शनिवार, १४ फेब्रुवारी, २०२६

विष्णुपुराण, द्वितीय अंश, द्वितीय अध्याय | Vishnu Puran, Ansh 2 , Adhyay 2

 

॥ विष्णुपुराणम् ॥

द्वितीयः अंशः॥ द्वितीयोऽध्यायः ॥

 

"भूगोलाचे विवरण

 

श्रीमैत्रेय उवाच
कथितो भवता ब्रह्मन्सर्गः स्वायम्भुवश्च मे ।
श्रोतुमिच्छाम्यहं त्वत्तः सकलं मण्डलं भुवः ॥ १ ॥

मैत्रेय म्हणाले ;– हे ब्रह्मन ! तुम्ही माझ्यासाठी स्वायम्भुव मनुच्या वंशाचे वर्णन केले, आता मी तुमच्या मुखारविंदातून सम्पूर्ण पृथ्वीमंडलाचे विवरण ऐकू इच्छितो .

 

 


 
यावन्तः सागर द्वीपास्तथा वर्षाणि पर्वताः ।
 वनानि सतितः पुर्यो देवादीनां तथा मुने ॥ २ ॥
 यत्प्रमाणमिदं सर्वं यदाधारं यदात्मकम् ।
 संस्थानमस्य च मुने यथावद्‌वक्तुमर्हसि ॥ ३ ॥

हे मुने ! जितके सागर, द्वीप, वर्ष, पर्वत, वन, नद्या आणि देवता आदिंची नगरे आहेत, त्या सर्वांची जी परिमाणे आहेत, जो आधार आहे, जी उपादान-कारके आहेत आणि जसा आकार आहे, ते सवांचे तुम्ही यथायोग्य वर्णन करावे .

 

 


 
श्रीपराशर उवाच
 मैत्रेय श्रूयतामेतत्सङ्‌क्षेपाद् गदतो मम ।
 नास्य वर्षशतेनापि वक्तुं शक्यो हि विस्तरः ॥ ४ ॥

पराशर म्हणाले ;– हे मैत्रेया ! ऐक,  मी ह्या सर्व गोष्टींचे संक्षेपात वर्णन करतो, कारण ह्या सर्वांचे विस्तारपूर्वक वर्णन करायला शंभर वर्ष सुद्धा कमी पडतील .

 

 

जम्बूप्लक्षाह्वयौ द्वीपौ शाल्मलिश्चापरो द्विज ।
कुशः क्रैञ्चस्तथा शाकः पुष्करश्चैव सप्तमः ॥ ५ ॥
 एते द्वीपाः समुद्रैस्तु सप्तसप्तभिरावृताः ।
 लवणेक्षुसुरासर्पिर्दधिदुग्धजलैः समम् ॥ ६ ॥

हे द्विजा ! जम्बू, प्लक्ष, शाल्मल, कुश, क्रोंच, शाक आणि सातवे पुष्कर हे सर्व द्वीप चारही बाजूंनी खारट पाणी, इक्षुरस, मदिरा, घृत, दधि, दुग्ध आणि गोड्या पाण्याच्या सात समुद्रांनी वेढलेले आहेत .

 



 
जम्बूद्विपः समस्तानामेतेषां मध्यसंस्थितः ।
 तस्यापि मेरुर्मैत्रेय मध्ये कनकपर्वतः ॥ ७ ॥

हे मैत्रेया ! जम्बुद्वीप ह्या सर्वांच्या मध्यावर स्थित आहे आणि त्याच्याही मधोमध सुवर्णमय सुमेरुपर्वत आहे .

 


 
चतुराशीतिसाहस्रो योजनैरस्य चोच्छ्रयः ॥ ८ ॥
 प्रविष्टः षोडशाधस्ताद्‌द्वात्रिंशन्मूर्ध्रि विस्तृत ।
 मूले षोडशसाहस्रो विस्तारस्तस्य सर्वशः ॥ ९ ॥
 भूपद्मस्यास्य शैलोऽसौ कर्णिकाकारसंस्थितः ॥ १० ॥

हा चौर्‍याऐंशी हजार योजने ऊंच आहे आणि खालच्या बाजूने सोळा हजार योजने पृथ्वीत घुसलेला आहे . ह्याचा वरील भागातील विस्तार बत्तीस हजार योजने असून खालील विस्तार सोळा हजार योजने आहे .  अशाप्रकारे हा पर्वत ह्या पृथ्वीरूप कमळाच्या कर्णिका (कोश) समान आहे .

 

 

हिमवान्हेमकूटश्च विषधश्चास्य दक्षिणे ।
नीलः श्वेतश्च शृङ्‍गी च उत्तरे वर्षपर्वताः ॥ ११ ॥

ह्याच्या दक्षिणेला हिमवान, हेमकूट आणि निषध व उत्तरेला नील, श्वेत आणि शृंगी नामक वर्षपर्वत आहेत .

 


 
लक्षप्रमाणो द्वौ मध्यौ दशहीनास्तथापरे ।
 सहस्रद्वितयोच्छ्रायास्तावद्‌विस्तारिणश्च ते ॥ १२ ॥

त्यातील मधले दोन पर्वत [निषध व नील] एक-एक लाख योजनपर्यंत पसरलेले आहेत, त्यांनरचे दुसरे दुसरे पर्वत त्यांच्यापेक्षा दहा दहा हजार योजने कमी आहेत . [अर्थात हेमकूट आणि श्वेत नव्वद हजार योजने आणि हिमवान व शृंगी ऐंशीहजार योजने पसरले आहेत] ते सर्व दोन हजार योजन उंच आणि तितकेच रूंद आहेत.

 



 
भारतं प्रथमं वर्षं ततः किम्पुरुषं स्मृतम् ।
 हरिवर्षं तथैवान्यन्मेरोर्दक्षिणतो द्विज ॥ १३ ॥

रम्यकं चोत्तरं वर्षं तस्यैवानु हिरण्मयम् ।
 उत्तराः कुरवश्चैव यथा वै भारतं तथा ॥ १४ ॥

हे द्विजा ! मेरुपर्वताच्या दक्षिणेला पहिले भारतवर्ष आहे, दुसरे किम्पुरुषवर्ष आणि तीसरे हरिवर्ष आणि उत्तरेला प्रथम रम्यक, मग हिरण्मय आणि त्यानन्तर उत्तरकुरुवर्ष आहे जे भारतवर्षा समान आहे .

 

नवसाहस्रमेकैकमेतेषां द्विजसत्तम ।
 इलावृतं च तन्मध्ये सौवर्णो मेरुरुच्छ्रितः ॥ १५ ॥

हे द्विजश्रेष्ठा ! ह्यांच्यातील प्रत्येकाचा विस्तार नऊ नऊ हजार योजन आहे ह्या सर्वांच्या मध्ये इलावृतवर्ष आहे जिथे सुवर्णमय सुमेरुपर्वत स्थित आहे .

 

 

मेरोश्चतुर्दिशं तत्तु नवसाहस्रविस्तृतम् ।
इलावृतं महाभाग चत्वारश्चात्र पर्वताः ॥ १६ ॥

हे महाभागा ! हे इलावृतवर्ष सुमेरुच्या चारही बाजूला नऊ हजार योजनांपर्यंत पसरलेले आहे.  त्याच्या चार बाजूंना चार पर्वत आहेत .

 


 
विष्कम्भारचिता मेरोर्योजनायुतमुच्छ्रिताः ॥ १७ ॥
 पुर्वेण मन्दरो नाम दक्षिणे गन्धमादनः ।
 विपुलः पश्चिमे पार्श्वे सुपार्श्वश्चोत्तरे स्मृतः ॥ १८ ॥

हे चारही पर्वत जणू सुमेरुला धारण करण्यासाठी ईश्वराने निर्माण केलेले आहेत . ह्यापैकी मन्दराचल पूर्वेला, गन्धमादन दक्षिणेला, विपुल पश्चिमेला आणि सुपार्श्व उत्तरेला आहे . हे सर्व दहा दहा हजार योजने ऊंच आहेत .

 


 
कदम्बस्तेषु जम्बूश्च पिप्पलो वट एव च ।
 एकादशशतायामाः पादपा गिरिकेतवः ॥ १९ ॥

ह्यांच्यावर पर्वतांच्या ध्वजांसारखे क्रमश: अकरा अकराशे योजन ऊंच कदम्ब, जम्बू, पिंपळ आणि वटवृक्ष आहेत .

 



 
जम्बूद्वीपस्य सा जम्बूर्नामहेतुर्महामुने ।
 महागजप्रमामानि जम्ब्वास्तस्याः फलानि वै ।
 पतन्ति भूभृतः पृष्ठे शीर्यमाणानि सर्वतः ॥ २० ॥

हे महामुने ! ह्यापैकी जम्बू (जांभूळ) वृक्षामुळेच जम्बुद्वीप हे नाव पडले आहे . ह्याची फळे महान गजराजासारखी मोठी असतात . जेव्हा ती पर्वतावर पडतात तेव्हा फुटून सगळीकडे पसरतात .

 

 

रसेन तेषां प्रख्याता तत्र जाम्बूनदीति वै ।
सरित्प्रवर्तते चापि पीयते तन्निवासिभिः ॥ २१ ॥

त्यांच्या रसापासून निर्माण झालेली जम्बू नावाची प्रसिद्ध नदी तिथे वाहते, जिचे जल तिथे राहणारे पितात .

 


 
न स्वेदो न च दौर्गन्ध्यं न जरा नेन्द्रियक्षयः ।
 तत्पानात्स्वच्छमनासां जनानां तत्र जायते ॥ २२ ॥

त्या नदीचे जलपान केल्याने तिथल्या शुद्धचित्त लोकांना घाम, दुर्गन्धी, म्हातारपण अथवा इन्द्रियक्षय ह्यांची बाधा होत नाही .

 


 
तीरमृत्तद्‌रसं प्राप्य सुखवायुविशोषिता ।
 जाम्बूनदाख्यं भवति सुवर्णं सिद्धभूषणम् ॥ २३ ॥

तिथल्या किनार्‍यावरील माती त्या रसात मिसळून मंद – मंद वायुमुळे सुकल्याने तिचे जाम्बूनद नामक सुवर्ण बनते जे सिद्ध पुरुषांचे भूषण आहे .

 


 
भद्राश्वं पूर्वतो मेरोः केतुमालं च पश्चिमे ।
 वर्षे द्वे तु मुनिश्रेष्ठ तयोर्मध्यमिलावृतः ॥ २४ ॥

मेरुच्या पूर्वेला भद्राश्ववर्ष आणि पश्चिमेला केतुमालवर्ष आहे तसेच हे मुनिश्रेष्ठा ! ह्या दोन्हींच्या मध्ये इलावृतवर्ष आहे .

 

 


 
वनं चैत्ररथं पूर्वे दक्षिणे गन्धमादनम् ।
 वैभ्राजं पश्चिमे तद्वदुत्तरे नन्दनं स्मृतम् ॥ २५ ॥

अशा प्रकारे त्याच्या पूर्वेला चैत्ररथ, दक्षिणेला गंधमादन, पश्चिमेला वैभ्राज आणि उत्तरेला नंदन नावाचे वन आहे .

 

 

अरुणोदं महाभद्रमसितोदं समानसम् ।                                                                                               सरांस्येतानि चत्वारि देवभोग्यानि सर्वदा ॥ २६ ॥

तसेच ज्यांचे देवतांकडून सर्वदा सेवन केले जाते असे अरुणोद, महाभद्र, असितोद आणि मानस – ही चार सरोवरे आहेत .

 



 
शीताम्भश्च कुमुन्दश्च कुररी माल्यवांस्तथा ।
 वैकङ्‍कप्रमुखा मेरोः पूर्वतः केसराचलाः ॥ २७ ॥

हे मैत्रेया ! शीताम्भ, कुमुन्द, कुररी, माल्यवान आणि वैकंक आदि पर्वत मेरुच्या पूर्व दिशेला असलेले केसराचल आहेत .

 


 
त्रिकूटः शिशिरश्चैव पतङ्‍गो रुचकस्तथा ।
 निषदाद्या दक्षिणतस्तस्य केसरपर्वताः ॥ २८ ॥

त्रिकुट, शिशिर, पतंग, रुचक आणि निषाद आदि केसराचल त्याच्या दक्षिणेला आहेत.

 



शिखिवासाः सवैडूर्यः कपिलो गन्धमादनः ।
जारुधिप्रमुखास्तद्वत्पश्चिमे केसराचलाः ॥ २९ ॥

शिखिवासा, वैडूर्य, कपिल, गन्धमादन आणि जारूधि हे त्याच्या पश्चिमेचे केसरपर्वत आहेत .

 

 

मेरोरनन्तराङ्‍गेषु जठरादिष्ववस्थिताः ।
शंखकूटोऽथ ऋषभो हंसो नागस्तथापरः ।
कालञ्जनाद्याश्च तथा उत्तरे केसराचलाः ॥ ३० ॥

तसेच मेरुच्या अतिशय जवळ असलेल्या इलावृतवर्षात आणि जठरादि देशांमध्ये स्थित शंखकूट, ऋषभ, हँस, नाग तथा कालंज आदि पर्वत उत्तरदिशेचे केसराचल आहेत .

 


चतुर्दशसहस्राणि योजनानां महापुरी ।
मेरोरुपरि मैत्रेय ब्रह्मणः प्रथिता दिवि ॥ ३१ ॥

हे मैत्रेया ! मेरुच्या वर अन्तरिक्षात  चौदा सहस्त्र योजने विस्तार असलेली ब्रह्माची महापुरी (ब्रह्मपुरी) आहे .

 

 


तस्यास्समन्ततश्चाष्टौ दिशासु विदिशासु च ।
इन्द्रादिलोकपालानां प्रख्याताः प्रवराः पुरः ॥ ३२ ॥

तिच्या सर्व बाजूच्या दिशा व उपदिशां मध्ये इन्द्रादि लोकपालांची आठ अति रमणीय आणि विख्यात नगरे आहेत .

 

 


 
विष्णुपादविनिष्क्रान्ता प्लावयित्वेन्दुमण्डलम् ।
 समन्ताद्‍ ब्रह्मणः पुर्यां गङ्‍गा पतति वै दिवः ॥ ३३ ॥

श्रीविष्णूंच्या पायांपासून जिचा उद्भव होतो ती गंगा चन्द्रमंडळाला चारही बाजूंनी आप्लावित करून स्वर्गलोकातून  ब्रह्मपुरीत खाली पडते .

 

 

सा तत्र पतिता दिक्षु चतुर्धा प्रतिपद्यते ।
सीता चालकनन्दा च चक्षुर्भद्रा च वै क्रमात् ॥ ३४ ॥

तिथे पडल्यावर ती चार दिशांना क्रमाने सीता, अलकनंदा, चक्षु आणि भद्रा ह्या नावांनी चार भागात विभक्त होते .

 


 
पूर्वेण शैलात्सीता तु शैलं यात्यन्तरीक्षगा ।
 ततश्च पूर्ववर्षैण भद्राश्वैनैति सार्णवम् ॥ ३५ ॥

त्यातील सीता पूर्वेला आकाशमार्गाने एका पर्वतावरून दुसर्‍या पर्वतावर जाऊन शेवटी पूर्वस्थित भद्राश्ववर्ष पार करून समुद्राला जाऊन मिळते .

 


 
तथैवालकनन्दापि दक्षिणेनैत्य भारतम् ।
 प्रयाति सागरं भूत्वा सप्तभेदा महामुने ॥ ३६ ॥

तसेच, हे महामुने ! अलकनंदा दक्षिणेला भारतवर्षात येते आणि सात भागात विभक्त होऊन समुद्राला जाऊन मिळते .

 


 
चक्षुश्चं पश्चिमगिरीनतीत्य सकलांस्ततः ।
 पश्चिमं केतुमालाख्यं वर्षं गत्वैति सागरम् ॥ ३७ ॥

चक्षु पश्चिमेच्या सर्व पर्वर्तांना पार करून केतुमाल नामक वर्षात वाहते व शेवटी सागरात जाते .

 


 
भद्रा तथोत्तरगिरीनुत्तरांश्च तथा कुरून् ।
 अतीत्योत्तरमम्भोधिं समभ्येति महामुने ॥ ३८ ॥

तसेच हे महामुने ! भद्रा उत्तरेकडील पर्वत व उत्तरकुरुवर्ष पार करूत उत्तरीय समुद्रात विलीन होते .

 

 

आनीलनिषधायामौ माल्यवद्‍गन्धमादनौ ।
तयोर्मध्यगतो मेरुः कर्णिकाकारसंस्थितः ॥ ३९ ॥

माल्यवान आणि गंधमादनपर्वत उत्तरेला तसेच दक्षिणेला नीलाचल आणि निषध पर्वतांपर्यत पसरलेले आहेत . ह्या दोन्हींच्या मध्ये कर्णिकाकार मेरुपर्वत स्थित आहे.



 
भारताः केतुमालाश्च भद्राश्वाः कुरवस्तथा ।
 पत्राणि लोकपद्मस्य मर्यादाशैलबाह्यतः ॥ ४० ॥

हे मैत्रेया ! मर्यादापर्वतांच्या बाह्यभागात स्थित भारत, केतुमाल, भद्राश्व आणि कुरुवर्ष ह्या लोकपद्माच्या पानांसारखे आहेत .

 


 
जठरो देवकूटश्च मर्यादापर्वतावुभौ ।
 तौ दक्षिणोत्तरायामावानीलनिषधायतौ ॥ ४१ ॥

जठर आणि देवकूट हे दोन्ही मर्यादापर्वत आहेत जे उत्तर आणि दक्षिणेला नील तथा निषधपर्वतापर्यंत पसरले आहेत .

 


गन्धमादनकैलासौ पूर्वपश्चायतावुभौ ।
अशीतियोजनायामावर्णवान्तव्यवस्थितौ ॥ ४२ ॥

पूर्व आणि पश्चिमेला पसरलेले गंधमादन आणि कैलास हे दोन पर्वत ज्यांचा विस्तार ऐंशी योजने आहे, समुद्राच्या आत स्थित आहेत .

 

 

निषधः पारियात्रश्च मर्यादापर्वतावुभौ ।
 मेरोः पश्चिमदिग्भागे यथा पूर्वे तथा स्थितौ ॥ ४३ ॥

पूर्वेसारखेच समान मेरुच्या पश्चिमेला सुद्धा निषध आणि पारियात्र नामक दोन मर्यादापर्वत स्थित आहेत .

 


 
त्रिशृङ्‍गो जारुधिश्चैव उत्तरौ वर्षपर्वतौ ।
 पूर्वपश्चायतावेतावर्णवान्तर्व्यवस्थितौ ॥ ४४ ॥

उत्तरेला त्रिश्रुंग आणि जारूधि नामक वर्षपर्वत आहेत . हे दोन्ही पूर्व आणि पश्चिमेला समुद्राच्या गर्भात स्थित आहेत .

 


 
इत्येते मुनिवर्योक्ता मर्यादापर्वतास्तव ।
 जठराद्याः स्थिता मेरोस्तेषां द्वौ द्वौ चतुर्दिशम् ॥ ४५ ॥

इसप्रकार, हे मुनिवरा ! तुला मी जठर आदि मर्यादापर्वतांचे वर्णन सांगितले, ज्यांच्यातील दोन दोन मेरुच्या चारही दिशांना स्थित आहेत .

 


 
मेरोश्चतुर्दिशं येतु प्रोक्ताः केसरपर्वताः ।
 शीतान्ताद्या मुने तेषामतीव हि मनोरमाः ।
 शैलानामन्तरे द्रोण्यः सिद्धचारणसेविताः ॥ ४६ ॥

हे मुने ! मेरुच्या चारही बाजूला स्थित असलेल्या ज्या शीतांत आदि केसर पर्वर्तांविषयी तुला सांगितले होते, त्यांच्या मध्ये सिद्धचारण आदि सेवा करत असलेल्या अति सुंदर कन्दरा आहेत .

 


 
सुरम्याणि तथा तासु काननानि पुराणि च ।
 लक्ष्मीविष्ण्वग्निसूर्यादिदेवानां मुनि सत्तम ।
 तास्वायतनवर्याणि जुष्टानि वरकिन्नरैः ॥ ४७ ॥

हे मुनिसत्तमा ! त्यात सुरम्य नगरे तथा उपवने आहेत आणि लक्ष्मी, विष्णु, अग्नि तसेच सूर्य आदि देवतांची अत्यंत सुंदर मन्दिरे आहेत जिथे सदा किन्नरश्रेष्ठ सेवा करतात .

 


गन्धर्वयक्षरक्षांसि तथा दैतेयदानवाः ।
क्रीडन्ति तासु रम्यासु शैलद्रोणीष्वहर्निसम् ॥ ४८ ॥

त्या सुंदर पर्वत द्रोणींमध्ये गन्धर्व, यक्ष, राक्षस, दैत्य आणि दानवादि अहर्निश क्रीडा करतात .

 


 
भौमा ह्येते स्मृताः स्वर्गा धर्मिणामालया मुने ।
 नैतुषु पापकर्माणो यान्ति जन्मशतैरपि ॥ ४९ ॥

हे मुने ! हे सम्पूर्ण स्थान भौम (पृथ्वी) स्वर्ग म्हणून ओळखले जाते व हे धार्मिक पुरुषांचे निवासस्थान आहे . पापकर्मा पुरुष इथे शंभर जन्म घेतले तरी जाऊ शकत नाही .

 

 


भद्राश्वे भगवान्विष्णुरास्ते हयशिरा द्विज ।
वराजः केतुमाले तु भारते कूर्मरूपधृक् ॥ ५० ॥

हे द्विजा ! श्रीविष्णुभगवान भद्राश्ववर्षात हयग्रीवरूपात, केतुमालवर्षात वराह रूपात आणि भारतवर्षात कूर्मरूपात राहतात .

 


 
मत्स्यरूपश्च गोविन्दः कुरुष्वास्ते जनार्दनः ।
 विश्वरूपेण सर्वत्र सर्वः सर्वत्रगो हरिः ॥ ५१ ॥
 सर्वस्याधारभूतोऽसौ मैत्रेयास्तेऽखिलात्मकः ॥ ५२ ॥

तसेच ते भक्तप्रतिपालक श्रीगोविंद कुरुवर्षात मत्स्यरूपात राहतात.  अशा प्रकारे ते सर्वमय सर्वगामी हरि विश्वरूपात सर्वत्रच राहतात.  हे मैत्रेया ! ते सर्वांचे आधारभूत आणि सर्वात्मक आहेत .

 


 
यानि किम्पुरुषादिनि वर्षाण्यष्टौ महामुने ।
 न तेषु शौको नायासो नोद्वेगः क्षुद्‍भयादिकम् ॥ ५३ ॥

हे महामुने ! किम्पुरुष आदि जी आठ वर्ष आहेत तिथे शोक, श्रम, उव्देग आणि क्षुधा वगैरेंचे भय अजिबात नाही .

 


 
स्वस्थाः प्रजा निरातङ्‍कास्सर्वदुःखविवर्जिताः ।
 दश द्वादशवर्षाणां सहस्राणि स्थिरायुषः ॥ ५४ ॥

तेथील प्रजा स्वस्थ, आतंकहीन आणि समस्त दु:खांपासून रहित आहे तसेच तेथील लोक दहा बारा हजार वर्षांचे स्थिर आयुष्य असणारे आहेत .

 


 
न तेषु वर्षते देवो भौमान्यम्भांसि तेषु वै ।
 कृतत्रेतादिकं नैव तेषु स्थानेषु कल्पना ॥ ५५ ॥

तिथे वर्षा कधीच होत नाही, तिथे केवळ पार्थिव जल आहे आणि तिथे कृतत्रेतादि युगांची कल्पना सुद्धा नाही.

 


सर्वेष्वेतेषु वर्षेषु सप्त सप्त कुलाचलाः ।
नद्यश्च शतशस्तेभ्यः प्रसूता या द्विजोत्तम ॥ ५६ ॥

हे द्विजोत्तमा ! ह्या सर्व वर्षांत सात – सात कुल पर्वत आहेत आणि त्यांच्यापासून शेकडो नद्यांचा उद्गम होतो .

 



 इति श्रिविष्णुमहापुराणे द्वितीये अंशे द्वितीयोऽध्यायः (२)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, तृतीय अंश, त्रयोदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 3 , Adhyay 13

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ तृतीयः अंशः ॥ त्रयोदशोऽध्यायः ॥   आभ्युदयिक श्राद्ध , प्रेतकर्म तथा श्राद्धादि विचार और्व उवाच सचैलस्य पितुः ...