गुरुवार, १८ डिसेंबर, २०२५

विष्णुपुराण, प्रथम अंश, एकादश अध्याय | Vishnu Puran, Ansh 1, Adhyay 11

 

॥ विष्णुपुराणम् ॥

॥ प्रथमः अंशः ॥ एकादशोऽध्यायः ॥  

 

"ध्रुवचे वनगमन व मरीचि आदि ऋषिंची भेट"

 

पराशर उवाचः
 
प्रियव्रतोत्तानपादौ मनोः स्वायम्भुवस्य तु ।
 
द्वौ पुत्रौ सुमहावीर्यौ धर्मज्ञौ कथितौ तव ॥ १ ॥

पराशर म्हणालेहे मैत्रेया ! मी तुला स्वायम्भुव मनुच्या प्रियव्रत आणि उत्तानपाद नामक दोन महाबलवान आणि धर्मज्ञ पुत्रांबद्दल सांगितले होते .

 


 
तयोरुत्तानपादस्य सुरुच्यामुत्तमः सुतः ।
 
अभीष्टायामभूद्‌ब्रह्मन्पितुरत्यन्तवल्लभः ॥ २ ॥

हे ब्रह्मन ! त्या उत्तानपादाची प्रेयसी पत्नी सुरुचिपासून वडिलांचा अत्यंत लाडका उत्तम नामक पुत्र झाला .

 


सुनीतिर्नाम या राज्ञस्तस्याभून्महिषी द्विज ।
 
स नातिप्रीतिमांस्तस्यामभूद्यस्या ध्रुवः सुतः ॥ ३ ॥

हे द्विजा ! त्या राजाला जी सुनीति नामक राजमहिषी होती तिच्याविषयी त्याला विशेष प्रेम नव्हते . तिचा पुत्र ध्रुव होता .

 

 
 
राजासनस्थितस्याङ्‌कं पितुर्भ्रातरमाश्रितम् ।
 
दृष्ट‍्वोत्तमं ध्रुवश्चक्रे तमारोढुं मनोरथम् ॥ ४ ॥

एके दिवशी राजसिंहासनावर बसलेल्या पित्याच्या मांडीवर आपल्या भावाला उत्तमला बसलेला पाहून ध्रुवाला देखील वडिलांच्या मांडीवर बसायची इच्छा झाली .

 


प्रत्यक्षं भूपतिस्तस्याः सुरुच्या नाभ्यनन्दत ।
प्रणयेनागतं पुत्रमुत्सङ्‌गारोहणोत्सुकम् ॥ ५ ॥

पण राजाने आपल्या प्रेयसी सुरुचि समोर, मांडीवर चढायला उत्सुक होऊन प्रेमाने आलेल्या त्या पुत्राचा आदर नाही केला .

 


 
सपत्नीतनयं दृष्ट्‍वा तमङ्‌कारोहणोत्सुकम् ।
 
स्वपुत्रं च तथारूढं सुरुचिर्वाक्यमब्रवीत् ॥ ६ ॥

आपल्या सवतिच्या पुत्राला मांडीवर चढायला उत्सुक पाहून व आपल्या पुत्राला मांडीवर बसलेला पाहून सुरुची म्हणाली .

 


 
क्रियते किं वृथा वत्स महानेष मनोरथः ।
 
अन्यस्त्रीगर्भजातेन असम्भूय ममोदरे ।
 
उत्तमोत्तममप्राप्यमविवेको हि वाञ्छसि ॥ ७ ॥

सत्यं सुतस्त्वमप्यस्य किन्तु न त्वं मया धृतः ॥ ८ ॥

अरे मुला ! माझ्या पोटातून उत्पन्न न होता कोणा अन्य स्त्रीचा पुत्र असूनही तू व्यर्थ का असे मोठे स्वप्न पाहातोस ?  तू अविवेकी आहेस म्हणून, अशा अलभ्य उत्तमोत्तम वस्तुंची इच्छा करत आहेस. हे ठीक आहे की तू देखील ह्याच राजाचा पुत्र आहेस, पण मी तर तुला आपल्या गर्भात धारण नहीं केले .

  

एतद्‌राजासनं सर्वभूभृत्संश्रयकेतनम् ।
योग्यं ममैव पुत्रस्य किमात्मा क्लिश्यते त्वया ॥ ९ ॥

समस्त चक्रवर्ती राजांचे आश्रयरूप असलेले हे राजसिंहासन तर माझ्याच पुत्राच्या योग्यतेचे आहे, तू व्यर्थ का आपल्या मनाला त्रास करून घेतोस ?

 


 
उच्चैर्मनोरथस्तेऽयं मत्पुत्रस्येव किं वृथा ।
 
सुनीत्यामात्मनो जन्म किं त्वया नावगम्यते ॥ १० ॥

माझ्या पुत्रासारखे तुझे हे वृथा उच्च मनोरथ का आहेत ? तुला माहित नाही का की तुझा जन्म सुनीतिपासून झाला आहे ?’

 


पराशर उवाचः
उत्सृज्य पितरं बालस्तच्छ्रुत्वा मातृभाषितम् ।
जगाम कुपितो मातुर्निजाया द्विज मन्दिरम् ॥ ११ ॥

पराशर म्हणालेहे द्विजा ! विमाताचे असे कथन ऐकून ते बालक रागावून पित्याला सोडून आपल्या आईच्या महलात गेला .

 


 
तं दृष्ट्‍वा कुपितं पुत्रमीषत्प्रस्फुरिताधरम् ।
 
सुनीतिरङ्‌कमारोप्य मैत्रेयैतदभाषत ॥ १२ ॥

हे मैत्रेया ! ज्याचे ओठ थोडे थरथरत होते अशा आपल्या रागावलेल्या पुत्राला पाहून सुनीतिने त्याला मांडीवर बसवून विचारले .

 


 
सुनीतिरुवाचः
 
वत्स कः कोपहेतुस्ते कश्च त्वां नाभिनन्दति ।
 
कोऽवजानाति पितरं तव यस्तेऽपराध्यति ॥ १३ ॥

बाळा ! तुझ्या रागाचे कारण काय आहे ? तुझा कोणी आदर केला नाही का ? तुझा अपराध करून कोण तुझ्या पित्याचा अपमान करत आहे ?’ .

 

 

पराशर उवाचः
इत्युक्तः सकलं मात्रे कथयामास तद्‌यथा ।
सुरुचिः प्राह भूपालप्रत्यक्षमतिगर्विता ॥ १४ ॥

पराशर म्हणालेअसे विचारल्यावर ध्रुवने आपल्या आईला सगळ्या गोष्टी सांगितल्या ज्या अति गर्विष्ठ सुरुचिने त्याच्या पित्यासमोर सांगितल्या होत्या .

 

 

 निःश्वस्य सेति कथिते तस्मिन् पुत्रेण दुर्मनाः ।
 
श्वासक्षामेक्षणा दीना सुनीतिर्वाक्यमब्रवीत् ॥ १५ ॥

आपल्या मुलाने हुंदके देत असे सांगितल्यावर दु:खि सुनीतिने खिन्न चित्त व दीर्घ नि:श्वासा मुळे मलिन नयना होऊन म्हटले .

 


 
सुनीतिरुवाचः
 
सुरुचिः सत्यमाहेदं स्वल्पभाग्योऽसि पुत्रक ।
 
न हि पुण्यवतां वत्स सपत्नैरेवमुच्यते ॥ १६ ॥

सुनीति म्हणालीबाळा ! सुरुचिने बरोबर म्हटले, अवश्य तू मंदभाग्य आहेस. हे वत्सा ! पुण्यवानांना त्यांचे विपक्षी असे नाही म्हणू शकत .

 


 
नोद्वेगस्तात कर्तव्यः कृतं यद्‌भवता पुरा ।
 
तत्कोऽपहर्तुं शक्नोति दातुं कश्चाकृतं त्वया ॥ १७ ॥
 
तत्त्वया नात्र कर्तव्यं दुःखं तद्वाक्यसम्भवम् ॥ १८ ॥

बाळा ! तू व्याकुळ नको होऊस, कारण तू पूर्व-जन्मी जे काही केले आहेस त्याला दूर कोण करू शकेल ? आणि जे नाही केलस ते तुला कोण देऊ शकेल ? म्हणून तू  तिच्या बोलण्याचे दुःख करू नयेस .

  

राजासनं तथा छत्रं वराश्ववरवारणाः ।
यस्य पुण्यानि तस्यैव मत्वैतच्छाम्य पुत्रक ॥ १९ ॥

हे वत्सा ! ज्याचे पुण्य असते त्यालाच राजासन, राजछत्र तथा उत्तम-उत्तम घोड़े आणि हत्ती आदि मिळतात असे जाणून तू शांत हो .

 


 
अन्यजन्मकृतैः पुण्यैः सुरुच्यां सुरुचिर्नृपः ।
 
भार्येति प्रोच्यते चान्या मद्विधा पुण्यवर्जिता ॥ २० ॥

अन्य जन्मात केलेल्या पुण्य-कर्मांमुळेच सुरुचिवर राजाचे प्रेम आहे व पुण्यहीना असल्याने माझ्यासारखी स्त्री केवळ भार्या (भरण करण्यायोग्य) आहे .

 


 
पुण्योपचयसम्पन्नस्तस्याः पुत्रस्तथोत्तमः ।
 
मम पुत्रस्तथा जातः स्वल्पपुण्यो ध्रुवो भवान् ॥ २१ ॥

तसेच तिचा पुत्र उत्तम देखील खूप मोठा पुण्य-पुज्जसम्पन्न आहे आणि माझा पुत्र तू ध्रुव माझ्यासारखाच अल्प पुण्यवान आहे .

 


 
तथापि दुःखं न भवान् कर्तुमर्हति पुत्रक ।
 
यस्य यावत्स तेनैव स्वेन तुष्यति बुद्धिमान् ॥ २२ ॥

तरीही बाळा ! तु दु:खी नको होऊस, कारण ज्या मनुष्याला जितकं मिळतं तो आपल्याला मिळालेल्यात संतुष्ट राहातो .

 


 
यदि ते दुःखमत्यर्थं सुरुच्या वचसाभवत् ।
 
तत्पुण्योपचये यत्नं कुरु सर्वफलप्रदे ॥ २३ ॥

आणि जर सुरुचिच्या वाक्यांनी तुला खूप दुःख झाले असेल तर सर्वफलदायक अशा पुण्याचा संग्रह करायचा प्रयत्न कर .

 

 

सुशीलो भव धर्मात्मा मैत्रः प्राणिहिते रतः ।
निम्नं यथापः प्रवणाः पात्रमायान्ति सम्पदः ॥ २४ ॥

तू सुशील, पुण्यात्मा, प्रेमी आणि समस्त प्राण्यांचा हितैषी बन, कारण जसे सखल भूमिजवळ येणारे जल स्वतःच पात्रात येते तसेच सत्पात्र मनुष्याजवळ स्वत:च समस्त सम्पत्ती येते .

 

 

ध्रुव उवाचः
अम्ब यत्त्वमिदं प्राह प्रशमाय वचो मम ।
नैतद्‌दुर्वचसा भिन्ने हृदये मम तिष्ठति ॥ २५ ॥

ध्रुव म्हणाला ;– माते ! तु माझं चित्त शांत करण्यासाठी जे सांगितलस ते दुर्वाक्यांचे तडाखे बसलेल्या माझ्या ह्रद्यात जराही राहात नाही आहे .

 


 
सोऽहं तथा यतिष्यामि यथा सर्वोत्तमोत्तमम् ।
 
स्थानं प्राप्स्याम्यशेषाणां जगतामभिपूजितम् ॥ २६ ॥

म्हणून मी तरी आता असाच प्रयत्न करेन ज्यामुळे सम्पूर्ण लोकांपेक्षाही आदरणीय सर्वश्रेष्ठ पद प्राप्त करू शकेन.

 

 

 सुरुचिर्दयिता राज्ञस्तस्या जातोऽस्मि नोदरात् ।
 
प्रभावं पश्य मेऽम्ब त्वं धृतस्यापि तवोदरे ॥ २७ ॥

राजाची प्रेयसी अवश्य सुरुचि आहे आणि मी तिच्या उदरातून जन्म नाही घेतला, पण हे माते ! तुझ्या गर्भात वाढलेल्या माझा प्रभाव देखील तू पाहाशील .

 


 
उत्तमः स मम भ्राता यो गर्भेण धृतस्तया ।
 
स राजासनमाप्नोतु पित्रा दत्तं तथास्तु तत् ॥ २८ ॥

उत्तम, ज्याला तिने आपल्या गर्भात धारण केले तो माझाच भाऊ आहे. पित्याने दिलेले राजासन तोच प्राप्त करो. देव करो असेच होओ .

 


 
नान्यदत्तमभीप्स्यामि स्थानमम्ब स्वकर्मणा ।
 
इच्छामि तदहं स्थानं यन्न प्राप पिता मम ॥ २९ ॥

माते ! मी कोणा दुसर्‍याने दिलेल्या पदाचा इच्छुक नाहीं, मी तर माझ्या पुरुषार्थाने अशा  पदाची इच्छा करतो जे माझ्या पित्यानेही प्राप्त नाही केले .

 

 पराशर उवाच

निर्जगाम गृहान्मातुरित्युक्त्वा मातरं ध्रुवः ।
पुराच्च निर्गम्य ततस्तद्‌बाह्योपवनं ययौ ॥ ३० ॥

पराशर म्हणालेमातेला असे म्हणून ध्रुव तिच्या महलातून निघाला आणि नगराबाहेर येऊन बाहेरील उपवनात पोहोचला .

 


 
स ददर्श मुनींस्तत्र सप्त पूर्वागतान् ध्रुवः ।
 
कृष्णाजिनोत्तरीयेषु विष्टरेषु समास्थितान् ॥ ३१ ॥

तेथे ध्रुवाने आधीच आलेल्या सात मुनीश्वरांना कृष्ण मृग-चर्माच्या बिछान्याने युक्त आसनांवर बसलेले पाहिले .

 


 
स राजपुत्रस्तान्सर्वान्प्रणिपत्याभ्यभाषत ।
 
प्रश्रयावनतः सम्यगभिवादनपूर्वकम् ॥ ३२ ॥

त्या राजकुमाराने त्या सर्वांना प्रणाम करून अति नम्रता आणि समुचित अभिवादनादिपूर्वक त्यांना म्हटले .

 


 ध्रुव उवाच
उत्तानपादतनयं मां निबोधत सत्तमाः ।
जातं सुनीत्यां निर्वेदाद्‌युष्माकं प्राप्तमन्तिकम् ॥ ३३ ॥

ध्रुव म्हणालाहे महात्मांनो ! मला तुम्ही सुनीतिपासून उत्पन्न झालेला राजा उत्तानपादाचा पुत्र असे जाणा . मी आत्मग्लानिमुळे तुमच्या जवळ आलो आहे .

 


 
ऋषय ऊचुः
 
चतुःपञ्चाब्दसम्भूतो बालस्त्वं नृपनन्दन ।
 
निर्वेदकारणं किञ्चित्तव नाद्यापि वर्तते ॥ ३४ ॥

ऋषि म्हणालेराजकुमारा ! आता तर तू चार–पाच वर्षांचाच बालक आहेस. आता तर तुझ्या निर्वेदाचे कोणते कारणही नाही दिसत .

 


 
न चिन्त्यं भवतः किञ्चिद्‌ध्रियते भूपतिः पिता ।
 
न चैवेष्टवियोगादि तव पश्याम बालक ॥ ३५ ॥

तुला कोणता चिंतेचा विषयही नाही , कारण आजून तुझा पिता राजा जीवित आहे आणि हे बालका ! तुझी कोणती इष्ट वस्तु हरवली आहे असेही आम्हाला दिसत नाही  .

 


 
शरीरे न च ते व्याधिरस्माभिरुपलक्ष्यते ।
 
निर्वेदः किंनिमित्तस्ते कथ्यतां यदि विद्यते ॥ ३६ ॥

तसेच आम्हाला तुझ्या शरीरात कोणतीही व्याधी दिसत नाही. तर मग सांग की तुझ्या ग्लानिचे कारण काय आहे ?

 


 
पराशर उवाच
 
ततः स कथयामास सुरुच्या यदुदाहृतम् ।
 
तन्निशम्य ततः प्रोचुर्मुनयस्ते परस्परम् ॥ ३७ ॥

पराशर म्हणालेतेव्हा सुरुचि त्याला जे काही बोलली होती ते सगळं त्याने त्यांना सांगितलं. ते ऐकून ते ऋषिगण आपसात  अशाप्रकारे बोलू लागले .

 


 
अहो क्षात्रं परं तेजो बालस्यापि यदक्षमा ।
 
सपत्न्या मातुरुक्तं यद् हृदयान्नापसर्पति ॥ ३८ ॥

अहो ! क्षात्रतेज किती प्रबळ आहे, ज्यामुळे बालकातही इतकी अक्षमा आहे की  आपल्या विमातेचे कथन त्याच्या ह्रदयातून जात नाही .

 


भो भोः क्षत्रियदायाद निर्वेदाद्‌यत्त्वयाधुना ।
 
कर्तुं व्यवसितं तन्नः कथ्यतां यदि रोचते ॥ ३९ ॥

हे क्षत्रियकुमारा ! ह्या निर्वेदामुळे तू जे काही करायचा निश्चय केला आहेस, जर तुझी इच्छा असेल तर आम्हाला सांग .

 


 
यच्च कार्यं तवास्माभिः साहाय्यममितद्युते ।
 
तदुच्यतां विवक्षुस्त्वमस्माभिरुपलक्ष्यसे ॥ ४० ॥

आणि हे अतुलिततेजस्वी ! हे देखील सांग की आम्ही तुझी काय मदत करू, कारण आम्हाला असे जाणवते की तु काही सांगू इच्छितो आहेस .

 


 
ध्रुव उवाच
 
नाहमर्थमभीप्सामि न राज्यं द्विजसत्तमाः ।
 
तत् स्थानमेकमिच्छामि भुक्तं नान्येन यत्पुरा ॥ ४१ ॥

ध्रुव म्हणाला ;– हे द्वीजश्रेष्ठा ! मला ना धनाची इच्छा आहे ना राज्याची, मला केवळ एक तेच स्थान हवे जे ह्याआधी कधीच कोणीही भोगले नाही .

 


 
एतन्मे क्रियतां सम्यक् कथ्यतां प्राप्यते यथा ।
 
स्थानमग्र्यं समस्तेभ्यः स्थानेभ्यो मुनिसत्तमाः ॥ ४२ ॥

हे मुनिश्रेष्ठा ! आपली हीच सहायता होईल जर तुम्ही मला नीट सांगीतले की काय केल्याने ते सर्वात अग्रगण्य स्थान प्राप्त होऊ शकेल .

 


 
मरीचिरुवाच
 
अनाराधितगोविन्दैर्नरैः स्थानं नृपात्मज ।
 
न हि सम्प्राप्यते श्रेष्ठं तस्मादाराधयाच्युतम् ॥ ४३ ॥

मरीचि म्हणालेहे राजपुत्र् ! गोविन्दाच्या आराधनेशिवाय मनुष्याला ते श्रेष्ठ स्थान नाही मिळू शकत, म्हणून तू श्रीअच्युताची आराधना कर .

 


 
अत्रिरुवाच
 
परः पराणां पुरुषो यस्य तुष्टो जनार्दनः ।
 
स प्राप्नोत्यक्षयं स्थानमेतत् सत्यं मयोदितम् ॥ ४४ ॥

अत्रि म्हणालेजो परा प्रकृति आदिपासूनही  परे आहे तो परमपुरुष जनार्दन ज्याने संतुष्ट होतो त्यालाच ते अक्षयपद मिळतं हे मी खरंखरं सांगतो .

 

अङ्‌गिरा उवाच
यस्यान्तः सर्वमेवेदमच्युतस्याव्ययात्मनः ।
तमाराधय गोविन्दं स्थानमग्र्यं यदीच्छसि ॥ ४५ ॥

अंगिरा म्हणालेजर तू अग्रस्थानाचा इच्छुक आहेस तर ज्या अव्ययात्मा अच्युतामध्ये हे सम्पूर्ण जगत ओतप्रोत आहे त्या गोविन्दाचीच आराधना कर .

 


पुलस्त्य उवाच
परं ब्रह्म परं धाम योऽसौ ब्रह्म तथा परम् ।
तमाराध्य हरिं याति मुक्तिमप्यतिदुर्लभाम् ॥ ४६ ॥

पुलस्त्य म्हणालेजो परब्रह्म परमधाम आणि परस्वरूप आहे त्या हरिची आराधना केल्याने मनुष्य अति दुर्लभ मोक्षपद देखील प्राप्त करतो .

 


 
पुलह उवाच
 
ऐन्द्रमिन्द्रः परं स्थानं यमाराध्य जगत्पतिम् ।
 
प्राप यज्ञपतिं विष्णुं तमाराधय सुव्रत ॥ ४७ ॥

पुलह म्हणालेहे सुव्रता ! ज्या जगत्पतिच्या आराधनेने इंद्राने अत्युत्तम इंद्रपद प्राप्त केले आहे तू त्या यज्ञपति भगवान विष्णुची आराधना कर .

 


 
क्रतुरुवाच
 
यो यज्ञपुरुषो यज्ञे योगेशः परमः पुमान् ।
 
तस्मिंस्तुष्टे यदप्राप्यं किं तदस्ति जनार्दने ॥ ४८ ॥

क्रतु म्हणालेजो परमपुरुष यज्ञपुरुष, यज्ञ आणि योगेश्वर त्या जनार्दनाच्या संतुष्ट झाल्यावर कोणती वस्तु दुर्लभ राहू शकते ?

 


 
वसिष्ठ उवाच
 
प्राप्नोष्याराधिते विष्णौ मनसा यद्‌यदिच्छसि ।
 
त्रैलोक्यान्तर्गतं स्थानं किमु वत्सोत्तमोत्तमम् ॥ ४९ ॥

वसिष्ठ म्हणालेहे वत्सा ! विष्णुभगवानाची आराधना केल्याने तू आपल्या मनात जी इच्छा करशील तेच प्राप्त करशील, मग त्रिलोक्यातील उत्तमोत्तम स्थानाची गोष्टच सोड .

 


 
ध्रुव उवाच
 
आराध्यः कथितो देवो भवद्‌भिः प्रणतस्य मे ।
 
मया तत्परितोषाय यज्जप्तव्यं तदुच्यताम् ॥ ५० ॥
 
यथा चाराधनं तस्य मया कार्यं महात्मनः ।
 
प्रसादसुमुखास्तन्मे कथयन्तु महर्षयः ॥ ५१ ॥

ध्रुव म्हणालाहे महर्षिगण ! मज विनीताला तुम्ही आराध्यदेव तर सांगितलात. आता त्याला  प्रसन्न करण्यासाठी मला काय जप करायला हवा ते सांगा . त्या महापुरुषाची मी कशाप्रकारे आराधना करायला हवी, ते तुम्ही मला प्रसन्नतापूर्वक सांगावे .

 

 

 ऋषय ऊचुः
 
राजपुत्र यथा विष्णोराराधनपरैर्नरैः ।
 
कार्यमाराधनं तन्नो यथावच्छ्रोतुमर्हसि ॥ ५२ ॥

ऋषिगण म्हणालेहे राजकुमारा ! विष्णु भगवानांच्या आराधनेत  तत्पर पुरुषांनी

ज्याप्रकारे त्यांची उपासना करायला हवी ते आमच्याकडून यथावत श्रवण कर .

 

 

बाह्यार्थादखिलाच्चित्तं त्याजयेत्प्रथमं नरः ।
 
तस्मिन्नेव जगद्धाम्नि ततः कुर्वीत निश्चलम् ॥ ५३ ॥

मनुषयाने सर्वप्रथम सम्पूर्ण बाह्य विषयांपासून  आपले चित्त हटवावे आणि त्याला एकमात्र त्या जगदाधारातच स्थिर करावे .

 

 

एवमेकाग्रचित्तेन तन्मयेन धृतात्मना ।
जप्तव्यं यन्निबोधैतत्तन्नः पार्थिवनन्दन ॥ ५४ ॥

हे राजकुमारा ! अशाप्रकारे एकाग्रचित्त होऊन तन्मय-भावाने जे काही जपायचे ते ऐक .

 

 
 
हिरण्यगर्भपुरुषप्रधानव्यक्तरूपिणे ।
 
ॐ नमो वासुदेवाय शुद्धज्ञानस्वभाविने ॥ ५५ ॥

ॐ हिरण्यगर्भ, पुरुष, प्रधान आणि अव्यक्तरूप शुद्धज्ञानस्वरूप वासुदेवाला नमस्कार’ .


 
 
एतज्जजाप भगवान् जप्यं स्वायम्भुवो मनुः ।
 
पितामहस्तव पुरा तस्य तुष्टो जनार्दनः ॥ ५६ ॥
 
ददौ यथाभिलषितां सिद्धिं त्रैलोक्यदुर्लभाम् ।
 
तथा त्वमपि गोविन्दं तोषयैतत्सदा जपन् ॥ ५७ ॥

हा (ॐ नमो भगवते वासुदेवाय) मन्त्र पूर्वकाळी तुझे पितामह भगवान स्वायम्भुव मनुने जपला होता. तेव्हा त्याच्यावर संतुष्ट होऊन श्रीजनार्दनाने त्याला त्रैलोकात दुर्लभ अशी मनोवांछित सिद्धि दिली होती. तसे तू देखील ह्याचा निरंतर जप करत श्रीगोविंदाला प्रसन्न कर .

 

 


 इति श्रीविष्णुपुराणे प्रथमे अंशे एकादशोऽध्यायः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, तृतीय अंश, त्रयोदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 3 , Adhyay 13

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ तृतीयः अंशः ॥ त्रयोदशोऽध्यायः ॥   आभ्युदयिक श्राद्ध , प्रेतकर्म तथा श्राद्धादि विचार और्व उवाच सचैलस्य पितुः ...