मंगळवार, २१ एप्रिल, २०२६

विष्णुपुराण, तृतीय अंश, सप्तम अध्याय | Vishnu Puran, Ansh 3 , Adhyay 7

 

॥ विष्णुपुराणम् ॥

॥ तृतीयः अंशः सप्तमोऽध्यायः ॥

 


"यमगीता"

मैत्रेय उवाच
यथा वत्कथितं सर्वं यत्पृष्टोऽसि मया गुरो ।
श्रोतुमिच्छाम्यहं त्वेकं तद्‍भवान्प्रब्रवीतु मे ॥ १ ॥

श्रीमैत्रेय म्हणाले ;– हे गुरुदेव ! मी जे काही विचारलं ते सगळं आपण यथावत वर्णन केलंत. आता मी आणखी एक गोष्ट ऐकू इच्छितो, ती आपण मला सांगा || ||

 


सप्तद्वीपानि पातालविधयश्च महामुने ।
स्पतलोकाश्च येऽन्तस्था ब्रह्माण्डस्यास्य सर्वतः ॥ २ ॥
स्थूलैः सूक्ष्मैस्तथा सूक्ष्मसूक्ष्मात्सूक्ष्मतरैस्तथा ।
स्थूलात्स्थूलतरैश्चैव सर्वं प्राणिभिरावृतम् ॥ ३ ॥

हे महामुने ! सातही द्वीप, सात पाताळ आणि सातही लोक – ही सर्व स्थाने जी ह्या ब्रह्मांडा अंतर्गत आहेत, स्थूल, सूक्ष्म, सूक्ष्मतर, सूक्ष्मातिसूक्ष्म तसेच स्थूल आणि स्थूलतर जीवांनी व्यापलेली पाहेत || २ - ३ ||

 

 

अङ्‍गुलस्याष्टभागोपि न सोऽस्ति मुनिसत्तम ।
न सन्ति प्राणिनो यत्र कर्मबन्धनिबन्धनाः ॥ ४ ॥

हे मुनिसत्तमा ! एक अंगुळाचा आठवा भागही असा नाही जिथे कर्म-बंधनात बद्ध असलेले जीव राहात नाहीत || ||

 


 सर्वे चैते वशं यान्ति यमस्य भगवन् किल ।
 आयुष्याऽते तथा यान्ति यातनास्तत्प्रचोदिताः ॥ ५ ॥

किन्तु हे भगवन ! आयुष्य समाप्त झाल्यावर हे सगळे यमराजाला वशीभूत होतात व त्याच्या आदेशानुसार नरक आदि नाना प्रकारच्या यातना भोगतात || ||

 


 यातनाभ्यः परिभ्रष्टा देवाद्यास्वथ योनिषु ।
 जन्तवः परिवर्तन्ते शास्त्राणामेष निर्णयः ॥ ६ ॥

मग पाप-भोग समाप्त झाल्यावर ते देवादि योनिंमध्ये फिरत राहतात असेच सकल शास्त्रांचे मत आहे || ||

 

 

 सोहमिच्छामि तच्छ्रोतुं यमस्य वशवर्तिनः ।
 न भवन्ति नरा येन तत्कर्म कथयस्व मे ॥ ७ ॥

म्हणून तुम्ही मला असे कर्म सांगा जे केल्याने माणूस यमराजाला वशीभूत होत नाही ; मी आपल्याकडून हेच ऐकू इच्छितो || ||



 श्रीपराशर उवाच
 अयमेव मुने प्रश्नो नकुलेन महात्मना ।
 पृष्टः पितामहः प्राह भीष्मो यत्तच्छृणुष्व मे ॥ ८ ॥

श्रीपराशर म्हणाले ;– हे मुने ! हाच प्रश्न महात्मा नकुलने पितामह भीष्माला विचारला होता . त्यावेळी त्यांनी जे उत्तर दिलं तेच तुला सांगतो ऐक || ||




 भीष्म उवाच
 पुरा ममागतो वत्स सखा कालिङ्‍गको द्विजः ।
 स मामुवाच प्रष्टो वै मया जातिस्मरो मुनिः ॥ ९ ॥
 तेनाख्यातमिदं सर्वमित्थं चैतद्‍भविष्यति ।
 तथा च तदभूद्वत्स यथोक्तं तेन धीमता ॥ १० ॥

भीष्म म्हणाले ;– हे वत्सा ! पुर्वकाळी माझ्याकडे एक कलिंगदेशीय ब्राह्मण मित्र आला आणि मला म्हणाला – ‘मी विचारल्यावर एका जातिस्मर मुनिने सांगितले होते कि ह्या सर्व गोष्टी अमुक – अमुक प्रकारेच होतील.’ हे वत्सा ! त्या बुद्धिमानाने ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या प्रकारे होतील असे सांगितलेले त्या सर्व तशाच्या तशाच झाल्या || ९ – १० ||

 

 


 स पृष्टश्च मया भूयः श्रद्दधानेन वै द्विजः ।
 यद्यदाह न तद्दृष्टमन्यथा हि मया क्वचित् ॥ ११ ॥

अशाप्रकारे त्याच्याविषयी श्रद्धा निर्माण झाल्याने मी त्याला आणखी काही प्रश्न विचारले आणि त्यांचे उत्तर देताना त्या द्विजश्रेष्ठाने जे जे सांगितले त्या व्यतिरिक्त मी काहीही पाहिले नाही || ११ ||

 


 एकदा तु मया पृष्टमेतद्यद्‍भवतोदितम् ।
 प्राह कालिङ्‍गको विप्रःस्मृत्वा तस्य मुनेर्वचः ॥ १२ ॥
 जातिस्मरेण कथितो रहस्यः परमो मम ।
 यमकिङ्‍करयोर्योऽभूत्संवादस्तं ब्रवीमि ते ॥ १३ ॥

एके दिवशी, जे तु मला विचारत आहेस तोच प्रश्न मी त्या कालिङ्‍ग ब्राह्मणाला विचारला . तेव्हा तो ब्राह्मण त्या मुनीने सांगितलेले आठवून म्हणाला कि त्या जातिस्मर ब्राह्मणाने, यम आणि त्याच्या दूतांमध्ये जो संवाद झाला होता, ते अति गूढ़ रहस्य मला सांगितले होते . तेच मी तुला सांगतो || १२ – १३ ||




 कालिङ्‍ग उवाच
 स्वपुरुषमभिवीक्ष्य पाशहस्तं वदति यमः किल तस्य कर्णमूले ।
 परिहर मधुसूदनप्रपन्नान्- प्रभुरहमन्यनृणामवैष्णवानाम् ॥ १४ ॥

कालिंग म्हणाला ;– आपल्या दुताने हातात पाश घेतलेला पाहून यमराजाने त्याच्या कानात सांगितले – ‘भगवान मधुसुदनाला शरणागत असलेल्या व्यक्तिंना सोडून दे , कारण मी वैष्णवांच्या व्यतिरिक्त इतर सर्वांचा स्वामी आहे || १४ ||

 


 अहममरवरार्चितेन धात्रा यम इति लोकहिताहिते नियुक्तः ।
 हरिगुरुवशगोस्मि न स्वतन्त्रः प्रभवति संयमने ममापि विष्णुः ॥ १५ ॥

देव-पूज्य विधात्याने मला ‘यम’ नावाने लोकांच्या पाप-पुण्याचा विचार करण्यासाठी नियुक्त केले आहे. मी माझे गुरू श्रीहरि ह्यांच्या वशीभूत आहे, मी स्वतंत्र नाही. भगवान विष्णु माझेही नियन्त्रण करण्यास समर्थ आहे || १५ ||

 

 

 कटकमुकुटकर्णिकादिभेदैः कनकमभेदमपीष्यते यथैकम् ।
 सुरपशुमनुजादिकल्पनाभिर्हरिरखिलाभिरुदीर्यते तथैकः ॥ १६ ॥

ज्याप्रकारे सुवर्ण भेदरहित आणि एकच असूनही कटक, मुकुट तसेच कर्णिका आदिच्या भेदांमुळे नानारूपाने प्रतीत होते त्याच प्रकारे एकाच हरिचे देवता, मनुष्य आणि पशु आदि नाना-विध कल्पनांनी निर्देश केला जातो || १६ ||




 क्षितितलपरमाणवोऽनिलान्ते
 पुनरुपयान्ति यथैकतां धरित्र्याः ।
 सुरपशुमनुजादयस्तथान्ते
 गुणकलुषेण सनातनेन तेन ॥ १७ ॥

ज्याप्रकारे वायु शांत झाल्यावर त्यात उडणारे परमाणु पृथ्वीत मिळून एक होतात त्याचप्रकारे गुण-क्षोभाने उत्पन्न झालेले समस्त देवता, मनुष्य व पशु आदि त्या सनातन परमात्मात लीन होतात || १७ ||

 


 हरिममरवरार्चिताङ्‍घ्रिपद्मं-
 प्रणमति यः परमार्थतो हि मर्त्यः ।
 तमपगतसमस्तपापबन्धं
 व्रज परिहृत्य यथाग्निमाज्यसिक्तम् ॥ १८ ॥

जो भगवंताच्या सुरवर वन्दित चरण-कमलांची परमार्थ-बुद्धिने वन्दना करतो, घृताहुतिने प्रज्वलित अग्नि समान समस्त पापबंधनातून मुक्त झालेल्या त्या पुरुषाला तू दुरच सोडून निघून जा || १८ ||

 


इति यमवचनं निशम्य पाशी
यम पुरुषस्तमुवाच धर्मराजम् ।
कथय मम विभो समस्तधातु-
र्भवति हरेः खलु यादृशोऽस्य भक्तः ॥ १९ ॥

यमराजाचे हे वचन ऐकून पाशहस्त यमदूताने त्याला विचारले – ‘प्रभो ! सर्वांचा विधाता असलेल्या हरिचा भक्त कसा असतो ते आपण मला सांगा || १९ ||




 यम उवाच
 न चलति निजवर्णधर्मतो यः
 सममतिरात्मसुहृद्विपक्षपक्षे ।
 न हरति न च हन्ति किञ्चिदुच्चैः
 स्थितमनसं तमवेहि विष्णुभक्तम् ॥ २० ॥

यमराज म्हणाला ;– जो पुरुष आपल्या वर्ण-धर्मापासून विचलित होत नाही, आपले सुह्रद आणि विपक्षी दोघांप्रति समान भाव ठेवतो, कोणाचेही द्रव्य हरण करत नाही तसेच कोणत्याही जीवाची हिंसा करता नाही त्या अत्यंत रागादि-शून्य आणि निर्मलचित्त व्यक्तिला भगवान विष्णुचा भक्त समज || २० ||

 


कलिकलुषमलेन यस्य नात्मा
विमलमतेर्मलिनीकृतस्तमेनम् ।
मनसि कृतजनार्दनं मनष्यं
सततमवेहि हरेरतीवभक्तम् ॥ २१ ॥

ज्या निर्मलमतिचे चित्त कलि-कल्मषरूपी मलाने मलिन झालेले नाही आणि ज्याने आपल्या ह्रदयात श्रीजनार्दनाला बसवलेले आहे त्या माणसाला भगवंताचा अतीव भक्त समज || २१ ||




 कनकमपि रहस्यवेक्ष्य बुद्ध्या
 तृणमिव यःसमवैति वै परस्वम् ।
 भवति च भगवत्यनन्यचेताः
 पुरुषवरं तमवेहि विष्णुभक्तम् ॥ २२ ॥

जो एकांतात पडलेले दुसर्‍याचे सोने पाहूनही त्याला आपल्या बुद्धिद्वारा तृणासमान मानतो आणि निरंतर भगवंताचे अनन्यभावाने चिन्तन करतो त्या नरश्रेष्ठाला विष्णुचा भक्त समज || २२ ||

 


स्फटिकगिरिशिलामलः क्व विष्णु-
र्मनसि नृणां क्व च मत्सरादिदोषः ।
न हि तुहिनमयूखरश्मिपुञ्जे
भवति हुताशनदीप्तिजः प्रतापः ॥ २३ ॥

कुठे स्फटिकागिरी शिलासमान अति निर्मल भगवान विष्णु आणि कुठे मानवांच्या चित्तात राहणारे राग-द्वेषादि दोष ? हिमकराच्या (चन्द्र) किरणांमध्ये अग्नि तेजाची उष्णता कधीच राहू शकत नाही || २३ ||

 


 विमलमतिरमत्सरः प्रशान्त-
 श्शुचिचरितोखिलसत्त्वमित्रभूतः ।
 प्रियहितवचनोऽस्तमानमायो
वसति सदा हृदि तस्य वासुदेवः ॥ २४ ॥

जो व्यक्ति निर्मल-चित्त, मात्सर्यरहित, प्रशांत, शुद्ध-चरित्र, समस्त जीवांचा सुह्रद, प्रिय आणि हितवादी तसेच अभिमान आणि माया रहित असतो त्याच्या ह्रदयात भगवान वासुदेव सर्वदा विराजमान असतात || २४ ||

 


 वसति हृदिसनातने च तस्मिन्
 भवति पुमाञ्जगतोस्य सौम्यरूपः ।
 क्षितिरसमतिरम्यमात्मनोऽन्तः
 कथयति चारुतयैव शालपोतः ॥ २५ ॥

तो सनातन भगवंत ह्रदयात विराजमान झाल्यावर पुरुष ह्या जगतात सौम्यमूर्ति होतो, ज्याप्रकारे नवीन शाल वृक्ष आपल्या सौन्दर्यानेच आपल्या आत भरलेल्या अति सुंदर पार्थिव रसाची जाणीव करून देतो || २५ ||




यमनियमविधूत कल्पषाणा-
मनुदिनमच्युतसक्तमानसानाम् ।
अपगतमदमानमत्सराणां
त्यज भट दूरतरेण मानवानाम् ॥ २६ ॥

हे दूता ! यम आणि नियम द्वारा ज्यांची पापराशि दूर झाली आहे, ज्यांचे ह्रदय निरंतर श्रीअच्युतातच आसक्त असते, तथा ज्यांच्यात गर्व, अभिमान आणि मात्सर्याचा लेशही राहात नाही त्यांचा तू दुरूनच त्याग कर || २६ ||




 हृदि यदि भगवाननादिरास्ते
हरिरसिशङ्‍खगदाधरोव्ययात्मा ।
 तदघमघविघातकर्तृभिन्नं
 भवति कथं सति चान्धकारमर्के ॥ २७ ॥

जर खड्ग, शंख आणि गदाधारी अव्ययात्मा भगवान हरि ह्रदयात विराजमान असेल तर त्या पापनाशक भगवंताद्वारा त्याचे सर्व पाप नष्ट होऊन जाते . सूर्यासमोर अंधकार राहूच कसा शकेल ? || २७ ||

 


 हरति परधनं निहन्ति जन्तून्
 वदति तथाऽनृतनिष्ठुराणि यश्च ।
 अशुभजनितदुरमदस्य पुंसः
 कलुषमतेर्हृदि तस्य नास्त्यनन्तः ॥ २८ ॥

जो पुरुष दुसर्‍यांचे धन हरण करतो, जीवांची हिंसा करतो तसेच मिथ्या व कटुभाषण करतो त्या अशुभ कर्मोंन्मत्त दुष्टबुद्धिच्या ह्रदयात भगवान अनंत टिकू शकत नाही || २८ ||

 


 न सहति परसम्पदं विनिन्दां
कलुषमतिः कुरुते सतामसाधुः ।
 न यजति न ददाति यश्च सन्तं
मनसि न तस्य जनार्दनोऽधमस्य ॥ २९ ॥

जो कुमति दुसर्‍याचे वैभव पाहू शकत नाही, जो दुसर्‍यांची निंदा करतो, साधुजनांशी चुकीचा वागतो तसेच श्रीविष्णुची पूजाही करत नाही आणि दानधर्मही करत नाही त्या अधमाच्या ह्रदयात श्रीजनार्दनाचा निवास कधीच होऊ शकत नाही || २९ ||




 परमसुहृदिबान्धवे कलत्रे
 सुततनयापितृमातृभृत्यवर्गे ।
 शठमतिरुपयाति योऽर्थतृष्णां
 तमधमचेष्टमवेहि नास्य भक्तम् ॥ ३० ॥

जो दुष्टबुद्धि आपल्या परम सुह्रद, बंधू-बान्धव, स्त्री, पुत्र, कन्या, पिता तथा भृत्यवर्गा प्रति अर्थतृष्णा प्रकट करतो त्या पापाचारीला भगवंताचा भक्त समजू नकोस || ३० ||

 


 अशुभमतिरसत्प्रवृत्ति सक्त-
 स्सततमनार्यकुशीलसङ्‍गमत्तः ।
 अनुदिनकृतपापबन्धयुक्तः
 परुषपशुर्न हि वासुदेवभक्तः ॥ ३१ ॥

जो दुर्बुद्धि पुरुष असत्कर्म करत असतो, नीच पुरुषांचे आचरण व त्यांच्याच संगतीत उन्मत्त राहतो तसेच नित्य पापमय कर्मबंधनातच बांधला जातो तो मनुष्यरूपी पशुच असतो; तो वासुदेवाचा भक्त नाही होऊ शकत || ३१ ||




 सकलमिदमहं च वासुदेवः
परमपुमान्परमेश्वरः स एकः ।
 इति मतिरचलाभवत्यनन्ते
हृदयगते व्रजतान्विहाय दूरात् ॥ ३२ ॥

हा सकल प्रपंच आणि मी एक परमपुरुष परमेश्वर वासुदेवच आहे, ह्रदयात भगवान अनंत स्थित झाल्याने ज्याची बुद्धि स्थिर झाली आहे त्यांचा तू दुरूनच त्याग कर  || ३२ ||

 


कमलनयन वासुदेव विष्णो
धरणिधराच्युत शङ्‍खचक्रपाणे ।
भवशरणमितिरयन्ति ये वै
त्यज भट दूरतरेण तानपापान् ॥ ३३ ॥

हे कमलनयना ! हे वासदेवा ! हे विष्णो ! हे धरणिधरा ! हे अच्युता ! हे शंखचक्रपाणे ! आपण आम्हाला शरण द्या – जे लोग असे म्हणतात त्या निष्पाप व्यक्तिंचा तू दुरूनच त्याग कर || ३३ ||




 वसति मनसि यस्य सोव्ययात्मा
 पुरुषवरस्य न तस्य दृष्टिपाते ।
 तव गतिरथ वा ममास्ति चक्र-
 प्रतिहतवीर्यबलस्य सोऽन्यलोक्यः ॥ ३४ ॥

ज्या पुरुषश्रेष्ठाच्या अंत:करणात तो अव्ययात्मा भगवान विराज करतो त्याची जिथपर्यंत दृष्टि जाते तिथपर्यंत भगवंताच्या चक्राच्या प्रभावाने आपले बल-वीर्य नष्ट होत असल्याने तिथे तुझी अथवा माझी गति होऊ शकत नाही . तो (महापुरुष) तर अन्य (वैकुंठादि) लोकांत जाण्यास पात्र असतो || ३४ ||




 कालिङ्‍ग उवाच
 इति निजभटशासनाय देवो
 रवितनयस्य किलाह धर्मराजः ।
 मम कथितमिदं च तेन तुभ्यं
 कुरुवर सम्यगिदं मयापि चोक्तम् ॥ ३५ ॥

कालिंग म्हणाला ;– हे कुरुवरा ! आपल्या दूताला समजावण्यासाठी सुर्यपुत्र धर्मराजाने त्याला हे सांगितले . मला हा प्रसंग त्या जातिस्मर मुनिने सांगितला आणि मी ही सम्पूर्ण कथा तुला ऐकवली || ३५ ||




श्रीभीष्म उवाच
नकुलैतन्ममाख्यातं पूर्वं तेन द्विजन्मना ।
कलिङ्‍गदेशादभ्येत्य प्रीतेन सुमहात्मना ॥ ३६ ॥

भीष्म म्हणाले ;– हे नकुला ! पूर्वकाळी कलिंगदेशात आलेल्या महात्मा ब्राह्मणाने प्रसन्न होऊन मला हे सर्व सांगितले होते || ३६ ||

 


मयाप्येतद्यथान्यायं सम्यग्वत्स तवोदितम् ।
यथा विष्णुमृते नान्यत्त्राणां संसारसागरे ॥ ३७ ॥

हे वत्सा ! तोच सम्पूर्ण वृतांत, कि कशा प्रकारे ह्या संसार-सागरात एका विष्णुला सोडून जीवाचा दुसरा कोणीही रक्षक नाही, मी जशाचा तसा तुला ऐकवला || ३७ ||

 

 
किङ्‍कराः पाशदण्डाश्च न यमो न च यातनाः ।
समर्थास्तस्य यस्यात्मा केशवालम्बनःसदा ॥ ३८ ॥

ज्याचे ह्रदय निरंतर भगवत्परायण असते त्याचे यम, यमदूत, यमपाश, यमदंड अथवा यम-यातना कुणीही काहीही बिडवू शकत नाहीत || ३८ ||

श्रीपराशर उवाच
एतन्मुने समाख्यातं गीतं वैवस्वतेन यत् ।
त्वत्प्रश्नानुगतं सम्यक्‌किमन्यच्छ्रोतुमिच्छसि ॥ ३९ ॥
हे मूने ! वैवस्वताने सांगितलेले हे आख्यान तुझ्या विचारण्यावरून मी तुला समजावून सांगितले . आणखी तुला काय ऐकायचे आहे ? ॥ ३९ ॥




             "इति श्रीविष्णुपुराणे तृतीये अंशे सप्तमोऽध्यायः"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, तृतीय अंश, त्रयोदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 3 , Adhyay 13

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ तृतीयः अंशः ॥ त्रयोदशोऽध्यायः ॥   आभ्युदयिक श्राद्ध , प्रेतकर्म तथा श्राद्धादि विचार और्व उवाच सचैलस्य पितुः ...