सोमवार, ५ जानेवारी, २०२६

विष्णुपुराण, प्रथम अंश, पंचदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 1, Adhyay 15

 

॥ विष्णुपुराणम् ॥

॥ प्रथमः अंशः ॥ पञ्चदशोऽध्यायः ॥

"प्रचेतांच्या मारिषा नामक कन्येचे सात विवाह, दक्ष प्रजापतिची उत्पत्ति एवं दक्षाच्या आठ कन्यांच्या वंशाचे वर्णन"

 


पराशर उवाच
 
तपश्चरत्सु पृथिवीं प्रचेतःसु महीरुहाः ।
 
अरक्ष्यमाणामावव्रुर्बभूवाथ प्रजाक्षयः ॥ १ ॥

पराशर म्हणाले प्रचेता तपस्येत मग्न राहिल्याने [कृषि आदिद्वारा] कशाही प्रकारे रक्षा न झाल्याने पृथ्वीला वृक्षांनी झाकून टाकले आणि खूपशी प्रजा नष्ट झाली .

 


 
नाशकन्मरुतो वातुं वृतं खमभवद्‌द्रुमैः ।
 
दशवर्षसहस्राणि न शेकुश्चेष्टितुं प्रजाः ॥ २ ॥

आकाश वृक्षांनी भरून गेले होते. म्हणून दहा हजार वर्षापर्यंत वायु वाहिला नाही की  प्रजा काही करू शकली नाही .

 


 
तान्दृष्ट्‍वा जलनिष्क्रान्ताः सर्वे क्रुद्धाः प्रचेतसः ।
 
मुखेभ्यो वायुमग्निं च तेऽसृजन् जातमन्यवः ॥ ३ ॥

जलातून बाहेर आल्यावर त्या वृक्षांना पाहून प्रचेतागण अतिशय क्रोधित झाले आणि त्यांनी रागाने आपल्या मुखातून वायु आणि अग्नि सोडला .

 

 

उन्मूलानथ तान्वृक्षान्कृत्वा वायुरशोषयत् ।
 
तानग्निरदहद्‌घोरस्तत्राभूद्‌द्रुमसङ्‍क्षयः ॥ ४ ॥

वायुने वृक्षांना उपटून उपटून सुकवले व प्रचंड अग्निने त्यांना जाळून टाकले. अशाप्रकारे त्यावेळी तिथे वृक्षांचा नाश होऊ लागला .



 
द्रुमक्षयमथो दृष्ट्‍वा किञ्चिच्छिष्टेषु शाखिषु ।
 
उपगम्याब्रवीदेतान् राजा सोमः प्रजापतीन् ॥ ५ ॥

तेव्हा तो भयंकर वृक्ष प्रलय पाहून थोडेच वृक्ष राहिले असता त्यांचा राजा सोम प्रजापति प्रचेतांजवळ जाऊन म्हणाला .

 


कोपं यच्छत राजानः शृणुध्वं च वचो मम ।
 
संधानं वः करिष्यामि सह क्षितिरुहैरहम् ॥ ६ ॥

हे नृपतिगणा ! आपण क्रोध शांत करावा आणि मी जे सांगतो ते ऐकावे. मी वृक्षांसोबत तुमची संधि करून देतो .

 


 
रत्नभूता च कन्येयं वार्क्षेयी वरवर्णिनी ।
 
भविष्यं जानता पूर्वं मया गोभिर्विवर्धिता ॥ ७ ॥

वृक्षांपासून उत्पन्न झालेली सुंदर वरवर्णिनी रत्नस्वरूपा कन्येचे मी आधीपासून भविष्य  जाणून आपल्या [अमृतमय] किरणांनी पालन-पोषण केले आहे .

 


 
मारिषा नाम नाम्नैषा वृक्षाणामिति निर्मिता ।
 
भार्या वोऽस्तु महाभागा ध्रुवं वंशविवर्धिनी ॥ ८ ॥

वृक्षांची ही कन्या मारिषा नावाने प्रसिद्ध आहे, ती महाभागा निश्चितपणे ह्यासाठीच उत्पन्न केली गेली आहे की तुमच्या वंशाची वृद्धि करणारी तुमची भार्या व्हावी .

 


 
युष्माकं तेजसोऽर्धेन मम चार्धेन तेजसः ।
 
अस्यामुत्पत्स्यते विद्वान्दक्षो नाम प्रजापतिः ॥ ९ ॥

माझ्या व तुमच्या अर्ध्या अर्ध्या तेजाने हिच्यापासून परम विद्वान दक्ष नामक प्रजापति उत्पन्न होईल .

 


 
मम चांशेन संयुक्तो युष्मत्तेजोमयेन वै ।
 
तेजसाग्निसमो भूयः प्रजाः संवर्धयिष्यति ॥ १० ॥

तो तुमच्या तेजासोबत माझ्या अंशाने युक्त होऊन आपल्या तेजामुळे अग्नि समान होईल व प्रजेची खूप वृद्धि करेल .




 
कण्डुर्नाम मुनिः पूर्वमासीद्‌वेदविदां वरः ।
 
सुरम्ये गोमतीतीरे स तेपे परमं तपः ॥ ११ ॥

पूर्वकाळी वेदवेत्त्यांमध्ये एक कंडू नामक श्रेष्ठ मुनीश्वर होते. त्यांनी गोमती नदीच्या परम रमणीय तटावर घोर तप केले .

 


तत्क्षोभाय सुरेन्द्रेण प्रम्लोचाख्या वराप्सराः ।
 
प्रयुक्ता क्षोभयामास तमृषिं सा शुचिस्मिता ॥ १२ ॥

तेव्हा इंद्राने त्यांना तपोभ्रष्ट करण्यासाठी प्रम्लोचा नामकी उत्तम अप्सरेला नियुक्त केले. त्या मंजुहासिनीने त्या ऋषिश्रेष्ठाला विचलित केले .

 


 
क्षोभितः स तया सार्द्धं वर्षाणामधिकं शतम् ।
 
अतिष्ठन्मन्दरद्रोण्यां विषयासक्तमानसः ॥ १३ ॥

तिच्या द्वारा क्षुब्ध होऊन ते शंभराहून अधिक वर्षपर्यंत विषयासक्त-चित्ताने मन्दराचलाच्या  गुहेमध्ये राहिले .



 
तं सा प्राह महाभाग गन्तुमिच्छाम्यहं दिवम् ।
 
प्रसादसुमुखो ब्रह्मन्ननुज्ञां दातुमर्हसि ॥ १४ ॥

तेव्हा, हे महाभागा ! एक दिवस त्या अप्सरेने कंडू ऋषिंना म्हटले –हे ब्रह्मन ! आता मी स्वर्गलोकी जाऊ इच्छिते, आपण प्रसन्नतापूर्वक मला आज्ञा द्यावी' .

 


 
तयैवमुक्तः स मुनिस्तस्यामासक्तमानसः ।
 
दिनानि कतिचिद्‌भद्रे स्थीयतामित्यभाषत ॥ १५ ॥

तिच्या असे म्हणण्यावर तिच्यात आसक्त चित्त असलेल्या मुनिने म्हटले –भद्रे ! अजून काही  दिवस राहा’ .

 


 
एवमुक्ता ततस्तेन साग्रं वर्षशतं पुनः ।
 
बुभुजे विषयांस्तन्वी तेन सार्द्धं महात्मना ॥ १६ ॥

त्यांनी असे म्हटल्यावर त्या सुन्दरीने महात्मा कंडूसोबत आणखी शंभर वर्ष राहून नाना प्रकारचे भोग भोगले .

 

 

अनुज्ञां देहि भगवन् व्रजामि त्रिदशालयम् ।
उक्तस्तथेति स मुनिः स्थीयतामित्यभाषत ॥ १७ ॥

त्यानंतरही, तिच्या विचारण्यावर कीहे भगवन ! मला स्वर्गलोकी जायची आज्ञा द्यावी' ऋषीने हेच म्हटले 'आणखी थोडे राहा' .

 


 
पुनर्गते वर्षशते साधिके सा शुभानना ।
 
यामीत्याह दिवं ब्रह्मन्प्रणयस्मितशोभनम् ॥ १८ ॥

त्यानंतर शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ निघून गेल्यावर त्या सुमुखीने प्रणययुक्त स्मित करून सुशोभित वचनांनी परत म्हटले –ब्रह्मन ! आता मी स्वर्गात जात आहे' .

 


 
उक्तस्तयैवं स मुनिरुपगुह्यायतेक्षणाम् ।
 
प्राहास्यतां क्षणं सुभ्रु चिरकालं गमिष्यसि ॥ १९ ॥

हे ऐकून मुनिने त्या विशालाक्षीला आलिंगन देऊन म्हटले –अगे सुश्रु ! आता तर तू खूप दिवसांसाठी निघून जाशील क्षणभर तरी आणखी थांब' .

 


 
सा क्रीडमाना सुश्रोणी सह तेनर्षिणा पुनः ।
 
शतद्वयं किञ्चिदूनं वर्षाणामन्वतिष्ठत ॥ २० ॥

तेव्हा ती सुश्रोणी (सुंदर कंबर असलेली) त्या ऋषिसोबत क्रीडा करत दोनशे वर्षांपेक्षा थोडा कमी काळ राहिली .


 

गमनाय महाभागो देवराजनिवेशनम् ।
 
प्रक्तः प्रोक्तस्तया तन्व्या स्थीयतामित्यभाषत ॥ २१ ॥

हे महाभागा ! अशाप्रकारे जेव्हा जेव्हा ती सुन्दरी देवलोकी जायचे बोलत असे तेव्हा तेव्हा कंडू ऋषि तिला हेच म्हणत कीअजून थोडे थांब' .

 


 
तस्य शापभयाद्‌भीता दाक्षिण्येन च दक्षिणा ।
 
प्रोक्ता प्रणयभङ्‌गार्तिवेदिनी न जहौ मुनिम् ॥ २२ ॥

मुनिंच्या अशाप्रकारे सांगण्याने, प्रणयभंगची पीड़ा जाणणार्‍या त्या दक्षिणेने आपल्या दाक्षिण्यामुळे आणि मुनिंच्या शापाने भयभीत होऊन त्यांना सोडले नाही .

 


 
तया च रमतस्तस्य परमर्षेरहर्निशम् ।
 
नवं नवमभूत्प्रेम मन्मथाविष्टचेतसः ॥ २३ ॥

तसेच त्या महर्षि महोदयांचेही, कामासक्त चित्ताने तिच्यासोबत अहर्निश रमण करता करता तिच्यावरील नित्य नूतन प्रेम वाढत गेले  .

 


 
एकदा तु त्वरायुक्तो निश्चक्रामोटजान्मुनिः ।
 
निष्क्रामन्तं च कुत्रेति गम्यते प्राह सा शुभा ॥ २४ ॥

एके दिवशी ते मुनिवर अतिशय वेगाने आपल्या  कुटीतून निघाले. ते निघताच ती सुंदरी म्हणाली, ‘आपण कुठे जात आहात' .

 


 
इत्युक्तः स तया प्राह परिवृत्तमहः शुभे ।
 
संध्योपास्तिं करिष्यामि क्रियालोपोऽन्यथा भवेत् ॥ २५ ॥

तिने असे विचारल्यावर मुनिने म्हटले –हे शुभे ! दिवसा अस्त झाला आहे, म्हणून मी संध्योपासना करणार, नाहीतर नित्य-क्रिया नष्ट होईल' .

 


ततः प्रहस्य मुदिता तं सा प्राह महामुनिम् ।
किमद्य सर्वधर्मज्ञ परिवृत्तमहस्तव ॥ २६ ॥

तेव्हा त्या सुंदर दंतपंक्ति असलेलीने त्या मुनीश्वरांना हसून म्हटले, ‘हे सर्वधर्मज्ञ ! आजच तुमचा दिवस अस्त झाला का ?

 

 

बहूनां विप्र वर्षाणां परिणाममहस्तव ।
गतमेतन्न कुरुते विस्मयं कस्य कथ्यताम् ॥ २७ ॥

हे विप्रा ! अनेक वर्षानंतर आज आपला दिवस अस्त झाला आहे, हे ऐकून कोणाला आश्चर्य नाही वाटणार ?

 


 
मुनिरुवाच
 
प्रातस्त्वमागता भद्रे नदीतीरमिदं शुभम् ।
 
मया दृष्टा च तन्वङ्‌गि प्रविष्टा च ममाश्रमम् ॥ २८ ॥

मुनि म्हणालेभद्रे ! नदीच्या ह्या सुंदर तटावर तू आज पहाटेच तर आली आहेस. मी आजच तुला आपल्या आश्रमात प्रवेश करताना पाहिले होते .

 


 
इयं च वर्तते संध्या परिणाममहर्गतम् ।
 
उपहासः किमर्थोऽयं सद्‌भावः कथ्यतां मम ॥ २९ ॥

आता दिवस समाप्त झाल्याने संध्याकाळ झाली आहे. मग खरं सांग असा उपहास का करते आहेस ?



 
प्रम्लोचोवाच
 
प्रत्यूषस्यागता ब्रह्मन् सत्यमेतन्न तन्मृषा ।
 
किन्त्वस्य तस्य कालस्य गतान्यब्दशतानि ते ॥ ३० ॥

प्रम्लोचा म्हणाली ;– ब्रह्मन ! तुमचे हे कथन कितु पहाटेच आली आहेस' बरोबरच आहे त्यात काही खोटे नाही, पण त्या गोष्टीला आज शेकडो वर्ष होऊन गेली .

 


 
सोम उवाच
 
ततस्ससाध्वसो विप्रस्तां पप्रच्छायतेक्षणाम् ।
 
कथ्यतां भीरु कः कालस्त्वया मे रमतः सह ॥ ३१ ॥

सोम म्हणाला ;– तेव्हा त्या विप्रवराने त्या विशालाक्षीला घाबरून विचारले –अगं भीरु ! नीट सांग, तुझ्या सोबत रमण करून माझा किती काळ गेला आहे ? .



 
प्रम्लोचोवाच
 
सप्तोत्तराण्यतीतानि नव वर्षशतानि ते ।
 
मासाश्च षट्तथैवान्यत्समतीतं दिनत्रयम् ॥ ३२ ॥

प्रम्लोचा म्हणालीआतापर्यंत नऊशे सात वर्ष, सहा महिने आणि आणखी तीन दिवस झाले आहेत .

 



 
ऋषिरुवाच
 
सत्यं भीरु वदस्येतत् परिहासोऽथ वा शुभे ।
 
दिनमेकमहं मन्ये त्वया सार्धमिहासितम् ॥ ३३ ॥

ऋषि म्हणालेअगं भीरु ! हे तू बरोबर सांगत आहेस, कि हे शुभे ! माझी मस्करी करते आहेस ? मला तर असेच वाटते आहे कि मी ह्या स्थानावर तुझ्यासोबत केवळ एकच दिवस राहिलो आहे .



 प्रम्लोचोवाच
 
वदिष्याम्यनृतं ब्रह्मन् कथमत्र तवान्तिके ।
 
विशेषेणाद्य भवता पृष्टा मार्गानुवर्तिना ॥ ३४ ॥

प्रम्लोचा म्हणाली ;– हे ब्रह्मन ! आपल्या जवळ मी खोटे कसे बोलू शकेन ? आणि तेहि विशेष करून अशावेळी जेव्हा आज आपण आपल्या धर्म-मार्गाचे अनुसरण करण्यास तत्पर होऊन मला विचारत आहात .




 
सोम उवाच
 
निशम्य तद्‌वचः तस्याः स मुनिर्नृपनन्दनाः ।
 
धिग्‌धिङ्‌ मामित्यतीवेत्थं निनिन्दात्मानमात्मना ॥ ३५ ॥

सोम म्हणाला ;– हे राजकुमारांनो ! तिचे हे सत्य वचन ऐकून मुनिने 'माझा धिक्कार असो ! माझा धिक्कार असो !' असे म्हणून स्वतःच स्वतःची खूप निंदा केली .

 


 
मुनिरुवाच
 
तपांसि मम नष्टानि हतं ब्रह्मविदां धनम् ।
 
हृतो विवेकः केनापि योषिन्मोहाय निर्मिता ॥ ३६ ॥

मुनि म्हणालेओह ! माझे तप नष्ट झाले, ब्रह्मवेत्त्यांचे जे धन होते ते लुटले गेले आणि विवेकबुद्धि भ्रष्ट झाली. अहो! स्त्रीला कोणीतरी मोह उत्पन्न करण्यासाठीच रचले आहे.

 

 

ऊर्मिषट्कातिगं ब्रह्म ज्ञेयमात्मजयेन मे ।
 
मतिरेषा हृता येन धिक् तं कामं महाग्रहम् ॥ ३७ ॥

मला माझ्या मनाला जिंकून सहा ऊर्मिंच्या [क्षुधा, पिपासा, लोभ, मोह, जरा आणि मृत्यु] पलिकडे असलेले परब्रह्म जाणून घ्यायला हवे – जिने माझी अशाप्रकारे बुद्धि नष्ट केली, त्या कामरूपी महाग्रहाचा धिक्कार आहे .

 


 
व्रतानि वेदवेद्याप्तिकारणान्यखिलानि च ।
 
नरकग्राममार्गेण सङ्‌गेनापहृतानि मे ॥ ३८ ॥

नरकग्रामाच्या मार्गाचे रूप असलेल्या ह्या स्त्रीच्या संगामुळे  वेदवेद्य भगवंताच्या प्राप्तिसाठी केलेले माझे समस्त व्रत नष्ट झाले .

 



 
विनिन्द्येत्थं स धर्मज्ञः स्वयमात्मानमात्मना ।
 
तामप्सरसमासीनामिदं वचनमब्रवीत् ॥ ३९ ॥

अशाप्रकारे त्या धर्मज्ञ मुनिने स्वतःच स्वतःची निंदा करत तिथेच बसलेल्या त्या अप्सरेला म्हटले .

 

 

गच्छ पापे यथाकामं यत्कार्यं तत्कृतं त्वया ।
 
देवराजस्य मत्क्षोभं कुर्वन्त्या भावचेष्टितैः ॥ ४० ॥

अगं पापिणी ! आता तुझी जिथे इच्छा असेल तिथे जा, तू अपल्या प्रयत्नांनी मला मोहित करून इंद्राचे कार्य पूर्ण केले आहेस .

 


 
न त्वां करोम्यहं भस्म क्रोधतीव्रेण वह्निना ।
 
सतां सप्तपदं मैत्रमुषितोऽहं त्वया सह ॥ ४१ ॥

मी माझ्या क्रोधाने प्रज्वलित झालेल्या अग्निद्वारा तुझे भस्म नाही करणार, कारण सात पावले एकत्र राहिल्याने सज्जनांशी मित्रता होते आणि मी तर तुझ्या सोबत निवास केला आहे .

 


 
अथ वा तव को दोषः किं वा कुप्याम्यहं तव ।
 
ममैव दोषो नितरां येनाहमजितेन्द्रियः ॥ ४२ ॥

किंवा ह्यात तुझा तरी काय दोष, की मी तुझ्यावर क्रोध करू ? दोष सगळा माझाच आहे, कारण मीच अजितेन्द्रिय आहे .

 

 

यया शक्रप्रियार्थिन्या कृतो मे तपसो व्ययः ।
 
त्वया धिक्‌तां महामोहमञ्जूषां सुजुगुप्सिताम् ॥ ४३ ॥

तू महामोहाचा पेटारा व अत्यंत निंदनिया आहेस. हाय ! तू इंद्राच्या स्वार्थासाठी माझी तपस्या नष्ट केलीस !! तुझा धिक्कार आहे !!



 
सोम उवाच
 
यावदित्थं स विप्रर्षिस्तां ब्रवीति सुमध्यमाम् ।
 
तावद्‌गलत्स्वेदजला सा बभूवातिवेपथुः ॥ ४४ ॥

सोमाने म्हटलेते ब्रह्मर्षि त्या सुन्दरीला जोपर्यंत असे म्हणत राहिले तोपर्यंत ती [भीतीने] घामाघूम होऊन थरथर कापत होती .

 


 
प्रवेपमानां सततं खिन्नगात्रलतां सतीम् ।
 
गच्छ गच्छेति सक्रोधमुवाच मुनिसत्तमः ॥ ४५ ॥

अशाप्रकारे जिचे पूर्ण शरीर घामाने भीजले होते आणि जी भीतीने थर-थर कापत होती त्या प्रम्लोचेला मुनिश्रेष्ठ कंडूने क्रोधाने म्हटले –अगं ! तू चालती हो ! चालती हो !

 


 
सा तु निर्भर्त्सिता तेन विनिष्क्रम्य तदाश्रमात् ।
 
आकाशगामिनी स्वेदं ममार्ज तरुपल्लवैः ॥ ४६ ॥

तेव्हा वारंवार फटकारल्यावर तिने त्या आश्रमातून निघून आकाश-मार्गाने जाताना आपला घाम वृक्षांच्या पानांना पुसला .

 

 

निर्मार्जमाना गात्राणि गलत्स्वेदजलानि वै ।
 
वृक्षाद्‌वृक्षं ययौ बाला तदग्रारुणपल्लवैः ॥ ४७ ॥

ती बाला वृक्षांच्या नवीन लाल-लाल पानांनी आपले घामाने भरलेले शरीर पुसत एका वृक्षावरून दूसर्‍या वृक्षावर गेली .

 


 
ऋषिणा यस्तदा गर्भस्तस्या देहे समाहितः ।
 
निर्जगाम सरोमाञ्चस्वेदरूपी तदङ्‌गतः ॥ ४८ ॥

त्यावेळी ऋषींनी तिच्या शरीरात जो गर्भ स्थापित केला होता तो सुद्धा रोमांचातून बाहेर आला आणि घामाच्या रूपात तिच्या शरीरातून बाहेर आला .

 


 
तं वृक्षा जगृहुर्गर्भमेकं चक्रे तु मारुतः ।
 
मया चाप्यायितो गोभिः स तदा ववृधे शनैः ॥ ४९ ॥

त्या गर्भाला त्या वृक्षांनी ग्रहण केले, त्याला वायुने एकत्रित केले आणि मी त्याचे आपल्या किरणांनी  पोषण करू लागलो. त्यामुळे तो हळुहळु वाढला .

 

 

वृक्षाग्रगर्भसम्भूता मारिषाख्या वरानना ।
तां प्रदास्यन्ति वो वृक्षाः कोप एष प्रशाम्यताम् ॥ ५० ॥

वृक्षाग्रापासून उत्पन्न झालेली ती मारिषा नामकी सुमुखी कन्या तुम्हाला वृक्षगण समर्पण करतील. म्हणून आता हा क्रोध शांत करा .

 


 
कण्डोरपत्यमेवं सा वृक्षेभ्यश्च समुद्‌गता ।
 
ममापत्यं तथा वायोः प्रम्लोचातनया च सा ॥ ५१ ॥

अशाप्रकारे वृक्षांपासून उत्पन्न झालेली ती कन्या प्रम्लोचा अप्सरेची आणि कंडू मुनिंची कन्या आहे, तसेच  माझी आणि वायुची सुद्धा संतति आहे .

 


 
श्रीपराशर उवाच
 
स चापि भगवान् कण्डुः क्षीणे तपसि सत्तमाः ।
 
पुरुषोत्तमाख्यं मैत्रेय विष्णोरायतनं ययौ ॥ ५२ ॥

तत्रैकाग्रमतिर्भूत्वा चकाराराधनं हरेः ।
 
ब्रह्मपारमयं कुर्वञ्जपमेकाग्रमानसः ।
 
ऊर्ध्वबाहुर्महायोगी स्थित्वासौ भूपनन्दनाः ॥ ५३ ॥

पराशर म्हणालेहे मैत्रेया ! साधुश्रेष्ठ भगवान कंडू देखिल त्यांचे तप क्षीण झाल्याने पुरुषोत्तमक्षेत्र नामक भगवान विष्णुंच्या निवास-भूमिला गेले आणि हे राजपुत्रांनो ! तिथे ते महायोगी एकनिष्ठ होऊन एकाग्र चित्ताने ब्रह्मपार मन्त्राचा जप करत ऊर्ध्वबाहू राहून श्रीविष्णुभगवानांची आराधना करू लागले .

 



 
प्रचेतस ऊचुः
 
ब्रह्मपारं मुनेः श्रोतुमिच्छामः परमं स्तवम् ।
 
जपता कण्डुना देवो येनाराध्यत केशवः ॥ ५४ ॥

प्रचेतागण म्हणालेआम्ही कंडू मुनिंचे ब्रह्मपार नामक परमस्तोत्र ऐकू इच्छितो, ज्याचा जप करत त्यांनी श्रीकेशवाची आराधना केली होती .

 


सोम उवाच
पारं परं विष्णुरपारपारः परः परेभ्यः परमार्थरूपी ।
स ब्रह्मपारः परपारभूतः परः पराणामपि पारपारः ॥ ५५ ॥

सोमाने म्हटले – [हे राजकुमारांनो ! तो मन्त्र अशाप्रकारे आहे] –श्रीविष्णुभगवान संसार-मार्गाचे अंतिम अवधि आहेत, त्यांचा पार मिळणे कठिण आहे, ते पराहूनही (आकाशादि) पर अर्थात अनंत आहेत,  म्हणून सत्यस्वरूप आहेत. तपोनिष्ठ महात्म्यांनाच ते प्राप्त होऊ शकतात, कारण ते पराहून (अनात्म-प्रपंच) पर तसेच पराचेही (इन्द्रिय) अगोचर परमात्मा आहेत आणि (भक्तांचे) पालक तसेच [त्यांचे अभीष्ट] पूर्ण करणारे आहेत .

 

 


 
स कारणं कारणतस्ततोऽपि तस्यापि हेतुः परहेतुहेतुः ।
 
कार्येषु चैवं सह कर्मकर्तृ- रूपैरशेषैरवतीह सर्वम् ॥ ५६ ॥

ते कारणाच्या (पंचभूत) कारणाचे (पंचतन्मात्रा) हेतु (तामस-अहंकार) आणि त्यांच्याही हेतुच्या (महत्तत्त्व) हेतुचे सुद्धा (प्रधान) परम हेतु आहेत व अशाप्रकारे समस्त कर्म आणि कर्त्ता आदि सहित कार्यरूपाने स्थित सकल प्रपंचाचे पालन करतात .

 


 
ब्रह्म प्रभुर्ब्रह्म स सर्वभूतो ब्रह्म प्रजानां पतिरच्युतोऽसौ ।
 
ब्रह्माव्ययं नित्यमजं स विष्णु- रपक्षयाद्यैरखिलैरसङ्‌गि .

ब्रह्मच प्रभु आहे, ब्रह्मच सर्वजीवरूप आहे आणि ब्रह्मच सकल प्रजेचे पति (रक्षक) तथा अविनाशी आहे. ते ब्रह्म अव्यय, नित्य आणि अजन्मा आहे तसेच तेच क्षय आदि समस्त विकारांनी शून्य विष्णु आहे  .

 


 
ब्रह्माक्षरमजं नित्यं यथासौ पुरुषोत्तमः ।
 
तथा रागादयो दोषाः प्रयान्तु प्रशमं मम ॥ ५८ ॥

कारण तो अक्षर, अज आणि नित्य ब्रह्मच पुरुषोत्तम भगवान विष्णु आहे, म्हणून माझे राग आदि दोष शांत होवोत .




 
एतद्‌ब्रह्मपराख्यं वै संस्तवं परमं जपन् ।
 
अवाप परमां सिद्धिं स समाराध्य केशवम् ॥ ५९ ॥

ह्या ब्रह्मपार नामक परम स्तोत्राचा जप करत श्रीकेशवाची आराधना केल्याने त्या मुनीश्वरांनी  परमसिद्धि प्राप्त केली .

 


 [
इमं स्तवं यः पठति शृणुयाद्‌वापि नित्यशः ।
 
स कामदोषैरखिलैर्मुक्तः प्राप्त्नोति वाञ्छितम् ॥]
 
इयं च मारिषा पूर्वमासीद्‌या तां ब्रवीमि वः ।
 
कार्यगौरवमेतस्याः कथने फलदायि वः ॥ ६० ॥

[ जो पुरुष हे स्तवन नित्यप्रति वाचतो किंवा ऐकतोतो काम आदि सकल दोषांपासून मुक्त होऊन आपले मनोवांछित फळ प्राप्त करतो] आता मी हे सांगतो कि ही मारिषा पूर्वजन्मी  कोण होती. हे सांगितल्याने तुमचे कार्य सफल होईल. अर्थात तुम्ही प्रजावृद्धिरूप फळ प्राप्त करू शकाल .

 

 

अपुत्रा प्रागियं विष्णुं मृते भर्तरि सत्तमाः ।
भूपपत्नी महाभागा तोषयामास भक्तितः ॥ ६१ ॥

ही साध्वी आपल्या पूर्वजन्मी एक महाराणी होती. पुत्रहीन अवस्थेतच पतिच्या मृत्युमुळे ह्या महाभागेने आपल्या भक्तिभावाने विष्णुला संतुष्ट केले .

 


 
आराधितस्तया विष्णुः प्राह प्रत्यक्षतां गतः ।
 
वरं वृणीष्वेति शुभे सा च प्राहात्मवाञ्छितम् ॥ ६२ ॥

हिच्या आराधनेने प्रसन्न होऊन विष्णु ने प्रकट होऊन म्हटले –हे शुभे ! वर माग !तेव्हा हिने आपली मनोभिलाषा अशाप्रकारे सांगितली .

 


 
भगवन् बालवैधव्याद्‌ वृथाजन्माहमीदृशी ।
 
मन्दभाग्या समुद्‌भूता विफला च जगत्पते ॥ ६३ ॥

भगवंता ! बाल-विधवा झाल्याने माझा जन्म व्यर्थ झाला. हे जगत्पते ! मी अशी अभागिनी आहे कि फलहीन (पुत्रहीन) उत्पन्न झाली .

 


 
भवन्तु पतयः श्लाघ्या मम जन्मनि जन्मनि ।
 
त्वत्प्रसादात्तथा पुत्रः प्रजापतिसमोऽस्तु मे ॥ ६४ ॥

म्हणून आपल्या कृपेने जन्मो-जन्मी माझे मोठे प्रशंसनीय पति असोत आणि मला प्रजापति (ब्रह्माजी) समान पुत्र होवोत .

 


 
कुलं शीलं वयः सत्यं दाक्षिण्यं क्षिप्रकारिता।
 
अविसंवादिता सत्त्वं वृद्धसेवा कृतज्ञता ॥ ६५ ॥

रूपसम्पत्समायुक्ता सर्वस्य प्रियदर्शना ।
 
अयोनिजा च जायेयं त्वत्प्रसादादधोक्षज ॥ ६६ ॥

आणि हे अधोक्षजा ! आपल्या प्रसादाने मला देखिल कुल, शील, अवस्था, सत्य, दाक्षिन्य (कार्य-कुशलता), शीघ्रकारिता, अविसंवादिता (उलट न बोलणे), सत्त्व, वृद्धसेवा आणि कृतज्ञता आदि गुणांनी तसेच सुंदर रूपसम्पत्तिने सम्पन्न आणि सर्वांना प्रिय अशी अयोनिजा (मातेच्या गर्भाशिवाय जन्म असलेली) उत्पन्न कर .




 
सोम उवाच
 
तयैवमुक्तो देवेशो हृषीकेश उवाच ताम् ।
 
प्रणामनम्रामुत्थाप्य वरदः परमेश्वरः ॥ ६७ ॥

सोम म्हणालेतिच्या अशा बोलण्यावर वरदायक परमेश्वर देवाधिदेव श्रीह्रषीकेशाने प्रणामासाठी वाकलेल्या त्या बालेला उठवून म्हटले .

 


 
देव उवाच
 
भविष्यन्ति महावीर्या एकस्मिन्नेव जन्मनि ।
 
प्रख्यातोदारकर्माणो भवत्याः पतयो दश ॥ ६८ ॥

पुत्रं च सुमहावीर्यं महाबलपराक्रमम् ।
 
प्रजापतिगुणैर्युक्तं त्वमवाप्स्यसि शोभने ॥ ६९ ॥

भगवंत म्हणालेतुला एकाच जन्मी मोठे पराक्रमी आणि विख्यात कर्मवीर दहा पति असतील आणि हे शोभने ! त्याचवेळी तुला प्रजापति समान एक महावीर्यवान व अत्यंत बल-विक्रमयुक्त पुत्र देखिल प्राप्त होईल .

 


वंशानां तस्य कर्तृत्वं जगत्यस्मिन्भविष्यति ।
 
त्रैलोक्यमखिलं सूतिस्तस्य चापूरयिष्यति ॥ ७० ॥

तो ह्या संसारात अनेक वंश चालविणारा होईल आणि त्याची संतति सम्पूर्ण त्रिलोक्यात पसरेल .

 

 

त्वं चाप्ययोनिजा साध्वी रूपौदार्यगुणान्विता ।
मनःप्रीतिकरी नॄणां मत्प्रसादाद्‌भविष्यसि ॥ ७१ ॥

तसेच तू सुद्धा माझ्या कृपेने उदाररूप, गुणसम्पन्ना, सुशीला आणि मनुष्यांचे मन प्रसन्न करणारी अयोनिजाच उत्पन्न होशील .

 


 
इत्युक्त्वान्तर्दधे देवस्तां विशालविलोचनाम् ।
 
सा चेयं मारिषा जाता युष्मत्पत्नी नृपात्मजाः ॥ ७२ ॥

हे राजपुत्रांनो ! त्या विशालाक्षीला असे सांगून भगवंत अन्तर्धान झाले आणि तिच ही मारिषाच्या रूपात उत्पन्न झालेली तुमची पत्नी आहे .

 


 
पराशर उवाच
 
ततः सोमस्य वचनाज्जगृहुस्ते प्रचेतसः ।
 
संहृत्य कोपं वृक्षेभ्यः पत्नीधर्मेण मारिषाम् ॥ ७३ ॥

श्रीपराशरजी म्हणालेतेव्हा सोमदेवाच्या सांगण्यावरून प्रचेतांनी आपला क्रोध शांत केला आणि मारिषेला वृक्षांकडून पत्नीरूपात ग्रहण केले .

 


 
दशभ्यस्तु प्रचेतोभ्यो मारिषायां प्रजापतिः ।
 
जज्ञे दक्षो महाभागो यः पूर्वं ब्रह्मणोऽभवत् ॥ ७४ ॥

त्या दहाही प्रचेतां व मारिषेपासून महाभाग दक्ष प्रजपतिचा जन्म झाला जो आधी ब्रह्मापासून  उत्पन्न झाला होता .



 
स तु दक्षो महाभागस्सृष्ट्यर्थं सुमहामते ।
 
पुत्रानुत्पादयामास प्रजासृष्ट्यर्थमात्मनः ॥ ७५ ॥

अवरांश्च वरांश्चैव द्विपदोऽथ चतुष्पदः ।
आदेशं ब्रह्मणः कुर्वन् सृष्ट्यर्थं समुपस्थितः ॥ ७६ ॥

हे महामते ! त्या महाभाग दक्षाने, ब्रह्माच्या आज्ञेचे पालन करत सर्ग-रचनेसाठी उद्यत होऊन त्याची स्वतःची सृष्टि वाढविण्यासाठी व संतति उत्पन्न करण्यासाठी उच्च-नीच तथा द्विपाद चतुष्पाद आदि नाना प्रकारच्या जीवांना पुत्ररूपात उत्पन्न केले .

 


 
स सृष्ट्‍वा मनसा दक्षः पञ्चाशदसृजत स्त्रियः ।
 
ददौ स दश धर्माय कश्यपाय त्रयोदश ।
 
कालस्य नयने युक्ताः सप्तविंशतिमिन्दवे ॥ ७७ ॥

प्रजापति दक्षाने प्रथम मनानेच सृष्टि निर्माण करून मग स्त्रियांची उत्पत्ति केली. त्यातील दहा धर्माला आणि तेरा कश्यपाला दिल्या व काल-परिवर्तनात नियुक्त [अश्विनी आदि] सत्तावीस चन्द्रमाला विवाहात दिल्या .

 


 
तासु देवास्तथा दैत्या नागा गावस्तथा खगाः ।
 
गन्धर्वाप्सरसश्चैव दानवाद्याश्च जज्ञिरे ॥ ७८ ॥

त्यांच्यापासूनच देवता, दैत्य, नाग, गाई, पक्षी, गन्धर्व, अप्सरा आणि दानव आदि उत्पन्न झाले .

 


ततः प्रभृति मैत्रेय प्रजा मैथुनसम्भवाः ।
सङ्‌कल्पाद्‌दर्शनात्स्पर्शात्पूर्वेषामभवन् प्रजाः ।
तपोविशैषैरिद्धानां तदात्यन्ततपस्विनाम् ॥ ७९ ॥

हे मैत्रेया ! दक्षाच्या वेळेपासूनच प्रजेचं मैथुन (स्त्री-पुरुष संबंध) द्वारा उत्पन्न होणं सुरू झालं. त्या आधी अत्यंत तपस्वी प्राचीन सिद्ध पुरुषांच्या तपोबलाने, त्यांचे संकल्प, दर्शन अथवा स्पर्शमात्रानेच प्रजा उत्पन्न होत होती .




 
मैत्रेय उवाच
 
अङ्‌गुष्ठाद्‌दक्षिणाद्‌दक्षः पूर्वं जातः श्रुतो मया ।
 
कथं प्राचेतसो भूयः स सम्भूतो महामुने ॥ ८० ॥

श्रीमैत्रेय म्हणाले-  हे महामुने ! मी तर ऐकल आहे कि दक्षाचा जन्म ब्रह्माच्या उजव्या अंगठ्यापासून झाला होता, मग ते प्रचेतांचे पुत्र कसे झाले ?

 


 
एष मे संशयो ब्रह्मन्सुमहान्हृदि वर्तते ।
 
यद्‌दौहित्रश्च सोमस्य पुनः श्वशुरतां गतः ॥ ८१ ॥

हे ब्रह्मन ! माझ्या ह्रदयात मोठी शंका आहे की सोमदेवाचे नातू असूनही ते त्याचे सासरे झाले !

 


 
पराशर उवाच
 
उत्पत्तिश्च निरोधश्च नित्यो भूतेषु सत्तम ।
 
ऋषयोऽत्र न मुह्यन्ति ये चान्ये दिव्यचक्षुषः ॥ ८२ ॥

श्रीपराशर म्हणालेहे मैत्रेया ! प्राण्यांची उत्पत्ति आणि नाश [प्रवाहरूपाने] निरंतर होत असतो. ह्या विषयी ऋषि तथा अन्य दिव्यदृष्टि पुरुषांना कोणताही मोह होत नाही .

 

 

युगे युगे भवन्त्येते दक्षाद्या मुनिसत्तम ।
 
पुनश्चैव निरुद्ध्यन्ते विद्वांस्तत्र न मुह्यति ॥ ८३ ॥

हे मुनिश्रेष्ठा ! हे दक्षादि युगा-युगात होतात आणि परत लीन होतात; ह्यात विद्वानांना कसलाही प्रकारचा संदेह नसतो .

 


 
कानिष्ठ्यं ज्यैष्ठ्यमप्येषां पूर्वं नाभूद्‌द्विजोत्तम ।
 
तप एव गरीयोऽभूत्प्रभावश्चैव कारणम् ॥ ८४ ॥

हे द्विजोत्तमा ! ह्यांच्यात आधी कसल्याही प्रकारची ज्येष्ठता अथवा कनिष्ठता देखिल नव्हती. त्या काळी तप आणि प्रभावच त्यांच्या  जेष्ठतेचे कारण होते .

 


 
मैत्रेय उवाच
 
देवानां दानवानां च गन्धर्वोरगरक्षसाम् ।
 
उत्पत्तिं विस्तरेणेह मम ब्रह्मन्प्रकीर्तय ॥ ८५ ॥

श्रीमैत्रेय म्हणालेहे ब्रह्मन ! तुम्ही मला देव, दानव, गंधर्व, सर्प आणि राक्षसांची उत्पत्ति विस्तारपूर्वक सांगा .

 


पराशर उवाच
प्रजाः सृजेति व्यादिष्टः पूर्वं दक्षः स्वयम्भुवा । यथा ससर्ज भूतानि तथा शृणु महामते ॥ ८६ ॥

श्रीपराशर म्हणालेहे महामुने ! स्वयम्भू भगवान ब्रह्माची अशी आज्ञा झाल्यावर कितु प्रजा उत्पन्न करदक्षाने पूर्वकाळी ज्याप्रकारे प्राण्यांची रचना केली ती ऐक .

 


मनसान्येव भूतानि पूर्वं दक्षोऽसृजत्तदा ।
देवानृषीन् सगन्धर्वानसुरान्पन्नगांस्तथा ॥ ८७ ॥

त्या वेळी दक्षाने सर्वप्रथम ऋषि, गन्धर्व, असुर आणि सर्प आदि मानसिक प्राण्यांनाच उत्पन्न केले .

 

 

यदास्य सृजमानस्य न व्यवर्धन्त ताः प्रजाः ।
ततः सञ्चिन्त्य बहुशः सृष्टिहेतोः प्रजापतिः ॥ ८८ ॥
मैथुनेनैव धर्मेण सिसृक्षुर्विविधाः प्रजाः ।
असिक्नीमावहत्कन्यां वीरणस्य प्रजापतेः ।
सुतां सुतपसा युक्तां महतीं लोकधारिणीम् ॥ ८९ ॥

अशाप्रकारे रचना करत जेव्हा त्यांची ती प्रजा आणखी वाढली नाही तेव्हा त्या प्रजापतिने सृष्टिच्या वृद्धिसाठी मनात विचार करून मैथुनधर्माने नाना प्रकारची प्रजा उत्पन्न करण्याच्या इच्छेने वीरण प्रजापतिच्या अति तपस्विनी आणि लोकधारिणी पुत्री असिक्री सोबत विवाह केला .



 
अथ पुत्रसहस्राणि वैरिण्यां पञ्च वीर्यवान् ।
 
असिक्न्यां जनयामास सर्गहेतोः प्रजापतिः ॥ ९० ॥

त्यानंतर वीर्यवान प्रजापति दक्षाने सर्गाच्या वृद्धिसाठी वीरणसुता असिक्रीपासून पाच हजार पुत्र उत्पन्न केले .

 


 
तान् दृष्ट्‍वा नारदो विप्र संविवर्द्धयिषून्प्रजाः ।
 
सङ्‌गम्य प्रियसंवादो देवर्षिरिदमब्रवीत् ॥ ९१ ॥

त्याला असे प्रजावृद्धि इच्छुक पाहून प्रियवादी देवर्षि नारद त्याच्या जवळ जाऊन म्हणाला –

 


 
हे हर्यश्वा महावीर्याः प्रजा यूयं करिष्यथ ।
 
ईदृशो लक्ष्यते यत्नो भवतां श्रूयतामिदम् ॥ ९२ ॥

हे महापराक्रमी हर्यश्वगणा ! तुमचे हे प्रयत्न पाहून असे वाटते कि तुम्ही प्रजा उत्पन्न कराल, म्हणून माझे सांगणे ऐका" .

 

 

 बालिशा बत यूयं वै नास्या जानीत वै भुवः ।
 
अन्तरूर्ध्वमधश्चैव कथं सृक्ष्यथ वै प्रजाः ॥ ९३ ॥
 
ऊर्ध्वं तिर्यगधश्चैव यदाप्रतिहता गतिः ।
 
तदा कस्माद्‌भुवो नान्तं सर्वे द्रक्ष्यथ बालिशाः ॥ ९४ ॥

खेदाची गोष्ट आहे, तुम्ही पूर्णपणे अनभिज्ञ आहात कारण तुम्हाला ह्या पृथ्वीचा मध्य, ऊर्ध्व (वरचा भाग) आणि अध: (खालचा भाग) ह्याबद्दल काहीही ठाऊक नाही, मग प्रजेची रचना कशी करणार ? पहा, तुमची गति ह्या ब्रह्मांडात वर-खाली, इथे तिथे सगळीकडे अप्रतिहत आहे, म्हणून हे अज्ञानी लोकहो ! तुम्ही सगळे मिळून ह्या पृथ्वीचा अंत का नाही पाहात ?”

 


 
ते तु तद्वचनं श्रुत्वा प्रयाताः सर्वतो दिशम् ।
 
अद्यापि न निवर्तन्ते समुद्रेभ्य इवापगाः ॥ ९५ ॥

नारदाचे हे बोलणे ऐकून ते सगळे वेगवेगळ्या दिशांना निघून गेले आणि समुद्रात जाऊन ज्या प्रकारे नद्या परतत नाहीत त्याचप्रकारे ते सुद्धा आजपर्यंत परतले नाहीत .




 
हर्यश्वेष्वथ नष्टेषु दक्षः प्राचेतसः पुनः ।
 
वैरिण्यामथ पुत्राणां सहस्रमसृजत् प्रभुः ॥ ९६ ॥

हर्यश्वांच्या अशाप्रकारे निघून गेल्यावर प्रचेतांचे पुत्र दक्षाने वैरुणीपासून आणखी एक हजार पुत्र उत्पन्न केले .

 


 
विवर्धयिषवस्ते तु शबलाश्वाः प्रजाः पुनः ।
 
पूर्वोक्तं वचनं ब्रह्मन्नारदेनैव चोदिताः ॥ ९७ ॥
 
अन्योन्यमूचुस्ते सर्वे सम्यगाह महामुनिः ।
 
भ्रातॄणां पदवी चैव गन्तव्या नात्र संशयः ॥ ९८ ॥
 
ज्ञात्वा प्रमाणं पृथ्व्याश्च प्रजाः स्रक्ष्यामहे ततः ।
 
तेऽपि तेनैव मार्गेण प्रयाताः सर्वतोमुखम् ।
 
अद्यापि न निवर्तन्ते समुद्रेभ्य इवापगाः ॥ ९९॥

ते शबलाश्वगण सुद्धा प्रजा वाढविण्यास इच्छुक झाले. पण हे ब्रह्मन ! त्यांना नारदाने परत पुर्वी सांगितलेले तेच सांगितले. तेव्हा ते सगळे आपसात एक दुसर्‍याला सांगू लागले – ‘महामुनि नारद योग्य सांगत आहेत, ह्यात शंका नाही कि आपण सुद्धा आपल्या भावांच्या मार्गाचेच अवलम्बन केले पाहिजे. आपण सुद्धा पृथ्वीचे परिमाण जाणून मगच सृष्टि निर्माण करुया' अशाप्रकारे ते सुद्धा त्याच मार्गाणे सर्व दिशांना निघून गेले आणि समुद्रगत नद्यांसारखे आजतागायत परतलेले नाहीत .

 

 

ततः प्रभृति वै भ्राता भ्रातुरन्वेषणे द्विज ।
 
प्रयातो नश्यति तथा तन्न कार्यं विजानता ॥ १०० ॥

हे द्विजा ! तेव्हापासून भावाला शोधण्यासाठी जर भाऊच गेला तर तो नष्ट होतो, म्हणून पुरुषाने असे करू नये .




 
तांश्चापि नष्टान् विज्ञाय पुत्रान् दक्षः प्रजापतिः ।
 
क्रोधं चक्रे महाभागो नारदं स शशाप च ॥ १०१ ॥

महाभाग दक्ष प्रजापति ते पुत्र देखील गेले हे कळल्यावर नारदावर खूप चिडले आणि त्याला शाप दिला .

 

 

सर्गकामस्ततो विद्वान्स मैत्रेय प्रजापतिः ।
 
षष्टिं दक्षोऽसृजत्कन्या वैरिण्यामिति नः श्रुतम् ॥ १०२ ॥

हे मैत्रेया ! मी असे ऐकले आहे की नंतर त्या विद्वान प्रजापतिने सर्गवृद्धिच्या इच्छेने वैरुणी सोबत कन्या उत्पन्न केल्या .

 


 
ददौ स दश धर्माय कश्यपाय त्रयोदश ।
 
सप्तविंशति सोमाय चतस्रोऽरिष्टनेमिने ॥ १०३ ॥

त्यातील त्यांनी दहा धर्माला, तेरा कश्यपांना, सत्तावीस सोमाला (चन्द्रमा) आणि चार अरिष्टनेमिंना दिल्या .

 


 
द्वे चैव बहुपुत्राय द्वे चैवाङ्‌गिरसे तथा ।
 
द्वे कृशाश्वाय विदुषे तासां नामानि मे शृणु ॥ १०४ ॥

तसेच दोघींना बहुपुत्र, दोघींना अंगिरा आणि दोघींना कृशाश्वाला विवाहात दिल्या. आता त्यांची नावे ऐक .




 
अरुन्धती वसुर्जामिर्लम्बा भानुर्मरुत्वती ।
 
सङ्‌कल्पा च मुहूर्ता च साध्या विश्वा च तादृशी ।
 
धर्मपत्न्यो दश त्वेतास्तास्वपत्यानि मे शृणु ॥ १०५ ॥

अरुंधती, वसु, यामी, लम्बा, भानु, मरुत्वती, संकल्पा, मुहूर्ता, साध्या आणि विश्वा – ह्या दहा धर्माच्या पत्नि होत्या, आता तु त्यांच्या पुत्रांविषयी ऐक .



 विश्वेदेवास्तु विश्वायाः साध्या साध्यानजायत ।
 
मरुत्वत्या मरुत्वन्तो वसोस्तु वसवः स्मृताः ।
 
भानोस्तु भानवस्तत्र मुहूर्ताया मुहूर्तजाः ॥ १०६ ॥

विश्वा चे पुत्र विश्वेदेव होते, साध्यापासून  साध्यगण झाले, मरुत्वतीला मरुत्वान आणि वसुपासूण वसुगण झाले. तसेच भानुला भानु आणि मुहूर्तापासून मुहूर्ताभिमानी देवगण झाले .

 


 
लम्बायाश्चैव घोषोऽथ नागवीथी तु यामिजा ॥ १०७ ॥

पृथिवीविषयं सर्वमरुन्धत्यामजायत ।
 
सङ्‌कल्पायास्तु सर्वात्मा जज्ञे सङ्‌कल्प एव च ॥ १०८ ॥

लम्बाला घोष, यामीला नागवीथी आणि अरुंधतीपासून समस्त पृथ्वी विषयक प्राणी झाले तसेच संकल्पापासून सर्वात्मक संकल्पाची उत्पत्ति झाली .


 

ये त्वनेकवसुप्राणादेवा ज्योतिःपुरोगमाः ।
 
वसवोऽष्टौ समाख्यातास्तेषां वक्ष्यामि विस्तरम् ॥ १०९ ॥

नाना प्रकारचा वसु (तेज अथवा धन) ज्यांचा प्राण आहे असे ज्योंति आदि जे आठ वसुगण विख्यात आहेत, आता मी त्यांच्या वंशाचा विस्तार सांगतो .

 


 
आपो ध्रुवश्च सोमश्च धरश्चैवानिलोऽनलः ।
 
प्रत्यूषश्च प्रभासश्च वसवो नामभिः स्मृताः ॥ ११० ॥

त्यांची नावे आप, ध्रुव, सोम, धर्म, अनिल (वायु), अनल (अग्नि), प्रत्युष आणि प्रभास अशी आहेत .


 

आपस्य पुत्रो वैतण्डः श्रमः श्रान्तोऽधुनिस्तथा ।
ध्रुवस्य पुत्रो भगवान्कालो लोकप्रकालनः ॥ १११ ॥

आपचे पुत्र वैतंड, श्रम, शांत आणि ध्वनि झाले तसेच ध्रुवाचे पुत्र लोक-संहारक भगवान काळ झाले . 

 

 

सोमस्य भगवान्वर्चा वर्चस्वी येन जायते ॥ ११२ ॥
 
धरस्य पुत्रो द्रविणो हुतहव्यवहस्तथा ।
 
मनोहरायां शिशिरः प्राणोऽथ वरुणस्तथा ॥ ११३ ॥

भगवान वर्चा सोमाचे पुत्र होते ज्यांच्यापासून पुरुष वर्चस्वी (तेजस्वी) होतो आणि धर्माला त्याची भार्या मनोहर पासून द्रविण, हट एवं हव्यवह तथा शिशिर, प्राण आणि वरुण नामक पुत्र झाले .



अनिलस्य शिवा भार्या तस्याः पुत्रः पुरोजवः ।
 
अविज्ञातगतिश्चैव द्वौ पुत्रावनिलस्य तु ॥ ११४ ॥

अनिलची पत्नी शिवा होती, तिच्यापासून अनिलला मनोजव आणि अविज्ञातगति – हे दोन पुत्र झाले .

 


 
अग्निपुत्रः कुमारस्तु शरस्तम्बे व्यजायत ।
 
तस्य शाखो विशाखश्च नैगमेयश्च पृष्ठजाः ॥ ११५ ॥
 
अपत्यं कृत्तिकानां तु कार्त्तिकेय इति स्मृतः ॥ ११६ ॥

अग्निचा पुत्र कुमार शरस्तम्ब पासून उत्पन्न झाला होता, हा कृत्तिकांचा पुत्र झाल्याने कार्तिकेय म्हणवला गेला. शाख, विशाख आणि नैगमेय ह्याची छोटे भाऊ होते .

 

 

प्रत्यूषस्य विदुः पुत्रं ऋषि नाम्ना तु देवलम् ।
द्वौ पुत्रौ देवलस्यापि क्षमावन्तौ मनीषिणौ ॥ ११७ ॥

देवल नामक ऋषिला प्रत्युषचा पुत्र म्हटले जाते. ह्या देवलला सुद्धा दोन क्षमाशील आणि मनीषी पुत्र झाले .

 


 
बृहस्पतेस्तु भगिनी वरस्त्री ब्रह्मचारिणी ।
 
योगसिद्धा जगत्कृत्स्नमसक्ता विचरत्युत ।
 
प्रभासस्य तु सा भार्या वसूनामष्टमस्य तु ॥ ११८ ॥

बृहस्पतिची बहिण वरस्त्री, जी ब्रह्मचारिणी व सिद्ध योगिनी होती तथा अनासक्त-भावाने समस्त भूमंडलात विचरण करत होती, ती आठवा वसु प्रभास ह्याची पत्नी झाली .

 


 
विश्वकर्मा महाभागस्तस्यां जज्ञे प्रजापतिः ।
 
कर्ता शिल्पसहस्राणां त्रिदशानां च वार्द्धकिः ॥ ११९ ॥

तिच्यापासून सहस्त्रो शिल्पांचा कर्ता आणि देवतांचा शिल्पी महाभाग प्रजापति विश्वकर्माचा जन्म झाला .

 


 
भूषणानां च सर्वेषां कर्ता शिल्पवतां वरः ।
 
यः सर्वेषां विमानानि देवतानां चकार ह ।
 
मनुष्याश्चोपजीवन्ति यस्य शिल्पं महात्मनः ॥ १२० ॥

जो समस्त शिल्पकारांमध्ये श्रेष्ठ आणि सर्व प्रकारचे आभूषण बनवणारा झाला तसेच ज्याने देवतांच्या सम्पूर्ण विमानांची रचना केली व ज्या महात्माच्या [आविष्कृत] शिल्पविद्येच्या आश्रयाने अनेक मनुष्य जीवन-निर्वाह करतात .

 

 

तस्य पुत्रास्तु चत्वारस्तेषां नामानि मे शृणु ।
अजैकपादहिर्बुध्न्यस्त्वष्टा रुद्रश्च बुद्धिमान् ।
त्वष्टुश्चाप्यात्मजः पुत्रो विश्वरूपो महातपाः ॥ १२१ ॥

त्या विश्वकर्माला चार पुत्र होते, ज्यांची नावे  अजैकपाद, अहिर्बुध्न्य, त्वष्टा आणि परमपुरुषार्थी रूद्र अशी आहेत. त्यातील त्वष्टाचा पुत्र महातपस्वी विश्वरूप होता .

 


 
हरश्च बहुरूपश्च त्र्यम्बकश्चापराजितः ।
 
वृषाकपिश्च शम्भुश्च कपर्दी रैवतः स्मृतः ॥ १२२ ॥
 
मृगव्याधश्च शर्वश्च कपाली च महामुने ।
 
एकादशैते कथिता रुद्रास्त्रिभुवनेश्वराः ।
 
शतं त्वेवं समाख्यातं रुद्राणाममितौजसाम् ॥ १२३ ॥

हे महामुने ! हर, बहुरूप, त्र्यम्बक, अपराजित, वृषाकपि, शम्भु, कपर्दी, रैवत, मृगव्याध, शर्व आणि कपाली – हे त्रिलोक्याचे अधीश्वर अकरा रूद्र झाले. असे शेकडो महातेजस्वी एकादश रूद्र प्रसिद्ध आहेत .




 
कश्यपस्य तु भार्या यास्तासां नामानि मे शृणु ।
 
अदितिर्दितिर्दनुश्चैवारिष्टा सुरसा स्वसा ॥ १२४ ॥
 
सुरभिर्विनता चैव ताम्रा क्रोधवशा इरा ।
 
कद्रुर्मुनिश्च धर्मज्ञ तदपत्यानि मे शृणु ॥ १२५ ॥

ज्या [दक्षकन्या] कश्यपांच्या पत्नी झाल्या त्यांची नावे ऐक – त्या अदिति, दिति, दनु, अरिष्टा, सुरसा, स्त्रसा, सुरभि, विनता, ताम्रा, क्रोधवशा, इरा, कद्रु आणि मुनि होत्या. हे धर्मज्ञा ! आता त्यांच्या संततिचे विवरण श्रवण कर .



पूर्वमन्वन्तरे श्रेष्ठा द्वादशासन्सुरोत्तमाः ।
तुषिता नाम तेऽन्योन्यमूचुर्वैवस्वतेऽन्तरे ॥ १२६ ॥
उपस्थितेऽतियशसश्चाक्षुषस्यान्तरे मनोः ।
समवायीकृताः सर्वे समागम्य परस्परम् ॥ १२७ ॥

पूर्व (चाक्षुष) मन्वन्तरात तुषित नामक बारा श्रेष्ठ देवगण होते. ते यशस्वी सुरश्रेष्ठ चाक्षुष मन्वन्तरा नंतर वैवस्वत-मन्वन्तर आल्यावर एकमेकांजवळ जाऊन आपसात बोलू लागले .


आगच्छत द्रुतं देवा अदितिं सम्प्रविश्य वै ।
मन्वन्तरे प्रसूयामस्तन्नः श्रेयो भवेदिति ॥ १२८ ॥

हे देवगणांनो ! या, आपण लवकर अदितिच्या गर्भात प्रवेश करून ह्या वैवस्वत मन्वन्तरात  जन्म घेऊया, ह्यातच आपले हित आहे' .

 


 
एवमुक्त्वा तु ते सर्वे चाक्षुषस्यान्तरे मनोः ।
 
मारीचात्कश्यपाज्जातास्तेऽदित्या दक्षकन्यया ॥ १२९ ॥

अशा प्रकारे चाक्षुष-मन्वन्तरात निश्चय करून त्या सर्वांनी मरीचिपुत्र कश्यपाकडे दक्षकन्या अदितिच्या गर्भर्भातून जन्म घेतला .

 


 
तत्र विष्णुश्च शक्रश्च जज्ञाते पुनरेव हि ।
 
अर्यमा चैव धाता च त्वष्टा पूषा तथैव च ॥ १३० ॥
 
विवस्वान्सविता चैव मित्रो वरुण एव च ।
 
अंशो भगश्चातितेजा आदित्या द्वादश स्मृताः ॥ १३१ ॥

ते अति तेजस्वी तिच्यापासून उत्पन्न होऊन विष्णु, इंद्र, अर्यमा, धाता, त्वष्टा, पूषा, विवस्वान, सविता, मैत्र, वरुण, अंशु आणि भग नामक द्वादश आदित्य बनले .

 


 
चाक्षुषस्यान्तरे पूर्वमासन्ये तुषिताः सुराः ।
 
वैवस्वतेऽन्तरे ते वै आदित्या द्वादश स्मृताः ॥ १३२ ॥

अशाप्रकारे पहिल्या चाक्षुष मन्वन्तरात जे तुषित नामक देवगण होते तेच वैवस्वत मन्वन्तरात द्वादश आदित्य झाले .

 


 
सप्तविंशति याः प्रोक्ताः सोमपत्न्योऽथ सुव्रताः ।
 
सर्वा नक्षत्रयोगिन्यस्तन्नाम्न्यश्चैव ताः स्मृताः ॥ १३३ ॥

सोमाच्या ज्या सत्तावीस सुव्रता पत्निंविषयी आधीच सांगीतले आहे त्या सर्व नक्षत्रयोगिनी आहेत आणि ह्याच नावांनी विख्यात आहेत .

 

 

तासामपत्यान्यभवन्दीप्तान्यमिततेजसाम् ।
 
अरिष्टनेमिपत्नीनामपत्यानीह षोडश ॥ १३४ ॥
 
बहुपुत्रस्य विदुषश्चतस्रो विद्युतः स्मृताः ॥ १३५ ॥

त्या अति तेज्स्विनिंपासून अनेक प्रतिभाशाली पुत्र उत्पन्न झाले. अरिष्टनेमिच्या पत्निंना सोळा पुत्र झाले. बुद्धिमान बहुपुत्राच्या भार्या [कपिला, अतिलोहिता, पीता आणि अशिता नामक] चार प्रकारच्या विद्युत् म्हणून ओखळल्या जातात .

 


 
प्रत्यङ्‌गिरसजाः श्रेष्ठा ऋचो ब्रह्मर्षिसत्कृताः ।
 
कृशाश्वस्य तु देवर्षेर्देवप्रहरणाः सुताः ॥ १३६ ॥

ब्रह्मर्षिंपासून सत्कृत ऋचांचे अभिमानी देवश्रेष्ठ, प्रत्यंगिरापासून उत्पन्न झाले व शास्त्रांचे अभिमानी देवप्रहरण नामक देवगण देवर्षि कृशाश्वाची संतति आहे .

 

 

एते युगसहस्रान्ते जायन्ते पुनरेव हि ।
सर्वे देवगणास्तात त्रयस्त्रिंशत्तु छन्दजाः ॥ १३७ ॥
तेषामपीह सततं निरोधोत्पत्तिरुच्यते ॥ १३८ ॥

हे तात ! [आठ वसु, अकरा रूद्र, बारा आदित्य, प्रजापति आणि वषट्कार] ह्या तेहतीस वेदोक्त देवता आपल्या इच्छेनुसार जन्म घेणार्‍या आहेत. असे म्हणतात कि ह्या लोकी त्यांची उत्पत्ति व निरोध निरंतर होत राहतो. हे एक हजार युगानंतर पुन्हा पुन्हा उत्पन्न होत राहतात .

 

 

यथा सूर्यस्य मैत्रेय उदयास्तमनाविह ।
 
एवं देवनिकायास्ते सम्भवन्ति युगे युगे ॥ १३९ ॥

हे मैत्रेया ! ज्या प्रकारे लोकात सूर्याचा अस्त व उदय निरंतर होत राहतो त्याच प्रकारे हे देवगण सुद्धा युगायुगात उत्पन्न होत राहतात .

 


 
दित्या पुत्रद्वयं जज्ञे कश्यपादिति नः श्रुतम् ।
 
हिरण्यकशिपुश्चैव हिरण्याक्षश्च दुर्जयः ॥ १४० ॥
 
सिंहिका चाभवत्कन्या विप्रचित्तेः परिग्रहः ॥ १४१ ॥

आम्ही ऐकले आहे कि दितिला कश्यपांच्या वीर्यापासून परम दुर्जय हिरण्यकशिपु आणि हिरण्याक्ष नामक दोन पुत्र तसेच सिंहिका नामक एक कन्या झाली जिचा विप्रचिती सोबत विवाह झाला .

 


 
हिरण्यकशिपोः पुत्राश्चत्वारः प्रथितौजसः ।
 
अनुह्लादश्च ह्लादश्च प्रह्लादश्चैव बुद्धिवान् ।
 
संह्लादश्च महावीर्या दैत्यवंशविवर्धनाः ॥ १४२ ॥

हिरण्यकशिपुला अति तेजस्वी व महापराक्रमी अनुह्राद, ह्राद, बुद्धिमान प्रल्हाद आणि संह्राद नामक चार पुत्र झाले जे दैत्यवंशाची वृद्धि करणारे होते .

 


 
तेषां मध्ये महाभागः सर्वत्र समदृग्वशी ।
 
प्रह्लादः परमां भक्तिं य उवाच जनार्दने ॥ १४३ ॥

हे महाभागा ! त्यांच्यात प्रल्हाद सर्वत्र समदर्शी आणि जितेन्द्रिय होते, ज्यांनी श्रीविष्णु भगवंताच्या परमभक्तिचे वर्णन केले होते .

 


 
दैत्येन्द्रदीपितो वह्निः सर्वाङ्‌गोपचितो द्विज ।
 
न ददाह च यं पूर्वं वासुदेवे हृदि स्थिते ॥ १४४ ॥

ज्याला दैत्यराजद्वारा दीप्त केलेला अग्नि त्याचे सर्वांग व्याप्त करून सुद्धा, ह्रदयात  वासुदेव भगवंताच्या स्थित राहिल्याने जाळू नाही शकला .

 

 
 
महार्णवान्तःसलिले स्थितस्य चलतो मही ।
 
चचाल सकला यस्य पाशबद्धस्य धीमतः ॥ १४५ ॥

ज्या महाबुद्धिमानाच्या पाशबद्ध होऊन समुद्र जलात पडून इथेतिथे हलण्या डुलण्याने समस्त पृथ्वी हलु लागली होती .

 

 

न भिन्नं विविधैः शस्त्रैर्यस्य दैत्येन्द्रपातितैः ।
 
शरीरमद्रिकठिनं सर्वत्राच्युतचेतसः ॥ १४६ ॥

ज्याचे पर्वता समान कठोर शरीर, सर्वत्र भगवंत चित्त राहिल्याने दैत्यराजाने चालविलेल्या अस्त्र-शस्त्रांनीही छिन्न-भिन्न नाही झाले .

 

 

 विषानलोज्ज्वलमुखा यस्य दैत्यप्रचोदिताः ।
 
नान्ताय सर्पपतयो बभूवुरुरुतेजसः ॥ १४७ ॥

दैत्यराजद्वारा प्रेरित विषाग्निने प्रज्वलित मुखाचे सर्प सुद्धा ज्या महातेजस्वीचा अंत नाही करू शकले .

 


 
शैलैराक्रान्तदेहोऽपि यः स्मरन् पुरुषोत्तमम् ।
 
तत्याज नात्मनः प्राणान् विष्णुस्मरण दंशितः ॥ १४८ ॥

ज्याने भगवत्स्मरणरूपी कवच धारण केल्याने पुरुषोत्तम भगवंताचे स्मरण करत दगडांचा मारा झाल्यावरही प्राण सोडले नाहीत.

 


 
पतन्तमुच्चादवनिर्यमुपेत्य महामतिम् ।
 
दधार दैत्यपतिना क्षिप्तं स्वर्गनिवासिना ॥ १४९ ॥

स्वर्गनिवासी दैत्यपतिद्वारा वरून खाली फेकले गेल्यावर ज्या महामतिला पृथ्वीने जवळ जाऊन मध्येच आपल्या मांडीवर घेतले .

 


 
यस्य संशोषको वायुर्देहे दैत्येन्द्रयोजितः ।
 
अवाप सङ्‍क्षयं सद्यश्चित्तस्थे मधुसूदने ॥ १५० ॥

चित्तात श्रीमधुसुदनभगवंत स्थित असल्याने दैत्यराजाने नियुक्त केलेला सर्वांचे शोषण करणारा वायु ज्याच्या शरीरस्पर्शाने शांत झाला .

 

 

विषाणभङ्‌गमुन्मत्ता मदहानिं च दिग्गजाः ।
 
यस्य वक्षःस्थले प्राप्ता दैत्येन्द्रपरिणामिताः ॥ १५१ ॥

दैत्येन्द्रद्वारा आक्रमणासाठी नियुक्त उन्मत्त दिग्गजांचे दात ज्याच्या वक्ष:स्थलावर लागून तुटले व त्यांचा सर्व मद चूरचूर झाला .

 


 
यस्य चोत्पादिता कृत्या दैत्यराजपुरोहितैः ।
 
बभूव नान्ताय पुरा गोविन्दासक्तचेतसः ॥ १५२ ॥

पूर्वकाळी दैत्यराजाच्या पुरोहितांनी उत्पन्न केलेली कृत्या सुद्धा ज्या गोविंदासक्तचित्त भक्तराजाच्या अंताचे कारण नाही बनू शकली .

 


 
शम्बरस्य च मायानां सहस्रमतिमायिनः ।
 
यस्मिन् प्रयुक्तं चक्रेण कृष्णस्य वितथीकृतम् ॥ १५३ ॥

ज्याच्यावर प्रयुक्त केलेली अति मायावी शंबराची सहस्र माया श्रीकृष्णचंद्राच्या चक्राने व्यर्थ झाली .

 


 
दैत्येन्द्रसूदोपहृतं यश्च हालाहलं विषम् ।
 
जरयामास मतिमानविकारममत्सरी ॥ १५४ ॥

ज्या मतिमान व निर्मत्सराने दैत्यराजाच्या आचार्‍याने आणलेले हलाहल विष निर्विकार भावाने पचविले .

 


 
समचेता जगत्यस्मिन्यः सर्वेष्वेव जन्तुषु ।
 
यथात्मनि तथान्यत्र परं मैत्रगुणान्वितः ॥ १५५ ॥

जो ह्या संसारात समस्त प्राण्यांप्रति समानचित्त आणि आपल्यासारखेच दुसर्‍यांसाठी सुद्धा परमप्रेमयुक्त होता .

 

 

धर्मात्मा सत्यशौचादिगुणानामाकरः परः ।
उपमानमशेषाणां साधूनां यः सदाभवत् ॥ १५६ ॥

आणि जो परम धर्मात्मा महापुरुष, सत्य एवं शौर्य आदि गुणांची खाण तथा समस्त साधू-पुरुषांसाठी उपमास्वरूप होता .

 

 



            "इति श्रीविष्णुपुराणे प्रथमे अंशे पंचदशोऽध्याय
"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, तृतीय अंश, त्रयोदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 3 , Adhyay 13

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ तृतीयः अंशः ॥ त्रयोदशोऽध्यायः ॥   आभ्युदयिक श्राद्ध , प्रेतकर्म तथा श्राद्धादि विचार और्व उवाच सचैलस्य पितुः ...