बुधवार, २० मे, २०२६

विष्णुपुराण, तृतीय अंश, सप्तदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 3 , Adhyay 17

 

विष्णुपुराणम्

॥ तृतीयः अंशः ॥ सप्तदशोऽध्यायः ॥


 

"नग्नविषयक प्रश्न, देवतांचा पराजय, त्यांनी भगवंताच्या शरणी जाणे आणि भगवंताने मायामोह प्रकट करणे"

 

श्रीपराशर उवाच
 इत्याह भगवानौर्वः सगराय महात्मने ।
 सदाचारं पुरा सम्यङ्‍ मैत्रेय परिपृच्छते ॥ १ ॥

श्रीपराशर म्हणाले ; हे मैत्रेया ! पूर्वकाळी महात्मा सगरने विचारल्यावर भगवान और्वने अशा प्रकारे गृहस्थाच्या सदाचाराचे निरूपण केले होते || ||

 


 मयाप्येतदशेषेण कथितं भवतो द्विज ।
 समुल्लङ्‍घ्य सदाचारं कश्चिन्नाप्नोति शोभनम् ॥ २ ॥

हे द्विजा ! मी सुद्धा तुला त्याचे पूर्णपणे वर्णन केले . कोणताही पुरुष सदाचाराचे उल्लंघन करून सद्गति मिळवू शकत नाही || ||

 


 श्रीमैत्रेय उवाच
 षण्डापविद्धप्रमुखा विदिता भगवन्मया ।
 उदक्याद्याश्च मे सम्यङ्‍ नग्नमिच्छामि वेदितुम् ॥ ३ ॥

श्रीमैत्रेय म्हणाले ;– भगवन ! नपुंसक, अपवित्र आणि रजस्वला आदि विषयी मला  व्यवस्थित माहीत आहे [पण ‘नग्न’ कोणाला म्हणतात ते माहीत नाही]. म्हणून आता मी नग्न ह्या विषयी जाणू इच्छितो || ||

 


 कोनग्नः किं समाचारो नग्नसंज्ञां नरो लभेत् ।
 नग्नस्वरूपमिच्छामि यथावत्कथितं त्वाय ।
 श्रोतुं धर्मभृतां श्रेष्ठ न ह्यस्त्यविदितं तव ॥ ४ ॥

नग्न म्हणजे कोण ? आणि आणि कशा प्रकारचे आचरण करणार्‍या पुरुषाला नग्न-संज्ञा प्राप्त होते ? हे धर्मात्मांमध्ये श्रेष्ठ असणार्‍या ! मी तुमच्याकडून नग्न व्यक्तिच्या स्वरूपाचे यथावत वर्णन ऐकू इच्छितो; कारण आपल्यापासून कोणतीही गोष्ट अविदित नाही || ||

 


 श्रीपराशर उवाच
 ऋग्यजुःसामसंज्ञेयं त्रयी वर्णावृतिर्द्विज ।
 एतामुज्झति यो मोहात्स नग्नः पातकी द्विजः ॥ ५ ॥

श्रीपराशर म्हणाले ;– हे द्विजा ! ऋक, साम आणि यजु: ही वेदत्रयी वर्णांचे आवरणस्वरूप आहे . जो पुरुष मोहाने ह्यांचा त्याग करतो तो पापी ‘नग्न’ म्हणून ओळखला जातो || ||

 

 

त्रयी समस्तवर्णानां द्विजसंवारणं यतः ।
 नग्नो भवत्युज्झितायांमतस्तस्यां न संशयः ॥ ६ ॥

हे ब्रह्मन ! समस्त वर्णांचे संवरण (झाकणारे वस्त्र) वेदत्रयीच आहे; म्हणून त्यांचा त्याग केल्याने पुरुष ‘नग्न’ होतो ह्यात कोणतीही शंका नाही || ||

 


 इदं च श्रुयतामन्यद्‌यद्‍भीष्माय महात्मने ।
 कथयामास धर्मज्ञो वसिष्ठोऽस्मत्पितामहः ॥ ७ ॥

माझे पितामह धर्मज्ञ वसिष्ठांनी ह्या विषयी महात्मा भीष्मांना जे सांगितले होते ते ऐक || ||

 

 

 मयापि तस्य गदतः श्रुतमेतन्महात्मनः ।
 नग्नसम्बन्धि मैत्रेय यत्पृष्टोहमिह त्वाया ॥ ८ ॥

हे मैत्रेया ! तु जे मला नग्न विषयी विचारलेस त्यासंबंधी भीष्माला वर्णन करते वेळी मी देखील महात्मा वसिष्ठांचे कथन ऐकले होते || ||

 

 


 देवासुरमभूद्युद्धं द्विव्यमब्दशतं पुरा ।
 तस्मिन्परजिता देवा दैत्यैर्ह्रादपुरोगमैः ॥ ९ ॥

पूर्वी कोणे एके काळी देवता आणि असुरांचे शंभर दिव्यवर्ष परस्परांमध्ये युद्ध झाले . त्यात ह्लाद प्रभुति दैत्यांद्वारा देवगण पराजित झाले || ||

 

 

क्षीरोदस्योत्तरं कूलं गत्वा तप्यन्त वै तपः ।
विष्णोराराधनार्थाय जगुश्चेमं स्तवं तदा ॥ १० ॥

म्हणून देवगणांनी क्षीरसागराच्या उत्तरीय तटावर जाऊन तपस्या केली आणि भगवान विष्णुच्या आराधनेसाठी तेव्हा हे स्तवनगान केले || १० ||

 


 देवा ऊचुः
 आराधनाय लोकानां विष्णोरीशस्य यां गिरम् ।
 वक्ष्यामो भगवानाद्यस्तया ंविष्णुः प्रसीदतु ॥ ११ ॥

देवगण म्हणाले आम्ही लोकनाथ भगवान विष्णुच्या आराधनेसाठी ज्या वाणीचा उच्चार करतो त्यामुळे तो आद्य-पुरुष श्रीविष्णुभगवान प्रसन्न हो|| ११ ||

 


 यतो भूतान्यशेषाणि प्रसूतानि महात्मनः ।
 यस्मिश्च लयमेष्यन्ति कस्तं स्तोतुमिहेश्वरः ॥ १२ ॥

ज्या परमात्मापासून सम्पूर्ण भूत उत्पन्न झाले आणि ज्याच्यात ते सर्व अंतकाळी लीन होतील, जगात त्याची स्तुति करण्यास कोण समर्थ आहे ? || १२ ||



 तथाप्यरातिविध्वंसध्वस्तवीर्याभयार्थिनः ।
 त्वां स्तोष्यामस्तवोक्तीनां याथार्थ्यं नैव गोचरे ॥ १३ ॥

हे प्रभो ! जरी आपले यथार्थ स्वरूप हा वाणीचा विषय नसला तरी शत्रुकडून विध्वस्त होऊन पराक्रमहीन झाल्याने आम्ही अभयप्राप्तिसाठी आपली स्तुति करत आहोत || १३ ||

 

 

 त्वमुर्वी सलिलं वह्निर्वायुराकाशमेव च ।
 समस्तमन्तःकरणं प्रधानं तत्परः पुमान् ॥ १४ ॥

पृथ्वी, जल, अग्नि, वायु, आकाश, अंत:करण, मूल-प्रकृति आणि प्रकृतिच्या पलिकडे असलेला पुरुष – हे सर्व आपणच आहात || १४ ||

 

 

 एकं तवैतद्‍भूतात्मन्मूर्तामूर्तमयं वपुः ।
 आब्रह्मस्तम्बपर्यन्तं स्थानकालविभेदवत् ॥ १५ ॥

हे सर्वभूतात्मन ! ब्रह्मापासून स्तम्बपर्यन्त स्थान आणि कालादि भेद युक्त हा मुर्त्तामूर्त्त पदार्थमय सम्पूर्ण प्रपंच आपलेच शरीर आहे || १५ ||

 



 तत्रैशं तव यत्पूर्वं त्वन्नाभिकमलोद्‍भवम् ।
 रूपं विश्वोपकाराय तस्मै ब्रह्मात्मने नमः ॥ १६ ॥

आपल्या नाभि-कमलापासून विश्व उपकारार्थ प्रकट झालेले जे आपले प्रथम रूप आहे, हे ईश्वरा ! त्या ब्रह्मस्वरूपाला नमस्कार || १६ ||

 


 शक्रार्करुद्रवस्वश्विमरुत्सोमादिभेदवत् ।
 वयमेकं स्वरूपं ते तस्मै देवात्मने नमः ॥ १७ ॥

इंद्र, सूर्य, रूद्र, वसु, अश्विनीकुमार, मरुद्रण आणि सोम आदि भेद युक्त आम्ही सगळे सुद्धा आपलेच एक रुप आहोत; म्हणून आपल्या त्या देवरूपाला नमस्कार || १७ ||

 


 दम्भप्रायमसम्बोधि तितिक्षादमवर्जितम् ।
 यद्‍रूपं तव गोविन्द तस्मै दैत्यात्मने नमः ॥ १८ ॥

हे गोविन्दा ! जी दम्भमयी, अज्ञानमयी व तितिक्षा आणि दम्भशून्य आहे त्या आपल्या दैत्यमूर्तिला नमस्कार || १८ ||

 



 नातिज्ञानवहा यस्मिन्नाड्यः स्तिमिततेजसि ।
 शब्दादिलोभि यस्तस्मै तुभ्यं यक्षात्मने नमः ॥ १९ ॥

ज्या मंदसत्त्व स्वरूपात ह्रदयाच्या नाड्या अत्यंत ज्ञानवाहिनी नसतात तसेच जो शब्दादि विषयांचा लोभी असतो त्या आपल्या यक्षरूपाला नमस्कार || १९ ||

 

 

 क्रौर्यं मायामयं घोरं यच्च रूपं तवासितम् ।
 निशाचरात्मने तस्मै नमस्ते पुरुषोत्तम ॥ २० ॥
हे पुरुषोत्तमा ! आपले जे क्रूरता व मायायुक्त घोर तमोमय रूप आहे त्या राक्षसस्वरूपाला नमस्कार || २० ||

 

 

 स्वर्गस्थधर्मिसद्धर्मफलोपकरणं तव ।
 धर्माख्यं च तथा रूपं नमस्तस्मै जनार्दन ॥ २१ ॥

हे जनार्दना ! स्वर्गात राहणार्‍या धार्मिक जनांना यागादि सद्धर्मांची फलप्राप्ति करून देणारे जे आपले धर्म नामक रूप आहे त्याला नमस्कार || २१ ||

 


 हर्षप्रायमसंसर्गि गतिमद्‍गमनादिषु ।
 सिद्धाख्यं तव यद्‍रूपं तस्मै सिद्धात्मने नमः ॥ २२ ॥

जल-अग्नि आदि गमनीय स्थानी जाऊनही सर्वदा निर्लिप्त आणि प्रसन्न्तामय राहणारे ते सिद्ध नामक रूप आपलेच आहे; अशा सिद्धस्वरूप आपणाला नमस्कार || २२ ||

 


 अतितिक्षायनं क्रूरमुपभोगसहं हरे ।
 द्विजीह्वन्तव यद्‍रूपं तस्मै नागात्मने नमः ॥ २३ ॥

 हे हरे ! अक्षमेचा आश्रय असलेले अत्यंत क्रूर व कामोपभोगात समर्थ आपले द्विजिह्वा (दोन जीभा असलेले) रूप आहे, त्या नागस्वरूप आपणाला नमस्कार || २३ ||

 


 अवबोधि च यच्छान्तमदोषमपकल्मषम् ।
 ऋषिरूपात्मने तस्मै विश्वरूपाय ते नमः ॥ २४ ॥

हे विष्णो ! ज्ञानमय, शांत, दोषरहित व कल्मषहीन अशा आपल्या मुनिमय स्वरूपाला नमस्कार || २४ ||

 

 


 भक्षयत्यथ कल्पान्ते भूतानि यदवारितम् ।
 त्वद्‍रूपं पुण्डरीकाक्ष तस्मै कालात्मने नमः ॥ २५ ॥
कल्पान्तकाळी अनिवार्य रूपाने समस्त भूतांचे भक्षण करणार्‍या, हे पुण्डरीकाक्षा ! आपल्या त्या कालस्वरूपाला नमस्कार है || २५ ||

 

 

 सम्भक्ष्य सर्वभूतानि देवादीन्यविशेषतः ।
 नृत्यत्यन्ते च यद्‍रूपं तस्मै रुद्रात्मने नमः ॥ २६ ॥

प्रलयकाळी देवता आदि समस्त प्राण्यांना सामान्य भावाने भक्षण करून नृत्य करणार्‍या आपल्या रूद्र-स्वरूपाला नमस्कार || २६ ||

 


 प्रवृत्त्या रजसो यच्च कर्मणां करणात्मकम् ।
 जनार्दन नमस्तस्मै त्वद्‍रूपाय नरात्मने ॥ २७ ॥

रजोगुण प्रवृत्ति मुळे कर्मांचे करणरूप असलेल्या, हे जनार्दना ! आपल्या त्या मनुष्यात्मक स्वरूपाला नमस्कार || २७ ||

 

 

 अष्टाविशद्वधोपेतं यद्‍रूपं तामसं तव ।
 उन्मार्गगामि सर्वात्मंस्तस्मै वश्यात्मने नमः ॥ २८ ॥

हे सर्वात्मना ! अठ्ठावीस ‘वध-युक्त’ तमोमय आणि उन्मार्गगामी अशा आपल्या पशुरूपाला नमस्कार || २८ ||

 

 

 यज्ञाङ्‍गभूतं यद्‍रूपं जगतः स्थितिसाधनम् ।
 वृक्षादिभेदैः षड्भेदि तस्मै मुख्यात्मने नमः ॥ २९ ॥

जे जगताच्या स्थितिचे साधन आणि यज्ञाचे अंगभूत आहे तसेच वृक्ष, लता, गुल्म, वीरूध, तृण आणि गिरि – ह्या सहा भेदांनी युक्त अशा मुख्यरूप आपणाला नमस्कार || २९ ||

 


 तिर्यङ्‍मनुष्यदेवादि व्योमशब्दादिकं च यत् ।
 रूपं तवादेः सर्वस्य तस्मै सर्वात्मने नमः ॥ ३० ॥

तिर्यक मनुष्य तसेच देवता आदि प्राणी, आकाशादि पंचभूत आणि शब्दादि त्यांचे गुण – हे सर्व, सर्वांचे आदिभूत असलेल्या आपलीच रूपे आहेत; म्हणून हे सर्वात्मा आपणाला नमस्कार || ३० ||

 


 प्रधानबुद्ध्यादिमयादशेषा द्यदन्यदस्मात्परमं परात्मन् ।
 रूपं तवाद्यं यदनन्यतुल्यं तस्मै नमः कारणकारणाय ॥ ३१ ॥

हे परमात्मना ! प्रधान आणि मह्त्तत्त्वादिरूप ह्या सम्पूर्ण जगताच्या जे पलिकडचे आहे, सर्वाचे आदिकारण आहे व ज्या सारखे अन्य कोणतेच रूप नाही, आपल्या त्या प्रकृति आदि करणांच्या कारणरूपाला नमस्कार || ३१ ||

 


 शुक्लादिदीर्घादिघनादिहीन मगोचरं यच्च विशेषणानाम् ।
 शुद्धातिशुद्धं परमर्षिदृश्यंरूपाय तस्मै भगवन्नताः स्मः ॥ ३२ ॥

हे भगवंता ! शुक्लादि रूपांनी, दीर्घता आदि परिमाणांनी तसेच घन आदि गुणांनी रहित असलेल्या, समस्त विशेषणांचा अविषय व परमऋषिंना दर्शनीय आणि शुद्धातिशुद्ध असलेल्या आपल्या स्वरूपाला नमस्कार || ३२ ||

 


 यन्नः शरीरेषु यदन्यदेहेष्वशेषवस्तुष्वजमक्षयं यत् ।
 तस्माच्च नान्यद्‌व्यतिरिक्तमस्ति ब्रह्मस्वरूपाय नताः स्म तस्मै ॥ ३३ ॥

जे आमच्या व अन्य प्राण्यांच्या शरीरात तसेच समस्त वस्तूंमध्ये वर्तमान आहे, अजन्मा आणि अविनाशी आहे तसेच ज्या व्यतिरिक्त दुसरे काहीच नाही, त्या ब्रह्मस्वरूपाला आम्ही नमस्कार करतो || ३३ ||

 


 सकलमिदमजस्य यस्य रूपं परमपदात्मवतःसनातनस्य ।
 तमनिधनमशेषबीजभूत प्रभुममलं प्रणताःस्म वासुदेवम् ॥ ३४ ॥

परमपद ब्रह्मच ज्याचा आत्मा आहे अशा ज्या सनातन आणि अजन्मा भगवंताचे हा सकल प्रपंच रूप आहे, त्या सर्वांचे बीजभूत, अविनाशी आणि निर्मल प्रभु वासुदेवाला आम्ही नमस्कार करतो || ३४ ||

 


 श्रीपराशर उवाच
 स्तोत्रस्य चावसाने ते ददृशुः परमेश्वरम् ।
 शङ्‍खचक्रगदापाणिं गरुडस्थं सुरा हरिम् ॥ ३५ ॥

श्रीपराशर म्हणाले ;– हे मैत्रेया ! स्त्रोत्र समाप्त झाल्यावर देवतांनी हातात शंख, चक्र व गदा असलेल्या व गरुडावर आरूढ़ झालेल्या परमात्मा श्रीहरिला आपल्या समोर विराजमान पाहिले || ३५ ||

 


 तमुचुःसकला देवाः प्रणिपातपुरःसरम् ।
 प्रसीद नाथ दैत्येभ्यस्त्राहि नः शरणार्थिनः ॥ ३६ ॥

त्यांना पाहून समस्त देवतांनी प्रणाम केला व नन्तर त्यांना म्हणाले – हे नाथ ! प्रसन्न व्हा आणि आम्हा शरणागतांची दैत्यांपासून रक्षा करा || ३६ ||

 

 

 त्रेलोक्ययज्ञभागाश्च दैत्यैर्ह्रादपुरोगमैः ।
 हृता नो ब्रह्मणोऽप्याज्ञामुल्लङ्‍घ्य परमेश्वर ॥ ३७ ॥

हे परमेश्वरा ! ल्हाद प्रभुति दैत्यगणांनी ब्रह्माच्या आज्ञेचे सुद्धा उल्लंघन करून आमच्या व त्रैलोकाच्या यज्ञभागांचे अपहरण केले आहे || ३७ ||

 

 

 यद्यप्यशेषभूतस्य वयं ते च तावंशजाः ।
 तथाप्यविद्याभेदेन भिन्नं पश्यामहे जगत् ॥ ३८ ॥

जरी आम्हीआणि ते सर्वभूत आपलेच अंशज आहोत तरी अविद्यावश जगताला आम्ही परस्पर भिन्न-भिन्न पाहतो || ३८ ||

 


 स्ववर्णधर्माभिरता वेदमार्गानुसारिणः ।
 न शक्यास्तेऽरयो हन्तुमस्माभिस्तपसावृताः ॥ ३९ ॥

आमचे शत्रुगण आपल्या वर्णधर्माचे पालन करणारे, वेदमार्गावलम्बी आणि तपोनिष्ठ आहेत, म्हणून ते आमच्याकडून मारले नाही जात || ३९ ||

 


 तमुपायमशेषात्मन्नस्माकं दातुमर्हसि ।
 येन तानसुरान्हन्तुं भवेम भगवन्क्षमाः ॥ ४० ॥

म्हणून हे सर्वात्मन ! आम्ही त्या असुरांचा वध करण्यास समर्थ होऊ असा एखादा उपाय आपण आम्हाला सांगावा || ४० ||

 

 

 श्रीपराशर उवाच
 इत्युक्तो भगवांस्तेभ्यो मायामोहं शरीरतः ।
 समुत्पाद्य ददौ विष्णुः प्राह चेदं सुरोत्तमान् ॥ ४१ ॥

श्रीपराशर म्हणाले ;– त्यांनी असे म्हटल्यावर भगवान विष्णुने आपल्या शरीरातून मायामोह उत्पन्न केला आणि तो देवतांना देऊन म्हटले || ४१ ||

 

 
 मायामोहोयमखिलान्दैत्यांस्तान्मोहयिष्यति ।
 ततो वध्या भविष्यन्ति वेदमार्गबहिष्कृताः ॥ ४२ ॥

हा मायामोह त्या सम्पूर्ण दैत्यगणांना मोहित करेल, तेव्हा ते वेदमार्गाचे उल्लंघन करतील आणि तुमच्याकडून मारले जाऊ शकतील || ४२ ||

 

 

 स्थितौ स्थितस्य मे वध्या यावन्तः परिपन्थिनः ।
 ब्रह्मणो ह्यधिकारस्य देवा दैत्यादिकाः सुराः ॥ ४३ ॥

 

हे देवगणांनो ! जो कोणी देवता अथवा दैत्य ब्रह्माच्या कार्यात बाधा आणेल तो सृष्टिच्या रक्षणात तत्पर असलेल्या माझ्यासाठी वध्य होतो || ४३ ||

 


 तद्‍गच्छत न भीः कार्या मायामोहोऽयमग्रतः ।
 गच्छन्नद्योपकाराय भवतां भविता सुराः ॥ ४४ ॥

म्हणून हे देवगणांनो ! आता तुम्ही जा . घाबरू नका . हा मायामोह पुढे तुमच्यावर उपकार करेल || ४४ ||

 

 


 श्रीपराशर उवाच
 इत्युक्ताः प्रणिपत्यैनं ययुर्देवा यथागतम् ।
 मायामोहोऽपि तैः सार्धं ययौ यत्र महासुराः ॥ ४५ ॥

श्रीपराशर म्हणाले ;– भगवंताची अशी आज्ञा झाल्यावर देवगणांनी त्यांना प्रणाम केला आणि जिथून आलेले तिथे परत गेले तसेच त्यांच्या सोबत मायामोह सुद्धा जिथे असुरगण होते तिथे गेला || ४५ ||

 

 

 

"इति श्रीविष्णुपुराणे तृतीये अंशे सप्तदशोऽध्यायः" (१७)


 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, चतुर्थ अंश, त्रयोदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 4 , Adhyay 13

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ चतुर्थ: अंशः ॥ त्रयोदशो ऽध्यायः ॥   "सत्वतच्या सन्ततिचे वर्णन आणि स्यमन्तक मण्याची कथा" श्रीप...