गुरुवार, २० नोव्हेंबर, २०२५

विष्णुपुराण, प्रथम अंश, पञ्चम अध्याय | Vishnu Puran, Ansh 1, Adhyay 5

 

॥ विष्णुपुराणम् ॥

॥ प्रथमः अंशः   ॥ पञ्चमोऽध्यायः ॥

 

"अविद्यादि विविध सर्गांचे वर्णन"


मैत्रेय उवाचः
यथा ससर्ज देवोऽसौ देवर्षिपितृदानवान् ।
मनुष्यतिर्यग्वृक्षादीन्भूव्योमसलिलौकसः ॥ १ ॥

यद्गुणं यत्स्वभावं च यद्‌रूपं च जगद्‌द्विज ।
सर्गादौ सृष्टवान्ब्रह्मा तन्ममाचक्ष्व विस्तरात् ॥ २ ॥

मैत्रेय म्हणालेहे द्विजराजा ! सर्गाच्या आरंभी भगवान ब्रह्माने पृथ्वी, आकाश, जल वगैरेमध्ये राहणारे देव, ऋषि, पितृगण, दानव, मनुष्य, तिर्यक आणि वृक्षादिंना ज्याप्रकारे रचले, तसेच जसे गुण, स्वभाव आणि रूप असलेल्या जगताची रचना केली ते सर्व मला तुम्ही सांगा .



 
पराशर उवाचः
 
मैत्रेय कथयाम्येतच्छ्रुणुष्व सुसमाहितः ।
 
यथा ससर्ज देवोऽसौ देवादीनखिलान्विभुः ॥ ३ ॥

पराशर म्हणालेहे मैत्रेया ! भगवान विभुने ज्याप्रकारे ह्या सर्गाची रचना केली ते मी तुला सांगतोनीट लक्ष देऊन ऐक.



 
सृष्टिं चिन्तयतस्तस्य कल्पादिषु यथा पुरा ।
 
अबुद्धिपूर्वकः सर्गः प्रादुर्भूतस्तमोमयः ॥ ४ ॥

सर्गाच्या आरंभी ब्रह्माच्या पूर्ववत सृष्टिचे चिंतन करण्यामुळे प्रथम अबुद्धिपूर्वक तमोगुणी सृष्टिचा आविर्भाव झाला.



 
तमो मोहो महामोहस्तामिस्रो ह्यन्धसंज्ञितः ।
 
अविद्या पञ्चपर्वैषा प्रादुर्भूता महात्मनः ॥ ५ ॥

त्या महात्मा ब्रह्मापासून प्रथम तम (अज्ञान), मोह, महामोह (भोगेच्छा), तामिस्र  (क्रोध) आणि अन्धतामिस्र (अभिनिवेश) नामक पञ्चपर्वा (पाच प्रकारच्या) अविद्या उत्पन्न झाल्या.

 


 
पञ्चधावस्थितः सर्गो ध्यायतोऽप्रतिबोधवान् ।
 
बहिरन्तोऽप्रकाशश्च संवृतात्मा नगात्मकः ॥ ६ ॥

त्याच्या ध्यानामुळे ज्ञानशून्य, आतून बाहेरून, तमोमय आणि जड नगादि (वृक्ष-गुल्म-लता-वीरुत-तृण) रूप पाच प्रकारचा सर्ग निर्माण झाला .

 

 

मुख्या नगा यतश्चोक्ता मुख्यसर्गस्ततस्त्वयम् ॥ ७ ॥
 
तं दृष्ट्‍वाऽसाधकं सर्गममन्यदपरं पुनः ॥ ८ ॥

वराहाद्वारा सर्वप्रथम स्थापित झाल्याने नगादिला मुख्य म्हटले आहे,  म्हणून हा सर्ग देखील मुख्य सर्ग नावाने ओळखला जातो .



तस्याभिध्यायतः सर्गं तिर्यक्स्रोताभ्यवर्तत
यस्मात्तिर्यक्प्रवृत्तिस्स तिर्यक्स्रोतास्ततः स्मृतः ॥ ९ ॥

त्या सृष्टिला पुरुषार्थाची असाधिका पाहून त्यांनी पुन्हा अन्य सर्गासाठी ध्यान केले तेव्हा तिर्यक-स्रोत-सृष्टि उत्पन्न झाली, हा सर्ग (वायु समान) तिरका चालणारा असल्याने त्याला तिर्यक-स्रोत म्हणतात.

 


पश्वादयस्ते विख्यातास्तमः प्राया ह्यवेदिनः ।
 
उत्पथग्राहिणश्चैव तेऽज्ञाने ज्ञानमानिनः ॥ १० ॥

हा पशु, पक्षी आदि नावांनी प्रसिद्ध आहे आणि ते पशूपक्षी प्राय: तमोमय (अज्ञानी), विवेकरहित अनुचित मार्गाचा अवलंबन करणारे आणि विपरीत ज्ञानालाच यथार्थ ज्ञान मानणारे असतात.

 


अहङ्‌कृता अहम्माना अष्टाविंशद्वधात्मकाः ।
 
अन्तःप्रकाशास्ते सर्वे आवृताश्च परस्परम् ॥ ११ ॥

हे सर्व अहंकारी, अभिमानी, अठ्ठावीस वधांनी युक्त आंतरिक सुखालाच अंतिम  समजणारे आणि परस्पर एक-दूसर्‍याची प्रवृत्ति न जाणणारे असतात.



तमप्यसाधकं मत्वा ध्यायतोऽन्यस्ततोऽभवत् ।
 
ऊर्ध्वस्रोतस्तृतीयस्तु सात्त्विकोर्ध्वमवर्तत ॥ १२ ॥

ह्या सर्गालाही पुरुषार्थाचा असाधक मानून पुन:चिंतन केल्यावर एक आणखी सर्ग झाला, तो ऊर्ध्वस्रोत नामक तिसरा सात्त्विक सर्ग वरील लोकात राहू लागला.

 


 
ते सुखप्रीतिबहुला बहिरन्तस्त्वनावृताः ।
 
प्रकाशा बहिरन्तश्च ऊर्ध्वस्रोतोद्‌भवाः स्मृताः ॥ १३ ॥

ह्या ऊर्ध्व-स्रोत सृष्टिपासून उत्पन्न झालेले प्राणी विषय-सुखाचे प्रेमी, बाह्य आणि आंतरिक दृष्टिसम्पन्न, तसेच बाह्य आणि आंतरिक ज्ञानयुक्त होते.

 


 
तुष्ट्यात्मनस्तृतीयस्तु देवसर्गस्तु स स्मृतः ।
 
तस्मिन्सर्गेऽभवत्प्रीतिर्निष्पन्ने ब्रह्मणस्तथा ॥ १४ ॥

हा तिसरा देवसर्ग नावाने ओळखला जातो. ह्या सर्गाच्या निर्मितीमुळे संतुष्टचित्त ब्रह्माला अति प्रसन्नता झाली.


 
ततोऽन्यं स तदा दध्यौ साधकं सर्गमुत्तमम् ।
 
असाधकांस्तु ताञ्ज्ञात्वा मुख्यसर्गादिसम्भवान् ॥ १५ ॥
त्यानंतर ह्या मुख्यसर्ग आदि तीनही प्रकारच्या सृष्टिंमध्ये  उत्पन्न झालेल्या प्राण्यांना पुरुषार्थाचे असाधक मानून त्यांनी आणि एका उत्तम साधक सर्गाचे चिंतन  केले.


 
तथाभिध्यायतस्तस्य सत्याभिध्यायिनस्ततः ।
 
प्रादुर्भूतस्तदाव्यक्तादर्वाक्स्रोतास्तु साधकः ॥ १६ ॥

त्या सत्यसंकल्प ब्रह्माच्या अशाप्रकारे केलेल्या चिंतानाने अव्यक्त (प्रकृति) पासून पुरुषार्थाचा साधक अर्वाकस्रोत नामक सर्ग प्रकट झाला .

 


यस्मादर्वाग्व्यवर्तन्त ततोऽर्वाक्स्रोतसस्तु ते ।
 
ते च प्रकाशबहुलास्तमौद्रिक्ता रजोऽधिकाः ॥ १७ ॥

ह्या सर्गाचे प्राणी खाली (पृथ्वीवर) राह्तात म्हणून हाअर्वाकस्रोतनावाने ओळखला जातो, त्यांच्यात सत्त्व, रज और तम तीन्हींची अधिकता असते.

 

 

तस्मात्ते दुःखबहुला भूयो भूयश्च कारिणः ।
प्रकाशा बहिरन्तश्च मनुष्याः साधकास्तु ते ॥ १८ ॥

म्हणून ते दुःखबहुल, अत्यंत क्रियाशील आणि बाह्य-आभ्यन्तर ज्ञानाने युक्त आणि साधक आहेत. ह्या  सर्गाचे प्राणी मनुष्य आहे.

 



 
इत्येते कथिताः सर्गाः षडत्र मुनिसत्तम ।
 
प्रथमो महतः सर्गो विज्ञेयो ब्रह्मणस्तु सः ॥ १९ ॥

हे मुनिश्रेष्ठा ! अशाप्रकारे आतापर्यंत तुला मी सहा सर्ग सांगितले , त्यांच्यापैकी महत्तत्त्वाला ब्रह्माचा पहिला सर्ग जाणावा .

 


तन्मात्राणां द्वितीयश्च भूतसर्गस्तु स स्मृतः ।
 
वैकारिकस्तृतीयस्तु सर्ग ऐन्द्रियकः स्मृतः ॥ २० ॥

दूसरा सर्ग तन्मात्रांचा आहे, ज्याला भूतसर्ग देखील म्हणतात आणि तिसरा वैकारिक सर्ग आहे जो ऐन्द्रियिक (इन्द्रिय संबंधी) मानला जातो.

 


 
इत्येष प्राकृतः सर्गः सम्भूतो बुद्धिपूर्वकः ।
 
मुख्यसर्गश्चतुर्थस्तु मुख्या वै स्थावराः स्मृताः ॥ २१ ॥

अशाच प्रकारे बुद्धिपूर्वक उत्पन्न झालेला प्राकृत सर्ग चौथा मुख्यसर्ग आहे आणि पर्वत-वृक्षादि स्थावर हे ह्या मुख्य सर्गाच्या अंतर्गत आहेत .

 


 
तिर्यक्स्रोतास्तु यः प्रोक्तस्तैर्यग्योन्यः स उच्यते ।
 
तदूर्ध्वस्रोतसां षष्ठो देवसर्गस्तु संस्मृतः ॥ २२ ॥

ततोऽर्वाक्स्रोतसां सर्गः सप्तमः स तु मानुषः ॥ २३ ॥

पाचवा सर्ग जो तिर्यकस्रोत सांगितला त्याला तिर्यक (कीट-पतंगादि) योनि देखील म्हणतात, सहावा सर्ग ऊर्ध्व-स्रोतांचा ज्यालादेवसर्गम्हटले आहे . आणि तत्पश्चात सातवा सर्ग अर्वाक-स्रोतांचा जो मनुष्य सर्ग आहे.

 


अष्टमोऽनुग्रहः सर्गः सात्त्विकस्तामसश्च सः ।
 
पञ्चैते वैकृताः सर्गाः प्राकृतास्तु त्रयः स्मृताः ॥ २४ ॥

प्राकृतो वैकृतश्चैव कौमारो नवमः स्मृतः ।
 
इत्येते वै समाख्याता नव सर्गाः प्रजापतेः ॥ २५ ॥

आठवा अनुग्रह सर्ग असून हा सात्त्विक व तामसिक आहे. हे नंतरचे पाच वैकृत (विकारी) सर्ग आणि पहिले तीनप्राकृत सर्ग' म्हणून ओळखले जातात . नववा कौमर सर्ग आहे जो प्राकृत आणि वैकृत दोन्ही आहे .



 
प्राकृता वैकृताश्चैव जगतो मूलहेतवः ।
 
सृजतो जगदीशस्य किमन्यच्छ्रोतुमिच्छसि ॥ २६ ॥

अशाप्रकारे सृष्टि रचनेत प्रवृत्त झालेल्या जगदीश्वर प्रजापतिच्या प्राकृत व वैकृत नामक झालेल्या जगताचे मुलभुत नऊ सर्ग तुला सांगितले. आता आणि काय ऐकू इच्छितोस

 


 
मैत्रेय उवाचः
 
सङ्‍क्षेपात्कथितः सर्गो देवादीनां मुने त्वया ।
 
विस्तराच्छ्रोतुमिच्छामि त्वत्तो मुनिवरोत्तम ॥ २७ ॥

मैत्रेय म्हणालेहे मुने ! आपण ह्या देवादिकांच्या  सर्गांचे संक्षेपात वर्णन केले. आता हे मुनिश्रेष्ठा ! मी ह्यांच्याबद्दल आपल्या मुखकमलातून विस्तारपूर्वक ऐकू इच्छितो.

 

पराशर उवाचः
कर्मभिर्भाविताः पूर्वैः कुशलाकुशलैस्तु ताः ।
ख्यात्या तया ह्यनिर्मुक्ताः संहारे ह्युपसंहृताः ॥ २८ ॥

पराशर म्हणालेहे मैत्रेया ! समस्त प्रजा आपल्या पूर्व-शुभाशुभ कर्मांनी युक्त आहे. म्हणून प्रलयकाळी सर्वांचा लय झाल्यानंतर देखील ती आपल्या संस्कारांपासून मुक्त होत नाही .

 


स्थावरान्ताः सुराद्यास्तु प्रजा ब्रह्मंश्चतुर्विधाः
 
ब्रह्मणः कुर्वतः सृष्टिं जज्ञिरे मानसास्तु ताः ॥ २९ ॥

हे ब्रह्मन् ! ब्रह्माच्या सृष्टी कर्मात प्रवृत्त झाल्यावर देवतांपासून स्थावर पर्यन्त जी चार प्रकारची सृष्टी झाली ती केवळ मनोमयी होती .


 
ततो देवासुरपितॄन्मनुष्यांश्च चतुष्टयम् ।
 
सिसृक्षुरम्भांस्येतानि स्वमात्मानमयूयुजत् ॥ ३० ॥

मग देवता, असुर, पितृगण आणि मनुष्य – ह्या चारहींची तसेच जलाची सृष्टी  रचण्याच्या इच्छेने ब्रह्माने आपल्या शरीराचा उपयोग केला .

 


युक्तात्मनस्तमोमात्रा ह्युद्रिक्ताभूत्प्रजापतेः ।
 
सिसृक्षोर्जघनात्पूर्वमसुरा जज्ञिरे ततः ॥ ३१ ॥

सृष्टी-रचनेच्या इच्छेने प्रजापतिच्या युक्तचित्त होण्यामुळे तमोगुणाची वृद्धि झाली , म्हणून सर्वात आधी त्याच्या (ब्रह्माच्या) जांघेतून असुर उत्पन्न झाले .



 
उत्ससर्ज ततस्तां तु तमोमात्रात्मिकां तनुम् ।
 
सा तु त्यक्ता ततस्तेन मैत्रेयाभूद्‌विभावरी ॥ ३२ ॥

तेव्हा, हे मैत्रेया ! त्यांनी आपले ते तमोमय शरीर सोडले. ते सोडून दिलेले तमोमय शरीर म्हणजेच ही रात्र झाली.  नंतर अन्य देहात स्थित झाल्याने सृष्टिची इच्छा करणार्‍या प्रजापति ब्रह्मा अति प्रसन्न झाला .

 


सिसृक्षुरन्यदेहस्थः प्रीतिमाप ततः सुराः ।
 
सत्त्वोद्रिक्ताः समुद्‌भूता मुखतो ब्रह्मणो द्विज ॥ ३३ ॥

आणि हे द्विजा ! त्याच्या मुखातून सत्त्वप्रधान देवगण उत्पन्न झाले, त्यानंतर त्याने त्या शरीरालाही त्यागले .

 


त्यक्ता सापि तनुस्तेन सत्त्वप्रायमभूद्‌दिनम् ।
 
ततो हि बलिनो रात्रावसुरा देवता दिवा ॥ ३४ ॥

ते त्यागलेले शरीरच सत्त्वस्वरूपी दिवस बनले, म्हणूनच रात्रिच्या वेळी असुर बलवान होतात आणि दिवसा  देवगणांचे बल विशेष असते .

 


सत्त्वमात्रात्मिकामेव ततोऽन्यां जगृहे तनुम् ।
 
पितृवन्मन्यमानस्य पितरस्तस्य जज्ञिरे ॥ ३५ ॥

मग ब्रह्माने आंशिक सत्त्वमय अन्य शरीर ग्रहण केले आणि स्वतःला पितृवत मानून आपल्या पार्श्व-भागा पासून पितृगणांची रचना केली .



उत्ससर्ज ततस्तां तु सृष्ट‍्वा ततस्तामपि स प्रभुः ।
सा चोत्सृष्टाभवत्संध्या दिननक्तान्तरस्थिता ॥ ३६ ॥

पितृगणांची रचना करून त्याने ते शरीर देखील त्यागले. ते त्यागलेले शरीरच दिवस व रात्रीच्या मध्ये स्थित असलेली संध्या बनले .

 


रजोमात्रात्मिकामन्यां जगृहे स तनुं ततः।
 
रजोमात्रोत्कटा जाता मनुष्या द्विजसत्तम ॥ ३७ ॥

तत्पश्चात त्याने आंशिक रजोमय अन्य शरीर धारण केले. हे द्विजश्रेष्ठा ! त्यापासून रज: प्रधान मनुष्य उत्पन्न झाले .

 


तामप्य् आशु स तत्याज तनुं सद्यः प्रजापतिः ।
 
ज्योत्स्ना समभवत्सापि प्राक्संध्या याऽभिधीयते ॥ ३८ ॥

मग लगेचच प्रजापतिने त्या शरीराचा सुद्धा  त्याग केला,  ते शरीर ज्योत्स्ना बनले, ज्याला पूर्व-संध्या अर्थात प्रात:काल म्हटले जाते .

 


ज्योत्स्नागमे तु बलिनो मनुष्याः पितरस्तथा ।
 
मैत्रेय संध्यासमये तस्मादेते भवन्ति वै ॥ ३९ ॥

म्हणून, हे मैत्रेया ! प्रात:काळी मनुष्य आणि सायंकाळी पितर बलवान असतात .

 


 
ज्योत्स्ना रात्र्यहनी संध्या चत्वार्येतानि वै विभोः ।
 
ब्रह्मणस्तु शरीराणि त्रिगुणोपाश्रयाणि तु ॥ ४० ॥

अशाप्रकारे रात्र, दिवस, प्रात:काल आणि सायंकाल हे चारही प्रभु ब्रह्माचेच शरीर व तीनही गुणांचे आश्रय आहे



रजोमात्रात्मिकामेव ततोऽन्यां जगृहे तनुम् ।
 
ततः क्षुद्‌ब्रह्मणो जाता जज्ञे कामस्तया ततः ॥ ४१ ॥

मग ब्रह्माने एक आणखी रजोमात्रात्मक शरीर धारण केले, ज्याच्या द्वारा ब्रह्मापासून क्षुधा उत्पन्न झाली आणि क्षुधेपासून कामाची उत्पत्ति झाली .

 


क्षुत्क्षामानन्धकारेऽथ सोऽसृजद्‌भगवांस्ततः ।
 
विरूपाः श्मश्रुला जातास्तेऽभ्यधावंस्ततः प्रभुम् ॥ ४२ ॥

तेव्हा भगवान् प्रजापतिने अंधकारात स्थित होऊन क्षुधाग्रस्त सृष्टिची रचना केली, तिथे खूप कुरूप आणि दाढ़ी-मिशीवाले व्यक्ति उत्पन्न झाले. ते स्वयं ब्रह्माचे भक्षण करायला त्याच्या जवळ धावले.

 


 
मैवं भो रक्ष्यतामेष यैरुक्तं राक्षसास्तु ते ।
 
ऊचुः खादाम इत्यन्ये ये ते यक्षास्तु जक्षणात् ॥ ४३ ॥

त्यांच्यापैकी ज्यांनी असे म्हटले की  ‘असे करू नका, त्यांचे रक्षण करा' त्यांना राक्षस म्हटले गेले आणि जे म्हणालेआम्ही खाणारते खाण्याची वासना असल्यानेयक्षम्हटले गेले.



 
अप्रियेण तु तान्दृष्ट्‍वा केशाः शीर्यन्त वेधसः ।
 
हीनाश्च शिरसो भूयः समारोहन्त तच्छिरः ॥ ४४ ॥

त्यांची ही अनिष्ट प्रवृत्ति बघून ब्रह्माचे केस मस्तकावरून खाली गळून पडले आणि पुन्हा मस्तकावर आरूढ़ झाले .

 


 
सर्पणात्तेऽभवन् सर्पा हीनत्वादहयः स्मृताः ।
 
ततः क्रुद्धो जगत्स्रष्टा क्रोधात्मानो विनिर्ममे ।
 
वर्णेन कपिशेनोग्रभूतास्ते पिशिताशनाः ॥ ४५ ॥

अशाप्रकारे वर चढल्याने तेसर्पम्हटले गेले आणि खाली पडल्यानेअहिम्हटले गेले, नंतर जगरचयिता ब्रह्माने क्रोधित होऊन क्रोधयुक्त प्राण्यांची रचना केली.  ते कपिश (काळपट पिवळ्या) वर्णाचे, अति उग्र स्वभावाचे व मांसाहारी बनले .

 


 
गायतोऽङ्‌गात्समुत्पन्ना गन्धर्वास्तस्य तत्क्षणात् ।
 
पिबन्तो जज्ञिरे वाचं गन्धर्वास्तेन ते द्विज ॥ ४६ ॥

त्यानंतर गायन करते समयी त्याच्या शरीरातून तत्क्षणी गन्धर्व उत्पन्न झाले.
हे द्विजा ! ते वाणीचा उच्चार करत अर्थात बोलतच उत्पन्न झाले होते म्हणूनगन्धर्वम्हटले गेले .




 
एतानि सृष्ट्‍वा भगवान् ब्रह्मा तच्छक्तिचोदितः ।
 
ततः स्वच्छन्दतोऽन्यानि वयांसि वयसोऽसृजत् ॥ ४७ ॥

ह्या सर्वांची रचना करून भगवान ब्रह्माने पक्ष्यांना, त्यांच्या पूर्व-कर्मांनी प्रेरित होऊन स्वछंदतापूर्वक अपल्या आयुने रचले .

 


 
अवयो वक्षसश्चक्रे मुखतोऽजाः स सृष्टवान् ।
 
सृष्टवानुदराद्‌गाश्च पार्श्वाभ्यां च प्रजापतिः ॥ ४८ ॥

पद्‌भ्यां चाश्वान्समा तङ्‌गान्‍रास भान्गव यान्मृगान् ।
 
उष्ट्रानश्वतरांश्चैव न्यङ्‌कूनन्याश्च जातयः ॥ ४९ ॥

तदनन्तर आपल्या वक्ष:स्थलापासून मेंढी, मुखापासून बकरी, उदर आणि पार्श्वभागापासून गाय, पायांपासून घोड़े, हत्ती, गाढव, वनगाय, मृग, उंट, खेचर आणि न्यंक आदि पशुंची रचना केली .

 


 
ओषध्यः फलमूलिन्यो रोमभ्यस्तस्य जज्ञिरे ।
 
त्रेतायुगमुखे ब्रह्मा कल्पस्यादौ द्विजोत्तम ।
 
सृष्ट्‍वा पश्वोषधीः सम्यग्युयोज स तदाध्वरे ॥ ५० ॥

त्याच्या(ब्रह्माच्या) केसांपासून फल-मूलरूप औषधि उत्पन्न झाली. हे द्विजोत्तमा ! कल्पाच्या आरम्भीच  ब्रह्माने पशु और औषधि आदिंची रचना करून नंतर त्रेतायुगाच्या आरम्भी त्यांना यज्ञादि कर्मांमध्ये सम्मिलित केले .

 


गौरजः पुरुषो मेषश्चाश्वाश्वतरगर्दभाः ।
एतान्ग्राम्यान्पशूनाहुरारण्यांश्च निबोध मे ॥ ५१ ॥

गाय, बकरी, पुरुष, मेंढी, घोड़े, खेचर आणि गाढव हे सर्व गावात राहाणारे पशु आहेत .


श्वापदो द्विखुरो हस्ती वानरः पक्षिपञ्चमाः ।
 
औदकाः पशवः षष्ठाः सप्तमास्तु सरीसृपाः ॥ ५२ ॥

जंगली पशु हे आहेत – श्वापद(व्याघ्र आदि), दोन खुरांचे (वनगाय आदि), हत्ती, माकड आणि पाचवे पक्षी, साहावे जलातील जीव तसेच सातवे सरपटणारे प्राणी आदि .

 


 
गायत्रं च ऋचश्चैव त्रिवृत्साम रथन्तरम् ।
 
अग्निष्टोमं च यज्ञानां निर्ममे प्रथमान्मुखात् ॥ ५३ ॥

मग ब्रह्माने आपल्या प्रथम मुखातून गायत्री, ऋक, त्रिवृत्साम रथन्तर आणि अग्निष्टोम यज्ञांना निर्माण केले .

 


 
यजूंषि त्रैष्टुभं छन्दः स्तोमं पञ्चदशं तथा ।
 
बृहत् साम तथोक्थं च दक्षिणादसृजन्मुखात् ॥ ५४ ॥

दक्षिण-मुखापासून यजु, त्रैष्टुभ छंद, पंचदश स्तोम, बृहत्साम तथा उक्थ ह्यांची रचना केली.

 


 
सामानि जगतीछन्दः स्तोमं सप्तदशं तथा ।
 
वैरूपमतिरात्रं च पश्चिमादसृजन्मुखात् ॥ ५५ ॥

पश्चिम मुखापासून साम, जगतीछंद, सप्तदशस्तोम, वैरूप आणि अतिरात्र ह्यांना उत्पन्न केले.

 


 
एकविंशमथर्वाणमाप्तोर्यामाणमेव च ।
 
अनुष्टुभं स वैराजमुत्तरादसृजन्मुखात् ॥ ५६ ॥

तसेच उत्तर मुखापासून त्याने एकविंशतिस्तोम अथर्ववेद, आप्तोर्यामाण, अनुष्टुपछंद आणि वैराजची सृष्टि केली.


 
उच्चावचानि भूतानि गात्रेभ्यस्तस्य जज्ञिरे ।
 
देवासुरपितॄन् सृष्ट्‍वा मनुष्यांश्च प्रजापतिः ॥ ५७ ॥

 ततः पुनः ससर्जादौ सङ्‍कल्पस्य पितामहः ।
 
यक्षान् पिशाचान्गन्धर्वान् तथैवाप्सरसां गणान् ॥ ५८ ॥

नरकिंनररक्षांसि वयःपशुमृगोरगान् ।
 
अव्ययं च व्ययं चैव यदिदं स्थाणुजङ्‌गमम् ॥ ५९ ॥

अशाप्रकारे त्याच्या शरीरापासून समस्त उच्च नीच प्राणी उत्पन्न झाले. त्या आदिकर्ता प्रजापति भगवान ब्रह्माने देव, असुर, पितृगण आणि मनुष्यांची सृष्टि करून त्यानंतर कल्पाचा आरम्भ झाल्यावर मग यक्ष, पिशाच, गन्धर्व, अप्सरागण, मनुष्य, किन्नर, राक्षस, पशु, पक्षी, मृग आणि सर्प आदि सम्पूर्ण नित्य तसेच अनित्य स्थावर जंगम जगताची रचना केली .



तत् ससर्ज तदा ब्रह्मा भगवानादिकृत्प्रभुः ।
 
तेषां ये यानि कर्माणि प्राक्सृष्ट्यां प्रतिपेदिरे ।
 
तान्येव प्रतिपद्यन्ते सृज्यमानाः पुनः पुनः ॥ ६० ॥

त्यापैकी ज्यांचे जसे जसे कर्म पूर्वकल्पांमध्ये होते पुन्हा पुन्हा सृष्टि निर्माण झाल्यावर ते त्याच प्रकारच्या कर्मांत परत प्रवृत्त होतात .

 


 
हिंस्राहिंस्रे मृदुक्रूरे धर्माधर्मावृतानृते ।
 
तद्‌भाविताः प्रपद्यन्ते तस्मात्तत्तस्य रोचते ॥ ६१ ॥

त्यावेळी हिंसा-अहिंसा, मृदुता-कठोरता, धर्म-अधर्म, सत्य-मिथ्या हे सर्व आपल्या पूर्व भावनेनुसार त्यांना प्राप्त होते, म्हणूनच त्यांना ते आवडते .

 


 
इन्द्रियार्थेषु भूतेषु शरीरेषु च स प्रभुः ।
 
नानात्वं विनियोगं च धातैवं व्यसृजत्स्वयम् ॥ ६२ ॥

अशाप्रकारे प्रभु विधाताने स्वयं इंद्रियांचे विषय, भूत व शरीर आदिंमध्ये विभिन्नता आणि व्यवहार उत्पन्न केला आहे .

 


 
नाम रूपं च भूतानां कृत्यानां च प्रपञ्चनम् ।
 
वेदशब्देभ्य एवादौ देवादीनां चकार सः ॥ ६३ ॥

त्यानेच कल्पाच्या आरंभी देवता आदि प्राण्यांचे वेदानुसार नाम-रूप तथा कार्य-विभाग निश्चित केला आहे .



 
ऋषीणां नामधेयानि यथा वेदश्रुतानि वै ।
 
यथा नियोगयोग्यानि सर्वेषामपि सोऽकरोत् ॥ ६४ ॥

ऋषि तथा अन्य प्राण्यांचे देखील वेदानुकूल नाव आणि यथायोग्य कर्मांना त्यानेच  निर्दिष्ट केले आहे .

 


 
यथर्तुष्वृतुलिङ्‌गानि नानारूपाणि पर्यये ।
 
दृश्यन्ते तानि तान्येव तथा भावा युगादिषु ॥ ६५ ॥

ज्याप्रकारे भिन्न – भिन्न ऋतुंच्या पुन्हापुन्हा येण्याने त्यांची चिन्हे व नाम-रूप आदि पूर्ववत राहतात तसेच  युगादि मध्येही त्यांचे पूर्व भावच पाहिले जातात .

 


 
करोत्येवंविधां सृष्टिं कल्पादौ स पुनः पुनः ।
 
सिसृक्षाशक्तियुक्तोऽसौ सृज्यशक्तिप्रचोदितः ॥ ६६ ॥

सिसृक्षा शक्ति (सृष्टि-रचनेचे प्रारब्ध)च्या प्रेरणेने कल्पांच्या आरंभी वारंवार अशाच प्रकास सृष्टिची रचना ते करतात.





     
इति श्रीविष्णुपुराणे प्रथमे अंशे पञ्चमोऽध्यायः

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, तृतीय अंश, त्रयोदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 3 , Adhyay 13

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ तृतीयः अंशः ॥ त्रयोदशोऽध्यायः ॥   आभ्युदयिक श्राद्ध , प्रेतकर्म तथा श्राद्धादि विचार और्व उवाच सचैलस्य पितुः ...