मंगळवार, २४ मार्च, २०२६

विष्णुपुराण, द्वितीय अंश, त्रयोदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 2 , Adhyay 13

 

 

॥ विष्णुपुराणम् ॥

द्वितीयः अंशः॥ त्रयोदशोऽध्यायः ॥

 

 भरत चरित्र

 

मैत्रेय उवाच
भगवन्सम्यगाख्यातं यत्पृष्टोसि मया किल ।
भूसमुद्रादिसरितां संस्थानं ग्रहसंस्थितिः ॥ १ ॥

श्रीमैत्रय म्हणाले -

हे भगवन ! मी पृथ्वी, समुद्र, नद्या आणि ग्रहगणांची स्थिति आदि विषयी जे काही विचारले ते सर्व तुम्ही वर्णन केले ॥१॥


विष्ण्वाधारं यथा चैतत्त्रैलोक्यं समवस्थितम् ।
परमार्थस्तु ते प्रोक्तो यथाज्ञानं प्रधानतः ॥ २ ॥

त्याच बरोबर तुम्ही हे सुद्धा सांगितले की कशा प्रकारे हे समस्त त्रैलोक्य भगवान श्रीविष्णुच्याच आश्रित आहे आणि कसे परमार्थस्वरूप ज्ञानच सर्वात प्रधान आहे ॥२॥


 यत्त्वेतद्‍भगवानाह भरतस्य महीपतेः ।
 श्रोतुमिच्छमि चरितं तन्ममाख्यातुमर्हसि ॥ ३ ॥

किन्तु भगवान ! तुम्ही आधी ज्याची चर्चा केली होती त्या राजा भरताचे चरित्र मी ऐकू इच्छितो, कृपा करून ते आपण मला सांगावे ॥३॥


 भरतः स महीपालः शालग्रामेऽवसत्किल ।
 योगयुक्तः समाधाय वासुदेवे सदा मनः ॥ ४ ॥

असं म्हणतात, कि तो राजा भरत निरन्तर योगयुक्त होऊन भगवान वासुदेवात चित्त एकाग्र करून शालीग्राम क्षेत्रात रहात होता ॥४॥


 पुण्येदेशप्रभावेण ध्यायतश्च सदा हरिम् ।
 कथं तु नाभवन्मुक्तिर्यदभूत्स द्विजः पुनः ॥ ५ ॥

अशा प्रकारे पुण्यदेशाचा प्रभाव आणि हरिचिन्तनाने देखिल तो मुक्त का नाही झाला, कशामुळे त्याला परत ब्राह्मण जन्म घ्यावा लागला? ॥५॥


 विप्रत्वे च कृतं तेन यद्‍भूयः सुमहात्मना ।
 भरतेन मुनिश्रेष्ठ तत्सर्वं वक्तुमर्हसि ॥ ६ ॥

हे मुनिश्रेष्ठा ! ब्राह्मण होऊनही त्या महात्मा भरताने जे काही केले ते सर्व आपण कृपा करून मला सांगावे ॥६॥


 श्रीपराशर उवाच
 शालग्रामे महाभागो भगवन्न्यस्तमानसः ।
 स उवास चिरं कालं मैत्रेय पृथिवीपतिः ॥ ७ ॥

श्रीपराशर म्हणाले - हे मैत्रेया ! तो महाभाग पृथ्वीपति भरत भगवंतात चित्त एकाग्र करून चिरकालापर्यंत शालीग्राम क्षेत्रात राहिला ॥७॥


 अहिंसादिष्वशेषेषु गुणेषु गुणिनां वरः ।
 अवाप परमां काष्ठां मनसश्चापि संयमे ॥ ८ ॥

गुणवानांमध्ये श्रेष्ठ अशा त्या भरताने अहिंसा आदि सम्पूर्ण गुण आणि मनाच्या संयमात परम उत्कर्ष प्राप्त केला ॥८॥

 

 


यज्ञेशाच्युत गोविन्द माधवानन्त केशव ।
कृष्ण विष्णो हृषीकेश वासुदेव नमोस्तु ते ॥ ९ ॥

इति राजाह भरतो हरेर्नामानि केवलम् ।
नान्यज्जगाद मैत्रेय किञ्चित्स्वप्रान्तरेपि च ।
एतत्पदं तदर्थं च विना नान्यदचिन्तयत् ॥ १० ॥

'हे यज्ञेशा ! हे अच्युता ! हे गोविन्दा ! हे माधवा ! हे अनन्ता ! हे केशवा ! हे कृष्णा ! हे विष्णो ! हे हृषीकेशा ! हे वासुदेवा ! आपल्याला नमस्कार आहे' - अशा प्रकारे राजा भरत निरन्तर केवळ भगवंताचेच निमोच्चारण करत होता. हे मैत्रेया ! तो स्वप्नातही ह्या व्यतिरिक्त काहीच बोलत नसे आणि ह्या अर्था शिवाय दुसरे कोणते चिन्तनही करत नसे ॥९-१०॥

 


समित्पुष्पकुशादानं चक्रे देवक्रियाकृते ।
नान्यानि चक्रे कर्माणि निःसङ्‍गो योगतापसः ॥ ११ ॥

तो निःसंग, योगयुक्त आणि तपस्वी राजा भगवंताच्या पुजेसाठी केवळ समिधा, पुष्प आणि कुशाचाच सत्र्चय करत असे. त्या व्यतिरिक्त तो दुसरे कोणतेही कर्म करत नसे ॥११॥


 जगाम सोभिषेकार्थमेकदा तु महानदीम् ।
 सस्नौ तत्र तदा चक्रे स्नानस्यानन्तरक्रियाः ॥ १२ ॥

एके दिवशी तो स्नानासाठी नदीवर गेला आणि स्नान करून त्याने सर्व स्नानोत्तर क्रिया केल्या ॥१२॥

 

 

अथाजगाम तत्तीरं जलं पातुं पिपासिता ।
आसन्नप्रसवा ब्रह्मन्नेकैव हरिणी वनात् ॥ १३ ॥

हे ब्रह्मन ! तेवढ्यात त्या नदीच्या तीरावर एक आसन्नप्रसवा (लवकरच प्रसूति होणारी) तहानलेली हरिणी वनातून पाणी प्यायला आली ॥१३॥

 


ततः समभवत्तत्र पीतप्राये जले तथा ।
सिंहस्य नादः सुमहान्सर्वप्राणिभयङ्‍करः ॥ १४ ॥

जेव्हा तिचे पाणि पिऊन झाले तेव्हा सर्व प्राण्यांना भयभीत करणारी सिंह गर्जना झाली ॥१४॥

 


ततः सा सहसा त्रासादाप्लुता निम्नगातटम् ।
अत्युच्चारोहणेनास्या नद्यां गर्भः पपात ह ॥ १५ ॥

तेव्हा अत्यन्त भयभीत होऊन अचानक दचकून ती नदीच्या तटावर चढली; आणि इतक्या उंचावर चढल्याने तिचा गर्भ नदीत पडला ॥१५॥


तमूह्यमानं वेगेन वीचिमालापरिप्लुतम् ।
जग्राह स नृपो गर्भात्पतितं मृगपोतकम् ॥ १६ ॥

नदीच्या तरंगामध्ये पडून वाहून जात असलेल्या त्या गर्भभ्रष्ट मृगबालकाला राजा भरताने पकडले ॥१६॥

 

 

गर्भप्रच्युतिदोषेण प्रोत्तुङ्‍गाक्रमणेन च ।
मैत्रेय सापि हरिणी पपात च ममार च ॥ १७ ॥

हे मैत्रेया ! गर्भपातामुळे आणि खूप उंचावरून उडी मारल्याने ती हरिणी पडली आणि तिचा मृत्यु झाला ॥१७॥



 हरिणीं तां विलोक्याथ विपन्नां नृपतापसः ।
 मृगपोतं समादाय निजमाश्रममागतः ॥ १८ ॥

त्या हरिणीला मेलेले पाहून तपस्वी भरताने त्या बाळाला आपल्या आश्रमात आणले ॥१८॥

 

 

 चकारानुदिनं चासौ मृगपोतस्य वै नृपः ।
 पोषणं पुष्यमाणश्च स तेन ववृधे मुने ॥ १९ ॥

हे मुने ! मग राजा भरत त्या मृगबाळाचे नित्यप्रति पालनपोषण करू लागला आणि ते बाळही पुष्ट होऊन दिवसेंदिवस वाढू लागले ॥१९॥

 



चचाराश्रमपर्यन्ते तृणानि गहनेषु सः ।
दूरं गत्वा च शार्दुलत्रासादभ्याययौ पुनः ॥ २० ॥

ते बाळ कधी आश्रमा जवळच गवत खात चरत राही तर कधी वनात दूर पर्यंत जाऊन मग सिंहाच्या भयाने परत येई ॥२०॥

 

प्रातर्गत्वातिदूरं च सायमायात्यथाश्रमम् ।
पुनश्च भरतस्यभूदाश्रमस्योटजाजिरे ॥ २१ ॥

पहाटे ते कितीही दूर गेले तरी सायंकाळी आश्रमात परत यायचे आणि भरताच्या आश्रमाच्या पर्णशाळेच्या अंगणात पडून राही ॥२१॥

 


 तस्य तस्मिन्मृगे दूरसमीपपरिवर्तिनि ।
 आसीच्चेतः समासक्तं न ययावन्यतो द्विज ॥ २२ ॥

पिल्लात आता राजाचे चित्त आसक्त राहू लागले आणि ते अन्य विषयांकडे जातच नव्हते ॥२२॥


 विमुक्तराज्यतनयः प्रोज्झिताशेषबान्धवः ।
 ममत्वं स चकारोच्चैस्तस्मिन्हरिणबालके ॥ २३ ॥

ज्याने सम्पूर्ण राज्य आणि आपले पुत्र तसेच बन्धु-बान्धवांचा त्याग केला होता तोच भरत त्या हरिणाच्या पिल्लावर  निरतिशय प्रेम करू लागला ॥२३॥


 किं वृकैर्भक्षितो व्याघ्रैः किं सिंहेन निपातितः ।
चिरायमाणे निष्क्रान्ते तस्यासीदिति मानसम् ॥ २४ ॥

ते पिल्लू बाहेर गेल्यानंतर त्याला परतायला उशीर झाला तर त्याच्या मनात विचार येई, 'अरे ! त्या पिल्ला आज कोणा श्वापदाने तर खाल्ले नाही ना ? कोणा सिंहाच्या पंजात तर तो आज सापडला नाही ना ? ॥२४॥

 


 एषा वसुमती तस्य खुराग्रक्षतकर्बुरा ॥ २५ ॥

पहा, त्यांच्या खुरांच्या खुणांनी ही पृथ्वी किती सुरेख दिसत आहे ? माझ्या प्रसन्नते साठीच उप्तन्न झालेले हे मृगशावक कोण जाणे आज कुठे राहिले ? ॥२५॥


 प्रीतये मम जातोसौ क्व ममैणकबालकः ।
 विषामाग्रेण मद्‍बाहुं कण्डूयनपरो हि सः ।
 क्षेमेणाभ्यागतोरण्यादपि मां सुखयिष्यति ॥ २६ ॥

आज वनातून कुशलपूर्वक परतून आपल्या शिंगांनी माझ्या भुजा खाजवून ते मला आनंदित करेल ना ? ॥२६॥


 एते लूनशिखास्तस्य दशनैरचिरोद्‍गतैः ।
 कुशाः काशा विराजन्ते बटवः सामागा इव ॥ २७ ॥

पहा, त्याच्या नवजात दातांनी तोडलेल्या शिखांचे हे कुश आणि काश सामाध्यायी (शिखाहिन) ब्रह्माचार्‍यां सारखे कसे सुशोभित झाले आहेत ? ॥२७॥


 इत्थं चिरगते तस्मिन्स चक्रे मानसं मुनिः ।
 प्रीतिप्रसन्नवदनः पार्श्वस्थे चाभवन्मृगे ॥ २८ ॥

हे द्विजा ! अशा प्रकारे कधी जवळ तर कधी दूर राहणार्‍या त्या हरिणाच्या परतायला उशीर झाला कि त्या पिल्लाची भरत मुनि अशा प्रकारे काळजी करायचा आणि जेव्हा ते जवळ यायचे तेव्हा प्रेमाने त्याचा चेहरा खुलायचा ॥२८॥

 


 समाधिभङ्‍गस्तस्यासीत्तन्मयत्वादृतात्मनः ।
 सन्त्यक्तराज्यभोगर्धिस्वजनस्यापि भूपतेः ॥ २९ ॥

अशा प्रकारे त्या पिल्लातच आसक्तचित्त राहिल्याने, राज्य, भोग, समृद्धि आणि स्वजनांचा त्याग करूनही राजा भरताची समाधि भंग झाली ॥२९॥

 

 

 चपलं चपले तस्मिन्दूरगं दूरगामिनि ।
 मृगपोतेऽभवच्चित्तं स्थैर्यवत्तस्य भूपतेः ॥ ३० ॥

त्या राजाचे स्थिर चित्त ते हरिण चंचल झाल्यावर चंचल होई आणि ते लांब गेल्यावर चित्तही लांब जाई ॥३०॥

 


 कालेन गच्छता सोऽथ कालं चक्रे महीपतिः ।
 पितेव सास्त्रं पुत्रेण मृगपोतेन वीक्षितः ॥ ३१ ॥

कालान्तराने राजा भरताने, ते मृगबालक त्याला पुत्राच्या सजल नयनांनी पाहात असताना पित्याप्रमाणे आपल्या प्राणांचा त्याग केला ॥३१॥

 

 मृगमेव तदाद्राक्षीत्त्यजन्प्राणानसावपि ।
 तन्मयत्वेन मैत्रेय नान्यत्किञ्चिदचिन्तयत् ॥ ३२ ॥

हे मैत्रेया ! राजासुद्धा प्राण त्यागते वेळी स्नेहवश होऊन त्या हरिणालाच पहात राहिला त्याच्यात तन्मय राहिल्याने त्याने दुसरे कसलेही चिंतन केले नाही ॥३२॥


 ततश्च तत्कालकृतां भावनां प्राप्य तादृशीम् ।
 जम्बूमार्गे महारण्ये जातो जातिस्मरो मृगः ॥ ३३ ॥

त्यानन्तर, त्यावेळच्या सुदृढ़ भावनेमुळे तो जम्बूमार्गाच्या (कालत्र्चरपर्वत) घोर वनात आपल्या पूर्वजन्माच्या स्मृतिने युक्त एक मृग झाला ॥३३॥

 

 

 जातिस्मरत्वदुद्विग्नः संसारस्य द्विजोत्तम ।
 विहाय मातरं भूयः सालग्राममुपाययो ॥ ३४ ॥

हे द्विजोत्तमा ! आपल्या पूर्वजन्माचे स्मरण राहिल्याने त्याची संसारातून उपरति झाली आणि आपल्या मातेला सोडून तो परत शालीग्राम क्षेत्रात येऊन राहू लागला ॥३४॥


 शुष्कैस्तृणैस्तथा पर्णैः स कुर्वन्नात्मपोषणम् ।
 मृगत्वहेतुभूतस्य कर्मणो निष्कृतिं ययौ ॥ ३५ ॥

तिथे सुकलेले गवत व पाने खाऊनच आपल्या शरीराचे पोषण करत तो आपल्या मृगत्व प्राप्तिच्या हेतुभूत कर्मांचे निराकरण करू लागला ॥३५॥


 तत्र चोत्सृष्टदेहोऽसौ जज्ञे जातिस्मरो द्विजः ।
 सदाचारवतां शुद्धे योगिनां प्रवरे कुले ॥ ३६ ॥

त्यानन्तर ते शरीर त्यागून त्याने सदाचार सम्पन्न योग्यांच्या पवित्र कुळात ब्राह्मणजन्म ग्रहण केला . ह्या देहातही त्याला आपल्या पूर्वजन्माचे स्मरण होते ॥३६॥


 सर्वविज्ञानसम्पन्नः सर्वशास्त्रार्थतत्त्ववित् ।
 अपश्यत्स च मैत्रेय आत्मानं प्रकृतेः परम् ॥ ३७ ॥

हे मैत्रेया ! तो सर्वविज्ञानसम्पन्न आणि समस्त शास्त्रांचे मर्म जाणणारा होता तसेच आपल्या आत्म्याला निरन्तर प्रकृतिच्या पलिकडे पाहात होता ॥३७॥


आत्मनोऽधिगतज्ञानो देवादीनि महामुने ।
सर्वभूतान्यभेदेन स ददर्श तदात्मनः ॥ ३८ ॥

हे महामुने ! आत्माज्ञानसम्पन्न असल्याने तो देवता आदि सम्पूर्ण प्राण्यांना आपल्याहून अभिन्नरूपात पाहात असे ॥३८॥


 न पपाठ गुरुप्रोक्तं कृतोपनयनः श्रुतिम् ।
 न ददर्श च कर्माणि शास्त्राणि जगृहे न च ॥ ३९ ॥

उपनयन-संस्कार झाल्यावर तो गुरुंनी शिकवल्यावरही वेद-पाठ करत नव्हता किंवा कोणत्याच कर्माकडे लक्ष देत नव्हता किंवा कोणत्या अन्य शास्त्राचाही अभ्यास करत नव्हता ॥३९॥


 उक्तोपि बहुशः किञ्चिज्जडवाक्यमभाषत ।
 तदप्यसंस्कारगुणं ग्राम्यवाक्योक्तिसंश्रितम् ॥ ४० ॥

जेव्हा कोणी त्याची खूप विचारपूस केलीच तर तो जड समान काहातरी असंस्कृत, असार तसेच ग्रामीण वाक्यात उत्तर देत असे ॥४०॥


 अपध्वस्तवपुः सोऽपि मलिनाम्बरधृग्द्विजः ।
 क्लिन्नदन्तान्तरः सर्वैः परिभूतः स नागरैः ॥ ४१ ॥

सदैव अस्वच्छ मलिन शरीर, मलिन वस्त्र आणि अपरिमार्जित दन्तयुक्त राहिल्याने तो ब्राह्मण सदा आपल्या नगरवासीं कडून अपमानित होत राही॥४१॥

 

 

 संमाननापरां हानिं योगर्धे कुरुते यतः ।
 जनेनावमतो योगी योगसिद्धं च विन्दति ॥ ४२ ॥

हे मैत्रेया ! योगश्री साठी सर्वाधिक हानिकारक सम्मानच आहे, जो योगी अन्य मनुष्यांकडून अपमानित होतो तो त्वरित सिद्धि प्राप्त करतो ॥४२॥


 तस्माच्चरेत वै योगी सतां धर्ममदूषयन् ।
 जना यथावमन्येरन्गच्छेयुर्नैव सङ्‍गतिम् ॥ ४३ ॥

म्हणून योगींनी, सन्मार्ग दूषित न करता असे आचरण करावे ज्यामुळे लोक त्यांचा अपमान करतील आणि ते संगतिपासून लांब राहतील ॥४३॥



 हिरण्यगर्भवचनं विचिन्त्येत्थं महामतिः ।
 आत्मानं दर्शयामास जडोन्मत्ताकृतिं जने ॥ ४४ ॥

हिरण्यगर्भाच्या ह्या सारयुक्त वचनाचे स्मरण ठेऊन तो महामति विप्रवत स्वतःला लोकांमध्ये जड आणि उद्धट सारखा दाखवी ॥४४॥


 भुक्ते कुल्माषव्रीह्यादिशाकं वन्यं फलं कणान् ।
 यद्यदाप्नोति सुबहु तदत्ते कालसंयमम् ॥ ४५ ॥

कुल्माष (जव आदि) धान्य, शाक, जंगली फळे अथवा कण आदि जे काही भक्ष्य मिळत असे ते थोडे असलेतरी त्याला भरपूर समजून तो तेच खाऊन आपला कालक्षेप करत असे ॥४५॥


 पितर्युपरते सोऽथ भ्रातृभ्रातृव्यबान्धवैः ।
 कारितः क्षेत्रकर्मादि कदन्नाहारपोषितः ॥ ४६ ॥

पित्याच्या मृत्युपश्चात त्याचे भाऊबंध त्याला सडकं शीळं अन्न देऊन त्याचं पोषण करायचे आणि त्याच्याकडून शेतीचे कार्य करून घ्यायचे ॥४६॥


 समाक्षपीनावयवो जडकारी च कर्मणि ।
 सर्वलोकोपकरणं बभूवाहारचेतनः ॥ ४७ ॥

तो बैलासारखा पुष्ट शरीराचा आणि कर्माने जडवत निश्चेष्ट होता. म्हणून केवल आहार देऊन सर्व लोक त्याच्याकडून आपआपले काम करून घेत असत ॥४७॥

 

 


तं तादृशमसंस्कारं विप्राकृतिविचेष्टितम् ।
क्षत्ता पृषतराजस्य काल्यै पशुमकल्पयत् ॥ ४८ ॥

रात्रौ तं समलङ्‍कृत्य वैशसस्य विधानतः ।
अधिष्ठितं महाकाली ज्ञात्वा योगेश्वरं तथा ॥ ४९ ॥
ततः खङ्‍गं समादाय निशितं निशि सा तथा ।
क्षत्तारं क्रूरकर्माणमच्छिनत्कण्ठमूलतः ।
स्वपार्षदयुता देवी पपौ रुधिरमुल्बणम् ॥ ५० ॥

त्याला ह्या प्रकारे संस्कारशुन्य आणि ब्राह्मणवेशा विरुद्ध आचरण करणारा पाहून रात्रीच्या वेळी पृषतराजाच्या सेवकांनी बळीसाठी सुसज्जित करून काली मातेचा बलिपशु बनवले. पण एका परमयोगीश्वराला बळी साठी उपस्थित केलेले पाहून महाकालीने एक तीक्ष्ण तलवारीने त्या क्रूरकर्मा राजसेवकाचा गळा कापून टाकला आणि आपल्या पार्षदां सहित त्याचे रुधिर पान केले ॥४८-५०॥



ततःसौवीरराजस्य प्रयातस्य महात्मनः ।
विष्टकर्ताथ मन्येत विष्टियोग्योऽयमित्यपि ॥ ५१ ॥

त्यानन्तर, एके दिवशी महात्मा सौवीरराज कुठेतरी जात होते . त्यावेळी त्याच्या काही गुलामांना वाटले कि हा देखिल गुलाम होण्यास योग्य आहे ॥५१॥

 


तं तादृशं महात्मानं भस्मच्छन्नमिवानलम् ।
क्षत्ता सौवीरराजस्य विष्टियोग्यममन्यत ॥ ५२ ॥

राजाच्या सेवकांनी सुद्धा भस्मात लपलेल्या अग्नि समान त्या महात्म्याचा रागरंग पाहून त्याला गुलाम समजले ॥५२॥

 

 

 स राजा शिबिकारूढो गन्तुं कृतमतिर्द्विज ।
 बभूवेक्षुमतीतीरे कपिलर्षेर्वराश्रमम् ॥ ५३ ॥
 श्रेयः किमत्र संसारे दुःखप्राये नृणामिति ।
 प्रष्टुं तं मोक्षधर्मज्ञं कपिलाख्यं महामुनिम् ॥ ५४ ॥

हे द्विजा ! त्या सौवीरराजाने मोक्षधर्माचे ज्ञाता महामुनि कपिल ह्यांना हे विचारण्यासाठी कि 'ह्या दुःखी संसारात मनुष्याचे श्रेय कशात आहे' शिबिकेवर चढून इक्षुमती नदीच्या किनारी त्या महर्षिच्या आश्रमात जाण्याचा विचार केला ॥५३-५४॥


 उवाह शिबिकां तस्य क्षत्तुर्वचनचोदितः ।
 नृणां विष्टिगृहीतानामन्येषां सोऽपि मध्यगः ॥ ५५ ॥

तेव्हा राजसेवकाच्या सांगण्यावरून भरत मुनि सुद्धा त्या पालखीचे अन्य गुलामांसोबत वहन करू लागला ॥५५॥


 गृहीतो विष्टिना विप्रः सर्वज्ञानैकभाजनम् ।
 जातिस्मरोसौ पपास्य क्षयकाम उवाह ताम् ॥ ५६ ॥

अशा प्रकारे गुलामीत अडकल्यावरही आपल्या पूर्वजन्माचे स्मरण असणारा, सम्पुर्ण विज्ञानाचा एकमात्र पात्र तो विप्रवर आपल्या पापमय प्रारब्धाचा क्षय करण्यासाठी त्या शिबिकेला उचलून चालू लागला ॥५६॥

 

 

ययौ जडमतिः सोथ युगमात्रावलोकनम् ।
कुर्वन्मतिमतां श्रेष्ठस्तदन्ये त्वरितं ययुः ॥ ५७ ॥

बुद्धिमानांपेक्षाही श्रेष्ठ असा तो द्विजवर चार हाथ भूमि बघून मन्द-गतिने चालत होता, पण त्याचे अन्य साथी वेगाने चालत होते ॥५७॥


 विलोक्य नृपतिः सोथ विषमां शिबिकागतिम् ।
 किमेतदित्याह समं गम्यतां शिबिकावहाः ॥ ५८ ॥

अशा प्रकारे शिबिकेची गति पाहून राजा म्हणाला - 'अरे शिबिकावाहकांनो ! हे काय करता आहात ? समान गतिने चाला ' ॥५८॥


 पुनस्तथैव शिबिकं विलोक्य विषमां हि सः ।
 नृपः किमेतदित्याह भवद्‍भिर्गम्यतेन्यथा ॥ ५९ ॥

पण तरीही त्यांच्या गतित तिच विषमता पाहून राजाने परत विचारले - ' अरे हे काय ? असे असमान गतिने का चलत आहात? ' ॥५९॥


 भूपतेर्वदतस्तस्य श्रुत्वेत्थं बहुशो वचः ।
 शिबिकावाहकाः प्रोचुरयं यातीत्यसत्वरम् ॥ ६० ॥

राजाने परत परत असे विचारले तेव्हा ते शिबिका वाहक भरतला पाहून म्हणू लागले - ' आमच्यात हाच एकटा हळुहळु चालत आहे '॥६०॥


 राजोवाच
 किं श्रान्तोऽस्यल्पमध्वानं त्वयोढा शिबिका मम ।
 किमाया ससहो न त्वं पीवानसि निरीक्ष्यसे ॥ ६१ ॥

राजाने विचारले - अरे, तु तर अजून माझी शिबिका थोड्याच अंतरापर्यंत वाहिली आहेस .इतक्यात थकलास ? तसा तु चांगलाच हृष्ट पुष्ट दिसतोस, तर मग तुला एवढेही श्रम सहन होत नाहित का ? ॥६१॥


 ब्राह्मण उवाच
 नाहं पीवा न चैवोढा शिबिका भवतो मया ।
 न श्रान्तोस्मि न चायासो सोढव्योस्ति महीपते ॥ ६२ ॥

ब्राह्मण म्हणाला - राजन् ! मी तगडाही नाही किंवा मी तुमची शिबिका देखिल उचललेली नाही . मी थकलेलोही नाही आणि मला श्रम देखिल होत नाही ॥६२॥


 राजोवाच
 प्रत्यक्षं दृश्यसे पीवानद्यापि शिबिका त्वयि ।
 श्रमश्च भारोद्वहने भवत्येव हि देहिनाम् ॥ ६३ ॥

राजा म्हणाला -अरे तू तर प्रत्यक्ष तगडा दिसतोच आहेस, आता ह्यावेळी सुद्धा शिबिका तुझ्या खांद्यांवर ठेवलेली आहे आणि ओझं वाहून शरीराला श्रम होतातच ॥६३॥


 ब्राह्मण उवाच
 प्रत्यक्षं भवता भूप यद्दृष्टं मम तद्वद ।
 बलवानबलश्चेति वाच्यं पश्चाद्विशेषणम् ॥ ६४ ॥

ब्राह्मण म्हणाला - राजन् ! तुला प्रत्यक्ष काय दिसत आहे, आधी मला तेच सांग ! ' बलवान' किंवा 'अबलवान् ' आदि विशेषणांबद्दल नंतर सांग ॥६४॥

 

 

त्वयोढा शिबिका चेति त्वय्यद्यापि च संस्थिता ।
मिथ्यैतदत्र तु भवाञ्चृणोतु वचनं मम ॥ ६५ ॥
 

'तु माझ्या शिबिकेचे वहन केलेस, त्यावेळी सुद्धा ती तुझ्याच खांद्यांवर ठेवलेली होती ' - तुझे असे म्हणणे सर्वथा मिथ्या आहे, बरं माझं म्हणणं ऐक - ॥६५॥

 


 
भूमौ पादयुगं त्वास्ते जङ्‍घे पादद्वये स्थिते ।
 ऊर्वोर्जङ्‍घाद्वयावस्थौ तदाधारं तथोदरम् ॥ ६६ ॥

 बघ, पृथ्वीपर तर माझे पाय ठेवलेले आहेत, पायांवर जांघा आहेत आणि जांघांवर मांड्या आहेत आणि मांड्यांवर पोट आहे ॥६६॥

 


 
वक्षस्थलं तथा बाहू स्कन्धौ चोदरसंस्थितौ ।
 स्कन्धाश्रितेयं शिबिका मम भारोत्र किं कृतः ॥ ६७ ॥

पोटावर छाती, हात आणि खांदे आहेत तसेच खांद्यांवर ही शिबिका ठेवलेली आहे . आता ह्यात माझ्यावर कसं ओझं येणार ? ॥६७॥


 शिबिकायां स्थितं चेदं वपुस्त्वदुपलक्षितम् ।
 तत्र त्वमहमप्यत्र प्रोच्यते चेदमन्यथा ॥ ६८

ह्या शिबिकेत ज्याला तुझे म्हटले जाते ते शरीर इथे ठेवलेले आहे . प्रत्यक्षात ' तु तिथे (शिबिकेत) आहेस आणि मी इथे (पृथ्वीवर) आहे - असं म्हणणं पूर्णपणे खोटं आहे  ॥६८॥


 अहं त्वं च तथान्ये च भूतैरुह्याम पार्थिव ।
 गुणप्रवाहपतितो भूतवर्गोऽपि यात्ययम् ॥ ६९ ॥

हे राजन् मी, तु आणि अन्य समस्त जीवांचे वहन पत्र्चभूतांनीच केले जाते. तसेच हा भूतवर्ग सुद्धा गुणांच्या प्रवाहात पडल्यानेच वाहात आहे ॥६९॥


 कर्मवश्या गुणश्चैते सत्त्वाद्याः पृथिवीपते ।
 अविद्यासञ्चितं कर्म तच्चाशेषेषु जन्तुषु ॥ ७० ॥

हे पृथ्वीपते ! हे सत्त्वादि गुण सुद्धा कर्मांच्या वशीभुत आहेत आणि समस्त जीवांमध्ये कर्म अविद्याजन्यच आहे ॥७०॥


 आत्मा शुद्धोक्षरः शान्तो निर्गुणः प्रकृतेः परः ।
 प्रवृद्ध्यपचयौ नास्य एकस्याखिलजन्तुषु ॥ ७१ ॥

आत्मा तर शुद्ध, अक्षर, शान्त, निर्गुण, आणि प्रकृतिच्या पलिकडे आहे तसेच समस्त जीवांमध्ये तो एकच ओतप्रोत आहे . म्हणून त्याची वृद्धी अथवा क्षय कधीच नाहीं होत ॥७१॥


 यदा नोपचयस्तस्य न चैवापचयो नृप ।
 तदा पीवानसीतीत्थं कया युक्त्या त्वयेरितम् ॥ ७२ ॥

हे नृपा ! जर त्याचाच उपचय (वृद्धि) किंवा पचय (क्षय) नाही होत, तर मग तु हे कशाच्या आधारे म्हटलस कि 'तु तगडा आहेस? ' ॥७२॥

 

भूपादजङ्‍घाकट्यूरुजठरादिषु संस्थिते ।
शिबिकेयं यथा स्कन्धे तथा भारः समस्त्वया ॥ ७३ ॥

जर क्रमशः पृथ्वी, पाय, जंघा , कटि, ऊरू आणि उदरावर स्थित खांद्यांवर ठेवलेली हि शिबिका माझ्यासाठी भाररूप होऊ शकते तर त्याच प्रकारे तुझ्यासाठीही होऊ शकतेच ना ? (कारण हि पृथ्वी वगैरे जशी तुझ्यापेक्षा वेगळी आहे तशीच ती माझ्या आत्म्याहूनही सर्वथा भिन्न आहे) ॥७३॥

 


 तथान्यैर्जन्तुभिर्भूप शिबिकोढा न केवलम् ।
 शैलद्रुमगृहोत्थोऽपि पृथिवी सम्भवोपि वा ॥ ७४ ॥

तसेच ह्याच युक्तिवादाने अन्य समस्त जीवांनी सुद्धा फक्त शिबिकाच नाहीं, तर सम्पूर्ण पर्वत, वृक्ष, गृह आणि पृथ्वी आदिंचा भार उचललेला आहे ॥७४॥


 यदा पुंसः पृथग्भावः प्राकृतैः कारणेर्नृप ।
 सोढव्यस्तु तदायासः कथं वा नृपते मया ॥ ७५ ॥

हे राजन ! जेव्हा प्रकृतिजन्य कारणांमुळे पुरुष सर्वथा भिन्न आहे तर मग त्याचे परिश्रम देखिल मला कसे होऊ शकतील ? ॥७५॥


 यद्द्रव्या शिबिका चेयं तद्द्रव्यो भूतसङ्‍ग्रहः ।
 भवतो मेऽकिलस्यास्य ममत्वेनोपबृंहितः ॥ ७६ ॥

आणि ज्या द्रव्याने ही शिबिका बनली आहे त्याच द्रव्याने हे तुमचं, माझं आणि सर्वांचच शरीर सुद्धा बनलेलं आहे; ज्यात ममत्वाचा आरोप केला गेला आहे ॥७६॥

 

 

श्रीपराशर उवाच
एवमुक्त्वाभवन्मौनी स वहञ्छिबिकां द्विज ।
सोऽपि राजावतीर्योव्यां तत्पादौ जगृहे त्वरन् ॥ ७७ ॥

श्रीपराशर म्हणाले - असे म्हणून तो द्विजवर शिबिकेला उचलून मौन झाला; आणि राजाने सुद्धा लगेच पृथ्वीवर उतरून त्याचे चरण पकड़ले ॥७७॥


 राजोवाच
 भो भो विसृज्य शिबिकां प्रसादं कुरु मे द्विजः ।
 कथ्यतां को भवानत्र जाल्मरूपधरः स्थितः ॥ ७८ ॥

राजा म्हणाला - अहो द्विजराज ! ही शिबिका सोडा आणि माझ्यावर कृपा करा प्रभु ! कृपा करून सांगा की हा जडवेष धारण केलेले आपण कोण आहात ? ॥७८॥


 यो भवान्यन्निमित्तं वा यदागमनकारणम् ।
 तत्सर्वं कथ्यतां विद्वन्मह्यं शुश्रूषवे त्वया ॥ ७९ ॥

हे विद्वान ! आपण कोण आहात ? कोणत्या कारणाने आपलं इथे येणं झालं ? इथे यायचं कारण काय? हे सर्व आपण मला सांगावे. मला आपल्या विषयी ऐकण्याची मोठी उत्सुकता आहे  ॥७९॥


 ब्राह्मण उवाच
 श्रूयतां सोऽहमित्येतद्वक्तुं भूप न शक्यते ।
 उपभोगनिमित्तं च सर्वत्रागमनक्रिया ॥ ८० ॥

ब्राह्मण म्हणाला - राजन ! ऐक, मी अमुक आहे असं सांगता येत नाही आणि तु जे माझं इथे यायचं कारण विचारलस तर येणं जाणं वगैरे सर्व क्रिया कर्मफळाच्या उपभोगासाठीच असतात ॥८०॥


 सुखदुःखोपभोगौ तु तौ देहाद्युपपादकौ ।
 धर्माधर्मोद्‍भवौ भोक्तुं जन्तुर्देहादिमृच्छति ॥ ८१ ॥

सुख - दुःखाचा भोग हाच देह आदि प्राप्ति करून देणारा असतो तसेच धर्माधर्मजन्य सुख दुःख भोगण्यासाठीच जीव देहा आदि धारण करतो ॥८१॥


 सर्वस्यैव हि भूपाल जन्तोः सर्वत्र कारणम् ।
 धर्माधर्मौ यतः कस्मात्कारणं पृच्छते त्वया ॥ ८२ ॥

हे भूपाला ! समस्त जीवांच्या सम्पूर्ण अवस्थांचे कारण हे धर्म आणि अधर्मच आहेत तर मग विशेषरूपाने माझ्या आगरमनाचे कारण तु का विचारतोस ? ॥८२॥


 राजोवाच
 धर्माधर्मौ न सन्देहःसर्वकार्येषु कारणम् ।
 उपभोगनिमित्तं च देहाद्देहान्तरागमः ॥ ८३ ॥

राजा म्हणाला - नक्कीच समस्त कार्यांचे कारण धर्म आणि अधर्मं आहेत आणि कर्मफळाच्या उपभोगासाठीच एका देहातून दुसर्‍या देहात जाणे होत असते ॥८३॥


 यस्त्वेतद्‍भवता प्रोक्तं सोहमित्येतदात्मनः ।
 वक्तुं न शक्यते श्रोतुं तन्ममेच्छा प्रवर्तते ॥ ८४ ॥

पण आपण जे म्हणालात 'मी कोण आहे - हे सांगू नाही शकत' ह्याविषयी ऐकण्याची माझी इच्छा आहे ॥८४॥


 योस्ति सोऽहमिति ब्रह्मन्कथं वक्तुं न शक्यते ।
 आत्मन्येष न दोषाय शब्दोहमिति यो द्विज ॥ ८५ ॥

हे ब्रह्मन ! ' जो आहे (अर्थात जो आत्मा कर्त्ताभोक्तारूपाने प्रतीत होतो आणि सदा सत्तारूपाने वर्तमान आहे) तोच मी आहे' - असे का नाही सांगू शकत? हे द्विजा ! हा ' अहं' शब्द तर आत्म्यातील कोणत्याही प्रकारच्या दोषाचे कारण नसतो ॥८५॥

 

 

 ब्राह्मण उवाच
 शब्दोहमिति दोषाय नात्मन्येष तथैव तत् ।
 अनात्मन्यात्मविज्ञानं शब्दो वा भ्रान्तिलक्षणः ॥ ८६ ॥

ब्राह्मण म्हणाला - हे राजन ! तु जे म्हणालास 'अहं' शब्दामुळे आत्म्यात कोणताही दोष येत नाही ते ठीक आहे, पण अनात्म्यातच आत्मत्वाचे ज्ञान करवणारा भ्रान्तिमूलक 'हं' शब्दच दोषाचे कारण आहे ॥८६॥



 जिह्वा ब्रवीत्यहमिति दन्तोष्ठौ तालुके नृप ।
 एतेनाहं यतः सर्वे वाङ्‍‌निष्पादनहेतवः ॥ ८७ ॥

हे नृपा ! अहं शब्दाचे उच्चारण जिव्हा, दन्त, ओष्ठ आणि तालु पासून होते, पण हे सर्व त्या शब्दाच्या उच्चारणाचे कारण आहेत, 'हं' नाहीत ॥८७॥


 किं हेतुभिर्वदत्येषा वागेवाहमिति स्वयम् ।
 अतः पीवानसीत्येतद् वक्तुमित्थं न युज्यते ॥ ८८ ॥

तर मग जिव्हादि कारणामुळे ही वाणी स्वतःला 'हं' म्हणते का ? नाही ! म्हणूनच अशा स्थितित 'तू जाडा आहेस' असे म्हणणे देखिल उचित नाही ॥८८॥


 पिण्डः पृथग्यतः पुंसः शिरःपाण्यादिलक्षणः ।
 ततोहमिति कुत्रैतां संज्ञां राजन्करोम्यहम् ॥ ८९ ॥

डोके तसेच हातपाय आदि रूपी हे शरिर सुद्धा आत्म्याहून वेगळेच आहे . म्हणून हे राजन् ! ह्या 'अहं' शब्दाचा मी कुठे कसा प्रयोग करु ? ॥८९॥


 यद्यन्योस्ति परः कोऽपि मत्तः पार्थिवसत्तम ।
 तदैषोऽहमयं चान्यो वक्तुमेवमपीष्यते ॥ ९० ॥

तसेच हे नृपश्रेष्ठा ! तरी माझ्याहून भिन्न कोणी दुसरा सजातीय आत्मा असला तर ' हा मी आणि हा अन्य'- असे म्हटले जाऊ शकते ॥९०॥


 यदा समस्तदेहेषु पुमानेको व्यवस्थितः ।
 तदा हि को भवान्सोहमित्येतद्विफलं वचः ॥ ९१ ॥

पण, जेव्हा समस्त शरीरांमध्ये एकच आत्मा विराजमान आहे तर 'पण कोण आहात ? मी अमुकअमुक आहे.' ही अशी वाक्य निष्फलच आहेत ॥९१॥


 त्वं राजा शिबिका चेयमिमे वाहाः पुरःसराः ।
 अयं च भवतो लोको न सदेतन्नृपोच्यते ॥ ९२ ॥

'तु राजा आहे, ही शिबिका आहे, हे नृपा ! हे शिबिकावाहक आहेत तसेच ही सर्व तुझी प्रजा आहे' - हे नृपा ! ह्यातील कोणतीही गोष्ट परमार्थातः सत्य नाही ॥९२॥

 

वृक्षाद्दारु ततश्चेयं शिबिका त्वदधिष्ठिता ।
किं वृक्षसंज्ञा वास्याः स्याद्दारुसंज्ञाथ वा नृप ॥ ९३ ॥

हे राजन ! वृक्षापासून लाकूड झाले आणि लाकडापासून तुझी ही शिबिका बनली; तर मग सांग ह्याला लाकूड म्हणायचं कि वृक्ष ? ॥९३॥

 


 वृक्षारूढो महाराजो नायं वदति ते जनः ।
 न च दारुणि सर्वस्त्वां ब्रवीति शिबिकागतम् ॥ ९४ ॥

पण ' महाराज वृक्षावर किंवा लाकडावर बसले आहेत असं कोणीही म्हणत नाही ! सर्व लोक शिबिकेत बसले असंच म्हणतात ॥९४॥

 


 शिबिकादारुसङ्‍घातो रचनास्थितिसंस्थितः ।
 अन्विष्यतां नृपश्रेष्ठ तद्‍भेदे शिबिका त्वया ॥ ९५ ॥
 एवं छत्रशलाकानां पृथग्भावे विमृश्यताम् ।
 क्व यातं छत्रमित्येष न्यायस्त्वयि तथा मयि ॥ ९६ ॥

हे नृपश्रेष्ठा ! विशिष्ट रचनेच्या लाकडांच्या समूहालाच शिबिका म्हणतात . जर त्यापेक्षा कोणती भिन्न वस्तु असेल तर मग लाकूड वेगळं करून ती शोधा ॥९५॥

ह्याच प्रकारे छत्रातील शलाका वेगळी करून छत्र कुठे आहे ह्याचा विचार करावा . हाच न्याय तुझ्यात आणि माझ्यातही लागू होतो (अर्थात माझ्या आणि तुझ्या शरीरातही पंचभूता व्यतिरिक्त दुसरी कोणतीच वस्तु नाही) ॥९६॥

 


 पुमान् स्त्री गौरजो वाजी कुञ्जरो विहगस्तरुः ।
 देहेषु लोकसंज्ञेयं विज्ञेया कर्महेतुषु ॥ ९७ ॥

पुरुष, स्त्री, गाय, अज (बकरा), अश्व, गज, पक्षी आणि वृक्ष आदि लौकिक संज्ञांचा प्रयोग कर्महेतुक शरिरांमध्येच समजून घेतला पाहिजे ॥९७॥

 


 पुमान्न देवो न नरो न पशुर्न च पादपः ।
 शरीराकृतिभेदास्तु भूपैते कर्मयोनयः ॥ ९८ ॥

हे राजन पुरुष (जीव) ना देवता आहे, ना मनुष्य, ना पशु आणि ना वृक्ष आहे . हे सर्व कर्मजन्य शरीरांच्या आकृतिंचेच भेद आहेत ॥९८॥

 


 वस्तु राजेति यल्लोके यच्च राजभटात्मकम् ।
 तथान्यच्च नृपेत्थं तन्न सत्संकल्पनामयम् ॥ ९९ ॥

ह्या लोकी धन, राजा, राजाचे सैनिक तसेच आणखीनही ज्या सगळ्या वस्तु आहेत, हे राजन ! त्या परमार्थतः सत्य नाहीत, केवळ कल्पनामयच आहेत ॥९९॥

 


 यत्तु कालान्तेरेणापि नान्यां संज्ञामुपैति वै ।
 परिणामादिसम्भूतां तद्वस्तु नृप तच्च किम् ॥ १०० ॥

ज्या वस्तुचे परिणामादिक कारण असणारी कोणतीही संज्ञा कालान्तराने सुद्धा नसते, तीच परमार्थवस्तु आहे . हे राजन् ! अशी वस्तु कोणती आहे ? ॥१००॥

 


 त्वं राजा सर्वलोकस्य पितुः पुत्रो रिपो रिपुः ।
 पत्‍न्याः पतिः पिता सूनोः किं त्वं भूप वदाम्यहम् ॥ १०१ ॥

(तु स्वतःलाच पाहा) समस्त प्रजेसाठी तु राजा आहेस, पित्यासाठी पुत्र आहेस, शत्रुसाठी शत्रु आहे, पत्नीचा पति आणि पुत्राचा पिता आहेस । हे राजन! तु सांग, मी तुला काय म्हणू ? ॥१०१॥

 


 त्वं किमेतच्छिरः किं नु ग्रीवा तव तथोदरम् ।
 किमु पादादिकं त्वं वा तवैतत्किं महीपते ॥ १०२ ॥

हे महीपते ! तु हे मस्तक आहेस कि गळा कि पोट किंवा मग पाय वगैरे आहेस ? तसेच हे मस्तक वगैरे सुद्धा 'तुझे' काय आहे ? ॥१०२॥

 


 समस्तावयवेभ्यस्त्वं पृथग्भूय व्यवस्थितः ।
 कोऽहमित्यत्र निपुणो भूत्वा चिन्तय पर्थिव ॥ १०३ ॥

हे पृथ्वीश्वरा ! तु ह्या समस्त अवयवांहून वेगळा आहेस; म्हणून सावधान होऊन विचार कर कि, मी कोण आहे ॥१०३॥

 


 एवं व्यवस्थिते तत्त्वे मयाहमिति भाषितुम् ।
 पृथक्करणनिष्पाद्यं शक्यते नृपते कथम् ॥ १०४ ॥

हे महाराजा ! आत्मतत्त्व अशा प्रकारे व्यवस्थित आहे . ते सर्वापासून वेगळे करूनच सांगितले जाऊ शकते। तर मग, मी ते 'अहं' शब्दाने कसे वर्णन करू शकेन ? ॥१०४॥

 


 इति श्रीविष्णुमहापुराणे द्वितीये अंशे त्रयोदशोऽध्यायः (१३)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, तृतीय अंश, त्रयोदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 3 , Adhyay 13

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ तृतीयः अंशः ॥ त्रयोदशोऽध्यायः ॥   आभ्युदयिक श्राद्ध , प्रेतकर्म तथा श्राद्धादि विचार और्व उवाच सचैलस्य पितुः ...