गुरुवार, २६ मार्च, २०२६

विष्णुपुराण, द्वितीय अंश, चतुर्दश अध्याय | Vishnu Puran, Ansh 2 , Adhyay 14

 



॥ विष्णुपुराणम् ॥

द्वितीयः अंशः॥ चतुर्दशोऽध्यायः ॥

 

 जडभरत आणि सौवीर नरेशाचा संवाद

 

श्रीपराशर उवाच
 निशम्य तस्येति वचः परमार्थसमन्वितम् ।
 प्रश्रयावनतो भूत्वा तमाह नृपतिर्द्विजम् ॥ १ ॥

श्रीपराशर म्हणाले - त्याचे हे परमार्थमय वचन ऐकून राजाने विनम्र होऊन त्या विप्रवराला म्हटले ॥१॥


 राजोवाच
 भगवन्यत्त्वया प्रोक्तं परमार्थमयं वचः ।
 श्रुते तस्मिन्भ्रमन्तीव मनसो मम वृत्तयः ॥ २ ॥

राजा म्हणाला - भगवन ! आपण जे परमार्थमय वचन सांगीतले ते ऐकून माझी मनोवृत्ति भ्रान्त झाली आहे ॥२॥


 एतद्विवेकविज्ञानं यदशेषेषु जन्तुषु ।
 भवता दर्शितं विप्र तत्परं प्रकृतेर्महत् ॥ ३ ॥

हे विप्रा ! आपण सम्पूर्ण जीवांमध्ये व्याप्त असलेल्या ज्या असंग विज्ञानाचे दिग्दर्शन करवले ते निःसन्देह प्रकृतिच्या पलिकडे असलेले ब्रह्मच आहे ॥३॥

 

 


नाहं वहामि शिबिकां शिबिका न मयि स्थिता ।
शरीरमन्यदस्मत्तौ योनेयं शिबिका धृता ॥ ४ ॥

गुणप्रवृत्त्या भूतानां प्रवृत्तिः कर्मचोदिता ।
 प्वर्तन्ते गुणा ह्येते किं ममेति त्वयोदितम् ॥ ५ ॥

परंतु आपण जे म्हटले कि मी शिबिकेचे वहन करत नाही, शिबिका माझ्यावर नाही, ज्याने हि शिबिका उचलली आहे ते शरीर माझ्याहून पुर्णपणे भिन्न आहे . जीवांची प्रवृत्ति गुणांच्या (सत्व, रज, तम) प्रेरणेने होते आणि गुण कर्मांनी प्रेरित होऊन प्रवृत्त होतात - ह्यात माझे कर्तुत्त्व मानावे ? ॥४-५॥



एतस्मिन्परमार्थज्ञ मम श्रोत्रपथं गते ।
मनो विह्वलतामेति परमार्थार्थितां गतम् ॥ ६ ॥

हे परमार्थज्ञा ! ही गोष्ट ऐकताच माझे मन परमार्थाविषयी जिज्ञासु होऊन अतिशय उतावळे होत आहे ॥६॥


पूर्वमेव महाभागं कपिलर्षिमहं द्विज ।
प्रष्टुमभ्युद्यतो गत्वा श्रेयः किं त्वत्र शंस मे ॥ ७ ॥

हे द्विजा ! मी आधीच महाभाग कपिलमुनिंना हे विचारण्यासाठी कि 'संसाराच मनुष्यांचे श्रेय कशात आहे' त्यांच्याजवळ जाण्यास तत्पर झालो आहे ॥७॥


 तदन्तरे च भवता यदेतद्वाक्यमीरितम् ।
 तेनैव परमार्थार्थं त्वयि चेतः प्रधावति ॥ ८ ॥

पण मध्येच आपण जी वाक्ये बोललात ती ऐकून माझे चित्त परमार्थ-श्रवण करण्यासाठी आपल्याकडे झुकले आहे ॥८॥


 कपिलर्षिर्भगवतः सर्वभूतस्य वै द्विज ।
 विष्णोरंशो जगन्मोहनाशायोर्वीमुपागतः ॥ ९ ॥

हे द्विजा ! हे कपिलमुनि सर्वभुत भगवान श्रीविष्णुचेच अंश आहेत . त्यांनी संसाराचा मोह दूर करण्यासाठीच पृथ्वीवर अवतार घेतला आहे ॥९॥


 स एव भगवान्नूनमस्माकं हितकाम्यया ।
 प्रत्यक्षतामत्र गतो यथैतद्‍भवतोच्यते ॥ १० ॥

पण आपण जे अशा प्रकारे भाषण करत आहात त्यामुळे माझा निश्चय होत आहे कि तेच भगवान् कपिलदेव माझ्या हिताच्या इच्छेने इथे आपल्या रूपात प्रकट झाले आहेत ॥१०॥

 

 

 तन्मह्यं प्रणताय त्वं यच्छ्रेयः परमं द्विजः ।
 तद्वदाखिल विज्ञानजलवीच्युदधिर्भवान् ॥ ११ ॥

म्हणून हे द्विजा ! माझ्यासाठी जे परम श्रेय आहे ते मला विनम्राला सांगावे . हे प्रभो ! आपण सम्पूर्ण विज्ञान तरंगांचे जणू समुद्रच आहात ॥११॥


 ब्राह्मण उवाच
 भूप पृच्छसि किं श्रेयः परमार्थं नु पृच्छसि ।
 श्रेयांस्यपरमार्थानि अशेषाणि च भूपते ॥ १२ ॥

ब्राह्मण म्हणाला - हे राजन ! तु श्रेय जाणू इच्छितोस कि परमार्थ ? कारण हे भूपते ! श्रेय तर सर्व अपारमार्थिकच आहे ॥१२॥

 


देवताराधनं कृत्वा धनसम्पदमिच्छति ।
पुत्रानिच्छति राज्यं च श्रेयस्तस्यैव तन्नृप ॥ १३ ॥

हे नृपा ! जो पुरुष देवतांची आराधना करून धन, सम्पत्ति, पुत्र आणि राज्यादिकी इच्छा करतो त्याच्यासाठी तेच परम श्रेय आहे ॥१३॥


 कर्म यज्ञात्मकं श्रेयः फलं स्वर्गाप्तिलक्ष्णम् ।
 श्रेयः प्रधानं च फले तदेवानभिसंहिते ॥ १४ ॥

ज्याचे फळ स्वर्गलोकाची प्राप्ति आहे ते यज्ञात्मक कर्म सुद्धा श्रेयच आहे पण प्रधान श्रेय तर त्याच्या फळाची इच्छा न करण्यातच आहे ॥१४॥


 आत्मा ध्येयः सदा भूप योगयुक्तैस्तथा परम् ।
 श्रेयस्तस्यैव संयोगः श्रेयो यः परमात्मनः ॥ १५ ॥

म्हणून हे राजन्, योगयुक्त पुरुषांनी प्रकृति आदिच्या पलिकडे असलेल्या त्या आत्म्याचेच ध्यान केले पाहिजे, कारण त्या परमात्म्याचे संयोगरूप श्रेयच वास्तविक श्रेय आहे ॥१५॥

 

 श्रेयांस्येवमनेकानि शतशोय सहस्रशः ।
 सन्त्यत्र परमार्थस्तु न त्वेते श्रूयतां च मे ॥ १६ ॥

अशा प्रकारे शेकड़ो - हजारों प्रकारचे अनेक श्रेय आहेत पण हे सर्व परमार्थ नाहीत . आता जे परमार्थ आहे ते ऐक ॥१६॥

 

 

धर्माय त्यज्यते किन्तु परमार्थो धनं यदि ।
व्ययश्च क्रियते कस्मात्कामप्राप्त्युपलक्षणः ॥ १७ ॥

जर धनच परमार्थ आहे तर मग धर्मासाठी त्याचा त्याग का केला जातो ? तसेच इच्छित भोगप्राप्तिसाठी त्याचा व्यय का केला जातो ? (म्हणजेच तो परमार्थ नाही) ॥१७॥

 

 पुत्रश्चेत्परमार्थः स्यात्सोऽप्यन्यस्य नरेश्वर ।
 परमार्थभूतः सोऽन्यस्य परमार्थो हि तत्पिता ॥ १८ ॥

हे नरेश्वरा ! जर पुत्राला परमार्थ म्हणावे तर तो तर अन्याचा (आपल्या पित्याचा) परमार्थभूत आहे, तसेच त्याचा पिता सुद्धा दुसर्‍याचा पुत्र असल्याने (आपल्या पित्याचा) परमार्थ असणार ॥१८॥


 एवं न परमार्थोऽस्ति जगत्यस्मिञ्चराचरे ।
 परमार्थो हि कार्याणि कारणानामशेषतः ॥ १९ ॥

म्हणून ह्या चराचर जगतात पित्याचा कार्यरूप पुत्र सुद्धा परमार्थ नाही . कारण मग सर्व कारणांचे कार्य परमार्थ होईल ॥१९॥


 राज्यादिप्राप्तिरत्रोक्ता परमार्थतया यदि ।
 परमार्था भवन्त्यत्र न भवन्ति च वै ततः ॥ २० ॥

जर संसारात राज्यादिच्या प्राप्तिला परमार्थ म्हटले तर ते कधी असतात कधी नसतात. म्हणजे परमार्थ सुद्धा आगमापायी होईल.(म्हणून राज्यादि सुद्धा परमार्थ नाही होऊ शकत) ॥२०॥



 ऋग्यजुःसामनिष्पाद्यं यज्ञकर्म मतं तव ।
 परमार्थभूतं तत्रापि श्रुयतां गदतो मम ॥ २१ ॥

जर ऋक् , यजुः आणि सामरूप वेदत्रयी पासुन सम्पन्न होणार्‍या यज्ञकर्मांना परमार्थ मानतोस तर त्याविषयी माझे असे विचार आहेत - ॥२१॥

 

 

 यत्तु निष्पाद्यते कार्यं मृदा कारणभूतया ।
 तत्कारणानुगमनाज्ज्ञायते नृप मृण्मयम् ॥ २२ ॥

हे नृपा ! जी वस्तु कारणरूपा मृत्तिकेचे कार्य असते ती कारणाची अनुगामिनी असल्याने मृत्तिकारूपच मानली जाते॥२२॥

 


 एवं विनाशिभिर्द्रव्यैः समिदाज्यकुशादिभिः ।
 निष्पाद्यते क्रिया या तु सा भवित्री विनाशिनी ॥ २३ ॥

म्हणून जी क्रिया समिध, घृत आणि कुशा आदि नाशवान द्रव्यांनी सम्पन्न होते ती सुद्धा नाशवानच असणार ॥२३॥



 अनाशो परमार्थश्च प्राज्ञौरभ्युपगम्यते ।
 तत्तु नाशि न सन्देहो नाशिद्रव्योपपादितम् ॥ २४ ॥

पण प्राज्ञ पुरुष तर परमार्थ अविनाशी आहे म्हणतात आणि नाशवान् द्रव्यांनी निष्पन्न झाल्याने कर्म (अथवा त्यापासून निष्पन्न होणारे स्वर्गादि) नाशवानच आहेत ह्यात शंकाच नाही ॥२४॥

 

 

 तदेवाफलदं कर्म परमार्थो मतस्तव ।
 मुक्तिसाधनभूतत्वात्परमार्थो न साधनम् ॥ २५ ॥

जर फलशा रहित निष्कामकर्माला परमार्थ मानले तर ते मुक्तिरूप फळाचे साधन असल्याने साधनच आहे, परमार्थ नाही ॥२५॥

 


 ध्यानं चैवात्मनो भूपु परमार्थार्थशब्दितम् ।
 भेदकारि परेभ्यस्तु परमार्थो न भेदवान् ॥ २६ ॥

जर देहादि च्या इधारे आत्म्याचा पार्थक्य विचार करून त्याचे ध्यान करण्याला परमार्थ म्हणावे तर तो अनात्म्याने आत्म्याचा भेद करणारा आहे आणि परमार्थात तर भेदच नाही (म्हणून तो सुद्धा परमार्थ असू शकत नाही) ॥२६॥

 


 परमात्मात्मनोर्योगः परमार्थ इतीष्यते ।
 मिथ्यैतदन्यद्‌द्रव्यं हि नैति तद्द्रव्यतां यतः ॥ २७ ॥

जर परमात्मा आणि जीवात्म्याच्या संयोगाला परमार्थ म्हणावे तर ते सर्वथा मिथ्या आहे, कारण अन्य द्रव्याने अन्य द्रव्याची एकता कधी होऊ शकत नाही ॥२७॥

 

 

 तस्माच्छ्रेयांस्यशेषाणि नृपैतानि न संशयः ।
 परमार्थस्तु भूपाल संक्षेपाच्छ्रूयतां मम ॥ २८ ॥

म्हणून हे राजन निःसन्देह हे सर्व श्रेयच आहे, परमार्थ नाही. आता जो परमार्थ आहे तो संक्षेपात सांगतो, ते श्रवण कर ॥२८॥

 


 एको व्यापी समः शुद्धो निर्गुणः प्रकृतेः परः ।
 जन्मवृद्ध्यादिरहित आत्मा सर्वगतोव्ययः ॥ २९ ॥

आत्मा एक, व्यापक, सम, शुद्ध, निर्गुण आणि प्रकृतिच्या पलिकडे आहे; तो जन्म-वृद्धि आदि रहित, सर्वव्यापी आणि अव्यय आहे ॥२९॥

 


 परज्ञानमयो सद्‍भिर्नामजात्यादिभिर्विभुः ।
 न योगवान्न युक्तोऽभून्नैव पार्थिव योक्ष्यते ॥ ३० ॥

हे राजन ! तो परम ज्ञानमय आहे, असत नाम आणि जाति आदिशी त्या सर्वव्यापकाचा संयोग कधी झाला नाही आणि कधी होणारही नाही ॥३०॥

 


 तस्यात्मपरदेहेषु सतोऽप्येकमयं हि यत् ।
 विज्ञानं परमार्थोऽसौ द्वैतिनोऽतथ्यदर्शिनः ॥ ३१ ॥

'तो, आपल्या आणि अन्य प्राण्यांच्या शरीरात विद्यमान असूनही, एकच आहे' - अशा प्रकारे जे विशेष ज्ञान आहे तेच परमार्थ आले; द्वैत भावना असलेला पुरुष अपरमार्थदर्शी आहे ॥३१॥

 


 वेणुरन्ध्रप्रभेदेन भेदः षड्जादिसंज्ञितः ।
 अभेदव्यापिनो वायोस्तथास्य परमात्मनः ॥ ३२ ॥

ज्या प्रकारे अभिन्न भावाने व्याप्त एकाच  वायुच्या बासरीच्या छिद्रातील भेदांमधून षड्‌ज आदि भेद होतात त्याच प्रकारे ( शरीरादि उपाधिंमुळे) एकाच  परमात्म्याचे (देवता मनुष्य आदि) अनेक भेद प्रतीत होतात ॥३२॥

 


 एकस्वरूपभेदश्च ब्राह्मकर्मावृत्तिजः ।
 देवादिभेदेऽपध्वस्ते नास्त्येवावरणे हि सः ॥ ३३ ॥

एकरूप आत्म्याचे जे नाना भेद आहेत ते बाह्य देहादिंच्या कर्मप्रवृत्ति मुळेच झाले आहेत. देवादि शरीरांच्या भेदाचे निराकारण झाल्यावर हा भेद राहात नाही. त्याची स्थिति अविद्याच्या आवरणा पर्यंतच असते ॥३३॥

 

 

इति श्रीविष्णुमहापुराणे द्वितीये अंशे चतुर्दशोऽध्यायः (१४)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, तृतीय अंश, त्रयोदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 3 , Adhyay 13

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ तृतीयः अंशः ॥ त्रयोदशोऽध्यायः ॥   आभ्युदयिक श्राद्ध , प्रेतकर्म तथा श्राद्धादि विचार और्व उवाच सचैलस्य पितुः ...