मंगळवार, ९ डिसेंबर, २०२५

विष्णुपुराण, प्रथम अंश, नवम अध्याय | Vishnu Puran, Ansh 1, Adhyay 9

 

 

 

॥ विष्णुपुराणम् ॥

॥ प्रथमः अंशः   ॥ नवमोऽध्यायः ॥

 

"दुर्वासांच्या शापाने इंद्राचा पराजय,  ब्रह्माच्या स्तुतिने प्रसन्न,  भगवंताचे प्रकट होऊन देवतांना समुद्रमंथनाचा उपदेश, देवता आणि दैत्यांचे समुद्रमंथन"

 

पराशर उवाचः
इदं च शृणु मैत्रेय यत्पृष्टोऽहमिह त्वया ।
श्रीसम्बन्धं मयाप्येतच्छ्रुतमासीन्मरीचितः ॥ १ ॥

पराशर म्हणालेहे मैत्रेया ! तु आता मला ज्याविषयी विचारलेस तो श्रीसंबंध मी देखील मरीचि ऋषिंकडून ऐकला होता. तो मी तुला सांगतो, ऐक .

 


 
दुर्वासाः शङ्‌करस्यांशश्चचार पृथिवीमिमाम् ।
 
स ददर्श स्रजं दिव्यामृषिर्विद्याधरीकरे ॥ २ ॥
 
संतानकानामखिलं यस्या गन्धेन वासितम् ।
 
अतिसेव्यमभूद्‌ब्रह्मन् तद्‌वनं वनचारिणाम् ॥ ३ ॥

एकदा शंकराचे अंशावतार श्रीदुर्वास पृथ्वीतलावर विचरण करत होते. फिरता फिरता त्यांनी एका विद्याधरीच्या हातात संतानक पुष्पांची एक दिव्य माला पाहिली. हे ब्रह्मन् ! तिच्या सुगंधाने सुवासित होऊन ते वन वनवासी जनांसाठी अति सेवनिय झाले होते .

 

उन्मत्तव्रतधृग्विप्रः स दृष्ट्‍वा शोभनां स्रजम् ।
तां ययाचे वरारोहां विद्याधरवधूं ततः ॥ ४ ॥

तेव्हा त्या उन्मत्तवृत्तिच्या विप्रवराने ती सुंदर माला पाहून   विद्याधर सुन्दरीकडे ती मागितली .

 


 
याचिता तेन तन्वङ्‌गी मालां विद्याधराङ्‌गना ।
 
ददौ तस्मै विशालाक्षी सादरं प्रणिपत्य तम् ॥ ५ ॥

त्यांनी मागितल्यावर त्या विशाल नेत्र असलेल्या कृशांगी विद्याधरीने त्यांना आदरपूर्वक प्रणाम करून ती माला दिली .

 


 
तामादायात्मनो मूर्ध्नि स्रजमुन्मत्तरूपधृक् ।
 
कृत्वा स विप्रो मैत्रेय परिबभ्राम मेदिनीम् ॥ ६ ॥

हे मैत्रेया ! त्या उन्मत्तवेषधारी विप्रवराने ती घेऊन आपल्या मस्तकावर घातली आणि पृथ्वीवर विचरण करू लागले .

 


स ददर्श समायान्तमुन्मत्तैरावते स्थितम् ।
त्रैलोक्याधिपतिं देवं सह देवैः शचीपतिम् ॥ ७ ॥

त्याच वेळी त्यांनी उन्मत्त ऐरावतावर चढून देवतांसोबत येणार्‍या त्रैलोक्याधिपति शचीपति इंद्राला पाहिले .

 


तामात्मनः स शिरसः स्रजमुन्मत्तषट्पदाम् ।
आदायामरराजाय चिक्षेपोन्मत्तवन्मुनिः ॥ ८ ॥

त्याला पाहून मुनिवर दुर्वासाने उन्मत्तासारखी ती  मतवाल्या भ्रमरांनी गुंजणारी माला आपल्या मस्तकावरून उतरवून देवराज इंद्रावर फेकली .

 


 
गृहीत्वाऽमरराजेन स्रगैरावतमूर्धनि ।
 
न्यस्ता रराज कैलासशिखरे जाह्नवी यथा ॥ ९ ॥

देवराजाने ती घेऊन ऐरावताच्या मस्तकावर घातली, त्या वेळी ती अशी सुभोशित झाली जणू कैलास पर्वताच्या शिखरावर विराजमान झालेली श्रीगंगा .

 


मदान्धकारिताक्षोऽसौ गन्धाकृष्टेन वारणः ।
 
करेणाघ्राय चिक्षेप तां स्रजं धरणीतले ॥ १० ॥

त्या मदोन्मत्त हत्तीने देखील तिच्या गंधाने आकर्षित होऊन तिला सोंडेनी उचलून पृथ्वीवर फेकून दिले .

 


 
ततश्चुक्रोध भगवान्दुर्वासा मुनिसत्तमः ।
 
मैत्रेय देवराजानं क्रुद्धश्चैतदुवाच ह ॥ ११ ॥

हे मैत्रेया ! हे पाहून मुनिश्रेष्ठ भगवान दुर्वास अति क्रोधित झाले आणि देवराज इंद्राला म्हणाले .



 
दुर्वासा उवाचः
 
ऐश्वर्यमददुष्टात्मन्नतिस्तब्धोऽसि वासव ।
 
श्रियो धाम स्रजं यस्त्वं मद्दत्तां नाभिनन्दसि ॥ १२ ॥

दुर्वास म्हणालेअरे ऐश्वर्याच्या मदाने दूषितचित्त इंद्रा ! तू खूपच धीट आहेस, तू मी दिलेल्या संपूर्ण शोभेच्या धाममालेचा जराही आदर केला नाहीस .

 

प्रसाद इति नोक्तं ते प्रणिपातपुरःसरम् ।
हर्षोत्फुल्लकपोलेन न चापि शिरसा धृता ॥ १३ ॥

अरे ! तू प्रणाम करून "मोठी कृपा केलीत" असेही म्हटले नाहीस की आनंदाने प्रसन्नवदन होऊन तीला आपल्या मस्तकावरही ठेवले नाहीस .

 


मया दत्तामिमां मालां यस्मान्न बहु मन्यसे ।

त्रैलोक्यश्रीरतो मूढ विनाशमुपयास्यति ॥ १४ ॥

रे मूढा ! तु मी दिलेल्या मालेची जराही किंमत केली नाहीस, म्हणून तुझे त्रिलोकीचे वैभव नष्ट होईल .

 


 
मां मन्यसे त्वं सदृशं नूनं शक्रेतरद्विजैः ।
 
अतोऽवमानमस्मासु मानिना भवता कृतम् ॥ १५ ॥

इंद्रा ! नक्कीच तू मला इतर ब्राह्मणां समान मानतोस, म्हणून तुझ्यासारख्या अति मानीने माझा अशाप्रकारे अपमान केला आहे .



मद्दत्ता भवता यस्मात्क्षिप्ता माला महीतले ।
तस्मात्प्रणष्टलक्ष्मीकं त्रैलोक्यं ते भविष्यति ॥ १६ ॥

मी दिलेली माळा पृथ्वीवर फेकलीस म्हणून तुझे हे  त्रिभुवन लगेच श्रीहीन होईल .

 


 
यस्य सञ्जातकोपस्य भयमेति चराचरम् ।
 
तं त्वं मामतिगर्वेण देवराजावमन्यसे ॥ १७ ॥

रे देवराजा ! ज्याच्या क्रोधित होण्याने सम्पूर्ण चराचर जगत भयभीत होते त्या माझा तू अति गर्वाने अशा प्रकारे अपमान केलास .

 


पराशर उवाचः
महेन्द्रो वारणस्कन्धादवतीर्य त्वरान्वितः ।
प्रसादयामास मुनिं दुर्वाससमकल्मषम् ॥ १८ ॥
पराशर म्हणालेतेव्हा इंद्राने लगेच ऐरावत हत्तीवरून उतरून निष्पाप मुनिवर दुर्वासांना [अनुनय-विनय करून] प्रसन्न केले .

 


 
प्रसाद्यमानः स तदा प्रणिपातपुरःसरम् ।
 
प्रत्युवाच सहस्राक्षं दुर्वासा मुनिसत्तमः ॥ १९ ॥

तेव्हा त्याच्या प्रणामाने प्रसन्न होऊन मुनिश्रेष्ठ दुर्वास म्हणाले .

 


 
दुर्वासा उवाचः
 
नाहं कृपालुहृदयो न च मां भजते क्षमा ।
 
अन्ये ते मुनयः शक्र दुर्वाससमवेहि माम् ॥ २० ॥
 
दुर्वास म्हणाले – इंद्रा ! मी कृपाळुचित्त नाही, माझ्या अंत:करणात क्षमेला स्थान नाही . ते मुनिजन  वेगळे असतात, मी दुर्वास आहे हे समजून घे .

 


गौतमादिभिरन्यैस्त्वं गर्वमारोपितो मुधा ।
 
अक्षान्तिसारसर्वस्वं दुर्वाससमवेहि माम् ॥ २१ ॥

गौतमादि अन्य मुनिजनांनी तुला व्यर्थ इतकं महत्त्व दिलं आहे, पण याद राख, माझे दुर्वासाचे सर्वस्व क्षमा न करणंच आहे .

 

 

वसिष्ठाद्यैर्दयासारैस्स्तोत्रं कुर्वद्‌भिरुच्चकैः ।
 
गर्वं गतोऽसि येनैवं मामप्यद्यावमन्यसे ॥ २२ ॥

दयामूर्ति वसिष्ठ आदिंच्या भरपूर स्तुति करण्यामुळे तू इतका गर्वीष्ठ झाला आहेस कि आज माझा सुद्धा अपमान केलास .

 


ज्वलज्जटाकलापस्य भृकुटीकुटिलं मुखम् ।
निरीक्ष्य कस्त्रिभुवने मम यो न गतो भयम् ॥ २३ ॥

अरे ! आज त्रैलोक्यात कोण आहे जो माझा प्रज्वलित जटाकलाप आणि माझ्या वक्र भुवया पाहून भयभीत होत नाही  ?



नाहं क्षमिष्ये बहुना किमुक्तेन शतक्रतो ।
विडम्बनामिमां भूयः करोष्यनुनयात्मिकाम् ॥ २४ ॥

रे शतक्रतो ! तू वारंवार अनुनय-विनय करण्याचे ढोंग का करत आहेस ? तुझ्या ह्या सांगण्या करण्याने काय होणार ? मी क्षमा नाही करू शकत .

 


पराशर उवाचः
त्युक्त्वा प्रययौ विप्रो देवराजोऽपि तं पुनः ।
आरुह्यैरावतं ब्रह्मन् प्रययावमरावतीम् ॥ २५ ॥

पराशर म्हणालेहे ब्रह्मन् ! अशाप्रकारे ते विप्रवर तिथून निघून गेले आणि इंद्र देखिल ऐरावतावर चढून अमरावतीला निघून गेला .

 


ततः प्रभृति निःश्रीकं सशक्रं भुवनत्रयम् ।
मैत्रेयासीदपध्वस्तं सङ्‍क्षीणौषधिवीरुधम् ॥ २६ ॥

हे मैत्रेया ! तेव्हापासून इंद्रा सहित तीनही लोक वृक्ष – लता आदिंच्या क्षीण होण्याने श्रीहीन आणि नष्ट भ्रष्ट होऊ लागले .

 

 

न यज्ञाः समवर्तन्त न तपस्यन्ति तापसाः ।
न च दानादिधर्मेषु मनश्चक्रे तदा जनः ॥ २७ ॥

तेव्हापासून यज्ञकार्य बंद झाली, तपस्विंनी तप करणे सोडून दिले आणि लोकांचे दान आदि धर्मामध्ये चित्त नाही राहिले .



 
निःसत्त्वाः सकला लोका लोभाद्युपहतेन्द्रियाः ।
 
स्वल्पेऽपि हि बभूवुस्ते साभिलाषा द्विजोत्तम ॥ २८ ॥

हे द्विजोत्तमा ! सम्पूर्ण लोक लोभादिच्या वशीभूत झाल्याने सामर्थ्यहीन झाले आणि तुच्छ वस्तुंची देखिल अभिलाषा करू लागले .

 


 
यतः सत्त्वं ततो लक्ष्मीः सत्त्वं भूत्यनुसारि च ।
 
निःश्रीकाणां कुतः सत्त्वं विना तेन गुणाः कुतः ॥ २९ ॥

जिथे सत्त्व असते तिथेच लक्ष्मी राहाते आणि सत्त्व देखील लक्ष्मीचा सोबती आहे. श्रीहीन लोकांमध्ये कुठून आलं सत्त्व ? आणि सत्त्वाशिवाय गुण कसे राहातील ?



 
बलशौर्याद्यभावश्च पुरुषाणां गुणैर्विना ।
 
लङ्‌घनीयः समस्तस्य बलशौर्यविवर्जितः ॥ ३० ॥

गुणांच्या अभावी पुरुषांमध्ये बल, शौर्य आदि सर्वाचा अभाव होतो आणि निर्बल तथा अशक्त पुरुष सर्वांकडून अपमानित होतो .

 


भवत्यपध्वस्तमतिर्लङ्‌घितः प्रथितः पुमान् ॥ ३१ ॥

अपमानित झाल्याने प्रतिष्ठित पुरुषाची बुद्धि बिघडते .

 

 

एवमत्यन्तनिःश्रीके त्रैलोक्ये सत्त्ववर्जिते ।
 
देवान् प्रति बलोद्योगं चक्रुर्दैतेयदानवाः ॥ ३२ ॥
 
अशाप्रक्रारे त्रिलोक श्रीहीन व सत्त्वरहित झाल्यामुळे दैत्य आणि दानवांनी  देवतांवर आक्रमण केले .

 


 
लोभाभिभूता निःश्रीका दैत्याः सत्त्वविवर्जिताः ।
 
श्रिया विहीनैर्निःसत्त्वैर्देवैश्चक्रुस्ततो रणम् ॥ ३३ ॥

सत्त्व आणि वैभव शून्य झाल्यावर देखील दैत्यांनी  लोभवश नि:सत्त्व आणि श्रीहीन देवतांशी घोर युद्ध करायचे ठरविले .

 


विजितास्त्रिदशा दैत्यैरिन्द्राद्याः शरणं ययुः ।
पितामहं महाभागं हुताशनपुरोगमाः ॥ ३४ ॥

शेवटी दैत्यांकडून देवतांचा पराभव झाला . तेव्हा इन्द्रादि समस्त देवगण अग्निदेवाला पुढे करून महाभाग पितामह श्रीब्रह्माला शरण गेले .

 


 
यथावत् कथितो देवैर्ब्रह्मा प्राह ततः सुरान् ।
 
परावरेशं शरणं व्रजध्वमसुरार्दनम् ॥ ३५ ॥
 
उत्पत्तिस्थितिनाशानामहेतुं हेतुमीश्वरम् ।
 
प्रजापतिपतिं विष्णुमनन्तमपराजितम् ॥ ३६ ॥
 
प्रधानपुंसोरजयोः कारणं कार्यभूतयोः ।
 
प्रणतार्तिहरं विष्णुं स वः श्रेयो विधास्यति ॥ ३७ ॥

देवतांकडून सम्पूर्ण वृतांत ऐकल्यावर श्रीब्रह्मा त्यांना म्हणाले, ‘ हे देवगण ! तुम्ही दैत्यदलन परमेश्वर भगवान विष्णुंना शरण जा, जो [आरोपामुळे] संसाराच्या उत्पत्ति, स्थिति व संहाराचे कारण आहे सुद्धा आणि [वास्तवात] नाही सुद्धा आणि जो चराचरांचा ईश्वर, प्रजापतिंचा स्वामी, सर्वव्यापक, अनंत आणि अजेय आहे तसेच जो अजन्मा किन्तु कार्यरूपात परिणत झालेल्या प्रधान [मूलप्रकृति] आणि पुरुषाचे कारण आहे व शरणागतवत्सल आहे . तो अवश्य तुमचे मंगल करील .

 


पराशर उवाचः
एवमुक्त्वा सुरान्सर्वान् ब्रह्मा लोकपितामहः ।
क्षीरोदस्योत्तरं तीरं तैरेव सहितो ययौ ॥ ३८ ॥

पराशर म्हणालेहे मैत्रेया ! सर्व देवगणांना असे सांगून लोकपितामह श्रीब्रह्मा देखील त्यांच्या बरोबर क्षीरसागराच्या उत्तरतटावर गेले .

 


 
स गत्वा त्रिदशैः सर्वैः समवेतः पितामहः ।
 
तुष्टाव वाग्भिरिष्टाभिः परावरपतिं हरिम् ॥ ३९ ॥

तिथे जाऊन पितामह ब्रह्माने समस्त देवतांसह परावरनाथ श्रीविष्णु भगवानांची अति मंगलमय वाक्यांनी स्तुति केली .



ब्रह्मोवाचः
नमामि सर्वं सर्वेशमनन्तमजमव्ययम् ।
लोकधाम धराधारमप्रकाशमभेदिनम् ॥ ४० ॥
नारायणमणीयांसमशेषाणामणीयसाम् ।
समस्तानां गरिष्ठं च भूरादीनां गरीयसाम् ॥ ४१ ॥

ब्रह्मा म्हणाले – जो समस्त अणुंपेक्षाही अणु आहे आणि पृथ्वी आदि समस्त गुरुंपेक्षाही [भारी पदार्थों] गुरु आहे त्या निखिललोकविश्राम, पृथ्वीचा आधारस्वरूप, अप्रकाश्य, अभेद्य, सर्वरूप, सर्वेश्वर, अनंत, अज आणि अव्यय नारायणाला मी नमस्कार करतो .

 

 

यत्र सर्वं यतः सर्वमुत्पन्नं मत्पुरःसरम् ।
सर्वभूतश्च यो देवः पराणामपि यः परः ॥ ४२ ॥
परः परस्मात्पुरुषात्परमात्मस्वरूपधृक् ।
योगिभिश्चिन्त्यते योऽसौ मुक्तिहेतोर्मुमुक्षुभिः ॥ ४३ ॥
सत्त्वादयो न सन्तीशे यत्र च प्राकृता गुणाः ।
स शुद्धः सर्वशुद्धेभ्यः पुमानाद्यः प्रसीदतु ॥ ४४ ॥

माझ्यासह समस्त जगत ज्याच्यात स्थित आहे, ज्यापासून उत्पन्न झाले आरे आणि जो देव सर्वभूतमय आहे तसेच जो पराहूनही [प्रधानादि] पर आहे; जो परपुरुषाहूनही पर आहे, मुक्ति-लाभासाठी मोक्षकामी मुनिजन ज्याचे ध्यान करतात तसेच ज्या ईश्वरात सत्त्वादि प्राकृतिक गुणां सर्वथा अभाव आहे तो समस्त शुद्ध पदार्थांहूनही परम शुद्ध परमात्मस्वरूप आदिपुरुष आमच्यावर प्रसन्न होवो .

 


 
कलाकाष्ठामुहूर्तादिकालसूत्रस्य गोचरे ।
 
यस्य शक्तिर्न शुद्धस्य स नो विष्णुः प्रसीदतु ॥ ४५ ॥

ज्या शुद्धस्वरूप भगवंताची शक्ति [विभूति] कला-काष्ठा व मुहर्त आदि काल-क्रमाचा विषय नाही, ते भगवान विष्णु आमच्यावर प्रसन्न होवोत .


प्रोच्यते परमेशो हि यः शुद्धोऽप्युपचारतः ।
प्रसीदतु स नो विष्णुरात्मा यः सर्वदेहिनाम् ॥ ४६ ॥

जो शुद्धस्वरूप असूनही उपचाराने परमेश्वर (परमा = महालक्ष्मी, ईश्वर = पति ) अर्थात लक्ष्मीपति म्हणवला जातो आणि जो समस्त देहधार्‍यांचा आत्मा आहे तो श्रीविष्णुभगवान आमच्यावर प्रसन्न होवो .

 

यः कारणं च कार्यं च कारणस्यापि कारणम् ।
 
कार्यस्यापि च यः कार्यं प्रसीदतु स नो हरिः ॥ ४७ ॥

जो कारण आणि कार्यरूप आहे तसेच कारणाचेही कारण आणि कार्याचेही कार्य आहे ते श्रीहरि आमच्यावर प्रसन्न होवोत .

 


 
कार्यकार्यस्य यत्कार्यं तत्कार्यस्यापि यः स्वयम् ।
 
तत्कार्यकार्यभूतो यस्ततश्च प्रणताः स्म तम् ॥ ४८ ॥

जो कार्याच्या [महत्तत्त्व] कार्याचाही [अहंकार] कार्य [तन्मात्रापंचक] आहे त्याच्या कार्याचाही [भूतपंचक] कार्य [ब्रह्मांड] जो स्वयं आहे आणि जो त्याच्या कार्याचाही [ब्रह्मा-द्क्षादि] कार्यभूत [प्रजापतींचे पुत्र-पौत्रादि] आहे त्याला आम्ही प्रणाम करतो .

 


कारणं कारणस्यापि तस्य कारणकारणम् ।
 
तत्कारणानां हेतुं तं प्रणताः स्म परेश्वरम् ॥ ४९ ॥

तसेच जो जगताच्या कारणाचे [ब्रह्मादि] कारण [ब्रह्मांड] आणि त्याच्या कारणाच्या [भूतपंचक] कारणाच्या [पंचतन्मात्रा] कारणांचाही [अहंकार – महत्तत्त्वादि] हेतु [मूलप्रकृति] आहे त्या परमेश्वराला आम्ही प्रणाम करतो .

 


भोक्तारं भोग्यभूतं च स्रष्टारं सृज्यमेव च ।
कार्यकर्तृस्वरूपं तं प्रणताः स्म परं पदम् ॥ ५० ॥

जो भोक्ता आणि भोग्य, स्रष्टा आणि सृज्य तथा कर्त्ता आणि कार्यरूप स्वयं आहे त्या परमपदाला आम्ही प्रणाम करतो .

 


 
विशुद्धबोधवन्नित्यमजमक्षयमव्ययम् ।
 
अव्यक्तमविकारं यत्तद्‌विष्णोः परमं पदम् ॥ ५१ ॥

जे विशुद्ध बोधस्वरूप, नित्य, अजन्मा, अक्षय, अव्यय, अव्यक्त आणि अविकारी आहे तेच विष्णुचे परमपद [परस्वरूप] आहे .

 


 
न स्थूलं न च सूक्ष्मं यन्न विशेषणगोचरम् ।
 
तत् पदं परमं विष्णोः प्रणमामि सदामलम् ॥ ५२ ॥

जे न स्थूल आहे न सूक्ष्म आणि अन्य कोणत्याही विशेषणाचा विषय नाही तेच भगवान विष्णुचे नित्य – निर्मल परमपद आहे, आम्ही त्याला प्रणाम करतो .

 


 
यस्यायुतायुतांशांशे विश्वशक्तिरियं स्थिता ।
 
परब्रह्मस्वरूपं यत्प्रणमामस्तमव्ययम् ॥ ५३ ॥

ज्याच्या अयुतांशाच्या [दहा हजारावा अंश] अयुतांशात ह्या विश्वरचनेची शक्ति स्थित आहे तथा जो परब्रह्म स्वरूप आहे त्या अव्ययाला आम्ही प्रणाम करतो .

 


यद्योगिनः सदोद्युक्ता पुण्यपापक्षयेऽक्षयम् ।
 
पश्यन्ति प्रणवे चिन्त्यं तद्विष्णोः परमं पदम् ॥ ५४ ॥

नित्य युक्त योगिगण आपल्या पुण्य–पापादिंचा क्षय झाल्यावर ॐकार द्वारा चिन्तनीय ज्या अविनाशी पदाचा साक्षात्कार करतात तेच भगवान विष्णुचे परमपद आहे .

 


 
यन्न देवा न मुनयो न चाहं न च शङ्‌करः ।
 
जानन्ति परमेशस्य तद्‌विष्णोः परमं पदम् ॥ ५५ ॥

ज्याला देवगण, मुनिगण, शंकर आणि मी, कोणीही जाणत नाही तेच परमेश्वर श्रीविष्णुचे परमपद आहे .

 

 

शक्तयो यस्य देवस्य ब्रह्मविष्णुशिवात्मिकाः ।
भवन्त्यभूतपूर्वस्य तद्‌विष्णोः परमं पदम् ॥ ५६ ॥

ज्या अभूतपूर्व देवाची ब्रह्मा, विष्णु आणि शिवरूप शक्ति आहेत तेच भगवान विष्णुचे परमपद आहे .

 


 
सर्वेश सर्वभूतात्मन्सर्व सर्वाश्रयाच्युत ।
 
प्रसीद विष्णो भक्तानां व्रज नो दृष्टिगोचरम् ॥ ५७ ॥

हे सर्वेश्वरा ! हे सर्वभूतात्मना ! हे सर्वरूपा ! हे सर्वाधारा ! हे अच्युता ! हे विष्णो ! आम्हा भक्तांवर प्रसन्न होऊन आम्हाला दर्शन द्या .

 


 
पराशर उवाचः
 
त्युदीरितमाकर्ण्य ब्रह्मणस्त्रिदशास्ततः ।
 
प्रणम्योचुः प्रसीदेति व्रज नो दृष्टिगोचरम् ॥ ५८ ॥

श्रीपराशर म्हणालेब्रह्माचे हे उद्गार ऐकून देवगणांनीही प्रणाम केला व म्हणाले –प्रभो ! आमच्यावर प्रसन्न होऊन आम्हाला दर्शन द्या .

 


 
यन्नायं भगवान् ब्रह्मा जानाति परमं पदम् ।
 
तं नताः स्मो जगद्धाम तव सर्वगताच्युत ॥ ५९ ॥

हे जगद्धाम सर्वगत अच्युता ! ज्याला हे भगवान ब्रह्मा देखील जाणत नाहीत , त्या आपल्या परमपदाला आम्ही प्रणाम करतो .

 



 
इत्यन्ते वचसस्तेषां देवानां ब्रह्मणस्तथा ।
 
ऊचुर्देवर्षयस्सर्वे बृहस्पतिपुरोगमाः ॥ ६० ॥

त्यानन्तर ब्रह्मा आणि देवगणांचे बोलून झाल्यावर बृहस्पति आदि समस्त देवर्षिगण बोलू लागले .

 


 
आद्यो यज्ञः पुमानीड्यो यः पूर्वेषां च पूर्वजः ।
 
तं नताः स्मो जगत्स्रष्टुः स्रष्टारमविशेषणम् ॥ ६१ ॥

जो परम स्तवनीय आद्य यज्ञ – पुरुष आहे आणि पूर्वजांचाही पूर्वमूल्य आहे त्या जगताच्या रचयिता निर्विशेष परमात्म्याला आम्ही नमस्कार करतो .

 


 
भगवन्भूतभव्येश यज्ञमूर्तिधराव्यय ।
 
प्रसीद प्रणतानां त्वं सर्वेषां देहि दर्शनम् ॥ ६२ ॥

हे भूत–भव्येश यज्ञमूर्तिधर भगवंता ! हे अव्यया ! आम्हा सर्व शरणागतांवर प्रसन्न व्हा आणि दर्शन द्या .

 


 
एष ब्रह्मा सहास्माभिः सहरुद्रैस्त्रिलोचनः ।
 
सर्वादित्यैः समं पूषा पावकोऽयं सहाग्निभिः ॥ ६३ ॥

 अश्विनौ वसवश्चेमे सर्वे चैते मरुद्‌गणाः ।
 
साध्या विश्वे तथा देवा देवेन्द्रश्चायमीश्वरः ॥ ६४ ॥
 
प्रणामप्रवणा नाथ दैत्यसैन्यपराजिताः ।
 
शरणं त्वामनुप्राप्ताः समस्ता देवतागणाः ॥ ६५ ॥

हे नाथा ! आमच्या सह हे ब्रह्मा, रुद्रांसह भगवान शंकर, बारहों आदित्यांसह भगवान पूषा, अग्निंच्यासह पावक आणि हे दोन्ही अश्विनीकुमार, आठही वसु, समस्त मरुद्रण, साध्यगण, विश्वेदेव तथा देवराज इंद्र हे सर्व देवगण दैत्यसेनेकडून पराजित होऊन अति प्रणत होऊन आपल्या शरणी आले आहेत .

 



 
पराशर उवाचः
 
एवं संस्तूयमानस्तु भगवाञ्छङ्‌खचक्रधृक् ।
 
जगाम दर्शनं तेषां मैत्रेय परमेश्वरः ॥ ६६ ॥

श्रीपराशर म्हणालेहे मैत्रेया ! अशाप्रकारे स्तुति केली गेल्यावर शंख-चक्रधारी भगवान परमेश्वर त्यांच्या समोर प्रकट झाले .

 


तं दृष्ट्‍वा ते तदा देवाः शङ्‌खचक्रगदाधरम् ।
 
अपूर्वरूपसंस्थानं तेजसां राशिमूर्जितम् ॥ ६७ ॥
 
प्रणम्य प्रणताः पूर्वं सङ्‍क्षोभस्तिमितेक्षणाः ।
 
तुष्टुवुः पुण्डरीकाक्षं पितामहपुरोगमाः ॥ ६८ ॥

तेव्हा त्या शंख – चक्रगदाधारी उत्कृष्ट तेजोराशिमय अपूर्व दिव्य मूर्तिला पाहून पितामह आदि समस्त देवगण अति विनयपूर्वक प्रणाम करून क्षोमवश चकित-नयन होऊन त्या कमलनयन भगवंताची स्तुति करू लागले .

 



 
देवा ऊचुः
 
नमो नमोऽविश्वेशस्त्वं ब्रह्मा त्वं पिनाकधृक् ।
 
इन्द्रस्त्वमग्निः पवनो वरुणः सविता यमः ।
 
वसवो मरुतः साध्या विश्वेदेवगणा भवान् ॥ ६९ ॥
 
देवगण म्हणालेहे प्रभो ! तुम्हाला नमस्कार आहे, नमस्कार आहे . तुम्ही निर्विशेष आहात तरीही तुम्हीच  ब्रह्मा आहात, तुम्हीच शंकर आहात तसेच तुम्हीच इंद्र, अग्नि, पवन, वरुण, सूर्य आणि यमराज आहात .

 


 
योऽयं तवाग्रतो देव समीपं देवतागणः ।
 
स त्वमेव जगत्स्रष्टा यतः सर्वगतो भवान् ॥ ७० ॥

हे देवा ! वसुगण, मरुद्गण, साध्यगण आणि विश्वेदेवगण देखील तुम्हीच आहात आणि तुमच्या समोर हा जो देवसमुदाय आहे, हे जगत्स्रष्टा ! तो देखील तुम्हीच आहात कारण तुम्ही सर्वत्र परिपूर्ण आहात .

 

 

त्वं यज्ञस्त्वं वषट्कारस्त्वमोङ्‌कारः प्रजापतिः ।
 
वेत्ता वेद्यं च सर्वात्मंस्त्वन्मयं चाखिलं जगत् ॥ ७१ ॥

तुम्हीच यज्ञ आहात, तुम्हीच वषटकार आहात तथा तुम्हीच ॐकार आणि प्रजापति आहात . हे सर्वात्मना ! विद्या, वेद्य आणि सम्पूर्ण जगत तुमचेच  स्वरूप आहे .

 


 
त्वामार्ताः शरणं विष्णो प्रयाता दैत्यनिर्जिताः ।
 
वयं प्रसीद सर्वात्मंस्तेजसाप्याययस्व नः ॥ ७२ ॥

हे विष्णो ! दैत्यांकडून पराभूत झालेले आम्ही आतुर होऊन तुम्हाला शरण आलो आहोत, हे सर्वस्वरूपा ! तुम्ही आमच्यावर प्रसन्न आणि आपल्या तेजाने आम्हाला सशक्त करा .



 
तावदार्तिस्तथा वाञ्छा तावन्मोहस्तथासुखम् ।
 
यावन्न याति शरणं त्वामशेषाघनाशनम् ॥ ७३ ॥

हे प्रभो ! जोवर जीव सम्पूर्ण पापांना नष्ट करणार्‍या तुम्हाला शरण नाहीं जात तोवर त्याच्यात दीनता, इच्छा, मोह आणि दुःख आदि वास करतात .

 


 
त्वं प्रसादं प्रसन्नात्मन् प्रपन्नानां कुरुष्व नः ।
 
तेजसां नाथ सर्वेषां स्वशक्त्याप्यायनं कुरु ॥ ७४ ॥

हे प्रसन्नात्मना ! आम्हा शरणागतांवर तुम्ही प्रसन्न व्हा आणि हे नाथा ! आपल्या शक्तिने आम्हा सर्व देवतांच्या   तेजाला परत सशक्त करा .


 
पराशर उवाचः
 
एवं संस्तूयमानस्तु प्रणतैरमरैर्हरिः ।
 
प्रसन्नदृष्टिर्भगवानिदमाह स विश्वकृत् ॥ ७५ ॥
 
पराशर म्हणाले – विनीत देवतांद्वारा अशाप्रकारे स्तुति केली गेल्यावर विश्वकर्मा भगवान हरि प्रसन्न होऊन म्हणाले .



 
तेजसो भवतां देवाः करिष्याम्युपबृंहणम् ।
 
वदाम्यहं यत्क्रियतां भवद्‌भिस्तदिदं सुराः ॥ ७६ ॥

हे देवगणानो ! मी तुमचे तेज परत वाढविन, तुम्ही आता मी सांगतो तसं करा .

 


 
आनीय सहिता दैत्यैः क्षीराब्धौ सकलौषधीः ।
 
प्रक्षिप्यात्रामृतार्थं ताः सकला ऐत्यदानव्वैः
 
मन्थानं मन्दरं कृत्वा नेत्रं कृत्वा तु वासुकिम् ॥ ७७ ॥
 
मथ्यताममृतं देवाः सहाये मय्यवस्थिते ॥ ७८ ॥

तुम्ही दैत्यांसोबत सम्पूर्ण ओषधी आणून अमृतासाठी क्षीर-सागरात घाला आणि मन्दराचल पर्वताला घुसळण्याची रवी तसेच वासुकि नागाला दोरी बनवून दैत्य आणि दानवांसोबत माझ्या मदतिने मंथन करून अमृत काढा .

 


 
सामपूर्वं च दैतेयास्तत्र साहाय्यकर्मणि ।
 
सामान्यफलभोक्तारो यूयं वाच्या भविष्यथ ॥ ७९ ॥

तुम्ही सामनीतिचे अवलम्बन करून दैत्यांना सांगा किह्या कामात सहायता केल्यास तुम्हाला देखील प्राप्त फळाचा समान भाग मिळेल' .

 


 
मथ्यमाने च तत्राब्धौ यत्समुत्पद्यतेऽमृतम् ।
 
तत्पानाद्‌बलिनो यूयममराश्च भविष्यथ ॥ ८० ॥

समुद्र मंथनातून जे अमृत प्राप्त होईल ते प्यायल्याने तुम्ही सबल आणि अमर व्हाल .

 


 
तथा चाहं करिष्यामि ते यथा त्रिदशद्विषः ।
 
न प्राप्स्यन्त्यमृतं देवाः केवलं क्लेशभागिनः ॥ ८१ ॥

हे देवगण ! तुमच्यासाठी मी अशी युक्ति करेन ज्यामुळे तुमच्यावर द्वेष करणार्‍या दैत्यांना अमृत मिळू शकणार नाही आणि त्यांच्या वाट्याला केवळ समुद्र-मंथनाचा क्लेशच येईल .

 


पराशर उवाचः
इत्युक्ता देवदेवेन सर्व एव ततः सुराः ।
संधानमसुरैः कृत्वा यत्नवन्तोऽमृतेऽभवन् ॥ ८२ ॥

पराशर म्हणालेतेव्हा देवदेव भगवान विष्णुंच्या अशा सांगण्यावर सर्व देवगण दैत्यांसोबत संधि करून अमृतप्राप्तिसाठी प्रयत्न करू लागले .

 


 
नानौषधीः समानीय देवदैतेयदानवाः ।
क्षिप्त्वा क्षीराब्धिपयसि शरदभ्रामलत्विषि ॥ ८३ ॥
 
मन्थानं मन्दरं कृत्वा नेत्रं कृत्वा च वासुकिम् ।
 
ततो मथितुमारब्धा मैत्रेय तरसामृतम् ॥ ८४ ॥

हे मैत्रेया ! देव, दानव व दैत्यांनी नाना प्रकारच्या औषधी आणून त्यांना शरद – ऋतूतील आकाशासमान निर्मल कान्तिच्या क्षीर-सागराच्या जलात टाकले आणि मन्दराचलाला रवी तथा वासुकि नागाला दोरी बनवून अतिशय वेगाने अमृत मंथनाचा आरम्भ केला .

 


 
विबुधाः सहिताः सर्वे यतः पुच्छं ततः कृताः ।
 
कृष्णेन वासुकेर्दैत्याः पूर्वकाये निवेशिताः ॥ ८५ ॥

भगवंताने ज्या बाजूला वासुकिची शेपूट होती तिथे देवतांना आणि जिथे त्याचे मुख होते तिथे दैत्यांना नियुक्त केले .

 


 
ते तस्य मुखनिश्वासवह्निनापहतत्विषः ।
 
निस्तेजसोऽसुराः सर्वे बभूवुरमितौजसः ॥ ८६ ॥

महातेजस्वी वासुकिच्या मुखातून निघणार्‍या नि:श्वासाग्नित होरपळून सर्व दैत्यगण निस्तेज झाले .

 


 
तेनैव मुखनिश्वासवायुनास्तबलाहकैः ।
 
पुच्छप्रदेशे वर्षद्‌भिस्तदा चाप्यायिताः सुराः ॥ ८७ ॥

आणि त्याच श्वास-वायुने विक्षिप्त झालेले  मेघ शेपटाकडे वृष्टि करत राहिल्याने देवतांची शक्ति वाढत गेली .

 


 
क्षीरोदमध्ये भगवान्कूर्मरूपी स्वयं हरिः ।
 
मन्दराद्रेरधिष्ठानं भ्रमतोऽभून्महामुने ॥ ८८ ॥

हे महामुने ! भगवान स्वयं कूर्मरूप धारण करून क्षीर सागरात फिरणार्‍या मन्दराचलाचे आधार बनले .

 

रूपेणान्येन देवानां मध्ये चक्रगदाधरः ।
 
चकर्ष नागराजानं दैत्यमध्येऽपरेण च ॥ ८९ ॥

आणि तेच चक्र–गदाधर भगवान आपल्या आणखी एका अन्य रूपाने देवतांमध्ये आणि आणखी एका रूपाने दैत्यांमध्ये मिळून नागराजाला खेचू लागले .

 


 
उपर्याक्रान्तवाञ्छैलं बृहद्‌रूपेण केशवः ।
 
तथापरेण मैत्रेय यन्न दृष्टं सुरासुरैः ॥ ९० ॥

तथा हे मैत्रेया ! एका अन्य विशाल रूपाने जे देवता आणि दैत्यांना दिसत नव्हते, श्रीकेशवाने वरून पर्वताला दाबून ठेवले होते .

 


तेजसा नागराजानं तथाप्यायितवान्हरिः ।
 
अन्येन तेजसा देवानुपबृंहितवान्प्रभुः ॥ ९१ ॥

भगवान श्रीहरि आपल्या तेजाने नागराज वासुकिमध्ये  बळाचा संचार करत होते आणि आपल्या अन्य तेजाने ते देवतांचे बळ वाढवत होते .



मथ्यमाने ततस्तस्मिन्क्षीराब्धौ देवदानवैः ।
 
हविर्धामाभवत्पूर्वं सुरभिः सुरपूजिता ॥ ९२ ॥

अशाप्रकारे देवता आणि दानवांद्वारा क्षीर-समुद्राच्या मंथनाने सर्वप्रथम हवि [यज्ञ-सामग्री] ची आश्रयरूपा सुरपूजिता कामधेनु उत्पन्न झाली .

 


 
जग्मुर्मुदं ततो देवा दानवाश्च महामुने ।
 
व्याक्षिप्तचेतसश्चैव बभूवुः स्तिमितेक्षणाः ॥ ९३ ॥

हे महामुने ! त्यावेळी देव आणि दानवगण अति आनंदित झाले आणि तिच्याकडे चित्त खेचले गेल्याने ते विस्मित होऊन तिला बघत राहिले  .

 


 
किमेतदिति सिद्धानां दिवि चिन्तयतां ततः ।
 
बभूव वारुणी देवी मदाघूर्णितलोचना ॥ ९४ ॥

मग स्वर्गलोकात  ‘हे काय आहे ? हे काय आहे ? ‘ असा विचार करणार्‍या सिद्धांसमोर मदाने परिपूर्ण लोचनांची वारुणीदेवी प्रकट झाली .

 


 
कृतावर्तात्ततस्तस्मात्क्षीरोदाद्‌वासयञ्जगत् ।
 
गन्धेन पारिजातोऽभूद्‌देवस्त्रीनन्दनस्तरुः ॥ ९५ ॥

आणि पुन्हा मंथन केल्यावर त्या क्षीर-सागरातून, आपल्या गंधाने, त्रैलोक्याला सुगन्धित करणारा व सुर-सुन्दरींचा आनंदवर्धक कल्पवृक्ष उत्पन्न झाला .

 


 
रूपौदार्यगुणोपेतस्तथा चाप्सरसां गणः ।
 
क्षीरोदधेः समुत्पन्नो मैत्रेय परमाद्‌भुतः ॥ ९६ ॥

हे मैत्रेया ! तत्पश्चात क्षीर-सागरातून रूप आणि उदारता आदि गुणांनी युक्त अति अद्भुत अप्सरा प्रकट झाल्या .

 


 
ततः शीतांशुरभवज्जगृहे तं महेश्वरः ।
 
जगृहुश्च विषं नागाः क्षीरोदाब्धिसमुत्थितम् ॥ ९७ ॥

नंतर चन्द्रमा प्रकट झाला ज्याला महादेवाने ग्रहण केले. त्याचप्रमाणे क्षीर सागरातून उत्पन्न झालेले विष नागांनी ग्रहण केले .

 

ततो धन्वन्तरिर्देवः श्वेताम्बरधरस्स्वयम् ।
बिभ्रत्कमण्डलुं पूर्णममृतस्य समुत्थितः ॥ ९८ ॥

नंतर श्वेतवस्त्रधारी साक्षात भगवान धन्वन्तरी अमृताने  भरलेले कमण्डलु घेऊन प्रकट झाले .

 


 
ततः स्वस्थमनस्कास्ते सर्वे दैतेयदानवाः ।
 
बभूवुर्मुदिताः सर्वे मैत्रेय मुनिभिः सह ॥ ९९ ॥

हे मैत्रेया ! त्यावेळी मुनिगणां सहित समस्त दैत्य आणि दानवगण स्वस्थ-चित्त होऊन अति प्रसन्न झाले .

 


 
ततः स्फुरत्कान्तिमती विकासिकमले स्थिता ।
 
श्रीर्देवी पयसस्तस्मादुद्‌भूता धृतपङ्‌कजा ॥ १०० ॥
त्यानंतर विकसित कमळावर विराजमान स्फुटकान्तिमयी हातात कमल-पुष्प धारण केलेली श्रीलक्ष्मीदेवी क्षीरसमुद्रातून प्रकट झाली .

 


 
तां तुष्टुवुर्मुदा युक्ताः श्रीसूक्तेन महर्षयः ॥ १०१ ॥
 
विश्वावसुमुखास्तस्या गन्धर्वाः पुरतो जगुः ।
 
घृताचीप्रमुखास्तत्र ननृतुश्चाप्सरोगणाः ॥ १०२ ॥

त्यावेळी महर्षिगण अति प्रसन्नतापूर्वक श्रीसुक्तद्वारा तिची स्तुति करू लागले तथा विश्वावसु आदि गन्धर्वगण तिच्या समोर गान आणि घृताची आदि अप्सरा नृत्य करू लागल्या .

 

 

गङ्‌गाद्याः सरितस्तोयैः स्नानार्थमुपतस्थिरे ।
 
दिग्गजा हेमपात्रस्थमादाय विमलं जलम् ।
 
स्नापयाञ्चक्रिरे देवीं सर्वलोकमहेश्वरीम् ॥ १०३ ॥

तिला आपल्या जलाने स्नान घालायला गंगा आदि नद्या स्वयं उपस्थित झाल्या आणि दिग्गजांनी सुवर्ण कलशांमध्ये भरलेल्या त्यांच्या निर्मल जलाने  सर्वलोक महेश्वरी श्रीलक्ष्मीदेवीला स्नान घातले .

 


 
क्षीरोदो रूपधृक्तस्यै मालामम्लानपङ्‌कजाम् ।
 
ददौ विभूषणान्यङ्‌गे विश्वकर्मा चकार ह ॥ १०४ ॥

क्षीर-सागराने मूर्तिमान होऊन तिला विकसित कमल-पुष्पांची माला दिली तर विश्वकर्माने तिच्या अंग-प्रत्यंगात विविध आभूषणे चढविली .

 


 
दिव्यमाल्याम्बरधरा स्नाता भूषणभूषिता ।
 
पश्यतां सर्वदेवानां ययौ वक्षःस्थलं हरेः ॥ १०५ ॥

अशाप्रकारे दिव्य माला आणि वस्त्र धारण करून, दिव्य जलाने स्नान करून, दिव्य आभूषणांनी विभूषित होऊन श्रीलक्ष्मी सम्पूर्ण देवता पाहात असता श्रीविष्णु भगवानांच्या वक्ष:स्थलात  विराजमान झाली .


 
तया विलोकिता देवा हरिवक्षःस्थलस्थया ।
 
लक्ष्म्या मैत्रेय सहसा परां निर्वृतिमागताः ॥ १०६ ॥

हे मैत्रेया ! श्रीहरिच्या वक्ष:स्थलात विराजमान श्रीलक्ष्मीचे दर्शन करून देवतांना अकस्मात अत्यंत प्रसन्नता प्राप्त झाली .

 

 

उद्वेगं परमं जग्मुर्दैत्या विष्णुपराङ्‌मुखाः ।
 
त्यक्ता लक्ष्म्या महाभाग विप्रचित्तिपुरोगमाः ॥ १०७ ॥

आणि हे महाभाग् ! लक्ष्मीपासून परित्यक्त झाल्याने भगवान विष्णुचे विरोधी विप्रचित्ति आदि दैत्यगण परम उद्दिग्न (व्याकुळ) झाले .

 


ततस्ते जगृहुर्दैत्या धन्वन्तरिकरस्थितम् ।
 
कमण्डलुं महावीर्या यत्रास्तेऽमृतमृतम् ॥ १०८ ॥

तेव्हा त्या महाबलवान दैत्यांनी श्रीधन्वन्तरिंच्या हातून तो कमंडलु खेचून घेतला ज्यात अति उत्तम अमृत भरलेले होते .

 


 
मायया मोहयित्वा तान्विष्णुः स्त्रीरूपमास्थितः ।
 
दानवेभ्यस्तदादाय देवेभ्यः प्रददौ विभुः ॥ १०९ ॥

म्हणून स्त्री (मोहिनी) रूपधारी भगवान विष्णुने आपल्या मायेने दानवांना मोहित करून त्यांच्याकडून तो कमण्डलु घेऊन देवतांना दिला .

 


 
ततः पपुः सुरगणाः शक्राद्यास्तत्तदाऽमृतम् ।
 
उद्यतायुधनिस्त्रिंशा दैत्यास्तांश्च समभ्ययुः ॥ ११० ॥
 
तेव्हा इंद्र आदि देवगणांनी ते अमृत पिऊन टाकले; त्यामुळे दैत्य अति तीक्ष्ण खंड आदि शस्त्रांसह त्यांच्यावर तुटून पडले .

 


 
पीतेऽमृते च बलिभिर्देवैर्दैत्यचमूस्तदा ।
 
बध्यमाना दिशो भेजे पातालं च विवेश वै ॥ १११ ॥

पण अमृत-पानामुळे बलवान झालेल्या देवतांद्वारा मारले जाऊन दैत्यांची संपूर्ण सेना दशदिशांना धावून गेश काही दैत्य पाताळलोकी देखील गेले .

 

 

ततो देवा मुदा युक्ताः शङ्‌खचक्रगदाभृतम् ।
 
प्रणिपत्य यथापूर्वमाशासत्तत्त्रिविष्टपम् ॥ ११२ ॥

मग देवगण प्रसन्नतापूर्वक शंख–चक्र–गदा-धारी भगवंताला प्रणाम करून पहिल्यासारखे स्वर्गाचे शासन करू लागले .

 


ततः प्रसन्नभाः सूर्यः प्रययौ स्वेन वर्त्मना ।
 
ज्योतींषि च यथामार्गं प्रययुर्मुनिसत्तम ॥ ११३ ॥

हे मुनिश्रेष्ठा ! तेव्हापासून प्रखर तेजोयुक्त भगवान सूर्य आपल्या मार्गाने तसेच अन्य तारांगण देखील आपआपल्या मार्गाने चालू लागले .

 


जज्वाल भगवांश्चोच्चैश्चारु दीप्ति र्विभावसुः ।
 
धर्मे च सर्वभूतानां तदा मतिरजायत ॥ ११४ ॥

सुंदर दीप्तिशाली भगवान अग्निदेव अत्यंत प्रज्वलित झाले व तेव्हापासूनच समस्त प्राणी धर्मामध्ये प्रवृत्त झाले .

 

 

 त्रैलोक्यं च श्रिया जुष्टं च बभूव द्विजसत्तम ।
 
शक्रश्च त्रिदशश्रेष्ठः पुनः श्रीमानजायत ॥ ११५ ॥

हे द्विजोत्तमा ! त्रेलोक्य श्रीसंपन्न झाले व देवतांमध्ये श्रेष्ठ इंद्र पुन: श्रीमान झाले .

 


 
सिंहासनगतः शक्रः सम्प्राप्य त्रिदिवं पुनः ।
 
देवराज्ये स्थितो देवीं तुष्टावाब्जकरां ततः ॥ ११६ ॥

त्यानंतर इंद्राने स्वर्गलोकात जाऊन परत देवराज्यावर अधिकार मिळविला आणि और राजसिंहासनावर आरूढ़ होऊन पद्महस्ता श्रीलक्ष्मीची अशाप्रकारे स्तुति केली .

 

इन्द्र उवाचः
नमस्ये सर्वलोकानां जननीमब्जसम्भवाम् ।
श्रियमुन्निद्रपद्माक्षीं विष्णुवक्षःस्थल स्थिताम् ॥ ११७ ॥

इंद्र म्हणालासम्पूर्ण लोकांची जननी, विकसित कमलासमान नेत्र असलेली, भगवान विष्णुच्या वक्ष:स्थलात विराजमान कमलोद्भवा श्रीलक्ष्मीदेवीला मी नमस्कार करतो .

 


पद्मालयां पद्मकरां पद्मपत्रनिभेक्षणाम् ।
वन्दे पद्ममुखीं देवीं पद्मनाभप्रियामहम् ॥ ११८ ॥

कमळ हेच जिचे निवासस्थान आहे, कमळ हेच जिच्या कर-कमलात सुशोभित आहे, तथा कमल-दला समानच  जिचे नेत्र आहेत त्या कमलमुखी कमलनाथ-प्रिया श्रीकमलादेवीची मी वन्दना करतो .

 


 
त्वं सिद्धिस्त्वं स्वधा स्वाहा सुधा त्वं लोकपावनी ।
 
संध्या रात्रिः प्रभा भूतिर्मेधा श्रद्धा सरस्वती ॥ ११९ ॥

हे देवि ! तु सिद्धि , स्वधा , स्वाहा , सुधा आहेस आणि त्रैलोक्याला पवित्र करणारी आहेस तसेच तुच संध्या, रात्रि, प्रभा, विभूति, मेधा, श्रद्धा आणि सरस्वती आहेस .



यज्ञविद्या महाविद्या गुह्यविद्या च शोभने ।
 
आत्मविद्या च देवि त्वं विमुक्तिफलदायिनी ॥ १२० ॥

हे शोभने ! यज्ञ-विद्या (कर्म-काण्ड), महाविद्या (उपासना) आणि गुह्यविद्या (इंद्रजाल) तुच आहेस तथा हे देवि ! तुच मुक्ति-फल-दायिनी आत्मविद्या आहेस .

 


 
आन्वीक्षिकी त्रयीवार्ता दण्डनीतिस्त्वमेव च ।
 
सौम्यासौम्यैर्जगद्‌रूपैस्त्वयैतद्‌देवि पूरितम् ॥ १२१ ॥

हे देवि ! आन्विक्षीकी (तर्कविद्या), वेदत्रयी, वार्ता (शिल्पवानिज्यादि) आणि दंडनिति (राजनीति) सुद्धा तुच आहेस . तुच आपल्या शांत आणि उग्र रूपांनी हा समस्त संसार व्यापलेला आहेस .

 


का त्वन्या त्वामृते देवि सर्वयज्ञमयं वपुः ।
 
अध्यास्ते देवदेवस्य योगिचिन्त्यं गदाभृतः ॥ १२२ ॥

हे देवि ! तुझ्या शिवाय अशी कोण अन्य स्त्री आहे जी देवदेव भगवान गदाधराच्या योगिजन चिंतित सर्वयज्ञमय शरीराचा आश्रय प्राप्त करू शकेल .

 


त्वया देवि परित्यक्तं सकलं भुवनत्रयम् ।
विनष्टप्रायमभवत्त्वयेदानीं समेधितम् ॥ १२३ ॥

हे देवि ! तु संपूर्ण त्रैलोक्याचा त्याग केलास तेव्हा ते नष्टप्राय झाले होते, आता तुच त्याला पुन: जीवन-दान दिले आहेस .

 


दाराः पुत्रास्तथागारसुहृद्धान्यधनादिकम् ।
 
भवत्येतन्महाभागे नित्यं त्वद्वीक्षणान्नृणाम् ॥ १२४ ॥

हे महाभागे ! स्त्री, पुत्र, गृह, धन, धान्य तथा सुह्रद हे सर्व सदैव तुझ्याच कटाक्षामुळे मनुष्यांना मिळतात .

 


 
शरीरारोग्यमैश्वर्यमरिपक्षक्षयः सुखम् ।
 
देवि त्वद्दृष्टिदृष्टानां पुरुषाणां न दुर्लभम् ॥ १२५ ॥

हे देवि ! तुझ्या कृपादृष्टिला पात्र असलेल्या पुरुषांसाठी शारीरिक आरोग्य, ऐश्वर्य, शत्रु-पक्षाचा नाश आणि सुख आदि काहीही दुर्लभ नाही .

 

 

त्वं माता सर्वभूतानां देवदेवो हरिः पिता ।
 
त्वयैतद्‌विष्णुना चाम्ब जगद्‌व्याप्तं चराचरम् ॥ १२६ ॥

तु सम्पूर्ण लोकाची माता आहेस व देवदेव भगवान हरि पिता आहेत . हे माते ! तुझ्या आणि श्रीविष्णुभगवंता पासूनच हे सर्व चराचर जगत व्याप्त आहे .

 


 
मा नः कोशं तथा गोष्ठं मा गृहं मा परिच्छदम् ।
 
मा शरीरं कलत्रं च त्यजेथाः सर्वपावनि ॥ १२७ ॥

हे सर्वपावनि मातेश्वरि ! आमच्या कोश (खजाना), गोष्ठ (पशु-शाला), गृह, भोगसामग्री, शरीर आणि स्त्री आदिंचा तु कधीही त्याग करू नकोस अर्थात त्यांच्यात भरपूर राहा .

 


मा पुत्रान्मा सुहृद्वर्गं मा पशून्मा विभूषणम् ।
त्यजेथा मम देवस्य विष्णोर्वक्षः स्थलालये ॥ १२८ ॥

अग्नि विष्णुवक्ष:स्थल निवासिनि ! आमचे पुत्र, सुह्रद, पशु आणि भूषण आदिंना कधीही सोडून जाऊ नकोस .

 


 
सत्त्वेन सत्यशौचाभ्यां तथा शीलादिभिर्गुणैः ।
 
त्यज्यन्ते ते नराः सद्यः संत्यक्ता ये त्वयामले ॥ १२९ ॥

हे अमले ! ज्या मनुष्यांना तू सोडून जातेस त्यांचा सत्त्व (मानसिक बल), सत्य, शौच आणि शील आदि गुण सुद्धा शीघ्र त्याग करतात .

 


त्वयावलोकिताः सद्यः शीलाद्यैरखिलैर्गुणैः ।
 
कुलैश्वर्यैश्च युज्यन्ते पुरुषा निर्गुणा अपि ॥ १३० ॥

आणि तुझी कृपा- दृष्टि झाल्यावर तो गुणहीन पुरुष सुद्धा लवकरच शील आदि सम्पूर्ण गुण आणि कुलीनता तथा ऐश्वर्य आदिंनी सम्पन्न होतो .

 


 
स श्लाघ्यः स गुणी धन्यः स कुलीनः स बुद्धिमान् ।
 
स शूरः स च विक्रान्तो यस्त्वया देवि वीक्षितः ॥ १३१ ॥

हे देवि ! ज्याच्यावर तुझी कृपादृष्टि आहे तोच प्रशंसनीय आहे, तोच गुणी आहे, तोच धन्यभाग्य आहे , तोच कुलीन आणि बुद्धिमान आहे तथा तोच शूरवीर आणि पराक्रमी आहे .

 


 
सद्यो वैगुण्यमायान्ति शीलाद्याः सकला गुणाः ।
 
पराङ्‌मुखी जगद्धात्री यस्य त्वं विष्णुवल्लभे ॥ १३२ ॥

हे विष्णुप्रिये ! हे जगज्जननि ! तु ज्याला विमुख आहेस त्याचे शील आदि सर्व गुण त्वरित अवगुणरूप होतात .

 


 
न ते वर्णयितुं शक्ता गुणाञ्जिह्वापि वेधसः ।
 
प्रसीद देवि पद्माक्षि मास्मांस्त्याक्षीः कदाचन ॥ १३३ ॥

हे देवि ! तुझ्या गुणांचे वर्णन करायला श्रीब्रह्माची रसना देखुल समर्थ नाही . अत: हे कमलनयने ! आता माझ्यावर प्रसन्न हो मला सोडून कधीच जाऊ नकोस .

 


 
पराशर उवाचः
 
एवं श्रीः संस्तुता सम्यक् प्राह हृष्टा शतक्रतुम् ।
 
शृण्वतां सर्वदेवानां सर्वभूतस्थिता द्विज ॥ १३४ ॥

पराशरजी म्हणालेहे द्विजा ! अशाप्रकारे सम्यक स्तुति केली गेल्यावर सर्वभूतस्थित श्रीलक्ष्मी सर्व देवतां ऐकत असता इंद्राला असे म्हणाली .

 


श्रीरुवाचः
 
परितुष्टास्मि देवेश स्तोत्रेणानेन ते हरे ।
 
वरं वृणीष्व यस्त्विष्टो वरदाहं तवागता ॥ १३५ ॥
 
श्रीलक्ष्मी म्हणालीहे देवेश्वर इंद्रा ! मी तुझ्या ह्या स्तोत्राने अति प्रसन्न झाले आहे . तुला हवा तो वर माग. मी तुला वर देण्यासाठीच इथे आले आहे  .



इन्द्र उवाचः
वरदा यदि मे देवि वरार्हो यदि चाप्यहम् ।
त्रैलोक्यं न त्वया त्याज्यमेष मेऽस्तु वरः परः ॥ १३६ ॥

इंद्र म्हणालाहे देवि ! जर तू वर देऊ इच्छितेस आणि मी जर वर प्राप्त करण्या योग्य असेन तर मला पहिला वर हाच दे की तू कधीही ह्या त्रैलोक्याचा त्याग करणार नाहीस .

 

 

स्तोत्रेण यस्तथैतेन त्वां स्तोष्यत्यब्धिसम्भवे ।
 
स त्वया न परित्याज्यो द्वितीयोऽस्तु वरो मम ॥ १३७ ॥

आणि हे समुद्रसम्भवे ! दूसरा वर मला हा दे कि जो कोणी तुझी ह्या स्तोत्राने स्तुति करेल त्याचा तु कधीच त्याग करणार नाहीस .




 
श्रीरुवाचः
 
त्रैलोक्यं त्रिदशश्रेष्ठ न संत्यक्ष्यामि वासव ।
 
दत्तो वरो मया यस्ते स्तोत्राराधनतुष्टया ॥ १३८ ॥

श्रीलक्ष्मी म्हणालीहे देवश्रेष्ठ इंद्रा ! मी आता हा त्रिलोक कधीही सोडणार नाही . तुझ्या स्तोत्राने प्रसन्न होऊन मी तुला हा वर देते .

 

 

यश्च सायं तथा प्रातः स्तोत्रेणानेन मानवः ।
 
मां स्तोष्यति न तस्याहं भविष्यामि पराङ्‌मुखी ॥ १३९ ॥

तसेच जो कोणी मनुष्य प्रात:काळ व सायंकाळी ह्या स्तोत्राने माझी स्तुति करेल त्याला मी कधीही विमुख  होणार नाही .



 
पराशर उवाचः
 
एवं ददौ वरौ देवी देवराजाय वै पुरा ।
 
मैत्रेय श्रीर्महाभागा स्तोत्राराधनतोषिता ॥ १४० ॥
पराशर म्हणालेहे मैत्रेया ! अशाप्रकारे पूर्वकाळी महाभागा श्रीलक्ष्मीने देवराजाच्या स्तोत्ररूप आराधनेने संतुष्ट होऊन त्याला हे वर दिले .

 

भृगोः ख्यात्यां समुत्पन्ना श्रीः पूर्वमुदधेः पुनः ।
 
देवदानवयत्नेन प्रसूतामृतमन्थने ॥ १४१ ॥

लक्ष्मी आधी भृगु द्वारा ख्याति नामक स्त्रीपासून उत्पन्न झाली होती, नंतर अमृत-मंथनाच्या वेळी देव व दानवांच्या प्रयत्नांनी ती समुद्रातून प्रकट झाली .


 
एवं यदा जगत्स्वामी देवदेवो जनार्दनः ।
 
अवतारं करोत्येषा तदा श्रीस्तत्सहायिनी ॥ १४२ ॥

अशाप्रकारे संसाराचे स्वामी देवाधिदेव श्रीविष्णुभगवान जेव्हा जेव्हा अवतार धारण करतात तेव्हा लक्ष्मी त्यांच्या सोबत राहाते .

 


 
पुनश्च पद्मा सम्भूता आदित्योऽभूद्‌यदा हरिः ।
 
यदा तु भार्गवो रामस्तदाभूद्‌धरणी त्वियम् ॥ १४३ ॥

जेव्हा श्रीहरि आदित्यरूप झाले तेव्हा ती पद्मापासून पुन्हा उत्पन्न झाली आणि पद्मा नावाने ओळखली गेली तसेच जेव्हा ते परशुराम झाले तेव्ही ही पृथ्वी झाली .

 


 
राघवत्वेऽभवत्सीता रुक्मिणी कृष्णजन्मनि ।
 
अन्येषु चावतारेषु विष्णोरेषानपायिनी ॥ १४४ ॥

श्रीहरि राम झाले तेव्हा ती सीता झाली आणि कृष्णावताराच्या वेळी श्रीरुक्मिणी झाली. अशाप्रकारे अन्य अवतारांच्या वेळीही ती भगवंतापासून कधीच वेगळी होत नाही .

 


 
देवत्वे देवदेहेयं मनुष्यत्वे च मानुषी ।
 
विष्णोर्देहानुरूपां वै करोत्येषात्मनस्तनुम् ॥ १४५ ॥

भगवंत देवरूप झाल्यावर ती दिव्य शरीर धारण करते व मनुष्य झाल्यावर मानवीरूपात प्रकट होते है. विष्णु भगवानाच्या शरीराला अनुरूप असेच आपले देखील शरीर ही बनवते .

 


 
यश्चैतच्छृणुयाज्जन्म लक्ष्म्या यश्च पठेन्नरः ।
 
श्रियो न विच्युतिस्तस्य गृहे यावत्कुलत्रयम् ॥ १४६ ॥

जो मनुष्य लक्ष्मीच्या जन्माची ही कथा ऐकेल किंवा वाचेल त्याच्या घरी तीन कुळांपर्यंत कधीही लक्ष्मीचा नाश होणार नाही .

 


 
पठ्यते येषु चैवेयं गृहेषु श्रीस्तुतिर्मुने ।
 
अलक्ष्मीः कलहाधारा न तेष्वास्ते कदाचन ॥ १४७ ॥

हे मुने ! ज्या घरांमध्ये लक्ष्मीच्या ह्या स्तोत्राचा पाठ होतो तिथे कलहाला आधारभूत असलेली दरिद्रता कधीच वास करू शकत नाही .

 

 

एतत्ते कथितं ब्रह्मन्यन्मां त्वं परिपृच्छसि ।
क्षीराब्धौ श्रीर्यथा जाता पूर्वं भृगुसुता सती ॥ १४८ ॥

हे ब्रह्मन् ! तु जे मला विचारले होतेस की आधी भृगुची पुत्री होऊन नंतर परत लक्ष्मी क्षीर-समुद्रातून कशी उत्पन्न झाली त्यासंबंधी मी तुला हा सर्व वृत्तांत सांगितला .

 


 
इति सकलविभूत्यवाप्तिहेतुः
स्तुतिरियमिन्द्रमुखोद्गता हि लक्ष्म्याः ।
अनुदिनमिह पठ्यते नृभिर्यै-
र्वसति न तेषु कदाचिदप्यलक्ष्मीः ॥ १४९ ॥

अशाप्रकारे इंद्राच्या मुखातून प्रकट झालेली ही लक्ष्मीची  स्तुति सकल विभूतिंच्या प्राप्तिचे कारण आहे, जे लोक हिचे नित्य पठण करतील त्यांच्या घरी निर्धनता कधीच नाही राहू शकत .

 




            इति श्रीविष्णुपुराणे प्रथमे अंशे नवमोऽध्यायः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, तृतीय अंश, त्रयोदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 3 , Adhyay 13

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ तृतीयः अंशः ॥ त्रयोदशोऽध्यायः ॥   आभ्युदयिक श्राद्ध , प्रेतकर्म तथा श्राद्धादि विचार और्व उवाच सचैलस्य पितुः ...