मंगळवार, १३ जानेवारी, २०२६

विष्णुपुराण, प्रथम अंश, सप्तदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 1, Adhyay 17

 

॥ विष्णुपुराणम् ॥

॥ प्रथमः अंशः  ॥ सप्तदशोऽध्यायः ॥

 

"हिरण्यकशिपुचा दिग्विजय आणि प्रल्हाद – चरित्र"

 

श्रीपराशर उवाच -
 
मैत्रेय क्षूयतां सम्यक् चरितं तस्य धीमतः ।
 
प्रह्लादस्य सदोदार चरितस्य महात्मनः ॥ १ ॥

श्रीपराशर म्हणालेहे मैत्रेया ! त्या सर्वदा उदारचरित परमबुद्धिमान महात्मा प्रल्हादाचे चरित्र तु ध्यानपूर्वक श्रवण कर .

 


 
दितेः पुत्रो महावीर्यो हिरण्यकशिपुः पुरा ।
 
त्रैलोक्यं वशमानिन्ये ब्रह्मणो वरदर्पितः ॥ २ ॥

पूर्वकाळी दितिचा पुत्र महाबली हिरण्यकशिपुने,  ब्रह्माच्या वराने गर्वयुक्त (सशक्त) होऊन सम्पूर्ण त्रिलोक्य आपल्या वशीभूत केले होते .

 


 
इन्द्रत्वमकरोद्दैत्यः स चासीत्सविता स्वयम् ।
 
वायुरग्निरपां नाथः सोमश्चाभून्महासुरः ॥ ३ ॥

तो दैत्य इन्द्रपदाचा भोग घेत होता. तो महान असुर स्वयं सूर्य, वायु, अग्नि, वरुण आणि चन्द्रमा बनला होता .

 

 


 
धनानामधिपः सोऽभूत् स एवासीत्स्वयं यमः ।
 
यज्ञभागानशेषांस्तु स स्वयं बुभुजेऽसुरः ॥ ४ ॥

तो स्वयं कुबेर आणि यमराज सुद्धा होता व तो असुर स्वयं सम्पूर्ण यज्ञ-भागांचा भोक्ता होता .

 


 
देवाः स्वर्गं परित्यज्य तत् त्रासान् मुनिसत्तम ।
 
विचेरुरवनौ सर्वे बिभ्राणा मानुषीं तनुम् ॥ ५ ॥

हे मुनिसत्तमा ! त्याच्या भयाने देवगण स्वर्ग सोडून मनुष्य-शरीर धारण करून भूमंडळी विचरण करत असत .

 


 
जित्वा त्रिभुवनं सर्वं त्रैलोक्यैश्वर्यदर्पितः ।
 
उपगीयमानो गन्धर्वैः बुभुजे विषयान्प्रियान् ॥ ६ ॥

अशाप्रकारे सम्पूर्ण त्रिलोक्य जिंकून त्रिभुवनाच्या वैभवाने गर्विष्ठ झाला आणि गन्धर्वांकडून आपली स्तुति ऐकत तो आपले अभीष्ट भोग भोगत होता .



 
पानासक्तं महात्मानं हिरण्यकशिपुं तदा ।
 
उपासान् चक्रिरे सर्वे सिद्धगन्धर्वपन्नगाः ॥ ७ ॥

त्याकाळी त्या मद्यपानासक्त महाकाय हिरण्यकशिपुचीच समस्त सिद्ध, गन्धर्व आणि नाग आदि उपासना करत असत .

 


 
अवादयन् जगुश्चान्ये जयशब्दं तथापरे ।
 
दैत्यराजस्य पुरतश्चक्रुः सिद्धा मुदान्विताः ॥ ८ ॥

त्या दैत्यराजा समोर कोणी सिद्धगण बाजे वाजवून त्याचे यशोगान करत आणि कोणी अति प्रसन्न होऊन जयजयकार करत .

 

 

तत्र प्रनृत्तप्सरसि स्फाटिकाभ्रमयेऽसुरः ।
 
पपौ पानं मुदा युक्तः प्रासादे सुमनोहरे ॥ ९ ॥

तसेच तो असुरराज तिथे स्फटिक व अभ्र शिलेने बनलेल्या मनोहर महालात, जिथे अप्सरांचे उत्तम नृत्य होत असे, प्रसन्नतेने मद्यपान करत असे .

 


 
तस्य पुत्रो महाभागः प्रह्लादो नाम नामतः ।
 
पपाठ बालपाठ्यानि गुरुगेहङ्‍गतोऽर्भकः ॥ १० ॥

त्याचा प्रल्हाद नामक महाभाग्यवान पुत्र होता. तो बालक गुरुकडे जाऊन बालोचित पाठ शिकू लागला .

 


 
एकदा तु स धर्मात्मा जगाम गुरुणा सह ।
 
पानासक्तस्य पुरतः पुतुर्दैत्यपतेस्तदा ॥ ११ ॥

एके दिवशी तो धर्मात्मा बालक गुरूसोबत आपला पिता दैत्यराजाजवळ गेला जो त्यावेळी  मद्यपानात दंग होता .

 


 
पादप्रणामावनतं तमुत्थाप्य पिता सुतम् ।
 
हिरण्यकशिपुः प्राह प्रह्लादममितौजसम् ॥ १२ ॥

तेव्हा, आपल्या चरणांवर वाकलेल्या आपल्या  परम तेजस्वी पुत्र प्रल्हादला ऊठवून पिता हिरण्यकशिपुने म्हटले .




 
हिरण्यकशिपुः उवाच -
 
पठ्यतां भवता वत्स सारभूतं सुभाषितम् ।
 
कालेनैतावता यत्ते सदोद्योक्तेन शिक्षितम् ॥ १३ ॥

हिरण्यकशिपु बोलावत्स ! आजवर अध्ययनात निरंतर तत्पर राहून तु जे काही शिकलास त्याचे सारभूत शुभ भाषण मला ऐकव .



 
प्रह्लाद उवाच -
 
श्रूयतां तात वक्ष्यामि सारभूतं तवाज्ञया ।
 
समाहितमना भूत्वा यन्मे चेतस्यवस्थितम् ॥ १४ ॥

प्रल्हाद म्हणालाबाबा ! माझ्या मनात जे काही सारांशरूपाने स्थित आले ते मी आपल्या आज्ञेनुसार सांगतो, लक्ष देऊन ऐका .

 

 

अनादिमध्यान्तमजमवृद्धिक्षयमच्युतम् ।
 
प्रणतोऽस्म्यन्तमन्तानं सर्वकारणकारणम् ॥ १५ ॥

जो आदि, मध्य आणि अंत रहित, अजन्मा, वृद्धि, क्षय, शून्य आणि अच्युत आहे, समस्त कारणांचे कारण तथा जगताची स्थिति आणि अंतकर्ता आहे त्या श्रीहरिला मी प्रणाम करतो .




 
श्रीपराशर उवाच -
 
एतन्निशम्य दैत्येन्द्रः सकोपो रक्तलोचनः ।
 
विलोक्य तद्‍गुरुं प्राह स्फुरिताधरपल्लवः ॥ १६ ॥

श्रीपराशर म्हणालेहे ऐकून दैत्यराज हिरण्यकशिपुने क्रोधाने लाल झालेल्या डोळ्यांनी प्रल्हादच्या गुरुला पाहून थरथरणार्‍या ओठांनी म्हटले .

 


 
हिरण्यकशिपुरुवाच -
 
ब्रह्मबन्धो किमेतत्ते विपक्षस्तुतिसंहितम् ।
 
असारं ग्राहितो बालो मामवज्ञाय दुर्मते ॥ १७ ॥

हिरण्यकशिपु म्हणाला ;– रे दुर्बुद्धि ब्राह्मणाधमा ! हे काय ? तु माझी अवज्ञा करून ह्या बालकाला माझ्या विपक्षीच्या स्तुतिने युक्त असे शिक्षण दिलेस .




 
गुरुरुवाच -
 
दैत्येश्वर न कोपस्य वशमागन्तुमर्हसि ।
 
ममोपदेशजनितं नायं वदति ते सुतः ॥ १८ ॥

गुरूजी म्हणालेदैत्यराज ! आपण क्रोधित होऊ नये. आपला हा पुत्र मी शिकवलेले नाही सांगत आहे .

 



 
हिरण्यकशिपुरुवाच -
 
अनुशिष्टोसि केनेदृग् वत्स प्रह्लाद कथ्यताम् ।
 
मयोपदिष्टं नेत्येष प्रब्रवीति गुरुस्तव ॥ १९ ॥

हिरण्यकशिपु म्हणालाबेटा प्रल्हाद ! सांग तुला हे कोणी शिकवलं ? तुझे गुरूजी तर म्हणतात कि त्यांनी तुला असा ऊपदेश दिला नाही .



 
प्रह्लाद उवाच -
 
शास्ता विष्णुरशेषस्य जगतो यो हृदि स्थितः ।
 
तमृते परमात्मानं तात कः केन शास्यते ॥ २० ॥

प्रल्हाद म्हणालाबाबा ! ह्रदयात स्थित भगवान विष्णुच सम्पूर्ण जगताचा उपदेशक आहे. त्या परमात्म्याला सोडून आणखी कोण कोणाला काय शिकवू शकतो ?



 
हिरण्यकशिपुः उवाच -
 
कोयं विष्णुः सुदुर्बुद्धे यं ब्रवीषि पुनः पुनः ।
 
जगतामीश्वरस्येह पुरतः प्रसभं मम ॥ २१ ॥

हिरण्यकशिपु म्हणालाअरे मुर्खा ! ज्या विष्णुचे तू माझ्यासारख्या जगदीश्वरासमोर धृष्टतापूर्वक निश्शंक होऊन वारंवार वर्णन करत आहेस तो कोण आहे ?



 
प्रह्लाद उवाच -
 
न शब्दगोचरं यस्य योगिध्येयं परं पदम् ।
 
यतो यश्च स्वयं विश्वं स विष्णुः परमेश्वरः ॥ २२ ॥

प्रल्हाद म्हणालायोगिंनी ध्यान करण्यायोग्य ज्याचे परमपद वाणीचा विषय नाही होऊ शकत तसेच ज्याच्यापासून विश्व प्रकट झाले आहे आणि जो स्वयं विश्वरूप आहे तो परमेश्वरच विष्णु आहे .




 
हिरण्यकशिपुः उवाच -
 
परमेश्वरसंज्ञोऽज्ञ किमन्यो मय्यवस्थिते ।
 
तथापि मर्तुकामस्त्वं प्रब्रवीषि पुनः पुनः ॥ २३ ॥

हिरण्यकशिपु म्हणालाअरे मूढा ! मी असताना आणि कोण परमेश्वर म्हणवला जाऊ शकेल ? तरीही तू मृत्युच्या इच्छेने वारंवार हिच बडबड करत आहेस .



 
प्रह्लाद उवाच -
 
न केवलं तात मम प्रजानां स ब्रह्मभूतो भवतश्च विष्णुः ।
 
धाता विधाता परमेश्वरश्च प्रसीद कोपं कुरुषे किमर्थम् ॥ २४ ॥

प्रल्हाद म्हणालाहे तात ! तो ब्रह्मभूत विष्णु केवळ माझाच नाही , तर सम्पूर्ण प्रजा आणि आपलाही कर्त्ता, नियंता आणि परमेश्वर आहे. आपण प्रसन्न व्हावे, व्यर्थ क्रोध का करता .



 
हिरण्यकशिपुः उवाच -
 
प्रविष्टः कोऽस्य हृदये दुर्बुद्धेरतिपापकृत् ।
 
येनेदृशान्यसाधूनि वदत्याविष्टमानसः ॥ २५ ॥

हिरण्यकशिपु म्हणालाअरे कोण पापी ह्या दुर्बुद्धि बालकाच्या ह्रदयात घुसून बसला आहे ज्यामुळे आविष्टचित्त होऊन हा असे अमंगल वचन बोलत आहे ?

 


 
प्रह्लाद उवाच -
 
न केवलं मद्धृदयं स विष्णुः आक्रम्य ललोकानखिलानवस्थितः ।
 
स मां त्वदान्दीश्च पितःसमस्तान् समस्तचेष्टासु युनक्ति सर्वगः ॥ २६ ॥

प्रल्हाद म्हणालातात ! तो विष्णु माझ्याच ह्रदयात नाही, तर सम्पूर्ण लोकांमध्ये स्थित आहे. तो सर्वगामी तर मला, तुम्हा सर्वांना आणि समस्त प्राण्यांना आपल्या आपल्या प्रयत्नात प्रवृत्त करतो .

 



 
हिरण्यकिशिपुः उवाच -
 
निष्कास्यतामयं पापः शास्यतां च गुरोर्गृहे ।
 
योजितो दुर्मतिः केन विपक्षविषयस्तुतौ ॥ २७ ॥

हिरण्यकशिपु म्हणालाह्या पाप्याला इथून बाहेर काढा आणि गुरुकडे नेऊन त्याला योग्य शासन करा.  ह्या दुर्मतिला कोणी माझ्या विपक्षीच्या प्रशंसेत नियुक्त केले आहे कळत नाही .

 

 

 

श्रीपारशर उवाच -
इत्युक्तोऽसौ तदा दैत्यैः नीतो गुरुगृहं पुनः ।
जग्राह विद्यामनिशं गुरुशुश्रूषणोद्यतः ॥ २८ ॥

श्रीपराशर म्हणालेत्याच्या असे सांगण्यावर दैत्यगण त्या बालकाला परत गुरूजीकडे घेऊन गेले आणि तो गुरूजींची रात्रंदिवस योग्य प्रकारे सेवा-शुश्रूषा करत विद्याध्ययन करू लागला.

 


 
कालोतीतेति महति प्रह्लादमसुरेश्वरः ।
 
समाहूयाब्रवीद्‌गाथा काचित्पुत्रक गीयताम् ॥ २९ ॥

खूप काळ गेल्यावर दैत्यराजाले प्रल्हादला परत बोलावले व म्हटले –बाळा ! आज कोणतीतरी गाथा (कथा) ऐकव' .

 



 
प्रह्लाद उवाच -
 
यतः प्रधानपुरुषौ यतश्चैतच्चराचरम् ।
 
कारणं सकलस्यास्य स नो विष्णुः प्रसीदतु ॥ ३० ॥

प्रल्हाद म्हणालाज्याच्यापासून प्रधान, पुरुष आणि हे चराचर जगत उत्पन्न झाले आहे तो सकल प्रपंचाचे कारण असलेला श्रीविष्णु आमच्यावर प्रसन्न होवो .

 


 
हिरण्यकशिपुः उवाच -
 
दुरात्मा वध्यतामेष नानेनार्थोस्ति जीवता ।
 
स्वपक्षहानिकर्तृत्वात् यः कुलाङ्‍गारतां गतः ॥ ३१ ॥

हिरण्यकशिपु म्हणालाअरे ! हा मोठा दुरात्मा आहे ! ह्याला मारून टाका ! आता हा जगून काहीच फायदा नाही, कारण स्वपक्षाची हानि करणारा असल्याने तो आपल्या कुळासाठी अंगाररूप झाला आहे .

 

 


श्रीपराशर उवाच -
इत्याज्ञप्तास्ततस्तेन प्रगृहीतमहायुधाः ।
उद्यतास्तस्य नाशाय दैत्याः शतसहस्रशः ॥ ३२ ॥

श्रीपराशर म्हणालेत्यांची अशी आज्ञा झाल्यावर शेकड़ो-हजारो दैत्यगण मोठमोठे अस्त्र –शस्त्र घेऊन त्याला मारायला तयार झाले .




 
प्रह्लाद उवाच -
 
विष्णुः शस्त्रेषु युष्मासु मयि चासौ व्यवस्थितः ।
 
दैतेयास्तेन सत्येन माक्रमन्त्वायुधानि मे ॥ ३३ ॥

प्रल्हाद म्हणालाअरे दैत्यांनो ! भगवान विष्णु तर तुमच्या शस्त्रात, तुम्हा लोकांत आणि माझ्यात सर्वत्रच  स्थित आहे. ह्या सत्याच्या प्रभावामुळे ह्या अस्त्र-शस्त्रांचा माझ्यावर कोणताही प्रभाव पडणार नाही .



 
श्रीपराशर उवाच
 
ततस्तैः शतशो दैत्यैः शस्त्रोघैः आहतोऽपि सन् ।
 
नावाच वेदनामल्पामभूच्चैव पुनर्नवः ॥ ३४ ॥

श्रीपराशर म्हणालेतेव्हा त्या शेकड़ो दैत्यांच्या शस्त्र-समूहाचा आघात होऊनही त्याला जराशीही वेदना झाली नाही, तो आधीपेक्षा जास्त बल-सम्पन्न राहिला .




 
हिरण्यकशिपुः उवाच -
 
दुर्बुद्धे विनिवर्तस्व वैरिपक्षस्तवादतः ।
 
अभयं ते प्रयच्छामि मातिमूढमतिर्भव ॥ ३५ ॥

हिरण्यकशिपु म्हणालाअरे दुर्बुद्धि ! आता तू विपक्षाची स्तुति करण सोड, जा, मी तुला अभय-दान देतो, आता आणखी मूढपणा नको करूस .




प्रह्लाद उवाच -
 
भयं भयानामपहारिणि स्थिते मनस्यनन्ते मम कुत्र तिष्ठति ।
 
यस्मिन्स्मृते जन्मजरान्तकादि भयानि सर्वाम्यपयान्ति तात ॥ ३६ ॥

प्रल्हाद म्हणालाहे तात ! ज्याच्या स्मरणमात्रामु जन्म, जरा आणि मृत्यु आदि समस्त भय दूर होतात, त्या सकल-भयहारी अनंताच्या ह्रदयात स्थित राहिल्याने मला कसले भय असु शकते .

 


 
हिरण्यकशिपुः उवाच -
 
भोभोः सर्पाः दुराचारं एनमत्यन्तदुर्मतिम् ।
 
विषज्वालाकुलैः वक्रैः सद्यो नयतः संक्षयम् ॥ ३७ ॥

हिरण्यकशिपु म्हणालाअरे सर्पांनो ! ह्या अत्यंत दुर्बुद्धि आणि दुराचार्‍याला तुमच्या विषाग्नि-संतप्त मुखांनी दंश करून शीघ्र नष्ट करा .




श्रीपराशर उवाच -
 
त्युक्तास्ते ततः सर्पाः कुहकास्तक्षकादयः ।
 
अदशन्त समस्तेषु गात्रेष्वतिविषोल्बणाः ॥ ३८ ॥

श्रीपराशर म्हणालेअशी आज्ञा झाल्यावर अतिक्रूर आणि विषधर तक्षक आदि सर्पांनी त्याच्या समस्त शरीरावर दंश केले .

 

 

स त्वासक्तमतिः कृष्णे दश्यमानो महोरगैः ।
 
न विवेदात्मनो गात्रं तत्स्मृत्याह्लादसुस्थितः ॥ ३९ ॥

पण तो श्रीकृष्णचद्रात आसक्त-चित्त असल्याने व भगवत्स्मरणाच्या परमानंदात मग्न राहिल्याने त्या महासर्पांनी दंश केल्यावरही त्याच्या शरीरावर कोणत्याही  खूणा झाल्या नाहीत .

 


 
सर्पा ऊचुः -
 
दंष्ट्रा विशीर्णा मणयः स्फुटन्ति फणेषु तापो हृदयेषु कम्पः ।            
 
नास्य त्वचः स्वल्पमपीह भिन्नं प्रशाधि दैत्येश्वर कार्यमन्यत् ॥ ४० ॥

सर्प म्हणालेहे दैत्यराजा ! पाहा, आमचे दात तुटले, मणि फुटू लागले, फणांमध्ये वेदना होऊ लागली आणि ह्रदय कापू लागले, पण ह्याच्या त्वचेवर जराही चावल्याचे चिन्ह नाही. म्हणून तुम्ही आता आम्हाला दुसरे कार्य सांगा .

 



 
हिरण्यकशिपुः उवाच -
 
हे दिग्गजाः संकटदन्तमिश्रा घ्नतैनमस्मद् रिपुपक्षभिन्नम् ।           
 
तज्जा विनाशाय भवन्ति तस्य यथारणेः प्रज्वलितो हुताशः ॥ ४१ ॥

हिरण्यकशिपु म्हणालाहे दिग्गजांनो ! तुम्ही सर्व मिळून आपल्या संकीर्ण दातांनी माझ्या शत्रुपक्षाने माझ्या विरुद्ध केलेल्या ह्या बालकाला मारून टाका. जसा अरणीपासून उत्पन्न झालेला अग्नि अरणीलाच जाळतो त्याचप्रकारे काहीजण ज्यापासून उत्पन्न  होतात त्याचाच नाश करतात .




 
श्रीपराशर उवाच -
 
ततः स दिग्गजैः बालो भूभृच्छिखरसन्निभैः ।
 
पातितो धरणीपृष्ठे विषाणैः वावपीडितः ॥ ४२ ॥

श्रीपराशरजी म्हणालेतेव्हा पर्वत-शिखरासमान विशालकाय दिग्गजांनी त्या बालकाला पृथ्वीवर आपटून आपल्या दातांनी खूप तुडवलं .

 


स्मरतस्तस्य गोविन्दमभिदन्ताः सहस्रशः ।
 
शीर्णा वक्षस्थलं प्राप्य स प्राह पितरं ततः ॥ ४३ ॥

पण श्रीगोविंदाचे स्मरण करत राहिल्याने हत्तींचे हजारो दात त्याच्या वक्ष:स्थळावर आदळताच तुटून गेले, तेव्हा त्याने पिता हिरण्यकशिपुला म्हटले .

 


 
दन्ता गजानां कुलिशाग्रनिष्ठुराः शीर्णा यदेतेन बलं ममैतत् ।
 
महाविपत्तापविनाशनोऽयं जनार्दनानुस्मरणानुभावः ॥ ४४ ॥

 हे जे हत्तींचे वज्रा समान कठोर दात तूटले त्यात माझे काहीच बळ नाही, हा तर श्रीजनार्दनभगवंताच्या महाविपत्ति आणि क्लेशांना नष्ट करणार्‍या स्मरणाचाच प्रभाव आहे .



 
हिरण्यकशिपुः उवाच -
 
ज्वाल्यतामसुरा बह्निः अपसर्पत दिग्गजाः ।
 
वायो समेधयाग्निं त्वं दह्यतामेष पापकृत् ॥ ४५ ॥

हिरण्यकशिपु म्हणालाअरे दिग्गजांनो ! तुम्ही बाजूला व्हा. दैत्यगणांनो ! तुम्ही आग लावा, आणि हे वायु ! तु अग्निला प्रज्वलित कर ज्यामुळे ह्या पाप्याला जाळून टाकता येईल  .

 

 

श्रीपराशर उवाच -
 
महाकाष्ठचयस्थं तमसुरेन्द्रसुतं ततः ।
 
प्रज्वाल्य दानवा वह्निं ददहुः स्वामिनोदिताः ॥ ४६ ॥

श्रीपराशरजी म्हणालेतेव्हा अपल्या स्वामीच्या आज्ञेने दानवगण लाकडांच्या मोठा ढीगामध्ये उभे करून  त्या असुर राजकुमाराला अग्नि प्रज्वलित करून जाळू लागले .

 


 
प्रह्लाद उवाच -
 
तातैष वह्निः पवनेरितोऽपि न मां दहत्यत्र समन्ततोऽहम् ।
 
पश्यामि पद्मास्तरणास्तृतानि शीतानि सर्वाणि दिशां मुखानि ॥ ४७ ॥

प्रल्हाद म्हणालाहे तात ! पवनाने प्रेरित करूनही हा अग्नि मला जाळत नाही. मला तर सर्वच दिशा इतक्या शीतल वाटत आहेत जणू चहुबांजूला कमळं पसरवली आहेत .

 



 
श्रीपराशर उवाच -
 
अथ दैत्येश्वरं प्रोचुर्भार्गवस्यात्मजा द्विजाः ।
 
पुरोहिता महात्मानः साम्ना संस्तूय वाग्मिनः ॥ ४८ ॥

श्रीपराशर म्हणालेत्यानन्तर शुक्राचार्यांचे ज्येष्ठ पुत्र  वाग्मी महात्मा पुरोहितगण सामनीतिने दैत्यराजाची बढाई करत म्हणाले .

 

 


 
पुरोहिता ऊचुः -
 
राजन्नियम्यतां कोपो बालेपि तनये निजे ।
 
कोपो देवनिकायेषु तेषु ते शपलो यतः ॥ ४९ ॥

पुरोहित म्हणालेहे राजन ! तुम्ही ह्या बालक पुत्रावरचा आपला क्रोध शांत करा, तुम्हाला तर देवतांवर क्रोध करायला हवा, कारण ह्यात त्यांची सफलता आहे .

 

 

तथातथैनं बालं ते शासितारो वयं नृपः ।
 
यथा विपभनाशाय विनीतस्ते भविष्यति ॥ ५० ॥

हे राजन ! आम्ही आपल्या ह्या बालकाला असे शिक्षण देऊ ज्यामुळे तो विपक्षाच्या नाशाचे कारण होऊन आपल्या प्रति अति विनीत होईल .

 

 

बालत्वं सर्वदोषाणां दैत्यराजास्पदं यतः ।
 
ततोत्र कोपमत्यर्थं योक्तुमर्हसि नार्भके ॥ ५१ ॥

हे दैत्यराजा ! बाल्यावस्था तर सर्व प्रकारच्या दोषांचा आश्रय असते, म्हणून आपण ह्या बालकावर क्रोध प्रयोग करू नये .

 


न त्यक्ष्यति हरेः पक्षमस्माकं वचनाद्यदि ।
 
ततः कृत्यां वधायास्य करिष्यामोऽनिवर्तिनीम् ॥ ५२ ॥

जर आमच्या सांगण्यावरूनही ह्याने विष्णुचा पक्ष सोडला नाही तर आम्ही त्याला नष्ट करण्यासाठी कोणत्याही प्रकारे न टाळता येणारी कृत्या उत्पन्न करू .

 


 
श्रीपराशर उवाच -
 
एवमभ्यर्थितस्तैस्तु दैत्यराजः पुरोहितैः ।
 
दैत्यैः निष्कासयामास पुत्रं पावकसञ्चयात् ॥ ५३ ॥

श्रीपराशर म्हणालेपुरोहितांनी अशाप्रकारे प्रार्थना केल्यावर दैत्यराजाने दैत्यांद्वारा प्रल्हादला अग्निसमूहातून बाहेर काढले .

 

 

ततो गुरुगृहे वालः स वसन्बालदानवान् ।
 
अध्यापयामास मुहुः उपदेशान्तरे गुरोः ॥ ५४ ॥

मग प्रल्हाद, गुरूंकडे राहून त्यांनी शिकवून झाल्यावर  अन्य दानवकुमारांना वारंवार उपदेश देऊ लागला .

 

 

प्रह्लाद उवाच -
श्रूयतां परमार्थो मे दैतेया दितिजात्मजाः ।
न चान्यथैतन्मन्तव्यं नात्र लोभादिकारणम् ॥ ५५ ॥

प्रल्हाद म्हणालाहे दैत्यकुलोत्पन्न असुर-बालकांनो ! ऐका, मी तुम्हाला परमार्थाचा उपदेश करतो, गैरसमज करून घेऊ नका, कारण माझे असे सांगण्यामागे कोणत्याही प्रकारचे लोभादि कारण नाही .



 
जन्म बाल्यं ततः सर्वो जन्तुः प्राप्नोति यौवनम् ।
 
अव्याहतैव भवति ततोऽनुदिवसं जराः ॥ ५६ ॥

सर्व जीव जन्म, बाल्यावस्था आणि मग यौवन प्राप्त करतात, तत्पश्चात दिवसेंदिवस वृद्धावस्थेची प्राप्ति देखिल अनिवार्यच आहे .

 

 

ततश्च सृत्युमभ्येति जन्तुर्दैत्येश्वरात्मजाः ।
 
प्रत्यक्षं दृस्यते चैतद् अस्माकं भवतां तथा ॥ ५७ ॥

आणि हे दैत्यराजकुमारांनो ! मग तो जीव मृत्युमुखी  जातो, हे आम्ही आणि तुम्ही सर्वच प्रत्यक्ष पाहतो .

 


मृतस्य च पुनर्जन्म भवत्येतच्च नान्यथा ।
 
आगमोऽयं तथा यच्च नोपादानं विनोद्‌भवः ॥ ५८ ॥

मृत्युनंतर पुनर्जन्म होतो, हा नियम सुद्धा कधीच टाळता येत नाही. [श्रुति-स्मृतिरूप] आगम सुद्धा ह्या विषयाचे प्रमाण आहे कि उपादाना शिवाय कोणतीच वस्तु उत्पन्न होत नाही .



गर्भवासादि यावत्तु पुनर्जन्मोपपादनम् ।
सह स्तावस्थकं तावद् दुःखमेवावगम्यताम् ॥ ५९ ॥

पुनर्जन्म प्राप्त करण्यासाठि गर्भवास आदि जितक्या अवस्था आहेत त्या सर्वाना दुःखरूपच समजा .

 

 

क्षुत्तृष्णोपशमं तद्वद् शीताद्युपशमं मुखम् ।
 
मन्यते बालबुद्धित्वाद् दुःखमेव हि तत्पुनः ॥ ६० ॥

मनुष्य मुर्खतावश क्षुधा, तृष्णा व शीतादि शान्तिलाच सुख मानतो, पण वास्तवात ते सर्व दुःखमात्रच आहेत .

 

 

अत्यन्तस्तिमिताङ्‍गानां व्यायामेन सुखैषिणाम् ।
 
भ्रान्तिज्ञानावृताक्षाणां दुःखमेव सुखायते ॥ ६१ ॥

ज्यांचे शरीर [वातादि दोषाने] अत्यंत शिथिल होते त्यांना ज्याप्रकारे व्यायाम सुखप्रद वाटतो त्याचप्रकारे ज्यांची दृष्टि भ्रान्तिज्ञानाने झाकलेली असते त्यांना दुःखच सुख वाटते .

 



 
क्व शरीरमशेषाणां श्लेष्मादीनां महाचयः ।
 
क्व कान्तिशोभासौन्दर्य रमणीयादयो गुणाः ॥ ६२ ॥

अहो ! कुठे कफ आदि महाघृणास्पद पदार्थांचे समूहरूप शरीर आणि कुठे कान्ति, शोभा, सौन्दर्य एवं रमणीयता आदि दिव्य गुण ?

 


 
मांसासृक् पूयविण्मूत्र स्नायुमज्जास्थिसंहतौ ।
 
देहे चेत्प्रीतिमान् मूढो भविता नरकेऽप्यसौ ॥ ६३ ॥

जर कोणा मूढ़ पुरुषाचे मांस, रुधिर, पीब, विष्ठा, मूत्र, स्नायु, मज्जा आणि अस्थिंचे समूहरूप असलेल्या ह्या शरीरावर प्रीति जडू शकते तर त्याला नरक सुद्धा प्रिय वाटू शकतो .

 


 
अग्नेः शीतेन तोयस्य तृषा भक्तस्य च क्षुधा ।
 
क्रियते सुखकर्तृत्वं तद्‌विलोमस्य चेतरैः ॥ ६४ ॥

अग्नि, जलाच्या शीतलतेने, व भक्त तृषा व क्षुधेमुळेच सुखकारी होतो आणि त्यांचे प्रतियोगी जल आदि सुद्धा आपल्याहून भिन्न अग्नि मुळेच सुखकारी होतात .

 


 
करोति हे दैत्यसुता यावन्मात्रं परिग्रहम् ।
 
तावन्मात्रं स एवास्य दुःखं चेतसि यच्छति ॥ ६५ ॥

हे दैत्यकुमारांनो ! विषयांचा जितका जास्त संग्रह केला जातो तितकं जास्त ते मनुष्याच्या मनातील दुःख वाढवतात .

 


 
यावतः कुरुते जन्तुः सम्बन्धान्मनसः प्रियान् ।
 
तावन्तोस्य निखन्यन्ते हृदये शोकशङ्‍कवः ॥ ६६ ॥

जीव आपल्या मनाला प्रिय असणारे सम्बन्ध जितके वाढवत जातो तितके त्याच्या ह्रदयात शोकरुपी शल्य स्थिर होत जातात .

 

 

यद्यद्‍गृहे तन्मनसि यत्र तत्रावतिष्ठतः ।
 
नाशदाहोपकरणं तस्य तत्रैव तिष्ठति ॥ ६७ ॥

घरात जे काही धन-धान्यादि असते मनुष्य कुठेही राहिला तरी ते पदार्थ त्याच्या चित्तात घर करून राहतात आणि त्याच्या नाशाची व दाह आदिची सामग्री सुद्धधा त्यातच स्थित असते .

 

 

जन्मन्यत्र महद्‌दुखं म्रियमाणस्य चापि तत् ।
यातनासु यमस्योग्रं गर्भसंक्रमणेषु च ॥ ६८ ॥

अशा प्रकारे जिवंतपणी तर इथे महान दुःख असतच, पण मृत्युनंतरही यम-यातनांचे व गर्भ-प्रवेशाचे उग्र कष्ट भोगावे लागतात  .

 

 


 
गर्भेषु सुखलेशोऽपि भवद्‌भिः अनुमीयते ।
 
यदि तत्कथ्यतामेवं सर्वं दुःखमयं जगत् ॥ ६९ ॥

जर तुम्हाला गर्भवासात लेशमात्र सुखाचा अनुभव होत असेल तर सांगा. पूर्ण संसार असाच अत्यंत दुःखमय आहे .

 

 


 
तदेवमतिदुखानां आस्पदेऽत्र भवार्णेवे ।
 
भवतां कथ्यते सत्यं विष्णुरेकः परायणः ॥ ७० ॥

म्हणून दु:खाचा परम आश्रय असलेल्या ह्या संसार समुद्रात एकमात्र श्रीविष्णुच तुम्हा सर्व लोकांची परमगति आहे – हे मी सर्वथा सत्य सांगत आहे.

 


 
मा जानीत वयं बाला देही देहेषु शाश्वतः ।
 
जरायौवनजन्माद्य धर्मा देहस्य नात्मनः ॥ ७१ ॥

असे समजू नका की मी अजून लहान बालक आहे, कारण जरा, यौवन आणि जन्म आदि अवस्था देहाचेच धर्म आहेत, शरीराचा अधिष्ठाता आत्मा नित्य आहे, त्याच्यात हे कोणतेच धर्म नाहीत .

 


 
बालोऽहं तावदिच्छातो यतिष्ये श्रेयसे युवा ।
 
युवाहं वार्धके प्राप्ते करिष्याम्यात्मनो हितम् ॥ ७२ ॥

वृद्धोऽहं मम कार्याणि समस्तानि न गोचरे ।
 
किं करिष्यामि मन्दात्मा समर्थेन न यत्कृतम् ॥ ७३ ॥

एवं दुराशया क्षिप्तमानसः पुरुषः सदा ।
 
श्रेयसोऽभिमुखं याति न कादाचित्पिपासितः ॥ ७४ ॥

जो मनुष्य अशा दुराशांपासून विक्षिप्तचित्त राहतो किअजून मी बालक आले म्हणून इच्छेनुसार खेळून घेतो, युवावस्था प्राप्त झाल्यावर कल्याण-साधनेचा प्रयत्न करेन ’ ‘अजून मी तरूण आहे, म्हातारपणी आत्मकल्याण करेनआणि 'आता मी म्हातारा झालो, आता माझी इन्द्रिये आपल्या कर्मात प्रवृत्तच नाही होत, शरीर शिथिल झाल्यावर आता मी काय करू शकतो ? सामर्थ्य असताना मी काहीच केले नाही.तो अपने कल्याण-मार्गावर कधीच पुढे जात नाही, फक्त भोग-तृष्णेतच व्याकुळ राहतो .

 

 


 
बाल्ये क्रिडनकासक्ता यौवने विषयोन्मुखाः ।
 
अज्ञा नयन्त्यशक्त्या च वार्धकं समुपस्थितम् ॥ ७५ ॥

मुर्खलोक आपल्या बाल्यावस्थेत खेळत राहतात, युवावस्थेत विषयांमध्ये फसलेले असतात आणि म्हातारपण आल्यावर असमर्थतेमुळे व्यर्थ व्यतित करतात .

 


 
तस्माद्‍बाल्ये विवेकात्मा यतेत श्रेयसे सदा ।
 
बाल्ययौवनवृद्वाद्यैः देहभावैः असंयुतः ॥ ७६ ॥

म्हणून विवेकी पुरुषाने देहाच्या बाल्य, यौवन व वृद्ध आदि अवस्थांची अपेक्षा न करता बाल्यावस्थेतच आपल्या कल्यणाचा प्रयत्न करावा .

 

 


 
तदेतद्वो मयाख्यातं यदि जानीत नानृतम् ।
 
तदस्मत्प्रीतये विष्णुः स्मर्यतां बन्धमुक्तिदः ॥ ७७ ॥

मी तुम्हाला जे काही सांगितले ते जर तुम्ही मिथ्या मानत नसाल तर माझ्या प्रसन्नते साठी तरी बंधनमुक्त करणार्‍या श्रीविष्णुचे स्मरण करा .

 


 
प्रयासः स्मरणे कोऽस्य स्मृतो यच्छति शोभनम् ।
 
पापक्षयश्च भवति स्मरतां तमहर्निशम् ॥ ७८ ॥

त्यांचे स्मरण करण्यात परिश्रम कसले ? व केवळ स्मरणानेच ते अति शुभ फल देतात तसेच रात्रंदिवस त्यांचेच स्मरण करणार्‍यांचे पापही नष्ट होते .

 

 

 

सर्वभूतस्थिते तस्मिन् मतिर्मैत्री दिवानिशम् ।
 
भवतां जायतामेवं सर्वक्लेशान्प्रहास्यथ ॥ ७९ ॥

त्या सर्वभूतस्थ प्रभुत तुमची बुद्धि अहर्निश राहो आणि त्यांच्यात निरंतर तमचे प्रेम वाढो; अशाप्रकाहे तुमचे समस्त क्लेश दूर होतील .

 


 
तापत्रयेणाभिहतं यदेतदखिलं जगत् ।
 
तदा शोच्येषु भूतेषु द्वेषं प्राज्ञः करोति कः ॥ ८० ॥

जेव्हा संपूर्ण संसार तापत्रयाने दग्ध होत आहे तेव्हा ह्या शोचनीय जीवांचा कोण बुद्धिमान द्वेष करेल ?

 


 
अथ भद्राणि भूतानि हीनशक्तिरहं परम् ।
 
मुदं तदापि कुर्वीत हानिर्द्वेषफलं यतः ॥ ८१ ॥

आणिजीव तर आनंदातच आहे , मीच परम शक्तिहीन आहे' असा विचार करत असेल तरीही प्रसन्न राहावे कारण द्वेषाचे दुःखदायीच असते .

 

बद्धवैराणि भूतानि द्वेषं कुर्वन्ति चेत्ततः ।
सुशोच्यान्यतिमोहेन व्याप्तानीति मनीषिणाम् ॥ ८२ ॥

जर कोणी प्राणी वैरभावाने द्वेष करत असेल तर  विचारवंतांसाठी तोअहो ! हा महामोहाने व्याप्त आहेअसा अत्यंत शोचनीय आहे .

 


 
एते भिन्नदृसां दैत्या विकल्पाः कथिता मया ।
 
कृत्वाभ्युपगमं तत्र संक्षेपः श्रूयतां मम ॥ ८३ ॥

हे दैत्यगणांनो ! हे मी भिन्नभिन्न दृष्टिकोन असलेल्यांचे विकल्प सांगितले. आता त्यांचा समन्वयपूर्वक संक्षिप्त विचार ऐका .

 

 

विस्तारः सर्वभूतस्य विष्णोः सर्वमिदं जगत् ।
 
द्रष्टव्यमात्मवत् तस्मात् अभेदेन विचक्षणैः ॥ ८४ ॥

हे सम्पूर्ण जगत सर्वभूतमय भगवान विष्णुचा विस्तार आहे, म्हणून विचक्षण पुरुषांनी ह्याला आत्मा समान अभेदरूपाने पाहिले पाहिजे.

 


 
समुत्सृज्यासुरं भावं तस्माद् यूयं यथा वयम् ।
 
तथा यत्‍नं करिष्यामो यथा प्राप्स्याम निर्वृतिम् ॥ ८५ ॥

म्हणून दैत्यभाव सोडून आपण सर्व असा प्रयत्न करूया ज्याने शान्तिचा लाभ मिळवू शकू .

 


 
या नाग्निना न चार्केण नेन्दुना न च वायुना ।
 
पर्जन्यवरुणाभ्यां वा न सिद्धेर्न च राक्षसैः ॥ ८६ ॥
 
न यक्षैः न च दैत्येन्द्रैः नोरगैः न च किन्नरैः ।
 
न मनुष्यैः न पशुभिः दोषैः नैवात्मसम्भवैः ॥ ८७ ॥
 
ज्वाराक्षिरोगातीसार प्लीहगुल्मादिकैस्तथा ।
 
द्वेषेर्ष्यामत्सराद्यैर्वा रागलोभादिभिः क्षयम् ॥ ८८ ॥
 
न चान्यैः नीयते कैश्चित् नित्या यात्यन्तनिर्मला ।
 
तामाप्नोत्यमलेन्यस्य केशवे हृदयं नरः ॥ ८९ ॥

जो अग्नि, सूर्य, चन्द्रमा, वायु, मेघ, वरुण, सिद्ध, राक्षस, यक्ष, दैत्यराज, सर्प, किन्नर,मनुष्य, पशु व आपल्या दोषांनी तसेच ज्वर, नेत्ररोग, अतिसार, प्लीहा आणि गुल्म आदि रोगांनी व द्वेष, ईर्ष्या, मत्सर, राग, लोभ आणि कोणत्याही अन्य भावाने कधीच क्षीण होत नाही, आणि जो सर्वदा अत्यंत निर्मल आहे तो मनुष्य अमलस्वरूप श्रीकेशवात मनोंनिवेश करण्याने प्राप्त करतो .

 

 


 
असारसंसारविवर्तनेषु मा यात तोषं प्रसभं ब्रवीमि ।
 
सर्वत्र दैत्याःसमतामुपेत समत्वमाराधनमच्युतस्य ॥ ९० ॥

हे दैत्यांनो ! मी आग्रहपूर्वक सांगतो, तुम्ही ह्या असार संसाराच्या विषयांमध्ये कधीच संतुष्ट होऊ नका. तुम्ही सर्वत्र समदृष्टि ठेवा, कारण समता म्हणजेच श्रीअच्युताची आराधना आहे .

 

 

तस्मिन्प्रसन्ने किमिहास्त्यलभ्यं धर्मार्थकामैः अलमल्पकास्ते ।
 
समाश्रिताद्‍ब्रह्मतरोरनन्ता निःसंशयं प्राप्स्यथ वै महत्फलम् ॥ ९१ ॥

त्या अच्युताच्या प्रसन्न झाल्यावर संसारात काय दुर्लभ आहे ? तुम्ही धर्म, अर्थ आणि कामाची कधीच इच्छा करू नका, ते तर अत्यंत तुच्छ आहेत. त्या ब्रह्मरूप महावक्षाचा आश्रय घेतल्याने नि:संदेह [मोक्षरूप] महाफल प्राप्त कराल.

 

 


           "इति श्रीविष्णुपुराणे प्रथमे अंशे सप्तदशोऽध्याय
"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, तृतीय अंश, त्रयोदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 3 , Adhyay 13

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ तृतीयः अंशः ॥ त्रयोदशोऽध्यायः ॥   आभ्युदयिक श्राद्ध , प्रेतकर्म तथा श्राद्धादि विचार और्व उवाच सचैलस्य पितुः ...