय, ते नाव कोणत्या धातूपासून बनवले आहे इत्यादि..
2)विनियोग - यज्ञपद्धतीत कोणत्या कार्यासाठी कोणता मंत्र विहित केला आहे याचे सविस्तर वर्णन.
3)स्थापना(अर्थवाद) - यज्ञाच्या प्रत्येक पद्धतीचे महत्त्व काय, यज्ञ करण्याचे फायदे, न करण्याचे तोटे इत्यादि ..
4)कायदा (पद्धत) - यज्ञ आणि त्याच्याशी संबंधित क्रियांचे तपशीलवार वर्णन देणे.
ऋषी शबरांनी आपल्या मीमांसा दर्शनाच्या शाबरभाष्यात ब्राह्मण ग्रंथांचा विषय आणि त्याची विभागणी कशी आहे ह्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या मते ब्राह्मणग्रंथात यज्ञविधीचा विस्तार आणि विचार दहा वेगवेगळ्या दृष्टीकोनातून केला जातो.
“हेतुर्निर्वचनम् निंदा, स्तुती, संशय, विधी.
परिक्रिया पुराकल्पो वावधारकल्पना ।
उपमानंदशैतेतु विधियो ब्राह्मणस्यवे" || (मीमांसा सूत्र, शाबर भाष्य २.१८)
1. हेतु- यज्ञात कोणतेही कार्य का केले जाते याचे कारण सांगणे.
2. निर्वचन (व्याख्या) - शब्दांचा अर्थ स्पष्ट करणे. उदा- नाद ह्या मुळापासून नदी हा शब्द.
3. निंदा - यज्ञात निषिद्ध केलेल्या कर्माचा निषेध. जसे असत्य बोलणे यज्ञात निषिद्ध आहे.
4. स्तुति - यज्ञातील विहित कार्यांची स्तुती करणे. जसे 'यज्ञो वै श्रेष्ठम् कर्म' म्हणजेच यज्ञ हे श्रेष्ठ कर्म आहे, म्हणून ते केलेच पाहिजे.
5. संशय - कोणत्याही यज्ञासंबंधी काही शंका असल्यास त्याचे निराकरण करा.
6. विधी (पद्धत) - पद्धतीचा अर्थ म्हणजे यज्ञ कार्याच्या संपूर्ण पद्धतीचे तपशीलवार वर्णन करणे.
7. परिक्रिया- परोपकारी कृती किंवा कर्तव्यांचे वर्णन करणे.
8. पुराकल्प - यज्ञाच्या विविध पद्धतींच्या समर्थनार्थ कोणत्याही प्राचीन कथा किंवा ऐतिहासिक घटनेचे वर्णन करणे. उदा - हरिश्चंद्रोपाख्यानमधील 'चरैवेती, चरैवेती' (आत्म साक्षात्कार होईपर्यंत चालत रहा, चालत रहा) हा प्रसिद्ध निर्देश .
9. व्यवस्था – योजलेल्या परिस्थितीनुसार कामाची मांडणी.
10. उपमान - उपमा किंवा उदाहरण देऊन एखाद्या विषयाची पुष्टी करणे. उदा - ऐतरेय ब्राह्मणात 'चरैवेती'ची पुष्टी करण्यासाठी सूर्याचे उदाहरण मांडले आहे.
ब्राह्मण म्हणजे पुरोहित व त्याने लौकिक गोष्टींचा विस्तार कसा करावा याबाबतीत सांगितलेले ज्ञान म्हणजे ब्राह्मणग्रंथ. ब्राह्मणग्रंथात वेगवेगळ्या यज्ञानुसार म्हणायच्या ऋचा एकत्रित केल्या आहेत.
अमुक एखादा यज्ञ करण्यासाठी लागणारी पात्रता, त्या यज्ञातील विधी, नीतीनियम आणि इतर सर्व संबंधित कर्मकांडे ब्राह्मणग्रंथात विस्ताराने सांगितली आहेत.
ब्राह्मणग्रंथांत सांगितलेले यज्ञ करण्याचा अधिकार केवळ अग्निहोत्र धारण केलेल्या मनुष्यालाच प्राप्त होतो. त्यासाठी सर्वप्रथम वेदाध्ययनपूर्व अग्निहोत्र घ्यावे लागते. या यज्ञांचे नित्य, नैमित्तिक व काम्य असे मुख्यतः तीन प्रकार आहेत.
अग्निहोत्रहोम, दर्शपूर्णमास हे नित्य यज्ञ आहेत.
एखादे कारण घडल्यास त्या निमित्ताने जे यज्ञ करतात त्यांना नैमित्तिक यज्ञ म्हणतात.
आणि वेगवेगळ्या इच्छा मनात धरून विशिष्ट फलाच्या उद्देशाने केले जाणारे यज्ञ म्हणजे काम्य यज्ञ.
या व्यतिरिक्त ब्राह्मणग्रंथात अनेक कथा देखील आलेल्या आहेत. ज्या मधून त्याग, यज्ञांचे महत्त्व, सृष्टीची निर्मिती, शाप-वरदान ह्या विषयी अधिक माहिती मिळते उदा - पुरूरवा उर्वशी, शुनः शेपः, इंद्र अपला, अशा अनेक कथा आलेल्या आहेत. तसेच सरमा पणी कथेत अभिप्लव यागाची विस्ताराने माहिती आलेली आहे.
ब्राह्मण ग्रंथातील “अर्थवाद” या भागात विशिष्ट मंत्र आणि विधी का व कसे वापरावेत तसेच कोणते मंत्र वापरू नयेत व ते वापरले असता काय संकटे येऊ शकतात तेही सांगितले आहे.
“अर्थवाद” मध्ये अनेक तत्त्वज्ञानात्मक आणि व्याकरण विषयक ऋचांचा देखील समावेश आहे. ह्या ऋचा त्या त्या विधी नंतर दिल्या आहेत आणि म्हणून त्यांना विधीपुच्छ म्हटले आहे.
प्रशस्ति, पुराकल्प, परकृति आणि निन्दा या चार भागात अर्थवाद सांगितला आहे. ब्राह्मणग्रंथातील पुराकल्प आणि परकृति विभागात कथा उपकथांच्या द्वारे अमुक अमुक यज्ञ आधी कुठे कधी कोणी केला होता व त्याचे काय फळ मिळाले या विषयी विस्ताराने सांगितलेले आहे.
ब्राह्मणग्रंथात अनेक शब्दांच्या व्युत्पत्ति (etimology) दिल्या आहेत.
उदा - सूर्य = गां धारयति इति गन्धर्वः. म्हणून त्याची किरणे ह्या गाई आहेत तर तो गन्धर्व.
छंद आणि मंत्रांना रथ आणि नौकेची उपमा दिली आहे ज्यांचा योग्य वापर आपल्याला लक्ष्याप्रत घेऊन जातात असे म्हटले आहे.
ब्राह्मण ग्रंथांची विभागणी –
प्रत्येक वेदाचे स्वतःचे वेगळे ब्राह्मण ग्रंथ आहेत. वेदांच्या जेवढ्या संहिता आणि शाखा त्यांचे प्रत्येकाचे एक किंवा एकापेक्षा अधिक ब्राह्मणग्रंथ आहेत.
आजही विभागशः जवळपास १८ ब्राह्मण ग्रंथ उपलब्ध आहेत ते असे
ऋग्वेद – ऐतरेय ब्राह्मण आणि शांखायन/कौषीतकि ब्राह्मण
शुक्लयजुर्वेद – शतपथ ब्राह्मण
कृष्णयजुर्वेद – तैत्तिरिय ब्राह्मण
सामवेद – सामवेदाची ताण्ड्य, षड्विंश, सामविधान, आर्षेय, देवताध्याय, उपनिषद, संहितोपनिषद, वंश, जैमिनीय अशी एकूण ९ ब्राह्मणे मानतात.
अथर्ववेद – गोपथ ब्राह्मण
ऋग्वेदातील ऐतरेय ब्राह्मणात 40 अध्याय आहेत जे ८ पंचकात विभागले गेले आहेत. हा ग्रंथ महीदास ऐतरेय यांनी लिहिला असे मानले जाते. ऐतरेय ब्राह्मणात सोमयाग, अग्निहोत्र, राजसूय ह्या यागांची विस्ताराने माहिती आली आहे. यात एकूण ३३ देवांचा उल्लेख आलेला असून इंद्र सर्वात प्रमुख महत्वाचा देव मानला गेला आहे.
ऋग्वेदातील कौशितकी/शाङ्खायन ब्राह्मणग्रंथात 30 अध्याय आहेत. पहिले ६ अध्याय अन्नदान, अग्नीचे महत्त्व, दर्शपुर्णमास, चातुर्मास या विषयी आहेत. यातही ऐतरेय ब्राह्मणाप्रमाणेच सोमयागाचे महत्त्व सांगितले आहे.
साम वेदाचे तान्ड्य-महा-ब्राह्मणग्रंथ २५ भागात असल्याने पञ्चविंशति ब्राह्मण म्हणूनही प्रसिद्ध आहेत. हे खूप प्राचीन ब्राह्मणग्रंथ असून यात अनेक पौराणिक कथा आहेत. २६व्या ब्राह्मणग्रंथात वरील सर्व २५ भागांचे संकलन केलेले आहे. सामवेदाचे जैमिनीय ब्राह्मणग्रंथ, तान्ड्य-महा-ब्राह्मण पेक्षाही प्राचीन मानले गेले आहेत .
यजुर्वेदाचे कृष्ण-यजुर्वेद (तैत्तिरीय ब्राह्मण) आणि शुक्ल-यजुर्वेद (शतपथ ब्राह्मण – कारण यात १०० अध्याय आहेत) हे दोन ब्राह्मणग्रंथ आहेत. शतपथ ब्राह्मण आकाराने सर्वात मोठे असून हयात इतिहासाच्या दृष्टीने महत्वाच्या अशा कुरु, पांचाल, कोसल, विदेह या राज्यांचा आणि जनक, दुष्यन्त, जनमेजय ह्या राजांचे उल्लेख आढळतात.
शुक्ल यजुर्वेदाच्याच वाजसनेयी संहितेत कण्व आणि माध्यंदिन अशा दोन शाखा आहेत.
अथर्ववेदाचे गोपथ ब्राह्मणग्रंथ असून ह्यात यज्ञातील ४ ऋत्विजांनी म्हणजेच होतृ (ऋग्वेदी ऋत्विज), अध्वर्यु (यजुर्वेदी), उद्गाता (सामवेदी) आणि ब्रहमा (अथर्ववेदी ऋत्विज) यांनी करायची कर्मे विस्ताराने दिली आहेत.
ब्राह्मण ग्रंथात वेदातील मंत्रांचे अर्थ, यज्ञविधी, प्रयोग तसेच भारतीय उपखंडाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचीही माहिती मिळते.
प्रत्येक ब्राह्मणग्रंथातील महत्वाचा फरक म्हणजे ऋग्वेदाचे ब्राह्मणग्रंथ होतृच्या (ऋग्वेदी ऋत्विज) कार्याचे महत्त्व विषद करतात. सामवेदाचे ब्राह्मण उद्गाताच्या कार्याचे महत्त्व सांगतात तर यजुर्वेदाचे ब्राह्मणग्रंथ अध्वर्युची कार्ये सांगतात.
पण जरी प्रत्येक वेदाचे वेगळे ब्राह्मणग्रंथ असले तर सर्व ग्रंथातील संकल्पना एकच आहे. उदा – पिंडपितृयागाची संकल्पना ऐतरेय, गोपथ आणि जैमिनीय ह्या तीनही ब्राह्मणग्रंथात एकच आहे पण त्यासाठी करावयाचे कर्म, विधी वेगवेगळे आहेत कारण पुरोहित वेगळे आहेत.
ब्राह्मण ग्रंथात वेदातील मंत्रांचे अर्थ, यज्ञविधी, प्रयोग तसेच भारतीय उपखंडाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचीही माहिती मिळते.
© नयना पिकळे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा