गुरुवार, ६ नोव्हेंबर, २०२५

विष्णुपुराण, प्रथम अंश, द्वितीय अध्याय | Vishnu Puran , Ansh 1, Adhyay 2

 

॥ विष्णुपुराणम् ॥

॥ प्रथमः अंशः ॥ ॥ द्वितीयोऽध्यायः ॥


पराशर उवाच :
अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने ।
सदैकरूपरूपाय विष्णवे सर्वजिष्णवे ॥ १ ॥
पराशर म्हणाले –  त्या विकाररहित, शुद्ध, अविनाशी, परमात्मा, सर्वदा एकरस, सर्वविजयी भगवान वासुदेव विष्णुला नमस्कार .

 

नमो हिरण्यगर्भाय हरये शंकराय च ।
वासुदेवाय ताराय सर्गस्थित्यन्तकारिणे ॥ २ ॥

हिरण्यगर्भ म्हणजे ब्रह्मा, हरी म्हणजे विष्णु और शंकर जे जगताच्या उत्पत्ति, स्थिति और संहाराचे कारण आहेत आणि वासुदेव जे आपल्या भक्तांना संसार-सागरातून तारणारे आहेत त्यांना नमस्कार .  

 

एकानेकस्वरूपाय स्थूलसूक्ष्मात्मने नमः ।
अव्यक्तव्यक्तरूपाय विष्णवे मुक्तिहेतवे ॥ ३ ॥

जो एक असूनही अनेक आहे , जो स्थूल तसेच सूक्ष्म देखील आहे , जो अव्यक्त (कारण) आणि व्यक्त (कार्य) आहे , जो आपल्या अनन्य भक्तांच्या मुक्तीचे कारण आहे त्या श्रीविष्णुला नमस्कार .



सर्गस्थितिविनाशानां जगतो यो जगन्मयः ।
मूलभूतो नमस्तस्मै विष्णवे परमात्मने ॥ ४ ॥

जो विश्वरूप प्रभु विश्वाच्या उत्पत्ति, स्थिति व संहाराचे मूळ कारण आहे त्या परमात्मा विष्णुला नमस्कार .

 

आधारभूतं विश्वस्याप्यणीयांसमणीयसाम् ।
प्रणम्य सर्वभूतस्थमच्युतं पुरुषोत्तमम् ॥ ५ ॥

जो संपूर्ण विश्वाचा आधारभूत म्हणजे अधिष्ठान आहे, जो अतिसूक्ष्माहूनही सूक्ष्म आहे, अशा सर्व प्राणीमात्रांमध्ये स्थित असलेल्या त्या अविनाशी पुरुषोत्तमाला नमस्कार .  

 

ज्ञानस्वरूपमत्यन्तनिर्मलं परमार्थतः ।
तमेवार्थस्वरूपेण भ्रान्तिदर्शनतः स्थितम् ॥ ६ ॥

विष्णुं ग्रसिष्णुं विश्वस्य स्थितिसर्गे तथा प्रभुम् ।
प्रणम्य जगताम् ईशमजमक्षयमव्ययम् ॥ ७ ॥

कथयामि यथापूर्वं दक्षाद्यैर्मुनिसत्तमैः ।
पृष्टः प्रोवाच भगवानब्जयोनिः पितामहः ॥ ८ ॥

जो परमार्थत: म्हणजे प्रत्यक्षात अत्यंत निर्मळ ज्ञानस्वरूप आहे, पण जिवाच्या अज्ञानामुळे नाना पदार्थरूपी भासतो, तसेच जो काळ बनून जगताची उत्पत्ति स्थिति आणि संहार करणारा आहे,  त्या जगदीश्वर, अजन्मा, अक्षय आणि अव्यय अशा भगवान विष्णुला नमस्कार करून, मी तुला सर्व प्रसंग सांगतो जो पूर्वी दक्ष आदि मुनिश्रेष्ठांच्या विचारण्यावरून अब्जयोनि पितामह भगवान ब्रह्मांनी त्यांना सांगितला होता .

 

तैश्चोक्तं पुरुकुत्साय भूभुजे नर्मदातटे ।
सारस्वताय तेनापि मम सारस्वतेन च ॥ ९ ॥

तो प्रसंग दक्ष आदि मुनींनी नर्मदेच्या तीरावर राजा पुरुकुत्सला ऐकवला आणि पुरुकुत्साने सारस्वताला आणि सारस्वताने मला सांगितला होता .  

 

परः पराणां परमः परमात्मात्मसंस्थितः ।
रूपवर्णादिनिर्देशविशेषणविवर्जितः ॥ १० ॥

अपक्षयविनाशाभ्यां परिणामर्द्धिजन्मभिः ।
वर्जितः शक्यते वक्तुं यः सदास्तीति केवलम् ॥ ११ ॥

सर्वत्रासौ समस्तं च वसत्यत्रेति वै यतः ।
ततः स वासुदेवेति विद्वद्भिः परिपठ्यते ॥ १२ ॥

ज्याचा कधीच पार लागत नाही, जो परमश्रेष्ठ, अंतरात्म्यात स्थित परमात्मा, रूप, वर्ण, नाव आणि विशेषण आदिपासून रहित आहे, ज्याच्यात जन्म, वृद्धि, परिणाम, क्षय आणि नाश ह्या विकारांचा सर्वथा अभाव है, ज्याला केवळ “आहे” इतकंच म्हणू शकतो, तसेच ज्याच्याबद्दल असे म्हटले जाते की “तो सर्वत्र आहे आणि त्याच्यात समस्त विश्व वसलेलं आहे”. म्हणून विद्वान त्याला वासुदेव म्हणतात .



एकस्वरूपं च सदा हेयाभावाच्च निर्मलम् ॥ १३ ॥

तेच ब्रह्म नित्य, अजन्म, अक्षय, अव्यय, एकरस आणि हेय (त्याज्य) आदि गुणांचे  निर्मळ परब्रह्म आहे .

 


तदेव सर्वमेवैतद्‌व्यक्ताव्यक्तस्वरूपवत् ।
तथा पुरुषरूपेण कालरूपेण च स्थितम् ॥ १४ ॥

तेच ब्रह्म व्यक्त (कार्य) आणि अव्यक्त (कारण) जगताच्या स्वरूपात , तसेच साक्षी स्वरूप पुरुष आणि काळाच्या स्वरूपात स्थित आहे .



परस्य ब्रह्मणो रूपं पुरुषः प्रथमं द्विज ।
व्यक्ताव्यक्ते तथैवान्ये रूपे कालस्तथापरम् ॥ १५ ॥

हे द्विजा ! परब्रह्माचे प्रथम रूप पुरुष आहे, अव्यक्त (प्रकृति) और व्यक्त (महदादि) त्याची अन्य रूपे आहेत तसेच सर्वांना क्षोभित करणारा काळ हे त्याचे परमरूप आहे .



प्रधानपुरुषव्यक्तकालानां परमं हि यत् ।
पश्यन्ति सूरयः शुद्धं तद्‌विष्णोः परमं पदम् ॥ १६ ॥

अशाप्रकारे जो प्रधान, पुरुष, व्यक्त और काळ ह्या चारहीच्या पलीकडे आहे तसेच ज्याला केवळ विद्वानच पाहू शकतात तेच श्रीविष्णुचे परमपद आहे.

 

प्रधानपुरुषव्यक्तकालास्तु प्रविभागशः ।
रूपाणि स्थितिसर्गान्तव्यक्तिसद्‌भावहेतवः ॥ १७ ॥

प्रधान, पुरुष, व्यक्त आणि काळ श्रीविष्णुची वेगवेगळी रुपे विश्वाची उत्पत्ति, पालन आणि संहार ह्यांच्या प्रकाश व उत्पादनाचे कारण आहे.



व्यक्तं विष्णुस्तथाव्यक्तं पुरुषः काल एव च ।
क्री?अतो बालकस्येव चेष्टां तस्य निशामय ॥ १८ ॥

श्रीविष्णु जो व्यक्त, अव्यक्त, पुरुष और काळरूपात स्थित असतो, त्याची ही बाललीलाच आहे असे समज.

 


अव्यक्तं कारणं यत्तत्प्रधानमृषिसत्तमैः ।
प्रोच्यते प्रकृतिः सूक्ष्मा नित्या सदसदात्मिका ॥ १९ ॥

ह्यांच्यातील जे अव्यक्त कारण आहे, जे सदसद्रूप शक्तिविशिष्ट आणि नित्य एकरस आहे, श्रेष्ठ मुनिजन त्याला प्रधान तथा सूक्ष्म प्रकृति म्हणतात .



अक्षयं नान्यदाधारममेयमजरं ध्रुवम् ।
शब्दस्पर्शविहीनं तद्‌रूपादिभिरसंहितम् ॥ २० ॥

ते क्षयरहित असून , त्याला अन्य कोणताही आधार नाही तसेच ते अप्रमेय, अजर, निश्चल शब्द-स्पर्शीदिशून्य आणि रुपादिरहित आहे.



त्रिगुणं तज्जगद्योनिरनादिप्रभवाव्ययम् ।
तेनाग्रे सर्वमेवासीद्‌व्याप्तं वै प्रलयादनु ॥ २१ ॥

ते त्रिगुणमय असून विश्वाचे कारण आहे तसेच ते स्वयं अनादि असून उत्पत्ति आणि प्रलयरहित आहे . विश्वाचा हा संपूर्ण प्रपंच प्रलयकाळापासून सृष्टिच्या आरंभापर्यन्त ह्यानेच व्याप्त होता .



वेदवादविदो विद्वन् नियता ब्रह्मवादिनः ।
पठन्ति चैतमेवार्थं प्रधानप्रतिपादकम् ॥ २२ ॥

हे विद्वन ! श्रुतिचे मर्म जाणणारे, श्रुतिपरायण ब्रह्मवेत्ता महात्मागण ह्याच अर्थाला लक्ष्य मानून हा प्रधान प्रतिपादक श्लोक म्हणतात



नाहो न रात्रिर्न नभो न भूमि-
र्नासीत्तमोज्योतिरभूच्च चान्यत् ।

त्यावेळी (प्रलयकाळी) ना दिवस होता ना रात्र होती, ना आकाश होते ना पृथ्वी. ना अंधार होता ना प्रकाश आणि ह्या व्यतिरिक्त अन्य काहीही नव्हते.  



श्रोत्रादिबुद्ध्यानुपलभ्यमेकं
प्राधानिकं ब्रह्म पुमांस्तदासीत् ॥ २३ ॥

केवळ श्रोत्रादि इंद्रिय आणि बुद्धि आदिना अविषय असे एक प्रधान ब्रह्म आणि पुरुष इतकेच होते .



विष्णोः स्वरूपात्परतो हि ते द्वे रूपे प्रधानं पुरुषश्च विप्र ।
तस्यैव तेऽन्येन धृते वियुक्ते रूपान्तरं तद्‌द्विज कालसंज्ञम् ॥ २४ ॥

हे विप्रा ! श्रीविष्णुच्या परम (उपाधिरहित) स्वरूपापासून प्रधान आणि पुरुष ही दोन रुपे निर्माण झाली, त्याच श्रीविष्णूच्या ज्या अन्य रूपाद्वारे दोन्ही सृष्टि प्रलय काळी, संयुक्त आणि वियुक्त होतात त्या रूपान्तराचेच नाव काळ असे आहे .



प्रकृतौ च स्थितं व्यक्तमतीतप्रलये तु यत् ।
तस्मात् प्राकृतसंज्ञोऽयमुच्यते प्रतिसञ्चरः ॥ २५ ॥

आधीच्या प्रलयकाळी हा व्यक्त प्रपंच प्रकृती मध्ये लीन होता म्हणून प्रपंचाच्या ह्या प्रलयाला प्राकृत प्रलय म्हणतात .


अनादिर्भगवान्कालो नान्तोऽस्य द्विज विद्यते ।
अव्युच्छिन्नास्ततस्त्वेते सर्गस्थित्यन्तसंयमाः ॥ २६ ॥

हे द्विजा ! काळरूप भगवान अनादि आहे, त्याला अंत नाही . म्हणूनच विश्वाची उत्पत्ति, स्थिति आणि प्रलय देखील कधीच थांबत नाहीत . ते प्रवाहरूपी असे निरंतर होत राहतात .  



गुणसाम्ये ततस्तस्मिन्पृथक्पुंसि व्यवस्थिते ।
कालस्वरूपं तद्‌विष्णोर्मैत्रेय परिवर्तते ॥ २७ ॥

हे मैत्रेया ! प्रलयकाळी प्रधान प्रकृतिच्या साम्यावस्थेत स्थित होत असल्याने आणि पुरुष प्रकृति पासून वेगळा होत असल्याने श्रीविष्णुचे काळरूप प्रवृत्त होते .



ततस्तत् परमं ब्रह्म परमात्मा जगन्मयः ।
सर्वगः सर्वभूतेशः सर्वात्मा परमेश्वरः ॥ २८ ॥

प्रधानपुरुषौ चापि प्रविश्यात्मेच्छया हरिः ।
क्षोभयामास सम्प्राप्ते सर्गकाले व्ययाव्ययौ ॥ २९ ॥

त्यानंतर सर्गकाल उपस्थित झाल्यावर त्या परब्रह्म परमात्मा विश्वरूप सर्वव्यापी सर्वभूतेश्वर सर्वात्मा परमेश्वराने विकारी प्रधान आणि अविकारी पुरुष ह्यांच्यात प्रविष्ट होऊन त्यांना क्षोभित केले .



यथा सन्निधिमात्रेण गन्धः क्षोभाय जायते ।
मनसो नोपकर्तृत्वात्तथासौ परमेश्वरः ॥ ३० ॥

ज्याप्रकारे क्रियाशील नसतानाही गंध आपल्या केवळ सन्निध्याने मनाला क्षोभित करतो त्याचप्रमाणे परमेश्वर आपल्या केवळ सन्निध्याने प्रधान आणि पुरुषाला प्रेरित करतो .


स एव क्षोभको ब्रह्मन् क्षोभ्यश्च पुरुषोत्तमः ।
स सङ्‌कोचविकासाभ्यां प्रधानत्वेऽपि च स्थितः ॥ ३१ ॥

हे ब्रह्मन ! तो पुरुषोत्तमच ह्यांना क्षोभित करणारा आहे आणि क्षुब्ध होणारा देखील तोच आहे . तसेच  संकोच (साम्य) आणि विकास (क्षोभ) युक्त प्रधानरूपात देखील तोच स्थित आहे .

 

विकासाणुस्वरूपैश्च ब्रह्मरूपादिभिस्तथा ।
व्यक्तस्वरूपश्च तथा विष्णुः सर्वेश्वरेश्वरः ॥ ३२ ॥

ब्रह्मादि समस्त ईश्वरांचा ईश्वर तो श्रीविष्णुच समष्टि-व्यष्टिरूप, ब्रह्मादि जीवरूप तसेच महत्तत्त्वरूपात स्थित आहे.



गुणसाम्यात्ततस्तस्मात्क्षेत्रज्ञाधिष्ठितान्मुने ।
गुणव्यञ्जनसंभूतिः सर्गकाले द्विजोत्तम ॥ ३३ ॥

प्रधानतत्त्वमुद्‌भूतं महान्तं तत्समावृणोत् ।
सात्त्विको राजसश्चैव तामसश्च त्रिधा महान् ॥ ३४ ॥

हे द्विजश्रेष्ठा ! सर्गकाळाच्या वेळी गुणांनी युक्त असे साम्यावस्थारूप प्रधान जेव्हा श्रीविष्णुच्या क्षेत्रज्ञरूपात अधिष्ठित झाले तेव्हा त्यातून महत्तत्त्व उत्पन्न झाले , ह्या उत्पन्न झालेल्या महत्तत्त्वाला प्रधानतत्त्वाने आवृत्त केले, महत्तत्त्व सात्त्विक, राजस और तामस अशा भेदांनी तीन प्रकारचे आहे .



प्रधानतत्त्वेन समं त्वचा बीजमिवावृतम् ।
वैकारिकस्तैजसश्च भूतादिश्चैव तामसः ॥ ३५ ॥

परंतु ज्याप्रकारे बीज सालीच्या आत समभावाने झाकलेले असते तसेच ह्या त्रिविध महत्तत्त्वापासूनच वैकारिक (सात्त्विक) तेजस (राजस) आणि तामस भूतादि तीन प्रकारचा अहंकार उत्पन्न झाला .



त्रिविधोऽयमहङ्‌कारो महत्तत्त्वादजायत ।
भूतेन्द्रियाणां हेतुस्स त्रिगुणत्वान्महामुने ।
यथा प्रधानेन महान्महता स तथावृतः ॥ ३६ ॥

हे महामुने ! हा अहंकार त्रिगुणात्मक असल्याने भूत आणि इन्द्रिय आदींचे कारण आहे तसेच प्रधानाने जसे महत्तत्त्व व्याप्त आहे , तसेच महत्तत्त्वाने हा (अहंकार) व्याप्त आहे .

 

भूतादिस्तु विकुर्वाणः शब्दतन्मात्रकं ततः ।
ससर्ज शब्दतन्मात्रादाकाशं शब्दलक्षणम् ॥ ३७ ॥

भूतादि नामक तामस अहंकाराने विकृत होऊन शब्द-तन्मात्रा आणि त्या पासून शब्द-गुणयुक्त आकाशाची रचना केली.




शब्दमात्रं तथाकाशं भूतादिः स समावृणोत् ।
आकाशस्तु विकुर्वाणः स्पर्शमात्रं ससर्ज ह ॥ ३८ ॥

त्या भूतादि तामस अहंकाराने शब्द-तन्मात्रारूप आकशाला व्याप्त केले . त्यानंतर शब्द तन्मात्रारूप आकशाने विकृत होऊन स्पर्श-तन्मात्राची रचना केली.



बलवानभवद्‌वायुस्तस्य स्पर्शो गुणो मतः ।
आकाशं शब्दमात्रं तु स्पर्शमात्रं समावृणोत् ॥ ३९ ॥

त्यापासून (स्पर्श-तन्मात्रा) बलवान वायु झाला , ज्याचा गुण स्पर्श मानला गेला आहे . शब्द-तन्मात्रारूप आकशाने स्पर्श-तन्मात्रायुक्त वायुला आवृत केले आहे .



ततो वायुर्विकुर्वाणो रूपमात्रं ससर्ज ह ।
ज्योतिर् उत्पद्यते वायोस्तद्‌रूपगुणमुच्यते ॥ ४० ॥

नंतर स्पर्श-तन्मात्रारूप वायुने विकृत होऊन रूप-तन्मात्राची निर्मिती केली, रूप-तन्मात्रायुक्त वायुपासून तेज उत्पन्न झाले, ज्याचा गुण रूप मानले गेले आहे .



स्पर्शमात्रं तु वै वायू रूपमात्रं समावृणोत् ।
ज्योतिश्चापि विकुर्वाणं रसमात्रं ससर्ज ह ॥ ४१ ॥

स्पर्श-तन्मात्रा वायुने रूप-तन्मात्रायुक्त तेजाला आवृत केले. त्यानंतर रूप – तन्मात्रामय तेज देखील विकृत झाले आणि त्यापासून रस-तन्मात्राची निर्मिती झाली .



संभवन्ति ततोऽम्भांसि रसाधाराणि तानि च ।
रसमात्राणि चाम्भांसि रूपमात्रं समावृणोत् ॥ ४२ ॥

ह्या रस-तन्मात्रारूपा पासून रस-गुणयुक्त जल निर्माण झाले . रस-तन्मात्रायुक्त जलाला रूप-तन्मात्रामय तेजाने आवृत्त केले.



विकुर्वाणानि चाम्भांसि गन्धमात्रं ससर्जिरे ।
संघातो जायते तस्मात्तस्य गन्धो गुणो मतः ॥ ४३ ॥

रस-तन्मात्रारूप जलात विकार होऊन गंध-तन्मात्रा निर्माण झाले ज्यापासून पृथ्वी उत्पन्न झाली जिचा गुण गंध मानला गेला आहे .

 


तस्मिंस्तस्मिंस्तु तन्मात्रा तेन तन्मात्रता स्मृता ॥ ४४ ॥

ती आकाशादि भुते तन्मात्रायुक्त असल्याने त्यांना तन्मात्रा (गुणरूप) असेच म्हटले गेले आहे .




तन्मात्राण्यविशेषाणि अविशेषास्ततो हि ते ॥ ४५ ॥

तन्मात्रा मध्ये विशेष भाव नाही म्हणून ते अविशेष आहेत .  

 

न शान्ता नापि घोरास्ते न मूढाश्चाविशेषिणः ।
भूततन्मात्रसर्गोऽयमहङ्‌कारात्तु तामसात् ॥ ४६ ॥

ती सर्व अविशेष तन्मात्रा शांत, घोर अथवा मूढ़ नाहीत, अर्थात त्यांचा सुख-दुःख किंवा मोहरूपी अनुभव येणं शक्य नाही . अशाप्रकारे तामस अहंकारापासून हा भूत-तन्मात्रारूपी सर्ग झालेला आहे .


तैजसानीन्द्रियाण्याहुर्देवा वैकारिका दश ।
एकादशं मनश्चात्र देवा वैकारिकाः स्मृताः ॥ ४७ ॥

दहा इंद्रिये तेजस म्हणजेच राजस अहंकारापासून आणि त्यांचे अधिष्ठाता देवता वैकारिक म्हणजेच सात्त्विक अहंकारापासून उत्पन्न झाल्याचे म्हटले गेले आहे . अशाप्रकारे इंद्रियांच्या अधिष्ठाता दहा देवता आणि अकरावे मन वैकारिक (सात्त्विक) आहे .



त्वक् चक्षुर्नासिका जिह्वा श्रोत्रमत्र च पञ्चमम् ।
शब्दादीनामवाप्त्यर्थं बुद्धियुक्तानि वै द्विज ॥ ४८ ॥

हे द्विजा ! त्वचा, डोळे, नाक, जीभ आणि कान ही पाच बुद्धीच्या सहाय्याने शब्दादि विषयांचे ग्रहण करणारी पाच ज्ञानेंद्रिये आहेत .



पायूपस्थौ करौ पादौ वाक् च मैत्रेय पञ्चमी ।
विसर्गशिल्पगत्युक्ति कर्म तेषां च कथ्यते ॥ ४९ ॥

हे मैत्रेया ! पायु(गुद), उपरथ(लिंग), हस्त(हात), पाद(पाय) और वाक्(वाचा) – ही पाच कर्मेन्द्रिये आहेत . ह्यांचे काम मूल-मूत्र त्याग, शिल्प, गति आणि वचन सांगितले गेले आहेत .



आकाशवायुतेजांसि सलिलं पृथिवी तथा ।
शब्दादिभिर्गुणैर्ब्रह्मन्संयुक्तान्युत्तरोत्तरैः ॥ ५० ॥

आकाश, वायु, तेज, जल आणि पृथ्वी  ही पाच भुते उत्तरोत्तर (क्रमश:) शब्द-स्पर्श आदि पाच गुणांनी युक्त आहेत .



शान्ता घोराश्च मूढाश्च विशेषास्तेन ते स्मृताः ॥ ५१ ॥

ही पाच भुते शांत घोर आणि मूढ़ आहेत अर्थात सुख, दुःख आणि मोहयुक्त आहेत म्हणून त्यांना विशेष म्हटलं जातं.

 

नानावीर्याः पृथग्भूतास्ततस्ते संहतिं विना ।
नाशक्नुवन्प्रजाः स्रष्टुमसमागम्य कृत्स्नशः ॥ ५२ ॥

ह्या भूतांमध्ये पृथक-पृथक नाना शक्ति आहेत . म्हणून ते परस्परांसोबत पूर्णत: एकत्र आल्याशिवाय विश्वाची रचना करू शकले नाहीत .



समेत्यान्योन्यसंयोगं परस्परसमाश्रयाः ।
एकसंघातलक्ष्याश्च सम्प्राप्यैक्यमशेषतः ॥ ५३ ॥
पुरुषाधिष्ठितत्वाच्च अव्यक्तानुग्रहेण च ।
महदाद्या विशेषान्ता ह्यण्डमुत्पादयन्ति ते ॥ ५४ ॥

म्हणून एक दुसऱ्याच्या आश्रयाने राहणाऱ्या आणि एक-दुसऱ्याचे आश्रय असणाऱ्या आणि एकाच संघाताच्या उत्पत्तिच्या लक्ष्याच्या महत्तत्त्वापासून विशेषपर्यन्त प्रकृतिच्या ह्या सर्व विकारांनी पुरुषाकडून अधिष्ठित झाल्याने परस्पर मिळून सर्वथा एक होऊन प्रधानतत्त्वाच्या अनुग्रहाने अंड्याची उत्पत्ति केली.



तत् क्रमेण विवृद्धं तु जलबुद्बुदवत् समम् ।
भूतेभ्योऽण्डं महाबुद्धे बृहत्तदुदकेशयम् ।
प्राकृतं ब्रह्मरूपस्य विष्णोः स्थानमनुत्तमम् ॥ ५५ ॥
हे महाबुद्धे ! पाण्याच्या बुडबुड्या प्रमाणे क्रमश: भूतांपासून मोठ झालेलं ते गोलाकार पाण्यावर स्थित महान अंडे ब्रह्म (हिरण्यगर्भ) रूप श्रीविष्णुचा अति उत्तम प्राकृत आधार बनले.



तत्राव्यक्तस्वरूपोऽसौ व्यक्तरूपी जगत्पतिः ।
विष्णुर्ब्रह्मस्वरूपेण स्वयमेव व्यवस्थितः ॥ ५६ ॥

त्यात(अंड्यात) अव्यक्त-स्वरूप जगत्पति श्रीविष्णु व्यक्त हिरण्यगर्भरूपाने स्वयं विराजमान झाले .



मेरुरुल्बमभूत्तस्य जरायुश्च महीधराः ।
गर्भोदकं समुद्राश्च तस्यासन्सुमहात्मनः ॥ ५७ ॥

त्या महात्मा हिरण्यगर्भाचा सुमेरु म्हणजे उल्ब (गर्भावरचे वेष्टन), अन्य पर्वत म्हणजे जरायु (गर्भाशय) आणि समुद्र म्हणजे गर्भाशयस्थ रस होता .



साद्रिद्वीपसमुद्राश्च सज्योतिर् लोकसङ्‌ग्रहः ।
तस्मिन्नण्डेऽभवद्‌विप्र सदेवासुरमानुषः ॥ ५८ ॥

हे विप्रा ! त्या अंड्यातच पर्वत आणि द्वीप आदींसह समुद्र, ग्रह-गणासहित सम्पूर्ण लोक तसेच देव, असुर आणि मनुष्य आदि विविध प्राणिवर्ग प्रकट झाले .



वारिवह्न्यनिलाकाशैस्ततो भूतादिना बहिः ।
वृतं दशगुणैरण्डं भूतादिर्महता तथा ॥ ५९ ॥

ते अंडे पूर्व-पूर्वच्या अपेक्षेने दहा दहा गुण अधिक जल, अग्नि, वायु, आकाश आणि भूतादि अर्थात तामस-अहंकाराने आवृत आहे तसेच भूतादि महत्तत्त्वाने घेरलेले आहे.



अव्यक्तेनावृतो ब्रह्मंस्तैः सर्वैः सहितो महान् ।
एभिरावरणैरण्डं सप्तभिः प्राकृतैर् वृतम् ।
नालिकेरफलस्यान्तर्बीजं बाह्यदलैरिव ॥ ६० ॥
आणि ह्या सर्वांसाहित ते महत्तत्त्व देखील अव्यक्त प्रधानाने आवृत आहे . ज्याप्रकारे नारळाच्या फळाचे आतील बीज अनेक सालींनी झाकलेले असते तसेच हे अंडे देखील ह्या सात प्राकृत आवरणांनी घेरलेले आहे .


जुषन् रजोगुणं तत्र स्वयं विश्वेश्वरो हरिः ।
ब्रह्मा भूत्वास्य जगतो विसृष्टौ सम्प्रवर्तते ॥ ६१ ॥

आणि हयात (अंड्यात) स्थित असलेले स्वयं विश्वेश्वर भगवान श्रीविष्णु ब्रह्मा बनून रजोगुणांचा आश्रय घेऊन ह्या विश्वाच्या रचनेत प्रवृत्त होतात .



सृष्टं च पात्यनुयुगं यावत्कल्पविकल्पना ।
सत्त्वभृद्‌भगवान्विष्णुरप्रमेयपराक्रमः ॥ ६२ ॥

तसेच रचना झाल्यानंतर सत्त्वगुण-विशिष्ट अतुल पराक्रमी भगवान श्रीविष्णु त्याचे (विश्वाचे) कल्पांतपर्यन्त युगा युगात पालन करतात .



तमौद्रेकी च कल्पान्ते रुद्ररूपी जनार्दनः ।
मैत्रेयाखिलभूतानि भक्षयत्यतिदारुणः ॥ ६३ ॥

हे मैत्रेय ! नंतर जेव्हा कल्पाचा अंत होतो तेव्हा अति दारुण तम: प्रधान रुद्ररूप धारण करून जनार्दन श्रीविष्णुच समस्त भूतांचे भक्षण करतात .



संभक्षयित्वा भूतानि जगत्येकार्णवीकृते ।
नागपर्यङ्‌कशयने शेतेऽसौ परमेश्वरः ॥ ६४ ॥

प्रबुद्धश्च पुनः सृष्टिं करोति ब्रह्मरूपधृक् ॥ ६५ ॥

अशाप्रकारे समस्त भूतांचे भक्षण करून विश्वाला जलमय करून तो परमेश्वर शेष-शय्येवर शयन करतो आणि जागे झाल्यावर ब्रह्मरूप होऊन परत विश्वाची निर्मिती करतो.

 

सृष्टिस्थित्यन्तकरणाद्‌ब्रह्मविष्णुशिवात्मिकाम् ।
स संज्ञां याति भगवानेक एव जनार्दनः ॥ ६६ ॥

तो एकच भगवान जनार्दन जगताच्या सृष्टि, स्थिति आणि संहारासाठी ब्रह्मा, विष्णु और शिव – ही तीन नावे (रुपे) धारण करतो.



स्रष्टा सृजति चात्मानं विष्णुः पाल्यं च पाति च ।
उपसंहरते चान्ते संहर्ता च स्वयं प्रभुः ॥ ६७ ॥

तो प्रभु श्रीविष्णु स्रष्टा (ब्रह्मा) होऊन आपलीच सृष्टि करतो, पालक श्रीविष्णु होऊन पाल्यरूप आपलेच पालन करतो आणि शेवटी स्वतःच संहारक (शिव) बनून स्वतःच लीन होतो .



पृथिव्यापस्तथा तेजो वायुराकाशमेव च ।
सर्वेन्द्रियान्तःकरणं पुरुषाख्यं हि यज्जगत् ॥ ६८ ॥

पृथ्वी,  जल,  तेज,  वायु आणि आकाश तसेच समस्त इंद्रिये आणि अंत:करण आदि जितके जग आहे ते सर्व पुरुषरूप आहे .



स एव सर्वभूतात्मा विश्वरूपो यतोऽव्ययः ।
सर्गादिकं तु तस्यैव भूतस्थमुपकारकम् ॥ ६९ ॥

आणि तो अव्यय श्रीविष्णुच विश्वरूप आणि सर्व भूतांचा अंतरात्मा असल्याने ब्रह्मादि प्राण्यांमध्ये स्थित सर्गादिक देखील त्याचेच उपकारक आहेत .



स एव सृज्यः स च सर्गकर्ता स एव पात्यत्ति च पाल्यते च ।
ब्रह्माद्यवस्थाभिरशेषमूर्ति- र्विष्णुर्वरिष्ठो वरदो वरेण्यः ॥ ७० ॥

तो सर्वस्वरूप, श्रेष्ठ, वरदायक और वरेण्य (प्रार्थनेच्या योग्य) भगवान श्रीविष्णुच ब्रह्मा आदि स्वरूपात रचना करणारा आहे, तोच रचना करतो, तोच रचला जातो, तोच पालन करतो, तोच पाळला जातो तोच संहार करतो आणि तोच संह्र्त होतो म्हणजे लय पावतो .




        "
इति श्रीविष्णुपुराणे प्रथमे अंशे द्वितीयोऽध्यायः"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विष्णुपुराण, तृतीय अंश, त्रयोदश अध्याय | Vishnu Puran, Ansh 3 , Adhyay 13

  ॥ विष्णुपुराणम् ॥ ॥ तृतीयः अंशः ॥ त्रयोदशोऽध्यायः ॥   आभ्युदयिक श्राद्ध , प्रेतकर्म तथा श्राद्धादि विचार और्व उवाच सचैलस्य पितुः ...