॥ विष्णुपुराणम्
॥
॥ चतुर्थ: अंशः
॥ चतुर्विंशोऽध्यायः ॥
"कलियुगी राजांचे आणि कलिधर्माचे वर्णन तसेच राजवंश-वर्णनाचा उपसंहार"
श्रीपराशर उवाच
योऽयं रिपुञ्जयो नाम बार्हद्रथोऽन्त्यस्तस्यामात्यो मुनिको नाम भविष्यति ॥ १ ॥
स चैनं स्वामिनं हत्वा स्वुपुत्रं प्रद्योतनामानमभिषेक्ष्यति ॥ २ ॥ तस्यापि बलाकनामा
पुत्रो भविता ॥ ३ ॥ ततश्च विशाखयूपः ॥ ४ ॥ तत्पुत्रो जनकः ॥ ५ ॥ तस्य च नन्दिवर्धनः
॥ ६ ॥ ततो नन्दी ॥ ७ ॥ इत्येतेऽष्टित्रिंशदुत्तरमष्टशतं पञ्च प्रद्योताः पृथिवीं भोक्ष्यन्ति
॥ ८ ॥
श्रीपराशर म्हणाले ;- बृहद्रथ वंशाचा रिपुञ्जय नामक जो अन्तिम राजा होईल त्याचा
सुनिक नामक एक मन्त्री असेल. तो आपल्या स्वामी रिपुञ्जयला
मारून आपला पुत्र प्रद्योत ह्याचा राज्याभिषेक करेल. त्याचा पुत्र बलाक असेल, बलाकचा
विशाखयूप विशाखयूपचा जनक, जनकचा नन्दिवर्धन व नन्दिवर्धनचा पुत्र नन्दी होईल. हे पाच
प्रद्योत वंशीय नृपतिगण एकशे अड़तीस वर्ष पृथ्वीचे पालन करतील ।। १-८ ।।
ततश्च शिशुनाभः ॥ ९ ॥ तत्पुत्रः काकवर्णो भविता ॥ १० ॥ तस्य
च पुत्रः क्षेमधर्मा ॥ ११ ॥ तस्यापि क्षतौजाः
॥ १२ ॥ तत्पुत्रो विधिसारः ॥ १३ ॥ ततश्चाजातशत्रुः ॥ १४ ॥ तस्मादर्भकः ॥ १५
॥ तस्माच्चोदयनः ॥ १६ ॥ तस्मादपि नन्दिवर्धनः ॥ १७ ॥ ततो महानन्दी ॥ १८
॥ इत्येते शैशुनाभा भूपालास्त्रीणि वर्षशतानि द्विषष्ट्यधिकानि
भविष्यन्ति ॥ १९ ॥
नन्दीचा पुत्र शिशुनाभ, शिशुनाभचा काकवर्ण, काकवर्णचा क्षेमधर्मा, क्षेमधर्माचा
क्षतौजा, क्षतौजाचा विधिसार, विधिसारचा अजातशत्रु, अजातशत्रुचा अर्भक, अर्भकचा उदयन,
उदयनचा नन्दिवर्धन आणि नन्दिवर्धनचा पुत्र महानन्दी होईल. हे शिशुनाभ वंशीय नृपतिगण
तीनशे बासष्ठ वर्ष पृथ्वीवर शासन करतील ॥ ९-१९ ॥
महानन्दिनस्ततः
शूद्रगर्भोद्भवोति लुब्धोतिबलो महापद्मनामा नन्दः परशुराम इवापरोऽखिलक्षत्रान्तकरी
भविष्यति ॥ २० ॥ ततः प्रभृति शुद्रा भूपाला भविष्यन्ति ॥ २१ ॥ स चैकच्छत्रामनुल्लङ्घितशासनो महापद्मः पृथिवीं भोक्ष्यते ॥ २२ ॥ तस्याप्यष्टौ सुताःसुमाल्याद्य भवितारः ॥ २३ ॥ तस्य महापद्मस्यानुपृथिवीं भोक्ष्यन्ति
॥ २४ ॥
महानन्दीचे शूद्रच्या गर्भातून उत्पन्न अत्यन्त लोभी व महाबलवान् महापद्म नामक
नन्द दूसर्या परशुरामासमान सम्पूर्ण क्षत्रियांचा नाश करणारा होईल . तेव्हापासून शूद्रजातीय राजा राज्य करतील. राजा
महापद्म सम्पूर्ण पृथ्वीचे एकछत्र व अनुल्लंघित राज्यशासन करेल. त्याला सुमाली आदि आठ पुत्र होतील जे महापद्मानंतर पृथ्वीचे राज्य भोगतील
॥ २० -२४ ॥
महापद्मपुत्राश्चैकं
वर्षशतमवनीपतयो भविष्यन्ति ॥ २५ ॥
ततश्च
नवचैतान्नन्दान् कौटिल्यो ब्राह्मणः समुद्धरिष्यति ॥ २६ ॥
तेषामभावे
मौर्व्याः पृथिवीं भोक्ष्यन्ति ॥ २७ ॥
कौटिल्य
एव चन्द्रगुप्तमुत्पन्नं राज्येऽभिषेक्ष्यति ॥ २८ ॥
महापद्म व त्याचे पुत्र शंभर वर्ष पृथ्वीवर शासन करतील . त्यानन्तर ह्या नवनन्दांना कौटिल्य नामक एक ब्राह्मण नष्ट करेल, त्यांचा अन्त
झाल्यावर मौर्य नृपतिगण पृथ्वी भोगतील. कौटिल्य मुरा नामक दासीपासून नन्दद्वारा उत्पन्न झालेल्या
चन्द्रगुप्ताला राजा अभिषिक्त करेल ॥ २५-२८॥
तस्यापि
पुत्रो बिन्दुसारो भविष्यति ॥ २९ ॥
तस्याप्यशोकवर्धनस्ततः
सुयशास्ततश्च दशरथस्ततश्च संयुतस्ततः शालिशुकस्तस्मात्सोमशर्मा तस्यापि सोमशर्मणः शतधन्वा
॥ ३० ॥
तस्यानुबृहद्रथनामा
भविता ॥ ३१ ॥
एवमेते
मौर्या दश भूपतयो भविष्यन्ति अब्दशतं सप्तत्रिंशदुत्तरम् ॥ ३२ ॥
चन्द्रगुप्तचा पुत्र बिन्दुसार, बिन्दुसारचा अशोकवर्धन, अशोकvvअर्धनाचा सुयशा, सुयशाचा दशरथ,
दशरथचा संयुत, संयुतचा शालिशूक, शालिशूकचा सोमशर्मा, सोमशर्माचा शतधन्वा तसेच शतधन्वाचा
पुत्र बृहद्रथ होईल. अशाप्रकारे एकशे त्र्याहत्तर वर्ष
हे दश मौर्यवंशी राजा राज्य करतील ॥ २९-३२ ॥
तेषामन्ते
पृथिवीं दश शुङ्गा भोक्ष्यन्ति ॥ ३३ ॥
ह्यांच्या नन्तर पृथ्वीवर दहा शुङ्गवंशीय राजागण होतील ॥ ३३ ॥
पुष्यमीत्रःसेनापतिःस्वामिनं
हत्वा राज्यं करिष्यति तस्यात्मजोऽग्निमित्रः ॥ ३४ ॥
त्यातील पहिला पुष्यमित्र नामक सेनापति आपल्या स्वामीला मारून स्वतः राज्य
करेल, त्याचा पुत्र अग्निमित्र असेल ॥ ३४ ॥
तस्मात्सुज्येष्ठस्ततो
वसुमित्रस्तस्मादप्युदङ्कस्ततः पुलिन्दकस्ततो घोषवसुस्कस्मादपि वज्रमित्रस्ततो भगवतः
॥ ३५ ॥ तस्माद्देवभूतिः ॥ ३६ ॥
अग्निमित्रचा पुत्र सुज्येष्ठ, सुज्येष्ठचा वसुमित्र, वसुमित्रचा उदंक, उदंकचा
पुलिन्दक, पुलिन्दकचा घोषवसु, घोषवसुचा वज्रमित्र, वज्रमित्रचा भागवत व भागवतचा पुत्र
देवभूति असेल ॥ ३५-३६ ॥
इत्येते
शुङ्गा द्वादशोत्तरं वर्षशतं पृथिवीं भोक्ष्यन्ति ॥ ३७ ॥
हे शुङ्गनरेश एकशे बारा वर्ष पृथ्वीचा भोग घेतील ॥ ३७ ॥
ततः
कण्वानेषाभूर्यास्यति ॥ ३८ ॥
त्यानन्तर ही पृथ्वी कण्व भूपालांच्या अधिकारात जाईल ॥ ३८ ॥
देवभूतिं
तु शुङ्गराजानं व्यसनिनं तस्यैवामात्यः कण्वो वसुदेवनामा तं निहत्य स्वयमवनीं भोक्ष्यति
॥ ३९ ॥
शुङ्गवंशीय अति व्यसनशील राजा देवभूतिला कण्ववंशीय वसुदेव नामक त्याचा मन्त्री
मारून स्वतः राज्य भोगेल ॥ ३९॥
तस्य
पुत्रो भूमित्रस्तस्यापि नारायणः ॥ ४० ॥ नारायणात्मजःसुशर्मा
॥ ४१ ॥
त्याचा पुत्र भूमित्र, भूमित्रचा नारायण तसेच नारायणचा पुत्र सुशर्मा होईल
।। ४०-४१॥
एते
काण्वायनाश्चत्वारः पञ्चचत्वारींशद्वर्षाणि भूपतयो भविष्यन्ति ॥ ४२ ॥
हे चार कण्व भूपतिगण पंचेचाळीस वर्ष पृथ्वीचे अधिपति असतील ॥ ४२ ॥
सुशर्माणं
तु काण्वं तद्भूत्यो बलिपुच्छकनामा हत्वान्ध्रजातीयो वसुधां भोक्ष्यति ॥ ४३ ॥ ततश्च कृष्णनामा तद्भ्राता पृथिवीपतिर्भविष्यति ॥ ४४ ॥
कण्ववंशीय सुशर्माला त्याचा बलिपुच्छक नावाचा आन्ध्रजातीय सेवक मारेल व स्वतः
पृथ्वीचा भोग घेईल. त्याच्यामागे त्याचा भाऊ कृष्ण पृथ्वीचा
स्वामी होईल ॥ ४३-४४ ॥
तस्यापि
पुत्रः शान्तकर्णिस्तस्यापि पूर्णोत्सङ्गस्तत्पुत्रः शातकर्मिस्तस्माच्च लम्बोदरः
तस्माच्च पिलकस्ततो मेघस्वातिः स्ततः पटुमान् ॥ ४५ ॥ ततश्चारिष्टकर्मा ततो हालाहलः
॥ ४६ ॥ हालाहलात्पललकस्ततः पुलिन्दसेनस्ततः सुन्दरस्ततःशातकर्णिः शिवस्वातिस्ततश्च
गोमतिपुत्रस्तत्पुत्रोऽलिमान् ॥ ४७ ॥ तस्यापि शान्तकर्णिस्ततः शिवश्रितस्तश्च शिवस्कन्धस्तस्मादपि
यज्ञश्रीस्ततो द्वियज्ञस्तस्माच्चन्द्रश्रीः ॥ ४८ ॥ तस्मात्पुलोमाचिः ॥ ४९ ॥
कृष्णाचा पुत्र शांतकर्णि, शांतकर्णीचा पूर्णोत्संग, पूर्णोत्संगचा शातकर्णी,
शातकर्णीचा लम्बोदर, लम्बोदरचा पिलक, पिलकचा मेघस्वाति, मेघस्वातिचा पटुमान, पटुमानचा
अरिष्टकर्मा, अरिष्टकर्माचा हालाहल, हालाहलचा पललक, पललकचा पुलिन्दसेन, पुलिन्दसेनचा
सुन्दर, सुन्दरचा शातकर्णि [दूसरा], शातकर्णीचा शिवस्वाति, शिवस्वातिचा गौतमीपुत्र,
गोमतिपुत्रचा अलिमान् अलिमानचा शान्तकर्णि [दूसरा] शान्तकर्णिचा शिवश्रीत, शिवश्रीतचा
शिवस्कन्ध, शिवस्कन्धचा यज्ञश्री, यज्ञश्रीचा द्वियज्ञ, द्वियज्ञचा चन्द्रश्री तसेच
चन्द्रश्रीचा पुत्र पुलोमाचि असेल ॥ ४५-४९ ॥
एवमेते त्रिंशच्चत्वार्यब्दशतानि षट्पञ्चाशदधिकानि पृथिवीं भोक्ष्यन्ति आन्ध्रभृत्या
॥ ५० ॥
अशा प्रकारे हे तीस आंध्रभृत्य राजागण चारशे छप्पन वर्ष पृथ्वीचा भोग घेतील
॥ ५०॥
सप्ताभीरप्रभृतयो
दश गर्दभिलाश्च भूभुजो भविष्यन्ति ॥ ५१ ॥
ततःषोडश
भूपतयो भवितारः ॥ ५२ ॥
ततश्चाष्टौ
यवनाश्चतुर्दश तुरुष्कारा मुण्डाश्च त्रयोदश एकादश मौना एते वै पृथुवीपतयः पृथिवीं
दशवर्षशातानि नवत्यधिकानि भोक्ष्यन्ति ॥ ५३ ॥
ततश्च
एकादश भूपतयोऽब्दशतानि त्रीणि पृथिवीं भोक्ष्यन्ति ॥ ५४ ॥
ह्यांच्यानंतर सात आभीर आणि दश गर्दभिल राजा होतील. मग सोळा
शक, नंतर आठ यवन, चौदा तुर्क, तेरा मुण्ड (गुरुण्ड) आणि
अकरा मौन जातिय राजा एक हजार नव्वद वर्ष पृथ्वीचे शासन करतील . ह्यातील अकरा मौन राजा पृथ्वी तीनशे वर्ष भोगतील ॥ ५१-५४ ॥
तेषूत्सन्नेषु
कैंकिला यवना भूपतयो भविष्यन्त्यमूर्धाभिषिक्ताः ॥ ५५ ॥
तेषामपत्यं
विन्ध्यशक्तिस्ततः पुंरजयस्तस्माद्रामचन्द्रस्तस्माद्धर्मवर्मा ततो वङ्गस्ततोभून्नन्दनस्ततःसुनन्दी
तद्भ्राता नन्दीयशाः शुक्रः प्रवीर एते वर्षशतं षड्वर्षाणि भूपतयो भविष्यन्ति ॥ ५६
॥
त्यांच्यानंतर कैंकिल नामक यवनजातीय अभिषेकरहित राजा होतील. त्यांचा वंशधर विन्ध्यशक्ति असेल. विन्ध्यशक्तिचा
पुत्र पुरञ्जय, पुरञ्षयचा रामचन्द्र, रामचन्द्रचा धर्मवर्मा, धर्मवर्माचा वंग, वंगचा
नन्दन व नन्दनचा पुत्र सुनन्दी असेल. सुनन्दीचे नन्दियशा,
शुक्र आणि प्रवीर हे तीन भाऊ असतील. हे सर्व एकशे सहा
वर्ष राज्य करतील ॥ ५५ -५६ ॥
ततस्तत्पुत्रास्त्रयोदशैते
बाह्लिकाश्च त्रयः ॥ ५७ ॥ ततः पुष्पमित्राः पटुमित्रा स्त्रयोदशैकलाश्च सप्तान्ध्राः ॥ ५८ ॥ ततश्च
कोसलायां तु नव चैव भूपतयो भविष्यन्ति ॥ ५९ ॥ नैषधास्तु त एव ॥ ६० ॥
ह्यांच्या पश्चात तेरा त्यांच्या वंशाचे व तीन बाह्रिक राजा होतील . नंतर तेरा पुष्पमित्र आणि पटुमित्र तसेच सात आन्ध्र माण्डलिक भूपतिगण होतील
. नऊ राजा क्रमशः कौशल देशात राज्य करतील . निषध
देशाचे स्वामीसुद्धा हेच असतील ॥ ५७-६० ॥
मगधायां
तु विश्वस्फटिक संज्ञोऽन्यान्वर्णान्करिष्यति ॥ ६१ ॥
कैवर्तवटुपुलिन्दब्राह्मणान्राज्ये
स्थपयिष्यति ॥ ६२ ॥
मगध देशात विश्वस्फटिक नामक राजा अन्य वर्णियांना प्रवृत्त करेल. तो कैवर्त, वटु, पुलिन्द आणि ब्राह्मणांना राज्यात नियुक्त करेल ॥६१-६२॥
उत्साद्याखिलक्षत्रजातिं
नव नागाः पद्मवत्यां नाम पुर्यामनुगङ्गाप्रयागं गयायाञ्च मागधा गुप्तांश्च भोक्ष्यन्ति
॥ ६३ ॥
सम्पूर्ण क्षत्रिय-जातिचे उच्छाटन करून पद्मावतीपुरीत नागगण तसेच गंगेच्या
जवळील प्रयाग व गयामध्ये मागध आणि गुप्त राजा राज्य-भोग घेतील ॥ ६३ ॥
कोशलान्ध्रपुण्ड्रताम्रलिप्तसमतटपुरीं
च देवरक्षितो रक्षिता ॥ ६४ ॥
कोशल, आन्ध्र, पुण्डू, ताम्रलिप्त आणि समुद्र तटवर्तिनी पुरीचे देवरक्षित नामक
एक राजा रक्षण करेल ॥ ६४ ॥
कलिङ्गमाहिषमहेन्द्रभौमान्
गुहा भोक्ष्यन्ति ॥ ६५ ॥
कलिङ्ग, माहिष, महेन्द्र आणि भौम आदि देश गुह नरेश भोगेल ॥ ६५ ॥
नैषधनैमिषक
कालकोशकाञ्जनपदान्मणिधान्यकवंशा भोक्ष्यन्ति ॥ ६६ ॥
नैषध, नैमिषक आणि कालकोशक आदि जनपद मणिधान्यक वंशीय राजा भोगतील ॥ ६६ ॥
त्रैराज्यमुषिकजनपदान्
कनकाह्वयो भोक्ष्यति ॥ ६७ ॥
त्रैराज्य आणि मुषिक देशांवर कनक नामक राजाचे राज्य असेल ॥ ६७ ॥
सौराष्ट्रावन्ति
शुद्राभीरान्नर्मदामरुभूविषयांश्च व्रात्यद्विजाभीरशूद्राद्या भोक्ष्यन्ति ॥ ६८ ॥
सौराष्ट्र, अवन्ति, शूद्र, आभीर तसेच नर्मदा तटावरील मरुभूमिवर ब्रात्य, द्विज,
आभीर आणि शूद्र आदींचे आधिपत्य असेल ॥ ६८ ॥
सिन्धुतटदाविकोर्वीचन्द्रभागा
काश्मीरविषयांश्च व्रात्यम्लेच्छस्कूद्रादयो भोक्ष्यन्ति ॥ ६९ ॥
समुद्रतट, दावी कोर्वी,
चन्द्रभागा आणि काश्मीर आदि देशांचा ब्रात्य, म्लेच्छ व शूद्र आदि राजागण भोग घेतील॥
६९ ॥
एते च तुल्यकालाःसर्वे
पृथिव्यां भूभुजो भविष्यन्ति ॥ ७० ॥
हे समस्त राजे पृथ्वीवर एकाच वेळी असतील ॥ ७० ॥
अल्पप्रसादा
बृहत्कोपाः सार्वकालमनृताधर्मरुचयः स्त्रीबालगोवधकर्तारः परस्वादानरुचयोऽल्पसाराः तमिस्त्रप्राया
उदितास्तमितप्राया अल्पायुषो महेच्छा ह्यल्पधर्मा लुब्धाश्च भविष्यन्ति ॥ ७१ ॥
हे थोड़ी प्रसन्नता असलेले, अत्यंत क्रोधी, सर्वदा अधर्म व मिथ्या भाषणात रुचि
असणारे, स्त्री-बालक व गायींची हत्या करणारे, परधनाचे हरण करण्यात रुचि असणारे, अल्पशक्ति,
तमःप्रधान, उत्थानासोबतच पतनशील, अल्पायु, महत्त्वाकांशी, अल्पपुण्य व अत्यन्त लोभी
असतील ॥७१॥
तैश्च
विमिश्रा नजपदाः तच्छीलानुवर्तिनो राजाश्रयशुष्मिणो म्लेच्छाचाराश्च विपर्ययेण वर्तमानाः
प्रजाः क्षपयिष्यन्ति ॥ ७२ ॥
हे सर्व देशांना परस्पर मिळवून त्या राजांच्या आश्रयानेच बलवान होऊन त्यांच्या
स्वभावाचे अनुकरण करणार्या म्लेच्छांसमान व आर्यविपरीत आचरण करत सर्व प्रजेला नष्ट-भ्रष्ट
करतील ॥ ७२ ॥
ततश्चानुदिनं अल्पाल्पह्रासव्यवच्छेदाद् धर्मार्थयोर्जगतःसंक्षयो भविष्यति ॥ ७३ ॥
तेव्हा दिवसेंदिवस धर्म
व अर्थाचा थोड़ा-थोड़ा ह्रास तसेच क्षय होत असल्याने संसाराचा क्षय होईल ॥ ७३ ॥
ततश्चार्थ
एवाभिजनहेतुः ॥ ७४ ॥ बलमेवाशेषधर्महेतुः ॥ ७५ ॥ अभिरुचिरेव
दाम्पत्यसम्बन्धहेतुः ॥ ७६ ॥ स्त्रीत्वमेवोपभोगहेतुः
॥ ७७ ॥ अनृतमेव व्यवहारजयहेतुः ॥ ७८ ॥ उन्नताम्बुतैव पृथिवीहेतुः ॥ ७९ ॥ ब्रह्मसूत्रमेव
विप्रत्वहेतुः ॥ ८० ॥ रत्नधातुतैव श्लाघ्यताहेतुः
॥ ८१ ॥ लिङ्गधाराणमेवाश्रमहेतुः ॥ ८२ ॥ अन्याय एव वृत्तिहेतुः ॥ ८३ ॥ दौर्बल्यमेवावृत्तिहेतुः
॥ ८४ ॥ अभयप्रगल्भोच्चारणमेव पाण्डित्यहेतुः ॥ ८५ ॥ अनाढ्यतैव साधुत्वहेतुः ॥ ८६ ॥ स्त्रानमेव
प्रसाधनहेतुः ॥ ८७ ॥ दानमेव धर्महेतुः ॥ ८८
॥ स्वीकरणमेव विवाहहेतुः ॥ ८९ ॥ सद्वेषधार्येव पात्रम् ॥ ९० ॥ दूरायतननोदकमेव तीर्थहेतुः
॥ ९१ ॥ कपटवेषधारणमेव महत्त्वहेतुः ॥ ९२ ॥
त्यावेळी अर्थ म्हणजे
पैसा हाच कुलीनतेचा हेतु असेल; बल हेच सम्पूर्ण धर्माचा हेतु असेल; पारस्परिक रुचि
हीच दाम्पत्य-सम्बन्धाचा हेतु असेल, स्त्रीत्व हाच उपभोगाचा हेतु असेल [म्हणजेच स्त्रीची
जात किंवा तिच्या कुळाचा कोणीही विचार करणार नाही] ; मिथ्या भाषण हेच व्यवहारात सफलता
प्राप्त करण्याचा हेतु असेर; जलाची सुलभता व सुगमता हाच पृथ्वीच्या स्वीकृतिचा हेतु
असेल, म्हणजेच पुण्यक्षेत्रांचा कोणीही विचार करणार नाहीत. [जिथले
जलवायु उत्तम तीच भूमि उत्तम मानली जाईल]; यज्ञोपवीतच ब्राह्मणत्वाचा हेतु असेल; रत्नादि
धारण करणे हाच प्रशंसेचा हेतु असेल; बाह्य चिह्न आश्रमांचा हेतु असेल; अन्याय हाच आजीविकेचा
हेतु असेल; दुर्बलताच बेकारीचा हेतु असेल; निर्भयतापूर्वक धृष्टतेने बोलणेच पाण्डित्याचा
हेतू असेल; निर्धनताच साधुत्वाचा हेतु असेल; स्नान हा साधनाचा हेतु असेल; दान हाच धर्माचा
हेतु असेल; स्वीकार करणे हाच विवाहाचा हेतु असेल [म्हणजेच संस्कार आदिची अपेक्षा न
करता पारस्परिक स्नेहबन्धनानेच दाम्पत्य सम्बन्ध स्थापित होतील]; चांगल्या प्रकारे
छानछोकीने राहणाराच सुपात्र मानला जाईल ; दूरदेशीचे जलच तीर्थोदकत्व मानले जाईल तसेच छद्मवेश धारण करणे हेच गौरवाचे कारण असेल ॥७४ -
९२ ॥
इत्येवमनेकदोषोत्तरे तु
भूमण्डले सर्वावर्णेष्वेव यो यो बलवान्स स भूपतिर्भविष्यति ॥ ९३ ॥
अशा प्रकारे पृथ्वी मंडलात विविध दोष पसरल्याने सर्व वर्गात जो-जो बलवान तोच
राजा बनेल ॥ ९३ ॥
एवं
चातिलुब्धकराजासहाः शोलानामन्तरद्रोणीः प्रजाःसंश्रयिष्यन्ति ॥ ९४ ॥
मधुशाकमूलफलपत्रपुष्पाद्याहाराश्च
भविष्यन्ति ॥ ९५ ॥
अशाप्रकारे अतिलोलुप राजांचा करभार सहन न करता आल्याने प्रजा पर्वत गूहांचा
आश्रय घेईल व मधु, शाक, मूल, फल, पत्र आणि पुष्प आदि खाऊन दिवस काढेल ॥ ९४-९५ ॥
तरुवल्कलपर्णचीर
प्रावरणाश्चातिबहुप्रजाः शीतवातातपवर्षसहाश्च भविष्यन्ति ॥ ९६ ॥
वृक्षांची पाने आणि वल्कल हेच त्यांचे कपड़े असतील. अधिक
संतति होईल. सर्वजण शीत, वायु, घाम व वर्षा आदि
कष्ट सहन करतील ॥९६॥
न च
कश्चित्त्रयोविंशतिवर्षाणि जीविष्यति अनवरतं चात्र कलियुगे भयमायात्यखिल एवैष जनः ॥
९७ ॥
कोणीही तेवीस वर्षांपर्यंत जिवंत राहू शकणार नाही. अशाप्रकारे
कलियुगात हा सम्पूर्ण जनसमुदाय निरन्तर क्षीण होत राहील ॥ ९७ ॥
श्रौते स्मार्ते च धर्मे विप्लवमत्यन्तमुपगते क्षीणप्राये च कलावशेष जगत्स्त्रष्टुश्चराचरगुरोरादि
मध्यान्तरहितस्य ब्रह्ममयस्यात्मरूपिणो भगवतो वासुदेवस्यांशः शम्बलग्रामप्रधानब्राह्मणस्य
विष्णुयशसो गृहेष्टगुणर्धिसमन्वितः कल्किरूपी जगत्यत्रावतीर्य सकल म्लेच्छदस्युदुष्टाचरमचेतसां
अशेषाणां अपरिच्छिन्नशक्तिमाहात्म्यः क्षयं करिष्यति स्वधर्मेषु चा खिलमेव संस्थापयिष्यति
॥ ९८ ॥
अशाप्रकारे श्रौत आणि स्मार्त धर्माचा अत्यन्त ह्रास झाल्यावर व कलियुगाचा
काळ संपत आल्यावर शम्भल ग्रामनिवासी ब्राह्मण श्रेष्ठ विष्णुयशाच्या घरी समस्त विश्वाचा
रचयिता, चराचरगुरु, आदिमध्यान्तशून्य, ब्रह्ममय आत्म स्वरूप भगवान वासुदेव आपल्या अंशाने
अष्टैश्वर्ययुक्त कल्कि रूपात संसारात अवतार घेऊन असीम शक्ति व माहात्म्याने सम्पन्न
होऊन सकल म्लेच्छ, दस्यु, दुष्टाचारी तसेच दुष्टचित्तांचा क्षय करून समस्त प्रजेला
आपआपल्या धर्मात नियुक्त करेल ॥ ९८ ॥
अनन्तरं चाशेषकलेरवसाने निशावसाने विबुद्धानामिव तेषामेव जनपदानां अमलस्फटिकविशुद्धा
मतयो भविष्यन्ति ॥ ९९ ॥
त्यानंतर समस्त कलयुग समाप्त झाल्यावर रात्र संपून जाग आलेल्या सारखी तत्कालीन
लोकांची बुद्धी स्वच्छ, स्फटिकमणि समान निर्मळ होईल ॥ ९९ ॥
तेषां
च बीजभूतानां अशेषमनुष्याणां परिणतानामपि तत्कालकृतापत्यप्रसूतिर्भविष्यति ॥ १०० ॥
त्या समस्त बीजभूत मणसांपासून त्यांची अधिक अवस्था असूनही त्यावेळी संतति उत्पन्न
होऊ शकेल ॥ १०० ॥
तानि
च तदपत्यानि कृतयुगानुसारीण्येव भविष्यन्ति ॥ १०१ ॥
त्यांची संतति सत्ययुगाच्याच धर्माचे अनुसरण करणारी असेल ।।१०१।।
अत्रोच्यते
यथा
चन्द्रश्च सूर्यश्च तथा तिष्यो बृहस्पतिः ।
एकराशौ
समेष्यन्ति तदा भवति वै कृतम् ॥ १०२ ॥
ह्या विषयी असे म्हटले जाते की;- ज्यावेळी चन्द्र, सूर्य व बृहस्पति पुष्य
नक्षत्रात स्थित होऊन एकाच राशित एकत्र येतील तेव्हा सत्ययुगाचा आरंभ होईल ।। १०२ ॥
अतीता
वर्तमानाश्च तथैवानागताश्च ये ।
एते
वंशेषु भूपालाः कथिता मुनिसत्तम ॥ १०३ ॥
हे मुनिश्रेष्ठा ! तुला मी हे समस्त वंशांच्या भूत, भविष्य व वर्तमानकालीन
सर्व राजांचे वर्णन केले ॥ १०३ ॥
यावत्परीक्षितो
जन्म यावन्नन्दाभिषेचनम् ।
एतद्वर्षसहस्रं
तु ज्ञेयं पञ्चाशदुत्तरम् ॥ १०४ ॥
परीक्षिताच्या जन्मापासून नन्दच्या अभिषेकापर्यंत एक हजार पाचशे वर्षाचा काळ
समजून घ्यायला हवा ॥१०४।।
सप्तर्षीणां
तु यौ पूर्वौ दृश्येते ह्युदितौ दिवि ।
तयोस्तु
मध्ये नक्षत्रं दृश्यते यत्समं निशि ॥ १०५ ॥
तेन
सप्तर्षयो युक्तास्तिष्ठन्त्यब्दशतं नृणाम् ।
ते तु
पारीक्षिते काले मघास्वासन्द्विजोत्तम ॥ १०६ ॥
तदा
प्रवृत्तश्च कलिर्द्वादशाब्दशतात्मकः ॥ १०७ ॥
सप्तर्षिंमधील जी दोन नक्षत्रे [पुलस्त्य व क्रतु] आकाशात आधी दिसतात, त्यांच्या
मध्ये रात्रीच्या वेळी जे [दक्षिणोत्तर रेखेवर] समदेशी स्थित [अश्विनी आदि] नक्षत्र
आहेत, त्यातील प्रत्येक नक्षत्रावर सप्तर्षिगण एक-एकशे वर्ष राहतात . हे द्विजोत्तमा ! परीक्षिताच्या वेळी हे सप्तर्षिगण मघा नक्षत्रावर होते. त्याचवेळी बाराशे वर्षांचे प्रमाण असलेला कलियुग सुरू झाला ॥ १०५-१०७॥
यदैव
भगवान्विष्णोरंशो यातो दिवं द्विज ।
वसुदेवकुलोद्भूतस्तदैवात्रागतः
कलिः ॥ १०८ ॥
हे द्विजा ! जेव्हा श्रीविष्णुचे अंशावतार असलेले वसुदेवाचे वंशधर भगवान कृष्ण
निजधामाला गेले त्याचवेळी पृथ्वीवर कलियुगाचे आगमन झाले होते॥१०८॥
यावत्स
पादपद्माभ्यां पस्पर्शेमां वसुन्धराम् ।
तावत्पुथ्वीपरिष्वङ्गे
समर्थो नाभवत्कलिः ॥ १०९ ॥
जोपर्यंत भगवंत आपल्या चरणकमलांनी ह्या पृथ्वीला स्पर्श करत राहीले तोपर्यंत
पृथ्वी संसर्गीत करण्याची कलियुगाची हिम्मत झाली नाही ॥ १०९ ॥
गते
सनातनस्यांशे विष्णोस्तत्र भुवो दिवम् ।
तत्याज
सानुजो राज्यं धर्म पुत्रो युधिष्ठिरः ॥ ११० ॥
सनातन पुरुष भगवान विष्णुचे अंशावतार श्रीकृष्ण स्वर्गलोकी परतल्यावर भावंडांसहित
धर्मपुत्र महाराज युधिष्ठिराने आपल्या राज्याचा त्याग केला ।। ११० ॥
विपरीतानि दृष्ट्वा च
निमित्तानि हि पाण्डवः ।
याते कृष्णे चकाराथ सोऽभिषेकं परीक्षितः ॥ १११ ॥
कृष्णा अन्तर्धान झाल्यावर विपरीत लक्षणे पाहून पांडवांनी परीक्षिताला राज्यपदावर
अभिषिक्त केले ॥ १११ ॥
प्रयास्यन्ति
यदा चैते पूर्वाषाढां महर्षयः ।
तदा
नन्दात्प्रभृत्येष गतिवृद्धिं गमिष्यति ॥ ११२ ॥
ज्यावेळी हे सप्तर्षि गण पूर्वाषाढ़ा नक्षत्रावर जातील तेव्हा राजा नन्दाच्या
वेळेपासून कलियुगाचा प्रभाव वाढू लागेल ॥ ११२ ॥
यस्मिन्
कृष्णो दिवं यातस्तस्मिन्नेव तदाहनि ।
प्रतिपन्नं
कलियुगं तस्य संख्यां निबोध मे ॥ ११३ ॥
ज्या दिवशी भगवान कृष्ण परमधामाला गेले होते त्याच दिवशी कलियुग उपस्थित झाला
होता. आता कलियुगाची वर्ष-संख्या एक ॥ ११३ ॥
त्रीणि
लक्षाणि वर्षाणां द्विज मानुष्यसंख्यया ।
षष्टिश्चैव
सहस्राणि भविष्यत्येष वै कलिः ॥ ११४ ॥
हे द्विजा! मानवी वर्ष गणनेनुसार कलियुग तीन लाख साठ हजार वर्ष राहील ॥ ११४॥
शातानि
तानि दिव्यानां सप्त पञ्च च संख्यया ।
निःशेषेण
गते तस्मिन् भविष्यति पुनः कृतम् ॥ ११५ ॥
त्यानंतर बाराशे दिव्य वर्ष झाल्यावर कृतयुग असेल ॥ ११५॥
ब्राह्मणाः
क्षित्त्रिया वैश्याः शुद्राश्च द्विजसत्तम ।
युगेयुगे
महात्मानः समतीताः सहस्रशः ॥ ११६ ॥
हे द्विजश्रेष्ठा ! प्रत्येक युगात हजारों ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र
महात्मागण झाले आहेत ॥११६ ॥
बहुत्वान्नामधेयानां
परिसंख्या कुले कुले ।
पौनरुक्त्याद्धि
साम्याच्च न मया परिकीर्तिता ॥ ११७ ॥
त्यांच्या अत्यधिक संख्येमुळे तसेच समानतेमुळे कुळांमध्ये पुनरुक्ति होऊ नये
म्हणून मी त्या सर्वांची नावे सांगितली नाहीत ॥ ११७ ॥
देवापिः
पौरवो राजा पुरुश्चेक्षाकुवंशजः ।
महायोगबलोपेतौ
कलापग्रमसंश्रितौ ॥ ११८ ॥
पुरुवंशीय राजा देवापि तसेच इक्ष्वाकुकुलोत्पन्न राजा मरु हे दोघे अत्यन्त
योगबलसम्पन्न आहेत आणि ते कलापग्रामी राहातात ॥ ११८॥
कृते युगे त्विहागम्य
क्षत्रप्रावर्तकौ हि तौ ।
भविष्यतो मनोर्वशबीजभूतौ व्यवस्थितौ ॥ ११९ ॥
सत्ययुग आरम्भ झाल्यावर ते पुन्हा मर्त्यलोकी येतील व क्षत्रिय-कुळाचे प्रवर्तक
होतील. ते आगामी मनुवंशाचे बीजरूप आहेत ॥ ११९॥
एतेन
क्रमयोगेन मनुपुत्रौर्वसुन्धरा ।
कृतत्रेताद्वापराणि
युगानि त्रीणि भुज्यते ॥ १२० ॥
सत्ययुग, त्रेता व द्वापर ह्या तीनही युगांमध्ये ह्याच क्रमाने मनुपुत्र पृथ्वीचा
भोग घेतात ॥ १२० ॥
कलौ
ते बीजभूता वै केचित्तिष्ठन्ति वै मुने ।
यथैव
देवापिपुरू साम्प्रतं समधिष्ठितौ ॥ १२१ ॥
नंतर कलियुगात ह्यातीलच काही आगामी मनु संततिच्या बीजरूपात स्थित राहातात जसे
आता देवापि आणि मरु आहेत ।।१२१॥
एष तूद्देशतो
वंशस्तवोक्तो भूभुजां मया ।
निखिलो
गदितुं शक्यो नैष वर्षशतैरपि ॥ १२२ ॥
ह्याप्रकारे मी तुला सम्पूर्ण राजवंशांचे हे संक्षिप्त वर्णन सांगितले, ह्यांचे
पूर्णपणे वर्णन करायला शंभर वर्ष देखील कमी पडतील ॥ १२२ ॥
एते चान्ये च भूपाला यैरत्र
क्षितिमण्डले ।
कृतं ममत्वं मोहान्धैर्नित्यं हेयकलेवरे ॥ १२३ ॥
ह्या हेय शरीराच्या मोहाने अन्ध झालेले हे व इतर अनेक भूपतिगण झाले ज्यांनी ह्या पृथ्वी मण्डळावर
प्रेम केले । १२३ ॥
कथं
ममेयमचला मत्पुत्रस्य कथं मही ।
मद्वंशस्येति
चिन्तार्ता जग्मुरन्तमिमे नृपाः ॥ १२४ ॥
'ही पृथ्वी कशा प्रकारे केवळ माझी, माझ्या पुत्राची किंवा माझ्या वंशाची होईल, ह्याच
चिन्तेत व्याकुळ होऊन ह्या सर्व राजांचा अन्त झाला ॥ १२४ ।।
तेभ्यः
पूर्वतराश्चान्ये तेभ्यस्तेभ्यस्तथा परे ।
भविष्याश्चैव
यास्यन्ति तेषामन्ये च येऽप्यनु ॥ १२५ ॥
ह्याच चिन्तेत सतत असल्याने ह्या सर्व राजांचे पूर्व-पूर्ववर्ती राजा नष्ट
झाले आणि ह्याच चिंतेत मग्न राहून आगामी भूपतिगण सुद्धा मृत्युमुखी पडले ॥ १२५ ॥
विलोक्यात्मजयोद्योगं
यात्राव्यग्रान्नराधिपान् ।
पुष्पप्रहासैः
शरदि हसन्तीव वसुन्धरा ॥ १२६ ॥
अशाप्रकारे आपल्यावर विजय मिळवण्यासाठी ह्या राजांनी केलेले अथक उद्योग पाहून
वसुन्धरा शरत्कालीन पुष्षांच्या रूपात जणू हसते आहे ॥ १२६ ।।
मैत्रेय
पृथिवीगीताञ्च्लोकांश्चात्र निबोध मे ।
यानाह
धर्मध्वजिने नजकायासितो मुनिः ॥ १२७ ॥
हे मैत्रेया ! आता तु पृथ्वीचे काही श्लोक ऐक। पूर्वकाळी हे श्लोक असित मुनिने
धर्मध्वजी राजा जनकाला ऐकवले होते । १२७ ।।
पृथिव्युवाच
कथमेष
नरेद्राणां मोहो बुद्धिमतामपि ।
येन
फेनसधर्माणोऽप्यतिविश्वस्तचेतसः ॥ १२८ ॥
पृथ्वी म्हणते ;- अहो ! बुद्धिमान असूनही ह्या राजांना हा कसला मोह होतो आहे
ज्यामुळे ते बुडबुड्या सारखे क्षणस्थायी असूनही आपल्या स्थिरतेवर एवढा विश्वास ठेवतात
।। १२८ ॥
पूर्वमात्मजयं
कृत्वा जेतुमिच्छन्ति मन्त्रिणः ।
ततो
भृत्यांश्च पौरांश्च जिगीषन्ते तथा रिपून् ॥ १२९ ॥
हे लोक आधी स्वतःला जिंकतात
,मग आपले मंत्री व नंतर क्रमशः आपले भृत्य, पुरवासी आणि शत्रुंना जिंकू इच्छीतात ॥
१२९ ॥
क्रमेणानेन
जेष्यामो वयं पृथ्वीं ससागराम् ।
इत्यासक्तधियो
मृत्युं न पश्यन्त्यविद्वरगम् ॥ १३० ॥
'ह्याच क्रमाने आपण समुद्रपर्यन्त ही सम्पूर्ण पृथ्वी जिंकू अशा बुद्धिने मोहित
झालेल्या ह्या लोकांना आपला निकटवर्ति मृत्यु दिसत नाही ॥ १३० ॥
समुद्रावरणं
याति भूमण्डलमथो वशम् ।
कियदात्मजयस्यैतन्मुक्तिरात्मजये
फलम् ॥ १३१ ॥
जरी समुद्राने घेरलेला हा सम्पूर्ण भूमण्डल आपल्या ताब्यात आला तरी मनोजयापुढे
ह्याची किंमत काय ! कारण मोक्ष तर मनोजयामुळेच प्राप्त होतो ॥१३१ ॥
उत्सृज्य
पूर्वजा याता यां नादाय गतः पिता ।
तां
मामतीव मूढत्वाज्जेतुमिच्छन्ति पार्थिवाः ॥ १३२ ॥
जिला सोडून ह्यांचे पूर्वज निघून गेले तसेच जिला आपल्या सोबत ह्यांचे पिता
सुद्धा घेऊन गेले नाहीत त्या मला अत्यन्त मूर्खतेमुळे हे राजे जिंकू इच्छितात ॥ १३२
॥
मत्कृते
पितृपुत्राणां भ्रातॄणां चापि विग्रहः ।
जायतेऽत्यन्तमोहेन
ममत्वादृतचेतसाम् ॥ १३३ ॥
ज्यांचे चित्त ममतामय आहे त्या पिता-पुत्र व भावंडांमध्ये आत्यंतिक मोहामुळे
माझ्यासाठी परस्पर कलह होतो ॥ १३३ ॥
पृथ्वी
ममेयं सकला ममैषा मदन्वयस्यापि
च शाश्वतीयम् ।
यो यो
मृतो ह्यत्र बभूव राजा कुबुद्धिरासीदिति तस्य तस्य ॥ १३४ ॥
जे जे राजा इथे होऊन गेले त्या सर्वांचिच अशी कुबुद्धि होती की ही सम्पूर्ण
पृथ्वी माझीच आहे व माझ्या मागे माझ्याच संततिची राहील ॥ १३४ ॥
दृष्ट्वा
ममत्वादृतचित्तमेकं विहाय मां मृत्युवशं व्रजन्तम् ।
तस्यानुयस्तस्य
कथं ममत्वं हृद्यास्पदं
मत्प्रभवं करोति ॥ १३५ ॥
अशा प्रकारे माझ्याविषयी ममत्व असलेल्या एका राजाला, मला सोडून मृत्युमुखी
जाताना पाहूनही त्याचा उत्तराधिकारी आपल्या हृदयात माझ्याविषयी ममत्व कसे ठेवू शकतो
कळत नाही ॥ १३५ ॥
पृथ्वी
ममैषाशु परित्यजैनां वदन्ति ये दूतमुखैः स्वशत्रून् ।
नराधिपास्तेषु
ममातिहासः पुनश्च
मूढेषु दयाभ्युपैति ॥ १३६ ॥
जे राजे दूतांच्या द्वारा आपल्या शत्रुला सांगतात की, ही पृथ्वी माझी आहे,
तुम्ही त्वरित हिला सोडून निघून जा” त्यांच्यावर मला खूप हसू येते व त्या मूर्खांवर
दयासुद्धा येते ॥ १३६ ॥
श्रीपराशर
उवाच
इत्येते
धरणीगीतः श्लोका मैत्रेय यैः श्रुताः ।
ममत्वं
विलयं याति तपत्यर्के यथा हिमम् ॥ १३७ ॥
श्री पराशर म्हणाले ;- हे मैत्रेया ! पृथ्वीच्या ह्या श्लोकांना जो पुरुष ऐकेल
त्याची ममता सूर्याच्या तापाने बर्फ वितळतो तशी वितळून लीन होईल ॥ १३७ ॥
इत्येष
कथितः सम्यङ्मनोर्वंशो मया तव ।
यत्र
स्थितिप्रवृत्तस्य विष्णोरंशांशका नृपाः ॥ १३८ ॥
अशा प्रकारे मी तुला चांगल्या प्रकारे मनुच्या वंशाचे वर्णन केले ज्या वंशाचे
राजागण स्थितिकारक भगवान् विष्णुच्या अंशाचे अंश होते ॥ १३८ ॥
शृणोति
य इमं भक्त्या मनोर्वंशमनुक्रमात् ।
तस्य
पापमशेषं वै प्रणश्यत्यमलात्मनः ॥ १३९ ॥
जो पुरुष ह्या मनुवंशाचे क्रमशः श्रवण करतो त्या शुद्धात्म्याचे सम्पूर्ण पाप
नष्ट होते ॥ १३९ ॥
धनधान्यर्धिमतुलां
प्राप्नोत्यव्याहतेन्द्रियः ।
श्रुत्वैवमखिलं
वंशं प्रशस्तं शशीसूर्ययोः ॥ १४० ॥
जो मनुष्य जितेन्द्रिय होऊन सूर्य व चन्द्राच्या ह्या प्रशंसनीय वंशांचे सम्पूर्ण
वर्णन ऐकतो, तो अतुल धन-धान्य व संपत्ति प्राप्त करतो ॥ १४० ॥
इक्ष्वाकुजह्नुमान्धातृसगराविक्षितान्रघून्
।
ययातिनहुषाद्यांश्च
ज्ञात्वा निष्ठामुपागतान् ॥ १४१ ॥
महाबलान्महावीर्याननन्तधनसञ्चयान्
।
कृतान्कालेन
बलिना कथाशेषान्नराधिपान् ॥ १४२ ॥
श्रुत्वा न पुत्रदारादौ
गृहक्षेत्रादिके तथा ।
द्रव्यादौ
वा कृतप्रज्ञो ममत्वं कुरुते नरः ॥ १४३ ॥
महाबलवान महावीर्यंशाली अनन्त धन सन्चय करणारे तसेच परम निष्ठावान इक्ष्वाकु,
जह्रु, मान्धाता, सगर, आविक्षित रघुवंशी राजागण तसेच नहुष आणि ययाति आदिंचे चरित्र
ऐकून, ज्यांना काळाने आज कथा मात्र शेष ठेवले आहे, प्रज्ञावान् मनुष्य पुत्र, स्त्री,
गृह, क्षेत्र व धन आदिमध्ये ममत्वाने गुंतत नाही ।। १४१-१४३ ॥
तप्तं
तपो यैः पुरुषप्रवीरै रुद्बाहुभिर्वर्षगणाननेकान् ।
इष्ट्वा
सुयज्ञैर्बलिनोऽतिवीर्याः कृता नु कालेन कथावशेषाः
॥ १४४ ॥
ज्या पुरुष श्रेष्ठांनी ऊर्ध्वबाहु होऊन अनेक वर्ष कठिण तपस्या केली होती तसेच
विविध प्रकारच्या यज्ञांचे अनुष्ठान केले होते, आज त्या अति बलवान वीर्यशाली राजांना
काळाने केवळ कथामात्र ठेवले आहे ॥ १४४ ॥
पृथुःसमस्तान्विचचार
लोकानव्याहतो योविजितारिचक्रः ।
स कालवाताभिहतः
प्रणष्टः क्षिप्तं यथा शाल्मलितूलमग्नौ ॥ १४५ ॥
जो पृथु आपल्या शत्रुसमूहाला जिंकून स्वच्छन्द-गतिने समस्त लोकी विचरत होता
आज तोच कालवायुच्या प्रेरणेने फेकलूल्या रूईच्या राशीसारखा नष्ट-भ्रष्ट झाला आहे ॥
१४५ ॥
यः कार्तवीर्यो
बुभुजे समस्तान्द्वीपान्समाक्रम्य हतारिचक्रः ।
कथाप्रसङ्गेष्वभिधीयमानः
स एव संकल्पविकल्पहेतुः ॥ १४६ ॥
जो कार्तवीर्य आपल्या
शत्रु-मण्डळाचा संहार करून समस्त द्वीपांना वशीभूत करून त्यांचा भोग घ्यायचा आज कथा-प्रसङ्गातून
त्याचे वर्णन ऐकताना तोच संकल्प विकल्पाचा हेतु ठरतो, म्हणजेच तो वास्तवात होता की
नाही असा संदेह निर्माण होतो ॥ १४६ ॥
दशाननाविक्षतराघवाणामैश्वर्यमुद्भासितदिङ्मुखानाम्
।
भस्मापि
शिष्टं न कथं क्षणेन भ्रूभङ्गपातेन धिगन्तकस्य ॥ १४७ ॥
समस्त दिशांना देदीप्यमान
करणारे रावण, मरुत्त आणि रघुवंशींच्या क्षणभंगुर ऐश्वर्याचा धिक्कार असो। नाहीतर काळाच्या
क्षणिक कटाक्षपापामुळे आज त्याचे भस्ममात्र देखील उरलेले नाही ॥ १४७ ॥
कथाशरीरत्वमवाप
यद्वैमान्धातृनामा भुवि चक्रवर्ती ।
श्रुत्वापि
तत्कोहि करोति साधुर्ममत्वमान्मन्यपि मन्दचेताः ॥ १४८ ॥
जो मान्धाता सम्पूर्ण
भूमण्डळाचा चक्रवर्ती सम्राट होता आज तो केवळ कथेतच उरला आहे. असा
कोण मन्दबुद्धि जो हे ऐकल्यावरही आपल्या शरीरावर प्रेम करेल ? ॥ १४८ ॥
भगीरथाद्याःसगरं
ककुत्स्थो दशाननो राघवलक्ष्मणौ च ।
युधिष्ठिराद्याश्च
बभूवुरेते सत्यं न मिथ्या क्व नु ते न विद्मः ॥ १४९ ॥
भगीरथ, सगर, ककुत्स्थ, रावण, रामचंद्र, लक्ष्मण आणि युधिष्ठिर आदि आधी होऊन
गेले ही गोष्ट सर्वथा सत्य आहे, ह्यात काहीच खोटे नाही, पण आता ते सगळे कुठे आहेत
आपल्याला माहीत नाही ॥ १४९ ॥
ये साम्प्रतं
ये च नृपा भविष्याः प्रोक्ता मया विप्रवरोग्रवीयाः ।
एते
तथान्ये च तथाभिधेयाः सर्वे भविष्यन्ति यथैव
पूर्वे ॥ १५० ॥
हे विप्रवरा! वर्तमान व भविष्यकालीन ज्या ज्या महावीर्यशाली राजांचे मी वर्णन
केले ते व अन्य लोक सुद्धा पूर्वोक्त राजांसारखेच कथामात्र शेष राहतील
॥ १५० ॥
एत द्विदित्वा
न नरेण कार्यं ममत्वमात्मन्यपि पण्डितेन ।
तिष्ठन्तु
तावत्तनयात्मजाद्याः क्षेत्रादयो ये च शरीरिणोऽन्ये
॥ १५१ ॥
हे समजून घेऊन पुत्र, पुत्री आणि क्षेत्र आदि तसेच अन्य प्राणी तर सोडाच, बुद्धिमान्
मनुष्याने आपल्या शरीरावर सुद्धा प्रेम करू नये ॥ १५१ ॥
इति श्रीविष्णुमहापुराणे चतुर्थेंऽशे चतुर्विंशोऽध्यायः (२४)
श्रीविष्णुमहापुराणे चतुर्थांऽशः समाप्तः
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा